जे न देखे रवी...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
11 Dec 2025 - 14:55

तू

ग्रीष्म-तप्त भूमीवर तू तर
सर सर मृगसर कोसळणारी

विकल-विव्हल प्राणांवर फुंकर
घालुनी सांत्वन तू करणारी

क्षणभंगुरता गर्वे मिरवीत
चिरंतनासम तू फुलणारी

परंपरांचे अवजड बंधन
सहज समूळ तू झुगारणारी

कोलाहल भवताली त्यावर
प्रशांत शिडकावा करणारी

भळभळते व्रण माझे बांधून
भरजरी पैठणी तू उरणारी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
1 Dec 2025 - 15:15

लक्ष लोलक तोलत

लक्ष लोलक तोलत
उसळते निळी लाट
किनाऱ्याशी फुटताना
एक अतृप्ती उत्कट

मावळतीच्या दिशेला
फूल फुटे केशराचे
निळ्या घुमटाला पडे
कोडे कुण्या नक्षत्राचे

तोल ढळण्या आधीच
हस्तिदंती मनोऱ्याचा
कोष आवळून घेतो
मीच माझ्या भोवतीचा

नाहिद नालबंद's picture
नाहिद नालबंद in जे न देखे रवी...
1 Dec 2025 - 12:32

परखड

यामुळे वाट्यास माझ्या रोज परवड
बोलतो कायम म्हणे मी फार परखड

वेळ येता कर्जमाफीची बळीच्या
मग तिजोरी शासनाची जाम खडखड

एकही नेता गुणी ना भ्रष्ट सारे
भाषणे आता तयांची हीन बडबड

इंग्रजीला शक्य तितकी टाळतो मी
टिकविण्या करतो मराठी हीच धडपड

यामुळे हरकत तयांची लेखनाला
वापरत नाही कधी मी शब्द जडजड

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जे न देखे रवी...
29 Nov 2025 - 21:41

कधी निसटले धागे

कधी निसटले धागे
मज कळलेच नाही
कशी उसवली वीण
मज कळलेच नाही

त्या निवांत भेटी
त्या एकांत गाठी
डोळ्यांत हर्षाचे झरे
अन देहांची मिठी
क्षण ते सरले जरी
मन ते भरलेच नाही

ती मधाहूनी गोड
कुठे हरवली ओढ ?
अशी कशी मुक्याने
मोडली माझी खोड
माणसाचे मन ते
मज उमगलेच नाही

युयुत्सु's picture
युयुत्सु in जे न देखे रवी...
16 Nov 2025 - 09:09

कोडी

कोडी
===

-राजीव उपाध्ये १६. नोव्हें २०२५

तो सरळ
चालत होता...

चालता चालता
त्याला आयुष्याने
कोडी टाकायला
सुरुवात केली.

तो कोडी सोडविण्यात
मग्न असताना
त्याला कुणीतरी
धडक देऊन
पाडले.

तो पडला
जखम झाली
भळभळा वाहू
लागली.

नाहिद नालबंद's picture
नाहिद नालबंद in जे न देखे रवी...
2 Nov 2025 - 10:55

या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला (तरही)

सानी मिसऱ्याची ओळ क्रांतिताई (क्रांति साडेकर) यांची,
तरही साठी ओळीबद्दल आभार, त्यांना न विचारता ही ओळ वापरली त्याबद्दल क्षमस्व! ओळ वाचून नाही राहवलं.
===================================
त्याच वाटेवर जुन्या भटकायचे नव्हते मला
(या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला)

पेन्शन खातेच मी बदलून गावी घेतले
आणखी शहरात त्या राहायचे नव्हते मला

सुखी's picture
सुखी in जे न देखे रवी...
22 Oct 2025 - 08:20

कळलं च नाई

इवले इवले डोळे, खूप खूप खेळले,
दमून झोपी कधी गेले, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, खेळता खेळता रडले,
रडता रडता कधी हसले, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, छोटे छोटे डोळे,
मोठे कधी झाले, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, दूर निघून गेले,
कधी परत येतात, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, परत फिरून आले,
नवीन इवले डोळे, सोबत कधी आले कळलं च नाई.

नाहिद नालबंद's picture
नाहिद नालबंद in जे न देखे रवी...
21 Oct 2025 - 10:01

बघ

बघ
ती सावलीच ठरली वरचढ उन्हावरी बघ
माझाच जीव जडला माझ्या व्यथेवरी बघ

वारीत पांडुरंगा सावध रहा जरा तू
मारेल चोर डल्ला तुझिया विटेवरी बघ

म्हणतात जे मराठी चित्रपट अता न चाले
नसते पकड जराही त्यांची कथेवरी बघ

साहेब जे कधीही दिसले मुळी न मजला
होते हजर परंतू कायम पटावरी बघ

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
17 Oct 2025 - 16:45

सणासुदीची सफाई

"नास्तिकांनी खायला कोंडा,
उशाला धोंडाचं गाणं!"
कितीही म्हटलं, तरी
आपल्या देशाची पक्की जमीन
धर्माच्या खाटेचीच सोय!

पंथाच्या गादीची उब,
सांस्कृतिक उशीसंगे अल्हाददायक झोप —
आपलेसेपणा देणारी ही सोय
बहुतेकांना हवीच असते, नाही का?

सणांच्या आधी, माळ्यावरची
समृद्ध अडगळ खाली उतरते,
तेव्हा माळ्याचीही सफाई होते.

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
10 Oct 2025 - 14:47

दहा अंगुळे उरला

अभंगाची मूळाक्षरे
ध्यानी मनी घोटताना
"वि"ठ्ठलाच्या "वेलांटीत"
"का"न्हा रेखाटतो "काना"

वेचुनिया मूळाक्षरे
घडवितो शब्द तुका
गहनाचा अंतर्नाद
झंकारतो त्यात, ऐका

शब्द चोखट, रोकडे
जोडे तुका, रचे ओळ
ओळी ओळीत गर्जती
वीणा, मृदंग नि टाळ

एका एका अभंगाचा
शब्द शब्द जो जगला
तुका आभाळ व्यापून
दहा अंगुळे उरला

पारुबाई's picture
पारुबाई in जे न देखे रवी...
4 Oct 2025 - 08:56

समुद्रच आहे एक विशाल जाळं

ही एक दीर्घ कविता आहे.
एका समुद्रात राहणाऱ्या निळ्या पोटाच्या काळ्या मासोळीची ही गोष्ट आहे. या मासोळीचे मनोविश्व मोठे विलक्षण आहे. वाचायला लागल्यावर एकसलग वाचत रमून जावे अशी ही गोष्ट.

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
19 Sep 2025 - 11:18

सागर तळाशी

सागर तळाशी | तुटल्या केबल
त्याने जगड्व्याळ | लोच्या झाला || १ ||

बाह्य जगताशी | संबंध तुटला
येरू डोकावला | आत तेव्हा || २ ||

अनाहत नाद | आला समेवर
कल्लोळ सुस्वर | उसळला || ३ ||

स्थूल ओलांडून | ओसंडे सूक्ष्मात
ऐसी ज्याची रीत | दिसला तो || ४ ||

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
18 Sep 2025 - 22:18

मुसळधार पावसाने....

या वर्षी पावसाने कहर केलाय. एक शब्द चित्र......

नाही दिली उसंत
सावराया जिर्ण पाले
मुसळधार पावसाने
गर्विष्ठ ......
हवेल्यानां शांत केले

हिरव्या माळरानी
ना ही कळ्या उमलल्या
मुसळधार पावसात,
व्यथा.....
खडकात जिरून गेल्या

अंडी फुटून गेली
आळ्या मरून गेल्या
मुसळधार पावसाने
फुल.....
पाखरांचा काळ केला

निनाद's picture
निनाद in जे न देखे रवी...
14 Sep 2025 - 14:06

चमकणारे आभास निळे

जागं मन हे, अर्धवट मिटल्या डोळ्यांत
देकार्तेच्या का शंकेचा पोकळ गोंधळ.
'मी विचार करतो, म्हणून मी आहे'?
पण हे विचार कुणाचे?
एका ॲपच्या नोटिफिकेशनचे?

अस्सल आरसा असूनही
पडझडलेल्या प्रतिमेचा भुगा
रात्री बेरात्री चिवडत बसणे
जसा नित्शेच्या 'माणसाच्या'
अशक्यप्राय स्वप्नाचा उपहास.

युयुत्सु's picture
युयुत्सु in जे न देखे रवी...
8 Sep 2025 - 12:10

कल्पका:

नास्ति भारत: देश: यत्र कल्पका: सन्ति दुर्लभा:।
अपमानिता: यदा नित्यं प्रगतीस्तत्र कथं भवेत्॥

--राजीव उपाध्ये

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
7 Sep 2025 - 13:07

कवितेच्या गणिताची कविता + - x ÷

कविता-रतीचे | विभ्रम अनंत
तयांचे गणित | कैसे करू?

तरीही करितो | वेडे हे धाडस
माझ्या अक्षरांस | हासू नये :)
~~~~~~~~~~~
कधी बेरीज बेचैनीची
कधी वास्तव वजावटीस
कधी गुणाकार गहनाचा
कधी भागे कवी शून्यास

कवितेचे गणित कसे हे
उत्तर ना त्याचे कळते
ओळींच्या मधली जागा
गणिताला डिवचून जाते

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
5 Sep 2025 - 20:43

(π)वाट

स्पर्शरेषा जोखते जणु
वर्तुळाची वक्रता
परीघ अंशी / व्यास छेदी
(π) उरवी तत्त्वता

वर्तुळाचे केन्द्र जीवा #
ना कधीही स्पर्शिते
केंद्र गिळता तीच जीवा
व्यास बनुनी राहते

(π) द्विगुणित होऊनी
परिघास जेव्हा भागतो
हाती ये त्रिज्या-जिला
व्यासार्ध कुणी संबोधितो

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
3 Sep 2025 - 09:26

होडी

वाण्याचे सांगतो कुळ,
विकतो देहू गावी गुळ
नांदुरकीच्या झाडाखाली
बेतुक्या शोधतो मुळ

स्वर टाळ चिपळ्यांचा
विरून हवेत गेला
छेडून विणेच्या तारा
बेतुक्या थकून गेला

भोवती गर्द पाचोळा
काही हिरवा काही पिवळा
काही वार्‍याने उडून गेला
काही तीथेच निजला

युयुत्सु's picture
युयुत्सु in जे न देखे रवी...
1 Sep 2025 - 18:26

उंदीर

घरात पडला उंदीर मरूनी
थकलो सगळे शोध घेऊनी
चंद्रावर गेला मानव तरीही
उंदीर शोधण्या गॅजेटच नाही...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
24 Aug 2025 - 17:56

स्ट्रिंग थिअरीचा पाया

(FunU)वादी लेखनाची
होता उर्मी अनावर
ब्रह्मलीन असूनही
प्रकटू का मिपावर?

बादरायणी संबंध
येतील का माझ्या कामी?
(एन्ट्रॉपीचे ॐकाराशी
करू कलम कसे मी?)

"जानव्याचा दोरा हाच
स्ट्रिंग थिअरीचा पाया"
हीच थीम ठेवूनिया
लेख घ्यावा का पाडाया?