शुभेच्छा
!!!! गुढीपाडवा!!!!
प्रेषक शार्दुल ( मंगळ, 03/16/2010 - 10:37) .गुढीपाडवा,,,, आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!!
ही आमची साधीसुधी गुढी,,,,,, परदेशात सण साजरा करण्याचा प्रयत्नच म्हणाना!!!!




'मराठी भाषा दिनाच्या' शुभेच्छा!
प्रेषक पाषाणभेद ( शनी, 02/27/2010 - 03:51) .आज २७ फेब्रुवारी. वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन म्हणजेच आपला मराठी भाषा दिन.
तमाम मराठी बांधवांना 'मिसळपाव' परिवाराकडून 'मराठी भाषा दिनाच्या' शुभेच्छा!
मी संपादक झालो तर ?
प्रेषक टारझन ( शनी, 02/20/2010 - 23:29) .णमस्कार्स लोक्स ,
मी लेखकर्मी, आज मी दहावीच्या मराठीच्या पेपरची तयारी करतोय. तसा मी भरपुर संस्थळांवर लिहीतो आणि सगळीकडे भरपुर प्रसिद्ध आहे, ह्याचे कारण माझे "विकली हिणकस " मधे बर्याचदा छापुन येणारे लेख. असो बदलीन.
तो विषय येथे नाही , पण तरीही रहावले नाही म्हणून सांगतो , "कॅफेटाईम्स" मधे सुद्धा माझ्या वाचनिय अशा प्रतिक्रीया छापुन येतात ! तर असा मी .. असामी लेखकर्मी .
आता २१ अपेक्षित उघडलन् ! प्रश्न पडला कोणत्या विषयावर निबंध गाळू ? तसे ऑप्शन्स बरेच होते, जसे
१. संकेतस्थळमालकांच्या दुष्काळी व्यथा
२. हिणकसकुमार , संकेतस्थळासाठी शाप की वरदान ?
३. मी संपादक झालो तर ?
४. बांग्लादेशी लेखकांचे मनोगत
५. वातुळ बटाट्यांना कसे आवरावे ?
परंतु सगळंच ह्या आधी कोणी ना कोणी उष्ट करून ठेवल्याने मी त्यातल्या त्यात एका विषयाला हात घालतो.
तर चला , निबंधाला सुरूवात करतो ! काही संवाद म्हणजे स्वतःशीच केलेली उद्बोधक चर्चा 
मित्रांनो , आपल्या प्रत्येकामधे एक सुप्त इच्छा नेहमीच ठरलेली असते. आपण फलाना फलाना झालो तर ? आपल्याला फलाना फलाना सुपरपॉवर्स मिळाल्या तर ? नुसत्या कल्पनांनी मन कसं भ्रंम्हाडी सफरीचा लुफ्त (घो त्या "त्फ" चा ) लुटू लागतं, नाही ? मला सुद्धा असंच काहीसं वाटे . तसे सुपरपॉवर असणे म्हणजे एक युनिकनेस असतो . पत्त्यांमधे जशी "हुकमाचे पत्ते" असतात आणि ते बाकी प्रकारच्या पत्त्यांवर भारी असतात त्याच प्रमाणे संपादकपॉवर आहे असे मला प्रांजळपणे वाटते . पुन्हा इथे ही एक्का एकंच .. मग येतात राजा-राणी-गोट्या वगैरे ..
हो ... पण ह्या आतल्या गोटातल्या गोष्टी . बाहेरू मात्र हुकमाचं पान म्हणजे हुकमाचं पान
!
मी जर संपादक झालो तर आधी माझे नाव बदलून कात्रीकर्मी ठेवुन घेईन , काय म्हणता ? णॉट रेकमेंडेड आय.डी ? सगळेच आपल्याला फाट्यावर मारून आपल्या फाट्याचं भजं करतील ? मग "का.त्र्या. मारुदे" ते ही घेतल्या गेला आहे ? ह्या अरेरे .. मग "कापुरंग" ? काय ? नाही घेता येणार ? का ? दोन तारांवर पाय ठेऊन कसरत करावी लागेल ? नको .. आपली ती कुवत नाही ... आता काय घेऊ ? "(सर्वकापी) कात्रु" घेऊ? नको .. नाजुक पण डेंजर ? नको बॉ .. एवढं बहुआयामी व्यक्तिमत्व आपलं नाही .. पण छ्या .. इथे ही फेल्ड् .. थांबा "कापिन कात्रीसार्खे" घेतो .. फेल्ड् अगेन.. मुस्तस्द्दीपणा हा मँडेटरी आहे ? तो कोणा लेकाच्यान आहे ? सोडा नाद ! .. लेम्मी कीप ट्रायिंग .. "कात्रा" ... नाही? .. ह्या आय.डी.चाही विकास झालाय वाटतं ऑलरेडी ... एखादं ६० वर्षापुर्वीचं नाव ट्राय करतो .. ते शक्यतो कोणी घेतलं नसेल .. "कापुन ठेव" .. फेल्ड .. आय.डी. एग्झिस्ट सिन्स जिजस बॉर्न ? च्यामारी हा आय.डी आपल्या बारश्यालाही घेणं शक्य नव्हतं ! च्यायला ... सुपरपॉवर व्हायची स्वप्न पहातोय खुशाल .. पण असं ठोस , भरीव आणि वजनदार का बरं लागत नाहीये ? "कात्रोबा टर्टर " .. "डोन्च्यू डेयर टू थिंक ऑफ धिस आय.डी. यू वान्ना लिव्ह ऑर यू वान्ट पॅरागॉन ?" असा काहीसा मेसेज आला .. शिवधनुष्यापेक्षाही जड नाव घेतल्यावर काय होणार ? .. आहे त्याच नावाने संपादक व्हावे काय ? नाही .. असं कसं .. असं कसं ? सुपरहिरो ला नेहमी एक आभासी नाव असलंच पाहिजे .. पण नाही ना सुचत .. अर्रे पण मी होतो ना "अपवाद पारा " ! आपण आहे ह्याच नावाने "संपादक - द सुपर कापर" बनुया !
मी संपादक झालो तर !!!! वा वा वा !!! काय सुरेख आणि तरल विचार आहे ! नुसत्या कल्पनेनेच माझी बोटं कशी शिवशिवायला लागली ! योग्य जागी ह्यांचा तसाही हल्ली उपयोग होत नाही ... घ्या अवघे अंतरजालंची माझे घर म्हणा ! आणि दाखवा बोटांची जादू जगाला
साला कोण नडतो पहातोच मला ! एकतर संपादक झाल्यावर सर्वेसर्वा आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो ! मग काय ? पुर्ण राण मोकळं आहे आपल्याला ! कापा कुठेही आणि कसेही .... आणि लावा आग जंगलाला
कोणी बोंबललाच .. तर म्हणायचं .. अरे हल्ली उण्ह फार तापतात .. वणवा पेटला असेल .. आम्ही नाही .. आम्ही नाही केलं हो काही .. हॅहॅहॅ .. आम्ही तर वेगळ्याच संस्थळांवर / ब्लॉग्ज वर काड्या करण्यात मश्गुल होतो .. असं करून हलकेच कॉलरवरची (नसलेली) धुळ झटकावी. नाही तरी अशी वेळ येते फार कमी ... कारण सर्वेसर्वा कसा रोखठोक आहे .. जसा युद्धावर जाणार्या सोल्जरच्या अंगावर बॉंब्ज , मॅग्झिन्स , चाकूज, गन्स इत्यादी सामान लोड केलेला असतो तसा आपला सर्वेसर्वा आंगभर चपला लटकवून असतो सगळ्या साईझच्या. आहे काय नाय काय !! सरळ पीन मारावी ... हे पहा मालक .. हे बेणं आपल्याविरूद्ध ( स्वत:विरुद्धचे हल्ली हे "आपल्या" विरुद्ध केल्यावर एखादा वेगळा इफेक्ट येतो ) लै बडबड करतं हल्ली .. ह्याला धडा शिकवलाच पाहिजे. ह्याची लेखणी हल्ली आपल्याविरुद्ध फार चालते . आपल्याच संस्थळावर येऊन आपली तासतो म्हणजे काय ? कापला त्याला ! मग मालकंही डोक्यावर कौतुकाने हात फिरवून "व्वा रे माझ्या संपादका ~! कसा बाणेदार संपादक वाटतोस
म्हणतील आणि एक पाठीला चोळण्याचा साबण बक्षिस म्हणून देतील .. की लग्गेच आपले ढोरास रोड ला पळावे .. तीकडे म्हणे भरपुर म्हशी डूंबत असतात
आपण मात्र साबणाबरोबर डर्मीकुलही न्यावे .
आणि आपली आवडती म्हैस पाहुन काळ्या पाठी पांढर्या करण्याचे निष्फळ प्रयत्न करावे
होत नाही पाहुन तात्पुरता उपाय म्हणून बरोबर आणलेलं डर्मिकुल फासावं
म्हैसही खुष .. आपण ही खुष ..
पण असं सुपरहिरो ने आपल्या हेतु पासुन अवांतर होऊन असं चालेल ? गप गुमान कितीही (आणि काहीही) वाटलं तरी कम ब्याक टू दं ड्युटी ! इट्स आवर वावर शेवटी .. नाही का ? 
असो , संपादक झालो तर अवांतरपणा किंवा कल्ला करण्याची काही विषेश शक्ति नष्ट होतात
अर्थात त्या करायच्या असल्यास आपली "अय्यार" शक्ती वापरून आपला क्लोन तयार करून तो जंगलात सोडावा ! ह्याच्या तारा आपल्या हातात नाहीत हे लपवण्याचे कौशल्य मात्र आपल्यात हवे ! ह्या "अय्यारी क्लोन्स" चा अजुन एक उपयुक्त उपयोग असतो
ह्याला काही तरी वाकडे-तिकडे लिहीण्यास लावावे , मग आपण (अचानक) प्रकट होऊन भर चौकात हाणावे , ह्यामुळे आपला दरारा कसा तरारून वाढतो.
संपादक झाल्यावर अजुन एक गोष्ट करायची ! ते म्हणजे सपक किंवा आळणी लिहायला लागायचे
काय ? अरे पण आपल्याला कल्ला किंवा राडा नसलेली प्रत्येक गोष्ट सपक आळणीच लागते , असं जनरलाईझ करून कसं चालेल ? आणि किती अवघड हे आव्हान ? सगळी थेरं आपण स्वतःच्या नावाने करूच शकणार नाही ? हे म्हणजे "अल् कायदा" ने आतंकवादी हमले करून गुप्तता पाळायला लागली तर त्या "अल् कायदा" च्या जेवढं जिवावर येईल त्यासारखं होईल राव ! मग ? संपादकपणा म्हणजे काय पोरखेळ वाटला ? आपल्याला कर्मी वगैरे बिरुदं लावली की लगेच महाण होतो का कोणी ? लक्षात ठेव ! संपादक ही पॉवर आहे मोठी वेगळी पॉवर ...
वाटतं सोपं पण नाहीये तसं .. वारंवार कासर्याचे घाव पडून पडून रहाटाचं चाक जसं गुळगुळीत होतं तसं एका क्षणात करणं सोप्पं आहे की काय ? तेवढे घट्टे आणि घाव सोसावे लागतात तेवढा वेळ द्यावा लागतो .. तेवढी परिपक्वता यायला हवी .. कोणीही आल्ल्याबल्ल्या संपादक होऊन चालेल का? निसर्ग ते कधीही मान्य करणार नाही !
त्यामुळे तु आहे तसाच लेखकर्मी रहा बाबा ! नसत्या सुपरपॉवर्स ची स्वप्न पाहु नकोस !
तुझं वय आहे आवडत्या नट्यांची स्वप्न पहाण्याचं .. ती पहा
उपयोगात तरी येतील किमान .. (कुठाय तो आयेशाचा फोटू ? )
ह्या सगळ्या गोष्टींच्या पलिकडे गेलास .. की मग पहा संपादकपणाची स्वप्न !
टिप : पेपर लिहून भरपूर टाईम उरला तर बाकी विषयांवरचे निबंध लिहीन 
सुहास शिरवळकर ह्यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन
प्रेषक संदीप चित्रे ( शनी, 01/30/2010 - 22:18) .' सुहास शिरवळकर असे आणि तसे '
संपादक :अनिल किणीकर
प्रकाशक : शाशिदीप प्रकाशन
प्रकाशन हस्ते : श्री. द.मा. मिरासदार , श्री. ह्. मो. मराठे
दिनांकः ७ फेब्रुवारी २०१०, सायं ६ वा.
स्थळः पुणे मराठी पत्रकार संघ , पत्रकार भवन , गांजवे चौकाजवळ , नवी पेठ, पुणे.
सुहास शिरवळकर यांचा निधनानंतर असा जाहीर कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे.
ग्रंथात, चित्रपट, कला , साहित्य, मराठी प्रकाशन क्षेत्रातील मान्यवर आणि सु.शि. फॅन, कुटुंबीय यांनी शिरवळकर यांचावर , व्यक्ती आणि साहित्यिक म्हणून लेख लिहले आहेत.
प्रकाशनाच्या दिवशी सु.शि. यांच्या शशिदीप प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सर्व पुस्तकांवर ४०% सुट मिळणार आहे.
सर्वांना सस्नेह आमंत्रण !
'चेहरा पुस्तक' (facebook) इथे 'सुहास शिरवळकर- suhas shirvalkar' ह्या ग्रुपचे सभासद होण्यासाठी हा दुवा वापरा.
साठी बुद्धी...
प्रेषक विकास ( रवी, 01/24/2010 - 20:05) .

या मंगळवारी, २६ जानेवारी २०१० ला अधुनिक भारताचे प्रजासत्ताक झाले, त्याला ६० वर्षे होत आहेत. त्या निमित्ताने सर्वप्रथम सर्व भारतीयांना तसेच भारतवंशीयांना शुभेच्छा!
व्यक्तीच्या आयुष्यासंदर्भात, मराठीत एक मजेशीर वाक्प्रयोग आहे: "साठी बुद्धी नाठी". त्याचे एक कारण असे सांगितले जाते की, साठाव्या वर्षांनंतर माणूस म्हातारपणा कडे झुकायला लागल्यावर परत लहान मुलासारखा वागायला लागतो, वागणे बदलू लागते, इत्यादी...मात्र राष्ट्राच्या बाबतीत असे म्हणणे अवघड आहे. कारण आज जी साठ वर्षे होत आहेत ती एका अधुनिक व्यवस्थेला, राष्ट्राला नाही. ते तर हजारो वर्षे जुने आहे. (हजारो असे मोघम इतक्यासाठी की नक्की किती जुने हा तुर्तास वाद नको!
).
भारत हा असा एक प्राचीन देश आहे जिथे गोष्टी पटकन बदलत नाहीत असे म्हणले जाते.साम्यवाद हे सर्वास (सामाजीक) असे वाटणार्या आपल्या तत्कालीन साम्यवाद्यांपैकी कॉ. डांगेंना, स्टॅलीनने सांगितले होते की इतर सर्व जगात कम्युनिझम आणता येईल पण भारतात नाही... भारतास बदलणे सोपे नाही हा त्यातील मूळ मुद्दा. येथे क्रांती होत नाही, तर निव्वळ उत्क्रांती होते असे म्हणणारेपण स्वप्नाळू असतात. तसे म्हणले तर ते बरोबर पण आहे. पण ही उत्क्रांती म्हणजे निव्वळ वाढ आहे की विकास (प्रोग्रेस) आहे यावर त्यातील यश अथवा फोलपणा ठरू शकतो.
स्वा. सावरकरांनी एक छान काव्यमय व्याख्या, क्रांती या शब्दाची केली आहे: "गतीशून्य माणसाच्या अथवा कुजू पाहणार्या राष्ट्राच्या, पायात बद्ध असलेल्या शृंखला, जेंव्हा प्रगतीच्या घणाखाली तुटू लागतात, तेंव्हा होणार्या आवाजाला, क्रांती असे म्हणतात".
या चर्चेचा विषय हा काहीसा या व्याखेतील शब्दांसंदर्भातच आहे. आपण अधुनिक भारतात आणि भारतीयांत तसेच अनिवासी भारतीयांत काय चांगले नाही, काय वाईट होत आहे याबद्दल कायमच लिहीतो. त्यात कधी कधी कडवे वास्तव असते तर कधी कधी नुसतेच अवास्तव असते. पण गेल्या ६० वर्षात भारतात प्रत्येक मिनिटाला नसेल पण सातत्याने क्रांती होत आहे असे मात्र मला नक्की वाटते.
तेंव्हा तुम्हाला प्रजासत्ताकाच्या वाढदिवसानिमित्ताने या संदर्भात काय (चांगले) आठवत आहे? अशा कुठल्या शृंखला कुठल्या प्रगतीच्या घणाखाली तुटल्या आणि आजही तुटत आहेत ज्यामुळे आपल्या आजी-आजोबांपेक्षा, आई-वडलांचे आणि त्यांच्यापेक्षा आपले जीवन हे बदलत आहे?
सकारात्मक प्रतिसादांसाठी विनंती करतो. याचा अर्थ वाईट झाकायचे असा नाही, त्यावर परत कधी तरी...किमान चांगले किती झाले याचा मागोवा घेतला तर वाईटाल तोंड कसे देता येईल या संदर्भात वेगवेगळे मार्ग/विचार दिसू लागतील.
कातरवेळ
प्रेषक पुनेरी ( गुरू, 01/21/2010 - 14:05) .सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्याने त्या शुक्रवारी मी जरा लवकरच घरी आलो होतो अन इंग्रजी चित्रपटाची सीडी लावुन बसलो होतो. कुशीत गोटु झोपला होता. अन रात्री अकरा वाजण्याच्या सुमाराला फोन घणघणला. सहसा माझ्या कार्यालयीन कामाचे फोन भ्रमणध्वनीवरच येतात त्यामुळे लॅन्डलाइनवरचा फोन बहिणीचा किंवा भावाचा असेल असा अंदाज करत मी उचलला.
"अरे आईला संध्याकाळपासुन चक्कर येतीये. डॉक्टरकडे जाऊन आलो आम्ही तर ब्लडप्रेशर जास्त होतं. त्यांनी ब्लडप्रेशरची गोळी घ्यायला सांगीतल होत अन ती गोळी तासाभरापुर्वी घेतली तरी अजुन चक्कर येतेच आहे," ठाण्याहुन बहिण बोलत होती. आवाजात तणाव जाणवत होता.
आई सुमारे दहा दिवसांपुर्वीच बहिणीकडे ठाण्यात रहायला गेलेली. जाताना पुण्यात डॉक्टरांकडे सगळे हेल्थ चेक अप केलेले अन तेव्हा तब्येत नॉर्मल असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिलेला. त्यामुळे काहीतरी किरकोळ असेल असे वाटले अन बहिणीला मी सांगीतले की, "थोडा वेळ वाट बघु, कदाचित बरे वाटेल. वाटल्यास डॉक्टरना परत फोन कर. नाहीतरी उद्या मला सुट्टी आहेच तर मी उद्या सकाळी तिकडे येतो." अन फोन ठेवला. पण कुठेतरी काहीतरी चुकत असल्याचे जाणवत होते. फोन ठेवला अन लक्षात आले की आपण ब्लड प्रेशर किती आहे, गोळी घेऊन किती वेळ झालाय ते विचारलेच नाही. परत फोन लावला तर बिझी होता. बहुतेक बहिण डॉक्टरांशीच बोलत होती. रिडायल केले तर फोन लागला.
"डॉ़क्टरांशी बोलले मी. ते म्हणाले गोळी घेतल्यावर लगेच चक्कर थांबायला हवी होती. त्यांनी ज्युपीटर हॉस्पीटल मधे न्यायला सांगीतलय," बहिण म्हणाली. चौकशी केली तर कळले डॉक्टरांनी तपासले तेव्हा ब्लडप्रेशर १०५/२१० होते. आई फोनवर बोलु शकत होती. तिने सांगीतले, "बहिण ऑफिसमधे गेल्यावर घरात ती एकटीच होती. संध्याकाळ पर्यंत सगळे ठीक होते पण पाच वाजल्यानंतर ती जरा आडवी झाली तर जोरात चक्कर यायला लागली." बोलण्यावरुन आई पुर्ण सावध असल्याचे जाणवत होते पण आवाज खोल गेला होता अन थरथरत होता. लगेच निर्णय घेतला अन बहिणीला कळवलं, "आईला मिळेल त्या वाहनानं लगेच हॉस्पीटलमधे ने. मी ताबडतोब ठाण्याला पोहोचण्यासाठी निघतो आहे."
फोन ठेवला अन पुन्हा परिस्थितीच भान आलं. बहिण ठाण्यात रहात असली तरी दिवसभर कामानिमित्त मुंबईतच असते. तिला ठाण्यातली फारशी माहिती असणे शक्यच नव्हते. त्यात आई अशी आजारी, ती एकटी अन रात्रीची वेळ. मदतीला कोणीतरी हवे, किमान मी ठाण्याला पोहोचेपर्यंत तरी. पहिले नाव डोळ्यासमोर आले ते आंतरजालावर भेटलेला मिपाकर सुहृद निखिल देशपांडे याचेच. सरळ त्याला फोन लावला अन सगळी परिस्थिती कानावर घातली. बहिणीचे फोन नंबर दिले अन विनंती केली तिच्याबरोबर संपर्क साधुन हवी ती मदत करण्याची. त्यानेही हात आखडता न घेता लगेच फोन करतो अन ताबडतोब त्यांना भेटायला जातो असे कळवले.
त्यानंतर पुण्यातच असलेल्या बहिणीला फोन केला अन असे असे झाल्याने मी ठाण्याला जात असल्याचे कळवले. मेहुण्यानी धीर दिला परंतु मन काही थार्यावर नव्हते. मग टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल बिझिनेस मधल्या माझा मित्र माऊली याला फोन केला अन ताबडतोब गाडी हवी असल्याचे कळवले. काय झाले आहे ते कळल्यावर त्याने स्वतःच माझ्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला. अडचण फक्त एकच होती, त्याची सगळ्यात आरामदायक गाडी त्या दिवशी औरंगाबादला पाठवली होती अन केव्हाही परतणे अपेक्षित होती. कुणी गाडी नेलीय चौकशी केली तर कळले माझाच मित्र नितीनकडे ती होती. लगेच नितीनला फोन केला. तो रस्त्यात जेवायला थांबला होता पण मला गाडी हवीये म्हटल्यावर न जेवता तसाच पुण्याला परतला.
दरम्यान बहिणीने ठाण्यातच असलेली तिची एक मैत्रीण अन माझ्या तिथेच रहाणार्या मामेबहिणीशी संपर्क साधला होता अन ते सगळे लोक बहिणीच्या घरी पोहोचले होते. निखिल स्वतः हॉस्पीटलमधे त्यांची वाट पहात होता. हॉस्पीटल मधे जायला निघता निघताना आईला दोन उलट्या झाल्याचे कळले अन चिंता अजुनच वाढली. पण आई स्वतः फोनवर बोलत होती त्यामुळे जरा धीर येत होता.
तरी गाडी येऊन मी घरुन निघेपर्यंत साडेबारा-एक वाजलेच. पण निखिल, मामेबहिणीचा मुलगा, वगैरे मंडळी आईबरोबर असल्याने अन ते फोनवरुन थोड्या थोड्या वेळाने संपर्कात असल्याने जरा आधार वाटत होता. आईला ट्रीट करणार्या डॉ़क्टरांशीही त्यांनी फोनवर बोलणे करवुन दिले. रात्री अडीच-तीन वाजता मी हॉस्पीटलमधे पोहोचलो तेव्हा सगळे तिथेच थांबले होते. बराच आग्रह करुन सुद्धा निखिल वगैरे मंडळी पहाटेपर्यंत बरोबर थांबली. त्या दिवशी कुणालाच झोपता आले नाही.
तीन दिवस आय सी यु मधे अन एक दिवस वॉर्ड मधे काढल्यावर आईला डिस्चार्ज मिळाला अन ती पुण्याला परतली सुद्धा. डॉक्टरांनी सांगीतले मानेचे स्नायु आखडल्याने तिला त्रास झाला. आता औषधे, व्यायाम वगैरे सुरु आहे अन तिची तब्येत सुधारते आहे. पण अजुनही त्यारात्रीची आठवण अस्वस्थ करुन जाते. सुहॄदांच्या सहकार्यानेच अवघड परिस्थितीवर मात करुन ती कातरवेळ निभावुन नेणे शक्य झाले.
व्हर्च्युअल रिअॅलिटी किंवा रिअल व्हर्च्युअॅलिटी म्हणतात ती हीच असेल का?
भटकंती स्पेशल २०१० कॅलेंडर
प्रेषक pankajzarekar ( बुध, 01/06/2010 - 12:17) .समस्त मिपा'कर बंधू आणि भगिनी.
सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. नववर्षासाठी आम्ही काही तरी भेट म्हणून एक उपक्रम राबवला आहे. एक भटकंती स्पेशल कॅलेंडर. पूर्ण कॅलेंडर इथे देण्याऐवजी पहिल्या वर्षाचे पान इथे दाखवत आहे. बाकी कॅलेंडर माझ्या ब्लॉगवरुन डाऊनलोड साठी उपलब्ध आहे. पूर्ण छापून घेण्याएवढे आकाराचे भिंतीवरचे कॅलेंडर आहे.

.
.
.
येथून डाऊनलोड करा...
इथे ब्लॉगची लिंक देणे हा ब्लॉगचे ट्राफिक वाढवण्याचा उद्देश असे कुणी समजत असेल तर मर्जी आपली. पण तसे करण्याने माझा वैयक्तिक काही फायदा नाही, कारण मी ब्लॉगवर कुठल्याही मला पैसे देणाऱ्या जाहिराती पोस्ट करत नाही.
लोभ असावा.
-Pankaj भटकंती Unlimited
http://www.pankajz.com/
२०१०-विजयी भव!!!
प्रेषक कलंत्री ( बुध, 12/30/2009 - 20:47) .२०१० च्या वर्षाची सुरवात होण्यास काही तासांचाच अवकाश आहे. एक वर्ष संपणार आणि दुसरे सुरु होणार. पाश्चात्य विचारांत जी काही कमी अथवा आक्रमकता असो, पण आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन मात्र उत्साहाचा आणि उमेदीचा आहे.
माणुसमात्र अनेक अनियमितता अथवा बंधनाने बांधला गेला आहे, परंतु अश्या वर्षाच्या सुरवातीस मात्र त्याचा कल हा आशावादी आणि संकल्पाचा असतो ही बाजु मला जमेची वाटते.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक गोष्टी करण्याच्या राहुन जातात त्यांना अश्या वर्षाच्या सुरवातीच्या कल्पनेने परत एकदा उजाला देता येतो. अनेक संकल्प / ठराव मनात केले जातात आणि काहीवेळेस सातत्याच्या अभावी रोजच्या धबडक्यात कोठेतरी जिरले जातात अथवा विरले जातात.
या वर्षासाठी मी मात्र परत एकदा आशावादी आहे, अनेक संकल्प पुर्णत्त्वास नेण्याचा विचार मी मागच्या १०/१२ दिवसापासुन करत आहे.
व्यक्तिस्मरण : आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ति आपल्या आचारांनी विचारांनी आपल्यावर प्रभाव टाकत असतात. अश्या व्यक्तिंची यादी करणे आणि रोजच त्यांच्या दुर्मिळ आणि प्रिय गुंणाचा प्रत्यय घेत जाणे. कोणी व्यक्ति अफलातुन विचार करत असते तर कोणी आपले जीवनच एखाद्या गोष्टीसाठी वाहुन टाकत असते. अश्या मोजक्या व्यक्तींचे नित्य स्मरण करणे.
गुणोपासना : अनेक गुण आपल्यात कमी आहेत आणि त्याचा उत्कर्ष अथवा विकास आपल्यास आपल्याला हवे असलेले सुख, समाधान देईल याची आपल्याला खात्री असते. अश्या गुणांना स्मरत राहणे कोणास ठाऊक त्यांच्या प्रत्यक्ष गुंणाचा विकास आपल्या मनःपटलावर होऊनही जाईल. उदा नम्रता, मृदुता, मैत्री, क्षमा भावना इत्यादी इत्यादी.
साधना : जीवनाचा नेमका हेतु काय आहे हे फक्त त्या इश्वरासच ठाऊक असावे. पण त्यासाठी आपण काही तंत्र वापरु शकतो. उदा ध्यान, व्यायाम, जप, प्रार्थना, योगासने इत्यादी इत्यादी. यावर्षी यासर्वांमध्ये सातत्य आणण्याचा विचार आहे. पाहु या काय ते घडते?
चला आपल्या सर्वांनाही २०१० विजयी असो अशी सद्बभावना.
द्वारकानाथ कलंत्री.
सध्या मुक्काम राजकोट, गुजरात.
चौसष्ठ घरातला आनंद!
प्रेषक चतुरंग ( शुक्र, 12/11/2009 - 00:21) .२००८ साली जागतिक विजेता बनून भारतीय बुद्धीबळाचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवणारा आनंद विश्वनाथन हा ११ डिसेंबर ला वयाची ४० वर्षे पूर्ण करत आहे!

आनंद एक असामान्य खेळाडू तर आहेच पण अतिशय नम्र, विनयशील आणि साधा माणूस आहे. आपल्या यशाचे श्रेय तो आई-वडील आणि पत्नी अरुणा ह्यांना देतो.
२०१० साली होणार्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रशियन खेळाडू वेसेलिन टोपालोव हा त्याचा आव्हानवीर आहे. विजेतेपदाचा मुकुट टिकवण्याची तयारी आनंद करतोय.
त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे खास अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा!!

(दोन्ही चित्रे आंतरजालावरुन साभार.)
-(आनंदचा चाहता)चतुरंग
अजून एक क्रियाशील आदर्श
प्रेषक विकास ( रवी, 12/06/2009 - 21:02) .हे पार्सी बाबा भारताच्या किनार्यावर गुजराथच्या बाजूने नक्की कधी आले ते माहीत नाही, पण त्यावेळची एक कथा आत्ता एकदम आठवली. ते त्या भागातील राजाकडे गेले आणि स्वतःच्या देशातील अत्याचारांमुळे विस्थापित झालो आहोत तेंव्हा आम्हाला येथे आश्रय मिळूंदेत म्हणून विनंती केली. राजा काहीच बोलला नाही, फक्त त्याने दुधाने काठोकाठ भरलेला पेला दाखवला. उद्देश हा की आम्ही येथे परिपूर्ण आहोत असे काहीसे दाखवणे. पण त्या समुहाचा म्होरक्या पार्सीबाबा पण हुषार - त्याने त्या दुधात तसेच न बोलता साखर घातली. अर्थात त्याने सांगितले, की आम्ही या काठोकाठ दुधाने भरलेल्या पेल्यात जशी साखर विरघळली तसेच एकरूप होऊन राहू. किंबहुना दूध गोडच करू ... अर्थात ह्या "मुक्या संवादावर" राजा एकदम खुष झाला आणि एकीकडे स्वतःपुरता मर्यादीत असलेला हा पारशी समाज दुसरीकडे संपूर्ण भारतवर्षासाठी सातत्याने देतच राहिला आणि भारताला मोठे करत राहिला.
आता वरील कथा एकदा दंतकथा आहे असे कदाचीत एरव्ही म्हणावेसे वाटले असते, पण लोकसत्तेतील टाटांची अशीही एक औदार्यगाथा ही बातमी वाचली आणि खरेच दुधातील साखर समजली.
त्या बातमीत ताजमधील कर्मचार्यांनी केलेल्या कर्मचार्यांची माहीती आहेच, पण आजपर्यंत कधीही गाजावाजा न केलेली माहीती रतन टाटांबद्दल आहे. तेव्हढाच भाग खाली चिकटवला आहे.
सर्वसामान्य माणसांनी-कर्मचाऱ्यांनी आपल्या संस्थेसाठी, किंबहुना आपल्या देशासाठी बजावलेली ती धाडसी सेवाच होती.. नेमका तोच भाव एका कार्यक्रमात बोलताना दस्तुरखुद्द रतन टाटांच्या शब्दांतून व्यक्त झाला आणि नंतर तर तो कंपनीनं टाकलेल्या एकेका पावलातनं अभिव्यक्तही झाला.. ते म्हणाले, ‘हा उद्योग एकटय़ा टाटांचा नाही, त्यादिवशी कामावर हजर असलेल्या सर्वाच्या मिळून मालकीचा तो आहे, म्हणूनच हे घडू शकलं’.. अवघी एक दिवसाची कंत्राटी नोकरी केलेल्या, पण त्या दिवशी कामावर हजर असलेल्या प्रत्येकाला हॉटेल पुन्हा सुरू होईपर्यंतच्या काळात तो नोकरीवर असल्यासारखंच वागवलं गेलं.. नोकरीत असणाऱ्या प्रत्येकाला मदत आणि सहाय्य मिळालंच, पण रेल्वे स्थानकावर मृत्युमुखी पडलेल्या, शेजारच्या पावभाजीवाल्याच्या वा पानवाल्याच्या टपरीवर असताना मृत्युमुखी पडलेल्यांनाही टाटांनी मदत केली.. हॉटेल बंद होतं त्या काळात तर प्रत्येकाला (अंदाजे १६०० जणांना) मनीऑर्डरनं घरपोच पगार मिळाला.. टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसच्या सहकार्यानं ज्यांना-ज्यांना आवश्यक होती, त्या प्रत्येकाला मानसिक सल्ल्याची मदत दिली गेली..
जखमी झालेल्या वा मृत्युमुखी पडलेल्या ८० कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन रतन टाटांनी सर्वाची भेट घेतली, विचारपूस केली.. ज्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक मुंबईबाहेर रहात होते, अशा सर्वाना विमानानं मुंबईत आणलं गेलं, त्यांची सुमारे तीन आठवडे राहण्याची व्यवस्था हॉटेल प्रेसिडेंटमध्ये करण्यात आली.. टाटांनी प्रत्येकाची समक्ष भेट घेतली.. तीन दिवस तर स्वत: रतन टाटा स्मशानाच्याच फेऱ्या मारत होते.. अवघ्या २० दिवसात या मदतकार्यासाठीचं वेगळं प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलं.. टाटांचं मोठेपण असं की ज्यांचा प्रत्यक्ष टाटा उद्योगसमूहाशी काडीचाही संबंध नव्हता, अशा रेल्वे कर्मचाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना एवढंच काय अगदी पादचाऱ्यांनाही टाटांनी मदत देऊ केली.. जवळपास सलग सहा महिने प्रत्येकाला दहा हजार रुपये टाटांकडून मिळत राहिले..
एका पदपथविक्रेत्याची चार वर्षे वयाची नात, चार गोळ्या लागल्यानं जखमी झाली.. टाटांनी तिलाही बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं, लक्षावधी रुपये खर्च करून तिच्यावर शस्त्रक्रिया करवून घेतली.. ज्यांच्या हातगाडय़ा गेल्या त्यांना टाटांनी पर्यायी गाडय़ा घेऊन दिल्य़ा.. बळी पडलेल्यांच्या कुटुंबातील ४६ मुलांची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली.. हल्ल्यात बळी पडलेल्या प्रत्येकाला टाटांनी दिलेली नुकसानभरपाईच ३६ ते ८५ लाखांच्या घरात गेली असावी.. पण त्या शिवायही त्यांच्या कुटुंबीयांची आणि त्यांचेवर अवलंबून असलेल्या सर्वाची जबाबदरी घेण्याचं, जगाच्या पाठीवर कुठेही त्यांच्या मुलांनी शिक्षण घ्यायचं ठरवलं तरी त्यासाठीचा सारा खर्च उचलण्याचं, आयुष्यभरासाठी कुटुंबीयांचा वैद्यकीय खर्च करण्याचं, मृतांनी घेतलेलं सारं कर्ज सव्याज परत करण्याचं दायित्वही टाटांनी घेतलं..
आधीच्या क्रियाशील आदर्शातून सामान्यातील असामान्य वृत्ती दिसली तर या उदाहरणातून केवळ "धंदेवाईक" म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते त्यांनी ठेवलेली सामाजीक बांधिलकी आणि जबाबदारी. आता (नुसती) आशा(च) करतो इजा-बिजा-तीजा म्हणत एखाद्या राजकारणी व्यक्तीमत्वाचे पण उदाहरण वाचायला मिळेल. 


