टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
वाङ्मय
अभिनंदन!
प्रेषक प्रमोद देव ( शनी, 10/11/2008 - 20:52) .स्टार माझा ह्या दूरचित्रवाणी वाहीनीतर्फे घेतलेल्या "ब्लॉग माझा" ह्या स्पर्धेत मिपाच्या सदस्यांचा प्रचंड विजय झालेला आहे.
श्रीयुत नंदन होडावडेकर म्हणजेच आपला नंदन.. ह्याच्या ब्लॉगला दुसरे पारितोषिक मिळालेले आहे
तसेच सर्वश्री धोंडोपंत आपटे(धोंडोपंत), संदिप चित्रे आणि प्रा.डॉ. दिलीप बिरुटे अशा तिघांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेले आहे.
ह्या चौघांचे त्रिवार अभिनंदन!
एक पुरवणी सुचना: अभिजित पेंढारकर म्हणजेच मिपावरील आपला अभिजित ह्यालाही ह्याच स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेले आहे. त्याचेही त्रिवार अभिनंदन.
गाणी अंगणातली, गाणी माजघरातली, गाणी तीन सांजेची... (१)
प्रेषक विसोबा खेचर ( शुक्र, 10/10/2008 - 01:14) .मला हे गाणं जसं दिसलं, जसं भावलं, जसं कळलं तसं मी लिहिलं आहे. ते चूक की बरोबर हे मला माहीत नाही! एकतर आपल्याला काव्यातलं फारसं काही कळत नाही मग उगाच खोटं कशाला बोला!
हां, त्याला एकदा सुरांचा साज चढला की माझी थोडीफार मैत्री होते काव्याशी! तीसुद्धा अगदी माझ्यापुरतीच..!
नाविका रे, वारा वाहे रे,
डौलाने हाक जरा आज नाव रे..
हे सांगतांना त्या नविकाबद्दल एक विश्वास आहे. जणू काही तो नाविक कुणी माहेरचाच मनुष्य आहे, ज्याला विश्वासाने काही सांगावं!
डौलाने हाक जरा आज नांव रे..!
मग? मला जायचंय पैलतिरी असलेल्या माझ्या घरी! छान वारा वाहतोय, सुंदर मूड आहे! मनी एखादी आस असली तरी सुंदर मूड तयार होतो, अन् त्या मुडातूनच मनीचं गुज सहजासहजी असं ओठांवर येतं! एखाद्या नाविकासमोर उघड होतं!
मग नाव कशी हाकायला हवी? डौलानेच ना? 
त्यामुळे 'डौलाने हाक जरा आज नांव रे..' ही ओळही तशीच डौलदार वाटते! ज्या डौलाने नाव हाकणं अपेक्षित, तोच डौल त्या ओळीतही! की त्या ओळीतल्या डौलामुळे नाव खरोखरच डौलदारपणे हाकायला हवी हे पटतं? की हेच गाण्याचे शब्द अन् त्याची चाल यांचं अद्वैत?
सांजवेळ झाली आता पैल माझे गाव रे..!
क्य बात है.. ! 'पैल माझे गाव रे..' हे सागताना 'अरे समजून घे रे जरा, तीन सांजा झाल्या अन् पैलतीरी असलेल्या माझ्या गावाला मला लौकर जायचंय रे.. अशी समजावणी! एक आर्जव! आणि कुण्या जवळच्या सुहृद मित्राला सांगावं असा विश्वास..! एका नाविकाचं आणि स्त्री प्रवाश्याचं इतकं सुंदर नातं असू शकतं? धाकल्या दिरासारखं किंवा पाठच्या भावासारखं! क्या बात है..!
आषाढाचे दिसं गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला
माझा राऊ मनामंदी बोलुनि गेला
धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे...!
काय संवाद साधला माझ्या राऊनी माझ्यापाशी? आता तो संवाद त्या नाविकाला सांगायचाय! 'पैल माझे गाव रे..' ह्या आर्जवाने त्याला कधीच आपलासा केलाय! मग आता मनातल्या राऊचे संवाद त्याला सांगायला काय हरकत आहे अशी एक स्वाभाविकता..!
आषाढ गेला, श्रावण गेला अन् आता भादवा आला! भादवा हा शब्द असा गाऊन ठेवलाय की त्या एका शब्दात आषाढ आणि श्रावणाची प्रतिक्षा उभी केली आहे! आषाढ-श्रावणातली ती मौनप्रतिक्षा अखेर झालीच शेवटी प्रकट भादवा या शब्दातून..! 

एक म्हणणं मांडलं आहे 'भादवा' ह्या शब्दातून..!
आणि आता नावेत बसल्यावर अवचित त्या नाविकासमोर आषाढ-श्रावणातला विरह ओठी आला आहे!
भादवाही येऊन उभा राहिला आहे त्यामुळे आता पुढल्या अश्विनातलं शरदाचं चांदणं अन् अश्चिनातल्या पौर्णिमेची आस आता चांगलीच जाणवू लागली आहे! आता नाही धीर धरवत..!
नेमकं हेच जाणवतं का हो 'धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे...!' या ओळीतनं? 
असो, एक हृदयाला हात घालणारं गाणं! एखाद्या सर्जनशील, संवेदनशील चित्रकराला हे गाणं नुसत ऐकून हातात कुंचला घ्यावासा वाटेल आणि त्याच्या कॅन्व्हासवर डौलाने जाणारी ती छानशी शिडाची होडी उतरेल, मंद वारा वाहणारी ती सांजवेळ उतरेल.. त्या चित्रात पार्श्वरंग असतील भादवा आला ह्या म्हणण्याचे आणि असेल एक ओढ लगोलग येऊ घातलेल्या अश्विनातली...!
-- तात्या अभ्यंकर.
लेबल : तात्या अभ्यंकरांचे काही ऍब्स्ट्रॅक्ट विचार...!
पुढलं गाणं : शब्द शब्द जपून ठेव, बकुळिच्या फुलापरी...!
(अर्थात, मूड लागल्यास अन् सवड झाल्यास..!) 
मराठी पुस्तकाचं प्रकाशन
प्रेषक बी टी गॉडवीट ( बुध, 10/01/2008 - 16:58) .मी छंद म्हणून लघुकथा लिहितो. यातील काही वेगवेगळ्या मासिकांमधून वेळोवेळी प्रसिद्धही झाल्या आहेत. या कथांचे पुस्तक प्रकाशित करण्याची माझी इच्छा आहे. परंतू वेगवेगळ्या लोकांचे मराठी प्रकाशकांबद्दलचे अनुभव ऐकून प्रकाशकांचे दरवाजे ठोठावण्याची माझी इच्छाही नाही आणि माझ्याकडे तेवढा वेळही नाही. दुसरं म्हणजे मी कुणी प्रस्थापित लेखक नाही किंवा माझं पुस्तक कितपत खपेल याची आज काहीच खात्री नाही. त्यामुळे प्रकाशकाच्या दॄष्टिनं ही व्यावसायिक जोखीम आहे. त्यामुळे प्रकाशक यात रस घेणार नाहीत हे सहाजिक आहे. म्हणूनच पुस्तकाचा येणारा उत्पादन खर्च (छपाई वगैरे) उचलण्याची माझी तयारी आहे, म्हणजेच ही जोखीम मी घेण्यास तयार आहे. परंतू याबरोबरच पुस्तकाचं marketing आणि distribution, व्यावसायिक प्रकाशकाच्या मदती शिवाय जवळ जवळ अशक्य आहे. त्यामुळे पुस्तकाचं उत्पादन तुम्ही तुमचं तुम्ही केलंत तरीही पुस्तक दुकानांमधून उपलब्ध करुन देण्यासाठी किंवा वर्तमानपत्रांमधून त्याचं परिक्षण आणवण्यासाठी वगैरे, प्रकाशकांचे पाय पकडण्याशिवाय पर्याय नाही असे दिसते. माझ्या मित्रमंडळींनी दिलेल्या सल्ल्यानुसार प्रकाशक मंडळी हा वर्ग काही फार विश्वास ठेवण्याच्या लायकीचा असतोच असं नाही.
अर्थात सर्वच प्रकाशक असे असतील असं मी म्हणत नाही पण कोण चांगला आणि कोण वाईट हे कसं ठरवणार? हात पोळल्यावरच (किंवा न पोळल्यावर) कळेल. त्यामुळे कुणाला याबाबतीत काही अनुभव असल्यास किंवा कुणी काही सल्ला देऊ शकल्यास मी आभारी होईन.
मम सुखाची ठेव...
प्रेषक विसोबा खेचर ( रवी, 09/28/2008 - 10:27) .किंचित कवी असलेल्या तात्या अभ्यंकरांच्या
या वेड्यावाकड्या ओळी कुसुमाग्रजांच्या चरणी अर्पण...!
ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं!
ती स्वरलता आहे, ती गानसम्राज्ञी आहे, ती मेलडीक्वीन आहे.....!
षड्ज पंचम भावातला सुरेल जुळलेला तानपुरा,
अन् त्यातला नैसर्गिक शुद्ध गंधार..
तो तर तिच्या गळ्यातच आहे...!
नव्हे, तर त्या गंधाराचं तंबोर्यातलं स्वयंभूत्व
हे तिच्या गळ्यानेच सिद्ध केलेलं आहे...!
कोमल अन् शुद्ध रिखभ, हे एरवी एकमेकांचे वैरी,
स्वभावाने अगदी एकदुसर्याच्या विरुद्ध,
परंतु दोघेही तिचेच आहेत...!
तोडीत दिसणारं कोमल गंधाराचं कारुण्य
हे तिनंच दाखवलं आम्हाला...
आणि बागेश्रीतला शृंगारिक कोमल गंधारही
तिनंच शिकवला आम्हाला...!
तिने स्वर लावल्यावर
तीव्र मध्यमातली अद्भुतता दिसली आम्हाला...
आणि शुद्ध मध्यमाचं गारूडही तिनंच घातलं आम्हाला...!
तिच्या पंचमातली अचलता आम्ही अनुभवली...
महासागराच्या ऐन मध्यावर एखाद्या जहाजाला
जसा एक आश्वासक सहारा मिळावा,
तसा सहारा, तसा आधार हा तिचाच पंचम देतो....!
हा पंचम एक आधारस्तंभ स्वर आहे,
आरोही-अवरोही हरकतींचं ते एक अवचित विश्रांतीस्थान आहे,
हे तिनं गायल्यावरच पटतं आम्हाला...!
तिच्याइतका सुरेख, तिच्या इतका गोड
शुद्ध धैवत गाऊच शकत नाही कुणी....
आणि तिच्याइतकं कुणीच दाखवू शकत नाही,
कोमल धैवताचं प्रखरत्व आणि त्याचं समर्पण....!
कोमल निषादाचं ममत्व अन् देवत्व,
तिच्यामुळेच सिद्ध होतं...
आणि तिच्या शुद्ध निषादामुळेच कळली आम्हाला
गाण्यातली मेलडी...!
आणि तिचा तार षड्ज?
गायकी म्हणजे काय, पूर्णत्व म्हणजे काय,
गाण्याचा असर म्हणजे काय,
हे तिथंच कळतं आम्हाला, तिथंच जाणवतं...तिच्या तार षड्जात..!
तिचा तार षड्जच पूर्ण करतो आमच्या
सगुण-निर्गुणाच्या अन् आध्यात्माच्या व्याख्या...
आणि तोच भाग पाडतो आम्हला,
ईश्वरी संकल्पनेवर विश्वास ठेवायला....!

ती गाते आहे, आम्ही ऐकतो आहोत...
सलीलदा, सचिनदा, पंचमदा, मदनमोहन, नौशादमिया
अन् कितीतरी अनेक..
तिच्या गळ्याकरताच केवळ,
पणाला लावतात आपली अलौकिक प्रतिभा...!
अन् तिच्याकडे पाहूनच
खुला करतात बाबुजी
"ज्योती कलश छलके"चा अमृतकुंभ...!
तिचं गाणं हा आमचा अभिमान आहे...
तिचं गाणं हा आमचा अहंकार आहे...
तिचं गाणं ही आमची गरज आहे...
तिचं गाणं ही आमची सवय आहे....
तिचं गाणं हे आमचं व्यसन आहे....
तिचं गाणं हे आमचं औषध आहे...
तिचं गाणं ही आमची विश्रांती आहे...
आणि
तिचं गाणं हेच आमचं सुख-समाधान आहे...
इतकंच म्हणेन की,
अन्न, वस्त्र, निवारा ह्या आमच्या मूलभूत गरजा.
त्यात आता तिच्या गाण्याचीही भर पडली आहे...!
शब्द खूप तोकडे आहेत,
तेव्हा पुरे करतो आता हे शाब्दिक बुडबुडे...
शेवटी एवढंच सांगून थांबतो की तिचं गाणं ही
"मम सुखाची ठेव" आहे!
"मम सुखाची ठेव" आहे!
--(तिचा भक्त, तिचा चाहता, तिचा प्रेमी!) तात्या अभ्यंकर.
बरेच काही उगवून आलेले...[अंतिम भाग]
प्रेषक नंदन ( शुक्र, 09/26/2008 - 21:47) .[प्रस्तावना - या लेखाचा पहिला भाग येथे वाचता येईल. हा (थोडा रुक्ष) भाग, झाडांचा चेतनागुणोक्ती अलंकारात झालेल्या साहित्यातील उपयोगाविषयी आहे, आणि उदाहरणार्थ द.भा. धामणस्कर, रेगे, बोरकर यांच्या काही कविता उद्धृत केल्या आहेत.]
माणसाचं किंवा मानवी जीवनाचं रुपक म्हणून झाडांचा साहित्यात उपयोग कायमच होत आला आहे. पण याचं 'मूळ' काय? उत्क्रांतीच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर झाडालाही आपल्यासारखा जीव आहे, कदाचित भावनाही आहेत हे आपल्याला समजलं असावं? आदिमानवाला जेव्हा आपल्यासारख्याच वाढणार्या, खुरटणार्या, बहरणार्या आणि उन्मळून पडणार्या झाडाबद्दल प्रथम आत्मीयता वाटली, ही झाडं तर आपल्यासारखीच असं वाटून जिवाचे मैत्र जडले; तो क्षण 'मा निषाद'च्याच तोडीचा असावा. आणि कदाचित सुसंस्कृत होण्याचा पहिला टप्पाही.
ज्या गोष्टीबद्दल आपल्याला जिव्हाळा वाटतो, तिला आपल्या गोटात ओढण्याचा आपण जाणता-अजाणता प्रयत्न करत असतोच, त्यातलाच झाडांचे रूपक, हा एक भाग असावा असं मला वाटतं. (ममता हा शब्दच मुळात मम-ता म्हणजे माझेपणा यातून आला असावा. आत्मीयता, आपलेपणा यांचे शब्दशः अर्थही तसेच.) एखाद्या जिवलग मित्राला भावासारखा म्हणून अधिक आतल्या वर्तुळात आपण ओढत असतो, त्यातला प्रकार. तेव्हा झाडांवर होणारं हे मानवी भावभावनांचं 'रोपण' वृक्षवल्ली आम्हां सोयरी याच भावनेतून उगवलं असावं.
'जो खांडावया घाव घाली, की लावणी जयाने केली, दोघां एकची साऊली, वृक्षु जैसा' म्हणत स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगणारे आणि काव्य म्हणजे काय, विचारल्यावर जिच्याकडे बोट दाखवावं अशा 'कोंभाची लवलव, सांगे मातीचे मार्दव' सारख्या ओळी लिहून गेलेले ज्ञानेश्वर; वृक्षवल्लींना सोयरी म्हणणारे तुकाराम आणि कांदा, मुळा, भाजीत विठाई पाहणारा सावतामाळी; पाण्यात पाय सोडून बसलेला बालकवींचा औंदुबर; नितळ न्याहारीला काळा वायू घेणारी मर्ढेकरांची झाडं; गीतरामायण लिहिताना झालेल्या उन्मनी अवस्थेचे वर्णन 'चंद्रभारल्या जिवाला नाही कशाचीच चाड; मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड' अशा शब्दांत करणारे गदिमा; 'प्रत्येक झाडामाडा त्याची त्याची रुपकळा, प्रत्येक पानाफुला त्याचा त्याचा तोंडवळा' म्हणत प्रत्येक माणसातलं वेगळेपण शोधणारे, पावसाळ्यात 'वेली ऋतुमती झाल्या गं' असं लिहून जाणारे बोरकर; तमाच्या तळाशी दिवे लागल्याचा अपूर्व अनुभव 'रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पान्हावले; तिथे मोकळा मी मला हुंगिताना, उरी गंध कल्लोळुनि फाकले' अशा शब्दांत मांडणारे शंकर रामाणी; निष्पर्ण तरुंच्या राईत 'झाडांत पुन्हा उगवाया'ची आस लागलेले ग्रेस; 'आणिक तुझिया लाख स्मृतींचे, खेळवीत पदरात काजवे; उभे राहुनी असे अधांतरी, तुजला ध्यावे, तुजला ध्यावे' अशी रक्तामध्ये ओढ मातीची लागलेल्या इंदिराबाई संत; युगानुयुगीच्या चिर-तंद्रीत कृष्णाची प्रतीक्षा करणार्या राधेला 'जलवाहिनी निश्चल कृष्ण, वन झुकले काठी राधा, विप्रश्न' म्हणणारे पु. शि. रेगे; 'ग्रासली झाडे दिशांनी नग्नदेही, कोरड्या डोळ्यांत आता थेंब नाही' असं लिहून जाणारे महानोर; 'रांडेपेक्षा आहे रांड, मुलापेक्षां आहे मूल' असे रोखठोक वर्णन करणार्या विंदांचे 'उगाचफूल'; काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग लिहिणारे दासू वैद्य; 'नेमस्त झाड मी आहे, मूळ फांद्या जिथल्या तिथे' म्हणणारा संदीप खरे; गद्यातले उदाहरण द्यायचे झाले तर अंतू बर्व्याच्या दारातला गेली चाळीस वर्षं न मोहरलेला हापूस, 'कोसला'मध्ये वेताळाच्या टेकडीवरचं झाड पाहून - 'खरं झाड म्हणजे जमिनीत असतं. वरचं झाड म्हणजे आतडी, फुफ्फुसं असं. माणसाचं जमिनीत काय आहे?' असे आणि तत्सम प्रश्न पडणारा पांडुरंग सांगवीकर किवा बर्ट्रांड रसेलला 'गर्भश्रीमंतीचे झाड' म्हणणार्या पद्मजा फाटक; चौकट राजातलं बोन्सायच्या झाडाचं उघड रुपक आणि जवळचा भाग असूनही गूढ, अज्ञात राहिलेल्या देवराईचं तरल प्रतीक; शाकुंतलातील 'आद्ये वः कुसुमप्रसूतिसमये यस्या भवत्युत्सवः' अशा शकुंतलेच्या वर्णनापासून ते रुदालीत गुलजारच्या 'तेरा छूंआ लागे, मेरी सूखी डाल हरियाए' पर्यंत अक्षरशः एक प्रबंध लिहिता येईल इतकी उदाहरणं सापडतील.
...
जन्माला, नवनिर्मितीला पालवीची उपमा अगदी प्राचीन आहे. आणि ह्या वाढणार्या अंकुराला पाहून, 'सोसंल का त्याला, ऊन वारा पानी' म्हणत धास्तावणारे जन्मदात्यांचे वात्सल्यही तितकेच सनातन. द. भि. धामणस्कर त्यांच्या 'बरेच काही उगवून आलेले' मधल्या 'केळीचे पान' या कवितेत म्हणतात तसे -
...तर हिरव्या पाना
अस्तित्वाच्या लांबलचक देठाभोवती मातीनं
सुरक्षित गुंडाळून ठेवलेलं तुझं
शैशव उलगडत जाताना मी
किती हळुवार, किती हळवा झालो होतो हे
तुला नीट सांगताही येणार नाही आता मला...
सुरुवातीच्या पहाटत्या हिरव्यात
अधिकाधिक हिरवेपण कसे भरत गेले याचा
क्षणाक्षणांचा हिशेब माझ्या डोळ्यांत...
आता ऐन नव्हाळीत एक सौंदर्यसंपन्न हिरवा
तुझ्यात काठोकाठ भरून आणि मी
बराचसा कृतार्थ तुझा
आत्यंतिक उत्कटतेचा दिवसही
पाहतो आहे म्हणून्; तसा खूपसा भयभीतही -
तथाकथित जगरहाटीनुसार तुझ्या विनाशाला आता
कधीही सुरुवात होईल म्हणून...
मला दिसते आहे, प्राणपणाने
जपावे असे काही तुझ्यात - तू
एक देखण्या पूर्णत्वाचं प्रतीक तुझ्या अखंडतेत;
या प्रदेशातून वाहणारे चंचल वारे मात्र
माझ्याशी सहमत नाहीत. भय वाटते ते
त्यांचेच...
स्त्री ही क्षणाची पत्नी, पण अनंतकाळची माता असते असं म्हणतात. तसंच पत्नीत 'गृहिणी सखी सचिवः' च्या जोडीला आईपण शोधणार्या पुरुषालाही पितृसुलभ वात्सल्याची भावनाही जाणवत असतेच. अशाच समजूतदार, प्रेमळ सख्याच्या रुपातली पु. शि. रेग्यांची 'शेवगा' ही छोटेखानी कविता.
दोन प्रहर. निवांत सारें.
श्रमभराने बाजेवरतीं
पांगुळलेली तू.
खिडकीबाहेर ढाळितो चवरी
आसुरलेला शेवगा दारचा.
'सा विद्या या विमुक्तये' सारखाच प्रगल्भ प्रेमाचा पुढचा टप्पा म्हणजे हा आपल्या वात्सल्याचे बंधन न होऊ देण्याचा. अडनिड्या वयात उगाच रागावून अबोल होऊन बसणारी टीन-एजमधली मुलं काय किंवा वेगळ्या वाटा शोधायला घर सोडून निघालेलं तारुण्य काय; सोशिक अनाग्रही आईबाप धामणस्करांच्या 'परिपक्व' झाडांसारखेच -
रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय :
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही...
मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;
गाणे आपल्याच कंठात उद्भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहावयास तयार आहेत...
कशासाठी जगावं, हा प्रश्न कळतं झाल्यापासून प्रत्येक टप्प्यावर पडत असावा. पण वृद्धत्वात आणि 'मिड-लाईफ'मध्ये कदाचित जरा जास्तच वेळा. बोरकरांची ही कविता, अनंत काणेकरांच्या त्या प्रसिद्ध लघुनिबंधातलं तत्त्वज्ञानच सांगते ('दोन मेणबत्त्या'मधील दुसर्यासाठी जगलास तर जगलास, स्वत:साठी जगलास तर मेलास); पण जरा बदलून. 'स्वतःला विसरून दुसर्यांसाठी जगा' पेक्षा 'स्वतःबरोबरच दुसर्यांनाही आनंद देत जगा' असे. गीतेतल्या वर मुळे, खाली फांद्या असलेल्या अश्वत्थ वृक्षाचे रूपक रंजक आहेच, पण आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता जितके जमतील तितके वेगवेगळे अनुभव घ्या, असं शेवटच्या ओळीत सांगणारे बोरकर या एका ओळीतूनच 'बाणा कवीचा' दाखवून जातात. आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात त्यातले इतर अन्वयार्थही स्पष्ट होत जातातच.
कुणासाठी तरी या रे, या रे मोडून फळांनी
कुणासाठी तरी झुका, झुका जडून फुलांनी
कुणासाठी तरी, या रे गाढ भरून सुखांनी
कुणासाठी तरी, गा रे मुक्त सहस्र मुखांनी
पसरून पाळेमुळे, धरा धरित्रीचा तळ
पानोपानी खेळवा रे, तिच्या कुसव्याचे जळ
भुजाबाहूंनी कवळा, स्वैर धावणारे वारे
लक्ष हिरव्या डोळ्यांत, रात्री बिंबवा रे तारे
व्हा रे असे अलौकिक, लोकी येथल्या अश्वत्थ
कंप भोगा शाखापर्णी, मुळी राहून तटस्थ
उत्पत्ती, स्थितीबरोबरच लयाचा निर्देश करण्यासाठीही झाडांचं रूपक वापरलं जातं. छान पिकत जाणार्या वृद्धत्वाची तुलना अनाग्रही, समजूतदार झाडांशी होणे साहजिकच. वाढत्या वयात, कळत जाते तसे राग-रोष सरून एक अलिप्त एकटेपणा येतो. पाडगावकर म्हणतात तसा 'सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालण्याचा' समजूतदारपणा. 'जो तो आपापला येथे कुणी ना आधार' चा शहाणा स्वीकार. अशा वेळी, बोरकरांच्या शब्दांत सांगायचे तर -
कळत जाते तसे, कशी झाडे पाखरे जीव लावतात
शब्द सारे मिटून, कसे तळ्यामधेच पेंगू लागतात
अशी अवस्था होते. बोलण्यात वारंवार पिकल्या पानांचे, वठलेल्या खोडाचे संदर्भ येतात. असं असलं तरी, मागे वळून पाहताना मनाच्या एका समाधानी अवस्थेत, आपलं आयुष्य अगदीच काही वाया गेलं नाही अशी कृतकृत्यतेची जाणीवही कधी दिलासा देऊन जाते. 'जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले, तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले' सारखी. द. भा. धामणस्करांची ही शेवटची कविता अशीच नम्र कृतार्थतेची भावना अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त करते -
तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले...
[समाप्त]
"लव" इज द "गेम"!
प्रेषक मृगनयनी ( बुध, 09/24/2008 - 15:48) .मनाच्या गाभार्यात , कधीकधी भरुन येतात भूतकाळाचे मेघ...
आणि मग एकेक लडींप्रमाणे उलगडत जातात, त्या आठवणी...
मी म्हणायचे, "मला आवडते काळ्या दगडावरची रेघ. "
तू म्हणायचास, " मला मात्र भुरळ पाडतं अळवावरचं पाणी. "
मी विचारायचे, "राधा खरी की रुक्मिणी ? "
तू विचार करुन म्हणायचास, "मीरा च खरी विरहिणी. "
मी : म्हणजे राधेच्या प्रेमात, नव्हतीच का कधी भक्ती?
तू : हो..... पण विष पचवायलाही लागते मोठी शक्ती...!
मी : तरी पण सांग ना..... कोण खरं....?
तू : खरंतर लग्नपेक्षा प्रेमच बरं !
मी : फक्त प्रेमासाठी म्हणुन, का राधेने समाजनिंदेला तोंड द्यावं ?
तू : आता प्रेम करायचं, म्हटल्यावर तेवढं सहन करायलाच हवं!
मी : पण म्हणुन, समाजाचा फक्त राधेवर तेवढा रोष.....
तू : समाजच तसा आपला, यात माझा काय दोष?.....
मी : ठाऊक आहे ना तुला, राधेने वासनेच्या पलीकडलं प्रेम केलं होतं....
तू : हो ... पण या कलीयुगात, पलीकडच्या तीरावर... पाण्यातुनच जावं लागतं!
मी : असं म्हणतात, खर्या प्रेमात स्वार्थ बघायचा नसतो!
तू : हो... पण खर्या प्रेमाचा अर्थ आपणच ठरवायचा असतो.....!!!
मी थोडी नाराज होऊन म्हणाले, " हे मात्र छान!.. प्रत्येक शब्दाचा अर्थ बदलवता येतो
तुला!"
तू माझ्या डोळ्यांत बघत म्हणालास, " हो!.. कारण आयुष्याच्या प्रत्येक खेळात रस आहे मला!!"
मी : म्हणजे, आयुष्यातली प्रत्येक गोष्ट, खेळ म्हणुनच खेळायची असते?
तू : हं..... एखादी खेळी मुद्दाम हरुन जिंकायची असते!
मी : म्हणजे...तुझ्यावर प्रेम करणार्यांच्या भावनांचाही तू खेळच करतो का?
तू : विचार कर.. आपल्या भावनांचा कधी परस्परांशी मेळ असतो का!?!
मी : भावनांचा विचार करण्यासाठी त्यांचा भावनात्मक दृष्टीनेच विचार करायला हवा!
तू : म्हणजे.... त्यासाठी मला परत मांडावा लागेल खेळ नवा!!!
मी : तू ही माणुसच आहेस ना.... तरी नाहीच कशी तुला निर्व्याज प्रेमाची जाण.....
तू : माझ्या खेळात मला माहित आहे फक्त हृदयांची देवाण घेवाण.....
मी कळवळुन म्हणाले, " इतका कसा रे निष्ठूर तू, माझ्या आजवरच्या विश्वासाला तडा गेला.."
तू शांतपणे म्हणालास, "फासेच उलटे टाकलेस तू, म्हणुन तर तुझा डाव चुकला..."
मग फक्त आघात सोसत राहिले, मी होऊन नि:शब्द.....
अश्रूंच्या माळेतून आठवत राहिले, प्रेम आणि सौदा यातलं द्वंद्वयुद्ध!
निरोप घेताना तुझा मी इतकंच म्हणाले, "तुझा खेळ हरले मी... विसरुन जा माझं प्रेम..."
मग तू ही थोडा 'इमोशनल' होऊन म्हणालास, " You also forget it, at last LOVE is the GAME!
एवढं होऊनही विसरुनचं गेले मी तुला एक सांगायचं....
मला नवीन खेळाची माहिती दिल्या बद्दल "थँक यु" म्हणायचं!
तू काहीही म्हण आता... पण खरोखरच तुझे मानले पाहिजेत आभार.....
कारण माझ्या प्रेमाला तू फक्त "खेळ"च म्हटलास...... म्हणाला नाहीस "जुगार" !
बरेच काही उगवून आलेले...[भाग १]
प्रेषक नंदन ( सोम, 09/22/2008 - 07:47) .झाडांबद्दल मराठीत शेकडो लेख, कविता आल्या असाव्यात. बोरकरांच्या किंवा अलीकडे द. भा. धामणस्करांच्या कविता वाचताना, घासून गुळगुळीत झालेल्या ह्या रूपकालाही नवीन रूपडं कसं बहाल करता येतं, हे जाणवतं. सगळं आयुष्य शहरात गेल्यामुळे असेल, पण 'वृक्षवल्ली आम्हां सोयरे' वगैरे आतून मला कधीच वाटलं नव्हतं. पण गेल्या काही महिन्यांत झाडांची वेगवेगळी रूपं पाहिली. इतकी भिन्न, इतकी वेधक की अगदी अट्टल शहरी माणसालाही त्यांच्यात रस निर्माण व्हावा. त्यांच्याबद्दल लिहून, त्यांना न्याय द्यायचा तर तेवढीच अलौकिक प्रतिभा हवी. तिचा अभाव असला, तरी पूर्वसुरींनी जे काम करून ठेवलंय ते अधूनमधून आठवत होतं. ही कदाचित - लाईफ इमिटेटिंग आर्ट, आर्ट इमिटेटिंग लाईफ सारखी आस्वादाची दुहेरी प्रक्रिया असावी. म्हणजे क्वचित कधी सरत्या संध्याकाळी जसं 'कहीं दूर जब दिन ढल जाये' आठवतं किंवा पावसात 'ओ सजना'/'रिमझिम गिरे सावन' डोक्यात प्ले होऊ लागतं; त्याच्या उलट सारे प्रवासी घडीचे किंवा शंकर पाटलांच्या कथा वाचताना आपला गाव आठवतो किंवा लंपन वाचताना आपणही लहानपणी असाच बर्याचदा मॅडसारखा विचार करायचो असं वाटत राहतं. रोजच्या जगण्यात अचानक एखाद्या कलाकृतीची आठवण व्हावी आणि कधी काही वाचताना, ऐकताना 'स्मरणाचा उत्सव जागून' विसरलेलं काही पुन्हा आठवावं - ही जोडी तशी रंजक आहे.
अर्थातच, हे नेहमी होणे नाही. तसं झालं तर त्यातली उत्स्फूर्तता, मजा निघून जाईल. त्यामुळे झाडं पाहून आठवलेल्या त्या एक-दोन कविताच फक्त लिहिण्यापेक्षा एकंदरीतच सापडलेले झाडांचे उल्लेख एका लेखात लिहावेत असं जेव्हा प्रथम डोक्यात आलं; तेव्हा हे कृत्रिम तर होणार नाही ना, ही शंकाही जोडीनेच आली. पण त्या एखाद-दोन क्षणांचा कल्पनाविस्तार केला तर इतरांनाही कदाचित त्यात काही ओळखीचं सापडेल, असंही वाटलं. त्यामुळेच हे - 'बरेच काही उगवून आलेले...'
...
दहिसरचं मुंबईकरण होण्यापूर्वी अनेक वेगवेगळी झाडं पहायला मिळायची. शाळेला जायच्या रस्त्यावर पांगारा आणि अमलताश होते. ग्रीष्मात अनुक्रमे लाल आणि पिवळ्या रंगांत फुलून यायचे. ठिकठिकाणचे गुलमोहर, देवळाकडचं पार असलेलं पिंपळाचं झाड, गुंजाची - बदामाची झाडं, सुबाभूळ, अशोक आणि कितीतरी नाव माहीत नसलेली फुलझाडं - दहिसरचं दहा वस्त्यांचं गाव हे वर्णन सार्थ ठरवत.
शाळेच्या इमारतीतून मैदानापलीकडचं खाचर दिसायचं. गडद पावसाळी दिवसांत अंधारून येऊन पाऊस पडायला लागला की तिथली झाडं अक्षरशः झोडपून निघायची. क्वचित बाईही मग शिकवणं थांबवायच्या. अंधारल्या वर्गात बसून ढगांच्या गडगडाटात, डोळेभरुन ती गदगदणारी झाडं मग सगळे पाहत राहत. पण शाळा म्हटली की, प्राथमिक शाळेच्या जवळचं एक झाड आठवतं. त्याच्या अंगाखांद्यावर 'रम्य बाल्य ते जिथे खेळले' पासून त्या तरूतळी 'तसव्वुर-ए-जानाँ किये हुए' करत बसून राहण्यापर्यंतची सर्वांची प्रगती, तशी त्याच्याच जोडीने झाली. मित्राने एक अतिशय जुना फोटो पाठवल्यावर या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. यंदाच्या फेरीत हे झाड दिसलं नाही, पण त्याच्या नसण्याने काही विशेष वाटलंही नाही. जुनी इमारतच मोडकळीला आल्याने वर्गही नवीन जागेत भरू लागले होते. तेव्हापासून त्याचं प्रयोजनच संपलं असावं.
ग्रँटरोडच्या चिखलवाडीच्या चाळीत मात्र झाडांचं इतकं कौतुक करायला कुणाला सवड नसे. नाही म्हणायला नानाचौकाकडून चौपाटीकडे जाताना मणीभवनच्या गल्लीत हिरवीगच्च झाडे दिसत. त्या रस्त्याचे नावही रसिकतेने लॅबर्नम रोड, म्हणजे बहावा/अमलताश मार्ग ठेवलेलं. मागे जसं फोर्टमधल्या टॅमरिंड लेनचं 'मुदण्णा शेट्टी मार्ग'(!) म्हणून नामकरण झालं; तसंच लॅबर्नम हे कुण्या इंग्रजाचं नाव असल्याने (बापूंच्या वास्तव्याने पुनीत इ. झालेल्या) मणीभवनकडच्या त्या रस्त्याचं नावही बदलण्याचा घाट मुंबई महापालिकेने घातला होता. सुदैवाने तो बेत तेव्हा तडीस गेला नाही.
झाडांबद्दल लिहित असताना कोकणातल्या झाडांचा उल्लेख होणार नाही, हे अशक्यच. लेकुरवाळा फणस. काजूची बुटकबैंगण झाडं, करवंदीच्या जाळ्या, रातांबे नि जामाची झाडं. हापूस-पायरी-रायवळ-माणकुराद आंब्यांची कैक झाडं. आंबा पिकून जाळीत पडल्याचा आवाज आल्यावर, भावंडांबरोबर शर्यत लावायची आणि ज्याला प्रथम सापडेल त्याने तो खायचा. 'आठवणींच्या चिंचा गाभुळ' ऐकलं की चिंचांऐवजी, त्या आंब्यांचीच चव आठवते. फुलझाडांची तर गणतीच नाही. पण तळकोकणात काय किंवा गोव्यात काय; ज्याला व्यवच्छेदक म्हणावं असं झाड म्हणजे नारळाचं. हिरवं मोकळं खाचर आणि त्याच्या कडेला असलेली माडाची झाडं काय सुरेख दिसतात. पाच-सहा झाडांतलं एक उगाच तिरपं, जमिनीशी अधिक सलगी साधत वाढलेलं असतं. एखाद्या फॅमिली फोटोसाठी प्रौढ मंडळी गंभीरपणे उभी आहेत, आणि मध्येच एखादा गोटू गंमतीने जरा वाकड्याच पोझमध्ये उभा राहला आहे, असं ते पाहून वाटत राहतं. मंगेशी-शांतादुर्गेच्या देवळाबाहेरच्या तळ्यांवर हिरवी सावली धरणारे माड मात्र तसे गंभीर. अर्थात, हे झाड खरे पहावे ते किनार्याजवळ. माडांशिवाय कुठल्याही किनार्याला शोभा नाही, हे पुलंचं मत इकडचे भुंडे किनारे पाहिले की पटतं. रेड्डीच्या महागणपतीकडे जाणारा रस्ता सुंदर आहेच, पण तितकाच देवळापाठचा किनाराही. लाल माती, हिरवी झाडी आणि समोरची निळाई.
...
इथल्या प्रवासांत वेगवेगळी झाडं पहायला मिळाली. आधी अनोळखी, अपरिचित वाटणारी. हळूहळू सवयीने मग थोडीफार ओळखीची झालेली. शिकागोला दोन वर्षांपूर्वी भर थँक्सगिव्हिंगच्या (नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा) गेलो होतो. तपमान शून्याच्या बरंच खाली. नुकताच बर्फ पडून गेलेला. भणाणत्या वार्यामुळे आणि अपुरे गरम कपडे आणल्याने गोठलेला मी. अशा वेळी चालताना एक वळण घेतलं, आणि अनपेक्षितपणे दिव्यांनी मढवलेली निष्पर्ण तरुंची राई समोर आली.
पुढे कधीतरी जेव्हा पु. शि. रेग्यांची 'गंधरेखा' वाचली, तेव्हा - एक आहे झाड माझे, रांठ ज्याच्या जीर्ण शाखा; साठीषण्मासी परंतु लाख ज्या येती शलाका - या ओळीवर अडखळून हीच झाडं पुन्हा डोळ्यासमोर उभी राहिली.
एक आहे झाड माझें रांठ ज्याच्या जीर्ण शाखा;
साठिषण्मासीं परंतु लाख येती ज्या शलाका
झाड माझें लाल ज्याला आग्रहाची लाख पानें;
आणि माझी बंडखोरी घोषतों मी गात गाणें.
झाड माझें लाखमोली लाल ज्याला फक्त पानें,
नेणतां ये एक ज्याला शुभ्र कांही जीवघेणें.
एक, ज्याला जाणिवेच्या लांच्छनाच्या गंधरेखा;
पाहतों मी ज्यात माझें झाड, माझ्या आणभाका
ग्रेसच्या बर्याच कवितांसारखाच या कवितेचा अर्थ बिनचूकपणे सांगणे अशक्य आहे. पण हट्टाने बंड करुन, जगाशी सारे संबंध तोडून आपल्या कोशात राहिलेल्या - वेळोवेळी ती आग्रही लाल पानांची तुसडेपणाकडे झुकणारी बंडखोरी मिरवणार्या; एखाद्या वठलेल्या खोडासारख्या माणसाला काही कारणाने, अवचितपणे 'आज फारा दिवसांनी कोंभ मुसळाला आले' सारखी पालवी फुटावी (नेणतां ये एक ज्याला शुभ्र काही जीवघेणें) आणि ती हवीहवीशी वाटली तरी इतक्या वर्षांच्या सवयीने त्या गंधरेखेबद्दल थोडी शरम वाटावी, असं काहीसं. थोडक्यात 'ऍज गुड ऍज इट गेट्स' मधली जॅक निकल्सनची तुसड्या, विक्षिप्त लेखकाची ऑस्करविजेती भूमिका. झाडांवर झालेल्या मानव्याच्या आरोपाबद्दल (चेतनागुणोक्ती अलंकार) पुढे लिहीनच, पण 'पाहतों मी ज्यात माझें', असं हे रेग्यांचं झाड त्याचं उत्तम उदाहरण ठरावं.
...
शिकागोतल्या या झाडांसारखी इतर अनेक झाडं भटकंतीत सापडत गेली. स्मोकी माऊंटन नॅशनल पार्कमधलं वार्या-पावसात करकरणारं 'कराल' झाड. सॅन फ्रान्सिस्कोजवळचं प्रसिद्ध 'द लोन सायप्रस' आणि त्याच्या शेजारी दुर्लक्षलेलं 'देहा फुटले वारा फांटे, अंगावरचे पिकले कांटे, आभाळांत खुपसून बोटें' उभं असणारं 'घोस्ट ट्री'. ब्राईस कॅन्यनमध्ये 'खडकावरील अंकुरा'सारखं उगवून आलेलं एकुलतं एक झाड. रेडवूडमधली गाढ हिरवी शांतता, सिकोयामधले प्रचंड घेराचे प्राचीन वृक्ष. 'शिशिरऋतुच्या पुनरागमे, एकेक पान गळावयां' होण्यापूर्वी बॉस्टनजवळ झाडांवर पाहिलेला रंगांचा उत्सव. स्वप्नात केलेला प्रवास वाटावा, अशा कोलोरॅडोतल्या एका रेल्वेप्रवासात दोन्हीकडे पिवळ्या-लाल रंगांच्या पानांच्या झाडांनी भरून गेलेले डोंगर. पेट्रिफाईड नॅशनल फोरेस्टमधली 'माझ्या मना बन दगड' म्हणून चक्क दगड बनलेली झाडं. प्रत्येकाची तर्हा वेगळी.
पण या सर्वांत विलक्षण असेल तर ते आर्चेस नॅशनल पार्कमध्ये पाहिलेलं एक झाड. यूटाहमधल्या या अप्रतिम राष्ट्रीय उद्यानात 'फिएरी फर्नेस' म्हणून एक रेंजर-गायडेड, अर्थात उद्यान अधिकार्याच्या नेतृत्वाखालीच होणारा ट्रेक आहे. त्या ट्रेकदरम्यान रेंजरने एक झाड दाखवलं होतं. काही वर्षांपूर्वी त्याच्या खोडाच्या मध्यावर वीज पडून त्याच्या जळून जवळपास चिरफळ्या उडाल्या होत्या. पण जगण्याची इच्छा इतकी चिवट असते, की मृतप्राय झालेल्या त्या खोडालाही पुन्हा पालवी फुटली.
एकाच या जन्मी, फिरुनि नवे जन्मलेल्या; पोटात वीज थिजवून उभ्या असलेल्या, जागेपण गिळून उभे असेपर्यंत वाढणार्या ह्या गूढ, जायबंदी झाडाला बोरकरांची ही कविताच न्याय देऊ शकते.
झाड गूढ झाड गूढ, ओल्या प्रकाशाची चूड
गार गार पारा गाळी, स्वप्नरंगांचे गारुड
झाड पाताळ फोडिते, झाड आकाश वेढिते
ताळमूळ संसाराचे गाठीगाठीत जोडिते
झाड वाकडे-तिकडे, छेडी फांद्यांची लाकडे
वीज थिजवून पोटी, वारी मेघांचे साकडे
झाड स्वच्छंदी आनंदी, सुखे होय जायबंदी
घावाघावातून गाळी, फुले ज्वा़ळांची जास्वंदी
झाड माझे वेडेपिसे, उन्हीं जळताना हसे
रुसे धो धो पावसात, चांदण्यात मुसमुसे
वेडे झोपेत चालते, अर्ध्या स्वप्नांत बोलते
गिळोनिया जागेपण, उभे आहे तो वाढते
...
(अखेरचा भाग या गुरूवारी)
[हाच लेख येथेही वाचता येईल.]
म्हणी रिमिक्स! :)
प्रेषक भाग्यश्री ( शनी, 09/20/2008 - 05:53) .हॅलो सगळे मिपाकर !
अभिजितचा म्हणींचा धागा भलताच लोकप्रिय ठरला .. त्यावरून हा खेळ आठवला.. एका संस्थळावर पाहीला होता..
या खेळात, दोन वेगळ्या म्हणी एकत्र करायच्या आहेत..
उदा...
हातच्या कंकणाला खळखळाट फार.. ! 
असेल हरी तर जमतील भुते..! 
चला, येऊद्या अजुन विनोदी म्हणी! 
ऋषी आणि लांडगा... :)
प्रेषक विसोबा खेचर ( शुक्र, 09/19/2008 - 23:18) .राम राम मिपाकर सभ्य स्त्रीपुरुषहो,
वरील दुव्यातली कथा वाचल्यानंतर माझ्या मनात आलेले विचार येथे नोंदवत आहे. आपल्याही मनातले विचार इथे नोंदवून हा धागा अंमळ मजेशीर करा ही विनंती.. 
माझ्या मनातले विचार -
१) हा ऋषी चक्क थापा मारतो आहे. "माझ्यावर लांडग्याने उडी मारली तरी मी कसा शूर! अन् मी कसा वाचलो आणि पर्यायाने तो लांडगा माझं काहीच वाकडं करू शकला नाही.." हेच त्या ऋषीला, सॉरी! गोसावड्याला भासवायचं असावं! 
२) जर ही ष्टोरी खरी असेल तर त्या ष्टोरीत लांडग्याच्या ऐवजी एखादा जबरदस्त भुकेला पट्टेरी वाघ असता तर किती बरं झालं असतं! 
येऊ द्यात आपलेही विचार... 
आपला,
(थापाड्या ऋषी!) तात्या.
वयम् मोठम् खोटम्!
प्रेषक अरुण मनोहर ( बुध, 09/17/2008 - 16:33) .माणूस हा एक विचीत्र प्राणी आहे. जे आपल्यापाशी नाही त्यासाठी झुरत असतो. ईतरांचे सोडा, पण आपल्यापाशी जे आहे त्याचे कौतूक त्याला स्वत:लाच नसते. कुणीतरी नमूद करून ठेवलेच आहे. आपल्या सर्व मित्रांची मुले आज्ञाधारक आणि हुशार असतात. समोरच्या बसस्टॉपवर उभ्या असलेल्या माणसांसाठी पटापट एकाच नंबरच्या दोन दोन बसेस येतात. आपल्या बाजूला मात्र हवी असलेली बस एक तास वाट पहायला लावून येते, आणि आपल्या पुढल्या माणसाला आंत घेतल्यावर कंडक्टर आपल्यावर खेकसतो "दरवाजा छोडो". एकूण आपल्याला जे हवे असते ते आपल्याला मिळतच नाही. चुकूनमाकून मिळालेच, तर ते योग्य वेळी मिळाले नाही असे आपल्याला वाटते.
माणसाच्या वयाचे पण असेच आहे. आपले सध्याचे वय कधी कधी आवडत नाही. आपण सध्याच्या वयाच्या आगेमागे घोटाळतो. चिमुरडी सोनीया गाजराचा माईक हातात धरून पॉप सिंगरच्या थाटात गाणे म्हणते. बालवाडीत जाणारा कुणाल शाळेतल्या भावाचे दप्तर खांद्यावर लटकवून माझी परीक्षा आहे म्हणत तरातरा निघतो. प्रायमरीतली निशा आत्याच्या मेक़अप बॉक्समधले लांबवलेले सामान वापरून जुही चावला होण्याची स्वप्ने पहाते. नोकरीच्या कटाकटींना वैतागून कुलकर्णी केव्हा रिटायर होऊन आरामात दिवस घालवीन म्हणत असतो. निवृत्त झालेले आजोबा आमच्या वेळी हे असे होते तसे होते या आठवणींचे उसासे सोडत असतात.
लहानपणी तुम्ही काळ्या शाईने ओठांवर मिशा रंगवून, वडीलांचे ढगळ होणारे कपडे घालून आपल्यापेक्षा जड असलेली बॅग ओढीत ऑफ़ीसला जाण्याचे नाटक केलेले नसेल, तर तुम्ही लहानपणातील एका आनंदाला मुकलात. ते जरी केलेले नसले, तरी लहान भावाने तुमचे ऐकले नाही म्हणून, वडीलांचा आव आणुन त्याची काऩउघाडणी केली असेल. कुठे एखादी पमी, आजीचा चष्मा चढवून ज्ञानेश्वरी वाचून पहात असेल. लहानपणी आपण सारेच, मी मोठा कधी होणार ह्या ध्यासाने पछाडलेले असतो. पु.लं.नी लहानांची ही धडपड, "वयं मोठं खोटं" मधे त्यांच्या मिष्कील शैलीत अचूक टिपली आहे.
लहानपण हे असे असते. मोठ्यांच्या बुटांत पाय घालण्याची धडपड करता करता ते वय भुरकन उडून गेले, ही बोंच बुट चावायला लागतात तेव्हाच कळते. वर्षावर्षांच्या उन्हात कुणाचे केस पिकतात, तर कुणाचे काळाच्या वादळवाऱ्यात वाहून जातात. मधुमेह जीवनातला नाही, तरी जेवणातला मधू पळवून नेतो. पडलेले दात वाणीतला गोडवा लपवितात. अशा वेळी तुकारामांची "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा" ही उक्ती दुसऱ्या अर्थाने आठवते. आपले वय आपल्याला वाकुल्या दाखवायला लागते. "वो कागजकी कश्ती, वो बारीशका पानी गहीवर आणतात. लहानपणी मोठे होण्याची उतावीळता. मोठे झाल्यावर लहानपण आठवून उसासे. एकूण काय, सध्याचे वय आपणाला आवडतच नाही.
फ़क्त आपल्याच नाही, पण इतरांकडूनही वयानुसार आपल्या ठराविक अपेक्षा असतात. त्या अपेक्षांना कुणी खरे उतरत नाही असे दिसले, तर आपण कासाविस होतो. एखादे म्हातारबुवा बर्फ़ाचा गोळा खातांना दिसले, तर आपल्यालाच खोकला येतो. केसांचा फ़ुगा पाडलेला तरूण युवक किर्तनाला आलेला दिसला, तर "पोरींवर लाईन मारयला आला असेल" हीच प्रतीक्रिया संभवते. कोणत्या वयात काय करावे, काय करू नये, ह्याचे सगळे आराखडे ठरलेले असतात. काही क्षेत्रे फ़क्त तरुणांचीच मक्तेदारी चालू देतात.
मागे एकदा आम्ही ऑफ़ीसचे सहकारी दुपारच्या जेवणाला निघालो होतो. साहजीकच चर्चेचा ओघ त्यावेळी झालेल्या क्रिकेटच्या मॅचकडे वळला. ती टीम कां हरली ह्याचे सहज उत्तर तीशीतल्या नरेन्द्रकडे होते. "त्यांचा प्लेअर लाईऩअप बघा. कीतीतरी खेळाडू पस्तीशी ओलांडलेले आहेत. How can anyone expect them to perform?"
पन्नाशी ओलांडलेल्या मला ते वाक्य खुपले. वयाविषयी आपले कीती पूर्वग्रह असतात! ज्यांना दोनच वर्षांपुर्वी डोक्यावर चढवले होते, तेच स्टार प्लेअर्स पस्तीस वर्षाचे होताच मोडीत काढले जातात! अशा जगात आपला काय पाड लागणार? आपण नां स्टार नां प्लेअर. पस्तीशी तर केव्हाच इतीहासजमा झालेली. सुन्नपणे नरेन्द्रची मल्लीनाथी ऐकतांना मला एका विचाराने मात्र दिलासा दिला. "नरेन्द्र बेटा. आज तू खैर मानून घे. पण दिवसांगणीक तू देखील तेथेच पोहोचत आहेस! शुअरली, उद्या एखादा तरुण तुझ्याविषयी असेच बोलेल!" ही छोटी गोष्ट एक खुणगाठ बांधून जाते. इतरांचे वाढते वय दिसते, पण तिथेच नेणाऱ्या आपल्या वयाच्या पाउलखुणा आपल्याला दिसतच नाही.
पाउलखुणा कदाचित नजरेआड केल्या जात असतील. पण वाढत्या वयाचा सुप्त आकस मनांत खोल कुठेतरी जाणवत असावा. तीशीतली दोन पोरांची आई असलेली ओळखीतली बाई, जेव्हा तुम्हाला सर्वांसमोर काका म्हणून बोलावते, तेव्हा तिला काय सांगायचे असते? तुम्ही माझे (वयस्कर) काका, म्हणजे मी आपोआपच तरूण, असे ते व्यस्त गणीत असते. स्वत:चे तारुण्य आणि म्हणजेच स्वत:चा ताजेतवानेपणा जाहीर करायची ती एक धडपड असेल कां? ती धडपड करतांना समोरच्या काकाचा आपण पार मामा करून टाकत आहे ह्याचे सोयरसुतक तिला नसते. असे पाहीले की मला अमेरिकन संस्कृतीचे कौतुक वाटते. तीन वर्षाची चिमुरडी देखील शेजाऱ्याला सरळ "हाय फ़ीलीप" पुकारते. उगाच कामापुरता मामा नाही. त्या लोकांची स्वतंत्र व्यक्तीमत्वे अशीच लहानपणापासून फ़ुलवल्या जातात. आता फ़्लीप साईड म्हणून कोणी असे म्हणेल की त्यांना वडील मंडळींचा आदर वगैरे नसतो. पण आदर काय नांवाने हाक मारली की नाहीसा होतो? की काका म्हटल्यावर मिळतो? समोरच्या व्यक्तीविषयी मनांत जशी भावना असेल त्याप्रमाणे आदर, अनादरही शब्दांच्या पलीकडे जाऊन व्यक्त होतोच. समोरच्या माणसाला त्याच्या नावाने सन्मानपूर्वक संबोधायचे, त्याचे नांव घेऊन उद्धार करायचा, कां "पिकले पान’ म्हणून गळण्याआधीच जळण्याची आशा धरायची हे तुम्हीच ठरवायचे. तुमच्या वागण्यातून तुमचे व्यक्तीमत्व जगाला दिसेलच.
मला सकाळी धावायला जाण्याचा छंद आहे. गेली वीस वर्षे मी रोज न चुकता चार किलोमिटर धावायचा नियमच केला आहे. आजकाल जॉगींगचा विषय कुठे निघाला की मला चूप बसणेच आवडते. आपल्या जॉगींगचा उल्लेख केला तर कोणितरी म्हणतोच "कमाल आहे बुवा तुमची. ह्या वयांत देखील कसे काय जमते हे तुम्हाला?" अशी वाक्ये धावण्याच्या कौतुकापेक्षा, "ह्या वयाचा" सल घेऊनच येतात.
मधमवयीन आयष्यात असे अनेक सल सतावित असतात. धड इकडे नाही, धड तिकडे नाही असा हा धेडगुजरी काळ असतो. नवीन युग प्रचंड वेगवान झाले आहे. आजचे तंत्रज्ञान उद्या कबाडखान्यात फ़ेकल्या जाते. परवाच एका पस्तीस वर्षाच्या युवकाला बोलतांना ऐकले की चार पाच वर्षे अनुभव असलेल्या यंग स्मार्ट कॅंडीडेटसच्या बरोबर नवीन नोकरीसाठी स्पर्धा करणे खूप कठीण झाले आहे.
आजच्या युगातील चंट, अती वेगवान आणि आक्रमक तरूणांच्या झंझावाती कार्यप्रणालीत, "थांबा, थंड डोक्याने विचार करा" वगैरे धोरणी संथपणाला वाव नसतो. त्य़ांच्या लेखी मधमवयीन म्हणजे "बसून अडचण आणि असून खोळंबा" अशी ब्याद असते. मला वाटते, वयोगटांमधे सर्वांत गोंधळलेले अशे दोन गट असतात. टीनएजर्स आणि मधमवयीन. एका विचीत्र आयडेंटीटी क्रायसीस मधे सापडलेली ही मंडळी असतात. टीनएजर्सला कोणी समजावून घेत नाहीत. मधमवयीन सतत इतरांना समजावण्याचा निष्फ़ल प्रयत्न करत असतात. ह्या वयातील जोडीचा, म्हणजे बापलेकांचा संवाद, किंबहुना संवादाचा अभाव ऐकण्यासारखा असतो.
जीवनातील सारे खाचखळगे, उंबरठे ओलांडून शेवटी आपण वृद्धकाळाच्या शांतवनांत पोहचतो. जे मिळवायचे ते सारे मिळवून झालेले असते. जे गमवायचे ते गमावलेले असते. आता कोणाकडून काही अपेक्षा नसतात. आपल्याकडूनही कोणी काही अपेक्षा करू नये येवढीच एक रास्त अपेक्षा उरलेली असते. मुलाबाळांचे, नातवंडांचे कौतुक करत, त्यांच्या जीवनातला आनंद उपभोगत शांतपणे उरलेली वाटचाल करायची असते. पण हे सूख, कीती लोकांच्या वाट्यास येते? कुठे तरी काही तरी खटकत राहते. मुलांचा आनंद आपलासा मानता मानता नकळत एखादी अदृष्य सीमा पार करून आपण त्यांच्या आयुष्यावर अतिक्रमण करतो. आपल्याला ते त्या क्षणि उमगतही नसेल. लहानपणी मोठ्यांच्या बुटांत पाय घालून स्वत: चालून पाहीले होते. आता लहानांच्या बुटांत पाय घालून त्यांना चालविण्याची घोडचूक करतो आणि तोंडघशी पडतो.
म्हातारपणी शरीर थकायचे हा तर निसर्गनियमच आहे. देवाने निर्माण केलेल्या शरीर नामक अद्भुत बायोमशीनचे एक एक पुर्जे नाकाम बनु लागतात. मुलाबाळांचे बंध कदाचित आधीच सुटले असतील. आता उरलेले सारेच पाश सुटू लागतात. आतापर्यंत जे खरोखर अगदी आपले स्वत:चे वाटत होते, ते शरीर देखील साथ सोडू लागते. असे झाले की पुन्हा एकदा आपण आपल्या वयालाच दोष देतो.
वयाचे हे असेच आहे. वयम् मोठम् खोटम्! पण वयातील खोट काढत बसणेही खरे नाही. सत्य फ़क्त सध्याचे वय असते, आधीचे धुके , नंतरचे स्वप्न! असा विचार करा, सध्याचे वयही क्षणाक्षणाला धुक्यात जमा होते आणि दर क्षणाला समोरची स्वप्ने साकार होत रहातात. वयाची गंमत ह्यातच आहे.




