टिळकांच्या या खटल्यापूर्वीच भारतीय लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक दमनाची प्रशासकीय आणि कायदेशीर चौकट ब्रिटिशांनी उभारून ठेवली होती. जी कुठली घडामोड ब्रिटिशांच्या मते त्यांचे भारतावरील नियंत्रण नाकारू पाहणारी ठरू शकेल, त्यामागील व्यक्तींवर 'राजद्रोहा'चे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढत होते. ब्रिटिश सरकारविषयी तिरस्कार वाढविणारे, त्या सरकारचा अवमान करू पाहणारे किंवा त्या सरकारविषयी अप्रीती निर्माण करू पाहणारे कोणतेही वर्तन 'राजद्रोह' ठरविले जाऊ शकत असे.
टिळकांवर हा राजद्रोहाचा आरोप एकंदर तीनदा ठेवला गेला. पहिल्यांदा १८९७ मध्ये, नंतर १९०८ आणि लगेच १९१६ मध्ये.