विरंगुळा

रविवारची करमणूक.

चटपटीत मजेदार भेळ खाताना शेवटच्या घासासाठी खुसखुशीत पुरीचा एखादा तुकडा राखून ठेवावा तसा च एक कागदी संग्रह मी बनवतो आहे .
त्यातीलच ही एक चित्र मालीका .
निर्मीती काळ अंदाजे १९४९-५०.
प्रकाशकीय हक्काचा अंदाज नाही पण प्रशासकीय हक्काचा आहे.
संपादकांनी पुरेसा आस्वाद घेतल्यावर धागा अप्रकाशीत करायला हरकत नाही.
मिपा सदस्यांना त्यांच्या व्यक्तीरेखेशी साम्य असलेल्या व्यक्ती या धाग्यात दिसल्यास तो केवळ योगायोग नाही.
किंबहुना हे साम्य दाखवणे हा एक हिडन अजेंडा आहे असे म्हटल्यास मी अंमळ नाखुशीनंतर सहमती दर्शवीन

अर्ध्या तासाचा फरक

साल होते १९९५. नोव्हेंबर २१. नवी दिल्ली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी निघालेल्या अभ्यास सहलीचा आमचा मुक्काम गेले दोन दिवस चाणक्यपुरीच्या इंटरनॅशनल यूथ हॉस्टेल येथे होता. आमचा तीस - पस्तीसजणांचा तांडा दिल्लीत आल्यापासून नुसती तंगडतोड करत होता. पुण्यात सगळीकडे दुचाकी, रिक्षांची सवय... इथे सगळी अंतरे लांबच लांब, आणि आमचे प्राध्यापक आम्हाला ''कसे सगळे तावडीत सापडलेत, '' अशा आविर्भावात दिल्ली घुमव घुमव घुमवत होते. राजघाट, इंडिया गेट, संसद, १ सफदरजंग रोड, १० जनपथ, बहाई मंदिर..... आमची पायपीट संपायची काही चिन्हे दिसत नव्हती! आणि जरा उसंत मिळाली की बरोबरच्या मुली आमच्या वर्गमित्रांना बरोबर घेऊन करोलबाग नाहीतर पालिकाबझारवर धाडी घालत. सायंकाळी हॉस्टेलावर दिवसभरात केलेल्या शॉपिंगचा प्रदर्शनाचा कार्यक्रम असे.

मला दोन दिवस फीर फीर फिरून जाम कंटाळा आला होता. पाय तर काय दुखत होते विचारू नका. कोठेतरी शांतपणे, आरामात, ए‌‌. सी. च्या थंडगार झुळका खात अतिशीतपेयांचा आस्वाद घ्यावा, सोबत मंद संगीत असावे, निवांत गप्पांचा फड जमवावा अशा दिवास्वप्नांत मी गर्क होते.
हीच अवस्था माझ्या अन्य दोन अमराठी मैत्रिणींची होती. बाकी कळपातील शिस्त व अनुशासनाला (? ) न जुमानता कामचुकार म्हशींप्रमाणे आम्ही कधी आमच्या ग्रुपला चकवा देऊन ह्या 'स्थल-दर्शनातून' निसटतो असे आम्हाला झालेले!

अखेर ती घटिका आली! एकामागून एक स्थळांचे डोळे भिरभिरवणारे दर्शन घेतल्यावर आमचे प्राध्यापक आम्हाला प्रगती मैदानावर घेऊन आले. तिथे कोणतातरी मेळा भरला होता. त्यांची अपेक्षा होती की आम्ही दुखऱ्या पायांनी ते मैदान पालथे घालत त्या मेळ्याचा आनंद घ्यावा! ह्यॅ!!!!
बाकी सर्व ग्रुप मैदानात शिरल्यावर आम्ही तिघी मैत्रिणींनी सर्वांची नजर चुकवून तिथून कल्टी मारली. आदल्या दिवशी कॅनॉट प्लेस मध्ये ''निरुलाज''च्या जवळचे ''द होस्ट'' नावाचे एक मस्त तारांकित हॉटेल आम्ही हेरून ठेवले होते. आदल्या दिवशी तिथे थोडा अल्पोपाहारही केला होता. जुन्या युरोपियन धाटणीचे वातावरण, आल्हाददायक ए. सी. आणि चकाट्या पिटायला अतिशय उत्तम! आता तिथेच जायचे, मस्त हाणम्या जेवायचे आणि तेथील ए. सी. चा मनोरम आनंद घेत फुल्ल्टू टाईमपास करायचा.... मग सायंकाळी बाकी ग्रुपला थेट हॉस्टेलावर गाठायचे... वाट चुकलो वगैरे सांगून वेळ मारून न्यायची, असा प्लॅन ठरला.

एका रिक्षात आम्ही तिघींनी स्वतःचे देह कोंबले व कॅनॉट प्लेसच्या दिशेने प्रवास सुरू केला.
आमचा आनंद एव्हाना 'कशी हूल दिली' ह्या कल्पनेने व दोन-तीन दिवसांनी धड आरामात बसून जेवायला मिळण्याच्या संधीप्राप्तीने गगनात मावत नव्हता. चाणक्यपुरीत विदेशी वकिलाती व यांच्या टोलेजंग इमारती, कचेऱ्या, बंगले, हॉटेल्स, रस्ते, चौक सगळेच चकचकीत होते... पण हॉटेल्स पंच-सप्त तारांकित त्यामुळे आमच्या खिशाच्या बाहेर! हॉस्टेलाचे अन्न सुमार होते आणि त्यात तिथे एक पंजाब - हरियाणाची हॉकी टीम राहायला आलेली.... त्यांच्या अफाट खाण्यामुळे हॉस्टेल कॅन्टिनमधले बहुतेक पदार्थ संपलेले असत. त्यामुळे गेले तीन दिवस आम्ही कोणत्यातरी चायनीजच्या गाडीसमोर उभे राहून, नाहीतर हॉस्टेलाजवळच्या रस्त्यावरच्या धाब्यावर अक्षरशः खाली पदपथावर फतकल मारून जेवत होतो.

आज मात्र आमचे खाद्य भाग्य उजाडले होते!

हॉटेलपाशी पोहोचेपर्यंत दुपारचे अडीच झालेले. बाहेर टळटळीत ऊन असताना आपण कसा ए. सी. हॉटेलात बसून यथेच्छ जेवण चापायचा निर्णय घेतला ह्याबद्दल स्वतःच्या अक्कलहुशारीचे कौतुक करतच आम्ही हॉटेलबाहेर दाखल झालो. तिथे आम्हाला आमच्यासारखीच दोन चुकार मांजरे उर्फ आमचे वर्गमित्र दिसले. म्हणजे काल ह्यांनीदेखील हे हॉटेल हेरून ठेवले होते म्हणायचे!! एकमेकांना 'कसे इतरांना गंडवले'च्या टाळ्या देऊन झाल्यावर आम्ही सुहास्यवदनाने हॉटेलात प्रवेश केला. एका छानशा टेबलला मोकळे पाहून तिथेच बसायचे ठरवले. 'लंच क्राऊड' ओसरत आल्यामुळे जागा मिळायला काहीच प्रॉब्लेम आला नाही.
मग सुरू झाला आमचा टाईमपास. स्टार्टर्स, मॉकटेल्स, गप्पांचा राऊंड - मग वेटर दोन-तीनदा सूचकपणे ऑर्डर घ्यायला आल्यावर पुढची ऑर्डर असा कार्यक्रम सुरू झाला. तसे आम्ही सगळे पुण्यातही फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, डेक्कन, कॅंप इत्यादी ठिकाणच्या विविध रेस्टॉरंटसमध्ये चकाट्या पिटण्यात माहिर असल्यामुळे येथेही तेच काम कुशलतेने पार पाडण्यात आम्हाला कसलीच अडचण येत नव्हती. बरं, स्टाफदेखील कसलीही खळखळ न करता चुपचाप आमचे हास्यविनोद, लांबवलेल्या ऑर्डरी, आमच्या दोस्तांची कॉमेडीगिरी वगैरे सहन करत होता. शेजारच्या दोन-तीन टेबल्सना काही परदेशी प्रवासी बसले होते, त्यात दोन-चार रुपसुंदऱ्या असल्यामुळे आमच्या मित्रांचे निम्मे लक्ष गप्पांमध्ये, निम्मे 'त्यांच्या'कडे लागले होते. अर्थातच आम्ही त्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन दोघांनाही भरपूर छळून घेतले.

अचानक मित्राची नजर मनगटावरच्या घड्याळाकडे गेली. ''ओह, शि* यार! वुई आर ब्ल* लेट फॉर अवर कर्फ्यू टाईम! ''
पाहिले तर सायंकाळचे सात वाजत आलेले. अरेच्या! वेळ कसा आणि कुठे गेला हे कळलेच नव्हते! आणि दिल्लीत पाऊल टाकल्या टाकल्या आमच्या प्राध्यापकांनी समस्त विद्यार्थ्यांना तंबी दिली होती : सर्वांनी सायंकाळी सहाच्या आत हॉस्टेलावर हजर पाहिजे! मुलींना तर साडेपाचापर्यंतच हजर राहण्याच्या सूचना होत्या. कारण अर्थात चाणक्यपुरी भागातील अतिकडक सुरक्षा, चेकपोस्ट्स, निर्जन रस्ते, गुन्हेगारी आणि घातपाताची भीती ह्याशिवाय आमचे त्या शहरात असलेले नवखेपण हे होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घेतलेली ही दक्षता होती.
अर्थात आमच्या टाईमपासमध्ये आम्ही ही बाब साफ विसरलो होतो! मग काय! घाईघाईत बिल दिले, टॅक्सी पकडली आणि हॉस्टेलाचा मार्ग धरला. अंधार पडल्यावर एरवी उजेडात ओळखीची वाटणारी दिल्ली परकी परकी, असुरक्षित वाटू लागली होती. रस्त्यावरच्या वाहनांचे वेग वाढले होते. चाणक्यपुरीच्या जवळ तर रस्त्यात माणसेच नव्हती. होत्या त्या फक्त भन्नाट, सुसाट वेगाने धावणाऱ्या परदेशी बनावटीच्या, काळ्या काचांच्या अशक्य चकचकीत गाड्या!! रस्त्यावर दोन-तीनदा आम्हाला सुरक्षारक्षकांनी, पोलिसांनी थांबवले, आमची ओळखपत्रे पाहिली आणि मगच पुढे सोडले. वॉकीटॉकी काय, हेल्मेटस काय... हे सुरक्षा प्रकरण आम्हाला झेपणारे नव्हते!

हॉस्टेलमध्ये पोचलो तेव्हा जवळपास पावणेआठ होत आलेले.
आमच्या उरलेल्या दोन रूममेट्स आम्ही लपत-छपत रूममध्ये प्रवेश केल्यावर अक्षरशः चिडचिडाट करत आमच्या अंगावर धावूनच यायच्या शिल्लक होत्या. ''कहां गये थे रे तुम लोग? पता है क्या, सर दो-दो बार चक्कर लगाके गए सब रूम्सकी । हमने कैसे उन्हे रोका है हमेही पता है... क्या क्या बहाने बनाने पडे तुम लोगके लिए.... अब सरको यदी मालूम पडा और उन्होंने इंटर्नल्स और व्हायवाके मार्क्समेंसे कुछ मार्क्स काटे तुम लोगके, तो हमे मत बताना, हां ।'' अरे बापरे! हा तर विचार आमच्या डोक्यातच शिरला नव्हता. आम्ही आवरून घेईपर्यंत सर पुन्हा एकदा 'चेक' करायला आलेच होते. मग हसत हसत, 'हॅलो सर, गुड इव्हिनिंग सर.... ' वगैरे मोघम गप्पा मारून झाल्यावर ते एकदाचे अंतर्धान पावले. हुश्श! इंटर्नल्स आणि व्हायवाचे मार्क्स बचावले!!
त्या रात्री आम्ही तिघी उशीरापर्यंत 'आपण कशी धमाल केली' म्हणून खिदळत होतो. पण का कोण जाणे, कुठेतरी काहीतरी चुकतंय असेच मनात खोलवर वाटत होते.

ते असं का वाटत होते त्याचे कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उलगडले.
मी आमच्या रूममध्ये तयार होत होते तेवढ्यात कालच्या आमच्या हॉटेल-स्वारीतील एक मैत्रीण रूममध्ये आली आणि फुसफुसली, ''जल्दी नीचे आ, बाकी सब इंतजार कर रहे है ।'' मला तर काही कळेना! तर माझा हात धरून ती जवळपास मला ओढतच खाली घेऊन गेली. ''अरे, तू बताएगी क्या यह सब क्या चल रहा है? '' इति मी. ''तू देख'' करत तिने मला स्वागतकक्षात नेले. तिथे तिपाईवर दोनचार इंग्रजी वृत्तपत्रे पडली होती. तिने त्यातले एक उचलले व माझ्या हातात कोंबले, ''ले, पढ! '' मी मथळ्यावर नजर फिरवली आणि पायाखालची जमीनच जणू सरकत आहे असे वाटले.
आदल्या सायंकाळी ठीक साडे-सातच्या दरम्यान कॅनॉट प्लेसमधील हॉटेल दिल्ली दरबारजवळ झालेल्या शक्तीशाली बॉंब स्फोटात दोन नागरिक ठार, बावीस जखमी.... माझ्या हातातून वर्तमानपत्र गळून पडायचेच ते काय शिल्लक राहिले! आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो ते दिल्ली दरबारपासून थोड्याच म्हणजे तीन-चार मिनिटांच्या रस्त्यावर होते. आदल्या दिवशी ह्याच दिल्ली दरबारच्या बाहेर आम्ही परतीसाठी टॅक्सी शोधत होतो! आणि त्यानंतर जेमतेम अर्ध्या तासात तिथे बॉंब ब्लास्ट झाला होता! आपल्याला तिथे अजून उशीर झाला असता तर???!!! कल्पनाही करवत नव्हती.
आपल्या बरोबर, हॉटेलात आजूबाजूला असणार्‍यांपैकी तर कोणी त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये सापडले नसतील? नोव्हेंबरच्या सकाळच्या धुकंभरल्या थंडीतही मला घाम फुटला होता. काही सुचत नव्हते!
आमचे ते दोन मित्र व आम्ही तिघीजणी यांची सायलेंट कॉंफरन्स झाली. ''पेपर देखा क्या? '' ''हां यार, बाल बाल बचे।'' ''चूप! कोई कुछ नही बोलेगा ।'' ''हां, यह भी सही है, यदी औरोंको पता लगा तो....स्पेशली सर को....।'' ''देखो, अपना चेहरा जरा ठीक करके जाना औरोंके सामने.... नही तो पूछेंगे ।'' ''हां रे.... '' आमची धेडगुजरी कॉन्फ़रन्स संपली. दिल्लीच्या घटनेमुळे बाकी स्थलदर्शनाला गुंडाळून पुढच्या टप्प्याला, म्हणजेच आग्रा - मथुरेला जाण्याचे ठरले. जाताना आमची बस कॅनॉट प्लेसवरून गेली. खिडक्यांच्या काचांतून मुंड्या बाहेर काढायचेच ते काय शिल्लक ठेवून समस्त सहाध्यायींनी बॉंब ब्लास्टच्या जागेचे दर्शन घेतले. ''ए तूने देखा क्या, वह दूकान कितनी जली हुई दिखायी दे रही थी ना? '' एक वर्गमैत्रीण दुसरीला मोठ्यानं विचारत होती. मी मात्र मनातल्या मनात ''देवा, वाचवलंस रे बाबा! आता पुन्हा अशी चूक करणार नाही!! '' हेच पुटपुटत बसले होते!

-- अरुंधती कुलकर्णी
http://iravatik.blogspot.com/

विजापुरचा अजब किस्सा

हा किस्सा विजापूरला घडलेला. वडीलांचे व्यवसायाच्या कामाअंतर्गत तिथल्या एका शेतकर्‍याने शेतजमीन सर्वेक्षणासाठी बोलावल्याने विजापूरला जायचे नक्की झालेले. आम्हाला शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. मग ठरले की सकुटुंब सपरिवार विजापूरला जायचे, वडील त्यांचे काम आटोपतील आणि मग आम्ही त्यांच्याबरोबर विजापूर-दर्शन करू.

ठरल्याप्रमाणे आम्ही चौघे लाल डब्ब्यातून विजापूरला रवाना झालो. तिथल्याच एका बर्‍यापैकी लॉजमध्ये उतरलो. वडीलांची विजापुरात त्यांचे शेतकरी ग्राहक सोडले तर फार कोणाशीच ओळख नव्हती. त्यांचे काम अंदाजाप्रमाणे एका दिवसात आटोपले. आता कल्ला!! मग काय, आमची विजापूर-भ्रमन्ती सुरु झाली. कधी पायी, कधी सायकल-रीक्षा (की रीक्षा?) यांनी तेथील प्रेक्षणीय स्थळे पालथी घालायला सुरुवात केली. सोबत आईसक्रीम डायट! अहाहा!!

तर असेच फिरत फिरत आम्ही गोल घुमटापाशी आलो. तेथील आवाज घुमण्याची अद्भुतता अनुभवून झाली. मग तेथील थडगी पाहून झाली. मला तर कधी एकदा तिथून निघतोय असे झाले होते!
त्यानंतर जोड घुमट पाहिला. तिथून निघत होतो.... दुपारचे ऊन चांगलेच होरपळत होते. घशाला कोरड जाणवत होती. आता रीक्षात बसायचे आणि थेट लॉज गाठायचे असा प्लॅन चाललेला असतानाच एक खणखणीत आवाजातील हाक ऐकू आली, ''कुलकर्णी साब, ओ कुलकर्णी साब.....''

वडीलांनी लक्ष दिले नाही. थोड्या अंतरावर इतरही प्रवासी रेंगाळत उभे होते. त्यांना वाटले, त्यापैकीच कोणाला तरी हाळी दिली असेल.

ह्या खेपेस हाक स्पष्ट व खणखणीत होती....'' ओ कुलकर्णी साब....थोडा रुकिये |'' नकळत वडीलांची व त्यासोबत आमची पावलेही थबकली. आमच्यासमोर एक उंचापुरा, हिरवी कफनी घातलेला, हातात मोरपीसाचा झाडू घेतलेला, डोक्याला हिरव्या रंगाचे फडके गुंडाळलेला फकीर उभा होता. सुरमा घातलेले त्याचे डोळे भेदक होते. वडीलांना वाटले, ह्याला काही पैसे वगैरे हवे असतील, म्हणून त्यांनी खिशात हात घातला. त्याबरोबर त्या फकीराने त्यांना थांबायची खूण केली. ''हमें आपसे कुछ नही चाहिए|'' (मग कशाला थांबवलं?)
जणू आमच्या मनातला प्रश्न ओळखून तो फकीरबाबा वडीलांना म्हणाला, '' आपका पूरा नाम फलाना फलाना है, आप पूनासे आये है |'' (बरोबर आहे बाबा तुझं, आता मुद्द्यावर येशील का? आणि तुला ही माहिती कोणी दिली?)
आमच्या चेहर्‍यावर जणू प्रश्नचिन्हे कोरली गेली होती. आपले बोलणे तसेच पुढे चालू ठेवून तो बाबा उद्गारला, '' लेकिन आप असल में पूनाके नही है | आपका मूल ग्राम फलाना फलाना है | आपके पिताजीका पूरा नाम फलाना फलाना था, दादाजीका नाम फलाना फलाना था |'' आता आम्ही केवळ भोवळ येऊन खाली पडायचेच शिल्लक राहिलो होतो. ह्या बाब्याला आपलं नाव, गाव, व्यवसाय, पूर्वजांची नावं हे सगळं कोठून समजलं? कोणी सांगितलं? ही असली कसली थट्टा?
पण खरी भोवंडायची वेळ नंतरच येणार होती!!
आमच्या गोंधळलेल्या चेहर्‍यांकडे बघत त्या फकिराने एकदम वडीलांच्या नजरेला नजर भिडवली आणि म्हणाला, ''हम यह सब जानते है क्योंकि बहुत साल पहले आपके दादा-परदादाजीसे पहले, आपके पुरखोंमेंसे एक बडे नेक और पाक इन्सान अपने संगीत- गुरुके खातिर, मरनेसे पहले अपने पूरे परिवारके साथ मुस्सलमान धरमको अपनाए थे | उन सबकी कबरें यहां है, आए, उन्हे मिले |'' त्याने आपल्या हाताने आम्हाला त्याच्याबरोबर चलायची खूण केली.
आता थरथरायची आमची पाळी होती. कोण कुठला फकीर, अचानक उगवतो काय, काहीच्याबाही बरळतो काय, आणि आता तर आम्हाला कोठेतरी चलण्याची जवळपास आज्ञाच करतो!!
त्याने नेलेल्या ठिकाणी बाहेर स्पष्ट शब्दांत स्त्रियांनी प्रवेश करायला मनाई आहे असे लिहिले होते. आई व आम्ही दोघी बहिणी तिथेच घुटमळलो. तसे तो फकीर आमच्याकडे वळून म्हणाला, ''आप भी आईए, यह सब तो आपकेही लोग है | झिझकना मत, बेखौफ आना |'' अरे बाबा, तू असं काय म्हणून राहिला? तुला कळतंय का तू काय बोलतो आहेस ते? इति आम्ही, अर्थात मनातल्या मनात.
जोड घुमटाच्या जवळच असलेला हा भाग जवळपास निर्जन होता. समोर तंबूवजा कनात दिसत होती. हिरव्यागार रंगाची. नक्षीदार वेलबुट्टी, भरजरी काम केलेले पडदे आजूबाजूला सोडलेले. आत शिरल्यावर ऊद, धूपाचा दर्ग्याजवळ येणारा सुवास चारी अंगांनी वेढत होता. भर उन्हातही इथे एक प्रकारचा गारवा भरून राहिला होता. मोरपीसाच्या चवर्‍या की पंखे घेऊन अजून दोन -तीन फकिरासारखी दिसणारी माणसे तेथील काही कबरी (की पीर)वर चवर्‍या ढाळत होती. आम्हाला पाहून कोणीही आश्चर्य दाखवले नाही, की खास स्वागतही केले नाही. आपापल्या जागाही सोडल्या नाहीत. हुश्श!
आम्हाला भेटलेला फकिरबाबा तोवर कोपर्‍यात असलेल्या एका कबरींच्या समूहाकडे आम्हाला घेऊन गेला होता. तिथे गेल्यावर थबकून त्या कबरींकडे अंगुलीनिर्देश करून त्याने सांगितले की हेच आहेत तुमचे पूर्वज.
त्याही पुढे जाऊन प्रत्येक कबरीपाशी जाऊन त्याने ती कबर कोणाची आहे हे सांगितले. त्यांचे आधीचे नाव व धर्म बदलल्यावर घेतलेले नावही सांगितले. सर्वात शेवटी त्या परिवारातील कुटुंबप्रमुखाच्या थडग्यापाशी येऊन तो थांबला आणि नाट्यमय सुरात म्हणाला, ''यह आपका कबसे इंतजार कर रहे है |''
हे राम!!!!!! एव्हाना आम्हाला अगदी पिक्चरच्या सेटवर गेल्यासारखं वाटायला लागलेलं! भांबावून जाणं का काय असतं म्हणतात ना, ते अगदी सहीच्या सही अनुभवलं तिथं.
वडीलांनी समयसूचकता दाखवून त्या कबरीला प्रणाम केला, चक्क साष्टांग प्रणिपातच घातला म्हणेनात! त्यांच्या वागण्याचा अर्थ ओळखून आम्हीही वाकलो व यथोचित नमस्कार केले. नंतर त्या फकीरबाबालाही दंडवत घातला. त्याने मोठ्या तोंडाने आशीर्वाद दिले. आम्हाला सोडायला परत कनातीच्या दारापर्यंत आला.
वडीलांनी पुन्हा एकदा त्याला काहीतरी पैसे द्यावेत म्हणून खिशात हात घातल्यावर त्याने पुन्हा एकदा ठाम नकार दिला. ''फिरसे आना |'' आम्ही हात हालवून निरोप घेत असताना तो जोरात उद्गारला.
जवळपास पळत पळतच आम्ही रीक्षा स्टँड गाठला. तिथून थेट लॉज! घडलेल्या प्रकाराविषयी कोणीच बोलत नव्हते. आईने वडीलांना फक्त त्यांचा खिसा चाचपून पैशाचे पाकिट वगैरे सुरक्षित आहे ना हे पहायला सांगितले. सर्वकाही जिथल्या तिथे होते. जागेवर नव्हती ती आमची मने! ह्या अकल्पित माहितीला खरे-खोटे पडताळायला कोणी जुन्या पिढीची माणसेही उरली नव्हती, ना कागदपत्रे! गांधीजींच्या खुनानंतर आमच्या मूळ गावी उडालेल्या दंगलींत सर्व ब्राह्मणवस्ती पेटवून देण्यात आली होती, त्यात ती कागदपत्रेही नष्ट झाली होती.

अजूनही आम्हाला जे घडले, जी माहिती मिळाली ती सत्य की असत्य की आभास की अजून काही, ह्याबद्दल खात्री नाही. पण मिळालेला अनुभव मात्र जाम थरारक होता, जो या जन्मात विसरणे शक्य नाही!!

(वरील संवाद मी माझ्या तुटपुंज्या हिंदीच्या तोकड्या आधाराने लिहायचा प्रयत्न केलाय. तेव्हा चु.भू.दे.घे.)

-- अरुंधती कुलकर्णी

http://iravatik.blogspot.com/

कवितेची पाककृती ३: मुक्तकं गहिऱ्या नात्यांची

कवितेची पाककृती ३: मुक्तकं गहिऱ्या नात्यांची
(पुन्हा एकदा सरस्वतीला स्मरून...)

आपण सर्वसाधारण आयुष्याविषयी चर्चा करणाऱ्या कविता कशा बनवायच्या हे पहिल्या लेखात पाहिलं. गेल्या लेखात आपण सदाबहार प्रेमकविता कशा बनवायच्या ते पाहिलं. पण या ओढाळ वयाच्या प्रेमकविता चाखून झाल्यानंतर कधीतरी नव्हाळ्याच्या प्रेमाच्या रूपांतर जिव्हाळ्याच्या नात्यामध्ये होतं. प्रेमाच्या बंधनात एकदा बांधले गेले की ते दोघे अधिकाधिक जवळ येतात. अशी जवळीक झाली की पुढे काय करायचं याबाबत मात्र त्या दोघांची मतं वेगवेगळी असतात. एक जुनं हिंदी गाणं या मतभेदाचं सुंदर चित्रण करतं...

मै तेरा हजबंड तू मेरी वाईफ, जो मै कहू तू करेगी, तो आओ मिलकर प्यार करे, गाडी मे रोमान्स करे.
तू मेर हजबंड मै तेरी वाईफ, जो मै कहू तुम करोगे, तो आओ मिलकर काम करे, प्यार की कोई बात करे.

प्रेम व्यक्त करण्याच्या स्त्री पुरुषांच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. आणि कधी ना कधी त्या वेगवेगळ्या आहेत हे दोघांच्याही लक्षात येतं. आणि मग शिल्लक राहातो, एक लांबलचक हम्म्म्म्म.

कधीतरी अचानक, कल्पना नसताना त्या नात्यातल्या तरुणाला तरुणीकडनं शब्द ऐकू येतात ज्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर असतं 'आय थिंक वी नीड टू टॉक'. इंग्लिशमध्ये ही रुळलेली वाक्यरचना आहे, मराठीत त्या बाबतीत प्रमाण भाषा बनवणाऱ्यांमध्ये त्याविषयी अजून एकमत नाही. पण ते यायच्या आधी तरुणीने 'हा असा का बरं वागतो?' वरती थोडाबहुत विचार करून झाल्यानंतर हम्म्म्म्म म्हटलेलं असतं. ८२.४७% वेळा स्त्री पहिल्यांदा हम्म्म्म्म म्हणते असं आमच्या सखोल अभ्यासावरून दिसलेलं आहे. (अशी चार दशांशापर्यंत आकडेवारी दिली की एकदम खरी वाटते की नाही? पण त्याविषयी अधिक जाणून घ्यायला आमच्या 'काही संख्याशास्त्रीय पाककृती' ची वाट पहावी लागेल) ते वाक्य पहिल्यांदा तो ऐकतो तेव्हा त्या बिचाऱ्याला आपल्यावर नक्की काय प्रसंग आलेला आहे हे कळत नाही. पण काही वेळा ऐकलेलं असलं की मग मात्र तो लवकरच सावध होतो. त्याचे कान टवकारतात आणि श्वास आत खेचला जाऊन हम्म्म्म्म च्या बरोब्बर उलटी प्रतिक्रीया होते. एखादा रानटी प्राणी आसपास आहे, त्याच्यापासून बचाव कसा करायचा, युद्ध करायचं की पळून जायचं या दोन्हीच्या अॅड्रेनलिनतर्रार तयारीत. खूप वेळा ऐकल्यानंतर मात्र त्याला यातून बचाव नाही हे कळतं व त्याचाही एक हम्म्म्म्म येतो. व नंतर सुरू होते ती ती व तो चर्चा....

नातं मोठं झाल्यानंतरच्या चर्चा या आपण दोघं नक्की कोण आहोत, त्यापासून तयार होणारं नातं हे चांगलं बनतंय का, ते चांगलं बाळसं धरतंय का, ते दिसायला चांगलं आहे का, लोक त्याला काही बोलत तर नाहीत ना, या स्त्रीच्या मातृसुलभ भावनेतून उद्भवतात (८२.४७% वेळा). कधी ते खूप गोंडस हसतं तेव्हा त्याला तीट लावावीशी पण तिला वाटते. पुरुषाला मुळातच या सर्व गोष्टींची तितकी हौस नसते. असल्या बाबतीतली त्याची उदासीनता त्याच्या स्वत:च्या नट्ट्यापट्ट्यातून दिसून येते. त्याच्या मते, बहुतेक दिवशी आंघोळ, लाज राखण्यापुरते कपडे आणि सकाळी दात घासण्याचे जगावर उपकार, एवढं त्या नात्याने केलं की बास झालं. घर हा एक प्रचंड मोठा खोका असतो आणि त्यात आपल्या वस्तू पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे ठेवायच्या असतात या त्याच्या व्यवस्थितपणाच्या कल्पना. बायकांना मात्र नट्टापट्टा करणं हे बाहेर जाण्याइतकंच महत्त्वाचं असतं. कशासाठी काय, असले युटिलिटेरिअन प्रश्न त्यांना भेडसावत नाहीत. बाहुलीच्या इवल्याशा स्कर्टला इवल्या इवल्या टिकल्या लावून त्यांची फुलं करणाऱ्या मुली मोठ्या होऊन घराचा प्रत्येक कोपरा सजवून सोडायला जातात. मग नात्याला त्यांनी मॅचिंग कपडे, आधुनिक फॅशन आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या नाही दिल्या तरच नवल. एकदा का नात्यात पडलं की पुरुषांचे शिकारीचे दिवस संपलेले असतात, आणि एकत्र घरकुल बनवण्याचे स्त्रियांचे दिवस सुरू झालेले असतात. त्यामुळे ही गाणी बहुधा स्त्रियांच्या तोंडीच ऐकू येतात.

या गाण्यांचं थोडक्यात स्वरूप
तू हा असा वागतोस/आहेस, मी अशी वागते/आहे, त्यामुळे आपलं नातं बिघडतंय/छान आहे.

काही वेळा या रचना
'मी ही अशी (क्षसारखी) - तू हा असा (यसारखा)------- (इथे क्ष हे उत्कट, भावनाप्रधान, अशा अर्थाचे शब्द घ्या तर य हे तर्ककठोर, सडेतोड, विचारी, निष्काळजी, विरक्त अशा अर्थाचे घ्या)
आपलं कसं होणार........'
अशा पुनरावृत्ती करणाऱ्या कडव्यांनी देखील तयार करता येतात. दोन्ही पद्धतींनी तयार करून बघा.

मी एक चांदणी लुकलुकणारी, स्वैर, ठिणगी.
तू तर चंद्र, संथ एकसंध प्रकाशाने अविरत तळपणारा...
तुझ्याभोवतालचं अभेद्य खळं मी कसं छेदणार...

मी एक फुलपाखरू, रंगपंखांनी फडफडणारं, धुंद माझ्यातच
तू एका चिताऱ्याप्रमाणे, स्वसिद्ध, स्थितप्रज्ञ
मला कसं पकडशील तुझ्या कुंचलेजालात...

वगैरे वगैरे
दुसरा, जास्त भरदार व अधिक पापिलवार प्रकार आहे. या प्रकारे कविता तयार करण्यासाठी थोडी जास्त क्लिष्ट रचना लागते. ही रचना शब्दांमधली नसून वेगवेगळ्या वाक्यांमधली आहे. पण त्याचबरोबर छंदांचं बंधन गळून पडतं त्यामुळे तुम्हाला सरळ सरळ परिच्छेद लिहून त्याची मु्क्तकं करता येतात. प्रत्येक वाक्यसंग्रह साधारण दोन ते तीन वाक्यांचा करावा. या कवितेत रे, अरे, नाही रे, राजा, अशा संबोधनांची रेलचेल असावी.

वाक्यसंग्रह १: तुझ्याकडनं किंवा आपल्या नात्याकडनं माझ्या अपेक्षा (इथे स्वप्न, आकांक्षा, वाटलं होतं, वगैरे शब्दप्रयोग उपयुक्त ठरतात. एक गोजिरवाणं चित्र आवश्यक)
वाक्यसंग्रह २: प्रत्यक्षात मला काय दिसतंय? किंवा तू त्या पूर्ण करतो आहेस का? (पण, मग, असं असताना, हे अपरिहार्य. प्रश्नार्थक वाक्य खूप परिणामकारक होतात. )
वाक्यसंग्रह ३: मी कशी वागते/आहे/कोमेजते (आणि मला मात्र, तडजोड, प्रयत्न करते रे मी, कसं, मला काय करावं कळत नाही, हे व असे शब्द बऱ्याच वेळा दिसतात)
वाक्यसंग्रह ४: त्याने माझी व नात्याची घुसमट कशी होते (किंवा ते फुलतंय कसं - पण पोरींनी लाईन देण्याइतकंच ते क्वचित... भावना, कुचंबणा, जळणे, विझणे हे शब्द फार उपयोगी))
वाक्यसंग्रह ५: पुढे काय होणार... एक हम्म्म्म्म....(मला नाही रे माहीत, काय करू सांग ना, कसं होणार, तडजोड... वगैरे शब्दप्रयोग करावेत)

एक स्वप्नाळू छटा येणं आवश्यक आहे. त्यासाठी कविता लिहिताना चेहेऱ्यावरचे भाव पुसून टाकून आढ्याकडे बघा, व नजरेने जणू त्यात भोक पाडून पलिकडचं आकाश दिसतंय का हे पाहाण्याचा प्रयत्न करा. (वरच्या कुळकर्ण्यांच्या घरात काय चाललंय वगैरे नको...) सध्या कवितक प्रणालीमध्ये तुम्हाला दोन्ही प्रकारच्या रचनांपैकी कुठचीही निवडता येते. त्यातली पहिली कडव्यांच्या पातळीवरची प्रणाली तशी सोपी आहे - तिच्यासाठी कवितकमध्ये चंद्र-चांदणी, फुलपाखरू-फूल, चित्र-चित्रकार अशा कही जोड्या तयार करून ठेवलेल्या आहेत. पण अजून नात्याच्या प्रकारावरनं त्याचं वर्गीकरण नीट पूर्ण झालेलं नाही. वाक्यसंग्रहाच्या कविता हा थोडा क्लिष्ट प्रकार आहे, व कवितकाने कितपत प्रगती करता येईल याबाबत शंका आहे. हे अर्थात खरोखर उच्च दर्जाची कविता करण्यासाठी. मागे म्हटल्याप्रमाणे वैयक्तिक वापरासाठी आणि काही वेळा मराठी दिलाची धडकन होण्यासाठीही या प्रणालीने वर सुचवलेले आकारबंध व त्यात टाकता येणारे शब्दप्रयोग यांनी अत्यंत प्रभावी कविता करता येतात. खरोखरचा अनुभव असेल तर ठीकच, पण अनुभव नसताना शब्दांचं जाळं विणणं बिलकुल कठीण नाही, हे कवितक मागचं तत्वज्ञान आहे. कधी तर अनुभूतींची ठेचच लागते शुद्ध शब्दांना असं वाटतं.

मी एक रचना उदाहरणार्थ दाखवतो. त्यातले वाक्यसंग्रह कुठचे हे उघड होईलच. त्यासाठी पुन्हा लिहीत बसत नाही.

या नात्याचं राज्य अस्ताला चाललंय
नव्हतं कारे आपण म्हटलं एक पाऊल तुझं आणि एक माझं?
दोघेही सारखेच... राजा आणि राणी...
मग का होतात आपल्या राज्यात हे धनुष्याचे टणत्कार? ही बेसुमार अग्नि़वृष्टी?
त्यांना सामंजस्याच्या ढाली, अश्रूंचे पाऊस...कुठवर पुरणार, माझ्या राजा?

आणि इतकं असूनही तू कसा क्षणात हसतोस, काहीच झालं नाही असा,
फसफसलेल्या, उत्साहाने वाहणाऱ्या सोड्यासारखा?
या हसण्याने कशी बोथट होईल माझी मघाची दुधारी वेदना?
एकीकडे राजा रुसला - दुसरीकडे राज्य बुडलं.

माझ्या मनातल्या आकांक्षा भस्म होतात समिधेसारख्या
या भावनेच्या जाळात.

आणि घड्याळाचा लोलक काळजीने बघत
तसाच हलत राहातो...
मागे पुढे
मागे पुढे

तर मंडळी कविता लिहायला घेण्यापूर्वी वर सांगितल्याप्रमाणे आढ्याकडे बघा. एक खोल गंभीर श्वास घ्या, भुवया चिंतेने थोड्या वर घ्या, आणि मान थोडी नाही नाही अशी हलवत तो 'हम्म्म्म्म' म्हणत सोडा. चला, तुमचा मूड तयार झाला. आता ताबडतोब कविता करायला घ्या.
(वरील कविता खऱ्या अर्थाने माझी नाही, ते माझ्या बुद्धीने केलेलं मराठीतलं स्वैर रूपांतर आहे, या कवितेचं.)

अप्राप्य!!!

नीळाभोर इवलासा मखमली खंड्या,
रोज नीळ्या आभाळातून भीरभीरत उतरणारा,
हवेत कविता लिहीत असल्यासारखा.
तिच्या खिडकीसमोर,
तारेवर दिमाखात, ऐटीत बसून जग न्याहाळणारा.
त्याचा तोरा तरी किती म्हणावा!
मैना, बुलबुल यांचा किलबिलाटच फार.
हा एकटा शांत समाधीस्थ.
ठरवीक वेळेला येणारा-जाणारा...
मान वेळावून इकडे-तिकडे बघेल.... नाहीसुद्धा!
ती रोज वाट बघणार.
खिडकीपाशी उभी.
तिला वाटे-त्याच्या
गोजीरवाण्या पंखांवरून हात फिरवावा,
त्याला हातात घेऊन अलगद घट्ट पकडावं,
त्याच्या नीळाईचा वर्ख बोटांनी स्पर्शावा,
छातीवरच्या शुभ्र ठीपक्याचं चुंबन घ्यावं.
अप्राप्य!!!
त्याच्या अप्राप्यतेतच त्याची अनिवार ओढ
रोज तळमळवणारा अन...
तरी सुखावणारा
वाट पहायला लावणारा अन ...
तरी मोहवणारा
नीळाभोर इवलासा मखमली खंड्या!!!

सव्यसाचि (भाग -३)

भाग -१

भाग -२

K|nG786N :- हमारे दुनियामे आनेसे पहेले नाम / देश और धर्म दोनो छोडना पडता है ये बात १०० बार पहले अपने दिमाग मे टाईप करलो.. तो चलो मेरे चेले कल मिलेंगे और इसी बॅंक का सर्व्हर हॅक करके तुम्हारी पढाई-लिखाई चालु करेंगे

मी :- व्हॉट ????

मला तर रात्रभर झोपच लागली नाही. आता काय होईल ते होईल पण मागे हटायचे नाही असे ठरवुन दुपारी याहुला लॉग इन झालो. पण त्या दिवशी शफी साहेब आलेच नाही. माझी कोणी गंमत तर नसेल ना केली ? राहुन राहुन मला हाच प्रश्न सतावत होता. दुसर्‍या दिवशी कॉलेजला टांग मारुन आम्ही आमचा मुक्काम याहु रुम मध्येच हलवला. साधाराण दुपारी १ च्या सुमाराला शफी अवतरला.

"क्यु बे इंडियन कैसा है ? चल ये फाईल एक्सेप्ट कर और ठिकसे पढ इसको" आल्या आल्या साहेबांनी हुकुम केला.

साला फाईल एक्सेप्ट करावी का नको ? नक्की कसली फाईल असेल ? माझे विचारचक्र चालु झाले...

"अबे वर्ड फाईल हि है वो, दोस्त को दगा देने की रीत नही है हमारी."

झाले क्षणात माझ्याकडून एक्सेप्ट वर क्लिक केले गेले. डाउनलोड झाले ली फाईल मी उघडून वाचायला सुरुवात केली. साला हा शफी खरच भुत आहे की काय ?? मला चक्कर यायची फक्त बाकी होती....

फाईल मध्ये महाराष्ट्र माझा बॅंकेच्या सर्व्हरची इत्यंभुत माहिती नोंदवलेली होती. जणु बॅंकेची वेबसाईट ह्या शफीने बनवली असल्यागत सगळ्या नोंदी त्यात लिहिलेल्या होत्या. साला हे म्हणजे एकाने हरणाला पकडून ठेवल्यावर दुसर्‍याने त्याला बाण मारुन शिकार करण्यायेवढे सोपे काम होते आता.

पण धनुष्य बाण आणी नेम धरुन चालवायची पद्धत अजुन शिकायची बाकी होती ना !! पुन्हा आम्ही मसिहा शफी ह्यांच्या कृपेसाठी धाव घेतली. फाईल संपुर्ण वाचल्याचे सांगुन आता पुढील विद्या प्रदान करण्याची विनंती केली.

"साले तुम चोटीवाले झटसे सब सिख जाते हो Wink अच्छा डि-डॉस के बारे मे पता है ? कभी किया है ??" शफी साहेब.

" IRC सर्व्हर्स पे किया था. लास्ट टाईम ब्रॉड-वे और थायलंड के ६ सर्व्हर्स क्रॅश हो गये थे उसमे मैने व्हिक्टर का साथ दिया था. मेरे बॉट नेट से मैने थायलंड के २ सर्व्हर्स क्रॅश किये थे" माझी स्व-स्तुती.

"चुत्या है वो व्हिक्टर ! आजकल अंदर है क्रेडीट कार्ड हॅकींग के जुर्म मे" शफी कडून माझ्या ज्ञानात भर आणी बरोबरीने व्हिक्टर (आणी माझे) मुल्यमापन.

"ये सब नही पता. मैने कभी क्रेडीट कार्ड के लोचे नहि किये." मी.

"कभी करना भी मत ! साला खाया पिया कुछ नाही... अच्छा तेरा बॉट नेट चालु है ना अभी ? मेरे आय आर सी चॅनेल पे जरा फ्लड करके बता" शफी म्हणाला.

काही वेळातच मी त्याला मस्त फ्लड करुन दाखवला, त्याच बरोबरीने त्याला माझे बॉटस आणी प्रॉक्सीज देखील दाखवल्या.

"एकदम बढीया. साले तु हिरा है, बस तेरे को थोडा चमकाना मांगता है !"

आणी पुढे अनेक दिवस शफी साहेब आम्हाला चमकावत होते. बाय द वे त्या दिवशी महाराष्ट्र माझा बॅंकेच्या सर्व्हरची जी दारुण अवस्था झाली त्याबद्दल खरे तर सर्व परिक्षार्थींची माफी मागतो बर का. जरा जोरातच धक्का मारला गेला माझ्याकडून, पुर्ण ४२ तास झोपला बघा सर्व्हर.

असो...

हळुहळु शफीच्या तालमीत मी चांगलाच तयार झालो होतो. त्याचा माझ्यावर येवढा का जीव होता मला आजही माहित नाही, पण आज मी शफीच्या देखील चार पावले पुढे आहे ते त्याच्याचमुळे.

सर्व्हर्स आणी वेबसाईटसचे गळे दाबायला शिकल्यानंतर आता पुढला टप्पा होता फिशींगचा . ह्या विषयात मात्र मी अगदी घोड्यासारखा जोरदार धावलो हे स्वस्तुतीचे आरोप सहन करुनही मला सांगीतलेच पाहिजे. फिशींग शिकायला सुरुवात केल्यापासुन बरोब्बर पाचव्या दिवशी मी ई-बे चे फिशींग पेज बनवुन शफीच्या खात्यात १२०० डॉलर्स आणी ४ क्रेडीट-कार्डचे नंबर गोळा करुन दाखवले. फिशींगमध्ये मी मास्टर असलो तरी माझ्या दृष्टीने ती एक भुरटी चोरीच होती, ज्यात मला कधिच रस वाटला नाही. पण ह्या फिशींग मधल्या प्रभुत्वानेच माझ्यासाठी एकदिवस अलीबाबाच्या गुहेचे दार उघडले.

ज्या दिवसाची प्रत्येक छोटा मोठा हॅकर स्वप्न बघत असतो आणी ती फक्त स्वप्नच राहणार हे मान्य करत असतो तो दिवस माझ्या आयुष्यात प्रत्यक्षात उजाडला.

ती शनिवारची रात्र मी कशी विसरणार ; साधारण रात्री ११ च्या सुमाराला मला याहु फोनवरुन कॉल आला. कॉलर अन-नोन होता पण आता त्याची सवय झाली असल्याने मी सहजपणे कॉल रिसीव्ह केला.

"पॅपीलॉन ??" पलिकडून विचारणा झाली.

"येस" मी सहजपणे उत्तर दिले.

"वेलकम टू एलीट क्लब...." पलिकडून उदगारले गेलेले हे चारच शब्द माझ्या हाता पायाला थरथर सुटण्यासाठी पुरेसे होते.....

(क्रमश:)

(कथा पुर्णतः काल्पनीक)

चित्रपटांची व सिरियल्सची गमतीदार शिर्षके!!!

(यात कुणालाही, कशालाही दुखावण्याचा हेतू नाही. फक्त मनोरंजन आणि विनोदनिर्मितीसाठी मी हे लिहिले आहे.)

आपल्या मराठी चित्रपटांचे पूर्वी सासू-सून-नणंद-भावजय-कुंकू याप्रकारचेच कथानक असायचे. नावेही तशीच असायची. मला तशी काही नावे सुचत आहेत. आणि जर हिंदी चित्रपटांप्रमाणे काही नावांच्या पुढे अर्थदर्शक शब्द किंवा वाक्य टाकले तर कशी गंमत येईल ते मी खाली देत आहे.

तुम्हीही सुचवू शकता प्रतिक्रियेद्वारे अशी काही गमतीदार नावे:

  • थरारक सासू - दी अल्टीमेट टॉर्चर
  • बावरलेला नवरा - नवरा अंडर फायर
  • माहेरचं मांजर- कॅटवूमन गेम
  • मांजरीचं माहेर
  • आहेर फेकला बाहेर
  • बाहेरचा आहेर- एका अयशस्वी आहेराची कथा
  • माहेरचा तवा- द "फ्राय" स्टोरी
  • लेक चालली सासरला (वर्षातून एकदा)
  • जाऊबाईच्या नणंदेची सासू- द अल्टीमेट रिलेशन्शीप
  • खवळलेली सासू- चवताळलेली सून - एक जगजाहिर जुगलबंदी
  • चतुर कावळा - भोळी मैना- एका पक्षीप्रेमीची कथा
  • एका मामे-सासूची गोष्ट
  • नणंद बनवी भडंग- चविष्ट कथा
  • सासूचा थयथयाट - एका नृत्यप्रिय खाष्ट सासूची कर्मकहाणी
  • डोंबिवलीच्या सासूबाई खाष्ट - (डोंबिवली फास्ट चे सासू व्हर्जन)
  • माझी लेक- तुझी सून
  • माझ्या सूनेचा सासरा
  • थांब सुने केस ओढते! (द्वंद्व कथा)
  • सासऱ्याच्या सासूचं माहेर
  • सासूच्या सासऱ्याच्या माहेरचा कचरा- गंभीर होत चाललेल्या कचराप्रश्नावर जळजळीत भाष्य
  • माहेरची गाडी
  • माहेरची फ्लॉपी - करूया कॉपी
  • माहेरची हार्ड डिस्क-एक रिस्क
  • ९ गिगा बाईट चा आहेर
  • डीजीटल आहेर
  • काका-नाना-मामा-दादा....
  • स्टीलचा गॅस
  • हळद झाली पिवळी
  • हळद पुसली- कुंकू धुतलं
  • सासू ऍट द रेट आदळापट डॉट संताप-फिमेल्सची इमेल कथा
  • धाकटा बोका
  • शाब्बास सूनबाईची सासू!
  • सासरा पळाला सासरी
  • भावजयीचा भाचा- नणंदेचा नाना
  • भावाची भाभी
  • भुताचा भाचा
  • सासवेची आसवं...

आणि एकता कपूरच्या क छाप सिरियल्स -

  • क्यों की कुत्ता भी कभी काटता था
  • कुसूम के काकी के कौवे की कसम
  • कौन किसको काटे?
  • क्या करू कमला?
  • कमला करे काम
  • कैसी कैसी कहानी!!
  • कब कैसे कौन कौन कही कही
  • कहानी कामचोर की
  • कुसूम के काकी के काका की कागज की कश्ती की कहानी
  • कसौटी कुसुम के कैची की ( एका लेडीज टेलर ची कथा )
  • कसलेली सासू - कच्ची सून
  • कुसूमच्या माहेरची कच्ची कैरी
  • कैरी झाली आंबा

आजकालच्या मालिकांची मजेशीर 'विवाहबाह्य' नावे!
(एकता कपूर च्या मालीकांमध्ये अगदी प्रमाणाबाहेर, अजीर्ण होईल ईतके विवाहबाह्य संबंध दाखवले जातात. त्यामुळे तो काळ आता दूर नाही की मालिकांची नावे खालील प्रमाणे असतील)

  • पहले पती की पहली शादी
  • मेरे चौथे पती के सातवे लडके की तिसरी गर्लफ्रेंड
  • अगली करवाचौथ नया पती
  • कौनसा पती?
  • दो नंबरी पती
  • पॉचवे पीया का घर
  • पहले पती का पता
  • तेरा तिसरा पती सिर्फ मेरे पहली पत्नी का है
  • हमारा पती
  • मरी गर्लफ्रेंड के पती का बॉयफ्रेंड
  • कौन किसका पती?
  • मेरे पेहले पती का दुसरा पाप

एकता कपूर प्रायोजीत परीक्षा:

प्रश्न १ : योग्य पती निवडा व योग्य पत्नी शी जोड्या लावा

प्रश्न २ : खाली दिलेल्या नायिकांची दुसरी लग्ने कधी झाली, कशी व का मोडली ते एका वाक्यात स्पष्ट करा.

प्रश्न ३ : एका जन्मात सात लग्ने, तर एकूण फेऱ्यांची संख्या किती?

प्रश्न ४ : एका वर्षाच्या आत दोन लग्न केलेल्या नायिका किती ?

--- निमिष सोनार, पुणे

माझ्या कार्टून्स च्या ब्लॉग ला जरूर भेट द्या:
http://cartoonimish.blogspot.com
इतर ब्लॉग्ज-
http://nimish-marathi.blogspot.com
http://nimish-english.blogspot.com

माझी हॉस्पीटल भरती

त्या दिवशी मला अचानक भोवळ आली. कदाचित बजेट सेशन लाईव्ह पाहील्यामुळे असेल किंवा राहुल महाजन च स्वयंवर (त्याच स्वयंवर आणि त्याच्या भावी वधूचा स्वयंवध) पाहील्यामूळे असेल. पण आली खरी. सौ ने घाबरून लगेच फॅमीली डॉक्टरला फोन केला आणि सरळ हास्पीटलचा रस्ता धरला.

तळमजल्यावरच्या दोन वॉर्डबॉयनी विड्या फुंकून झाल्यावर " पेशंट कोणाय?" अशी पॄच्छा केली. त्यांचीही चुक नाही म्हणा. कारण मी तसा थोडासा (बरचसा इती सौ) गुटगुटीत आहे खरा. सौ ने माझ्याकडे अंगुली निर्देश केल्यावर त्या दोघांनी सरळ 'कबड्डी कबड्डी' करत माझी गचांडी धरली आणि स्ट्रेचरवर मला उताणा केला. ह्या अनपेक्षीत हल्ल्याने घाबरून मी डोळे गच्च मिटून घेतले. त्यामुळे 'पेशंट सिरीयस आहे' अशी समस्त भगिनींची (नर्सीणींची हो) , मावश्यांची (मावश्या म्हणजे हास्पीटलातली एक मावशी त्याचे अनेकवचन मावश्या. उगाच तमाशाची वेगैरे आठवण काढू नका) आणि वॉर्ड बॉयांची समजूत झाली असणार. ह्या हॉस्पीटलच एक बर असत. तिथे आधीपासून आया, मावश्या, सिस्टर असे आपले नातेवाईक हजर असतात. वरच्या मजल्यावर आय सी यु (मराठी अनूवाद : मी तुला बघतो) नामक खोली मध्ये मला भरती करण्यात आल. सौ ला रीसेप्शन ला जाऊन सगळ्या फॉर्म्यालीटीज पूर्ण करण्याची सुचना करण्यात आली. परत एकदा माझी गचांडी धरून मला कॉटवर आदळण्यात आल. कॉटशेजारील रॉडवर एक प्लास्टीकची बाटली (ती सुद्धा उलटी) टांगण्यात आली आणि त्याच एक टोक माझ्या मनगटात खुपसण्यात आल.

" कसली बाटली हो? "
" ग्लुकोज"
" अहे पण ती अशी उलटी का टांगलीये. सरळ टांगा ना. उगाच पडली बीडली तर खात्रड होईल ना"
" अशीच टांगायची असते" (सिस्टरच्या नजरेत " हे कुण्या गावच पाखरू" असा काहीसा भाव दिसला)"
" हे ग्लुकोज कश्या करता असत ?"
" शक्ती येण्या करता"
" मग त्यापेक्षा मी सरळ ग्लुकोज बीस्कीट खाउ का हो? माझ्या कडे २ पुडे नेहेमी असतात. ५ रुपये वाले"
" तुम्हाला झोपेच इंजेकशन देऊ का हो ? "
(हा प्रतिप्रश्न कदाचित माझ्या प्रश्न टाळण्यासाठी असावा.)
मी लगेच त वरून ताक भात ओळखून पांघरूण डोक्या वरून ओढून झोपेच सोंग घेतल.

थोड्यावेळाने जवळपास कुणी नाही ह्याची खातरजमा करून हळूच पांघरुण बाजूला केल. ती सलाईनची सुई खूपसून ठेवल्यामूळे एक तर झोप येत नव्हती आणि दूसर म्हणजे पोटात भुकेचा गोळा उठला होता. काही वेळाने सौ बाजूला येऊन उभी राहीली.
" सगळे सोपस्कार पूर्ण केलेस का?"
" हो. फॉर्म भरून दिला आणि दहा हजार रुपये डीपॉझीट म्हणून दिले"
" किती ??? "
" दहा हजार डीपॉसीट. दिवसाच भाड ४ हजार रुपये"

पेशंटला हास्पीटल मध्ये 'भरती करण' का म्हणतात ते मला आत्ता कळल. पेशंटला हास्पीटलात भरती केल की त्याच्या खिशाला ओहोटी लागते. आणि हा भरती ओहोटीचा खेळ सदैव चालू असतो.

" बर आता तुम्ही झोपा. मी बाहेर थांबलेय. काही लागल तर सांगा "
" लागल तर म्हणजे? लागतच आहे की. ही इतकी मोठी सुई मनगटात खुपसून ठेवलीये. ग्लुकोज म्हणे"
पण माझी फालतू कोटी ऐकायला सौ थांबली नाही. इथे भुकेने पोटात आग पडलेली.

"मला जेवायला मिळेल का हो? " मी मावशीला विचारल
" इथे आय सी यु मध्ये जेवण नाय. पेशंटला फक्त लीक्वीड डायट मिळेल"
"मग जरासा चहा मिळेल का हो? कधी पासून तल्लफ आलीये "
"बर आणते थोड्यावेळाने"
मला गदगदून आल. म्हणून मी पडल्या पडल्याच थोडस गदगदून घेतल. मराठीत "माय मरो पण मावशी जगो" अशी म्हण का आली असावी त्याची मला प्रचिती आली. मावशीने मला 'थोड्यावेळाने" म्हणजे साधारण तासा-भराने 'लपून छपून' चहा आणून दिला. कुणी मावशीला मला लपून छपून चहा आणून देताना पाहील असत तर 'मावशी पेशंटला ताडी-माडी विक्री केंद्रातून काहीतरी जिन्नस किंवा नीरा विक्री केंरातली उरलेली आदल्या दिवशीची नीरा तर आणून देत नाही ना?' अशी शंका त्याला/तीला आली असती. असो. चहा अगदी छान म्हणजेच 'पाणीदार' होता. पण त्या परीस्थीतीत तो तसा 'पाणीदार' चहाही खुप छान लागला.

मला थोडीशी डुलकी लागली असेल नसेल तोच मला कुणीतरी उठवल. बघतो तर माझ्या भोवती दोन डॉक्ट्रर (त्यांना आर एम ओ म्हणतात अस नंतर कुणीस सांगीतल.), दोन सीस्टर्स . मी जागा झालोय बघून एकीने माझ्या खाकेत थर्मामीटर खुपसल,दुसरीने दंडाला कसल तरी कापड चोपडल आणि फुस्स फुस्स करून हवा भरली. एका आर एम ओ ने गळ्यातला स्टेथस्कोप माझ्या छातीवर लावल्या सारखा केला आणि मला जोराने श्वास घेण्याची आज्ञ्या केली. दुसर्‍याने माझी नाडी (हाताची) धरली. कदाचित 'मल्टी टास्कींग मल्टी टास्कींग' म्हणतात ते हेच असावे. ते सर्व आपापसात काहीतरी पुटपुटत होते. मला त्यात 'ब्लड रीपोर्ट' 'ई सी जी' अस काहीस ऐकू आल.मी 'बी पी' असाही काहीतरी शब्द ऐकला आणि थोडासा कावरा बावरा झालो.
"मला नक्की काय झालय डॉक्टर"
"आमची तपासणी चालू आहे. कळेलच लवकर काय ते"
"मला डीस्चार्ज कधी मिळणार मग?"
"लवकरच. डोंट वरी. आल इज वेल"
(आयला हे डॉक्टर लोकही चित्रपट बघतात तर)
मला लगेच उडी मारुन ' जहापना तुसी ग्रेट हो. तोहफा कुबुल करो' अस म्हणावस वाटल. पण ते हाताला सलाईन लाउन ठेवलेल ना. त्यामुळे नाईलाज झाला.
एका सीस्टर ने मला फटकन टोचल आणि चांगल वाडगाभर रक्त काढल. दुसरीने छाती पोटावर कसलासा गोंद डकवला आणि कसले तरी रबराचे बील्ले त्यावर डकवले. बाजुच्या यंत्रावर काही तरी वेड्या वाकड्या रेशा उमटल्या (बहुदा मशीन बीघडल असाव. नायतर सरळ रेशा नसत्या का आल्या )
" हे काय हो?"
"ई सी जी"
"ई सी जी म्हनजे"
"एको कार्डीयो ग्राम"
" अस्स अस्स" मी मला समजल्या सारख दाखवल
तोपर्यंत त्या पहील्या सीस्टरच पूरेस रक्त शोषून झाल होत.
"बर आता पुढची टेस्ट फास्टींग नंतर"
"फास्टींग?" मी जोरात किंचाळलो
"अहो मला इथे भरती केल्या पासून काहीही खायला दिल नाहीये आणि त्यात आता वेगळ फास्टींग काय करायचय?"
त्या दोन्ही सीस्टर्स पुढच ऐकायला थांबल्या नाहीत. आपापसात काहेतरी पुटपुटत नीघून गेल्या. कदाचित 'ह्या पेशंटला एनीमा द्यावा का रेचक पाजाव का दोन्ही एकदमच कराव." हे त्या डीस्कस करत असाव्यात.

रात्री कधीतरी मग मला दमून झोप लागली. झोपेत छान छान स्वप्न पडत होती. मला इंजेक्शन देणारी सीस्टर एंजेक्शन्ची सुई मोडली म्हणून रडत होती. नाडी तपासू पहाणारा एम आर ओ हाताला नाडीच लागत नाही म्हणून कावरा बावरा झाला होता. मला एनीमा द्यायला वॉर्डबॉय आला तेंव्हा मी लब्बाड पणे बाजुच्या खुर्चीवर बसून राहीलो. आणि 'पेशंट कुठाय' अस विचारल्यावर 'काय माहीत नाही बॉ' अशा अर्थाची ओठ मुडपून खुण केली. शेवटी शेवटी तर मी कॉट खाली लपून राहीलो आणि सर्व जण पेशंट कशे शोधताहेत त्याची गम्मत बघत राहीलो. तेंव्हा का कोण जाणे कुठूनस एक मांजर आल आणि मला कॉट खाली येऊन अंग घासायला लागल.चाटायला लागल गुदगुदली होऊन मी अंग झटकल आणि टक्क जागा झालो. जागा होउन बघतो तर काय एक वॉर्डबॉय मला गरम कपड्याने खरवडून काढत होता. काय करताय विचारल तर म्हणला स्पंजींग.
घड्याळात बघीतल तर पहाटेचे ५ वाजले होते. आता पेशंटला झक्कत इतक्या पहाटे उठवून घासून पूसून काढायच काय अडल असत का हो? पण नाही (हे अगदी मोहनदास सुखटणकर स्टाईलीत बर)

शेवटी एकदाची ती शुभ घडी आली. डॉक्टर शहा का डॉक्टर मोदी असे कुणीसे एक डॉक्टर आले. ते आल्यावर एम आर ओ, सीस्टर, वॉर्ड बॉय आणि आमची सौ असा घोळका सभोवताली जमला. ते पाहून कुणीतरी पेशंट अत्यवस्थ आहे अशी तर पेशंटची आणि त्यांच्या नातेवाईकांची धारणा झाली असावी.
"तुमची तबेयत आता लय छान दिसते. तुम्हाला डीस्चार्ज द्यायला आता काय बी प्रॉब्लेम दिसत नाय. फकस्त काही टेस्ट वरचेवर करत जा"
माझा चेहरा आनंदाने खुलला. मी लगेच ती दुखणारी सलाईन काढायला लावली. माझ्या नेहेमीच्याच (म्हण्जे गबाळ्या) पेहेरावात आलो आणि लीफ्टने धावत पळत रीसेप्शनला पोहोचलो. तोपर्यंत सौ डीस्चार्ज पेपर्स घेउन आली. बील बघतो तर काय चक्क पंधरा हजार रुपये. मला पुन्हा भोवळ आली पण परत मला भरती करतील म्हणून मी ती थोपवून धरली.चेहेरा हसरा केला. शीळ घातली. ती नेहेमी सारखी न येता इडली लावलेल्या कुकरच्या शीट्टी सारखी आली. बील 'चुक'ते करून तीकडून काढता पाय घेतला. आणिक तीथे थांबलो तर अधिक भाड लावतील. उगाच कशाला.

आजकाल मला अचानकच भोवळ येते कधीतरी. मग मी लगेच जीवन नायतर रामकृष्ण हॉटेलात जाऊन म्हैसूर मसाला डोसा, नायतर इडली-वडा हादडतो आणि हास्पीटलच्या रस्त्यावर चुकून सुद्धा फिरकत नाही.'पंधरा हजार रुपये खर्च करण्यापेक्षा ५० रुपये खर्च केलेले कधीही उत्तम' काय म्हणता?

***************************************************
समाप्त

संतू..

"आत्त्या.. मी काय कराय णाई..! भांडी आपोआप खाली पडल्यात.." हे असलं बोलणं म्हणजे नक्कीच संतू. कराय णाई, बगाय णाई, दिसाय णाई.. अशी क्रियापदांची धिरडी हा संतूच करू जाणे..

संतू!! खरं नाव चंद्रकांत ढवणे(ढवने). याची मोठी बहीण माझ्या मामाकडे कामाला होती. मामाकडेच लहानपणापासून राहिलेली तिथेच वाढलेली. आमचं बिर्‍हाड जेव्हा इचलकरंजीहून कोल्हापूरला हललं तेव्हा माझ्या आईच्या मागे लागून हीने याला आमच्यासोबत कोल्हापूरला पाठवून दिला. "तुमच्या घरी कामाल राहुदे.. तिथे काहीतरी शिकेल आणि र्‍हाईल.." असं म्हणून तिने त्याला आमच्यासोबत पाठवून दिलं. हा संतू म्हणजे माझ्या मामाच्या घरी कामाला असणार्‍या सुशिलाचा भाऊ.. इतकीच काय ती त्याची ओळख होती आम्हाला.

कोल्हापूरला हा आला आणि आजी-आजोबांपासून तेव्हाचे आमचे घरमालक आण्णा शिरगांवकर यांच्यापर्यंत सगळ्यांचाच तो "नारायण "झाला. आण्णा खाली रहात असत आणि आम्ही वरच्या मजल्यावर. कोल्हापूरातली पहिली ३-४ वर्षं आम्ही या आण्णांचे भाडेकरू होतो. बंगल्याच्या आवारातल्या पेरूच्या, आंब्याच्या झाडावर चढून पेरू आणि आंबे उरवण्यापासून भाकरी करण्यापर्यंतची सगळीच कामे हा करू लागला. अतिशय हुशार डोक्याचा. माझ्या आजोबांनी त्याला 'संतू ' या नावावरून संतराम्-संतरामबापू.. अशी नावे दिली. माझ्या आजोबांशी याची चांगलीच जोडगोळी जमली होती. आजोबांना फिरायला नेण्यापासून त्यांच्याशी वाद घालण्यापर्यंत हा संतू सगळी कामे करायचा.

वयानं माझ्यापेक्षा एखादं वर्ष लहान असेल नसेल. तो आमच्या घरी आला तेव्हा मी नववीमध्ये होते. घरी भांडी घासायला येणार्‍या मावशीबाईं, आणि हा.. दोघांची जुगलबंदी एकदा सुरू झाली की आमची छान करमणूक व्हायची. नात्यातल्या कोणाची तरी सायकल याला मिळाली आणि बाहेरची कामेही हा करू लागला. वाचायचा अखंड नाद . आई माझी लेखिका असल्याने तिच्या जवळ असलेली नसलेली सगळी पुस्तके वाचून काढली त्याने. लहान होता... नाही म्हंटले तरी एक थर्मास, एक ट्यूब लाईट, यांची मोडतोड झाली होतीच. तेव्हापासून घरामध्ये काहीही पडल्या झडल्याचा आवाज आला की, आई.."संतूऽऽऽऽ!! काय पडलं?? काय फुटलं??" असं विचारयची. एकदा तरी, बाबांच्या जुन्या येझ्दी मोटरसायकल चा हॉर्न काढून ठेवलेला याल कुठतरी माळ्यावर मिळाला. याने लगेच तो खाली काढून, त्याच्या वायर्स सॉकेट मध्ये घालून पाहिल्या. झालं!! त्या जुन्या बंगल्याचं जुनं वायरिंग.. एका झटक्यात शॉर्ट सर्किट झालं. आणि आमच्या टिव्हीतून धूर आला. त्या दिवशी बाबा खूप चिडले होते. मात्र तो पर्यंत या संतूने सर्वांना इतका जीव लावला होता की, त्याला परत त्याच्या बहिणीकडे पाठवावे असे वाटले नाही कोणालाही. असंच एकदा, मी काहीतरी माझ्या कपाटामधून काढायला गेले आणि माझी पुस्तके, कंपास बॉक्स असं काय काय खाली पडलं.. कोणी काही विचारायच्या आधीच संतू माझ्या आईला म्हणाला,"आत्त्या, मी बाथरूम जवळ आहे.. मी काही नाही पाडलं." तेव्हा त्याच्या मिश्किल स्वभावाचं कौतुक वाटलं होतं.

माझी दहावी झाल्यावर आई-बाबांनी त्याला बाहेरून दहावीला बसवले. माझी पुस्तके, वह्या घेऊन हा अभ्यास करू लागला. एकेठिकाणी त्याला क्लासही लावला. क्लासमध्ये शिकून , घरी अभ्यास करणे सुरू झाले. दरम्यान आम्ही आमचा बंगला बांधला.. तिथे रहायला गेलो. माझे बाबा तेव्हा, नवमहाराष्ट्र स्पिनिंग मिल्स, साजणी, इचलकरंजी .. इथे मिल्सच्या क्वार्टर मध्ये रहात होते. आमची शिक्षणं आणि आईची नोकरी कोल्हापूरात असल्याने आम्ही इथेच होतो. संतू, बाबांच्या सोबत तिथे क्वार्टरवरती रहायला गेला. एम डी साहेबांचा केअर टेकर.. अशी त्याची पोस्ट होती. Wink स्वयंपाक करण्यापासून, घर स्वच्छ ठेवण्यापर्यंत तो करत असे. बाबांच्यासोबत कोल्हापूरलाही येत असे.

एकदा असंच काहीतरी आईने सांगितलेलं काम घेऊन हा बाहेर गेला होता. कोणती तरी बिल्डिंग शोधत होता. त्याने तिथल्याच एका रिक्षा वाल्याला विचारलं.. "काय हो भाऊ, अमुक अमुक बिल्डींग कुटं हाय?" रिक्षावाल्याने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं , आणि मग 'काय मुर्ख माणूस आहे' अशा आविर्भावत त्याने रिक्षाचा आरसा १८० अंशात फिरवला आणि त्यात बोट करून म्हणला त्याला.."ही बघ हितं हाय ती बिल्डींग.." ही बिल्डिंग हा उभा होता त्याच्या मागेच होती. Smile याला नेहमीच माणसं अशी विचित्रच भेटत. कुठे गेला आहे आणि सांगितलेलं काम सरळपणाने करून आलाय.. असं कधीच नाही झालं. सतत गमतीदार किस्से घडत याच्यासोबत.

आपापलं शिकायचं पोहायला म्हणून टायरट्यूब घेऊन आला आणि कोल्हापूरच्या राजाराम तलावावर पोहायला जाऊ लागला. तो तलाव माळरानावर आहे. बांधीव नाहीये. तिथे हा नियमित जात असे आणि आज किती पोहोलो, काय काय केलं, किती म्हशी आल्या होत्या, .. याचं रसभरीत वर्णन करून सांगत असे. मात्र एकेदिवशी हा पोहून आला आणि सोफ्याच्या कडेला बसून राहिला नुसताच. एकदम शांत, भेदरलेल्या अवस्थेत..काहीही बोलायला तयार नाही. एक्-दोन वेळा विचारलं तर काहीच सांगेना काय झालंय ते. आईने थोडं रागावून विचारल्यावर मात्र जे काही त्यानं सांगितलं.. ते ऐकून मात्र हसून हसून लोळायची वेळ आली. तर त्याने सांगितलेला किस्सा त्याच्याच शब्दांत..

- तिथं पोहयला गेलो तर एक जाडच्या जाड माणूस आधीच आत पाण्यात डुंबत होता. आणि माझ्याबरोबर आणखी एक मुलगा होता आज. त्यानं मला विचारलं," तुला येतंय का रं पवायला." मी म्हणालो.."नाही , अजून टायरट्यूब घेऊनच पोहोतोय." मग तो म्हणाला,"अरे ही ट्यूब घ्यून किती दिस पोवनार?? त्यो रेडा बघ कसा.. मस्त डुंबतोय" असं तो त्या जाड माणसाकडे बोट दाखवत म्हणाला. मी बघितलं तर तो माणूस आमच्याच कडं येताना दिसला. तो जवळ आला.. आणि त्याने त्या मुलाला दोन्ही हातांनी उचलला आणि पाण्याच्या बरोबर मध्यात जाऊन फेकून दिला. तो मुलगा..ओय ओय ओयोय... करत लांब पाण्यात जाऊन पडला.. आणि तिकडच्या बाजूच्या काठापर्यंत पोहत जाऊन तिथून पळून गेला. मग तो जाड माणूस माझ्याकडे पुन्हा वळला.. मी आपला लग्गेच्च्च ती टायरट्यूब घालून बसलो.. तो जवळ यायला लागला तसं मला लई भिती वाटायला लागली. तो माणूस जवळ आला आणि गणपत पाटलांसारख्या आवाजात म्हणाला.."पावनं.. लोक काय बी बोलुद्यात आपण शिकायचं सोडाचं न्हाय. कल्ळं का?" मी आपली मान डोलावली आणि कपडे घालून परत आलो... मला त्यानं फेकलं असतं तर.. मला तर पोहायला बी येत नव्हतं.. म्हणून ट्यूब घालून बसलो व्हतो...
झालं !! हे त्यानं सांगितलं आणि.. आम्ही जे हसत सुटलो ते सुटलोच.

एकदा आमच्या लॅब्रॅडॉल कुत्रीला फिरवायला म्हणून घेऊन गेला. तीने फिरता फिरता एका बंगल्याच्या समोर केलेल्या सिमेंट्च्या उतारावर छोटा कार्यक्रम आटोपून घेतला. बंगल्याचा मालक आवारातच होता कुठेतरी. तो आला.. आणि त्याने चिडून संतूला विचारलं, "काय रे ए.. समजत नाही का तुला? काय हे केलंय इथं?" .. याला काय बोलावं कळेना.. पण एकदम म्हणून गेला.."काका, मला कळून काय उपयोग.. हिला कळायला नको का?".. मालक बिचारा काय बोलणार. निर्विकारपणे तिथून निघून गेला.

संतू.. !! बाबांनी त्याला नोकरीला लावला. नोकरी करता करता नाईट कॉलेजला जाऊ लागला होता. आता आमच्या घरी रहाणे त्याला रूचेना. बाहेर भाड्याने खोली घेऊन राहू लागला. अधून मधून भेटायला येत होता. रक्षाबंधन आणि भाऊबीजेला न चुकता यायचा. मला नेहमीच काहीतरी भेट देऊन जायचा. माझ्या लग्न झाल्यावर पुण्यालाही आला होता १-२ वेळा. माझ्या पिल्लूच्या जन्मानंतर मी आईकडे जितके दिवस होते तितके दिवस न चुकता मला आणि पिल्लूला भेटायला येत होता.
मागच्या भारत भेटीत आईकडे गेले तेव्हा समजलं की, त्याला दोन वर्षापूवी पंजाबात कुठेतरी नोकरी लागली होती आणि तो तिकडे गेला होता. मात्र नंतर तो कधीच आला नाही कोल्हापूरला. त्यानंतर कधी भेटलाही नाही.
संतू .. पुन्हा कधी भेटेल, कुठे भेटेल.. काहीच नाही माहिती. पण जिथे असेल तिथे सुखी असावा ..
अजूनही आशा आहे.. कधी तरी आईकडे गेले असता.. त्याचं "मी बघाय णाय ताई..." हे क्रियापदाचं धिरडं नक्की बघायला मिळेल.

- प्राजु