user

विनोद

कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड

कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड

या धाग्यातील प्रतिसादांमध्ये मंदार व प्रसाद जोशींनी म्हटले होते:
">कोथरुड थोडं सं रुड वाटटं नाई ?!!
खत्रूड शी यमक जुळतं नै, कोथरूडचं
>>>> ह्यावर एक मस्त कविता लिहिता येईल !!१
चला यमकं जमवुया"

मंग काय? आसली भारी सिच्यूएशन दिल्यावर लगेच लिहून काढली कविता. वाचा तर मग:

कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड
म्या जवा भेटाया जातो काशीला....
तवा... तवा...
तवा निसती ताठ करी मिसूरडं ||धृ||

हातात काठी अंगात डगला
दारापाशी तो राखणदार बसला
येळ काढ थोडा उगा नग रडारड
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड ||१||

तुझी अन माझी जोडी जमली
नाही कोनीही भिती घातली
मग तुझाच बाप का घालं खोडं?
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड ||२||

न्हाई भित मी तुझ्या बा ला
वर्‍हाड घेवून येईल सांग त्याला
जावई आहे त्याचा मी मागंपुढं
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२८/०८/२०१०

प्रेमाची बँक

प्रेमाची बँक
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का?
माझे अकाउंट उघडतेस का?
माझ्या प्रेमाच्या सेव्हिंग्जवर काही रिटर्न देशील का? ||धृ||

खाते ओपनकरण्यासाठी प्रेमपत्राचा अर्ज लिहीला
प्रेमजाणत्या मित्राला ओळखीसाठी तयार केला
इनवर्डला पडला अर्ज, आता सहिशिक्का मारशील का?
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||१||

अकाउंटचे असती करंट, लोन, सेव्हिंग, रिकरींग
सगळे नकोच मजला फिक्स खातेच हवे ग
त्याच्याशी तुझे अकाउंट जॉईंट करशील का?
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||२||

ऑनलाईन प्रेम, मोबाईल एसएमएस प्रेम सुविधांचे काय?
या सोईसार्‍या मिळती इतरांना मलाही मिळतील काय?
प्रेम धनाची होम डिलीव्हरी सुविधा मला मिळेल का? ||३||

आता स्नेहाची गुंतवणूक करतो
ओव्हरड्राफ्ट प्रितीची इंस्टॉलमेंट मिळवतो
तान्हूल्याच्या रूपात पोस्ट डेटेड चेक देशील का?
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२७/०८/२०१०

मेंदूदुखापत एसएमएस???

मेंदूदुखापत एसएमएस???

आज सकाळी ९.१८ मिनिटांनी माझ्या मोबाईलवर, +९२३४२७९३६५१५ या नंबरवरून एक कॉल आला.
काल सकाळी १०:४३ मिनिटांनी माझ्या मोबाईलवर, +९१९xxxxxxxxx या नंबरवरून एक एसएमएस आला.

त्यात मला एक सुचना आहे असे सांगण्यात आले.

एसएमएस इंग्रजीत होता. तो मी खाली देत आहे.
"Pls's do not attened any call frm 7888308001, 9316048121, 9876266211, 9888854137, 9876715587
These numbers comes in red colors. u may get brain hammerage due to high energy."

मराठी अनुवाद: 7888308001, 9316048121, 9876266211, 9888854137, 9876715587 या फोन नंबर्स वरून आलेला कोणताही फोन उचलू नका.
हे क्रमांक लाल अक्षरात असतात. जास्त उर्जे मुळे मेंदूदाह होवू शकतो.

बर्‍याच जणांच्या तोंडून असले अपघात या अशा एसएमेस मुळे झालेले ऐकण्यात आलेले आहे. असे फालतू एसएमेस महालक्ष्मी प्रसन्न झाल्याच्या एसएमेस ची पुढची आवृत्ती दिसते.

मोबाईल कंपन्याच असले सुरूवातीचे एसेमएस पाठवत असतील काय? त्यावरून हा प्रकार निव्वळ आर्थिक फ़सवणुकीचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मला वाटते.
.
.
. त्या एसएमएस चे काय करू?

जाणकारांनी मतप्रदर्शन करावे.

पाषाणभेद

आणखी एक तळीराम: श्री. वि. रा.भाटकर यांचा

मी लहान असताना आमच्याकडे अपूर्व नावाचं डायजेस्ट (रीडर्स डायजेस्ट सारखं) येत असे. तेव्हा एकदा त्यात “मला दारू चढत नाही” अशी एक अफलातून कविता आली होती. काळाबरोबर ती विस्मृतीत गेली. पण हल्लीच आणखी कसलातरी संदर्भ शोधताना महाराष्ट्र टाईम्सच्या वेबसाईटवर ती दिसली आणि परमानंद जाहला.

कविता मुळात खूप जुनी, म्हणजे 1961 ची. तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे कवि श्री. वि रा भाटकर यांच्याबद्दल काही माहिती असण्याची शक्यता नव्हतीच. पण “अपूर्व” मध्ये ही कविता छापताना असा उल्लेख दिला होता की कवि: वि. रा. भाटकर (आधारित चित्रे : दीनानाथ दलाल) ( ' दीपावली '- जानेवारी 1961 मधून साभार) पुढे म.टा च्या पानाचा दुवा देत आहे. ज्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यायचा असेल त्यांनी या पृष्ठाला जरूर भेट द्यावी. नंतरच्या पिढीतील वाचकांनी एका मजेदार अनुभवासाठी वाचायला हरकत नाही. (कवितेचा दुवा).

कवितेत एका “तळीरामाचं” कथन आहे. तो सुरुवातीला म्हणतो की,

“मला दारू चढत नाही
दारूबंदी असूनही
मी दारू खूप पितो पण मला दारू
कधी चढत नाही.
याचं एक कारण आहे.
दारू पिण्याची माझी एक
स्पेशल सिस्टीम आहे. “

पुढे तो आपल्या दारू पिण्याच्या स्टाईलचं वर्णन करतो, ते आमच्यासारख्या “दारु म्हणजे काय रे भाऊ?” वाल्या लोकांनाही गार करणारं आहे. दारू पिऊन हे महाशय हळूच बायकोच्या खोलीत डोकावून बघतात , “बायको गाढ झोपलेली असते आणि या कानाचा त्या कानाला पत्ता नाही”

पण प्रत्येक कडव्याबरोबर (पेल्याबरोबर?) या तळीरामाच्या सांगण्यात थोडा थोडा बदल होत जातो, आणि शेवटी गाडी ज्या स्टेशनावर येऊन थांबते ते म्हणजे,

“या बायकोचा त्या बायकोला
पट्टा नाही
आणि मी इटकी
दारू प्यायलो
पण अजून मला
च्यढली णाही खर्र ना ?”

हे सगळं मुळातूनच वाचण्यासारखं आहे.

पण ही कविता अचानक समोर आली, तेव्हापासून मला छळणारा एक प्रश्न म्हणजे, एवढं विनोदी लिहू शकणारा कवी/लेखक, आणि त्याच्या नावावर आणखी काही साहित्य कसं नाही? मी लहान असल्यापासून पुस्तकं वाळवीसारखी खाते. पण या लेखकाचं कोणतेही पुस्तक मी वाचलेलं नाही, एवढंच नाही तर एखाद्या दिवाळी अंकात सुद्धा यांचं काही लेखन वाचल्याचं आठवत नाही.

1960-61 च्या काळात मराठी पुस्तकांना चांगले दिवस होते. “दीपावली” सारख्या प्रतिष्ठित अंकात ज्या अर्थी श्री भाटकर यांची कविता प्रसिद्ध झाली होती, त्या अर्थी ते निदान काही लोकांच्या माहितीचे असणार.

“मिसळपाव” म्हणजे सर्व ठिकाणचे आणि सर्व वयांचे लेखक वाचक यांचा भेटण्याचा अड्डा! तेव्हा, जर कुणाला श्री वि. रा भाटकर यांच्याबद्दल, त्यांच्या इतर लेखनाबद्दल् काही माहिती असेल, तर कृपया कळवावी. म्हणजे, सर्वांनाच त्यांच्या लेखनाचा आस्वाद घेता येईल. आपल्याला अमेरिकन लेखकांबद्दल सगळी माहिती असते, पण आपल्याच मराठी लेखकांबद्दल फारसं काही माहित नसतं. फक्त कुतुहल म्हणून विचारते, कोणाला काही माहित आहे का? माहिती असेल तर जरूर सांगा, कारण हसायला सगळ्यांनाच आवडतं!

स्माईल प्लीज

फेसबुक वर शोधाशोध करताना "या फोटोना आवरा" म्हणून एक लिंक मिळाली. काही नमुने देत आहे. बाकीचे तुम्ही बघा.
Ismile please
jaahiraat
jaahiraat2

what's that?
kombadi
pune1
pune2

(वर्षाव)

छ्या छ्या, आजकाल बायका दारू पिऊ लागल्या. बीयर, वाईन आणि लिकरमधला फरक तरी कळतो का त्यांना? निदान दारू पिऊन मिपावरती धागे तरी टाकू नयेत. धागे कसले, कॉकटेलमध्ये भिजून ओल्यागिच्च झालेल्या कागदी स्ट्रॉ. आजकाल त्याही मिळत नाहीत. माझ्याकडे एक शेवटची स्ट्रॉ आहे ती टाकून देतो. मग बघतोच उंटाची पाठ कशी मोडत नाही ते.
----------------------------------------------------------------------------------------------
लाहोल बिलाकुवत. तौबा तौबा. या काफरांची ही मिजाज! हे अल्ला परवरदिगार, आता तूच माझं रक्षण कर रे बाबा या रावणी पिठल्यापासून.
----------------------------------------------------------------------------------------------
तो गोसावी रोज येतो. अल्लख म्हणतो. आपल्या भोकरी डोळ्यांनी मला निरखून बघतो. नजर हळूच खाली घरंगळते. पण घेत मात्र काहीच नाही. मला वाटत राहातं एकदा तरी त्याच्या झोळीत भाकर घालताना त्याच्या हाताला हात लागावा. मोहरून माझी मान खाली जाईल, तरी मी चोरटा कटाक्ष एखादा टाकेनच. कल्पनेने सुद्धा हुळहुळून जायला होतं. पण रीत आड येते, त्यालाही. मी ही अशी वांझ, मग तो माझ्या हातची भिक्षा कशी घेणार. हं. बघतेच कशी नाही घेत ते.
----------------------------------------------------------------------------------------------
आपून सगळा करून पायला. साला तिला सगळा उलटाच वाटला तर मी पन काय करनार. आयला माज्याकडचं सगलं काडून दिला, तर ती म्हनतीय वासना. तिच्याच पाठी लागलेल्या एका यडच्याप प्वाराला जरा दमात घेऊन कळवळीची विनंती क्येली तर ती म्हंती मीच गुंड म्हणून. तिची एक मैत्रीण होती जरा 'अडचणीत' तर मी मोठ्या मनाने पैशे दिले हॉस्पिटल वगैरे साठी, तर ही म्हंते दीखावा नुसता. आता मला नीट आटवत नांय हां.. त्ये सगला काडून दिला तेवा दीखावा म्हनली असंल आणि मैत्रिणीच्या वेळी वासना म्हणाली असंल. कायका आसंना पन मुद्द्या काय, कसा वागू मी शहाण्यासारखा................ई...ई......ई......ई.........ईईईईई......................ही पाल कुठनं टपकली मधेच?
----------------------------------------------------------------------------------------------
कॉसकोचा प्रवास करून आताशा माझं वजन वाढायला लागलंय. तिकडे काय मस्त मस्त सॅंपलं मिळतात - हाताळायला आणि चापायलासुद्धा. त्यात एचार वाल्यांनी प्रोसेस इंप्रुव्हायला सांगितली - आणि मीसुद्धा ती घरीच इंप्लिमेंट करायला गेले. ती दूतीही नव्हती तिथे, ते बरंच. नव्या प्रोसेसमुळे अर्ध्या वाटेवर जी पाठीत उसण आली, की विचारू नका. तरी बरं नवरा कधी नव्हे तो नेमका कामाला आला. पण त्याची आणि आमच्या मुलीची छद्मी नजर अजून जात नाही डोळ्यासमोरून.
----------------------------------------------------------------------------------------------
तर मंडळी, या वर्षी आपल्याला रस्तेबांधणीचं बजेट जास्त मागून घ्यायचं आहे. काय आहे की थ्री डी एक्स्प्रेस बांधायची आहे ना! आणि तरीही पुरले नाहीत तर करून टाकू झुमरीतलैया ते पटणा
आणि होस्पेट ते गुलबर्गा कॅन्सल. काय म्हणता, पुणे तळेगाव कॅन्सल? छे छे, मला या पुणेकरांशी पुन्हा वाद उकरून काढायचा नाही. एकदा त्यांच्या ब्ल्याक बुकात गेलो तेवढं पुरेसं आहे.
----------------------------------------------------------------------------------------------
आमचे बाबा म्हणजे ना, अगदीच हे आहेत. स्वत्ताला ज्यादा शाने समजतात. मला काच फुटण्याविषयी सांगतात. म्हणतात हॉकी स्टिकने फोडायची. मला काय कळत नाही का? आता मोठा आहे मी. आत्तापर्यंत खूप बाटल्या फुटल्या...
----------------------------------------------------------------------------------------------
आपण इंचाइंचाने काश्मीरमध्ये माघार घेत आहोत. फार बिकट परिस्थिती आहे, आपले प्रधानमंत्री, आपले राष्ट्रपती, आपले लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? आजच जोरदार कारवाई करायला हवी. नाहीतर हे जर असंच चालू राहिलं तर दीडेक लाख वर्षात आपल्याला जम्मू-काश्मीरवर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आणि दहा पंधरा लाख वर्षात संपूर्ण भारत गमावून बसू, आणि युरोपासारखी परिस्थिती येईल. लवकर पोस्टकार्ड टाका, वेळ फार नाही.
----------------------------------------------------------------------------------------------
कविते, तू भाजी होशिल का...

स्फुरलीस तू अवचित मजला,
पोळीचा परि तवा तापला,
भेंडी होऊनी ताकामधली,
वदनी माझिया कवळशिल का ?
कविते, तू भाजी होशील का ?

('गे कविते, तू भाजी होशिल का...' नकोच ते. भलेभले चळतात.)
----------------------------------------------------------------------------------------------
आजकाल मिपावर बऱ्याच चर्चा चालू आहेत. इतकंच नाही, तर त्या चर्चा कशा चालाव्या, किंवा चालू नयेत यासाठी कोणत्या सूचना देणं रास्त आहे, हे शोधून काढण्यासाठी कौल टाकावे का असा कौल टाकण्याची चर्चादेखील चालूच आहे. एक अस्सल मराठी माणूस म्हणून आम्हीही या सगळ्यात हिरीरीने भाग घेत आहोत, घेत राहू. पण नुकतंच सरपंचांनी चर्चा टाळाव्यात, वारंवार सूचना टाळाव्यात, मिपा सर्वांचंच आहे अशा अनेक गोष्टी सांगितल्या असतानाही या चर्चा चालवाव्यात का? आपल्यासारख्या थोरामोठ्यांकडून या समस्यांवर काही प्रकाश पडेल अशी आशा आहे. की कौलच टाकावा सरळ?
----------------------------------------------------------------------------------------------
ऊलिखांनी गांजलेला शक्तिशाली सिंह मी
काय सांगू लायसॉल्ला आयळीची ही व्यथा
----------------------------------------------------------------------------------------------

वाचायला विसरू नका - तुझा बाप मरेल

शाळेच्या मैदानावर राजू आणि चिंटूची चांगलीच जमली.राजूने क्रिकेट खेळताखेळता चिंटूला भरमसाठ शिव्या दिल्या.आणि तुझा बाप मरेल असा घणाघाती शापही दिला.तुम्हाला वाटेल शाप फक्त महाभारात ,रामायणातच होते कि काय,आजच्या युगात आधुनिक भारतातही शाप आहेत आणि ते लागूही पडतात.
राजूच्या जिभेवर म्हणे तीळ आहे .तो जे बोलतो ते खरे होते.बाकी काही खरे होऊ दे अथवा न होऊ दे ,पण जेव्हा राजू संतापाने कोणाला तुझा बाप मरेल असा शाप देतो त्यावेळी मात्र सारेच टरकतात.कारण दुस-या दिवशी बाप वर रवाना झालेला असतो.अशी अनेक उदाहरणे घडल्यामुळे मैदानावर सुरु असलेला क्रिकेटचा डाव अचानक थांबला.फिल्डर जागच्याजागी उभे राहिले.कारण राजूने चिंटुला संतापाने शाप दिला होता.क्रिकेटची इनिंग तेथेच संपली .जो तो आपल्या घरी गेला आणि दुस-या दिवशी चिंटुच्या बाबांची इनिंग संपली होती.
मैदानावरची हि घटना शाळेत कुणीतरी वर्गशिक्षक तुकाराम शिंदे यांना सांगितली.तुकाराम शिंदे भडक डोक्याचे त्यांनी राजूला स्टंपने बदडला.राजु रडरड रडला.संतापाच्या भरात तो ओरडला ‘सर मला मारताय तुमचा बाप मरेल .‘ संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी गेलेले शिंदे सर दुस-या दिवशी गावी निघून गेले.सांगलीवरून वडील वारल्याचा फोन आल्याची बातमी शाळेत पसरली आणि शाळेला एक दिवसाची सुट्टी मिळाल्यांने मुले आनंदाने घरी निघून गेली.
१५ दिवसांनी शाळेत परतलेल्या शिंदे सरांनी सर्व इतिहास मुख्याध्यापक रघुवीर पवार यांना सांगितला.पवारांनी राजूच्या वडीलांना निरोप पाठवला,मुलाच्या कर्तृत्वाचे पाढे त्यांनी राजूचे वडील शंकरराव यांच्या पुढे वाचले.‘असे अनेक प्रकार आपल्या मुलाच्या बाबतीत घडले आहेत यापुढे लक्ष्य ठेवा‘ अशी तंबी राजूच्या वडीलांना मुख्याध्यापकांनी दिली.कुठूनतरी राजूच्या कानावर ही बातमी गेली.त्यानी या रघुवीर मास्तरचा म्हातारा मरतो कि नाही बघ अशी वल्गना वर्गात केली.आणि दुस-या दिवशी रघुवीर पवार यांचे वडील कैलासवासी झाले.
यथावकाश राजूचा दाखला शाळेतून काढून त्याच्या घरी पाठवण्यात आला.राजूचा मोठा भाऊ प्रविण शाळेत गेला त्यांनी मुख्याध्यापकांना भरपूर समजावले कुणीही ऐकले नाही.कारण राजूचा अनुभव शाळा, गाव ,मित्र सर्वांनाच आला होता.अनेकांनी हे कार्ट मरत का नाही ?असे जाहीर प्रकटनही केले होते. राजुचे नाव अखेर शाळेतून काढण्यात आले.या प्रकारामुळे राजुचा भाऊ खूप संतापला.त्यांनी घरामध्ये राजुला बेदम बदडले.राजूमुळे सर्वांना मनस्ताप सहन कारावा लागला होता याची चिड मारा्तांन त्याच्या मनात होती.मार खाऊन सुजलेला राजू कोप-यातून हळूच बोलला ‘दादा मला मारतोस तुझा पण बाप मरेल. झालं.....सत्यानाश...राजूच्या या वाक्याने प्रविणच्या हातातली काठी खाली पडली.राजूचे बाबा शंकरराव धाडकन खुर्चीत बसले.आईने थेट हुंदकाच दिला.आणि घरात सर्वत्र नीरव शांतता पसरली.आपले बाबा मरणार या कल्पनेने प्रविणला वाईट वाटले.आपण जाणार या भावनेतून शंकरराव खुर्चीत विमनस्क बसले होते.रात्री घरी कोणीही जेवले नाही.पाण्याचा थेंबही पोटात गेला नाही.राजूची आत्तापर्यंतची भविष्यवाणी खरी ठरली होती.त्यामुळे सर्व कुटुंब चिंतेत होते.शंकरराव सारखे आपल्या छातीला हात लावून स्वत:ला तपासून पाहात होते.पंखा पडून मरायला होईल या भितीने ते पंख्यापासून दूर जाऊन बसले.रात्रीच दोन वाजले तरी शंकररावांना झोप नाही.घरात मोठा लाईट लावून ठेवलेला होता. छातीत धडधड सुरु होती.
पहाटे पहाटे राजूचे बाबा शंकरराव यांना डोळा लागला.
तेवढ्यात राजूची आई त्यांना उठवू लागली.
‘ अहो उठा, झोपलात काय ? शेजारचे गणपतराव मेले.
............
सुनिल पाटकर

पश्चिम महाराष्ट्राचे प्रेमगीत

उसाच्या कांड्यांनी रट्टे खाताना,
भुईमुगानं हात द्यावा ,
तशी आलीस आयुष्यात तू ,
आंतरपीक होवून .

मोर्चात माझ्या शर्टाला बिल्ला लावताना,
जेव्हा म्हणालीस की
अगदी शेट्टी सायबासारखं बोलता की ओ ,
तेव्हाच ओळखलं मी .
म्हटलं ,
मळ्याला मालकीण गावली .
एकदाची .

पण आता बांधावर उभारून किती दिवस बघायची वाट ?
झुगारून दे ही जुलमाची झोनबंदी ,

माव्या सारखा पसरलाय विरह.
शिवारभर .
तुझ्या ओठातून
पिवू दे मला एन्डोसल्फान ,
तुझ्या श्वासाची भुकटी भुरभूरु दे माझ्या गात्रा गात्रावर
फॉलीडॉल होवून.
होवून जावू दे
उभ्या देहाची
साखर.

आक्रसलेल्या क्रोशाची चित्तरकथा

तसे अधून-मधून मला सर्जनशीलतेचे झटके येत असतात. कधी त्यांची परिणिती काव्य-लेख-निबंधांत होते तर कधी एखादी 'अनवट' कलाकृती आकार घेते! येथे 'अनवट' शब्दाचा अर्थ 'जरा हट के' असा आहे हे सुज्ञांनी समजून घ्यावे. चांगल्या मशागत केलेल्या जमिनीत ज्या जोमाने तण उगवते त्याहीपेक्षा अधिक जोमाने माझ्या सुपीक डोक्यातून अनेक हरहुन्नरी विचारांचे पीक निघत असते. मग त्यासाठी एखादीच ठिणगी पुरेशीअसते.... भुस्सदिशी विचारांचा जाळ उमटतो आणि त्याचे पर्यवसान अनोख्या 'कला(? )कृती'मध्ये होते!!

अशीच परवा टी. व्ही. चॅनल्समधून दमछाक होईस्तोपर्यंत येरझारा घालताना माझी नजर एका चॅनलवर थबकली. एक देखणी, सालंकृत ललना तिथे प्रेक्षकांना तिने बनवलेल्या क्रोशाच्या पिशव्या, पर्सेस, रुमाल वगैरे मोठ्या अभिमानाने व उत्साहाने दाखवत होती. झाले! ठिणगी पडली!! मला फार पूर्वी मी बनवलेल्या क्रोशाच्या वस्तूंची आठवण झाली. घाईघाईने मी कपाटे हुडकायला सुरुवात केली.

बऱ्याच खटपटी-लटपटींनंतर लक्षात आले की आपण त्यांतील बऱ्याच वस्तू कोणाकोणाच्या हातांत कोंबल्या आहेत..... व त्यांच्या प्रतिक्रियेसाठी क्षणभरही प्रतीक्षा न करता तिथून काढता पाय घेतला आहे!!! पण अशा बेइमान स्मृतींनी नाउमेद होणे आमच्या रक्तात नाही बरे! म्हणूनच, कपाटातील कपड्यांच्या अक्षम्य उलथापालथीनंतर जेव्हा मम हाती एवढे दिवस तोंड लपवून बसलेली क्रोशाची सुई लागली तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला! 'हेच ते हेच ते हेच ते चरण अनंताचे' अशा गाण्याच्या लकेरी घेत मी एका कोपऱ्यातील प्लॅस्टिकच्या पिशवीतील दुर्लक्षित लोकरीच्या गुंड्यांकडे माझा मोर्चा वळवला. येथे मी विनम्रपणे नमूद करू इच्छिते की माझ्या एका मावसबहिणीचा लोकरी कपडे विणण्याचा व्यवसाय असल्यामुळे तिच्या कृपेने आमच्या घरी कधीच लोकरीचा तुटवडा भासत नाही. तिच्या कपडे विणून उरलेल्या लोकरीला खासा न्याय देण्याचे धार्ष्ट्य मी वेळोवेळी माझ्या 'अनवट कलाकृती'च्या माध्यमातून समस्त जगताला दाखवून देत असते.

असो. तर आता लोकरही सापडली होती, आणि क्रोशाची सुईदेखील! माझ्यासारख्या अट्टल कलावंताला दुसरे काय लागते! तत्काळ माझ्या कोमल, कुशल हस्तांनी टाके विणायला सुरुवात केली. औदार्याचा जन्मजात वस्तुपाठ मिळाल्याने आपण विणताना टाके मोजावेत, आकार ठरवावा असे माझ्यासारख्या मनस्वी कलावंताला शोभून दिसत नाही. मग कितीही टाके गळाले, उसवले, आक्रसले किंवा ढिले पडले तरी बेहत्तर.... आम्ही आमच्या कलेशी कोणतीही तडजोड करीत नाही! लोकरीचा एक गुंडा संपला तर दुसऱ्या रंगाचा गुंडा घ्यायचा.... अगदी विणीच्या एका ओळीच्या मधोमध देखील! पारंपारिक, संकुचित दृष्टीच्या पल्याड जाऊन धाडस दाखवणाऱ्यालाच खरी कला उमगते असे म्हणतात. कदाचित म्हणूनच मी क्रोशाच्या बारीकशा सुईच्या माध्यमातून माझी बेदरकार, धाडसी वृत्ती जगाला दाखवून देत असावे!

तर, अशा वर्णनातून वाचकांना जो अर्थबोध व्हायचा तो एव्हाना झाला असेलच... हिरव्यागार, पोपटी रंगाचे दोन मोठे लोकरी गुंडे माझ्यासमोर आ वासून पडले होते.... त्यांच्या डोळ्यांत भरणाऱ्या (की खुपणाऱ्या? ) रंगरूपाकडे दुर्लक्ष करीत मी दात-ओठ खाऊन त्यांच्या मूक आव्हानाला प्रतिसाद देत होते. टाक्यांमागून टाके, ओळींमागून ओळी, विणलेल्या खांबांमधून लपंडाव खेळताना मी जणू देह-काळाचे भानच विसरले होते. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसत होता तशी मला फक्त पोपटी लोकर दिसत होती. झरझर धावणाऱ्या हातांमधून एक गोजिरा आकृतिबंध जन्म घेत होता. येणारे-जाणारे माझी ही (अ)घोर तपश्चर्या पाहून (बहुधा) कौतुकाने तोंडातून 'च च' असले काहीसे उद्गार काढून मला प्रोत्साहन (की सांत्वना? ) देत होते. वडिलांना वाटले की मी त्यांच्यासाठी खास थंडीच्या मुहूर्तांवर मफलर विणत आहे! तसे त्यांनी बोलूनही दाखवले. परंतु अहोरात्र माझ्या लोकरी कलाकृतीच्या आराधनेत (शब्दशः) गुंतलेल्या मला त्यांचे शब्द जाणवले तरच नवल!

असेच विणकाम-तपश्चर्येत तीन दिवस गेले. बाकीचे जग आपापल्या दिनक्रमांत गुंग होते.... पण माझ्या तारवटलेल्या डोळ्यांना एकच लोकरी स्वप्न दिसत होते. बघता बघता अर्धा हात लांबीचा, सुबक विणीचा एक देखणा चौकोन तयार झाला होता. वडील अधून-मधून त्याच्याकडे अनिमिष दृष्टीने पाहत 'वा! छान! ' असले काहीसे उद्गार काढत. पण मला त्यांमागील मर्म उमगत नव्हते. त्या चौकोनातून मस्त पर्स साकारेल अशा दिवास्वप्नांत मी गढले होते.

लोकरीचे गुंडे संपत आले तसे माझे विणकामही संपुष्टात आले. विणलेला चौकोन तीन बाजूंनी शिवून घेतला. त्याच्या कडांना दोन सुंदर गोफ विणून अडकावले... पण माझी पर्स अचानक झोळीप्रमाणे मध्यावर खचू लागली... आ वासलेले तिचे तोंड मिटता मिटेना! गोफांचे ठिकाण बदलून पाहिले, परंतु एकदा रुसलेली पर्स माझ्या मनातला आकार घेईना.... मी अशीच खटपटत असताना पिताश्रींची नजर माझ्या हातातील केविलवाण्या दिसणाऱ्या आकारावर पडली. "हे काय?!! तू मफलर नाही बनवलास? " त्यांचा प्रश्न आत्ता कोठे माझ्या ध्यानात येत होता. मीही मग ओशाळे हसत "अहो, लोकरच संपली! " अशी सारवासारव केली. अखेर माझ्या सर्व प्रयत्नांना त्या आडमुठ्या पर्सने दाद न दिल्याने मीही तिला रागारागाने तिचे गोफांचे अलंकार काढून विणकामाच्या पिशवीत पुन्हा ढकलून दिले.

रात्री त्या फसलेल्या पर्सच्या विचारांनी डोळ्याला डोळा लागत नव्हता. काय योजिले होते आणि काय घडले! केवढी ही घोर फसवणूक!! मनाची समजूत घालूनही मन जुमानत नव्हते. ती पोपटी लोकर माझ्या मिटल्या पांपण्यांआडून मला वाकुल्या दाखवीत होती. क्रूर! निष्ठुर!! तिला आता चांगलाच धडा शिकवावा हा विचार मनास चाटून गेला आणि मी अंथरुणावरच ताडकन उठून बसले. वडिलांना जोरात हाक मारली. ते बिचारे झोपायच्या तयारीतच होते. ते 'काय गं? ' असे विचारत आले मात्र, आणि मी जादूगाराच्या पोतडीतून काढावी तशी ती अडेलतट्टू पोपटी बिनबंदाची पर्स पिशवीतून काढून त्यांच्यासमोर धरली. त्यांनी माझ्याकडे बुचकळलेल्या नजरेने पाहिले. तो शिवलेला चौकोन मी त्यांच्या हातांत कोंबला व मोठ्या ऐटीत उद्गारले, "बघा बरं, डोक्याला बसते आहे का ही टोपी... " त्यांनीही लगेच ती नक्षीदार, जाळीदार 'टोपी' डोक्यावर चढवली. अगदी फिट्ट बसली. कानही झाकले जात होते. वा! जणू त्यांच्या डोक्याच्या मापानेच ही टोपी विणल्यासारखे वाटत होते. माझा त्या पर्सवरचा सूड पूर्ण झाला होता!!! "बाबा, राहू देत तुम्हालाच ही टोपी.... मी तुम्हाला मफलर विणेपर्यंत नक्की कामी येईल... हां,बाहेर घालता नाही येणार तिच्या पोपटी रंगामुळे, पण घरी घालायला काही हरकत नाही."

वडील नव्या लोकरी टोपीला मस्तकावर चढवून पुन्हा झोपायला निघून गेले आणि पर्सच्या आक्रसलेल्या त्या नव्या रूपात क्रोशाच्या पुढील कलाकृतीची मधुर स्वप्ने पाहत मीही निद्रादेवीस शरणाधीन झाले!

-- अरुंधती

(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित)

Syndicate content
Scroll to Top