प्रतिभा

शब्द माझे पडती अपूरे...

आठवता तुझे मोहक रूप, बोलणे ते हसुनी गालांत..
होई स्मृती त्या सुंदर क्षणांची, घालविले जे तुझ्या सोबती!!

कानांचीही ओंजळ व्हावी, आवाज तुझा मी मनी वाहावा,
शब्द फक्त ते ऐकत जावे, अर्थ तयांचा निसटुनी जावा!
तू बोलावे, मी ऐकावे, काय चालले कुणास ठावे..
तुझ्यासमवे बसुनही केवळ, अस्तित्व माझे (मी) विसरून जावे!!

काळेशार ते लोभस डोळे, अथांगात त्या बुडून जावे!
केसांच्या त्या मुक्त बटांतून चंद्राचेच जणु दर्शन व्हावे!!
निरागसतेचा कळस व्हावा असे तुझे ते नितळ हास्य!
मनांत उठती भावतरंग, पापण्या तुझ्या लवतांना!

शब्द माझे पडती अपूरे वर्णन कराया तुझे!
यत्न केले कितीही परंतू पडतात अंती खुजे!!

राघव
[टीप: सदर कविता मी जालावर अगोदरही प्रकाशित केलेली आहे.]

ओळखा पाहु,

सदर फोटो हा खाद्य पदार्थाचा आहे.
ओळखा पाहु,

ओळखा पाहु, तो काय असेल तो??
जमल्यास त्यातील पदार्थे सांगा.

छायाचित्र क्र. ४ चे परिक्षण

छायाचित्र परिक्षण वाचण्याआधी मुळ चित्र येथे पहावे

==============

ही नजर की बाण हा, घायाळ करते जीवा
त्या मुठित लपविले, घायाळ माझ्या जीवा

ते लटकलेले कानचे, की आशा माझ्या मनीची
स्वत:संगे झुलविले, घायाळ माझ्या जीवा

ती वक्रगती कटीका, की रस्ता माझ्या मनीचा
त्या झटक्याने फसविले, घायाळ माझ्या जीवा

ती कमरसाखळी हो, की इच्छा माझ्या मनीची
त्या विळख्याने भुलविले, घायाळ माझ्या जीवा

सर्व असूनही एकटी, की आस माझ्या मनीची
तु विश्वामित्र बनविले, घायाळ माझ्या जीवा

-ऋषिकेश
(रात्री १२ ची वेळ असल्याने छंदाच्या अपेक्षा माझ्यासारख्या स्वचंदी माणसाकडून तुर्तास नको Wink . सुचलं ते लिहिलं)

भातुकलीच्या खेळामधले, राजा आणिक राणी.....

भातुकलीच्या खेळामधले, राजा आणिक राणी.....
अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी एक कहाणी.....

हातामध्ये हात गुंफुनि, बालपणी ते बागडले ....
अल्लडपणे त्या प्रेमाचे, बंध गुंफिले गेले...

कधी राजाचे डोळे विचारिती, घरट्यात राहशील माझ्या?
राणीला ही कळली त्याची, शब्दावाचूनि भाषा...

वचन दिले त्यांनी परस्परांना, मानुनि जीवनसाथी...
आयुष्यभर साथ देण्याच्या, बांधल्या रेशीमगाठी...

त्यांच्या घरट्यापुढे उमलल्या, सुखस्वप्नांच्या वेली...
राणीच्या वेणीत माळे राजा, जाई जुई चमेली...

ते दोधे आनंदाच्या डोही रमले, काळ लोटला काही...
पण राजा-राणीचा हा संसार, नियतीला बघवला नाही...

नियती अचानक एके दिवशी, वादळ घेऊनि आली...
अन् राणीच्या त्या प्रिय राजाला दूरवर घेऊन गेली...

पण राणीचे ह्रदय राजाकडे, अन् राजाचे राणीपाशी....
नियती घेऊन गेली राजाला एका दूरदेशी...

त्या देशी होत्या अनेक राजकन्या अन् अनेक सुकुमारी...
पण त्या 'राजाच्या राणीची' त्यांना सर-ही नाही आली...

पुढे राजाचे काय झाले, ते राणीला उमगले नाही...
ती राजाच्या आठवणीने, वेडीपिशी होऊनि जाई....

मोडले घरटे, सुकुन गेल्या सुखस्वप्नांच्या वेली....
ना कधी कळले, नियतीने का ही क्रूर थट्टा केली....

राणी विचारे नियतीला, का ठरवली प्रीत ही खोटी....?
ती वेडी राणी वाट पाहते, झुरते राजासाठी....

नियतीलाही ठाऊक नव्हते, उत्तर तिच्या प्रश्नाचे...
आणि राणीलाही मान्य नव्हते, चक्र हे जीवनाचे....

'नियतीवरती मात करुनि, नक्की येईल माझा राजा....'
राणीच्या वेड्या मनात, अजूनही आहे ही वेडी आशा....

भातुकलीच्या खेळामधले, राजा आणिक राणी...
अर्ध्या डावाची ही आहे, अधूरी प्रेमकहाणी.......

रेखाटन - २

हे मी बर्‍याच अगोदर काढलेले एक रेखाटन.
अपूर्ण राहिलेय हे खरेतर. तेवढा वेळच नाही मिळत सध्या. कमीत कमी ६-७ तासांची सलग बैठक हवी (अन् मूडही हवाच Wink ) त्यासाठी!!
पण ते डोळे अन् नाकाचे रेखाटन करण्यासाठी कसले कष्ट पडले होतेत ते आता आठवूनच कृताSSSSSSर्थ झाल्यासारखे वाटते Smile
तुम्हा सगळ्यांस आवडेल अशी आशा करतो.

राघव

(...आदिम घास...)

हा थरकाप उडवणारा...आदिम ध्यास.. हीच आमच्या आदिम घासामागची प्रेरणा! Wink

...आदिम घास...
================================
अमूर्त अनाकलनीय कवितांपासून.. लपूनछपून..
स्वत:ला वाचवत.. फिरत होतो,
अगदी तेव्हापासून! मी टाळत होतो...
प्रत्येक असह्य कविता...

जीवघेण्या प्रतिकांतून..
उपमांच्या कराल जबड्यांतून..
थरकाप उडवणार्‍या रुपकांपासून.. दूर..
दुबळ्या वाचकासारखं जगत..!

त्याच विडंबनाच्या ध्यासापोटी..
दुर्बल वाचकाचा लेखक झाला..
लेखकाचा झाला विडंबक...
लेखणीत चळ, शब्दात घोळ असलेला...
चक्रम.. विक्षिप्त..!

आणि त्या बरोबरच जन्माला आली..
वक्रोक्तीतली हूल... सर्वभक्षकत्वाची खाज..!
स्वार झाली... किंचाळणार्‍या कवितेवर..
पिसाळलेल्या ओळी काबूत घेत..
गोंधळवणारी.. चक्रावणारी कवने मागे सोडत..
उगवत्या विडंबनाच्या दिशेने!!

कवी बदलले.. कविता ती.. तशीच..
अनाकलनीय.. प्रसिद्धीसाठीची...
शब्द बदलले.. घास तो.. तस्साच...
विडंबनाचा!!!.....

नवकवींचं बारसं जेवलेला 'चतुरंग';
आजही हुडकतोच आहे..
स्वतःहून अंगावर चढवलेल्या..
झुलींचा मुकुटांचा भार पेलत...
महाजालाच्या पसार्‍यात...
भावनेच्या आविष्कारासाठी..!!!
अस्वस्थ सर्जनाच्या कल्पनेनं..
बिचकत..दबकत आलेल्या कवींना!!!

वाचतालिहिता तोच आदिम घास घेऊन...
विडंबतोच आहे... एक दुस्सह विपन्न काव्य!!!

=====================================
चतुरंग.................................... २६-०८-२००८

पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाध्यक्षांची 'मिसळपावसाठी' एक धावती मुलाखत

डॊ.गंगाधर पानतावणे          डॊ.गंगाधर पानतावणे आणि प्राचार्य ठाले पाटील
डॉ.गंगाधर पानतावणे    सोबत प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील

अमेरिकेत होणार्‍या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक, विचारवंत व समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे यांची आम्ही दि. २३/०८/०८ ला भेट घेतली. अभिनंदनाच्या गराड्यात आणि नेहमीच्या व्यस्त कार्यक्रमात मिसळपाव मराठी संस्थळासाठी त्यांची एक धावती मुलाखत.

परिचय : डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे, (जन्म: २८ जून १९३७ )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादला मराठी विभाग प्रमुख म्हणुन ९७ ला सेवानिवृत्त झाले. आंबेडकरी विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी १९६८ साली 'अस्मितादर्श' त्रैमासिक सुरु केले जे आजही चालु आहे. वैचारिक, सामाजिक अधिष्ठान, असलेले ' अस्मितादर्श' महाराष्ट्र आणि देशभरातील लेखक, कवी, समीक्षक,संशोधक, यांचे विचारमंच ठरले.

मूल्यवेध, विद्रोहाचे पाणी पेटले आहे, दलितांचे प्रबोधन, मूकनायक, वादळाचे वंशज, प्रबोधनाच्या दिशा, पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हलगी, चैत्य, लेणी, इत्यादी ग्रंथसंपदा डॉ. पानतावणे यांच्या नावावर आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने पहिल्या अखिल विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणुन आपली एकमताने निवड झाली. त्याबद्दल प्रथम अभिनंदन !!! सर, काय भावना आहेत या प्रसंगी.

'खूपच आनंद झाला. गेल्या अनेक वर्षापासून जी साहित्यसेवा चालू आहे, त्याचा हा गौरव आहे. मराठी साहित्य, संशोधन, दलित साहित्य, दलित चळवळ यांचा गौरव आहे. तसेच एकमताने झालेल्या निवडीचा मनस्वी आनंद होत आहे. त्याचबरोबर साहित्य आणि साहित्य व्यवहाराबरोबर, साहित्यातील दिग्गज मंडळी, दलित साहित्य चळवळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जोपासले आणि ते सर्वांसमोर मांडले आ़ज त्यांची आठवण होत आहे.

अस्मितादर्श आणि नवोदितांना दिलेली संधी..... जेष्ठ साहित्यिक, विचारवंत म्हणुन आपली निवड आहे, काय वाटते. ?

'अस्मितादर्शचा' प्रवास गेली ३४ वर्ष अव्याहतपणे चालु आहे, त्यातुन अनेक नवे साहित्यिक घडु शकले. या पाठीमागे प्रेरणा आणि उर्जा आहे ती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची. त्यांच्या विचारांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझी निवड ही सर्व लेखन प्रकारातील मराठी साहित्यिकांचा सन्मान समजतो. मराठी साहित्य जगातील इतर साहित्याचे तोडीचेच आहे, म्हणुन त्याची ही पावती आहे.

जागतिकीकरण, ...उदारीकरण...खाजगीकरण, माहितीतंत्रज्ञान याचा परिणाम मराठी साहित्यावर होत आहे का ?

जागतिक प्रभावरेट्यांमुळे जे जे बदल होत जातात त्याचा परिणाम साहित्यावर होतो. मात्र साहित्यातील चिरंतनमुल्य बदलत नसतात. विविध क्षेत्रातील ताण्-तणाव नव्या स्वरुपात येतील. संगणक आलं, संगणकाचा परिणाम जीवनावर होतो. आणि जीवनाचं दर्शन तर साहित्य घडवतं. मग त्याचे जे काय परिणाम असतील ते तर समोर येणारच आहेत. कुसुमाग्रजांनी जवळजवळ ४०-४५ च्या काळामधे एक कादंबरी लिहिली होती. त्याच्यामधे माणसं ही पृथ्वीला प्रदक्षीणा घालताहेत अशी कल्पना त्यांनी केली होती. हे प्रत्यक्षात आलं वीस-पंचवीस वर्षांनी. तेव्हा असं होतं..... लेखक जो काही लिहित असतो, तो जी काही कल्पना करतो. ते कधी-कधी वास्तवात सुद्धा येतं.

तेव्हा त्याचा संबंध हा अपरिहार्यपणे येणारच, तंत्रज्ञानक्षेत्रातील मंडळी असो, त्यांचे अनुभव असो, जागतिकीकरण असो... ज्याचे-ज्याचे परिणाम मानवी जीवनावर होतात, ते ते सर्व साहित्यामधून आलं पाहिजे. साहित्य हे मानवी जीवनाचं दर्शन घडवतं, तेव्हा स्वाभाविकपणे त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटेल.

विश्वसाहित्य संमेलनात आपण कोणती भुमिका मांडणार आहात ?

गेली चाळीस-पन्नास वर्षात जी परिवर्तने झालीत. विवक्षीत वर्तुळातून साहित्य बाहेर आले. मूक अनुभव व्यक्त होऊ लागले. त्याबरोबर कसदार साहित्याची चर्चा आणि देवाण-घेवाण या निमित्ताने करता येईल.

सर, मिसळपाव आणि तत्सम संकेतस्थळांवर लेखन करणारी जी लेखक मंडळी आहेत, उच्च दर्जाचे लेखन करुनही त्यांच्या लेखनाची नोंद साहित्यिक, समीक्षक दखल घेतांना दिसत नाही, असं मला वाटतं !

'विज्ञान कथा जेव्हा आल्या, तेव्हा प्रारंभी विज्ञान कथांकडे दुर्लक्षच झाले. मग ते लक्ष्मण लोंढे असतील, जयंत नारळीकर असतील, या लोकांनी विज्ञान कथा लिहिल्या. पण कालांतराने आपल्या लक्षात येते की त्यांच्या कथांचा विज्ञान कथा म्हणुन समावेश साहित्यामधे झाला आणि त्याची दखल घेतली गेली. इंटरनेटवरील लेखनाचा साहित्यविषयक लेखनाचा काळ फार थोडासा आहे, त्याची दखल साहित्याला घ्यावी लागेल.

सर, भावुकतेने अंत:करणात जपून ठेवलेले काही क्षण ?

१९४६ साली मी पहिल्यांदा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पाहिले आणि त्यांचे मराठीतले ओजस्वी भाषण ऐकले त्यानंतर अनेकदा त्यांची भाषणे ऐकण्याची संधी मिळाली. १९५४ साली माउंट हॉटेलमधे बाबासाहेबांच्या जयजयकाराने विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून टाकला. त्यावेळी ते आमच्याशी बोलले मी समोर होतो. ते मला म्हणाले ' तू काय करतोस ? मी म्हणालो, 'मी विद्यार्थी आहे, दहावीला आहे मग ते आम्हा सर्वांना उद्देशून म्हणाले, तुम्ही विद्यार्थी आहात. अभ्यासाकडे लक्ष द्या. 'less diet, study hard' असे बाबासाहेब म्हणत त्याचा पुनः एकदा प्रत्यय आला. आणि एकदा त्यांना वंदन करता आले. असे अनेक क्षण अतिशय भावुकतेने अंत:करणात जपून ठेवले आहेत.

नवीन लेखन करणा-यांसाठी काही संदेश ?

'संदेश काही नाही. प्रामाणिकपणे लिहिले पाहिजे. सच्चे अनुभव हे कधीही साहित्यापासून दूर राहात नसतात. दूर राहू नये. तेव्हा जे लिहायचे असेल त्यात आंतरिक उमाळा असावा. खोटेपणाने तुम्ही साहित्यनिर्मिती करु लागला तर त्याचा खोटेपणा उघड होतो. पितळ हे तुम्ही कितीही सोनं म्हटलं तर ते सोनं होत नाही. तसं साहित्याचे सुद्धा आहे.

धन्यवाद सर....!!!

( अजून खूप विचारायचे होते, गप्पा मारायच्या होत्या, पण अभिनंदनासाठी ताटकळलेली मंडळी पाहता गप्पा आवरत्या घेतल्या. मुलाखत भ्रमनध्वनीत रेकॉर्ड करुन नंतर लिहिलेले आहे,त्यामुळे चुभुदेघे. )
पुस्तके     सन्मान

सरांचे, स्वतःचे भव्य ग्रंथालय आहे. संशोधन कार्यासाठी अनेक प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना ती एक मेजवानी असते. विविध सन्मानचिन्ह, मानपत्रांनी सरांचे घर भरुन गेले आहे.

माझा निबंध ते अनुदिनीपर्यंतचा प्रवास

निबंध लिहा: माझा आवडता प्राणी, शाळेचे आत्मचरित्र, वाचनाचे महत्व.
शाळेत असा प्रश्न असायचा सहामाही व वार्षिक परिक्षेला. किंवा मग पत्रलेखन. गुण १० ते १५. त्यावेळेला नेमके काय लिहावे ते माहित नसायचेच. मित्रांसोबत जास्त वेळ शाळेतील अभ्यासाचेच जास्त बोलणे व्हायचे किंवा मग खेळ , दूरदर्शनवरील कार्यक्रम, सिनेमे ह्यांच्यावर चर्चा व्हायची. पण त्यावर लिहायला कधी कोणी नाही सांगितले. त्यामुळे निबंध लिहायला मदत व्हायची निबंधावरील पुस्तकाची किंवा मार्गदर्शकाची(हो, तेव्हा मार्गदर्शक वापरणे म्हणजे थोडेफार कमीपणाचे मानले जायचे) तेही वापरावयास सुरुवात केली होती. पण त्या वाचनावर, ठरलेल्या विषयांवरच लिहिले जायचे तरीही पूर्ण गुण मिळण्याची खात्री नसायची.
तसेच नेत्यांच्या जयंती/पुण्यतिथीलाही आपण त्या त्या नेत्याबद्दल भाषण लिहून (घेउन) व त्याची तयारी करून मग व्यासपीठावर बोलायला जायचो. मग ते शाळेत असो किंवा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेताना. माझ्या आठवणीप्रमाणे मी एका शाळेत जाऊन डॉ. हेडगेवारांवर भाषण केले होते. बाकी सर्व आपल्या शाळेतच. पण ते सर्व लिहिण्यातही कोणीतरी आपल्याला मदत केलेली असायचीच.

नंतर मग शाळेच्या बाहेरही थोडाफार सहभाग होऊ लागला. कॉलनीमधील गणपती उत्सवात एखाद-दुसरे एकपात्री कथन ही केले. मी ८/९ वीत असताना घरातील गणपतीची तयारी होत असताना मी व माझ्या बहिणीने गप्पा-गप्पांतच एक कथा तयार केली. ती आम्हालाच एवढी आवडली की मग आम्ही त्यावर एक अंकी नाटक लिहून काढले. मग इतरांची मदत घेऊन सार्वजनिक गणपतीत त्या नाटकाचे सादरीकरण केले.

हळू हळू (म्हणजे रखडत नाही हो, मी एक हुशार विद्यार्थी होतो Smile ) वरच्या इयत्तेत गेलो, कॉलेज मध्ये गेलो तर तो अनुभव वाढत गेला. इतर पुस्तक वाचन, वर्तमान पत्रे वाचणे सुरू झाले. भरपूर लोकांची पुस्तके, कथा वाचल्या. बातम्या, सिनेमे, गावा-गावांतील अनुभव गाठीशी येत गेले. तसेच विचारशक्ती वाढत गेली. त्यामुळे मित्रांसोबत/इतर लोकांसोबत चर्चा वाढत गेल्या. वादही घालू लागलो. त्यात वेगळेपणही वाटायचे.
मग आंतरजालावरील भ्रमण सुरू झाले. कॉलेज संपल्यावर काही मित्र दूर गेले. मग त्यांच्याशी इमेलवर संपर्क चालू राहिला. स्वत:चे अनुभव त्यांना मोठ्या-मोठ्या विपत्रांतून लिहून पाठवणे चालू झाले.
आंतरजालावर भ्रमण वाढत गेले. तेव्हा मराठी संकेतस्थळेही नावारूपाला आली होती. त्यांचे सदस्यत्व घेउन वाचन चालू झाले. तिथे प्रतिक्रिया देता देता नवीन गोष्टी कळत गेल्या. मग स्वत:चेही काहीतरी लिहिणे चालू झाले. प्रतिसाद मिळत गेले तसे हुरूप आला. काही वेळा विरोधातही प्रतिक्रिया मिळाल्या. पण आता सवय झालीय. त्यामुळे आता लिहितानाच असे विषय निवडतो की ज्यात मला माहित आहे, जमल्यास वाद घालण्यासही तयारी असा Wink
आता ब्लॉगमुळे तर गेल्या वर्षापासून स्वत:च्या मनातील विचार/तक्रारी खरडणे चालू झाले.

हे सर्व आठवत असताना नुकताच पिवळा डांबिस ह्यांचा हा अग्रलेख वाचला. आणि वाटले मला वाटत असलेले विचार ह्यात आहेतच. जसा सर्वांमध्ये फरक पडला, तसा शाळेतील निबंधापासून आता थोडेफार ललित लेखनापर्यंत स्वत:हून लिहिण्याइतपत माझ्यात फरक नक्कीच पडलाय. (लोक वाचतील, नाही वाचतील तो भाग वेगळा Wink )

तेव्हा चला, आपले लिहिणे सुरूच ठेवूया. पाहू आणखी किती फरक पडतो ते Smile

..कोणती संवेदना.

एक जीवन
जसा सागर,
सागरात तो एकटा..
एकाकी मनांस त्याच्या कोणती संवेदना?

आकाशी दशदिशांतून चंद्र तोही एकटा..
जीव येई - जन्म घेई,
जाई तेव्हा एकटा...

पण,
जगतांना भाव मात्र एकटा न सोडती.
गुंतवून स्वत:त ते स्वप्न त्याला दावती.
अन् स्वप्न जेव्हा स्वप्न ठरते
भावही ते मिथ्य दिसती...
अथांग या विश्वात उरतो, तोच त्याला सोबती...

एक जीवन
जसा सागर,
सागरात तो एकटा..
थिजलेल्या मनांस त्याच्या न कोणती संवेदना..

राघव

फोड रे मटका...

धुंद हे काश्मिर सगळे, एकमेकां मारिती
प्रश्न विसरूनी जनांचा, फोड रे मटका

धुंद त्या पदकांत सगळे, सुवर्ण कवटाळती
प्रश्न हरलेल्या क्षणांचा, फोड रे मटका

धुंद त्या खुर्चीत सगळे, राजिनामा खेळती
प्रश्न मॅडमच्या खुणांचा, फोड रे मटका

धुंद त्या नोटांत सगळे, राज-का-रण आहुती
प्रश्न विकलेल्या मतांचा, फोड रे मटका

धुंद ते मुंबईत सगळे, वीजपाणी सांडती
प्रश्न विझलेल्या दिव्यांचा, फोड रे मटका

धुंद अभिषेकांत सगळे, दुधदही अर्पिती
प्रश्न सुकलेल्या घशांचा, फोड रे मटका

धुंद त्या माडीत सगळे, साकीपेले रिचवीती
प्रश्न चुरलेल्या कळ्यांचा, फोड रे मटका

धुंद ते तंत्रात सगळे, दो करांनी उपसती
प्रश्न वितळत्या हिमाचा, फोड रे मटका

धुंद हे गोपाळ सगळे, गोपिका न्याहाळती
प्रश्न कसला रे थरांचा, फोड रे मटका

सर्व वाचकांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
-ऋषिकेश