या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याची 77 वर्षं पूर्ण होत असतानाच आणखी एका ऐतिहासिक घटनेला 170 वर्षं पूर्ण होत आहेत. ती ऐतिहासिक घटना म्हणजे हावडा रेल्वे स्थानकाची 170 वर्षपूर्ती. कोलकाता ही ब्रिटिश भारताची राजधानी असताना 15 ऑगस्ट 1854 ला हावडा ते हुगळी या 37 किलोमीटर लांबीच्या लोहमार्गावरून पहिली प्रवासी गाडी धावली होती. त्यानंतरच्या काळात हावड्याहून देशाच्या विविध भागांना जोडणारे लोहमार्ग झपाट्यानं उभारले गेले.
11 डिसेंबर 1911 पर्यंत कोलकाता ही ब्रिटिश भारताची राजधानी होती. त्यामुळं अखंड भारताच्या कानाकोपऱ्यातून कोलकात्याला येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या प्रचंड होती. ती मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक रेल्वेगाड्या सुरू करण्यात आलेल्या असल्या तरी प्रवाशांचा वाढता भार उचलण्यात आधीची इमारत कमी पडत होती. म्हणूनच हावड्याच्या रेल्वेस्थानकाच्या विस्ताराची आवश्यकता ईस्ट इंडियन रेल्वे कंपनीला वाटत होती. या स्थानकात 6 फलाट असले तरी ते आता अपुरे पडू लागले होते. त्यामुळं 1901 मध्ये हावडा रेल्वेस्थानकाच्या इमारतीच्या जागी प्रशस्त, भव्य इमारत उभारण्याचा विचार मांडला गेला. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आणि 1 डिसेंबर 1905 ला हावडा रेल्वेस्थानकाच्या नव्या इमारतीचं उद्घाटनही झालं. आपल्याला आज हावडा रेल्वे स्थानकाची दिसत असलेली तीच ही इमारत.
भारत ब्रिटिश साम्राज्यातील सर्वांत महत्वाची वसाहत होता. त्यामुळं त्याच्या राजधानीचे प्रवेशद्वार असलेलं हावडा रेल्वेस्थानकही त्या लौकिकाला साजेसं असेल याकडे विशेष लक्ष दिलं गेलं होतं. म्हणूनच हावडा रेल्वेस्थानकाची ही इमारत जितकी भव्य तितकीच आकर्षक बनली आहे. पुढच्या काळात या नव्या इमारतीचाही विस्तार होत गेलेला आहे. रेल्वेगाडीतून आपण उतरल्यावर फलाटावरून चालत असतानाच या इमारतीची भव्यता जाणवू लागते. हावडा रेल्वेस्थानकाची इमारत लाल आणि पिवळसर रंगांचा कल्पकतेनं वापर करून उभारलेली आहे. या इमारतीचे मुख्य दोन भाग पडतात – एक आहे मूळची इमारत आणि दुसरी आहे विस्तारित इमारत. त्यापैकी मूळची इमारत आता 120 वर्षांची होत आलेली आहे, तर विस्तारित इमारत 40 वर्षांची झालेली आहे. तरीही या दोन्ही इमारती वेगवेगळ्या वाटत नाहीत, इतक्या सहजतेनं त्या परस्परांमध्ये एकरुप झालेल्या आहेत.
हावडा स्थानकाची इमारत खरोखरच भव्य, प्रशस्त आणि आकर्षक आहे. ही इमारत भारतीय रेल्वेच्या पूर्व आणि आग्नेय विभागांमध्ये विभागली गेलेली आहे. एकाच रेल्वेस्थानकात दोन वेगवेगळे विभाग कार्यरत असणारे हावडा जंक्शन हे भारतीय रेल्वेचं एकमेव स्थानक आहे. 1980 नंतर हावडा जंक्शनमधल्या फलाटांची संख्या वाढवण्यात आली. सध्या या स्थानकात 23 फलाट आहेत. कोलकात्यातील मुसळधार पावसापासून प्रवाशांचं संरक्षण करण्यासाठी स्थानकाच्या मूळच्या इमारतीतील फलाट संपूर्णपणे भव्य शेड्सनी आच्छादित करण्यात आलेले आहेत. त्या जुन्या शेड्स आजही या स्थानकात पाहायला मिळतात. त्यावेळी रेल्वेगाड्यांना 8-10 डबेच जोडले जात असत. त्यामुळं संपूर्ण रेल्वेगाडी या फलाटांच्या खाली मावत असे. पण जसजसे रेल्वेगाड्यांचे डबे वाढत गेले, तसतसे फलाट मूळच्या शेड्सच्या बाहेर लांबपर्यंत विस्तारत गेले.
आज हावडा स्थानकातून सुमारे 252 मेल/एक्सप्रेस आणि 500 उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक होते. त्यामध्ये राजधानी, शताब्दी, जनशताब्दी, दुरंतो, वंदे भारत यासारख्या प्रतिष्ठीत रेल्वेगाड्यांबरोबरच नेताजी एक्सप्रेस (कालका मेल), मुंबई-हावडा मेल, हावडा-चेन्नई मेल, अमृतसर मेल अशा ऐतिहासिक रेल्वेगाड्याचाही समावेश होतो.