user

समाज

शिक्षणसंस्थांची पैसे कमविण्याची पद्धत

मागच्या आठवड्यातील स्थानिक दैनिक. त्यातील जाहिरात. एका खाजगी डी.एड. कॉलेजला शिक्षक पाहिजे म्हणून.
जाहिरातीत त्याच्यांकडलाच छापील अर्ज करावा अशी सुचना. त्या जाहिरातीत अर्जाची किंमत कोठेही उल्लेखलेली नाही.

माझा जवळचा मित्र एम.ए. बी.एड. झालेला. त्याने आज मला-शनिवारी सुटी-असल्याने मुलाखतीस बरोबर येण्याची विनंती केलेली. सकाळी १० वाजता नाशिकरोडला निघालो. कॉलेजच्या स्थळी ह्ह्ह्ह्ह्ही गर्दी. ५००-६०० जण/ जणी.

मित्राला अर्जासाठी रांगेत उभे केले अन आस्मादीक रिकामपणाची कामगीरी करण्यासाठी मोकळी झाली. एका खिडकीत अर्ज देणे चालू होती. रांगेच्या तोंडाशी गेलो. कुण्ण्णीच 'ओ मागे व्हा, आम्हीपण लायनीत आहोत' असे ओरडले नाही. आश्चर्य वाटले. रांगेच्या तोंडाशी असलेल्या एका मुलाला विचारले, "काय रे बाबा, अर्ज फुकट आहे का?" त्याने उत्तर दिले, "नाही हो, रु. १०० ला अर्ज मिळतो आहे". टाळकेच सटकले.

पुन्हा मित्राकडून जाहिरात घेतली अन काळजीपुर्वक बघीतली. त्यात अर्जासाठी कुठेही किंमत लागेल असा उल्लेख नव्हता. एका जणाकडून अर्जाचा नमूना बघीतला तर ती एक झेरॉक्स होती. अन त्यात कोठेही "अर्जाची किंमत: रु. १००/-" असा उल्लेख नव्हता. रांगेच्या तोंडाशी बराच वेळ उभा राहिलो. मित्राचा अर्ज मीच विकत घेवू शकत होतो पण मित्राचा नंबर जवळच आलेला होता अन नक्की काय चालले आहे याचा मला तपास करायचा होता. आतील कारकून अर्ज रू. १००/- घेवून देत होता अन तसा त्याच्या रजिस्टरमध्ये नावाची नोंद करत होता.

माझा असलाच मागचा अनुभव जिव्हारी लागलेला होता. आज नडायचेच ठरवले.

निट बघीतले की, अर्ज विक्री करून तो कारकून अर्जाच्या किंमतीची स्थळपावती देत नव्हता. तसेच भरलेला अर्ज स्विकारून त्याची स्विकृती पावतीही देत नव्हता. अन वर सांगितल्याप्रमाणे त्या जाहिरातीत अर्जाची किंमत कोठेही उल्लेखलेली नव्हती.

मित्राने अर्ज घेतला अन मी त्याला 'तू अर्ज तर भर तोपर्यंत आलोच' म्हणून मी तडक प्रिंसीपलच्या कॅबीन कडे गेलो. एक शाळकरी मुलगी आत जावू नका म्हणत होती. टाळलं तिला.

प्रिंसीपलांना विचारले की 'सर अर्जाची किंमत कोठेही नाही, रिसीट नाही, अ‍ॅक्नॉलेजमेंट नाही' काय करायचे? इंटरव्हूनेच भरती होईल ना? की इतर संस्थांसारखी नावाला जाहिरात अन नावाला मुलाखत. प्रिंसीपल बोलले, "तुम्हाला अर्ज घ्यायचा असेल तर घ्या. इंटरव्ह्यू होईल मगच निवड. अर्ज घेण्याचा आग्रह नाही". पुन्हा टाळके सरकले.

पत्रकार मेव्हण्यांना फोन लावला. बोलणे झाले. दोनच पर्याय. माहीतीचा अधिकार- एक दिड महिना थांबणे किंवा पोलीसात तक्रार- लगेच अ‍ॅक्शन. कोरा कागद घेतला. पोलीसांना अर्ज रखडला-बेकायदेशीर रित्या अर्ज विक्री चालू आहे. अर्ज लिहीतांना मित्राचे ४ मोबाईल आले. त्याला 'गाडीचे इंजीन ऑयल बदलतो आहे' असे सांगितले. तेव्हढ्यात तिन जण डोकावले. त्यांचाही संताप होत होता. आग वाढलेली होती.

इकडे माझे फोनवर फोन चालू होते. मनसेच्या श्री. प्रमोद वझरेंना ला फोन लावला. त्यांनी "५ मिनीटात परत तुला फोन करतो सांगितले".

ईकडे आम्ही चौघे तयार झालो अन पोलीस स्टेशनात आलो. पोलीस स्टेशनात ठाणे अंमलदाराकडे जा, सब इन्सेक्टरसाहेबांकडे जा सुरू झाले. एकाने त्याच्या ओळखीच्या पोलीसाला फोन लावला. एक इन्सेक्टरांनी अर्ज वाचायला घेतला. तक्रार अर्जाची डुप्लीकेट साठी झेरॉक्स आणायला सांगितली. मी लगेच झेरॉक्ससाठी पळालो. भारनियमन. दोन दुकानांचे झेरॉक्स मशीन बंद. नविन भाग. माहीत नाही. पळतच चालू झेरॉक्स शोधले.

तेव्हढ्यात वझरेंचा फोन: "अरे नाशिकरोड चे मनसेचे विभागीय अध्यक्ष संजय गायकवाड साहेबांना फोन करून सांगितलेले आहे. हा हा त्यांचा नंबर घे. त्यांना फोन कर." लगेच फोन केला. ते म्हटले की "मी निघालोच आहे. तू कोठे आहे. लगेच ये."

मी अन एक जण पोलीस स्टेशनातून निघालो अन कॉलेजवर आलो. ते अन त्यांचे सहकारी श्री. सुदाम ताजनपुरे, श्री. राजेश पंडित आदी वाटच पाहत होते. त्यांनी अर्ज, जाहिरात बघीतली. बॉल आपल्या कोर्टात होता. सगळे सरळ इंटरव्ह्यु चालू असलेल्या रूम मध्ये गेलो. प्रिंसीपल साहेब, शाळकरी मुलगी, आणखी एक नन चा ड्रेस घातलेली मुलगी अन एक जण इंटरव्ह्यू घेत होते. काय मुलाखत होते ते आपल्याला माहितच आहे. फालतूगिरी सगळी.

संजय गायकवाड साहेबांनी सरळ मुद्यालाच हात घातला. 'सर अर्जाची किंमत कोठे आहे? अर्जाची रिसीट कोठे आहे? आदी.' सर गोलमाल उत्तर देत होते. 'जाहिरातीत अर्जाची किंमत छापायचे राहून गेले, संस्थेचा रजिस्ट्रेशन क्रमांक टाकायचा विसरलो' आदी. बोलाचाली वाढली होती. माझा संताप झाला होता. प्रिंसीपलांना मी सगळी परिस्थीती समजावून सांगितली. इतरांनी मला शांत राहण्याचा सल्ला दिला.

सरांना त्यांची चुक समजलेली होती तरीही आपलाच मुद्दा लावून धरत होते. 'अर्ज तर फुकट देणे चालू आहे' असेही ते बोलले. माझ्या बरोबरीचे तिघे उमेदवार बोलले की सर आम्ही तर अर्जासाठी शंभर रुपये दिलेत. सर खोटे पडले. सर म्हणाले काय करायचे मग आता? तुम्ही सांगाल तसे करू. संजय गायकवाडांनी तोडगा काढला. सर, अर्जाची घेतलेली किंमत तुम्ही सगळ्या मुलांना परत करा. अन त्यांच्याही मुलाखती घ्या. शाळकरी मुलगी बोलली की मागे इतरही संस्थांनी अशा जाहिराती दिल्या होत्या. तिला तिथल्यातिथे गप्प केल. शेवटी सरांनी कारकूनाला बोलावले. त्याला अर्ज फुकट देण्यास व पैसे परत करण्यास सांगितले.

माझ्या मित्राला आता तेथे मुलाखतीस रस उरला नाही. त्याने लगेच पैसे परत घेतले. अन आम्ही निघालो. इतक्यात पोलीस स्टेशनातून इतर दोघे तक्रार अर्ज परत घेवून आले.

श्री. संजय गायकवाड लगेचच मला अन मित्राला 'शिक्षक उपसंचालकांकडे' घेवून गेले. त्यांना गायकवाड साहेबांनी परिस्थीती समजावून सांगितली. त्यांनी लगेचच संस्थेची मान्यता आहे की नाही याचे तपासणीचे आदेश दिले तसेच असले पैसे घेण्याचे काहीही अधिकार संस्थांना नसल्याचे स्पष्ट केले.

श्री. संजय गायकवाड यांनी मग लगेच तक्रार अर्ज घेतला अन "मी पोलीसांकडे जातो" असे सांगितले. त्यांनी तक्रार अर्ज पोलीस निरीक्षक श्री. सपकाळ साहेबांकडे दिला आहे. पोलीसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. आता पुढील कार्यवाही चालू आहे.

एका संस्थेत तर टक्कर दिली. पैसे परत मिळवून अर्धी लढाईच जिंकल्यासारखे वाटते. जेव्हा असले प्रकार पुर्णपणे बंद होत नाही तेव्हा पुर्ण लढाई जिंकली असे होईल.

ज्या विद्यार्थ्यांना नोकरी नाही त्यांच्या कडून मग्रूर संस्थाचालक साध्या अर्जाचीही किंमत घेता अन एक प्रकारे विद्यार्थ्यांना लुबाडतात. मागच्याच महिन्यात नाशकातल्या एका मोठ्या संस्थेने हजारो अर्ज विक्री करून लाखोंची माया जमवीलेली होती.

आता या सगळ्या कारभारात काही प्रश्न उद्भवतात.

१. सामाजीक शिक्षणसंस्थांचे असले 'छापील अर्जांचे' प्रकार म्हणजे धंदेवाईक प्रकार आहेत हे आपण म्हणू शकतो काय?

२. मी तो अर्ज बघीतला तर त्यात काही जगावेगळी माहीती विचारलेली नव्हती. तेच ते रकाने जे सर्वसामान्य अर्ज भरायला लागतात तेच होते. तो अर्ज छापायला केवळ १ ते १.५० रु खर्च आला असता. त्याच अर्जाची किंमत रु. १००/- होवू शकते काय? त्यात 'मला आपल्या संस्थेच्या सगळ्या अटी मान्य आहेत' असा उल्लेख होता अन मुख्य म्हणजे अटीच दिलेल्या नव्हत्या. हे म्हणजे कोर्‍या कागदावर सही करण्यासारखे होते.

त्याचबरोबर अर्जासोबत सगळ्या कागदपत्रांच्या ३ प्रतीलीपी आणि उमेदवाराचे ३ छायाचित्र जोडायचा खर्च पण ध्यानात घ्या.

५. माझ्या माहीतीप्रमाणे बि.एड, डि.एड. पदवी धारक बेरोजगारांची संख्या ध्यानात घेवून व असलेल्या जागा बघून कमीतकमी ५०० अर्ज जरी पकडले तरी 'विद्यामंदिरास' रू. ५००००/- ची घसघशीत कमाई होणार होती.

६. बी.एड, डि.एड. पदवी धारक हा काही निरीक्षर नसतो. त्यास कमीतकमी अर्ज तर 'लिहीता' येतच असणार. असे असतांना 'छापील अर्जाची' गरज काय? त्यांना अर्जाचे छापील स्वरूपच हवे होते तर पेपरध्येच तशा अर्जाचे स्वरूप देवून व ते बेरोजगारांनी टाईप करून घेवून - बेरोजगारांच्या पालकांचे पैसे वाचवता आले नसते काय?

मान्य आहे की, एवढे अर्ज स्वि़कारणे, प्रोसेस करणे, नोकरी देणे हे 'शिक्षणसंस्थेचे' 'काम' आहे. पण ते काही फुकट काम करणार नाहीत. नोकरी लागलेल्या (किमानपक्षी जाहीरात येण्याआधीच लागलेल्या) उमेदवारांकडून काही लाख घेतलेच असतील ना?

अशा प्रकारे एका मोठ्या एक नोकरीसाठी अर्ज विक्रीचा पायंडा पाडला जातोय त्याचे काय? अगदी सरकारी अर्ज देखील आजकाल रूपये २५०/- च्या ड्राफ्ट सोबत जोडले जातात.

सरकार बेरोजगारांची दखल घेईल काय?

- सचिन बोरसे (पाषाणभेद उर्फ दगडफोड्या)
३१/०७/२०१०

हनी बंचेस ऑफ ओट्स!

खाण्याच्या सीरिअल्सचे दोन रिकामे, जुने बॉक्सेस हे माझा अतिशय मौल्यवान ठेवा आहे हे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

१९९९ साली जेव्हा मी भारतातून मिशिगन टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटीत अमेरिकेकडे यायला निघालो तेव्हा माझ्या खिशात पहिल्या सत्राच्या फीला पुरतील इतके $९३०० चे प्रवासी चेक्स होते. माझ्या शिक्षणाकरता आमच्या घरावर कर्ज काढायची तयारी माझ्या वडिलांनी चालवलीच होती परंतु माझ्या मनात मात्र माझ्या शिक्षणासाठी घरच्यांवर हा कर्जाचा डोंगर नको हे ठाम होते!

पुढची चार वर्षे मी सफाई कामगाराचा मदतनीस ते प्रयोगशाळेतला असिस्टंट अशी सर्व प्रकारची कामे केली. हातातोंडाची गाठ पडावी ह्याकरता आठवड्याला ७ डॉलर अशा अतिशय तुटपुंज्या रकमेत मी दिवस काढले. त्यावेळचे आठवड्याभराचे सगळे हिशोब माझ्या आठवणीत अगदी पक्के कोरले गेलेत - दूध $१.१९, ब्रेड $०.८९, टूथपेस्ट आठवड्याच्या सरासरीने $०.३४, साल्वेशन आर्मीमधले डोनेशन केलेले कपडे, तेही असेच सरासरी $०.२७ - चुकूनमाकून कधी $७ पेक्षा कमी खर्च झालाच तर जमलेली चिल्लर मी जिवापाड जपत असे, अगदी पेनी अन पेनी! युनिवर्सिटीतल्या वाचनालयातलीच पुस्तके वापरण्याखेरीज माझ्याकडे मार्ग नव्हता इतकेच नव्हे तर रेस्तरॉंमधल्या भांडी धुण्याच्या कामाचे मोल मला फार होते कारण त्यानंतर मिळणारे "मोफत जेवण"! हळूहळू मी सरावलो तसा नवीन संधींचा शोध घेण्याची मानसिकता तयार झाली. २००१ साली मी मॅग्ना-डॉनेली कॉर्पोरेशन ह्या कंपनीकडे बिनपगारी समर इंटर्न म्हणून रुजू झालो.माझ्या जिवापाड काम करण्याने तीनच महिन्यात मला पूर्णवेळ पगारावर बढती मिळाली ती पुढचे ९ महिने!

डिसेंबर २००३ मधे जेव्हा मला पदवी मिळाली तेव्हा माझ्या बचत खात्यामधे शिल्लक होती $२२९ पण माझ्या डोक्यावर एका पेनीचेही कर्ज नव्हते! आठवड्याच्या शेवटी वाचवलेल्या पेनीज जमा केल्या तर $३.२४ जमले होते, अगदीच किरकोळ रक्कम होती ती पण माझ्या पदवीच्या पहिल्या वर्षापासून जे 'हनी बंचेस ऑफ ओट्स' चे दोन बॉक्सेस मला खुणावत होते ते घेण्याइतकी नक्कीच!

अजूनही ते बॉक्सेस मी जिवापाड जपलेत कारण माझ्या आयुष्यातला एक अतिशय कठिण काळ, ज्यावेळी मला माझे शिक्षण, माझा वीसा, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून काम करण्याचे मर्यादित तास, एका संपूर्णपणे अपरिचित देशात राहण्याचा ताण ह्यांनी माझे दूरगामी लक्ष्य ढळू नये ह्याकरता मला बळ दिलं, हे सगळे सगळे मला त्या दोन खोक्यांमधे दिसतं!
त्या चार वर्षात कमावलेल्या आत्मविश्वासामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधल्या दोन पूर्णवेळ समर इंटर्नशिप्स मी नाकारु शकलो आणि अ‍ॅनालॉग डिवायसेस ह्याच कंपनीत समर इंटर्नशिप मिळवली कारण मला माझ्या आवडत्या इलेक्ट्रॉनिक्सच्याच क्षेत्रात काम करायचं होतं! तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा अ‍ॅनालॉग डिवायसेसच्या क्लायंट केअर ग्रुपमधे येण्याची ऑफर जेव्हा मला मिळाली तेव्हा माझ्यासमोर पेच होता की मी नुकतीच मिळवलेली प्रॉजेक्ट लीडरशिपची जबाबदारी घेऊ की ती ऑफर स्वीकारु? पुन्हा एकदा माझ्या तात्कालिक चिंतांवर मात करीत मी ती ऑफर स्वीकारली कारण त्यामुळे मला कंपनीची बिझनेस ऑपरेशन्स कशी चालतात हे बघण्याची संधी मिळणार होती. माझे आवडते 'हनी बंचेस ऑफ ओट्स' खातखातच मी हा निर्णय घेतला होता हे सांगणे न लगे!

---------------------------------------------------------------
(आमच्या कंपनीमधला एक इंजिनिअर शिकागो युनिवर्सिटीत एम बी ए करायला निघालाय. त्याच्याशी बोलताना त्याने मला सांगितले की युनिवर्सिटीसाठी त्याने एक निबंध लिहिलाय त्यात त्याने स्वतःची कहाणी दिली आहे. ती वाचल्यावर मला आश्चर्य वाटले. त्याच्याशी आणखीन बोललो तेव्हा समजले की गेल्या ११ वर्षात तो भारतात फक्त एकदा जाऊ शकला कारण पैसेच नव्हते! वयाच्या १२ व्या वर्षी त्याची आई गेली तेव्हापासून मोठे होऊन अमेरिकेत शिक्षण घ्यायचे हा ध्यास त्याने घेतला. तो पूर्ण केला. गेल्या सहा वर्षातली बरीचशी कमाई तो पुढची दोन वर्षे एमबीए करण्यासाठी खर्च करेल आणि मग आणखीन मोठ्या पदावर काम करण्याची त्याची इच्छा पूर्ण होईल!
त्याला विचारुन मी त्या निबंधाचं भाषांतर मिपाकरांसाठी सादर केलं. हे करण्यामागे दोन उद्देश होते - एकतर सुस्थितीतल्या मुलामुलींना अशा कठिण परिस्थितीतून पुढे आलेल्या लोकांचे ताजे आदर्श डोळ्यांसमोर नसतात ते मिळावेत आणि दुसरे असे की अमेरिकेत येणारे सगळेच लोक हे पिसांच्या विमानावर बसून येतात आणि मजेत शिक्षण घेत गुबगुबीत खुर्चीत बसून नोकर्‍या करतात असा ज्या लोकांचा समज असेल तर तो काही अंशी दूर व्हावा!)

काला कोट चोर....

स्वाती ताईंच्या लोकलच्या गोष्टी वाचुन काही वर्षांपुर्वीची गोष्ट आठवली..

उन्हाळयाचे दिवस होते. मी आणी माझा एक मित्र स्लो ट्रेन ने ठाण्याहुन दादरला जात होतो.
दुपारची वेळ होती. डब्यात बर्यापैकी गर्दी होती. बसायला जागा नसल्यामुळे दरवाज्या जवळ वारा खात उभे होतो.

बाहेरच्याबाजुला तीन चार शाळकरी मुले लटकत होती. १०वीत शीकत असावीत. मस्त हींदीत गप्पा चालल्या होत्या.
गाडी सुटली की स्टेशनवर कुणाला तरी जोरात कॉमेंट मारणे चालु होते.

मुलुंडला गाडीत टी.सी. चढ्ले, कुर्ल्यापर्यंत एक दोन बकरे सापडले. या मुलांच्या गप्पा आता हे टी.सी. कसे चोर असतात, कसे पैसे लाटतात यावर चालु होत्या.

टी.सी. कुर्ल्याला उतरले. प्लॅट्फॉर्म वर अजुन दोन तीन टी.सी. होते. हे उतरलेले टी.सी. त्या प्लॅट्फॉर्मवरील टी.सी. जवळ जाउन उभे राहीले.

ट्रेन कुर्ला स्टेशन वरुन नीघाली आणी या दारातल्या मुलांपैकी एकाला काय लहर आली आणी तो टी.सी. कडे पाहुन मोठ्याने ओरडला "ए...कालाकोट चोर........."

सगळे टी.सी. त्या मुलांकडे बघु लागले. प्लॅटफॉर्म वरील ज्या लोकांनी ही आरोळी ऐकली ते टी.सी. कडे बघु लागले.
ट्र्न चालु झाल्यामुळे टी.सी. फक्त ऑकवर्ड होउन पहाण्या पलीकडे काही करु शकत नव्हते. ही मुले आपण काही मोठा परक्रम केल्यासारखी खुश झाली.

आणी अचानक चालु झालेली ट्रेन थांबली. हे एकदम अकल्पीत होते.

आता प्लॅटफॉर्म वरील टी.सी. ना जोर आला. त्यांच्यापैकी दोन तीन जण आमच्या डब्याकडे धावले. या मुलांची घाबरगुंडी उडाली. ते आता डब्यात आतल्या बाजुला घुसण्याचा प्रयत्न करु लागले. दोघेजण आत घुसले पण तो ओरडणारा आणी त्यांचा एक साथीदार त्या टी.सी. च्या तावडीत सापडले. दोघांचीही मानगुट पकडुन त्यांना टपलीत फटके मारत जीथे बाकी टी.सी. उभे होते तीकडे घेउन गेले.

दोन मीनीटांनी ट्रेन परत सुटली. पण दादर पर्यंत डब्यामधे बोलायचा हाच विषय होता.

रत्ना

परवा अचानक रस्त्यात ''ती'' दिसली. पाय ओढत, रेंगाळत चालणारी. कधी काळी भरगच्च दाट असलेल्या लांबसडक केसांमध्ये आता बर्‍याच रुपेरी छटा डोकावू लागलेल्या. चेहर्‍यावर एक म्लान उदासी. अंगावरची साडी तरी जरा बरी दिसत होती. मला समोर पाहून ती एकदम चमकलीच! काही क्षणांपूर्वी म्लान असलेल्या तिच्या चेहर्‍यावर ओळखीचे हसू फुलले. आत ओढलेले गाल रुंदावले आणि तिच्या खास शैलीत ती उद्गारली, ''ताई, आज इथं कुठं? कित्ती दिवसांनी भेटताय! '' मलाही तिला इतक्या वर्षांनी बघून खूप आनंद झाला होता. तिचा हात धरून मी म्हटलं, ''चल, भेटलीच आहेस तर तुला माझं नवं घर दाखवते! तुला परत आणून सोडते रिक्षाने हवं तर! ''
''नको नको, ताई! '' तिच्या स्वरात अजिजी होती, '' पुन्हा कधीतरी येईन ना मी! आज इथंच बोलू की! ''

रत्ना. आमच्याकडे ती पहिल्यांदा कामावर रुजू झाली तेव्हा मी आठ-नऊ वर्षांची असेन आणि ती कॉलेजच्या पहिल्या वर्षाला! किरकोळ शरीरयष्टी, सावळा वर्ण, लांबसडक केस आणि चेहर्‍यावर हसू असलेली तिची ती ठेंगणी मूर्ती आजही माझ्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी येते. कॉलेजची फी भरायला तिच्या आई आणि भावाने नकार दिला म्हणून ताठ मानेने, मिळालेल्या पगारातून पुढे शिकायचे ह्या जिद्दीने ती आमच्या घरी माझ्या नोकरी करणार्‍या आईला वरकामात मदत करायला आली आणि जणू आमच्या घरचीच होऊन गेली. भल्या पहाटे उठून घरात पडेल ते काम करायचे, भावाला व आईला व्यवसायात मदत करायची, कॉलेजच्या वेळा सांभाळायच्या, आमच्या घरचे काम आणि इतर दोन घरची कामे असे सर्व उरकून उरलेल्या वेळेत अभ्यास करणारी रत्ना. मला शाळेत सोडायला - आणायला येणारी, मी तिच्या बोलण्यातल्या चुका दुरुस्त केल्यावरही राग न मानणारी हसतमुख रत्ना. कामाला वाघ असणारी, शिकून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची स्वप्ने उरी बाळगणारी अल्लड रत्ना. दिसायला काळीसावळी आणि तिच्या पायात जन्मजात व्यंग होते म्हणून तिच्या घरचे सुरुवातीपासून तिचा राग राग करायचे. मोठ्या दोन बहिणींची लग्ने होऊन त्या सासरी गेल्या आणि व्यंगामुळे रत्नाला नीट स्थळेही चालून येईनात. रत्नाची त्यांच्या जातीबाहेर लग्न करायची तयारी होती, पण तिच्या भावाला व आईला ते मान्य नव्हते. तिच्या बाजूने बोलणारे तिचे वडील अकाली निवर्तल्यानंतर ती घरात एकटीच पडत गेली. तरीही तिने घरच्यांच्या लग्न करण्याच्या आग्रहाला बळी न पडता नेटाने आपले शिक्षण सुरू ठेवले होते. आमच्या घरी सर्वांना तिच्या ह्या जिद्दीचे खूप कौतुक वाटे. त्यामुळे तिला अभ्यासात, पुस्तके मिळवण्यात किंवा फी भरायला काही अडचण आली तर ती हक्काने आमच्याकडे मदत मागायला येत असे.

कालांतराने, मजल दरमजल करीत रत्ना एकदाची बी. ए. झाली. तिच्या घरी कोणालाच त्याचे फारसे कौतुक नव्हते. ना त्यामुळे भावाला कपड्यांना इस्त्री करून देण्याच्या त्याच्या व्यवसायात मदत होणार होती, ना आईच्या फुलांच्या व्यवसायात बरकत येणार होती! पण रत्ना आपल्या निकालावर खूप खूश होती. त्या खुशीतच ती मला एकदा त्यांच्या घरी घेऊन गेली. तिचे ते चंद्रमौळी घर, त्या छोट्याशा पत्र्याच्या खोलीत सहा माणसांचा रेटलेला संसार पाहिल्यावर मला तेव्हा एवढ्या छोट्या जागेत इतकी माणसे मावतात तरी कशी ह्याचेच नवल वाटले होते. त्या घरात रत्नाकडे होणारे दुर्लक्ष पाहिल्यावर माझी आई तिला सारखी आमच्याकडे पोळीभाजी खाऊन घ्यायचा आग्रह का करते ते जाणवू लागले होते. पण रत्नाला जणू आता ह्या वातावरणाची, वागणुकीची सवयच झालेली! गेली अनेक वर्षे तिने एकच स्वप्न उराशी बाळगले होते. तिला शिक्षिका होऊन शाळेत नोकरी करायची होती. आणि त्यासाठी तिचे पुढचे ध्येय होते बी. एड. पूर्ण करणे!

पण पुन्हा समोर दोन समस्या उभ्या ठाकल्या. पहिली समस्या म्हणजे बी. एड. प्रवेशाच्या फीसाठी लागणारा पैसा आणि दुसरी म्हणजे फायनलला तिला मिळालेला काठावरचा सेकंड क्लास. शेवटी तिने बालवाडी शिक्षिकेचा कोर्स करायचे ठरवले. मुलांमध्ये काम करायची तिला जबरदस्त हौस होती. त्यांना शिकवावे, घडवावे, त्यांच्यात रमून जावे असे तिला मनापासून वाटायचे. मग काय! बालवाडी प्रशिक्षणासाठी तिने तिचे सोन्याचे कानातले विकून पैसे उभे केले. पुढचे शिक्षण चालू ठेवायचे तर तिला अर्थार्जन करणे भागच होते. शहरातील सुप्रतिष्ठित समाजकारणी व राजकारणी अप्पाजी आमच्या परिचयातील होते. त्यांच्यापाशी रत्नाला चांगली नोकरी लावून देण्याविषयी शब्द टाकल्यावर त्यांनी तिला चिठ्ठी व तिची प्रमाणपत्रे घेऊन एक दिवस भेटायला बोलावले. तिथेच तिची ओळख सुभानरावाशी, अप्पाजींच्या धाकट्या लेकाशी झाली.

अप्पाजींच्या ओळखीने रत्नाला बर्‍यापैकी नोकरी तर मिळाली, पण सुभानरावाच्या आणि तिच्या भेटीगाठीही वाढू लागल्या. एक दिवस अप्पाजी आमच्याकडे 'सहज'च भेटायला म्हणून आले. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर त्यांनी थेट रत्नाची चौकशी करायला सुरुवात केली. त्यांना कारण विचारले तेव्हा त्यांनी नापसंतीने सांगितले की सध्या रत्ना आणि सुभान्या एकत्र भटकत असतात म्हणून! अप्पाजींना ही जवळीक अजिबात मान्य नव्हती. त्यांना रत्ना जातीने आणि परिस्थिती, पैसा, मान इत्यादींच्या निकषावर कोणत्याच बाबतीत आपल्या लाडक्या सुभानरावासाठी लायक वाटत नव्हती. शिवाय तिच्या पायातील व्यंगही होतेच! रागावलेल्या अप्पाजींची कशीबशी समजूत घातल्यावर ते एकदाचे घरी गेले, पण ''त्या रत्नाला समजावा, ह्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, '' अशी धमकी देऊनच!

दोनच दिवसांनी रत्नाला सांगावा देऊन आमच्या घरी सुभानरावाविषयी विचारणा करण्यासाठी बोलावून घेतले गेले. रत्ना आपल्या निवडीवर व निर्णयावर ठाम होती. ''सुभानराव आणि मी लग्न करायचं ठरवलंय. त्यांनी तसं वचन दिलंय मला. मी अप्पाजींच्या धमक्यांना घाबरणार नाही! सांगा त्यांना तसं! '' खरं तर सुभानरावाची कथा वेगळीच होती. सुप्रतिष्ठित, सधन घरातील वाया जाऊ पाहत असलेला तो लाडावलेला मुलगा होता. घरच्या दुधाच्या धंद्याकडे, शेतीकडे बघायचा तसा थोडाफार! पण त्याचा जास्त वेळ बाईक उडवण्यात, चकाट्या पिटत नाक्यावर बसून टवाळक्या करण्यात आणि पैसे लावून जुगार खेळण्यात जायचा. शिक्षणही जेमतेम दहावीपर्यंत झालेलं. हां, मात्र दिसायला तसा रुबाबदार होता आणि राहायचाही झोकात. गळ्यात सोन्याचा रुंद गोफ, हातात कडं, कायम कडक इस्त्रीचे आधुनिक ढंगाचे कपडे, परफ्यूम.... रत्ना पूर्ण गुरफटून गेली होती त्याच्यात. सुभानरावात काही दोष आहेत, तो दिसतो तितका साधासुधा नाही, सरतेशेवटी तो आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर जाणार नाही, सध्या तो वडिलांनी त्याचे पंख जरा कातरलेत म्हणून बिथरलाय आणि त्यांना उचकवायला अशा हरकती करत आहे हे मानायची तिची तयारीच नव्हती! तो जे सांगेल ते ती आनंदाने करत होती. इतके, की तिचा कोर्सही अर्धवट सोडला होता तिने! अप्पाजींच्या नाकावर टिच्चून दोघंही बरोबर भटकायची! तिला समजावायला गेल्यावर तर तिने आमच्याकडे येणेच बंद करून टाकले! रस्त्यात दिसली तरी ओळख देईनाशी झाली.

आणि एक दिवस अचानक रत्ना अस्ताव्यस्त, विस्कटलेल्या अवतारात आमच्या दारात येऊन उभी राहिली. डोळे रडून रडून सुजलेले, चेहर्‍यावर वेडसरपणाची झाक.... तिची अशी अवस्था पाहून आम्हाला धक्काच बसला! सुभानरावाने तिला फसवून त्याच्या जातीतल्या, श्रीमंत घरातल्या दुसर्‍याच पोरीशी लग्न केले होते.
''मला पार लुटलं हो त्यानं! पार फशिवलंन! माझी इज्जत गेली, आब्रू गेली.... आता मी काय तोंड दाखवू? कशी घरी जाऊ? '' तिचा तो घायाळ टाहो काळीज चिरून जात होता. आईने तिला कसंबसं सावरलं. ह्यातूनही काहीतरी मार्ग निघेल असं आश्वासन दिल्यावर मग ती जरा शांत झाली. उध्वस्त अवस्थेतच तिच्या घरी परतली. एकदा रॉकेल अंगावर ओतून घेतले असेच निराशेच्या भरात! पण तिची भाचरे येऊन बिलगली तिला तसा तिचा बांध फुटला. काही महिन्यांनी परिस्थितीतून जरा सावरल्यानंतर सुभानरावावर फसवणुकीचा दावा ठोकता येईल का, ह्यासाठी ती आमच्या ओळखीच्या एका वकिलांना भेटून आली. पण त्यांनी तिला स्पष्ट शब्दात अशा दाव्यांमध्ये खर्च होणारा पैसा, वेळ व मनस्ताप -बदनामीची कल्पना दिल्यावर तिने सुभानरावावर दावा करण्याचा विचार रहित केला. शिवाय अप्पाजींचा राजकीय प्रभाव बघता अशी केस कोर्टात उभी राहील की नाही ह्याबद्दलही शंका होती.

''आता काय करणार आहेस? '' माझ्या आईने तिला विचारले.
''काय करणार वैनी! अर्धवट राहिलेला कोर्स पूर्ण करीन म्हणते. बघूयात देवाच्या मनात तरी माझ्यासाठी काय आहे ते! '' रत्नाच्या स्वरात कडवटपणा ठासून भरला होता.
एका अनामिक जिद्दीने भारलेल्या कडवटपणाने रत्नाने तो कोर्स पूर्ण केला खरा, पण मधल्या वर्षा-दोन वर्षांच्या काळात स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून तिने स्वतःची पार वाताहत करून घेतली. रोज कसलेतरी उपास करायची. खाण्यापिण्याकडे लक्षच द्यायची नाही. आधीच तिची किरकोळ शरीरयष्टी! आता तर ती अजूनच कृश दिसू लागली. डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली. माझ्या आईला तिची जास्तच काळजी वाटू लागली. डॉक्टरांकडे जबरदस्तीने घेऊन गेल्यावर आणि त्यांनी तिला भले मोठे लेक्चर दिल्यावर मग कोठे ती जरा ताळ्यावर येऊन वागू लागली.

आताशा तिची आमच्याकडे पूर्वीसारखी ये-जा राहिली नव्हती. बघता बघता तिचा अल्लडपणा ओसरून चेहर्‍यावर, वागण्यात एक प्रकारचा पोक्तपणा आला होता. जणू मोकळेपणाने हसायचे ती विसरूनच गेली होती. अशीच एके दिवशी ती अवचित संध्याकाळी भेटायला म्हणून घरी आली. बोलता बोलता दोन गोष्टी अगदी सहज बोलल्यासारख्या सांगितल्या तिने. पहिली गोष्ट म्हणजे सुभानराव तिला भेटायला आला होता. खास तिची माफी मागायला. त्याच्या लहान बाळाला कसलासा असाध्य आजार झाला होता म्हणे! आणि सुभानरावाला वाटत होते की त्याने रत्नाला जे फसवले त्याचेच हे प्रायश्चित्त आहे! त्यामुळे तो तिची माफी मागायला आला होता.
''मग? तू काय म्हणालीस? '' आईने तिला विचारले.
तशी खांदे उडवीत रत्ना उद्गारली, ''मी काय म्हणणार वैनी!! मी काही एवढी वाईट नाही त्याच्या संसाराला शाप द्यायला. तिथंच माफ करून टाकलं मी त्याला, आणि सांगितलं, पुन्हा चेहरा दाखवू नको म्हणून, नाहीतर पायताणानं हाणून काढेन! '' तिचे ते बोल ऐकल्यावर माझ्या आईच्या तोंडावर हसू फुटल्याविना राहवले नाही.
त्या दिवशी अगदी निघायची वेळ आली तशी रत्ना हळूच म्हणाली, '' मी माझं लगीन ठरीवलंय. ''

त्या खुळ्या पोरीने सुभानराव भेटून माफी मागून गेल्यावर तिरिमिरीत एका बिजवराशी लग्न करायचे ठरविले होते. एके काळी तिचे कोणाशीही लग्न लावायला तयार असणारे तिचे आई-भाऊ ह्या लग्नाविषयी जरा साशंक होते. पण रत्नाचा निर्णय एकदा झाला की तो झालाच! त्यामुळे ठरविल्याप्रमाणे तिने त्या माणसाशी आळंदीला जाऊन लग्न केले. लग्नानंतर एकदा आम्हाला ती घरी भेटायला आली तेव्हा तिच्या चेहर्‍यावर पुन्हा ते सुपरिचित हसू खेळत होते. आईने तिची कौतुकाने खणानारळाने, नवी साडी देऊन ओटी भरली आणि ''एका मोठ्या अरिष्टातून पोरगी सुटली म्हणायची! '' असा सुटकेचा नि:श्वासही टाकला.

पण नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. लग्नानंतर आठ-दहा महिन्यांतच रत्ना नवर्‍याच्या जाचाला, मारहाणीला आणि व्यसनाला कंटाळून पुन्हा माघारी आली. घरी समजूत काढायला ह्या खेपेला तिची आईही नव्हती. लेकीच्या लग्नानंतर दोनच महिन्यात ती परलोकवासी झालेली. भावाच्या घरात, त्याच्या संसारात आपला अडथळा होऊ नये असा आटोकाट प्रयत्न करत, स्वतःला आक्रसून घेत पुन्हा एकदा रत्ना एका बालवाडीत ''ताई'' म्हणून रुजू झाली.

अवचितपणे तिला रस्त्यात भेटल्यावर ह्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. मधल्या वर्षांमध्ये बरेच काही घडून गेले होते. त्या घटनांच्या अंगखुणा वागवत रत्ना माझ्यासमोर आज उभी होती.
''काय करतेस सध्या तू? '' ह्या माझ्या प्रश्नावर मंदसे हसत रत्ना उत्तरली, ''काय करणार ताई! तीच ती शाळेतली नोकरी. आणि बी. एड. पूर्ण करते आहे! ''
''आँ?!!! '' आता आश्चर्यचकित होण्याची माझी खेप होती.
'' तुम्हाला नवल वाटलं असेल ना ताई? आता ह्या वयात मी काय शिकणार म्हणून! पण मला सारखं वाटायचं, आपण बी. एड. करायचं स्वप्न अर्धवट सोडलं ते चांगलं नाही केलं. आता मी ते स्वप्न पूर्ण करत आहे. ''
''आणि घरी? भाऊ काय म्हणतो? '' मी हलकेच विचारले.
''भाऊ? तो काय म्हणणार? त्याची पोरं मोठी झाली आता. ती आपल्या आत्याची बाजू घेतात. त्याला म्हणतात, बाबा, तुम्ही न्हाई शिकलात तर न्हाय, पण आत्याला तर शिकू देत! ''
''वा! गुणी आहेत गं तुझी भाचरं! '' माझ्या तोंडून नकळत कौतुकाची दाद दिली गेली.
''ताई, आईगत माया केली आहे मी त्यांच्यावर! आता तीच माझी लेकरं! '' रत्नाचा स्वर पुरता कौतुकात भिजला होता.
''खरंच, चलतेस का गं घरी? '' मी पुन्हा एकदा न राहवून तिला विचारलं, ''आईला खूप बरं वाटेल तुला भेटून! ''
रत्नाचे डोळे क्षणभर पाणावले. पण मग लगेच तिने स्वतःला सावरले आणि उद्गारली, ''वैनींना माझे नमस्कार सांगा. त्यांना म्हणावं आता ही रत्ना बी. एड. झाल्याचे पेढे घेऊनच तुम्हाला भेटायला येईल! ''

तिला आमचा नवा पत्ता, फोन नंबर देऊन झाल्यावर काही क्षण दोघी तशाच उभ्या होतो. शांत, निःशब्द! मग ती पुन्हा हसली, ''निघते आता ताई! घरी उशीर होईल. '' त्या हास्यात मी उगाचच काहीतरी शोधत राहिले. माझा निरोप घेऊन ती पुन्हा पाय ओढत आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागली. तिच्या पाठमोर्‍या मूर्तीकडे मी कितीतरी क्षण तशीच बघत उभी होते. मनात कोठेतरी तिच्यावरच्या अन्यायाविषयीची खंतही होती आणि त्याचबरोबर परिस्थितीशी झगडत, सन्मानाने जगू पहाणार्‍या तिच्या संघर्षाविषयी, तिच्या जिद्दीविषयी कौतुकाची सायही होती. प्रतिकूल परिस्थितीतही आशेचा चंद्रकिरण शोधणार्‍या, हार न मानणार्‍या तिच्या त्या वृत्तीला मी मनोमन सलाम केला आणि मार्गस्थ झाले.

-- अरुंधती

(सत्यकथेवर आधारित)

नाडी ग्रंथांवरील प्रथम आंतरराष्टीय अधिवेशनाचे वार्तांकन - दिवस दुसरा


नाडी ग्रंथांवरील प्रथम आंतरराष्टीय अधिवेशनाचे वार्तांकन - दिवस दुसरा


प्रागला नाडी ग्रंथाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाचा मान मिळाला. भारतात याच्या आधी दोन ठिकाणी नाडी ग्रंथांवर अधिवेशन भरवले गेले होते. २००७ साली पुण्यात व नंतर २००९ साली बडोद्यात. त्यावेळी काही कल्पनाही नव्हती की त्यानंतरचे अधिवेशन असे भारताबाहेर घडेल म्हणून.

दि ६ जून २०१०.

जास्त वेळ न दवडता अधिवेशनाचे पहिले सत्र माझ्या भाषणाने सुरू झाले. त्यात मी नाडी ग्रंथात सुचवलेले शांती दीक्षेचे उपाय करायची गरज व ज्यांनी ते केले त्यांच्या अनुभवांची कथने सादर केली.
त्यानंतर शिवषण्मुगमना पाचारण केले गेले. त्यांनी त्यांच्या बद्दल व नाडी वाचनाच्या अनुभवांबद्दल कथन केले. बालपणापासून त्यांनी कसे शिक्षण घेतले. कसून अभ्यास केल्यानंतर गेली २५ वर्षांत त्यांनी हजारोंच्या संखेने नाडी ग्रंथांचे वाचन कले आहे. त्यांनी सर्वात जास्त जपानहून येणाऱ्या दहा हजाराच्यावर लोकांची नाडी ग्रंथ कथने केल्याचे ऐकून श्रोते थक्क झाले. त्यांचा पलनी ह्या शिष्याने गेल्या १५वर्षात अनेक नाडी केंद्रातून काम करु नाव कमावल्याचे सांगितले. भाषांतरकार रवीने नाडी ग्रंथातील क्लिष्ट तमिळकथनांची सुंदर व समर्पक इंग्रजी शब्दरचनेत कथने करायची हातोटी कशी मिळवली ते कथन केले. आपली नाडी ग्रंथांची सेवा दहा वर्षांपेक्षा जास्त जुनी असल्याचे विनम्रपणे सांगितले.
शिवाने नंतरच्या आपल्या कथनाची सुरवात ओमकाराने केली. आम्ही त्याला म्हणून साथ दिल्यावर उपस्थित सर्वांनी ओमकार म्हणून सभागृहात एक गूढ गंभीर नाद विलक्षण प्रभाव पसरला. शिवाने पॉवेलची मैत्रिण मारियांच्या “धेनका” नावाच्या मातेचा अगस्त्यमहर्षींनी आपल्या नाडीग्रंथांत मदरमेरीच्या अंशाचा जन्म असल्याचे कथन, त्यांच्या प्रेमळ नजरेचा “दिव्यदृष्टी” म्हणून महर्षींनी केलेला गौरव ऐकून उपस्थितांपैकी धेनकांच्या कृपादृष्टीची जाण व महत्व आधीच माहित असणाऱ्यांनी टाळ्यांचा गजर करून आपली संमती दर्शवली.
दुपारच्या भोजनाच्या विश्रामात व नंतर लोकांचा गराडा व प्रत्येकाला आमच्याशी बोलायची उत्सुकता जाणवत होती. मात्र योग्य रुपांतरकार नसल्याने जे त्यातल्या त्यात इंग्रजीत बोलत होते त्यांच्यापाशी गर्दी होत होती. मधल्या काळात लोकांनी आपल्या शंका एका बॉक्समधे लिहून पाठवाव्यात असे सुचवल्याप्रमाणे अनेक विचारणा आल्या होत्या. त्याला वेळ देऊन नव्या सत्राची सुरवात झाली. बहुतेकांचा सुर काहीच माहिती वा अनुभव नसल्याने आमच्या कथनातील थक्क करणाऱ्या गोष्टींच्याबद्दल आणखी जाणून घेण्याचा होता.
त्यानंतर शिवषण्मुगमनी नटराजाच्या मुर्तींच्या गौरवचिन्हांनी जोसेफ, मेरिया, धेनकांना “होली मदर” असे गौरवून सत्कार केला. मी शालीं पाठींवर घालून त्यांना गौरवले. पॉवेलला मी एक गणेशाची एबस्ट्रॅक्ट रुपातील सुंदर फ्रेम देऊन सन्मान गेला. नंतर पॉवलनी माईक हातात घेऊन आपले निवेदन केले. शेवटी मुख्य नाडी वाचक शिवानी अगस्त्य, वसिष्ठ, काकभुजंदर, शुक, कौशिक, भृगु आदि अनेक महर्षींच्या केलेल्या स्तुतीगायनाने पुन्हा सभागृह भारले गेले. त्यानंतर आमचे रीतसर आभार मानून अधिवेशनाची सांगता झाल्याचे जोसेफ श्रोटरनी जाहीर केले. असे हे पहिले आंतरराष्ट्रीय नाडी ग्रंथ अधिवेशन संपन्न झाले.

पाप्यांचा कहर !

विदेशात एकमेकांना भेटायच्या व अभिवादन करायच्या विशिष्ठ पद्धती आहेत. कधी हस्तांदोलन तर कधी एकमेकांजवळ अलगद येऊन गालाला हलकेच पुसट स्पर्ष गालाने वा ओठांनी करून भेटीचा आनंद व्यक्त करायची प्रथा आहे. आम्हाला याची सवय नसल्याने प्रत्येक जण मिठीत घेऊन दोन्ही गालांवर देणाऱ्या हलक्या चुंबनाची सवय करून घेता घेता आमची तारांबळ उडत होती. विशेषतः स्त्रियांच्याकडून मिळणाऱ्या तशा जोरदार प्रतिसादाला!
पलनी न राहवून म्हणाला, “ सामी, हमने अबतक अपने वाईफका भी इतनी बार लिया नही होगा इतना यहां एक दिन में हुवा!“
मी त्याला कौतुकाने मान डोलवून होकार भरला. नंतरच्या सहवासात नाडीवाचक अशा प्रतिसादाला समरसून उत्तर देऊ लागल्याने ते या प्रथेला रुळल्याचे जाणवले. असो.

त्यानंतर पुढील तीन आठवड्यात १००पेक्षा जास्त लोकांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केले. त्या प्रत्येकाची नाडी पट्टी मिळुन एक प्रकारे विक्रम झाला, असे खुदुद नाडी शास्त्रींचे मत होते. त्या प्रत्येकाला आपले नाव वअन्य माहिती कुठे व कशी पट्टीत लिहिलेली आहे ते त्यांना आवर्जून दाखवण्यात दोघे नाडी शास्त्री तत्पर होते. त्याचे सर्वांसाठी व्हीडीओ शूटिंग होत होते. काहींना अगदी पहिली नाडीपट्टी उघडल्यापासून रेकॉर्डिंग हवे होते तसे त्यांना वेगळे पैसे भरुन मिळवायची सोय होती. प्रत्येकाने इंग्रजीतून झेक भाषेसाठी भाषांतरकाराची आपापली सोय करायची होती.
शेवटच्या दिवसात या अधिवेशनाचा थोडक्यात अहवाल व फोटो रेजेनेरेस नावाच्या मासिकात छापुन आल्याचे कळले. फोटो खाली पहा. ते नीट करून लावायला कृपया मदत हवी आहे.
अनेक ठिकाणी आम्हाला झेक लोकांचे काही उच्चार व इंग्रजीतील कथन नीटसे समजत नसे. त्यामुळे या व पुढील कथनात थोडी सरमिसळ होण्याची शक्यता आहे.
प्राग कॉलिंग लेख मालिका पुढे चालू...

पिण्याचे पाणी -एक समस्या

सध्या पाण्यावरून धुमशान सुरू आहे. नळाचे पाणी (टॅप वाटर) विरुद्ध बाटलीबंद पाणी . आमच्या इकडे (आखाती वाळवंटात) बाटलीबंद पाण्याचा जास्त वापर आहे. त्यातही काही जणांनी घरी पाणी शुद्ध करण्याचे महागडे (किंमत सुमारे ३५,००० रुपये) यंत्र (वाटर प्युरिफायर)लावले आहे. त्यांचे म्हणणे हे की बाटलीबंद पाण्यापेक्षा असे शुद्ध केलेले पाणी आरोग्यास जास्त चांगले. कारण त्यातील विरघळलेले क्षार ( टी. डी. एस. – Total Dissolved Solids) चे प्रमाण बाटलीबंद पाण्यापेक्षा कमी आहे.
प्रत्यक्षात WHO च्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे टी. डी. एस. चे प्रमाण ५०० मिलि प्रती १००० लिटर (500 ppm) असायला हरकत नाही. हे प्रमाण बाटलीबंद पाण्यात १५०मिलि प्रती १००० लिटर ( approx 150 ppm) असते तर प्युरिफायर ने शुद्ध केलेल्या पाण्यात ५० मिलि प्रती १००० लिटर (approx 50 ppm) किंवा त्यापेक्षा कमी असु शकते. टी. डी. एस. चे प्रमाण आणि आरोग्य या विषयावर WHO मात्र जास्त प्रकाश टाकत नाही त्यामुळे स्वच्छ पाण्याचे निकष काय असावे हा प्रष्न अनुत्तरितच राहतो.
भारतात असलो की पाण्यामध्ये सरळ क्लोरिन चे चार थेंब टाकून पाणी गटागटा प्यायला मोकळे. टी. डी. एस. चे टेन्शन नाही की बॅक्टीरिया वा व्हायरस चा उपद्रव नाही. परंतु पाणी खळखळ उकळुन वा गाळुन पिणे किंवा तुरटि टाकून त्यातला गाळ वेगळ करण्याच्या आपल्या सनातन पद्धतीला अजूनही तोड नाही हे मात्र खरे.
आमचा सध्या मुक्काम पोस्ट कुवेत; त्यामुळे सध्या बाटलीवरच (पाण्याच्या !) अवलंबुन आहे, (गंमत म्हणजे इथे पाणी १५ रुपये लिटर आणि तेल म्हणजे पेट्रोल ९ रुपये लिटर भावाने मिळते )
असो.
मला अजूनही पाण्याचा हा मूलभूत प्रष्न सोडविता आला नाही, तुम्हाला कोणाला याचे खात्रिलायक निदान मिळले काय?
तुम्ही हा प्रश्न कसा सोडवला? मला जाणुन घ्यायला आवडेल.

बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान?

बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान?

सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला मोबाईल फोन ची इतकी सवय झालेली असते कि मोबाईल आपल्याजवळ नसला किंवा आपण तो घरीच विसरलो की जणू 'हेल्पलेस' झाल्याचे फिलिंग येते. मात्र, मोबाईल ची इतकी सवय होण्या मागे तो आपल्याला कनेक्टेड ठेवतो हे तर कारण आहेच, पण त्याशिवाय त्यातील इमेल, इंटरनेट, कॅमेरा, म्युझिक प्लेयर आदी अनेक सुविधांवर आपण अवलंबून असतो.

कधी कधी मात्र मोबाईलच्या अतिरेकाने आपले नुकसान संभवते - हे नुकसान परस्पर संबंधातील गैरसमज आणि त्यातून उद्भवणारे तणाव, मोबाईलच्या अतिवापराने विनाकारण आर्थिक नुकसान आदी प्रकारचे असते, तर कधी केवळ मोबाईल असल्यामुळेच तातडीने संपर्क साधता येतो आणि कोणाचा जीव बचावतो तर कोणाची मालमत्ता संकटातून बाहेर काढता येते.

आपल्या मिपाकरांना या बाबतीत काय अनुभव आहेत? मोबाईल फोन मुळे कधी खूप नुकसान झाले तर कधी अचानक आलेल्या संकटातून बाहेर निघण्यासाठी मोबाईल चा उपयोग झाला का?

मोबाईल फोन संदर्भातले आपले अनुभव, अविस्मरणीय घटना शेअर करा...

--
इंटरनेटप्रेमी,
मुंबई, इंडिया.

मी अनुभवलेली अमेरीका

माझ्या सासूबाईंचा अनुभव त्यांच्या शब्दात -

अमेरीकेत प्रवेश म्हणजे स्वर्गात प्रवेश मिळण्यापेक्षादेखील कठीण हे आजूबाजूंचांकडून ऐकून होते पण याचा साक्षात अनुभव आला काही एक वर्षांपूर्वी. कॉन्सुलेट्च्या फेर्‍या आणि त्यांचे १७६० फॉर्म्स भरता भरता नाकी नऊ आले होते, जीव मेटाकुटीला आला होता. दर वेळेस कॉन्सुलेटला जाते वेळी सिद्धीविनायकाचं दर्शन घडत असे आणि बाप्पाची आळवणी पण तो सोनियाचा दिनु काही उगवत नव्हता. आपल्या इंडीयन लोकांना तुमचा मुलगा जर "आय टी" मधे असेल आणि अमेरीकेत असेल तर व्हिसा मिळणं बरच सुकर होतं.
शेवटी एकदाचा तो सुदिन उगवला आणि अस्मादिकांच्या हाती इकडे अमेरीकेचा व्हिसा पडला आणि तिकडे जीव भांड्यात.
मग काय सामान सुमानाची बांधाबांध, मुलगा-मुलगी, सून-जावई, नाती यांच्याकरता खाऊ, कपडे, पुस्तकं, सीडीज घेणं यात दिवस कसे गेले ते कळलच नाही. उत्साहाला अफाट उधाण असे त्या दिवसात कारण कित्येक वर्षांनी लेक (मुलगा आणि मुलगी) भेटणार होते परत नातींना बघायची ओढ मनाला व्याकुळ करत होती.
हल्ली विमान प्रवास कमीत कमी तासांचा झाला आहे म्हणजे एअर इंडीयाच्या विमानाने तुम्ही लवकरात लवकर म्हणजे साधारण वीस एक तासात पोचता.
आणि अशाच एका संध्याकाळी मी अमेरीकेच्या डेलावेअर स्टेटच्या "नेवार्क" विमानतळावर पोचले. डेलावेअर हे फर्स्ट स्टेट म्हणून ओळखलं जातं जसं त्याच्या लगतचं न्यू जर्सी हे "गार्डन स्टेट" म्हणून ओळखलं जातं.अशी इथे पद्धत आहे. विमानतळावर मुलगा, मुलगी, जावई, सून, नाती स्वागतास हजर होते. माझ्या नातींना पाहून भरून आलं, त्या लांब प्रवासाचं चीज झाल्यासारखं वाटलं. पुढचे काही दिवस जेट लॅग आणि नव्हाळी कौतुकण्यात गेले. सरावायला काही दिवस म्हणा महीने लागलेच.
पण एकदा सरावल्यानंतर हळूहळू इथली जीवनपद्धती लक्षात येऊ लागली. इथे रेसिडेन्शिअल एरीआ मधे स्वतंत्र लहान घरं, मोठी घरं, रो हाऊसेस व अपार्ट्मेंट्स असे प्रकार दिसतात. घर लाकडी असतं व पूर्ण कार्पेटेड असतं. काही स्वतंत्र घरात मात्र सुबक , पॉलीशड लाकडी फ्लोरींग दिसतं. प्रत्येक डेव्हलपमेंटमधे मोकळी जागा किंवा छोटा पार्क असतो तर अपार्टमेट काँप्लेक्स मधे पोहोण्याचा तलाव आणि जिम. प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा ऊंच झाडांच्या रांगा असतात. प्रत्येक एरीयात लहानसे का होईना शॉपींग सेंटर असतेच जेथे तुम्हाला औषधविक्रेते, भाज्यांची दुकाने, कपड्यांची दुकाने, टपाल खाते याशिवाय "बेस्ट बाय", "होम डेपो" सारखी मोठी दुकाने दिसतात. मोठे मॉल जसे कॉस्को, वॉलमार्ट, बी जे हे देखील असतात.
इथले निसर्गसौंदर्य विलोभनीय आहे. फक्त हिरव्या रंगाने झाडे भरलेली नसतात तर विविध रंगांची उधळण असते त्यांच्या पानांवर. पीवळी, नारींगी, लाल, जांभळी अशी ही उधळण पाहून डोळे दीपून जातात. लोकं खूप फुलवेडी. जिकडेतिकडे फुलांचे ताटवे लावलेले आढळतात. ठरावीक ऋतूतील पक्षांचे स्थलांतर अणि त्यांची आकाशातील माळ पाहून मन थक्क होते. रॉबीन, कार्डीनल, ब्लू जे कितीतरी मोहक पक्षी आपल्या अगदी अंगणात बागडतात. ससे, हरणं, खारी अंगणात येतात.
टीपीकल अमेरीकन माणूस कसा दिसतो विचरलं तर मला सांगता येणार नाही कारण जगभरातील लोकांनी या भूमीली आपलं घर मानलं आहे. मग तो ब्राऊन कातडीचा भारतीय असो वा पिवळा चीनी असो, गोरा ब्रीटीश असो वा काळा आफ्रीकन असो त्यामुळेच की काय इथे अन्नपदार्थांचे खूप वैविध्य दिसून येते. अमेरीकन, चायनीज, कोरीयन, कॉन्टीनेंटल, जॅपनीज, इटॅलीअन इतकेच काय तुर्कीश, पेरुव्हीअन, आयर्लंड्चे वगैरे रेस्टॉरंट्स दिसतात. याखेरीज खास अमेरीकन कुप्रसिद्ध जंक फूड मिळणारी "मॅकडोनाल्ड, टाको बेल, डंकीन डोनट्स" आदि रेस्टॉरंटस आहेतच. भारतीय लोकंही उद्योजकतेत मागे नाहीत बरंका. इथे अपना बझार आहे, भारतीय रेस्टॉरंट्स आहेत.
इथे पेट्रोलला गॅस म्हणतात व गॅस स्टेशनवर पैसे भरून स्वतःच गॅस गाडीत भरावा लागतो. पण त्यातही वेगवेगळ्या स्टेटचे वेगवेगळे नियम. न्यू जर्सी मधे गॅस आपला आपण भरणं बेकायदेशीर आहे जे की इतर स्टेटमधे कायदेशीर आहे. इथे रोख पैशापेक्षा प्लास्टीक मनी ला चलती जास्त. प्रत्येक घरात जितकी मोठी माणसं तितक्या कार असतात. बससेवा उपलब्ध असते पण ठरावीक वेळेत आणि ठरावीक भागातच. साधारणतः पती-पत्नी दोघेही नोकरदार असतात. त्यामुळे लहान मुलं डेकेअर्स मधे जातात, "आफ्टर्स्कूल अवर्स" ची सोयदेखील असते . मुलांना शाळेतून नेण्या-आणण्याचं काम शाळा किंवा डेकेअर करते. शाळांमधेही "पब्लीक" व "प्रायव्हेट" शाळा असतात. पब्लीक शाळांना फी नसते तर प्रायव्हेट शाळांना भरमसाठ फी असते.
नोकरदार वर्ग ८ ते ५ कामावर असतो. शनिवार, रवीवार सुट्टी. इथला वीकेंड खूप छान असतो. सगळेच लोक मनमुराद आनंद लुटतात. बाराही महीने अधून मधून केव्हाही पाऊस पडतो. हिवाळ्यात गुडघा गुडघा बर्फ त्यामुळे उन्हाळ्यात लोक मजा करून घेतात, समुद्रकिनार्‍यावर, दूर दूर सहलीला जातात, बारबेक्यू करतात. एकंदर चंगळ असते. हिवाळ्यात जाड जाड जॅकेट घालून कंटाळलेली प्रजा उन्हाळ्यात लहान लहान कपड्यात शिरते.
यांचा मोठा सण ख्रिसमस फारच धामधूमीत साजरा होतो. घरांना रोषणाई, घारांसमोर देखावे, महीनाभर खरेदीला गर्दी.
ब्लॅक फ्रायडे हा मोठा सेल असतो तसेच ईस्टर, हालोवीन हे सणही धामधूमीत साजरे होतात.
बहुतेक कुटुंबे मोठी असतात. किमान २ अपत्ये असतातच. कुमारी माता, विभक्त पती पत्नी यांचे प्रमाण जास्त आहे. पण तरीही मी म्हणेन एकत्र कुटुंबेच जास्त दिसतात. बायका पुरुषांच्या बरोबरीने कामे करतात. स्त्रियांबद्दल औपचारीक आदर पाळला जातो.
एकदा मी मॉलमधून बाहेर पडत असताना एक वृद्ध जोडपंही बाहेर पडलं.आजी गाडीत बसतेवेळी , आजोबांनी पुढे होऊन गाडीचा दरवाजा उघडला. आजी गाडीत बसल्यावर आजोबांनी दरवाजा बंद केला व ते फिरून आपल्या बाजूच्या सीटवर येऊन स्थानापन्न झाले. त्यांना चालताना त्रास होत होता. मला हे पाहून खूप कौतुक वाटलं. दुकानात आत जातानाही मागून येणार्‍या व्याक्तीसाठी दरवाजा उघडा धरण्याची पद्धत आहे. कुठेही कितीही मोठी रांग असली तरी लोक शिस्तीत, शांत उभे असतात. स्वच्छतागृहे स्वच्छ असतात.
एकंदर मला अमेरीका भावली आहे . तडजोड जरूरआहे पण सकारात्मक दृष्टी ठेवली तर खूप काही आनंद मिळवण्यासारखं आहे इथे.

सौंदर्यास्वाद

सौंदर्य कशात नसतं? सगळ्यांत असतं, अगदी दगडाधोंड्यातही. परंतु त्यासाठी हवी सौंदर्यास्वादक दृष्टी. कलाकारी भावली की अदाकारी सुचते. त्यातूनच मग सौंदर्य मन लावून आस्वादण्याची नजर लाभते.
अशा सौंदर्यदृष्टीमुळेच कधी वेड्यावाकड्या काष्ठातून सौष्ठवाचे शिल्प वेड्यासारखे अवतीर्ण होते तर कधी फटकाऱ्‍यांच्या शिंतोड्यातून बिनतोड असे चित्र कँनव्हासवर आकार घेते. कोणाला शब्दांचे सौंदर्य वाचावेसे वाटते तर कोणाला भावलेली सुंदरता शब्दांसह वेचाविशी वाटते. असे सौंदर्यपूर्ण वेचे वाचकांना भुलवतात, झुलवतात अन् खुलवतातही. कोणाला झाडाच्या खोडाची गोडी तर कोणाला खुणावते फांद्यांवरची जोडी. लावण्यमयीच्या लावण्यातल्या खोडी कोणाला वेड लावतात. तर नट नट्यांची अभिनय बेडी कोणाला विळखा घालते. जितक्या प्रकारच्या व्यक्ती तितक्या सौंदर्यासक्ती...
सृष्टीसौंदर्याची तर बातच निराळी. तिथे दृष्टी समोर सृष्टी असते. कोणताही आडपडदा न ठेवता निसर्ग सौंदर्याचा बिनबोभाटपणे आनंद लुटता येतो. परंतु लुटालुटीची भाषा येणाऱ्‍या नजरा भलत्याच रंगात येऊन जातात. त्यांना वाचन लेखन मनन अशा त्रांगड्यात गुंतण्याची गरज वाटत नाही. अशा
सौंदर्यासक्त नजरा सरळ एखाद्या कट्ट्यावर बसून मृगजळीय आकृत्यांना कुरवाळण्यात धन्यता मानतात. ही मान्यता त्या कमनीय बांध्याकडून खोचक नेत्रांना मिळत नसली तरी त्या नजरतिराची गुण्यता हमखास होते. अमुक इतक्या नजरांनी आज आपल्याला न्याहाळलं. असा गुणाकार करीत ती सुंदरा मनोमन सुखावते.
घरी या सुंदरतेची माफक तारीफ झाली नाही की सौंदर्यवतीचा पारा चढतो.
'तुमचं आजकाल माझ्याकडे लक्षच नाही मुळी' या वाक्यातून ती बाहेरच्या शोधक नजरांचं सूचन करीत असते. तिच्या मनीचे सौंदर्यप्रशंसक भाव वेळीच ओळखून 'आज तू खूपच छान दिसतेयेस गं राणी!' अशा पठडीतले उद्गार तोंडातून बाहेर काढले नाहीत तर पाखरू बाहेरच्या दुनियेतच फडफडणार हे ओघाने आलंच. म्हणूनच प्रत्येकाकडे सौंदर्यदृष्टी असणं महत्त्वाचं.
सुंदरतेचे अवलोकन करतांना डोळ्यांत आश्चर्यमिश्रित भाव अन् ओठांत स्तुतिसुमनांचा वर्षाव साठलेला असावा. दाटलेल्या अचंब्याच्या शब्दांना मुखातून वाट करून दिली की कलाकारी किंवा अदाकारीचा थाट अफाटपणे आस्वादता येतो. तेव्हा कोणत्याही दिलखेचक सौंदर्याचा भाट असणे केव्हाही चांगलेच...
('मिश्किली' मधून)

औषध उतारे आणि आशिर्वाद

ग्रंथपरिचय- औषधं उतारे आणि आशिर्वाद

मंत्रतंत्र बाबा बुवांच्या गप्पा चाललेल्या असताना एका मित्राने एक पुस्तक वाचायला दिलं. काहीशा नाखुशीनेच मी ते पाहिल. औषधं, उतारे आणि आशिर्वाद. मनोविकारांचा मागोवा हे उत्तम पुस्तक लिहिणारे मानसोपचार तज्ञ डॊ श्रीकांत जोशी यांनी ते अनुवादित केल होत. मूळ पुस्तक Mystics, Shamans and Doctors डॊ सुधीर कक्कर यांच. डॊ. श्रीकांत जोशी यांना हे पुस्तक का अनुवादित करावस वाटल हे वाचताना त्यांची भुमिका समजली. ते म्हणतात," अनेक शहाणी-सुरती दिसणारी- म्हणजे असलेली म्हणायला हरकत नाही, अगदी सुशिक्षित, सुसंकृत उच्चभ्रु समाजातील मंडळी स्वामी, महाराज गुरु यांच्या कच्छपी कशी लागतात? मला अध्यात्मातले काही कळत नाही. परंतु यातले काही गुरु मला उघडपणे भोंदु दिसत होते. पण माझीच काही मित्रमंडळी मोठ्या भक्ती भावाने त्यांच्या पायावर डोके ठेवत होती. त्यातुन त्यांना काहीतरी मिळत होते हे निश्चितच." हे पुस्तक वाचताना आपल्या अंतर्मनातील खोल दडलेल्या विचारांना भावनांना समजुतींना हाका मारणारे विचार वाचत,ऐकत आहोत असे वाचकांना वाटेल. लेखकाचा पुस्तक लिहिण्याचा उद्देश हा मानसिक आरोग्य आणि मनोविकार यांच्याशी संबंधित अशा पारंपारिक भारतीय प्रथा आणी उपचार पद्धती यांचा अभ्यास करणे हा आहे. लेखक कुठल्याही वादात पडु इच्छित नाही. तीन वर्षे भारतात हिंडत या गोष्टीचा अभ्यास करीत असताना भेटलेले गुढ संप्रदायाचे गुरु, शामान, मांत्रिक,भगत,वैद्य आणि इतर पारंपारिक औषधोपचार करणारे हकीम, बाबा वगैरे लोकांच्या भेटी गाठी व चर्चेतुन तयार झालेला हा दस्त ऐवज आहे. पुस्तक वाचताना अनिल अवचटांच्या धार्मिक पुस्तकाची हमखास आठवण येते.

बाहेरची बाधा म्हणजे काय? भुते कशी झपाटतात! ती कशी उतरवली जातात! मंत्र तंत्र यात तथ्य आहे का हे सर्व झूट? महाराज, माता, स्वामी यांच्य शिकवणीतुन आपणास मनाची शांतता खरच लाभु शकते का? हजारो वर्ष चालत आलेल्या आयुर्वेदाच्या परंपरेचा निश्चित अर्थ काय? मांत्रिक,स्वामी,महाराज, माता यांच्याकडे हजारो भारतीय का धाव घेतात? या व अशा अनेक प्रश्नांच्या अंगाने घेतलेला एक धांडोळा म्हणजे हे पुस्तक.

पहिल्या भागात पत्तेशाह दर्ग्यातील पीरबाबा व त्यांची उपचार पद्धती. यात भुताखेताशी सामना करण्याची बाबाची पद्धत. बाबांचे रुग्ण याबाबत किश्श्यांसह माहिती व त्याचे मनोवेश्लेषण दिले आहे. जिन, सैतान, बला, फरिश्ता या भोवती बाबांचे तत्त्वज्ञान फिरते. बाबांच्या रुग्ण संवादात स्वप्नांना फार महत्व आहे.

भुतप्रेतांचे स्वामी ( बालाजीचे मंदिर) या प्रकरणात मंदिरात भरणारा पिडितांचा दरबाराचे वर्णन आहे.राजस्थान मधील भरतपुर जवळ हनुमानाचे बालाजी हे रुप आहे. इथे भुतांचा बंदोबस्त एखाद्या कोर्ट कचेरी सारखा असतो, प्रथम अर्ज करायचा म्हणजे डाळ तांदुळ लाडु याचा नैवेद्य पुजार्‍यामार्फत देवाला दाखवायचा पुजारी एक लाडु म्रुतीला स्पर्श करुन रुग्णाला खायला देतो. त्या लाडवातुन बालाजीची शक्ती रुग्णात प्रवेश करते व भुताला दरबारात प्रकट व्हायला भाग पाडते. याला पेशी म्हणतात. ही पेशी यशस्वी झाली नाही तर जरा वरच्या लेव्हलचा अर्ज. अर्थात याचा खर्च जास्त. यात अजुन काही देवतांना आवाहन केले जाते. मंत्र म्हणले जातात. मंतरलेले पाणी त्याला प्यायला दिले जाते. रुग्णाच्या अंगात आले कि पेशी यशस्वी झाली. मग पुढे देवदेवतांचा व भुतांचा सामना चालू होतो. यात शिव्या आक्रोश व फटके यांचा सामावेश असतो. एरवी शालीन वाटणार्‍या स्त्रिया घाणेरड्या शिव्या देवदेवतांना व नातेवाईकांना देतात. शेवटी अंगातले भुत वठणीवर येते व कबुली जबाब या शेवटच्या नाट्यांक चालू होतो. मग ते भुत स्वत:ची ओळख सांगत माफी मागत रुग्णाला म्हणजे झाडाला सोडत. रुग्ण मग वारंवार देवाच्या पाय पडतो. अगदी आपल्याकडच्या दत्तसंप्रदायाच्या गाणगापुरची आठवण येते.

लेखकाने बालाजी मंदिरात अठ्ठावीस जणांच्या दीर्घ मुलाखती घेतल्या होत्या. त्यातील पंधरा हिस्टेरिक केसेस होत्या. पुर्वभारतातील आदिवासी भगत व तिबेटी परंपरा यावर देखील लेखकाने लिहिले आहे.

दुसर्‍या भागात राधास्वामी सत्संग निर्मला माता व तांत्रिक पंथा बाबत लिहिल आहे. गुरु-शिष्य या परंपरेतील द्वैत नात्याचे पैलू यात उलगडले आहेत.सत्संगा सारखी सामूहिक प्रार्थना, प्रवचने, तत्वज्ञानाचा प्रसार, पारायणे गुरुभक्ती या सर्वातुन काय साध्य करायचे? गुरुची प्रार्थना करुन त्याच्याशी एकरुप होउन शिष्य संसाराच्या चिंतेतुन मुक्त होउ पहात असतात. माताजींच्या कुंडलीनि जागृती बाबत लेखकाने स्वत: घेतलेला अनुभव फार मजेशीर आहे.'ओम सक्षत मोक्षदायिनी सक्षत निर्मलादेवी' या मंत्राचा उतारा अंगातील फ्रॊईड उतरवण्यासाठी उपयोगी होता. निर्मला मातेच्या मते फ्रॊईडियन लोकांची डावी बाजु कमकुवत असते.

तंत्रशास्त्रात अघोरी वा अनाचारी वाटणा‍र्‍या लैंगिक वर्तनाच्या/ मानसतिकतेचा विचार इथे केला आहे. स्वत:च्या शरीरातले पौरुषत्व व स्त्रीत्व अशा दोन्हींना जागृत करुन त्याचा आनंद लुटणे, लिंग भेदापलिकडे पोहोचणे असे काहीसे ध्येय यात असते. तांत्रिक ग्रंथात इश्वर आणि लिंग, संभोग आणि मुक्ती असे शब्द ऐकमेका ऐवजी सहज वापरले जातात. आपल्या तांत्रिक अनुभवामध्ये त्वचेवरील प्रत्येक घर्मछिद्र हे योनि प्रमाणे वाटते व संपुर्णे शरिर भर संभोगाचा आभास होतो असे रामकृष्णांनी लिहिले आहे असा उल्लेख यात आढळतो.

तिसर्‍या भागात आयुर्वेद व वैद्यांच्या उपचार पद्धतीबाबत उहापोह आहे. लेखक म्हणतो," पाश्चात्य सोडून इतर सर्व उपचार पद्धती ह्या जुनाट छा छु करणार्‍या युगातील आहेत असे मला वाटे. एखाद्या विषयाच्या शास्त्र शुद्ध अभ्यासासाठी त्या विषया बद्दल एकीकडे आदर आणि दुसरी कडे शंकेखोर चिकित्सा असा दुहेरी दृष्टीकोण आवश्यक असतो. हे मला आतापर्यंत जमले नसावे." धर्म संस्कृती, आयुर्वेद, , पाश्चात्य वैद्यक,मानसशास्त्र, आधुनिक उपचार पद्धती, त्यांच्या मर्यादा अशी निरिक्षणे मांडत झारसेटली या हरियाणातील वैद्य गुरुजींचे रुग्णांच्या केसेस दिल्या आहेत.

पुस्तक वाचताना एक गोष्ट जाणवते ती म्हणजे लेखकाला केवळ सैध्तांतिक चर्चा करायची नसुन अनुभवात्मक पातळीवर त्याचे विश्लेषण करायचे आहे. हे सर्व करताना भारतीय परंपरा औषध उतारे आणि आशिर्वाद या बद्दल मनात एक मउ कोपरा आहे. तो जपायचा आहे. समंजस सायकियाट्रिस्ट व समंजस भगत मांत्रिक यांच्यातील अलिखित कराराची निरिक्षण लेखकाला यात दिसते. वाचकांना हे पुस्तक काही ठिकाणी जड व दुर्बोध वाटले तरी ती लेखकाची अपरिहार्यता आहे. ड्र्ग व मॆजिक रेमिडि ऎक्ट चा विचार करताना पुस्तक एका अनोख्या पैलूचे दर्शन घडवते. एका मनोविश्लेषण तज्ञाचे मनोगत म्हणुन पुस्तकाची दखल नक्कीच घ्यावीशी वाटते.

पुस्तकाचे नांव- औषध उतारे आणि आशीर्वाद

लेखक- डॊ सुधीर कक्कर

अनुवाद- डॊ श्रीकांत जोशी

प्रकाशक - मॆजेस्टिक प्रकाशन

प्रथमावृत्ती मार्च १९९३

पृष्ठे-२०३

मुल्य- १००/-

Syndicate content
Scroll to Top