( ए आय,चाटगपट,जेमीनीबाबा,कृबू,)

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
25 Jun 2025 - 5:04 pm

डिस्क्लेमर-: सदर लेख केवळ मनोरंजनार्थ आहे. वेळ भरपूर,रिकामा मेंदू,स्वतःशी वाचाळ पंचाळशी करताना प्रसवलेल्या विचारातून प्रसूत झालेला आहे.याचा मृत अथवा जीवीत व्यक्तीशी,स्थळाशी,कल्पनां यांच्याशी काही एक संबंध नाही. तसे भासल्यास निव्वळ योगायोग समजावा.कृबुला विचारून बघू नये,विचारल्यास मिळालेल्या उत्तराचे उत्तर दायित्व प्रश्न कर्त्यावर असेल.आमच्या लेखी ए आय म्हंजे,

(ए) आय,(ए) आय....
अरे, हा तर जुनाच पर्याय .
काऊ कोकता उदरी,
आठवते ती (ए) आय...
मार खाताना बापाचा,
लपवते पदरी ती (ए) आय
तुही माही सारखीच हाय,
तरीही, माही आय ती माही आय
तुही आय ती तुही आय

(ए) आय (ए) आय
सम्दीं करतात हाय हाय,
प्रश्न अनेक
कृबुची आय,जेमीनीची आय
सारखीच हाय
पण उत्तर एकच देत नाय.
कुणाची आय खरी हाय...
हाय काय, नाय काय,......

सध्या ए आय,चाटगपट,जेमीनीबाबा,कृबू,एवढेच काय तर कायप्पावर सुद्धा मेटा (कुटीला आलेला) आय यांचा बोलबाला आहे. याने म्हणे लोकांच्या नोकऱ्या जाणार, बेरोजगारी वाढणार वगैरे वगैरे....

म्हणतात,ए आय ने विचारशक्तीची गरज कमी होईल,विचार करण्याची स्पिड कमी होईल,(तसेही आता तरी बरेचसे लोक कुठे संपूर्ण मेंदू वापरतात.कुणी अंधभक्त ,कुणी भक्त आणी उरलेले सुपरहुमन.)

कला,साहित्य,अर्थ सर्वच क्षेत्रात याची लुडबूड वाढणार आहे. म्हणतात, ते (कृबू) प्रत्यक्ष शिक्षणासाठी आवश्यक असलेला "जर्मन संज्ञानात्मक भार" (ते काय आसते ते मला विचारू नका,कुणी आय आय टी,एम आय टी चे अल्युमिनियम असतील त्यांना विचारा) ३२% ने कमी करेल. म्हंजे, परिक्षेत तीन टक्के अभ्यास केला की पास होणार काय? म्हंजे, बघा, बत्तीस टक्के कृबु कमी करणार अधिक तीन टक्के अभ्यास परिक्षार्थींनी केला झाला पस्तीस टक्के आणी आपल्याकडे पस्तीस टक्क्यांनाच पासिंग हाय नव्हं? कृबु आले तर तिसरी भाषा शिकायला लागेल काय? हा पण एक कळीचा मुद्दा आहे.

आता मी खुपच चांगला चित्रकार होणार आहे आहे.मिपावरील चित्रगुप्त, चौथा कोनाडा, आणखीन कुणीतरी जे शिसपेन्शीलीने चित्र काढतात त्यांच्या पेक्षाही मोठा.कारण कृबू माझा दोस्त होणार, अल्लाउद्दीनच्या जिन्न सारखा,कुठलाही जिन्नस मागताच मिळणार. मी तर प्रॅक्टिस पण सुरू केलीय.

म्हणे,ए आय वापरल्याने मज्जा आणी रज्जूचे कनेक्शन कमी होणार,हायला हे मात्र भंयकर हो...( मी रजनीला लाडाने कधी कधी रज्जू म्हणतो तर मी तीचा मजनू म्हणून लाडाने ती मला मज्जू म्हणते) मज्जू ने रज्जूला (? ) काही सांगितलेच नाही तर पुढे केव्हढं महाभारत होईल हे हृषिकेशीच जाणे. पण परत एक शंका, जाऊ द्यात,इथे ,"विच्छा माझी ", मधले दादा कोंडके आठवले नाही तर नवलच.

लहान असताना एक सायफाय वाचली होती, ते मिपाकर भागो लिहीतात तशीच. एक थिंक ट्यान्क मधे काही ग्रे मॅटर तरंगत आपसात गहन,गहन विचार विमर्श करत होते,ब्ला, ब्ला, ब्ला....

आता मेंदूचे कार्य कमी, (म्हणजे मगजमारी करता येणार का नाही?) पर्यायाने कार्यक्षमता कमी. कृबू सदृश्य काहीतरी गोष्ट अदृश्य राहून सर्व कामे करणार म्हणजे मेंदूची गरज रहाणार नाही.म्हंजे मेंदू पण गळून पडणार का काय!!! जसे शेपूट गळून आंत्रपुच्छ राहीले या सारखी मेंदू एखादी खुण मागे सोडणार काय,तर म्हंजे फ्युचर मधे येणाऱ्या पिढ्यानां कृबु सांगेल तुमच्या ऐन्सिस्टर्स ना ग्रे मॅटर होता.

एक मोठ्ठा प्रश्न,म्हणतात,"यम्टी मांईड डेव्हिल्स वर्कशॉप ",मांईड डोक्यात असते (मला माहीत आहे)म्हंजे मेंदूत असते.जर मेंदूच रहाणार नाही तर मांईड पण उरणार नाही. मग डेव्हिल्स आपले वर्कशॉप कुठे उघडणार?म्हंजे तो पण बेरोजगार होणार.बापरे,खुपच बेरोजगारी वाढणार.म्हंजे विपक्ष सरकारचे चांगलेच वाभाडे काढणार.म्हंजे,आबा,स्वरूप सुमीत सारखी मिपाखरे शक्तीशाली होणार.शालीतून मारण्या ऐवजी सरळच प्रहार करणार. मग सरकारभिमुख मिपाखरे काय करणार. या विचारानेच कसेतरी होत आहे.

सर्वच गोष्टी वाईट नसतात.एक चांगलयं,मेंदूच नाही म्हंजे ब्रेन हॅमरेज (मेंदू रक्तस्त्राव)नाही,ट्यूमर होणार नाही,फेशियल पालसी,मज्जा तंतू चे रोगही होणार नाहीत.मग न्युरोसर्जन,न्युरो फिजीशियन बेरोजगार होणार. बापरे.... एका डाॅक्टर मागे केव्हढी मोठ्ठी टिम असते,नर्स, टेक्निशियन, फिजीयो,लॅब, एच आर,मार्केटिंग, मुख्य म्हणजे विमा एजंट ...............मग हाॅस्पिटल बांधणारे,रंगारी,सुतारकाम करणारे, कॅन्टिनवाले....... आगो ब्बाबो, लईच भयानक बेरोजगारी. आता तर कल्पना,प्रतिभा सगळ्यांची मती खुटंणार.

कृबु तू दयाळू कृपावंत त्राता
असे आभंग वाचनात येणार का काय? मग अधूनिक वाल्मीकी यांच्या प्रतिभेला कृबुची टक्कर.... सर्वच भयानक... हे तर सायफाय पेक्षाही .... डोकं आता सांयसाय करायला लागलयं. थोडी म्हशीच्या दुधावरची जाड साय साखर खातो ,कदाचित कल्पना रांगायला लागेल....

मज्जारज्जूच नसेल तर पाठीच्या कण्याची जरूर नाही मग कणा नाही तर मणके नाही. म्हंजे मणक्यात गॅप होऊन पाठ दुखणार नाही. म्हजे ऑरथोपडीक डाॅक्टर पडिक बेरोजगार होणार.अरे बापरे विचार करू करूच डिप्रेसिंग वाटायला लागलंय बुवा.

हल्ली सर्वांना पाठीचा कणा, स्पाईन असतो तरीही कित्येक लोकांना स्पाइनलेस म्हणतात च नं! मग जेव्हां खरोखरच नसेल तेव्हां काय म्हणतील......

आता मेंदू नाही तर कवटी खाली ,खाली म्हंजे रिकामी असणार. म्हंजे प्रेताची रिकामी कवटी सुद्धा लवकरच फुटणार व लोकांना लवकर घरी जाता येणार.

पण तरिही, एक अजून प्रश्न डोक्यात येतो तो म्हंजे, मेंदू इतर आवयवांना हुकूम सोडतो व बाकीचे आवयव गुलामा सारखे काम करतात. मेंदूच उरला नाही तर इतर अवयव गुलामगिरीतून मुक्त होणार काय? मग कसे काम करणार? का प्रत्येकाचे स्वतंत्र कृबु, चाटगपट केंद्र असेल?त्यांच्यात मतभेद झाले तर तात्यांची भुमिका कोण करेल. किती काॅम्प्ल्याक्स नं!

अरे बापरे,सर्वच प्रकरण गंभीर आहे. जेव्हढा विचार करतोय तेव्हढी मेंदूची विचारशक्ती कमी होत चाललीय. कृबू माझ्या मेंदूचा ताबा तर घेत नाही ना!

असो,चंदनासी परिमळ,अम्हां काय त्याचे||

आमची कांचनसंध्या,थोड्याच वेळात काळोख होणार.पुनर्जन्म झाला तर बघून घेऊ. तसेही आताच्या मानवाला किडकी प्रजा म्हणलेच आहे. पुढे ही किड वाढतच जाणार कुणी म्हंटले आहे? माहीत नाही ,कुणी महान व्यक्तीच असणार.अशी वक्तव्ये प्रज्ञावंतच करू शकतात.आपण सामान्यानीं फक्त "चान,चान ", म्हणत मान डोलवायची.अशा किडेल्या प्रजातीत जन्म घेण्यापेक्षा भूभूचा जन्म बरा नाही का? त्यामुळे मरताना पुन्हा मानव जन्म नको असाच विचार मनात ठेवणार.

धनंजयाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणून गेले आहेत,

यं यं वापर स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् |
तं तमेवैति कौंन्तेय सदा तद्भावभावित:||६||

तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे ।
तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥

याप्रमाणॆ जिवंत असतांना, जी गोष्ट आवडीने अंत:करणात रहाते,तीच मरणाचे वेळी वारंवार मनात येते.

हे लक्षात ठेवून मेंदू विरहीत मानव जन्म नको अशीच अंतकाळी प्रार्थना करणार.

मग पुनर्जन्म पक्षी,भूभू वगैरेचा झाला तरी हरकत नाही.....

मुक्तकविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Jun 2025 - 3:38 pm | प्रचेतस

एआयसारख्या गंभीर विषयावर अत्यंत मिश्किल आणि उपरोधिक शैलीने मांडलेले विचार आवडले. लेखातील लोककथांच्या आणि रोजच्या जीवनातील उदाहरणांचा वापर प्रभावी वाटला.

अभ्या..'s picture

26 Jun 2025 - 3:59 pm | अभ्या..

वाहवा
हे खरे मिपावरचे आद्य जेमिनी बाबा.
काय टेम्प्लेटी प्रतिसाद हाणला.
सुंदर.

माझ्या वाचाळ पंचाळशीला नावाजले,पद्मपुरस्कार मिळाल्या सारखेच वाटले.

गावात बांबूची शिडी घेऊन अर्ध्या तासापुरते चौका चौकात घासलेटचे टिमटीमे लावण्याचा काळ ते रिमोट ने हॅवल्स चे पंखें, लाईट्स, सर्च लाईट्स, सोलार एनर्जी....

चौदावा झाल्यानंतर येणारे अर्धे पिवळे पोस्टकार्ड ते मोबाईल वर मरणाचा रिल्स बनवून एक एक लाईक्स करता होणारा तडफडाट.....

बैलगाडी ते चांद्रयान...

थ्री नाॅट थ्री ते बोफोर्स, ब्राह्मोस बघितलेल्या पिढीला कृबु ची काय मातब्बरी.

आज पु. ल.असते तर कसे व्यक्त झाले असते एव्हढाच विचार मनात येतो.

माहितगार's picture

26 Jun 2025 - 9:59 pm | माहितगार

आज पु.ल. असते तर ... कृबु. बद्दल कसे व्यक्त झाले असते ते मी च्याट जिपीटी आणि जेमिनी दोघांनाही विचारले. च्याट जेपिटी बाबांना प्रॉम्प्ट बदलून दिला तरी तेव्हढे जमले नाही. जेमिनी बाबांची व्हेर्शन बरी वाटली:
***
अहो, काय विचारता राव या नव्या 'कृत्रिम बुद्धीमत्ते'बद्दल! आज जर पुलं असते तर त्यांनी यावर काय भाष्य केलं असतं, याची कल्पनाच भन्नाट आहे. मला वाटतं, त्यांनी प्रथम या AI ची तोंडओळख करून घेतली असती, अगदी एखाद्या नव्या माणसासारखी. त्याला निरखून पाहिलं असतं, त्याचे गुण-अवगुण तपासले असते आणि मग आपल्या खुमासदार शैलीत सांगितलं असतं, "अहो मंडळी, हा काय नवा गडी बाजारात आलाय! म्हणतो मी विचार करतो, मी लिहितो, मी चित्रं काढतो. पण खरं सांगू का, याला अजूनही 'भेंड्या' खेळायला शिकवलं नाही वाटतं! किंवा कदाचित त्याला 'पावसाची गाणी' म्हणायला लावली तर तो 'एरर' दाखवून बसेल!" त्यांच्या नजरेतून AI म्हणजे माणसाच्या बुद्धीची एक गंमतशीर प्रतिकृतीच ठरली असती, जी काही गोष्टींत माणसाला भारी पडेल पण माणसाच्या सहजतेची, त्याच्या चुका करण्याची, त्याच्या भावनांची नक्कल कधीच करू शकणार नाही. कारण माणसाच्या चुकांमध्येच तर खरी गंमत असते, नाही का?

पण त्याचवेळी, पुलंनी या AI च्या शक्तीची नोंदही घेतली असती. त्यांनी म्हटलं असतं, "बघा मंडळी, हा काही साधासुधा प्रकार नाही बरं! हा आता घरगुती कामांपासून ते अवघड गणितांपर्यंत सगळं काही करतोय. कदाचित उद्या सकाळी तुमच्या बायकोच्या वाढदिवसाचं गिफ्ट काय घ्यायचं हे पण हाच सांगेल! आणि मग तुम्ही म्हणाल, 'पुलं, तुम्हीच बरे होतात, निदान बायकोला काय आवडतं हे तरी आम्हालाच ठरवू दिलं!' पण गंमत सोडा, याचा उपयोग चांगल्या कामासाठी झाला तर ठीक आहे. नाहीतर, उद्या हाच आपल्याला 'आम्ही तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहोत' असं सांगायला मागेपुढे पाहणार नाही. पण एक नक्की, माणसाने माणसासोबत बोलायला, हसायला, रुसायला आणि जगणं अनुभवायला विसरू नये. कारण ही 'कृत्रिम बुद्धिमत्ता' कितीही हुशार असली तरी तिला 'माणुसकी'ची ओळख करून देण्यासाठी अजून काही हजार वर्षांचा शोध लागेल!"