वाद
मैसूर
२ महिन्यापुर्वीच मैसूर - ऊटी ला जाउन आलो. तेव्हापसुन मनात होते की तिकडचे फोटु टाकावेत म्हणुन. पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही.
हा मैसूरचा प्रसिद्ध राजवाडा. ज्यानी राजस्थानमधले महाल पाहिले असतील त्यांना यात विशेष असे काही वाटणार नाही. पण राजवाडा छान जतन केलेला आहे. आणि इथली सर्वित्तम गोष्ट म्हणजे राजवाड्यातील तैलचित्रे. इतकी जिवंत तैलचित्रे मी आजवर इतर कोठेही पाहिलेली नाहीत. दुर्दैवाने आत कॅमेरा न्यायला बंदी आहे. त्यामुळे छायाचित्रण करता आले नाही. त्यामुळे राजवाड्याची फक्त बाहेरुनच छायाचित्रे काढुन समाधान मानावे लागले
वृंदावनचे पण फोटो टाकणार होतो पण का कोणास ठाऊक, २० वर्षांपुर्वी जे वृंदावन पाहिले होते ते हे नव्हेच असे वाटले. आता ती शान नाही उरली वृंदावनची. गणेशोत्सवात चिंचेच्या तालमीचे कारंजे पण त्याच तोडीचे असते. त्यामुळे असेल कदाचित पण काही विशेष नाही वाटले खरे.
वृंदावनने केलेली निराशा चक्क मैसूरचे प्राणिसंग्रहालय बघुन दुर झाली. आता झू बघुन खुष होण्याचे दिवस गेले खरे म्हणजे. माकड बघुन लहानपणी जे हसु यायचे ते पण येत नाही आता (मि पा ची कृपा. बरीच माकडे आहेत इथे. रोज आरसाही बघतो. त्याचाही परिणाम असेल कदाचित). पण मैसूर चा झू खरोखर अप्रतिम आहे. काही छायाचित्रे:
वरचा फोटो पुर्ण झूम लावुन काढलेला आहे. त्यामुळे क्लॅरिटी थोडी गंडली आहे.
वरच्या फोटोतला मिपाकर कोण हे ज्याचे त्याने ठरवावे 
लहानपणापसुन मैसूरचे सर्वात मोठे आकर्षण होते महिषासुराचा पुतळा. त्याचा हा पुतळा बघुन अंमळ थोडी निराशाच झाली. माझ्या कल्पनेतला हा पुतळा चांगला ५० -१०० फूट उंच आणि १०-१२ फूट रुंद होता. प्रत्यक्ष पुतळा बघुन पुतळ्याचा बोन्साय बघितल्यासारखा वाटला. माझ्या बरोबर असलेल्य मित्रांची पण थोड्याफार फरकाने अशीच निराशा झाली. तरी "तु अजुन थोडा जाड असला असतास तर असाच दिसला असतास" असे म्हणुन मित्राने त्यातल्या त्यात त्याचे मानसिक समाधान साधुन घेतलेच
हेच ते चामुंडा देवीचे सुप्रसिद्ध मंदीर
मैसूर मध्ये आमचे सर्वात जास्त निराशा केली मैसूर मसाला डोश्याने. मैसूर मसाला डोसा हवा असे म्हणालो की लोक आमच्याकडे फार विचित्र नजरेने पाहायचे. हा डोसा पुण्याच्या शेट्ट्यांनी चक्क मैसूरच्या नावावर खपवला आहे. शेवटी या डोश्यावर तडजोड केली. डोसा होता मात्र अप्रतिम
बाकी उटी भाग -२ मध्ये.
द्रष्टेपणा की न्यूनगंड की म्हातारचळ की आणखी काही?
गेल्या काही दिवसांमध्ये काही मनोरंजक बातम्या वाचनात आल्या. वातावरण बदलावरुन किंवा इतर काही कारणावरून मानवप्राण्याच्या भवितव्याबद्दल (नुसतीच) बोंब मारण्याच्या सध्याच्या फॅशनला अनुसरूनच या बातम्या आहेत. पण यात ज्यांचा उल्लेख आहे ते कोणी सोमेगोमे नाहीत. एक आहे प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ आणि दुसरा जैववैज्ञानिक.
त्यांची मते बहुतेकाना टोकाची वाटतील यात शंका नाही आणि त्यातल्या एकाने सांगितलेला उपाय तर एखाद्या हॉलिवुडी विज्ञानपटात शोभून दिसेल असाच आहे.
पहिली बातमी वाचली बीबीसीवर. खाली त्या बातमीचा दुवा दिलेला आहे. सेलिब्रिटी (मराठी शब्द?) भौतिकशास्त्रज्ञ स्टीवन हॉकिंग यांनी मानवजात वाचवण्यासाठी पृथ्वी सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे. कारण म्हणे पृथ्वीवर उल्का आदळण्याचा धोका आहे किंवा अण्विक संहार व्हायचा धोका आहे किंवा पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक स्त्रोत लवकरच संपुष्टात येतील किंवा सूर्याचं वय झालंय आणि लवकरच (फक्त ७.६ अब्ज वर्षांत) तो पृथ्वीला गिळंकृत करेल. आपल्या ग्रहमालिकेत पृथ्वीसदृश दुसरा ग्रह नसल्याने आपल्याला ४.२ प्रकाशवर्षे दूर (की जवळ?) असलेल्या प्रॉक्सिमा सेंटॉरी नामक तार्याच्या ग्रहमालिकेत जाऊन शोध घ्यावा लागेल हे ही त्यांनी सांगितलंय. म्हणजेच कुठे जायचं, कसं जायचं हा सगळा विचार त्यांनी करुन ठेवला आहे. आता फक्त कोणी जायचं हेच ठरवायचं बाकी आहे.
बीबीसी वरची बातमी
पृथ्वी सोडा किंवा नष्ट व्हा
दुसरे महाशय आहेत ऑस्ट्रेलियन जीवशास्त्रज्ञ फ्रँक फेनर. देवीच्या विषाणूंचा नायनाट करण्यात यांनी फार मोठा वाटा उचलला होता. सध्या ते साधारण ९५ वर्षांचे असावेत. यांच्या मतानुसार येत्या १०० वर्षांमध्ये मानवप्राणी नष्ट होणार. त्यांच्या म्हणण्यानुसार वातावरण बदल आणि लोकसंख्येचा स्फोट या दोन प्रमुख कारणांमुळे इतर अनेक प्राण्यांप्रमाणे माणूसही नष्ट होणार. औद्योगिकीकरण आणि एकंदरच नागरीकरण हे याचे मूळ कारण आहे कारण आदिम अवस्थेत माणूस जवळजवळ ४०-५० हजार वर्षे तगला आणि जगला.
फ्रँक फेनर
हा सगळा 'साठी बुद्धी नाठी' असा प्रकार आहे का? की काही दुर्दम्य आशावादी आणि अध्यात्मवादी म्हणतात तसे हे आत्यंतिक मानवी न्यूनगंडाचे उदाहरण आहे? की तर्काधिष्ठित विचारांचे योग्य अनुमान आहे?
स्वीकारता का आव्हान ?
भारतात काय चांगलं आणि काय वाईट ह्याची चर्चा गेली अनेक वर्षे मी ऐकत आहे.
चला तर मग एक खेळ खेळू
मी वाईट बाबी नमूद करतो (मी वाईट तर वाईट सही), तुम्ही चांगल्या बाबी नमूद करा.
काही अटी,
१) कोणीही, कोणावरही वैयक्तिक चिखल फेक करायची नाही
२) भारत देश हा एक सर्व साधारण माणसाच्या डोळ्याने बघून बाबी नमूद करायच्या.
जसे कि ज्याला एक - दोन मुलं आहेत,
रोज दहा तास काम करून त्याचा महिन्याचा पगार ८-१० हजार रुपये आहे.
तो सध्या एक चाळीत २-३ रूमच्या खोलीत रहात आहे.
३) स्वताच्या आणि इतर मित्रांच्या समस्या देखील मांडू शकता.
तर आहे का कबूल ?
(जेव्हा कधी पुढे भारतात काय चांगले, काय वाईट हा प्रश्न विचारला जाईल,
तेव्हा मी ह्या धाग्याचा दुवा देईन, आपण हि द्यावा.)
प्रेरणा : गेली काही दिवस उपक्रम आणि इतर संकेत स्थळावर चाललेले द्वंद युद्ध.
काहींच्या मते भारतात अजून तरी काही इतके वाईट दिवस आलेले नाहीत.
आणि काहींच्या मते भारताच्या लोकशाहीने सर्व सीमा पार करून देश कसा नसावा ह्याचे अतिउत्तम उदाहरण जगासमोर ठेवले आहे.
(मी नेहमी मला स्वताला विचारात असतो कि, खरंच अजून काहीतरी चांगलं शिल्लक राहिला आहे काय ह्या भारतात,
का फक्त मलाच तसे भासत आहे.
का माझीच दृष्टी इतकी वाईट झाली आहे कि, मला जिकडे तिकडे वाईटच वाईट दिसत आहे.
आता मी जो पेपर सकाळ, मटा, Times of India माझ्या संगणकावर मला इतरांपेक्षा वेगळे दिसतात)
ह्या चर्चेचा आरंभ इथे झालेला आहे. व इथे त्यावरील प्रतिक्रियाही पाहू शकता.
http://www.mr.upakram.org/node/2712
बाब्या आणि कार्टे
असे का होत असावे?
कुणाचे बोबडे बोल चुचुवाणी म्हणून कौतुकाने वापरले जातात. कुणा कार्ल्यान्चे चे टंकीत धागे (अशुद्ध मराठी म्हणून?) एकामागून एक प्रतिबंधीत होतात.
कुणी प्रविनभप्कर आक्रोश करतात "तुमच्या प्रतिसादावर आनि लेखनावर का हो नाही कोणी बोट ठेवत ?????? तुम्ही तर खुप जिव्हारी लागनारे लिहीता .. तरी त्यावर लोक हसतात ,, आम्ही समजुन सांगन्याच्या भाषेत लिहील तरी ते वाद घालतात .. "
कुणाच्या वाचनीय कथा तीन-चारशे वाचनांनंतर देखील कोरड्या रहातात. त्याचवेळेस पाचकळ धाग्यांवर शतके ठोकली जातात.
असे का होत असावे?
कार्ट्यांना लाडके बाब्ये कसे बनता येईल?
न कळणार्या गोष्टी
आज काल बऱ्याच गोष्टींचे अर्थच कळेनासे झाले आहेत. आपली आणि लोकांची आवड यात एवढा फरक कधी पडायला लागला? आपल्याला साधारण "वाह्यात" वाटणारे वागणे हे "हिप" किंवा "कूल" आहे असे चक्क छापून कसे येते आहे?
आत बघा मी एक यादीच तयार केली आहे
१. राहुल/राखी च्या स्वयंवराला येणार्या इच्छुक वधू/वर आणि त्यांचे कुटुंबीय - सगळ्या जगाकडून हसू करून घ्यावे असे त्यांना का वाटावे? राखीचे चे मुरके, रडणे किंवा रागावणे त्यांना लोभसवाणे वाटले की काय! आणि सावंत बाईंचे लाजऱ्या भारतीय वधूचे रूप, (कलात्मक पद्धतीने अंग उघडे टाकले असले तरी) आपण खरे आहे असेच मानले ना. आता सगळ्याचे उत्तर चॅनेल साठी टीआरपी आणि भाग घेणाऱ्यांसाठी पैसे आणि प्रसिद्धी आहे असे समजून घेतले की झाले! पण खरंच ही प्रसिद्धी हवी आहे का खूप जणांना?
२. बऱ्याच वाहिन्यांवर असणारे "दादागिरी", "रोडीज" किंवा "स्प्लिटस्व्हीला" सारखे सत्याचे असत्य खेळ. एकमेकांना वाट्टेल तसे बोलावे, वाट्टेल तसे वागावे, कट कारस्थाने करावी, दुसऱ्याचे पाय ओढावेत, अशा सर्व गुणांना उत्तेजन देणारे कार्यक्रम, त्यात भाग घेणे म्हणजे परम भाग्य! निडर, शूर वगैरे स्वत:ला समजावे व प्रेक्षकांना तसे बजावून सांगावे. पण आपण बापडे प्रेक्षक.. आपल्याला ते तसे जबरदस्त न वाटता मूर्ख वाटले तरी आपल्याला विचारतो कोण? भाग घेणारे एका बाजूला तर संचलन करणारे तर विशेषच. ती कोण सोनाली म्हणे "बिच" आणि तिचे कर्तृत्व काय तर घालून पाडून बोलणे.. वर ही कुप्रसिद्धी हेच कौतुक.. अशा आपल्या व्याख्या बदलल्या कधी? बेमुर्वत आणि बेफाम बोलणे म्हणजे करमणूक असे त्यांना वाटते... पण आपल्याला?
३. आपले सिनेमा सितारे हिंदी सिनेमात काम करतात पण हिंदी बोलत नाहीत, भारतीय आहेत पण भारतीय दिसत नाहीत, यांना आवडते कॅव्हीयर आणि यांची असते चीज आणि वाइन पार्टी! यांच्या लकबी, वागण्या बोलण्याची पद्धत, काही काही म्हणून भारतीय दिसू द्यायचे नाही असा यांचा हट्ट असतो. असे का झाले आहे आपले?
४. सभ्यता हद्दपार - आजच्या सिनेमातील दृष्ये, बक्षीस सोहळे संचलन करणाऱ्यांचे बोलणे या सगळ्यातून सभ्यता निघून चालली आहे. अनेक चित्रपटात गरज नसताना टॉयलेट मधली दृष्ये, एकूणच नैसर्गिक विधी समोर ठेवून केलेले विनोद यांची गर्दी झालेली दिसते. अंग उघडे टाकण्याविषयी तर न बोललेलेच बरे. शरीराचा बराचसा भाग उघडा ठेवणारे कपडे घालताना आपण नक्की काय मिळवू पाहतो आहोत? आधुनिकता, मुक्ती की केवळ पैसा आणि प्रसिद्धीच्या स्पर्धेत आपण मागे राहू नये म्हणून केलेली तडजोड?
५. वृत्त वाहिनी- हे जरी गुणी बाळ असले तरी तेही बरेच अवगुण शिकले आहे थोड्याच वेळात.. बऱ्याच वाहिन्यांवर सर्वाधिक जोर असतो तो सिनेमा केंद्रित बातम्यांचा, मग त्यात ऐश्वर्याचा फ्लू, सलमानची साडी नाहीतर कोणतरी पायल रोहटगीचा खुलासा असे काहीही केवळ फालतू असे असू शकते. मुलाखत घेणाऱ्याकडे विषयाचे पुरेसे ज्ञान असावे अशी अपेक्षा तर ठेवायचीच नाही. बर सिनेमाविषयी कार्यक्रम हे फक्त वर्तमानाशी निगडित, भूतकाल पूर्ण विसरून जायचा. रणबीर कपूर उगवता तारा, म्हणून ऋषी कपूर तेवढा आठवायचा, सैफचा सिनेमा आला की शर्मीला टागोर आठवायची. पण ज्यांचे आत्ताच्या जगताशी बंध नाहीत त्यांना मात्र पूर्ण विसरायचे. थोडक्यात, दर्जा पेक्षा खळबळ जास्त महत्त्वाची. आपण प्रेक्षक इतके मठ्ठ आणि फक्त वरवरच्या बातम्यांचे भुकेले आहोत का हो?
बरं कसे आहे की हे सगळे नवीन विचार आणि आचार आणि आपले ते जुने टाकाऊ, संकुचित विचार असे म्हणायची पण सोय नाही. कारण हा आमचाही काळ आहे. फरक आहे तो दृष्टिकोनामध्ये. मला खरंच आश्चर्य वाटते, कुठे गेली आपली शिकवण.. संयम ठेव, विवेकाने वाग, खरे बोल, कशाचाही अतिरेक करू नको, जीवन जग, हव्यास सोड, सभ्यता, शुचिता, सुशीलता ह्या सगळ्या गोष्टी, जगण्याचे तंत्र जमवून देणारी भारतीय तत्वद्य्नानाची बैठक, कुठे गेली? हा हक्काचा वारसा उधळून देऊन आपण आपले हे काय करून घेतले आहे??
कॉर्पोरेट / कॉलेज पार्ट्या, ग्रामस्थ आणि तारतम्य ...
मिपावरच्या सदस्य आणि वाचकांपैकी अनेकजण कुठल्या कुठल्या कंपन्यात काम करत असतील, कोण कॉलेजात शिकत असेल, इतर कोणी कुठल्या सामाजिक संस्थांमध्ये काम करत असेल.
मला मग एक सांगा की हे 'कॉर्पोरेट / कॉलेज पार्ट्या ' हे प्रकरण तुम्हाला नविन आहे का हो ?
जरा खालच्या लिंकवरची बातमी वाचा ...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6246549.cms
त्याचा थोडक्यात गोषवारा असा की ...
फ्रेण्डशीप डे ' च्या निमित्ताने थेऊर येथील एका बंगल्यात आयोजिण्यात आलेल्या विनापरवाना दारू पार्टीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी अचानक धाड टाकून सुमारे ३५० ते ४०० विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. हे विद्यार्थी दारूच्या नशेत बेधुंद होऊन धिंगाणा घालत होते. परंतु पोलिसांनी त्यांची नशा उतरवली.
पार्टीत सहभागी असलेले विद्यार्थी खडकी येथील सिंबॉयसिस मॅनेजमेंट ऑफ स्टडीज या एमबीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत. ' फ्रेण्डशीप डे ' च्या निमित्ताने सिनिअर्सनी ज्युनिअर्सना दिलेल्या या पार्टीमध्ये परप्रांतीय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये तरूण विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय आहे. त्याही दारूच्या नशेत झिंगत असल्याचे पोलिसांना आढळले. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, त्यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूचा साठाही आढळला. परंतु ड्रग्ज वा अन्य अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे आढळले नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
गंमत वाटली बातमी वाचुन.
१. आजकाल शहरातील गजबटापासुन जरा लांब व शांत म्हणुन कंपन्या किंवा कॉलेजेस मुद्दामुन अशा लांबच्या खेडेगावातील ठिकाणाची निवड करतात. पण आजकाल त्या 'सिंहगडाखाली पकडलेल्या रेव्ह पार्टी' नंतर अनेक गावातील अनेक ग्रामस्थांना उगाच स्वतःच पोलिसगिरी करायची सवय वाढत आहे.
२. अशा पार्ट्या म्हणजे दारु वगैरे आलीच.
अर्थात कोण ह्यात टुल्ल होऊन झिंगत असेल असे वाटत नाही, बरोबर कलिग्स असतात, कॉलेजचे मित्र आणि प्राध्यापक असतात, कॉपोरेट असेल तर वरिष्ठ अधिकारी असतात मग असे 'झिंगेल' कोण ?
३. मुळात अशा पार्ट्या ठेवणे हाच गुन्हा आहे का ?
तसे असेल तर सर्व गावकरी मिळुन आपल्या गावातील जागा न देण्याचा ठराव का करत नाहीत ?
४. अशातल्या बहुतेक तक्रारी ह्या एक तर राजकिय / सामाजिक / आर्थिक स्वार्थामधुन होतात किंवा जळजळीमधुन होतात असे आम्हाला ठामपणे वाटते.
इनफॅक्ट मी तर असे म्हणतो की कित्येकवेळा अशा पार्टीसाठी आलेल्या निमंत्रितांना ह्या गावातल्यातल्याच 'टवाळ' टोळक्याकडुन त्रास होतो पण उगाच बोभाटा नको म्हणुन शक्यतो हे आलेले आमंत्रित असा त्रास सहन करत असतात.
५. ह्या पार्टीत आलेल्यांनी झिंगुन रात्री आख्खे गाव तर डोक्यावर घेतले नाही ना ?
का चौकात जमुन उगाच उतमात घातला ?
इथे मला पार्टीचे १००% समर्थन करायचे नाही पण उगाच उठसुठ तक्रारी करुन दुसर्याच्या सेलेब्रेशनमध्ये धोंडा फेकण्यार्या प्रवृत्तीचा निषेध करायचा आहे.
ह्या लोकांनी पार्ट्या करुच नये का ?
जर एखाद्या गावाला तसे नको असेल तर त्यांनी तसा नियम बनवावा, पण शक्यतो अशा बंगल्याचे मालक हे बिगशॉट किंवा राजकिय वरदहस्त असणारे असल्याने व त्यांच्याविरुद्ध हे गावकरी बोलु शकत नसल्याने त्यांच्या 'सुडचक्रा'चा त्रास निष्कारण ह्या पार्टीवाल्यांना होगावा लागत आहे असे आम्हाला स्पष्ट शब्दात सांगु वाटते.
आता पोलिस तक्रारी झाल्या, पुढे काय निकाल लागु तो लागु पण तोवर ह्या पार्टीतल्या निमंत्रितांना जी नामुष्की भोगावी लागेल व आयोजकांच्या पुढच्या कारकिर्दीवर ह्याचा काय परिणाम होईल ह्याचा विचार कोण करणार आहे की नाही ?
जाता जाता :
मुद्दामुन 'परप्रातिंय' आणि 'मोठ्ठ्या संख्येने मुली' असा उल्लेख करणे प्रसारमाध्यमांना शोभत नाही.
ह्या पार्ट्या जर कॉर्पोरेट किंवा कॉलेजेसच्या असतील तर त्यात 'प्रांतिक' मतभेद कधीच नसतो, आतल्या आत जे काही प्रांतिय राजकारण चालत असेल तो भाग वेगळा पण हे असे उल्लेख हे तद्दन मसालेदार धंदेवाईक वृत्ती आहे असे आम्हाला वाटते.
बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान?
बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान?
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला मोबाईल फोन ची इतकी सवय झालेली असते कि मोबाईल आपल्याजवळ नसला किंवा आपण तो घरीच विसरलो की जणू 'हेल्पलेस' झाल्याचे फिलिंग येते. मात्र, मोबाईल ची इतकी सवय होण्या मागे तो आपल्याला कनेक्टेड ठेवतो हे तर कारण आहेच, पण त्याशिवाय त्यातील इमेल, इंटरनेट, कॅमेरा, म्युझिक प्लेयर आदी अनेक सुविधांवर आपण अवलंबून असतो.
कधी कधी मात्र मोबाईलच्या अतिरेकाने आपले नुकसान संभवते - हे नुकसान परस्पर संबंधातील गैरसमज आणि त्यातून उद्भवणारे तणाव, मोबाईलच्या अतिवापराने विनाकारण आर्थिक नुकसान आदी प्रकारचे असते, तर कधी केवळ मोबाईल असल्यामुळेच तातडीने संपर्क साधता येतो आणि कोणाचा जीव बचावतो तर कोणाची मालमत्ता संकटातून बाहेर काढता येते.
आपल्या मिपाकरांना या बाबतीत काय अनुभव आहेत? मोबाईल फोन मुळे कधी खूप नुकसान झाले तर कधी अचानक आलेल्या संकटातून बाहेर निघण्यासाठी मोबाईल चा उपयोग झाला का?
मोबाईल फोन संदर्भातले आपले अनुभव, अविस्मरणीय घटना शेअर करा...
--
इंटरनेटप्रेमी,
मुंबई, इंडिया.
जेम्स लेनच्या निमित्ताने उघडी पडणारी मराठी वैचारिक दिवाळखोरी
नमस्कार मिपाकरहो,
चिंतातुर जंतू यांचा हा उत्तम लेख त्यावर काही आक्षेपार्ह प्रतिसाद आल्याने आणि त्या प्रतिसादांचा त्रास मिसळपाव प्रशासनाला होऊ शकेल या शंकेतून काही काळ अप्रकाशित करण्यात आला होता. सध्या लेख प्रकाशित करून वाचनमात्र ठेवला आहे. लेखावरील आक्षेपार्ह प्रतिसाद एक एक करून अप्रकाशित केले जातील. तरीही असे प्रतिसाद राहील्यास सजग सदस्यांनी संपादकांना तसे कळवावे.
धन्यवाद,
संपादक मंडळ
जेम्स लेनच्या शिवाजीविषयीच्या पुस्तकावरची बंदी सुप्रीम कोर्टानं उठवल्यामुळे पुन्हा एकदा मराठी माध्यमं आणि जालावर त्याविषयी गदारोळ उठला आहे. या गदारोळात काही मूलभूत गोष्टींकडे सातत्यानं दुर्लक्ष होताना दिसतं आहे. हे दुर्लक्ष केवळ या एका मुद्द्यापुरतं मर्यादित नाही तर ते एका वाईट आणि अक्षम्य परंपरेच्या पायवाटेला हमरस्ता बनवणाऱ्या प्रवाहाचा भाग आहे. म्हणून सुशिक्षित समाजानं तरी त्याची दखल घेतली पाहिजे असं वाटतं. त्यासाठी हा लेखप्रपंच.
पुस्तकामागची ऐतिहासिक भूमिका:
मुळात आपल्याकडे अनेकदा असं दिसतं की एखाद्या गोष्टीवर अगदी आग्रही मतं प्रदर्शित करणाऱ्या लोकांनाही काही मुलभूत गोष्टी माहीत नसतात. असंच काहीसं या पुस्तकाच्या बाबतीत झालेलं दिसतं. इतिहास संशोधन करताना अनेक दस्तऐवजांचा वापर केला जातो. पुरावा म्हणून आधार घेतला जातो. ज्याची सत्यासत्यता अस्पष्ट आहे किंवा जी असत्यच आहेत अशी साधनंही इतिहासाचा अभ्यास करताना वापरता येतात याची जाण आपल्याकडे फारशी दिसत नाही. मिथकं आणि लोककथा यांचा वापर इतिहासात अशाच प्रकारे केला जातो. त्याची एक पध्दत आहे. त्याचे काही उपयोग आहेत. उदा. रामाविषयी उत्तरेत निर्माण झालेल्या लोककथा आणि दक्षिणेत निर्माण झालेल्या लोककथा यांचा तौलनिक अभ्यास केला तर त्यांत रामाची प्रतिमा भिन्न दिसते. रामाच्या दक्षिण विजयाविषयी जित (म्हणजे हरलेल्या) दक्षिणी लोकांचा जो विचार दिसतो, तो रामाला देव न मानता मर्त्य आणि स्खलनशील दाखवतो. किंवा, शकुंतला-दुष्यंताच्या मूळ कथेतली शकुंतला स्वाभिमानी आहे पण कालिदासाच्या नाटकात ती दुष्यंतानं आपला स्वीकार करावा यासाठी खूप झटते कारण ती कालिदासाच्या काळातल्या पुरुषप्रधान संस्कृतीनुसार वागते. अशा प्रकारे कालसापेक्ष, समाजसापेक्ष विश्लेषण करण्यासाठी लोककथांचा वापर करणं ही इतिहास संशोधनातली एक रूढ पद्धत आहे. हीच पध्दत लेन शिवाजीच्या आजूबाजूला निर्माण झालेल्या मिथकांना लावतो. या पध्दतीत काहीही गैर नाही. लेनचे निष्कर्ष चूक किंवा बरोबर ठरवण्याचं काम इतिहास संशोधकांचं आहे आणि ते त्यांना करू दिलं पाहिजे. पण त्यासाठी मुळात पुस्तक उपलब्ध होणं गरजेचं आहे.
पुस्तकातला वादग्रस्त भाग:
'शिवाजीचे खरे पिता शहाजी नसून दादोजी कोंडदेव होते, असं महाराष्ट्रात काही लोक खाजगीत (चेष्टेच्या सुरात) म्हणतात.' अशा प्रकारचं विधान लेन पुस्तकात करतो. आता दोन प्रश्न विचारावे लागतात:
१. एखादी वदंता अस्तित्वात आहे असं म्हणणं हे पुस्तकात गैरलागू आहे का? तर अजिबात नाही. कारण पुस्तकाचं स्वरूपच शिवाजीविषयीची मिथकं, आख्यायिका, लोककथा यांचा धांडोळा घेऊन त्यातून काय बोध होतो, ते पाहणं हा आहे. त्यामुळे अशा वदंतेचा उल्लेख करणं या पुस्तकाच्या एकंदर स्वरूपाशी सुसंगत आहे.
२. अशी वदंता खरंच अस्तित्वात आहे का? तर नक्कीच आहे. इतरांविषयी सांगू शकत नाही, पण पुण्यात ब्राह्मणी वातावरणात वाढलेल्या लोकांना कधीतरी असं काहीतरी कानावर येतं. उदा: दत्तो वामन पोतदार यांच्या हे (म्हणजे शिवाजीच्या पितृत्वाविषयीची कथित बाब) लक्षात आलं पण त्यांनी त्याची जाहीर वाच्यता कधी केली नाही असं माझ्या स्वत:च्या कानावर आलं होतं. त्याला आता कित्येक वर्षं लोटली. तेव्हा जेम्स लेनचं अस्तित्व आमच्या दखलपात्रही नव्हतं. त्यामुळे या वदंतेला जन्म देणारा मनुष्य लेन खचितच नाही. त्याला निव्वळ तिची वाच्यता करण्याबद्दल (आणि तेही शिवाजीविषयीच्या मिथकं/लोककथांच्या चर्चेच्या चौकटीत ती करण्याबद्दल) झोडपणं म्हणजे निरोप्याला जीवे मारण्यासारखं आहे.
लोकक्षोभ:
या पुस्तकात भावना भडकवणारं लिखाण आहे म्हणून त्यावर बंदी घालणं योग्य आहे असं एक मत दिसतं. वरचे मुद्दे वाचून हे मत पोकळ आहे असं समंजस लोकांना वाटेल अशी अशा आहे. तरीही जर भावना भडकवणाऱ्या लिखाणाचाच लेखाजोखा घ्यायचा झाला, तर सर्वप्रथम लेनला लक्ष्य बनवणार्या संभाजी ब्रिगेडची पत्रकं, पुस्तकं यांवर बंदी घालावी लागेल. कारण त्यांतलं लिखाण खूप भडक आणि प्रक्षोभक आहे. त्यात 'असं काही लोक म्हणतात' वगैरे संभ्रमाला जागा नाही. उलट अंतिम सत्य आम्हालाच कसं ठाऊक आहे असं अतिरंजित शैलीत ठणकावून सांगितलं गेलं आहे. त्या मानानं लेनचं लिखाण हे Oxford किंवा तत्सम शैक्षणिक (academic) प्रकाशनसंस्थेला पचेल असंच (म्हणजे काहींच्या भाषेत मुळमुळीत) आहे. त्याच्याशी तार्किक लढा देता येऊ शकेल कदाचित, पण त्याला रंजक वा सवंग म्हणणं कठीण आहे.
आता पुस्तकाला बाजूला ठेवून पुस्तकासंदर्भातल्या घटनांचं ऐतिहासिक विश्लेषण करायला कुणी संशोधक बसला तर त्याला काय सापडू शकेल? (हे सर्व केवळ अंदाज आहेत; हेच अंतिम सत्य आहे असा लेखकाचा अजिबात दावा नाही. मात्र, विशिष्ट काळात समाजात घडणाऱ्या काही गोष्टींना एका सुसंगत धाग्यात बांधणं शक्य होतं आहे असं जाणवतं, एवढंच.)
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाज पुरेसा सत्ताधारी असूनही सर्वसामान्य मराठा मतदाराला त्याचा पुरेसा लाभ मिळत नसावा, कारण वरची समृद्धी तळागाळातल्या मराठा समाजापर्यंत पोहोचत नव्हती. नव्वदीच्या दशकात या काहीशा असंतुष्ट समाजाचा एक घटक काँग्रेसी पक्षांपासून दूर जाऊ लागला होता. १९९५ मध्ये भाजप-सेना युतीचा झेंडा विधान भवनावर फडकला. यामुळे काँग्रेसी मराठा नेते कदाचित असुरक्षित झाले असावेत.
अशातच एक वेगळा राजकीय प्रवाह दिसू लागला: धर्म, प्रांत, भाषा यांविषयीच्या अस्मितांना खतपाणी घालून, सर्वसामान्यांच्या भावना भडकावून त्यांद्वारे मतं मिळवता येतात याचे पुरावे नव्वदच्या दशकात अधोरेखित झाले. अशा भावना भडकलेला मतदार काही काळापुरता आपलं विदारक आर्थिक वा सामाजिक वास्तव विसरून जाऊ शकतो, हेही लक्षात येऊ लागलं.
काहीशा दुरावलेल्या मराठा मतदाराला अशीच काहीशी भूल घालून आपल्याकडे पुन्हा खेचून आणता येईल अशा आशेत मराठा नेतृत्व मराठा समाजाला भडकावता येईल अशा एखाद्या मुद्द्याच्या शोधात असावं.
एका काळापर्यंत महाराष्ट्र सरकारचे व त्या अनुषंगानं पवार यांचे लेनसारख्यांशी - म्हणजे व्यक्तिश: लेनच असं नाही, पण महाराष्ट्राविषयी काम करणाऱ्या परकीय इतिहास संशोधकांशी - चांगले घनिष्ठ संबंध होते. उदा: "House and Home in Maharashtra, New Delhi, Oxford University Press, १९९८" हे पुस्तक पाहावे. त्यात परदेशात महाराष्ट्राविषयी घडलेल्या एका चर्चासत्रातले शोधनिबंध आहेत. चर्चासत्राची सुरुवात पवारांच्या बीजभाषणानं झाली होती. म्हणजे पवार त्या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी परदेशात गेले असावेत. अशा चर्चासत्रांना, यात आणि इतरत्र प्रकाशित झालेल्या अनेक संशोधकांना पवारांनी सरकारतर्फे (मुख्यमंत्री म्हणून) मदत केली होती. महाराष्ट्रावर होणाऱ्या संशोधनाशी त्यामुळे ते परिचित असावेत. लेन हा त्यांपैकी एक होता.
या पार्श्वभूमीवर भावना भडकावून राजकीय फायदा उठवता येईल असा मुद्दा म्हणून लेनचा कोलीत म्हणून वापर केला जाऊ शकतो, याची जाणीव मराठा नेतृत्वाला झाली असावी. त्यातच भांडारकर संस्था हे soft target होतं. कारण ज्याच्या भावना संस्थेवरच्या हल्ल्यानं दुखावतील आणि जो आपल्यापासून दुरावेल, असा मतदार अगदीच अल्पसंख्य होता - कारण मुळातच सुशिक्षित मतदारानं (म्हणजे आपण सर्व किंवा आपल्यापैकी बरेच जण) विचारवंतांना 'विचारजंत' म्हणून संबोधत सुशिक्षित, ज्ञानाधिष्ठित व्यवहाराला केराची टोपली दाखवली होती (हेच अजूनही चालू दिसतं).
थोडक्यात, स्वत:ला सुशिक्षित, समंजस, प्रतिष्ठित म्हणवून घेणारे आपण जेव्हा विचारवंतांना अप्रतिष्ठा दाखवतो, जगभरात रूढ असणार्या विचारपद्धतींना आणि ज्ञानशाखांना आपल्या अज्ञानापोटी कस्पटासमान मानतो, तेव्हा अशा भावना भडकावून लोकांच्या अज्ञानाचा फायदा उठवून राजकारण करणाऱ्या आणि त्यावर आपली पोळी भाजून घेणाऱ्या नेत्यांच्या हातातली आपण बाहुली बनतो. यातून आपण एक समाज म्हणून आपली वैचारिक दिवाळखोरी जगजाहीर करतो. जेम्स लेनच्या पुस्तकावरची बंदी उठवली जाण्याच्या निमित्तानं आपलंच आपल्याला जे दर्शन घडतं आहे, ते याच्याशी सुसंगतच आहे.
'मिश्किली' - ई-बुक प्रकाशित
प्रस्तावना...
भावनिक प्रस्ताव मांडला की तिची प्रस्तावना होत असते. शब्दांना छेडायचं, शब्दांनाच वेढायचं अन् निकालातही काढायचं एकंदर असाच काहिसा हा मामला. मामला रंगात आला की कामला होत असते. म्हणून काही श्यामलेचे महत्व कमी होत नाही. श्यामलतेतच श्याम व लता वेलीँचा संकर घडून येत असतो...
अशा प्रकारच्या शाब्दिक कोट्यांची कोट्यावधी उड्डाणे घेण्याचा मोह आंतरजालावर कळा दाबतांना होत आलाय. कळा दिल्या तरच पुढे कुणाला तरी लळा लावता येत असतो. म्हणून जास्त कुथत किँवा थुंकत न बसता मी मूळ मुद्द्यावरच येतो...
पडद्यावर लिहिणे ही एक कलाच. ते वाचून प्रतिसाद देणे ही तर महाकला. कलेकलेने घेत गेल्याने किलोकिलोचे माप पदरात पडते. अशाच काही मिश्किल विषयांना स्पर्श करीत गेलेली ही 'मिश्किली' आपणासारख्या पडदे(स्क्रिन) व तावदाने(विँडोज) वाचणाऱ्या/ लिहिणाऱ्यांना जरूर पसंत पडेल अशी आशा आहे...
तसं पाहिलं तर मुद्रित क्षेत्रात आम्ही उणीपुरी दहा वर्षे वेचली तरी म्हणावी तशी मुद्रा उठली नसतांना जालावरच्या शब्दकुसुमांना आपल्या हवाली करणं हे एक धाडसच. परंतु 'राजे' बोलले अन् दिल हालले. 'मीम'कारांनी मनावर घेतलं अन हे शब्दचित्र पानावर ओतलं. माझं पहिलं ई-पुस्तक सादर करण्याचा पहिला मान त्यांनाच आहे असे मी मानतो. मिश्किल लेखांच्या लिंका आपणापुढे प्रकाशित झाल्याचा डंका पिटावा तितका कमीच ठरेल. आता जे काही लिहायचे उरलेय ते वाचक-लेखकांच्या हाती सोपवितो...
- डॉ.श्रीराम दिवटे.
पुस्तक 'इथे' वाचा...
इराण, इस्लाम आणि दगडाने ठेचून मारण्याची कायदेशीर शिक्षा
इराणमधे सकिने मोहम्मदी अश्तियानी (मराठी उच्चाराबद्दल संभ्रमित) ह्या चाळिशीच्या महिलेला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा तिथल्या न्यायालयाने दिली होती. मानवाधिकारवाल्या लोकांनी जगभर रान उठवल्यामुळे ती शिक्षा रद्द झाली. ह्या बाईंना व्यभिचारी म्हणून ही शिक्षा दिली गेली. तिला ९९ फटक्यांची शिक्षा आधीच देऊन झाली आहे. संबंधित प्रकारात दुसरी व्यक्ती (बहुधा पुरुष) हिला काय शिक्षा मिळाली ते कळत नाही.
मराठी वृत्तपत्रात याविषयी फारसे काही आलेले आढळले नाही.
माझे मतः ह्या रानटी, कालबाह्य, क्रूर शिक्षेला कुठला सुसंस्कृत देश थारा देणार नाही. पण अस्सल इस्लमी कायदा जिथे लागू असतो तिथे हा प्रकार राजेरोस होतो. कुराणात ह्या प्रकारच्या "गुन्ह्याला" (इथे उभयता प्रगल्भ होते का, हे संबंध उभयतांच्या संमतीने झाले का वगैरे गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत) ही शिक्षा असल्याचे स्पष्टपणे लिहिले आहे. (चूभूद्याघ्या). त्यामुळे ते चुकीचे वगैरे म्हणणेही पाप आहे.
भारतातील मुस्लिमांचे ह्याविषयीचे मत काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. ह्या बाबतीत कुराणात लिहिलेले कालबाह्य आहे असे कुणी उघड म्हणेल का इथेही फतव्याची भीती आहे?
दुसरे असे की, आपले काय मत? प्रत्येक देशाला ह्या बाबतीत हवे ते करण्याची मुभा असावी की का शिक्षेचे काही प्रकार हे निर्विवादपणे रानटी समजले जावेत आणि त्याविरुध्द निषेधाचा आवाज उठवलाच जायला हवा?
मला वाटते इराणवर पाश्चिमात्यांचा विशेष राग आहे म्हणून इतका गदारोळ पण सौदी अरेबियात ह्या शिक्षा वरचेवर दिल्या जातच असतात. पण ते प्रकार बहुधा दाबले जातात. पैशाच प्रभाव

