नाईस टू मीट यू
सायंकाळ उलटून गेली होती, अंधार पडायला लागला होता. चंद्रगडाच्या किल्ल्यावर जायचं त्याचं निश्चित झालं होतं. भिल्लाच्या एका वस्तीवर प्रशांत पोहचला. एका भिल्लानं रानातल्या झोपडीत प्रशांतची राहण्याची जुजबी व्यवस्था केली. उघड्यावर झोपण्यापेक्षा बरं म्हणून प्रशांतही खूश झाला होता. शाल अंथरून बॅगेची उशी करुन बराच वेळ प्रशांत लोळत पडला होता. थकल्यामुळे त्याला एक हलकीशी डुलकी लागून गेली होती. डोळे उघडले, बाहेर पाहिलं तर अंधार अंगावर येत होता. दुरवर झोपड्यामधून धपं धपं असा एका तालात भाकरी थापल्याचा आवाज येत होता. कुत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज सुरुच होता.