परतीचा पाऊस...
थोडासा चिडलेला.... अंमळ रुसलेला..
परतीचा पाऊस...
विजांच्या मागून जोरदार गरजला
बरसून दमल्यावर रस्त्यात भेटला
सवयीप्रमाणे थोडावेळ दाटला
मग जाताना कानात पुटपुटला...
कागदाच्या होड्या सोडताना
आताशा भेटत नाहीस ?
पन्हाळीखाली चिंब भिजताना
मुळी दिसतचं नाहीस ?
अनवाणी पायांनी वाहत्या
पागोळ्यांमागे धावत ही नाहीस
की ओंजळीत विरघळणाऱ्या
बर्फ़ाळ गारा वेचित नाहीस
इतका मोठा झालास की पावलांना
गुंजभर चिखल ही लागु देत नाहीस
इतका थोर झालास की कपड्यांवर
थेंबभर ओलसुद्धा सहन करीत नाहीस..