टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
पाकक्रिया
आजची खमंग पाककृती: व्यक्तिचित्रे
प्रेषक सर्किट ( मंगळ, ०८/०५/२००८ - ०८:५५) .आमची प्रेरणास्थाने:
वैविध्यपूर्ण लिहा : आणीबाणीचा शासनकर्ता
भाजणीचे पीठ हे विविध डाळींचे एकत्र दळलेले दळण असते : कमलाबाई ओगले
बरं का मंडळी, आज आम्ही आपल्याला खमंग व्यक्तिचित्रे कशी बनवावीत ते सांगणार आहोत. (आज फक्त पाककृती देतो, हिचे प्रात्यक्षिक पुढल्या एखाद्या लेखात येईलच;-)
व्यक्तिचित्रे ही प्रतिसादांचे बाहुल्य वाढवण्याची सर्वात सोपी पाककृती. येथील सदस्य क्रमांक ८०० च्या खालच्या सर्वांना व्यक्तिचित्रलेखनातली ही गोम कळलेली आहेच. नव्हे, ज्यांना समजलेली आहे, त्यांनी आपल्या मोलकरणी, मावशा, आत्या, प्राध्यापक, विद्यार्थिनी, ह्या सर्वांची व्यक्तिचित्रे लिहून आपापली खर्जनशीलता दाखवलेली आहेच. आता उरले सदस्य क्रमांक ८०० च्या पुढचे (अडाणी) सदस्य. त्यांना सदर वैविध्य आपल्या लेखनात दाखवता यावे, ह्यासाठी हा लेखनप्रपंच.
तर, खमंग व्यक्तिचित्राची पाककृती अशी:
१. (पहिल्यांदा) एक व्यक्ती निवडावी. हे लिहायला सोपे जाते, पण व्यक्तिचित्राची खमंगता ५०% ह्या व्यक्तीच्या निवडीवरच अवलंबून असते. ही व्यक्ती तुमच्या-आमच्यासारखी सामान्य (किंवा क्षुद्र) नसावी. म्हणजे, ह्या व्यक्तीत काही गुण असावेत, जे हल्ली दिसत नाहीत, ते. आता समजा, तुम्हा-आम्हापैकी कुणाची निवड आपण केली, तर ह्या युगात जगणारे, म्हणजे सामान्यच, म्हणून ह्या व्यक्तीचित्राला फारसा प्रतिसाद लाभणार नाही. तुमची एखादी जुनी आत्या आहे का ? बालपणीचा काळ सुखाचा सारख्या भाजणीत तिचा एखादी डाळ म्हणून समावेश होऊ शकेल का ? नाही ? ते सोडा. तुम्ही एखाद्या चाळीत राहात होतात का ? असल्यास तिथे ह्या आत्या-मावश्यांसारखे स्पेसिमेन्स बरेच सापडतात. असे कुणी तुम्हाला माहिती आहे का ? लहानपणी जरी त्यांचा वाईट्ट राग येत असला, तरी ह्या वयात नक्कीच त्यांच्या काही तरी गुणांवर तुम्ही नक्कीच लिहू शकाल! आजकालच्या तरुण-तरुणींनी ह्या आत्या मावशा पाहिलेल्या नाहीत, हे छातीठोकपणे सांगतो, त्यामुळे त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली ह्या चित्रातून, तरी पुरेसे आहे. (आणि आईची आठवण म्हणजे, काय सांगू महाराजा ? प्रत्येकाकडून एक तरी प्रतिसाद नक्की! तुमचा लौकिक संवेदनशील लेखक म्हणून, किंवा पुलंनतर तुम्हीच म्हणून होणार ! जियो !)
पण तुम्ही चाळीत राहात नव्हता, कुठल्याही आत्या-मावशांशी परिचय नाही ? नो प्रॉब्लेम ! तुम्ही स्वत:ला कुठल्या कलांचे रसिक समजता ? संगीत ? मग कोपऱ्यावरचा कल्हईवाला आपल्या भसाढ्या आवाजात गातोय ना ? अहो, तोच तुमचा व्यक्तिचित्राचा क्याण्डिडेट ! (मात्र, त्याचे व्यक्तिचित्र लिहिताना, त्याला शापित यक्ष, गंधर्व, किंवा अप्सरा म्हणायला विसरू नका.) तुम्हाला चित्रांमध्ये गती आहे का ? नाही, गती असणे आवश्यक नाही. मधुबालाचे चित्र क्रेयॉन ने ट्रेस केले आहे ना तुम्ही ? मग आहेच की तुम्हाला गती ! आता, पहिले एक काम करा. इतर लोक जेव्हा त्यांची चित्रे प्रकाशित करतात, तेव्हा "भिवया जमल्या नाही", "नाक थोडे तेढे आले आहे" असे प्रतिसाद देत चला. म्हणजे, तुम्हाला चित्रकलेत गती आहे, अशी लोकांची समजूत होईल, आणि मग तुम्ही बाजूच्या फुटपाथवर रांगोळीने चित्र काढणाऱ्या युसुफचे व्यक्तिचित्र चितारण्यास मोकळे !
तुम्हाला हेही जमत नाही ? अरेरे ! मग सर्वात सोपा उपाय ! तुम्ही शाळेत शिकला असालच ! तिथले छड्या मारणारे शिक्षक आताही आठवत असतीलच ! मग कामच संपले. त्यांच्या छड्यांची आठवण "आमचे साने गुरुजी" ह्या नावाने लिहा. सगळ्यांना जाणीव होईल त्यांच्या हरवलेल्या बालपणाची. बालपणीचा काळ, जसा तुमचा छड्या खाऊन सुखाचा गेला, तसाच आज आमच्या मुलांचा का जात नाही, असे अनेक प्रतिसाद येतील. तुमचे व्यक्तिचित्रक म्हणून काम संपले.
असो, तर सांगायचे एवढेच, की पुढे व्यक्तिचित्रणासाठी मदत होईल म्हणून, आजच आपल्या आत्या मावश्या, कोपऱ्यावरचे कल्हईवाले, रांगोळीचे चित्रकार, आणि जुने शिक्षक, ह्यांच्यावर लक्ष ठेवून असा. वेळ काय सांगून येते ?
२. (आपल्याच ग्यासवर) आपल्या व्यक्तिमत्वाशी त्या व्यक्तीची जुळवाजुळव करावी. हे महत्वाचे. कारण मी लिहितो मुक्तके, आणि आत्या करते ओव्या. तिचे नि माझे कसे जमणार ? मी जर अभिजात, तर तीही अभिजातच असायला हवी. मी जर चित्रकार, तर तिनेही किमान रांगोळी तरी काढलेली असायला हवी. मी जर मटण खातो, तर तिलाही मटणाची गोडी लावायला हवी. नाहीतर मग मटण खाताना छायाचित्रे कशी देणार?
३. (चिमूटभर) भाईकाका. हा एकच शब्द लक्षात ठेवा. ह्यांचे पाळण्यातले नाव पुलदेशपांडे. पण हल्ली, हे भाईकाका ह्या नावाने ओळखले जातात. नव्हे, "पुलं" म्हटले की म्हणणारा भोटम ठरतो. त्याचे काय आहे, ह्या लेखकाने अनेक व्यक्तिचित्रे लिहिली असे बऱ्याच लोकांना माहिती आहे. त्यामुळे, हा शब्द आला, की भलेभले नरम होतात. विशेषत:, एकदा तुमच्यामागे "भाईकाकांची शैली" असे कुणी लचांड लावले, की तुम्ही वरच्या पातळीवर पोहोचलात, असे समजा. हे सोपे नाही बरे का मंडळी. ह्यासाठी अनेक वर्षांची तपस्या लागते. काही डॉ. वगैरे लोकांचे प्रतिसाद आवश्यक असतात. परंतु, एकदा हे झाले, की मग मात्र तुम्हाला मरण नाही. हे एकदा झाले, की दुनिया फाट्यावर मारायला तुम्ही मोकळे.
४. (चवीप्रमाणे) छायाचित्रे. व्यक्तिचित्र लिहायचे म्हटले, की मग त्याला "जेन्युईन" बनवण्यासाठी आवश्यक अशी छायाचित्रे आपल्याला मिळवून ठेवणे आवश्यक आहे. हल्ली ही नवीन पीढी छायाचित्रांशिवाय कुठल्याही व्यक्तीचित्रावर विश्वास ठेवण्यास नकार देते. अगदी कुणाच्याही पाठीवर साबण चोळले, तरी ती उघडी पाठ छायाचित्रात दाखवली नाही, तर हे तरुण आजकाल विश्वासच ठेवत नाहीत. हल्लीच्या पीढीला विश्वास ही गोष्ट कशाशी खातात ते माहिती नाही. (असो, त्याविषयी नंतर कधी तरी.)
५. (भरघोस) नर्म विनोद. आपण व्यक्तिचित्रणात जे काही अगम्य अगोचर लिहिलेले आहे, त्यावरचा अविश्वास नाहिसा करणे, ह्यासाठी अधून मधून नर्म विनोद करणे आवश्यक आहे. अन्यथा, हे सर्व सत्यच आहे, आणि गीतेवर एक हात ठेवून आपण दुसऱ्या हातावे टंकन करीत आहोत, असे वाटेल. त्यामुळ अधेमधे नर्म विनोद आलेत, की नव्या लोकांना वाटते, की आपण विनोदी लिहितो आहे, आणि जुन्या लोकांना वाटते की ही भाईकाकांची शैली. दोन्हीकडून टाळ्या पडतात. हे खरे, की खोटे, ते बिंग आपण बिंगच ठेवावे, फोडू नये.
६. (थोडी) गुप्तता. जरी आपण एखाद्या व्यक्तीचे चित्रण करत असलो, तरी त्या व्यक्तीविषयी सर्वच काही उघड करू नये. नाही तर, ही व्यक्ती आपल्यासारखीच सामान्य आहे, असे इतर सामान्य वाचकांना वाटते. आणि मग त्या व्यक्तिचित्रणाचा काय उपयोग ? श्री. भीमराव मेश्राम, ही व्यक्ती दिवसा दगड फोडते, म्हणून त्या व्यक्तीच्या कपाळावरील घर्मबिंदू कळफलकबडव्यांना आवडतात. संध्याकाळी घरी गेल्यावर इंटरनेटवरून बिपाशाची चित्रे बघताना, ह्याच व्यक्तीच्या चेहऱ्यावर येणाऱ्या घर्मबिंदूंविषयी कुणाला सहानुभूती वाटणार ?
७. (उकळताना) आपली एकाग्रता. आपण उगाच कधी कविता, कधी गझला. कधी वैचारिक लेख. कधी तंत्रज्ञानाविषयी. असे लेखन केले, तर व्यक्तिचित्रलेखक म्हणून आपली ख्याती विरणार. व्यक्तिचित्रांव्यतिरीक्त फारतर एखादा दुसरा विषय आपण हाताळायला हवा. दुसरे काहीही नाही. विशेषत: आपण ज्या विभागातली व्यक्तिचित्रे जास्त करून लिहितो, तोच विभाग आपण सांभाळायला हवा. इतर विभागात लेखन करण्यास आपण इतर लेखकांना उद्युक्त करायला हवे. स्वत: मात्र इतर ठिकाणी चोच देखील मारू नये. कारण असे केल्यास आपली प्रतिमा, ही "वैविध्यपूर्ण लेखक" अशी होते. ही भूमिका आपल्या व्यक्तिचित्रकाराला मारक आहे, हे लक्षात ठेवावे. जगात वैविध्यपूर्ण लेखक बरेच आहेत, त्यांना आपण "एक ना धड भाराभार चिंध्या" असे दूषण देऊ शकतो, पण आपली व्यक्तिचित्रकार अशी प्रतिमा ढासळल्यास आपल्या मदतीला हे वैविध्यपूर्ण येड*वे येणार आहेत थोडेच ?
मिसळ
प्रेषक गणा मास्तर ( मंगळ, ०७/१५/२००८ - ०९:५१) .ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो.
जगातली सगळ्यात फंडु मिसळ
प्रेषक सचीन जी ( शुक्र, ०६/१३/२००८ - ०९:५८) .नमस्कार मंडळी,
मी मिपा चा नुकताच सभासद झालो आहे.
नावावरुन आठवलं, जगातली सगळ्यात फंडु मिसळ पुणे - सोलापुर रस्त्यावर भिगवण या गावी मिळते.
ज्योती हॉटेल.
मी केवळ ही मिसळ खाण्यासाठी अनेकदा सोलापुर -पुणे - सोलापुर हा प्रवास कारने केला आहे ( सोपा रेल्वे पर्याय असताना).
मिपाकरांसाठी भिगवण वारी अनिवार्य आहे.
मिपा चा पंखा,
सचीन जी
खाना खजाना
प्रेषक अरुण मनोहर ( मंगळ, ०६/१०/२००८ - ०३:४९) .खाना खजाना
आजकाल टी व्ही वर कुठलीही चॅनेल लावली की हटकून कोणी एक बाबा किंवा बाबी झटपट स्वयंपाकाचे धडे धडाधड देतांना दिसतात. हे सारे पदार्थ सारखे सारखे पाहून काय होते, की आमच्या बीबीला बरेच इन्स्पीरेशन मिळते. तुम्ही म्हणाल, खुषनसीब आहात! वेगवेगळे पदार्थ खायला मिळत असतील!. तुमचा काही गैरसमज होण्याआधीच सांगून टाकतो. चमचमीत पदार्थ तर राहीले दूरच, पण नुसता डाळभात जरी मिळाला तरी खूप अशी स्थिती असते. (मिपावर चमचमीत पाककृतींचे फोटो असतात हे एक बरे आहे!)
टी व्ही वर इतक्या पाककृती दाखवतात, त्यातली नेमकी कोणती करायची ह्याचेच डीसीजन बीबीला घेता येत नाही. बीबीला सल्ला देण्यासाठी बाबा, बेबी सारेच पुढे सरसावतात. आणि मग काय विचारता राव! पार्लमेन्टरी गोंधळ बरा! हे करा, ते करा. ओरडाओरडी. शेवटी करायचे काहीच नाही. चूल आणि सर्वांची पोटे थंडच रहातात. आम्ही सगळे मात्र गरम होतो.
हे असे रोज चालते. एक दिवस विचार केला... नाहीतरी रोज बोलता बोलता आपण कल्पनेतच सारे पदार्थ खात असतो. तर मग बाकायदा बोलीभाषेतील पाककृतींचे धडेच का करू नये? मायबोली मराठी आणि हिन्दी पण एक समृद्ध भाषा आहे. म्हणींचा मोठा साठाच हिंदी मराठीत आहे. हा साठा वापरून मग मी एक खाना खजानाच तयार केला. माझा हा खजाना जर तुम्ही वापरलात, तर मूग गीळून गप्प बसण्याची पाळी तुमच्यावर कधीच येणार नाही. दाने दानेपे लिखा है खानेवाले का नाम ह्या न्यायाने तुमची सारी पोटपूजा यथासांग होईल. चला तर लुटू हा खाना खजाना.
काय आहे, की कुठलेही काम एकट्याने कधी करू नाही. खाना बनवण्याच्या कामात देखील एक चांगली, तरतरीत असीस्टंट हवीच. आता एक तरतरीत चवळीची शेंग अशी असीस्टंट निवडा. रेसीपी चांगली होण्यासाठी तिला आधी हरभर्याच्या झाडावर चढवा. जर जास्त उंचावर गेली, तर Too many cooks spoil the dinner म्हणून काहीतरी निमीत्य काढून तिला कटवा. सांगा, "जा, पी हळद आणि हो गोरी." आता ती परत येण्या आधी आपण काही रेसिपी पाहू या.
आधी मेन डीश. आपण बनवणार आहोत बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. धुतल्या तांदळासारखे चरीत्र असलेले तांदूळ घ्या. पाणी सगळ्यात चांगले म्हणजे इश्वराची करणी आणि नारळात पाणी. एका नारळातील करणी.. ओह.. पाणी काढून तांदळात टाका व खदखदा शिजवा. फ्रीज मधील शिळ्या कढीला ऊत येईपर्यंत उकळा. भाताचे छोटे छोटे गोळे करून हा बोलाचाच भात आणि मोठ्या वाडग्यात बोलाचीच कढी वाढा.
हा भात कमी पडेल असे वाटले तर भरीला करा बिरबलाची खिचडी. बाजारात तुरी आल्या असतील तर भट भटीणीला मारायच्या आधीच त्या घेऊन या. पाव किलो ये मूंग और मसूर की दाल त्यात टाका. दालमे कुछ काला असेल तर फारच छान. बिरबलाची खिचडी रंगी बेरंगी दिसेल आणि रंगाचा बेरंग होणार नाही. खिचडीला फोडणी साठी तेल कमीच लागते. म्हणून प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे पैकी दोन चमचे तेलाची बिनबुडाचे भांडे घेऊन तांदूळ, डाळ वगैरे मिश्रणाला फोडणी करा. काल खालेल्या मिठाला जागून चवीनुसार तेही घाला. शिजत असतांना उथळ पाण्याला खळखळाट फार होतो. तेव्हा अधून मधून जमीनीवर लाथ मारेन तेथून पाणी काढून पाणी घालून वाढवावे. बिरबलाची खिचडी सुर्यचुलीवर आभाळ अभ्राच्छादित असतांना शिजवली तर अप्रतीम बनते. लोक सहसा आवडीने खातात. पण कोणी खळखळ केलीच तर त्याची डाळ शिजू देऊ नका.
आता भाजी करू. एक मधम आकाराचा भ्रमाचा भोपळा घ्या. विळ्या भोपळ्याचे सख्य असल्याने, तो कापण्याच्या भानगडीत न पडता, सरळ तो भ्रमाचा भोपळा फोडा. नंतर तो अर्ध्या हळकुंडाने पिवळा करा. बायकोचे रोजचे सासुच्या डोक्यावर मिरे वाटणे झाले असेल तर ती पेस्ट बाजूला काढून ठेवा. तळण्या करता टेढी उंगलीसे घी निकालकर कढाइत टाका. एक कडू कारले साखरेत घोळा, तुपात तळा, व काप करून ठेवा. मात्र तळतांना सांभाळून! चुकून चारो उंगलीयां घीमे और सर कढाइमे टाकू नका. उगाच कारल्याची चव जाऊन भेजा खायची पाळी येईल. दोन लवंगी मिरची कोल्हापूरची घ्या. त्या चिरतांना आपले नाक वर ठेवा. नाहीतर नाकाला मिरची झोंबेल.
दोन अकलेचे कांदे घ्या. मात्र ते कादे नाकाने सोलायचे बर का! हे काम बायकांनाच चांगले जमते म्हणे. तेव्हा चवळीची शेंग असीस्टंट असली तर उत्तम, नाहीतर तुम्हालाच करावे लागेल. कांद्याचे काप करून ठेवा. सध्या जालावर खसखशीचे पीक फार आले आहे. त्याचीच फोडणी करा. फोडणी साठी थोडे वड्याचे तेल वांग्यावर टाकून घ्या. चवदार लागते. ही भाजी रटारटा शिजल्यावर चवीनुसार नावडतीचे मीठ अळणी टाका. ही झाली भ्रमाच्या भोपळ्याची भाजी तय्यार.
आता बनवू आंधळी कोशींबीर. हा पदार्थ करण्याच्या आदल्या रात्री रात्रभर जागून टीव्ही सिरीयल पाहून झोपेचे खोबरे करा व एका वाटीत काढून ठेवा. दोन मोठी गाजरे घ्या. त्यांची गाजराची पुंगी करा. ती वाजवण्याच्या भानगडीत न पडता, नुसती हाताने मोडा. नंतर लॅरी कींग स्टाईलने त्यांचा पूर्ण कीस काढा. रात्रीचे झोपेचे खोबरे त्यात मिसळा. एक कच्चे लिंबू घेऊन त्याचा रस डोळे बंद करून ह्या मिश्रणात टाकला की झाली आंधळी कोशींबीर.
आता एक नॉन व्हेज पदार्थ करून पाहूया. घरचीच सोने की अंडे देनेवाली मुर्गी घ्या. तिची सारी अंडी पिल्ली बाहेर पडण्याच्या आतच तिला सोडून द्या. कारण घरची मुर्गी दाल बराबर. म्हणून "जादा आवाज किया तर डाल दुंगा" म्हणणार्या भाईकडे जाऊन डाल घेऊन या. पण जपून. नाहीतर तो तुमचेच नॉन व्हेज बनवेल.
तसे तर आणखीन बरेच पदार्थ आहेत. पुणेकर करतात ती स्पेशालीटी, म्हणजे पचका वडा. झालेच तर मारक्या आयांच्या आवडीचे पाठीचे धिरडे. ते राहूच दे. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये.
जाता जाता एक सल्ला देतो. तापल्या तव्यावर पोळ्या भाजून घ्या. भाजतांना, बॉस साठी राखून ठेवलेले लोणी लावायचे. म्हणजे तुमची पोळी पिकेल.
डिझर्ट करायचे असेल तर, शिंक्यातली फळे खाली पाडा. मग पडत्या फळांची आज्ञा घेऊन त्यांचे छोटे तुकडे कापून एका बाऊल मधे ठेवा. थोडि कोल्ह्याची द्राक्षे आंबट त्यात टाका. ह्या सगळ्या अजब पाककृती पाहून मंडळी अवाक झाली असतीलच. तेव्हा खूप बडबड करून Ice break करा आणि फळांवर पसरा. फळे जरी नाही झाली थंड तरी मंडळी नक्कीच थंड होतील.
असे हे जेवण तर मस्तच झाले. आता हे सर्व ताटात पडले काय अन वाटीत पडले काय, काहीच फरक पडत नाही. एक लक्षात ठेवा. हे सारे खातांना pinch of salt बरोबर खायचे. हो, आणि दाखवायचे वेगळे दात न वापरता, खायचे वेगळे दात वापरा. नाही तर खाई त्याला खवखवे. जेवणा नंतर मुखशुद्धीसाठी भाई कडची सुपारी वापरू नका. उगाच दुधात मिठाचा खडा पडायचा.
खवय्यांनो, हा खाना खजाना खाऊन तुमचे पोट भरले नसेल दात कोरून पोट भरण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही ह्याची खात्री आहे. मिसळपाव वर चमचमीत भंडार उघडले आहे. तिथे जा. भरपेट आस्वाद घ्या!
पुर्वप्रकाशीत, पण नंतर संपादीत.
**********************
पृथ्वी वरच्या पाककृती
प्रेषक अरुण मनोहर ( मंगळ, ०६/०३/२००८ - ०७:२३) .पृथ्वी वृत्त -- तंत्र
जनास समरा जनास समरा यमाचा ल ग
१७ अक्षरे, ८ यती.
वृत्त जुळवण्या साठी ह्रस्व दिर्घाला काही ठीकाणी नजरेआड केले आहे, तरी भासासुद्दी वाल्यांनी क्श्मा करावी.
पृथ्वी वरील पाककृती
श्रीखंड-
मलाइ भरले.............दही तलम.............कापडी टांगुनी
निथाळुनि जळा.........समग्र गठडी............पुरी दाबुनी
पराति शर्करा............चक्का मिसळुनी.......अहा फेटले
इलायचि.................सुगंध घालुनि..........श्रिखंड हे वाटले
भजी
पिठात चिरले............कांदे मिसळुनी.........जळा ओतले
चवीस मिठ मीरची......मिळुनि घोळ...........फेटीयले
कढाइत भरूनि..........तेल अन आचत्या......लावुनी
भज्यास तळले..........गर्मागरम...............काढले बाहरी
गुलाबजामून (मधप्रदेशात "मावाबाटी")
दुधास अटवू...............खवा करुनि त्या..........मळावा पुरा
करोनि तवगोलकांस.......तळणी....................तळावा बरा
मधूर रसि.................डूबवूनि...................सम गोलकांना अरे
गुलाब जमना.............त्वरीत चखुनी.............जरा पाहिरे
मेथी पापडनु शाक
प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, ०५/२०/२००८ - ०९:३८) .मेथी पापडनु शाक
साहित्य : मेथीचे दाणे ५ टी स्पून ,किंचीत आंबट दही १ वाटी , पाणी अर्धा वाटी , कच्चे पापड ५, आवडत असल्यास टोमॆटो २ , मोहोरी , हळद एक चमचा , मीठ , तीखट , तूप/ तेल फ़ोडणी साठी
साधरण एक तास अगोदर मेथीचे दाणे भिजत ठेवावे,दही घोटुन घ्यावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात फ़ोडणीसाठी तूप/तेल(२/३ चमचे) तापवत ठेवावे.चांगले तापले की त्यात मोहोरी टाकावी , ही फ़ोडणी झाली की त्याच भांड्यात घोटलेले दही. थोडे पातळ करण्यासाठी त्यात थोडे पाणी टाकावे.
त्यात भिजवलेले मेथीचे दाणे टाकावे हळद , तिखट चवीपुरते घालावे. तीखट मीठ जरा कमीच टाकावे ( पापडात तीखट, खार/मीठ असते त्यामुळे)आवडत असल्यास टोमॆटो तुकडे करुन टाकावे व मेथीचे दाणे मऊ होई पर्यंत शिजु द्यावे.
चांगली उकळी आल्यावर एका पापडाचे चार तुकडे असे ५ पापड (कच्चे) तुकडे करुन टाकावे. पापड टाकल्यानंतर गॆस बंद करावा फ़ार उकळत ठेवु नये. ( अन्यथा पापडाचे तुकडे गोळा होतात).
वाढताना थोडे गरम करुन पसरट वाटीत वाढावे.
सूचना : यात कितीही इच्छा झाली तरी साखर गूळ वापरु नये./
: आळस म्हणुन पापड आख्खा टाकु नये.
साबुदाणा, रविवारची दूपार आणि मी
प्रेषक ऋषिकेश ( रवी, ०५/१८/२००८ - १८:०९) .आई बाबा पुण्याला गेले होते तेव्हाची ही गोष्ट! घरावर मी आणि माझा धाकटा भाऊ दोघांचच राज्य होतं. भावाने चतुराईने टिव्हीच्या रिमोटवरचं वर्चस्व अबाधित ठेवलं होतं. अगदी बाथरूमला जातानाही रिमोट बरोबर घेऊन जात होता म्हणा ना! त्यामुळे चालु कार्यक्रम आवडता असुनही, त्याने लावलेला कार्यक्रम कसा बघणार, असा प्रश्न इगोचा असल्याने मी टिव्ही बघु शकत नव्हतो. माझे मित्र (ज्यांबरोबर फिरताना रविवार कमी पडत असे) आता एकच मिळणार्या रविवारी झोपलो नाहि तर ऑफिसात लागलेली सवय मोडेल या कारणाने दुपारच्या झोपा काढत होते. शेजारच्या बांधकामावरचे मजूरही रविवार असल्याने शांतपणे विडीचे झुरके मारत मातीच्या ढिगार्यावर बसले होते. समोरच्या पटेलांची क्रिमा... हे गुज्जु नावं कुठुन शोघतात हा एक प्रश्नच आहे. माझा एक मित्र त्याच्या मुलीचं नाम स्म्लेषा ठेवणार होता. त्याचा अर्थ नाकातील प्रवाही पदार्थ आहे हे सांगितलं आणि मोठ्या कष्टाने त्याने हा बेत बदलला. पण ही क्रीमा आहे बरीक खास हं .. असो तर ही तासनतास खिडकीत घुटमळणारी क्रीमादेखील आज खिडकित येऊन आपले केस वाळवून आत लुप्त देखील झाली होती. अगदी लक्ष्मीदेखील लेकीला चित्रकला 'कॉन्टेस्टला' घेऊन जायचय म्हणून शिल्लक असलेली दोनचार भांडिच घासून पसार झाली होती. थोडक्यात माझ्या भोवतीची सारी स्थिरचर सृष्टी आत्मानंदात तल्लीन होती आणि मी मात्र एका रविवारची दुपार घालवावी कशी या वंचनेत होतो.
आता म्हणाला हा काहि प्रश्न आहे का? मस्त ताणून द्यावी, नाहीतर वाचन करत पडावं, नाहितर गाणी ऐकावीत किंवा जालावर येऊन काहितर खरडावं.. पण का कोण जाणे त्या दुपारी मला यापैकी काहि काहि करावसं वाटेना.. अगदी भावाशी भांडावसं देखील!.. मग एकदम माझ्या डोक्यात किडा वळवळला. चला काहितरी खायला करू या!
झालं! भावाला म्हटलं चलरे आपण मस्तपैकी काहितरी बनवुया खायला. भावाने एक असा काहि लुक दिला की तुला जे काहि करायचय ते कर, मला ते खायला लाऊ नकोस असं तो बजावतोय हे न बोलताही मला स्पष्ट ऐकु आलं. त्याला मस्का मारण्यात अर्थ नव्हता.
आता माझ्यापुढे प्रश्न होता करायचं काय? म्हणजे मला बरेच पदार्थ येतात आणि त्यातला कोणता बरं करावा अशातला भाग आहे असं समजु नका हं! (आता तुमच्यापैकी कोणाचाही असा समज नाहि आहे हे खरं असलं तरी लोक आपल्याला आहोत त्यापेक्षाही ग्रेट समजताहेत असं माणसाला उगाचच वाटत असतां नाहि!?) माझा प्रश्न होता घरात असलेला कच्चा माल आणि माझं पाककौशल्य यांच्या लसावितून काय बनवता येईल असा सारसार विचार करत होतो.
मी काय करू शकतो याची यादी तशी अगदिच काहि लहान नाहि. चहा नामक भारतीयाची प्राथमिक गरज मी अगदी लीलया पूर्ण करू शकतो. त्याच बरोबर कॉफी, हॉट चॉकलेट, आईस टी आदी पेयेदेखील मी बनवूनही लोक पिऊ शकतात. खाद्यपदार्थांत सँडविच, ऑमलेट अश्या सोप्य सोप्या पदार्थांपसून ते पोहे, उपमा असे कॉप्लेक्स आणि पावभाजी नामक अतिकॉप्लेक्स पदार्थ बनवता येण्याचा दावा मी करतो. पण दुपारचे चहाबरोबरचे खाणे यासाठी यापैकी काहिच फिट बसेना. भावाला विचारल्यावर उपकार केल्याच्या थाटात "तु ना, दाण्याच्या कुटात साखर घालून खा! तुला हा पदार्थ नक्की जमेल!" अशी अगदी सदाशिवपेठी कमेंट मारून हा हा हा करून हसून घेण्याशिवाय त्याने काहि केलं नाहि. काहिच सुचेना तेव्हा मी नाईलाजाने घरात काहि रेडीमेड आहे का ते शोधायला लागलो. एका डब्यात तळाला थोडासा साबुदाण्याचा चिवडा होता. दोन घासांत संपला देखील. तोंड मात्र चाळवलं!
"घरात आहे का रे चिवडा अजून", भावाला विचारलं
"कसला?"
"साबुदाण्याचा, या पिवळ्या झाकणाच्या डब्यातला संपवला मी आताच"
"तेवढाच होता!"
"अरे! हा चिवडा करुया!" माझ्या मनाने नक्की केलं. या विचारासरशी काहितरी नवं करायच्या आनंदात मी अगदी स्टाईल मधे साबुदाणा काढायला सुरुवात केली. पण एकदम जाणंवलं की साबुदाणा खिचडी करता येत असली तरी चिवडा कसा करतात कोणास ठाऊक होतं. भावाला केवळ प्राथमिक गरज पूर्ण करता येते. बाकी अगदी साधी फोपो देखील करत नाहि तो! मग काय नेट जिंदाबाद!
जालावर रेसिपि वाचली. त्याप्रमाणे एकेक स्टेप करू लागलो. "आता साबुदाणा मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळवा आणि टिपकागदावर पसरावा" असं एका ब्लॉगवर वाचलं. तेल तापवलं आणि साबुदाण्याचा मस्तपैकी एक बचका तेलात टाकला.
झालंऽऽऽ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
ताड-ताड-ताड-ताड साबुदाणा फुटाण्यासारखा उडू लागला. मी डोळे बंद करून घेतले. जरा आवाज कमी झाला आणि बघतो तर काय त्या कढईत फक्त दोनचार साबुदाणे माझ्याकडे दात विचकून हसत पडले होते. बाकी सार्यांनी जमिनीवर उड्या मारल्या होत्या. त्या आवाजाने भाऊ घाबरून आत आला. ओट्याचा अवतार बघून "आईला येऊ दे, मग बघ.. आणि बंद कर हे नाटक तुला नाहि जमायचं" अशी धमकी देऊ लागला. त्याला गप्प करणं ही काळजी मला नव्हती. कारण त्याच्या धक्क्याने फुटलेल्या ६ बश्या मांजरीने फोडल्या अशी घोषणा करेन या तहाद्वारे त्याला गप्प करता आलं असतं. पण आता त्याने डिवचल्यावर त्याच्या नाकावर टिच्चुन चिवडा करणं हे क्रमप्राप्त होतं!
मी पुन्हा सरसावलो. यावेळी साबुदाणा तेलात घालताच एक झाकण त्यावर ठेवलं! काहि क्षणातच आवाज बंद झाला. झाकण उघडून पाहतो तर काय काळेठिक्कर पसलेले साबुदाणे दुप्पट जोराने माझ्याकडे बघून खिदळत होते. आता मात्र हद्द होती. झाकण ठेवावं तर जळणार आणि झाकण काढावं तर उडणार अशी पंचाईत झाली होती. त्यात भावाची भोचक नजर टोचत होती. त्याचं ते मनातल्या मनात खिदळणं समजून अजून चेव येत होता. आता साबुदाण्याचा चिवडा करून खाणं हा प्रेस्टीज इशु बनला होता.
आता मात्र हार मानायची नाहि हे नक्की झालं. डोकं वार्याच्या वेगात कल्पना लढवू लागलं. एकामागून एक निष्फळ विचार येत होते. शेवटी एकदाची डोक्यात वीज चमकली. कपाट उघडलं आणि त्यातून एक जूना गॉगल बाहेर काढला.
आता मी साबुदाणा तळात होतो. सगळं स्वयंपाकघर आणि माझी रविवारची दूपार साबुदाणामय झाली होती. तरीही मी साबुदाणा तळला.. डोळ्यावर गॉगल लाऊन!!! .. असा कीचनमधे मनसोक्त बागडत केलेला चिवडा मस्त झाला हे वेगळे सांगणे नलगे!
-ऋषिकेश दाभोळकर
शाकाहार :- काही नवीन पैलु
प्रेषक मन ( शनी, ०५/१०/२००८ - ०५:२५) .मित्रहो,
जीवाची हत्या करणे वाइट,म्हणुन मांसाहार वाइट आणी म्हणुनच तो अयोग्य.शाकाहार तेव्हढा चांगला.
ह्यातील माझं काहीही म्हणणं नाही.
मी मानवी शरीर,प्रकृती ह्यासाठी स्वाभावीक अन्न कुठलं आहे, ते शोधतोय.
मुळात, बहुतांश सर्व सस्तन प्राणी आणी पक्षी ह्यांचे प्रामुख्याने शाकाहारी आणि मांसाहारी असे वर्गीकरण करता येते.
जे प्रामुख्याने वनस्पती खातात, ते शाकाहारी.
जे प्रामुख्याने इतर वनस्पतींशिवाय इतर सजीव(प्राणी,पक्षी )भक्ष्य म्हणुन खातात(स्वजातीतील् सुद्धा) ते मांसाहारी.
माझे काही तर्क, निरिक्षण आणि वाचनातील् काही भागानुसार मानवी शरीरा बद्दल हे विचारः-
१.एकाच प्रवर्गातील किंवा परीवारातील(स्पेसीज् किंवा फ्यामिली) प्राण्यांचा आहार समान/मिळताजुळता/साम्य असलेला असतो.
जसे घोडा आणि झेब्रा हे एकाच प्रवर्गातील प्राणी.
त्यांच्या शरीरात विलक्षण साम्य आहे.म्हणुन त्यांच्या आहारातही साम्य आहे.
दोघेही हिरवळ चरतात,त्यावर् जगु शकतात.
आता डोळ्यासमोर चित्र आणा की मांजर् उंदीर् पकडते आहे.
दुसरे चित्रः- चित्ता किंवा वाघ ससा पकडत आहेत.
काही साम्य दिसलं? दुसर्या चित्रात उंदीर(भक्ष्य) मोठा झाला आणि बनला ससा
तसेच भक्षक ही मोठा झाला आणि मनी मावशी चा बनला वाघोबा.
बरोबर? कारण हे दिसत की वाघ/चित्ता आणि मनी माउ हे एकाच म्हणजे मार्जार प्रवर्गातील असल्याने त्यांच्या
आहारात हे साम्य आहे.
अगदि त्याच प्रमाणे माणुस हा "ग्रेटर एप्स" ह्या प्रवर्गात मोडतो.(प्रवर्ग नामातील् चु.भु.द्या.घ्या. बायो लॉजी सोडुन काही युगे उलटली आहेत. )
त्यांतील प्राणी कोण? तर् ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे.
ह्यांचे मुख्य अन्न ते काय? तर् काही प्रमाणात् झाडपाला आणि उरवरीत फळे, काही प्रमाणात धान्य कण सुद्धा.
ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा?
२.मांसाहारी प्राण्यांची शरीर रचना वैशिष्ट्य म्हणजे अति तीक्ष्ण दात जबड्याच्या समोरील भागात् असतात.(थोडेफार् ड्रॅक्युलासारखेच,भयावह) उदाहरणः- कुत्रा,वाघ,लांडगा.
येथे, अन्न तोडणे हे मुख्य उद्दिष्ट् आहे, चर्वण नव्हे.
याउलट,शाकाहारी प्राण्यांकडे सहसा अशा दातांचा अभाव असतो.
त्यांचे दात असतात प्रामुख्याने "चर्वण" करण्यासाठी.जात्याच्या दोन दगडात जसे धान्य रगडले जाते,
त्याच प्रकारे अन्न हे ह्या प्राण्यांच्या रुंद पृष्ठभाग असणार्या दातात "रगडले" जाते.
नेमके असेच दात मानवाला आहेत,ते म्हणजे त्याच्या दाढा.
(जबड्याच्या आकारमानानुसार्, सर्वाधिक भुभागावर् हे दात पसरलेले आहेत.)
ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा?
३.शाकाहारी प्राणी "चावुन" खातो. मांसाहारी प्राणी चावतो कमी,"गिळतो" जास्त.
("अन्न रगडण्याची " पुरेशी व्यवस्था नसल्याने)ह्या चावुन खाण्यादरम्यान, धाकाहारी प्राण्याच्या आहारात पुरेशी "लाळ"
मिसळली जाते.मांसाहारी प्राण्यात ही प्रक्रिया तेव्हढ्या प्रमाणात होत नाही.(जवल् जवळ् नगण्य.)
माणसाच्या लाळेचे अन्नात मिसळण्याशी गुणोत्तर काढले,तर् ते शाकाहारी प्राण्यांच्या अगदी निकट जाते.
४.ऍपेंडिक्स् हे नाव बर्याच लोकांनी(जवळपास् आपण सर्वांनीच) ऐकले असावे.
काय असते हे ऍपेंडिक्स?
तो आहे मानवी शरीरातील एक हल्ली वापर होत नसलेला भाग.
तो हिरव्या वनस्पती खाणार्या प्राण्यात कार्यरत् असतो.
त्याचे कार्य हेच की:- हरित वनस्पतीतील सेल्युलोज चे पचन करुन त्यातुनही उर्जा मिळवणे.
मानवी शरीरात हा भाग् कार्यरत् नसल्याने हरित भाग उर्जेसाठी वापरता येत् नाही आणि मग विष्ठेतुन बाहेर् टाकला जातो.
पण ह्या अवयवाची उपस्थिती हेच सुचित करते की मानवी शरीर तुर्तास शाकाहारास जवळचे आहे.
शाकाहारच ते प्रमुख्याने नीट पचवु शकते.
५.सहज प्रवृत्ती:-
एका (पाश्चात्त्य)विश्लेषकाचे निरिक्षण आहे ते असे........
तुम्ही एका नुकत्याच थोड्याशा मोठ्या झालेल्या वाघाच्या भुकेल्या बछड्यासमोर किंवा मांजरीच्या पिल्लासमोर एक
सफरचंद ठेवा आणि ठेवा एक छोटेसे जिवंत कोंबडीचे पिल्लु.
नैसर्गिक बुद्धिनुसार्, बछडे त्या पिलाला (भक्ष्य म्हणुन) मारुन खाइल, व सफरचंदाशी खेळत बसेल्.
आता तसेच सफरचंद आणि जिवंत कोंबडीचे पिल्लु एका निरागस , भुकेल्या ,(माणसाच्या)बालकाच्या समोर ठेवा.
बालक ते सफरचंद खाउन टाकेल आणि त्या पिलाशी खेळण्यात मग्न होइल.
बछडे सफरचंद् खायचा विचारही करणार् नाही.
बालक त्या पिलाला मारुन मग खाण्याचा विचारही करणार नाही.
ह्याचे कारण?नैसर्गिक वृत्ती,नैसर्गिक जाणीव किंवा उपजत् ज्ञान म्हणा हवं तर.
मग ह्या सगळ्या गोष्टी बर्याचशा हेच सुचवतात की शारिरिक दृष्ट्या मानवाला प्रामुख्याने
शाकाहार हाच सुटेबल् ठरतो.
तूम्हाला काय वाटतं?
वरील निरिक्षण,तर्क् आणि निष्कर्ष योग्य दिशेने जाताहेत, की त्यात कुठे काही विसंगती,तर्क् दोष आहे?
रंगीत मिरच्या - रेसिपी सुचवाल ?
प्रेषक ईश्वरी ( शनी, ०५/१०/२००८ - ०२:५०) .परवाच एका परिचितांनी एक रन्गीत पाकीट दिले...भेट म्हणून. Mixed hot chilli peppers असे त्यावर लिहीले होते. ह्य पाकीटामधे रंगीबेरंगी , जरा जाडसर आणि लांबट आकाराच्या ३५-४० मिरच्या होत्या. लाल , केशरी, पिवळा, हिरवा, पोपटी असे विविध रंग बघून रंगवेड्या माझ्या छोटीला तर त्या लगेच खेळायला हव्या होत्या.
खरच; ह्या मिरच्या चवीने hot असल्या तरी त्यांना cool मिरची म्हणावे असेच सही रंग होते त्यांचे.
काही खाद्य पदार्थ बनवण्यापेक्षा टेबल वर सजवून नुसतेच त्यान्चे रंग न्याहळ्त बसावे असे वाटत होते. पण काहीतरी करायलाच हवे होते. नाहीतर फ्रीज मधे ठेवूनही काही दिवसांनी खराब झाल्या असत्या. परिचितांनी सान्गितले की ते ह्यान्ची भजी करतात आणि ती फारच छान लागतात. मी ही तेच करयचे ठरवले.
आख्ख्या मिरच्या उभी चिर पाडून आत किंचितसे मीठ भरुन भिजवलेल्या डाळीच्या पीठात बुडवून भजी केली. भजी दिसत छान होती आणि चवीला तर अहाहा ! मस्त च लागत होती. (अर्थात मला भजी च्या प्रत्येक घासाबरोबर पाणी प्यावे लागत होते. पण तरीही भजी enjoy केली. ) मला लाल मिरची सर्वात जास्त तिखट वाटली.. हिरवी तळल्यावर बरीच mild वाटली.

ज्याना तिखटजाळ पदार्थांन्ची आवड आहे त्यांना जरुर आवडतील ह्या मिरच्या.
अजून मिरच्या बर्याच शिल्लक आहेत. नवरॅने सुचवले की ग्रील वर भाजून मग लिंबू , मीठ घालून त्याची चटणी कर.
ईथल्या हौशी बल्ल्वाचार्यांना आणि पाककला निपूण सख्यांना अजून काही ह्या मिरच्यांचे पदार्थ सुचतायेत का? काही वेगळा चविष्ट पदार्थ बनवता येइल का?
-- ईश्वरी
प्रॉन्स ग्रीन पुलाव
प्रेषक प्रभाकर पेठकर ( मंगळ, ०५/०६/२००८ - २१:५६) .
साहित्यः
मध्यम आकाराची कोलंबी - ५०० ग्रॅम्स (थोडी मोठी चालेल पण फार लहान नको.)
नारळ - अर्धा
पुदीना -अर्धी मूठ
कोथिंबीर - एक मुठ
हिरव्या मिरच्या - ३ किंवा ४
लसूण - ८-१० पाकळ्या
आलं १"
लिंबू - १
मीठ चवीनुसार.
मोहरी - २ टेबलस्पून.
केळीची कोवळी पाने ४ (शक्यतो कर्दळीच्या पानाच्या आकारा एवढी)
सुवासिक बासमती तांदूळ - २ वाट्या (अंदाजे ४०० ग्रॅम)
वनस्पती तूप - ४-५ टेबलस्पून
काळी मिरी - १०- १२ नग
तेल फोडणीसाठी. (दोन चमचे)
तयारी:
कोलंबी सोलून साफ करून घ्यावी.
नारळ खवून घ्यावा.
पुदीना पाने निवडून, धूवून घ्यावीत.
हिरव्या मिरच्या, कोथिंबीर धूवून, चिरुन घ्यावी.
लसूण सोलून आणि आलं धूवून चिरुन घ्यावे.
बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यात ठेवून, निथळवून घ्यावा.
कृती:
नारळ, पुदीना, कोथिंबीर, मिरच्या, आलं - लसूण, लिंबू , मीठ आणि मोहरी मिक्सरमध्ये वाटून (कमीत कमी पाण्यात) मुलायम चटणी बनवावी.
ह्या चटणीत प्रॉन्स अर्धा तास मुरण्यास ठेवावे.
किंचीत तेलावर काळीमिरी फोडणीस टाकून फुटू द्यावी. त्यावर तांदूळ परतून, मापाने जेवढ्यास तेवढे पाणी घालून, घट्ट झाकण लावून, मंद आंचेवर भात मोकळा शिजवून घ्यावा.
दुसर्या एखाद्या पसरट पातेल्यात केळीची पाने अशी लावावीत की अर्धे पान पातेल्याच्या तळाला अंथरले जाईल आणि पानाचा बाकी अर्धा भाग पातेल्या बाहेर येईल. नंतर त्या पानांवर तळाला चार ठीकाणी आणि मध्यभागी असे ५ चमचे वनस्पती तूप सोडावे. त्यावर नारळाच्या चटणीत मुरवलेली कोलंबी नीट पसरून ठेवावी. कोलंबीवर मोकळा शिजवलेला भात पसरावा. आता, पातेल्याच्य बाहेर आलेला केळीच्या पानाचा भाग भातावर झाकणासारखा पसरवून वरून पातेल्याचे झाकण घट्ट लावावे आणि हा पुलावर मंद आंचेवर अर्धा तास शिजवावा.
अर्ध्या तासाने गॅस बंद करून १० मिनीटे पुलावर मुरू द्यावा.
जेवताना झाकण उघडून (पाहा काय मस्त वास आला नं!) केळीची पाने अलगद काढून टाकावी. हलक्या हाताने प्रॉन्स आणि भात वरखाली करून घ्यावा. आणि गरम गरम वाढावा. खाताना त्यावर शुद्ध साजूक तुपाची मस्त धार सोडावी आणि तुडुंब जेवावे.
खास सुचना: कोलंबी आणि मोहरी दोन्ही उष्ण असल्यामुळे दोन दिवस लागोपाठ खाऊ नये. त्रास होऊ शकतो.
शुभेच्छा....!



