अध्यात्माची भूमिती
अनादिच्या अलिकडचा
"अ" हा नि:संग असा एक बिंदू घेतला.
मग
अनंताला स्पर्श करू धजणारा,
ज्ञानगम्य असा,
"ज्ञ" हा दुसरा बिंदू घेतला.
"अ" ला "ज्ञ"शी जोडणारी
"अज्ञ" ही रेषा आखली.
ह्या रेषेवर
माझ्याच जवळपास
कायम घोटाळणारा
"हम्" हा बिंदू निवडला.
"अज्ञ" या रेषेशी
लंबरूप,
फटकून असणारे,
"सोs" हे प्रतल
असे निवडले
की ते "अज्ञ" रेषेला
"हम्" बिंदूत छेदेल.