या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. अजून पर्यन्त मिसळपाव वर देशातील सर्वात मोठ्या संस्कृतिक आणि सामाजिक संघटणे बाबत एक ही लेख आला नाही. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी.
आज RSS च्या ५ लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात. विद्या भारती ही शैक्षणिक संस्था १२,७५४ शाळा चालवते, जिथे भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाते आणि आधुनिक विषयांचाही समावेश असतो. सेवा भारती ही सामाजिक संस्था आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती मदतीसाठी हजारो प्रकल्प राबवते, विशेषतः दुर्बल आणि दुर्गम भागांमध्ये. राष्ट्र सेविका समितीसारख्या स्त्री संघटनांद्वारे महिलांना नेतृत्व आणि सांस्कृतिक प्रशिक्षण दिले जाते. या सर्व संस्था मिळून शिक्षण, सेवा आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतात.
अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम सध्या देशभरातील ६३,९२६ वनवासी गावांपैकी २१,८२९ गावांमध्ये विविध सेवा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पांमध्ये शाळा, बालवाडी, निवासी वसतिगृहे, आध्यात्मिक केंद्रे, दवाखाने आणि आरोग्य रक्षकांचे कार्य समाविष्ट आहे. महाराष्ट्रातील ५,६०० वनवासी गावांपैकी सुमारे २,००० गावांमध्ये आश्रमाचे कार्य सक्रिय आहे. याशिवाय, शिक्षण व आरोग्य सेवांबरोबरच ११३ कृषी विकास केंद्रेही कार्यरत आहेत, जी स्थानिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी मदत करतात.
१९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धकाळात RSS ने देशसेवेचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वयंसेवकांनी रक्तदान, अन्नवाटप, मदत शिबिरे, आणि अनेक ठिकाणी प्रत्यक्ष सीमेवर सैनिकांना मदत केली. या योगदानाची दखल घेत, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६३ साली, २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात RSS च्या स्वयंसेवकांना पथसंचलनासाठी आमंत्रित केले.
महात्मा गांधी यांनी १९३४ साली वर्धा येथे संघाच्या शिबिराला भेट दिली. त्या वेळी डॉ. हेडगेवार जिवंत होते. गांधीजींनी शिबिरातील शिस्त, अस्पृश्यतेचा अभाव आणि साधेपणा पाहून संघाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले, “संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे.” हे उद्गार ‘हरिजन’ साप्ताहिकात २८ सप्टेंबर १९४७ रोजी प्रसिद्ध झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ जानेवारी १९४० रोजी कराड (सातारा) येथे संघाच्या शाखेला भेट दिली. त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला आणि संघाच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण केले. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले, “जरी काही मुद्द्यांवर मतभेद असले, तरी मी संघाकडे आपुलकीच्या भावनेने पाहतो.” ही घटना ‘केसरी’ दैनिकात ९ जानेवारी १९४० रोजी प्रसिद्ध झाली होती.
देशावर जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात किंवा कोरोना सारखे आजार पसरतात, तेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते तत्काळ आपदाग्रस्त जनतेच्या सेवेसाठी सज्ज होतात. १९९३च लातूर भूकंप, २००१ गुजरात भूकंप, २०१३ उत्तराखंड पूर, २०१८ केरळ पूर अशा अनेक आपत्तींमध्ये संघाने मदत शिबिरे, वैद्यकीय सेवा आणि पुनर्बांधणीचे कार्य केले. हजारो कुटुंबांना नवजीवन मिळवून देण्यात संघाचा सेवाभाव महत्त्वाचा ठरला.
२००१ साली कच्छ जिल्ह्यातील भूकंपानंतर, आरएसएस आणि सेवा भारतीच्या स्वयंसेवकांनी भुज, अंजार आणि गांधीधाम परिसरात शेकडो मदत शिबिरे उभारले. अन्न, पाणी, औषधे आणि तात्पुरते निवारे पुरवण्यात आले. हुनरशाला फाउंडेशन आणि कच्छ महिला विकास संघटन यांच्या सहकार्याने पारंपरिक भुंगा घरांची रचना पुन्हा उभी करण्यात आली. स्थानिक मजुरांना भूकंप प्रतिरोधक बांधकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आणि गुजराती भाषेत मॅन्युअल तयार करून मार्गदर्शन करण्यात आले.
कोरोना महामारीच्या काळात, RSS चे ५ लाखांहून अधिक स्वयंसेवक रस्त्यावर उतरून गरजूंना मदत करत होते. काही स्वयंसेवकांनी आपला जीव गमावला, तरीही सेवा थांबली नाही. पाच जून २०२१ पर्यंत, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तानच्या सीमांपासून ते जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारण्यात आली. ११८ शहरांमध्ये कोविड केअर सेंटर्स, २८७ शहरांमध्ये आयसोलेशन सेंटर्स, ५ कोटी भोजन पॅकेट्स, ७३ लाखांहून अधिक कुटुंबांना राशन, आणि ४४ लाख स्थलांतरित मजुरांना सेवा पुरवण्यात आली.
२०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली.
शहरातील निवासी असो की वनवासी – सर्व भारतीयांची सेवा करणे आणि भारताला परम वैभवशाली बनविणे हेच आरएसएस च मुख्य ध्येय आहे.
प्रतिक्रिया
30 Sep 2025 - 4:59 pm | शाम भागवत
https://youtu.be/bSdo96LusOY?si=mbhUVpizpfht7P5Q
संघाबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केलंय. तेही संघाशी संबंधीत नसलेल्या महाराष्ट्र टाइम्समधल्या माणसाने.
30 Sep 2025 - 5:34 pm | स्वधर्म
संघ ही नोंदणीकृत संस्था आहे का?
पटाईतजी, या एका प्रश्नाबाबत लोकांच्या मनात फार गोंधळ आहे. कृपया आपण माहिती देऊन तो दूर करावा.
उपप्रश्नः
१. संघाच्या स्वयंसेवकाला काही ओळखपत्र, सभासद क्र. असे काही असते का?
२. संघाचे पैशाचे व्यवहार सरकारला, आयकर विभागाला दाखवले जातात का? त्याचे ऑडीट होते का? लोकांना व देणगीदारांसाठी त्याचा हिशोब प्रसिध्द केला जातो का?
नोंदणीकॄत संस्था असेले तर वरील दोन्ही होत असणार. आपण आता रिसर्च केलाच आहे, तर वरीलप्रमाणे नोंदणी आहे का या मुख्य व उपप्रश्नांची उत्तरे मिळाली तर लोकांच्या शंकांचे निरसन होईल.
1 Oct 2025 - 3:57 pm | समाधान राऊत
1. संघ ही संस्थाच नाही, नोंदणी करण्याचा प्रश्नच येत नाही ,
2.संघामध्ये ओळखपत्र वैगेरे काही दिले जात नाही , खूप खूप तर वर्ग असताना ओळख व्यवस्था म्हणून तात्पुरते ओळख पत्र या काही वर्षात देऊ लागले आहेत , वर्ग पूर्ण झाला की ते जमा करून घेतात , ही पद्धत संपूर्ण भारत भर असेलच असे नाही , नवीन छोटेखानी प्रयोग फक्त काही ठिकाणी झाले
3. संघामध्ये फक्त वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमेला भगव्या ध्वजासमोर समर्पण म्हणून काही निधी स्व ईच्छेनुसार निधी जमा केले जातो , आणि ह्या निधीमधूनच वर्षभराचा सर्व खर्च केला जातो . पुन्हा समर्पण गोळा केले जात नाही . ह्याचा हिशोब संघ कार्यालयात ठेवला जातो , कोणीही स्वयंसेवक हा हिशोब पाहू शकतो , परंतु सहसा कोणताही स्वयंसेवक हा हिशोब पाहत किंवा विचारत नाही , तेवढा विश्वास तेथे ठेवलेला असतो . याचे अंतर्गत ऑडिट होत असते .
फक्त राम मंदिराच्या वेळी संघाने समाजातून निधी गोळा केला होता , ते ही मंदिर समितीच्या अध्यक्षतेखाली , तो सुद्धा हिशोब संघ देऊ करतो/ त्या वेळी दिला . परंतु ज्यांनी एक रुपया सुद्धा राम मंदिरासाठी दिला नाही ते हिंदू बांधव देणगीचा हिशोब मागतात .राम मंदिरावरच आणि रामा वरतीच प्रश्न चिन्ह निर्माण आपले हिंदू बांधव करत , आहेत हे खेदाने नमूद करतो.
2 Oct 2025 - 4:25 pm | स्वधर्म
श्री पटाईत काकांनी काही उत्तरे दिली नाहीत. तुंम्ही दिलीत, हरकत नाही. त्याबद्दल धन्यवाद. आपण संघाकडे पाहताना एक विशिष्ट दृष्टीकोन ठेवून उत्तरे दिली आहेत. तथापि, या दिलेल्या माहितीकडे एका अपरिचिताचा पर्यायी दृष्टीकोन ठेवूनही पाहता येते.
>> 1. संघ ही संस्थाच नाही, नोंदणी करण्याचा प्रश्नच येत नाही
मग संघ हे काय आहे?
'२०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली.' असे पटाईत काका यांनी लिहिले आहे. याचा अर्थ लाखाहून जास्त स्वयंसेवक तर आहेतच. एवढे मोठे संगठन नोंदणी न करता चालवावे याचे कारण काय?
>> 2.संघामध्ये ओळखपत्र वैगेरे काही दिले जात नाही
नोंदणी नाही, सभासदत्व नाही, ओळखपत्र नाही. म्हणजे जवळजवळ भूमीगत संघटना असल्यासारखेच झाले. हे खरोखरच असे का चालवतात हा प्रश्न पडतो. समजा कोणी सभासदाने संघाच्या वतीने काही बेकायदेशीर काम केले, तर त्याच्यापासून संघाला हवे तेंव्हा वेगळे दाखवता येऊ शकते व जर चांगले काम केले तर संघाचा संबंध दाखवता येतो. हे कितपत पारदर्शक आहे असे आपणांस वाटते?
>> 3. संघामध्ये फक्त वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमेला भगव्या ध्वजासमोर समर्पण म्हणून काही निधी स्व ईच्छेनुसार निधी जमा केले जातो
हा निधी असा कितीसा असणार? काही माहिती खुली करण्यात आली आहे का? एवढ्या अल्प निधीमध्ये फक्त २०२५ या एका वर्षात ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे घेतली असा दावा करण्यात आला आहे. एक शिबीर घ्यायचं तर केवढा निधी लागेल? हे काम चांगलेच आहे व त्यासाठी संघाने कितीही पैसे गोळा करायला कोणाचाच आक्षेप असायचे कारण नाही, फक्त संस्थेची नोंदणी नसल्याने धर्मादाय आयुक्त, आयकर विभाग व सरकारच्या सर्व संस्था संघाला काहीही विचारू शकत नाहीत. एखादी साधी चार माणसांची संस्था काढली तरी केवढे नियम पाळावे लागतात, हिशोब ठेवावे लागतात व मुख्य म्हणजे जे कराल त्याची जबाबदारी संस्थेच्या पदाधिकार्यांना घ्यावीच लागते. संस्थेची व सभासदांची नोंदणीच न केल्यामुळे संघाला हे काहीच लागू होत नाही. त्यामुळे देशातील यंत्रणेला तिथे कसलाच प्रवेश नाही. संघ ही एक राष्ट्रप्रेमी संघटना आहे, तर देशाचे कायदे पाळायच्या कक्षेतच येऊ नये अशा प्रकारे ही संस्था का चालविली जाते हे आपण सांगू शकाल का?
आपल्यासारख्या संघाबद्दल अभ्यास असणार्या व्यक्तीकडून नीट माहिती घेण्यासाठी प्रश्न विचारले आहेत, कृपया गैरसमज नसावा.
30 Sep 2025 - 6:01 pm | अमरेंद्र बाहुबली
संघाची स्तुती संघाचे लोक सोडून कुणीही करत नाही, संघाचे लोक काम करताना संघाच्याच लोकाना दिसतात इतरांना नाही, स्वातंत्र्यलढ्यात संघाने सहभाग का घेतला नाही? हे कुणीही सांगत नाही, संघाचे लोक टाईट इस्त्रीचे कपडे घालून मदतीला जातात नि तसेच टाईट इस्त्रीचे कपडे घालून घरी येतात, (फोटो काढून), राबून राबून पांढरा शर्ट चिखलाचा झालेला, घामेघाम झालेला संघ कार्यकर्ता कधीही दिसलेला नाही दिसणारही नाही, संघातील काकांची मुले ख्रिस्ती देशात तसेच अरबी मुस्लिम देशात जाऊन डॉलर नी दिनार कमावीत असतात पण तेच काका इथे हिंदूंच्या रक्षणासाठी बहुजनांच्या मुलाना “दंडप्रहार” शिकवत असतात. थोडक्यात संघ ही समाजाला काहीही फायदा न देणारी तसेच उपद्रवही न देणारी संघटना आहे. सामान्य माणसाने संघा पासून आपली मुले कशी दूर ठेवता येतील हे पाहावे. १०० वर्षे पूर्ण करूनही सांगण्यासारखं काहीही न केलेली संघटना म्हणजे आरएसएस!
30 Sep 2025 - 11:13 pm | शाम भागवत
छान.
1 Oct 2025 - 3:33 pm | समाधान राऊत
मलाही संघाबद्दल जास्त काही माहिती नाही परंतु शाखेत न जाता त्याच्याबद्दल काहीच माहिती नसताना टिप्पणी करणे जास्त सोपे असे दिसते .
संघाचे स्वंयसेवक केलेल्या कामाचा गाजावाजा करत नाहीत , जे करतात ते सोशल मीडिया वापराने आणि account trp वयक्तिक जास्त करतात ,
संघ बामनांचा आहे ह्या मिथ्या गोष्टी आहेत, कित्येक प्रचारक ब्राह्मणच आहेत , ज्यांनी स्वतःचे आयुष्य देव देश धर्म ह्या गोष्टी साठी वाहून घेतले.
तुमच्या म्हणण्यानुसार संघाचा स्वयंसेवक फक्त दुसऱ्या संघी माणसाला दिसतो , तुम्हाला दिसत नाही , तर तो घामाने भिजला आहे किंवा नाही हे तुम्हाला कसे कळणार .
जरी काकांचा मुलगा अरबी देशात गेला असला तरी तो दंड प्रहार वैगेरे शिकला आहे फक्त बहुजन मुलांना शिकवता हे मिथ्या पसरवू नका , आणि तसेही बहुजनांच्या मुलांना अरब देशात जायला संघ अडवत नाही, वयक्तिक आयुष्यात संघ किमान गरज असेल तर मदत करते , दखल देत नाही.
संघाने बरेच लहान मोठे कार्यकर्ते देशाला दिले आहेत हे विसरू नका.
स्वातंत्र्य लढ्यातील संघाचे योगदान असे पुस्तक ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे , एकदा वाचा.
1 Oct 2025 - 5:10 pm | अमरेंद्र बाहुबली
संघाच्या शाखेत जाऊन एक दोन वर्ग करून, संघाच्या लोकांचे खरे चेहरे नी संघाचा खरा चेहरा पाहून मगच बोलतो आहे, “विशिष्ट” लोकांनी “विशिष्ट” लोकांसाठी बनवलेली संघटना एस संघा बद्दल म्हणता येते, संघाचा छुपा अजेंडा भयानक आहे, संघाच्या वरगांमध्ये काही विशिष्ट कुजबुजे महापुरुषांची बदनामी करण्यासाठी सोडलेले असतात, गांधी, नेहरू, नी अनेक स्वातंत्र्यविरुद्ध नको नको ते बोलले जाते, आपण स्वत स्वातंत्र्यलढ्यात काय दिवे लावले ह्याबद्दल चकार शब्द बोलत नाहीत, तुमची मुले संघात जाऊन भडकलेल्या माथ्याची होतात, संघात जे काका लोक जातात त्यांच्या मुला बाळाना, नातेवाईकांना ते तिथे आणत नाहीत, त्यांची मुले शिकून सावरून विदेशात पळ काढतात, पण बहुजनांची मुले इथे भडकलेली टाळकी घेऊन फिरतात, मागेच भय्याजी जोशी ह्या संघी माजी अध्यक्षाने महाराष्ट्रात मराठी बोलायची गरज नाही असे मराठी द्वेष्टे विधान केले होते.
3 Oct 2025 - 10:44 am | Bhakti
अरे जाऊदे!कोणाला सांगतो..
संघाचा अनुभव घेऊन त्यापासून दूर झालेल्यांचा १०१ कोटींचा एक मोठा ग्रुप होईल.
संघातील जनांचे महिलांविषयक संकुचित वृत्ती पाहून मीही दूर झाले.शाखा चालवली,दुर्गा वाहिनीचे शिबिरही केले पण महिलांवर कर्मकांडाचे खुप मोठे ओझे असावे या मतातून ते लवकर बाहेर पडणार नाहीत.
माणसाला स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर त्याने कोणत्याच संघटना,विचारसरणीचा भाग होऊ नये,freedom हेच खरे आयुष्य आहे.
3 Oct 2025 - 11:07 am | अमरेंद्र बाहुबली
संघातील जनांचे महिलांविषयक संकुचित वृत्ती पाहून मीही दूर झाले.
खरे आहे ताई, संघी लोकांना बहुजनांच्या मुली शिकलेल्या आजीबात सहन होत नाहीत.माणसाला स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर त्याने कोणत्याच संघटना,विचारसरणीचा भाग होऊ नये,freedom हेच खरे आयुष्य आहे.
क्या बात! एकदम खरे.1 Oct 2025 - 5:59 pm | निपा
शालेय जीवनात म्हणजे १९९५-२००० च्या सुमारास माझे अनेक मित्र संघात होते नागपुर ला. ते नेहमीच मुस्लिमांवर विनोद करायचे आणि महारांचा प्रचंड द्वेष करायचे. बरं हि मंडळी वेग वेगळ्या शाखेत होती. तरी त्यांचे विनोद आणि त्यांचा इतिहास हा सारखाच असायचा. आंबेडकर त्याकाळी तरी त्यांचा शत्रू न. १. आता हे विचार संघाचे कि त्यांचे स्वतःचे होते हे काही सांगता येत नाही .
बाकी हि मुलं जवळपास सगळी ब्राह्मण ! हे कधी शिव्या द्याचे नाही. विनोद पण कमरेखालचे नसायचे . राष्ट्रीयता नसानसात नुसती ओसंडून वाहायची . म्हणजे बाकीचे देशभक्त नव्हते असे नाही, पण हि मंडळी दाखवून देण्यात समोर होती.
2 Oct 2025 - 5:57 pm | धर्मराजमुटके
बाकी काहिही असो मात्र संघाची 'नमस्ते सदा वत्सले मातृभुमे' प्रार्थना फार सुंदर आहे.
3 Oct 2025 - 11:20 am | माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म.
"संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे"
सामाजिक कार्य असेलही पण स्वातंत्र्यलढ्यात नावड्त्या विचार्सरणीच्या लोकांना बदनाम करण्याचे काम कुजबुज आघाडीतर्फे कोण करते? कुजबुज आघाडीची जागा आता वॉट्स-अॅपने घेतली आहे.
१)सुभाषचंद्र बोसांवर नेहरू पाळत ठेउन होते. त्याही पुढे जाउन, नेहरूनी त्यांना बाजुला केले..
२)लालबहादुर शास्त्रींची हत्याच झाली..
३)राहुल गांधींचे खरे नाव वेगळेच आहे. हजारो कोटींची मालमत्ता इटालीमध्ये आहे.
ह्या अफवांचे जनक कोण होते/आहेत ?शाखेवर येणार्या तरूणांमध्ये काँग्रेसबद्दल/नेहरू गांधींबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली पाहिजे हा उद्देश नसतो का?स्व्तःच्या मुलांना युरोप्/अमेरिकेत सेटल करुन देउन बहुजन समाजातील लोकांना त्रिशुल घेउन 'जय श्रीराम' करायला लावणे हे निंदनीय आहे.
ह्यांचा ईस्लाम/ख्रिश्चनद्वेष कधीतरी जाईल अशी वेडी अपेक्षा बाळगुन आमच्यासारखे अनेकजण होते. पण गेल्या काही वर्षात तो द्वेष पसरवण्याचे काम अधिक जोमाने होउ लागले असे दिसते. भाषणात "सगळे आमचेच.'..म्हणायचे आणी मागे द्वेष पसरवायचा.
आता तो अनुपम खेरचा 'ताजमहल की तेजोमहल' असा चित्रपट येतोय. भारतातील किती लोकांची टाळकी फिरवण्यात हा चित्रपट यशस्वी होतो ते बघु.
3 Oct 2025 - 12:06 pm | अमरेंद्र बाहुबली
+१ संघ फक्त द्वेष पसरवण्याचे काम करतो, समाजोपयोगी काम संघाने कधीही केले नाही नी करणारही नाही.
3 Oct 2025 - 11:26 am | विजुभाऊ
मी विद्यार्थी परिषदेत जायचो त्या वेळेस संघाच आ आणि अभाविप चे काय नाते आहे असे विचारले तेंव्हा उत्तर मिळाले की थेट काहीच संबन्ध नाही. पण अभाविप मधील बरेच लोक संघात जातात.
काही बरे केले की तो संघाचा कसा आहे आणि त्याच इसमाने काही वाईट केले की जबाबदाती नाकारायची हा संघाचा कातडीबचाऊपणा नेहमीचाच असतो.
3 Oct 2025 - 3:55 pm | स्वधर्म
>> काही बरे केले की तो संघाचा कसा आहे आणि त्याच इसमाने काही वाईट केले की जबाबदाती नाकारायची हा संघाचा कातडीबचाऊपणा नेहमीचाच असतो.
म्हणूनच वरती विचारले आहे की सभासद नोंदणी, ओळखपत्र दिले जात नाही याचे हे कारण आहे का? समाधान किंवा पटाईत काकांच्या उत्तराची वाट पहात आहे. तुंम्ही तर अनुभवच शेअर केलात.
3 Oct 2025 - 1:24 pm | शाम भागवत
संघ इतका वाईट असून कसा काय मोठा होत जातोय काही कळत नाही.
कॉंग्रेस व तिचे शिर्ष नेते इतके चांगले असूनही ती रसातळाला का जातीय काही कळत नाही.
कलीयिग कलीयुग
दुसरं काय म्हणणार?
;)
3 Oct 2025 - 2:53 pm | धर्मराजमुटके
अहं. चुकलात तुम्ही. गोबरयुग म्हणायचं असतं
:)
3 Oct 2025 - 3:34 pm | शाम भागवत
:)
3 Oct 2025 - 5:50 pm | अमरेंद्र बाहुबली
संघ इतका वाईट असून कसा काय मोठा होत जातोय काही कळत नाही.
वाईट शक्तीदेखील मोठ्या होत असतात! उदा, तालिबान.
4 Oct 2025 - 6:51 am | शाम भागवत
तालीबान संघाएवढं मोठं आहे हे माहीत नव्हतं.
छान.
;)
3 Oct 2025 - 3:30 pm | सोत्रि
बरं झालं!
हे काही बरं झालं नाही!! :) :)
- (सघंशाखेत गेलेला) सोकाजी
5 Oct 2025 - 3:13 pm | तुर्रमखान
लोल!
3 Oct 2025 - 4:46 pm | सोत्रि
मी सहावीत असताना वडील संघाच्या शाखेत घेऊन गेले. त्यानंतर नियमीत शाखेत जाणे, तालुका, जिल्हा स्तरावरील शिबीरांना जाणे, असे करीत बाबरी-मशिद पडेपर्यंत संघाशी संबंध होता. त्यावेळी खेळायला मिळायचे आणि शारिरीक उर्जेचा निचरा चांगल्या प्रकारे करता यायचा त्यामुळे शाखेत जायला मजा यायची. गावातील सगळीच मुलं यायची त्यामुळे जरा जास्तच मजा यायची.
पण पुढे बौद्धिकं चालू झाली आणि 'ब्रेन वॉशिग'ला सुरुवात झाली. त्या अजाणत्या वयात पद्धतशीरपणे इतर धर्मांविषयीचा आकस मनात कोरला गेला. त्यावेळी रथयात्राचे दिवस होते. तालुका शिबिरांना गेल्यावर 'आपल्यावर' कसा अन्याय होतोय आणि 'आपण' कसे आपल्याच देशात असुरक्षित आहोत हे इतकं बिंबवलं गेलं होतं की त्यावेळची मानसिक विचारधारा अत्यंत असहिष्णू झाली होती. (इतकी की एका तरी 'परधर्मियाला' संपवणे हे इतिकर्तव्य आहे असे वाटू लगले होते).
तेल लगाओ डाबर का नाम मिटाओ बाबर का, एक धक्का और दो बाबरी को तोड दो....अशा आत्यंतिक आणि पराकोटीच्या घोषणा देत फिरत होतो त्याकाळी. बाबर कोण, बाबरी म्हणजे काय, तिला धक्का देऊन पाडायचे म्हणजे नेमकं काय होणार ह्याची काहीही अक्कल नव्हती, पण शाखेत जाऊन आपण देशासाठी आणि धर्मासाठी काहीतरी प्रचंड महत्वाच करतोय असं मनात बिंबवलं जात होतं.
नशिबाने जरी वडीलांनीच संघशाखेचा रस्ता दाखवला होता तरी ते मात्र समाजवादी होते. त्यामुळे माझ्या वैचारिक उधाणाला आवर घालायचे. त्यामुळे मी वाहवत जाण्यापासून वाचलो.
पुढे बाबरी पाडल्यावर लालकृष्ण अडवाणींनी त्या घटनेचा निषेध केल्यावर मी अवाक झालो होतो आणि वडील कसे बरोबर होते ह्याची प्रचिती येऊन, त्यादिवसापासून संघशाखेपासून जो दूर झालो तो आजपर्यंत.
ह्या संघाचं परदेशातलं रूपडं आहे 'विश्व स्वयंसेवक संघ'. अमेरिकन नागरिकत्व घेऊन हिंदू धर्माची धुरा वाहण्याचं पुण्यकर्म ते करत असतात. ह्याचाही मी दुर्दैवाने सक्षिदार आहे. एका अशाच विश्व स्वयंसेवच्या घरी सॅन होजेला असतना गेलो होतो. एक लाचार राष्ट्रिय संघी त्या विश्व स्वयंसेवच्या देणगी साठी भारताच्या तत्कालीन परिस्थीविषयी काहिही ऐकून घेत होता. मी ह्या सगळ्या संघींना पूर्ण कोळून प्यायलो असलो तरीही मला प्रचंड राग आला होता. तो त्या विश्व स्वयंसेवच्या लक्षात आला आणि माझ्याकडे बघत वर तोंड करून म्हणाला, " अरे लगता है इनके देश के बारे मे बोला तो बुरा लगा रहा है|"
मग त्याला मी विचारले 'नमस्ते सदा वत्सले मातृभुमे' म्हणता का इथे? त्यावर त्याचा झालेला कसनुसा चेहरा अजूनही लक्षात आहे :)
तर ते असो, १०० वर्ष पूर्ण केलेल्या संघाविषयीचा पटाईतकाकांचा हा, त्यांच्या निवृत्तकाळातला वेळ घालवायचा अजून एक उद्योग असलेला धागा, करमणूकीसाठी वाचला आणि त्यांचे इतर धागे वाचल्याबत येते तसे अंमळ हसू आले.
- (पूर्वाश्रमीचा संघी) सोकाजी
3 Oct 2025 - 5:51 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
इतकी की एका तरी 'परधर्मियाला' संपवणे हे इतिकर्तव्य आहे असे वाटू लगले होते
हा हा हा. कॉलोनीत राहणारे काहीजण तेव्हा कामाला जाताना बॅगेत सुरी ठेवत.चुकुन हल्ला झाला तर प्रतिकार करायला हवे म्हणून! अर्थात त्या सुरीने बटाटेही नीट कापता येत नसावेत. ग्रुहिणींनी अशा सुर्या आपल्या नवर्याना दिल्या होत्या. कॉलोनीचे 'संरक्षण' करण्यासाठी काही तरूण्/कॉलेजकुमार रात्रभर गेटजवळ बसत. एकदा खरोखर 'ते'(परधर्मीय तलवारी घेउन येत आहेत) अशी कुजबुज झाली आणि आमच्या तरूणांची पळता भुई थोडी झाली. धावत आपापल्या घरी जाउन बसले. तलवारी घेउन कोणी येत नव्हते.. ती अफवा होती हे नंतर कळले.
3 Oct 2025 - 5:51 pm | अमरेंद्र बाहुबली
खिक्क! हा आंतरराष्ट्रीय “गंडा” माहीत नव्हता. :)
3 Oct 2025 - 6:42 pm | स्वधर्म
या धाग्यामुळे संघाबाबत बरीच माहिती समजली. तसेच अनेक आक्षेपही समजले. पटाईत काका किंवा समाधान राऊत हे थोडा वेळ काढून मिपाकरांच्या आक्षेपांना आणि माझ्या प्रतिप्रश्नांना उत्तरे देतील अशी आशा आहे.
6 Oct 2025 - 8:45 am | समाधान राऊत
तरी हरकत नाही, बऱ्याच वेळा संघ शब्द ऐकला की समजून घेण्याची प्रवृत्ती कमी होते.असो.
1&3 समाज कार्य करणारा संघ हा पूर्णपणे स्वयंसेवकांवरती उत्स्फुर्तपणे चालतो , त्यांना इथे कुठलाही पगार , मानधन दिले जात नाही , नोंदणी न करण्याची मुभा स्वतः कायदा यांना देतो, आपला कायदाच लवचिक आहे त्याला आपण काहीं करू शकत नाही, संघाच्या स्थापनेच्या काही वर्षांनी देश स्वतंत्र झाला ,तरी तत्कालीन सरकारने संघाला कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी वेगळे कायदे का केले नाहीत किंवा का आणु शकले नाहीत ,(( tax बद्दल बोलायचे झाले तर सरकारी अधिकारी केव्हाही ह्यांचे ऑडिट करू शकते , तिथे सरकारला मज्जाव केला नाही , परंतु असे ऑडिट झाल्याचे ऐकिवात नाही , वरचेवर बोलण्यात ही मंडळी पटाईत असते ,पण काही सरकार व पक्ष ह्यांना पैशाच्या हिशोबापेक्षा बंदी घालण्यात जास्त इंटरेस्ट होता !!)) परंतु त्यांच्या सह संस्था ची नोंदणी केल्या जाते , जसे की सेवा भारती , आणि यांच्या मार्फत पैशाच्या उलाढाली होत असतात , ती 92000 शिबिरे फक्त एकट्या संघाने नाही तर त्यांच्या सह संस्था यांच्या मार्फत सुधा झाली आहेत , परंतु आपसुकच नाव संघाचे लागते , ह्या संस्था कर स्वरूपणाच्या कक्षेत येतात ,
समांतर उदाहरण देतो , वारकरी संप्रदायाचे , संघ यापुढे काहीच नाही ,
आता वारकरी सांप्रदायाची नोंदणी कशी करणार आणि कुठे करणार नोंदणी करताना कुणाच्या नावे करणार आणिं करावी का , आणि सगळ्यात महत्वाचे ओळखपत्र तरी कसे द्यायचे , गंध लावेल ते वारकरी , पताका हाती घेईल तो वारकरी , विठोबाचे नाम घेईल तो वारकरी , इथे जात धर्म काही पाहिले जात नाही , सामाजिक , धार्मिक आणि देशाच्या विरोधात काम न करणाऱ्या संस्थात्मकतेची ची नोंदणी करण्याची गरज नाही , वारकरी संप्रदायाचे जरी कुठे नोंदणी नसली तरी त्यांच्या सह संस्था / उपसंस्था , वारकरी दिंडी मंडळ , गड संस्थाने , ह्यांची नोंदणी असते , वारकरी संप्रदायाचा आर्थिक कारभार सुधा ह्याच संस्था मार्फत चालतो, असेच संघ सुधा काम करतो , ह्या उदाहरणामार्फत समजून घेण्यास काही अडचण असणार नाही अशी अपेक्षा करतो ,
2.बेकायदेशीर कामे किंवा अजेंड्याच्या व्यतिरिक्त कामे केल्यानंतर कुठली व्यवस्था किंवा कंपनी,संस्था,पक्ष त्याचे समर्थन करतो , आणि कुठली संस्था चांगले काम केल्यानंतर स्वतःचे नाव लावत नाही , कितीही लांबचा नातेवाईक असला तरी बरेच जण तो जसे काही ते घरातलाच आहे अशी ओळख दाखवतात , चांगल्या कामाचा पुरस्कार नाही तर कशाचा करायचा ,
संघ बेकायदेशीर कामे , देशविघातक कामे करतच नाही , संघ मुस्लिम विरोधी नाही , वरती कुजबुज वैगेरे कुणीतरी लिहिले आहे , परंतु सर तन जुदा बद्दल त्यांचे काहीच म्हणणे नाही असे दिसते , ही असली वाक्य देशाच्या समर्थनार्थ आहेत काय??
देव देश धर्म याबद्दल बोलत असताना ते कुणाला चुकीचे वाटत असेल तर अवघड आहे , हे लोक कोण आहेत हे वेगळे सांगणे लागत नाही
6 Oct 2025 - 11:32 am | शाम भागवत
चमच्याने चांगले भरवलंय. पण मला वाटते पहिल्या प्रतिसादात दिलेली लिंक पाहिली तर मराठीत सगळी माहिती मिळेल. अजिबात तोचतोच पणा नाही. मुलाखतकार व मुलाखत घेणारे अजिबात संघाशी संबंधीत नाहीत.
असो.
6 Oct 2025 - 5:06 pm | स्वधर्म
आपल्या प्रतिसादाचे शिर्षक 'अर्थात , प्रश्नांची उत्तरे देतो आहे म्हणून मी संघी असं काही असेल..' हे समजले नाही. म्हणजे आपण संघाच्या वतीने उत्तरे देत आहात पण संघाला जबाबदारीतून मुक्त करत आहात काय? खरे तर संघ सभासदांना सोयीनुसार आपले किंवा संबंध नसलेले म्हणतो, हाच एक आक्षेप होता.
सर्वप्रथम आपण द्वेषपूर्ण भाषा न वापरता उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल आभार. द्वेषपूर्ण प्रतिसादांची उदाहरणे या धाग्यावर अनेक आहेत. शिवाय इतर प्रतिसादकांनी सांगितलेले द्वेष पेरण्याच्या बाबतीतले संघातील अनुभव दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्यामुळे द्वेष हे संघाचे एक महत्वाचे इंधन आहे व संघप्रेमींचा तो एक खास पैलू आहे असे मानावे लागेल. गामा पैलवान यांचा प्रतिसाद हे 'संघ व द्वेष' कसे अविभक्त आहेत याचे याचे उत्तम उदाहरण आहे. ते संघस्वयंसेवक आहेत किंवा कसे ते आपल्याप्रमाणे परिस्थितीनुसारच ठरेल हेही आलेच. दुसर्या अनेक संघप्रेमींच्या बहुतेक प्रतिसादात दुसर्यांच्या हेतूबद्दल संशय, त्यांना कमी दाखवण्याची वृत्ती व 'आपण, आपला इतिहास, आपले काम, आपले नेते' हे सर्व जगात भारी आहेत असा ठाम विश्वास हे दिसून येतात. आपणच वर म्हटल्याप्रमाणे सहसा कोणताही स्वयंसेवक हा हिशोब पाहत किंवा विचारत नाही. असे प्रश्नच न विचारणारे व दुसरा पर्यायी विचार न स्विकारणारे कट्टर स्वयंसेवक तयार करणे, संघाचे यशच आहे. परंतु ते देशाला हितकारक आहे असे मात्र म्हणता येणार नाही.
आपण वारकरी संप्रदायाचे दिलेले उदाहरण थोडेसे वेगळे आहे असे वाटते. संत तुकाराम महाराज संस्थान, देहू व संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी हे वारीचे अनुक्रमे तुकाराम व ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे मुख्य आयोजक आहेत व दोन्ही संस्था नोंदणीकृत आहेत. त्यांचे जबाबदार पदाधिकारी असावेत असे वाटते. शिवाय वारकर्यांचे सर्व ध्येय हे आंतरमुखी भक्ती, परमेश्वर प्राप्ती इ. असून आपल्या मताशी जुळणार्या पक्षाच्याच हातात सत्ता असावी इ. प्रकारची ध्येये ते ठेवत नाहीत असे वाटते.
नर नारी बाळें अवघा नारायण । ऐसें माझें मन करीं देवा ॥1॥
न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद । अवघा गोविंद निःसंदेह ॥ध्रु.॥
या अभंगात द्वेष मनात नसावा अशी प्रार्थना केलेली आहे तर संघ प्रेमी व स्वयंसेवक इथे कसे व्यक्त झालेत ते स्पष्टच आहे.
6 Oct 2025 - 5:38 pm | स्वधर्म
माझ्या परिचयात एक संघस्वयंसेवक आहेत. ते रुग्णोपयोगी साहित्याचे केंद्र चालवतात. त्यांच्या मुळे व संघाच्या या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना मदत झाली आहे. तसेच ते महिन्यातून एकदा ठराविक खेड्यात जाऊन औषधे व वैद्यकीय सेवा पुरवतात. असे अनेक उपक्रम चालू असतील व संघाचे काही निरलस कार्यकर्ते तिथे काम करत असतील. त्याचे मूल्य मान्य करायला मला तरी हरकत नाही.
6 Oct 2025 - 11:44 pm | रामचंद्र
मूळचे संघाचे पण पुढे संघनेतृत्वाशी मतभेद झाल्याने/स्वतंत्रपणे संघतत्त्वज्ञानावर आधारितच पण खरेखुरी, उपयुक्त समाजसेवा करणारे असे अनेक आहेत, म्हैसाळच्या मधुकरराव देवलांपासून ते अगदी अविनाश धर्माधिकारी इ. पर्यंत. आणि या सगळ्यांच्या निरलस कार्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ 'परिवार' म्हणून मातृसंस्थेला होतोच. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कितीही मतभेद असले तरी आपल्या मतभेदांमुळे मातृसंस्थेला हानी पोहोचू नये, याबाबत संबंधित व्यक्ती कमालीच्या दक्ष असतात. 'परिवारा'चा पाया घालण्याच्या देवरसांच्या कार्यामुळेच खरं तर मातृसंस्थेला आजचे सर्वार्थाने सोन्याचे दिवस आले आहेत असं म्हणता येईल. अन्य प्रचारतंत्रांच्या जोडीला सोशल मीडियाचा इतका परिणामकारक वापर हा खरं तर अभ्यासाचा विषय ठरावा. नीतिनियमांचे अनावश्यक ओझे अजिबात न बाळगणे, लवचिकता, व्यवहारवाद, उपयुक्ततावाद, डावपेच, दीर्घसूत्री धोरण, अद्भुत चिकाटी यांसारख्या बाबी विरोधक लक्षात घेत नाहीत.
6 Oct 2025 - 6:39 pm | सुबोध खरे
काही जण कधी संघाशी संबंधित होते आणि नंतर त्यांनी अशोभनीय वर्तन केले म्हणून बहुसंख्य लोक संघाला दोषी धरतात याचे आश्चर्य वाटत नाही.
कारण नथुराम गोडसे हे केवळ एकेकाळी संघाशी संबंधित होते म्हणून गांधीहत्येनंतर काँग्रेसी लोकांनाही ७५ वर्षे संघालाच जबाबदार धरले आहे. गांधीहत्येच्या खटल्यात कोणताही पुरावा सापडला नाही तरीही.
अशी स्थिती गेली ७५ वर्षे असताना संघ प्रेमी अरे ला का रे उत्तर देणारच
ठकासी असावे महाठक। उद्धटासी उद्धट।
खटनटासी खटनट। झालेची पाहिजे॥
जय जय रघुवीर समर्थ
या अभंगात द्वेष मनात नसावा अशी प्रार्थना केलेली आहे तर संघ प्रेमी व स्वयंसेवक इथे कसे व्यक्त झालेत ते स्पष्टच आहे.
बाकी इथलेच अनेक प्रतिसाद बिनबुडाचे पण संघद्वेषाने परिपूर्ण असे आहेत एवढे नोंदवून मी खाली बसतो.
6 Oct 2025 - 7:23 pm | कर्नलतपस्वी
द्वेष आणी प्रेम परस्पर विरोधी भाव असले तरी बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा.
एखादी संस्था शभंर वर्ष प्रतिकूल परिस्थितीशी झगडून आपले अस्तित्व टिकवून ठेवते आणी एक्सपोनेनशियली वाढते यातच सर्व आले.
कितीही स्पष्टीकरण दिले तरी इथे कुणाचेही मतपरिवर्तन होणे शक्यच नाही उलट वाद वाढेल आणी मला त्यात रूची नाही एवढेच बोलून खाली बसतो.
6 Oct 2025 - 7:25 pm | नावातकायआहे
बाडिस!
3 Oct 2025 - 6:45 pm | सुबोध खरे
बरेच समाजवादी मी संघाच्या शाखेत गेलो होतो तेथे माझा भ्रमनिरास कसा झाला अशा अनेक कहाण्या नेहमी प्रसारित करत असतात.
संघाबद्दल प्रचंड द्वेष त्यांच्या मनात असतो. यामुळेच समाजवाद्यांनी संघाला उत्तर म्हणून राष्ट्र सेवा दल हि काढले होते पण त्यात काम करणाऱ्या समाजवाद्यांची लग्ने जमवण्यापलीकडे राष्ट्र सेवा दलाने भरीव असे काही केले नाही. त्यामुळे ते काही काळाने बंद पडले.
बाकी एकंदर भोंगळ विचारसरणी आणि अनुयायांपेक्षा नेते जास्त अशी स्थिती असल्याने भारतभर सर्वत्र समाजवादाची पीछेहाट झाली.
आता केवळ संघावर खार खाण्यापलीकडे त्यांच्याकडे इतर काही उद्योग राहिलेला नाही.
त्यामुळे असे बरेच वैफल्यग्रस्त समाजवादी संघावर टीका करताना सर्वत्र दिसणारच.
4 Oct 2025 - 7:09 am | शाम भागवत
मला असं वाटतं की द्वेष करणाऱ्यांची शक्ति कमी कमी होत जाते आहे. त्यामुळे द्वेष करणारे संघाच्या फायदा करून देतात असंच दिसून येतं.
गेल्या १०-१५ वर्षात संघ खूपच बदलला आहे. विरोधकांना मात्र संघ फक्त हाप पॅंट वरून फुलपॅंटीत एवढाच बदल झालेला दिसतोय.
:)
विरोधक त्याच भ्रमात असलेले बरे. _/\_
जागे झाले तर कदाचित संघाशी लढण्यासाठी एखादा उपाय शोधून काढायचे.
;)
4 Oct 2025 - 12:23 am | भृशुंडी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष भरली.
बाकी वेळ काय ते ठरवील. चालू द्या.
4 Oct 2025 - 6:57 am | शाम भागवत
:)
4 Oct 2025 - 9:12 am | कर्नलतपस्वी
शंभर वर्ष भरली.
बाकी वेळ काय ते ठरवील. चालू द्या.
कुणाची भरली याबद्दल आता तरी शंका नाही.
बाकी वेळ काय ठरवेल ते बघू......
4 Oct 2025 - 9:22 am | अमरेंद्र बाहुबली
शंभरी भरली :)
4 Oct 2025 - 1:00 am | रामचंद्र
शंभर वर्षे तितकीशी अनुकूल परिस्थिती नसूनही एखादी विचारसरणी जिवंत राहते, इतकेच नव्हे तर भौतिक-व्यावहारिकदृष्ट्या सामर्थ्यवान झालेली दिसते असे तर असेल तर विरोधकांनी त्या कारणांचा बारकाईने अभ्यास करायला हवा. याच्यासारखे उदाहरण म्हणजे त्यातल्या त्यात एकोणिसाव्या शतकात मूळ धरलेली ज्यू लोकांची चळवळ म्हणता येईल. दोन्हींच्या प्रणेत्यांचे व्यवहाराचे भान, चिकाटी आणि झोकून देण्याची वृत्ती या गोष्टींत विलक्षण साम्य आहे.
4 Oct 2025 - 6:57 am | शाम भागवत
गेल्या १० वर्षात संघ खूप बदललाय. पण जुन्या अनुभवांवर आधारित संघ विरोधक त्याच जुन्या भूमिकेत असलेले बरे. ते त्यांचे विचार मांडत राहतील तेवढे ते संघाच्या फायद्याचे आहे.
:)
4 Oct 2025 - 7:24 am | कर्नलतपस्वी
सहमत.
सद्य परिस्थिती पहाता संघ अधिक बलशाली व्हावा हिच श्रींची इच्छा असावी. यदा यदा ही.....
4 Oct 2025 - 12:48 pm | नावातकायआहे
आज संघ परिवाराला शंभर वर्षे झाली. देशभरात सर्वदूर देखणं संचलन पाहायला मिळालं. आदरणीय पंतप्रधानांनी त्याबद्दल एक पोस्टाचे तिकीटही जारी केलं.
सगळं भव्य दिव्य दिसलं.... कारण संघ परिवाराचं कामच तेवढं भव्य दिव्य आहे. केव्हाही कोठेही संकट येवो... देशाचा कोणताही कोपरा असो हा परिवार कसलीही अपेक्षा न करता रुजु होतो... न बोलता न काही आवाज करता काम करत राहतो. खरोखर अभिमान वाटावा असं हे संघटन आहे...
हा विषय आज लिहावासा वाटला कारण आदरणीय मोहन भागवतांचं भाषण ऐकत होते. संघप्रमुख म्हणून अतिशय आदर्श व्यक्तिमत्व आहे ते! ते आजच्या भाषणात म्हणत होते, मला माझा देश जसा हवा, तसं मी वागायला हवं हे वाक्य सकाळपासून मनात रूंजी घालत होतं. देश जसा हवा तसं वागायला हवं....
केवढा मोठा आशय असलेलं वाक्य आहे हे!
मला देश स्वच्छ हवा मला स्वतः स्वच्छता घरात घराबाहेर पाळायला हवी.
मला देश भ्रष्ट नको तर मला शपथ घ्यायला हवी... मी भ्रष्टाचार करणार नाही, मी पैसे देणार नाही, घेणारही नाही. मला माझा व्यवसाय धंदा नीट चालावा असं वाटत असेल, तर मी स्वतः स्वदेशी उत्पादनांवरच भर देईन, तीच वापरेन.
मी माझ्याच देशवासीयांचे पाय न ओढता पुढे जाईन.
माझा माझ्या देशातल्या प्रत्येक व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असेल, त्यामुळे त्या व्यवस्थाना धरून काम करताना मला वाईट वाटणार नाही...
माझा देश जर नियमबद्ध असावा असं वाटत असेल, तर मी वाहतुकीचा नियमही तोडायचा प्रयत्न करणार नाही. शिक्षण पद्धती उत्तम हवी असेल, तर मी शिक्षणामधली कोणतीही खोटी नाटी पद्धत वापरणार नाही. मी अतिशय सच्चाईने अभ्यास करेन. आणि योग्य ती दिशा शोधत माझ्या आयुष्याचा मार्ग सचोटीच्या रस्त्यावरच आखेन.
देश जर उद्योगरत हवा असं वाटत असेल तर मलाही सतत कार्यरत राहायला हवं ना!... मी जर म्हणत राहिलो की प्रत्येक गोष्ट देशाने मला द्यावी, मी मात्र काहीच करणार नाही हे कसं चालेल?
असे अनेक मुद्दे समोर आले, डोक्यात फिरत राहिले. सततच मी चा विचार डोक्यात राहिला तर समोर उभी भोगवादी संस्कृती आपणच निर्माण केली नाही का?
यूके यूएस सगळ्यांनाच छान वाटेल, पण ते माझं नाही ना! मग जे माझं आहे ते जिवापाड सांभाळायला हवं ना!.... माझा धर्म, माझे गड किल्ले, माझे प्रदेश, माझी जंगलं, सगळं खूप सुंदर आहे. शिवाय किती विविधता आहे.... इथे वाळवंट आहे, बर्फाच्छादित हिमालय आहे, राकट सह्याद्री अरवली निलगिरी आहे, हिरवीगार वनश्री आहे, लांबच्या लांब समुद्रकिनारे आहेत, उत्तम ऐतिहासिक वास्तू आहेत!
काय नाही या देशात.... सगळं काही आहे... आपण डोळे उघडून त्याला आपलं म्हणत नाही... तुम्ही फक्त या गोष्टीवर प्रेम करण्याची आवश्यकता आहे. देशाबद्दलचा अभिमान विकत मिळत नाही, तो रक्तातल्या प्रत्येक थेंबात रुजवावा लागतो.
माझ्याआधी देश उभा राहायला हवा...मी त्यानेच घडेल. मी घडवणं म्हणजे पैसा गाड्या दागदागिने कपडे परदेशी दौरे करणं नाही, तर माझ्या पलीकडे पाहत काही समाजाप्रित्यर्थ करणं.... आपला देश न पाहता, त्याच्या भल्याकरिता काहीही न करता मनुष्यजन्म घालवण यासारखं महापातक नाही.
देशाबद्दल, देशाच्या सेनेबद्दल, देशाच्या न्याय व्यवस्थेबद्दल अभिमान हे प्रत्येकाचंच आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येकाची तयारी असणे हेच भारतीय असल्याचं लक्षण आहे. मी भारतीय आहे याचा जर अभिमान असेल, तर माणूस देशात चुकीचं वागणार नाही आणि परदेशात गेल्यावरही देशाची प्रतिमा उन्नत राहावी म्हणून पराकोटीचे प्रयत्न करेल. मी काही चुकीचे वागलो, तर माझ्या देशाचं नाव खराब होईल या जाणिवेने तो जागरूकच राहिल....
मला संघप्रमुखांचं वाक्य खूपच अंतर्मुख करून गेलं... देशाबद्दल वाईट बोलणं, देशद्रोह करणं खूप सोपं आहे; पण इतकी आक्रमणे झाल्यावर वेगाने प्रगतीपथावर नेण्यासाठी देशाची बांधणी करणं खूपच अवघड काम आहे ना!... आपल्याला काही करता येत नसेल तर मोडता तर घालू नये ना! बघा पटतंय का????....
उर्मी निवर्गी, कोथरूड, पुणे
लेख नावासहित पुढे पाठवण्यास हरकत नाही.
4 Oct 2025 - 11:15 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
मजेशीर आहे पत्र. केंद्र सरकारमधील नेत्यांनी त्यांनी सांगितलेल्या विचारांचे पालन केले तरी देश बर्यापैकी पुढे जाईल असे आमचे मत.
5 Oct 2025 - 10:16 am | युयुत्सु
नमस्ते सदा
संघगीताच्या पुनर्निर्माणामध्ये आयात केलेल्या श्वेतकाय संगीतकारांचा थवा अवतरलेला बघून भारत देशात संगीतकारांचा दुष्काळ पडला की "आत्मनिर्भरतेला चुना" लावला असा प्रश्न पडला. आणि अंमळ मोउज वाटली.
https://youtu.be/gjx8Uqy7dZo?si=l8V4nv-h6Ys-GTT3
5 Oct 2025 - 7:03 pm | शाम भागवत
मजा घ्या व आनंदी रहा.
:)
5 Oct 2025 - 10:47 pm | गामा पैलवान
काही प्राण्यांना विष्ठाच शोधायची असते. त्यांना अगदी पंचेंद्रियांद्वारे पुरेपूर आस्वाद घ्यायचा असतो. त्यांनी जरूर घ्यावा. काही हरकत नाही.
फक्त एक गंमत सांगतो. अनेक प्राणी ठिकठिकाणी तिला शोधतात. पण मिळण्याची हमी नसते. विष्ठा हमखास मिळण्याचं ठिकाण अन्न आहे. तिथे नक्की लाभते. फक्त वांधा असाय की मानवप्राणी अन्नाला पूर्णब्रह्म समजतात. त्यामुळे पूर्णब्रह्मात विष्ठा शोधावी का, असा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार स्वत:लाच उत्तर द्यायचं आहे. शोधली तर मिळणार हे नक्की.
-गामा पैलवान
6 Oct 2025 - 6:56 pm | गामा पैलवान
स्वधर्म,
पहिल्याप्रथम धन्यवाद. माझ्या प्रतिसादातील मुद्द्याची पुष्टी केल्याबद्दल तुम्हांस कुठे ठेऊ आणि कुठे नको असे झाले आहे. असाच लोभ राहू द्या.
आ.न.,
-गा.पै.
6 Oct 2025 - 8:09 pm | स्वधर्म
तुमच्या सारखा प्रतिसाद केवळ चरम पातळीच्या द्वेषातूनच येऊ शकतो. तुमच्या पातळीला उतरुन दुसर्यांचा इतका द्वेष करणे, त्यांना हीन लेखणे जमणार नाही. त्यामुळे तुंम्ही जिंकलात! मजा करा.
6 Oct 2025 - 10:44 pm | गामा पैलवान
असहमती म्हणजे द्वेष अशी तुमची व्याख्या दिसते आहे. आणि मला आनंदी ठेवल्याबद्दल मी ही व्याख्या मनापासून स्वीकारंत आहे.
-गामा पैलवान
7 Oct 2025 - 8:31 am | कपिलमुनी
१.संघाबद्दल काहीच वाईट नाही.
२. संघाचे सगळे वाईट आहे.
7 Oct 2025 - 11:43 am | कपिलमुनी
१.संघाबद्दल काहीच वाईट नाही.
२. संघाचे सगळे वाईट आहे.
अशी मते व्यक्त केली जात आहेत , पण याच्या उलट परीस्थिति आहे.
इतर सर्व संघटनांप्रमाणे संघात सगळेच वाईट नाही आणि सगळे चांगले नाही.
कित्येक वर्षे संघात काम केले , शिक्षक , संघटक राहून प्रचारकांसोबत खुप काम केले आहे , नंतर वनवासी कल्याण आश्रम संस्थेच्या मार्फत काम केले..
तिथे बरेच इतर विचारांचे लोक भेटले .. हळूहळू संघाच्या मर्यादा कळत गेल्या..
संघ सगळाच वाईट नाही , पण त्यांनी मध्ययुगातल्या खुळचट कल्पना काढून टाकायला हव्यात..गांधी द्वेष, मुस्लीम द्वेष थांबवायला हवे..
एक प्रसंग आठवतो , एका सांयशाखेत भगत सिंग ची फाशी थांबवायला गांधीनी काहीच केले नाहि अशी चर्चा चालू होति.. ११-२० वर्षे सगळयांचे गांधी हरामखोर यावर एकमत झाले.. मी तेव्हा विचारले , १९३१ साली संघ होताच ..मग त्यांनी आंदोलन का नाही केले फाशी थांबवायला ?? मग थातूर मातूर उत्तरे ! हे असे बर्याच वेळा घडल्यावर कळले ,.. टीका करणे सोपे असते इतिहासावर टीका करणे तर फारच सोपे..
पण ग्राउंड वर्क करणे अवघड ! आणि मी संघापासून हळूहळू लांब होत गेलो .. द्वेष नसवा ..
हिंंदूंची संघटना असावी, हिंदू साठी काम करावे . पण आंबेडकरांच्या वेळि संघ त्यांच्या बाजूने उभा राहीला नाही. हिंदू मधील जातीभेद मिटवायचा सखोल प्रतय्न संघाने केल नाहि . अशा ऐतिहासिक चुका संघाकडे पण आहेत..
असो , १०० वर्षे झाल्यावर संघ सर्व समावेशक होइल आणि लहान मुलांचे गांधी विरोधी, मुस्लीम विरोधी ब्रेन वॉश बंद करेल ही आशा आणि शुभेच्छा !
7 Oct 2025 - 12:43 pm | अमरेंद्र बाहुबली
संघामुळे मी प्रचंड गांधीद्वेष्टा झालो होतो, पण जसजसा संघा पासून दूर होत नी सत्याच्या जवळ जात गेलो तसे गांधी कळत गेले, आज आपण विविध जातींचे हिंदू एकत्र आहोत , विविध प्रांतातले बहुभाषिक लोक एका देशाच्या धाग्याने जोडलो गेलो आहोत. विविध धर्माचे लोक एकत्र नांदत आहोत हे सगळ घडवून आणणारा एकमेव व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी हे जेव्हा कळले तेव्हा विस्मयचकित व्हायला झाले, त्याचबरोबर संघ किती द्वेष भरतो हे देखील लक्षात आले. अनेक संघात जाणारे लोक ओळखीचे आहेत, वयक्तिक ते प्रचंड चांगले आहेत. बऱ्याच लोकांचा संघात जायला म्हणजे फक्त दसऱ्याच्या मिरवणुकीत जायला नाईलाज असतो हे लक्षात आले, एरवी संघाच्या प्रात नि सांय शाखेत कुत्रही फिरकत नाही. लहान मुलाना खेळ खेळन्याचे आमिष दाखवून संघ शाखेत आणले जाते! जातीचा प्रेशर, संस्थेचा प्रेशर, आजूबाजूच्या लोकांनी ओढून ताणून नेणे अश्या विविध प्रकारे लोक जाऊन हजेरी लावतात.
7 Oct 2025 - 4:13 pm | स्वधर्म
हेच मलाही जाणवले आहे. अगदी या चर्चेतही आपल्याशी मतभेद असणार्यांशी बोलताना कमालीचा द्वेष जाणवला.
7 Oct 2025 - 1:54 pm | सोत्रि
मी एका शिबिरात, घरवापसी करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या हिंदूना कोणत्या जातीत परत घ्यायचे ह्यावर संघाचे काय मत आहे? असा प्रश्न विचारला.
त्यावेळी, जेव्हा कोणी घरवापसी करतो, तेव्हा तो फक्त हिंदू समाजात परत येतो, एखाद्या विशिष्ट जातीत नाही असं उत्तर मिळालं होत. त्यावर त्यांचा रोटी-बेटी व्यवहार कसा होणार ह्या पुढच्या प्रश्नानंतर माझी रवानगी 'प्रहरी' म्हणून शिबिराच्या सीमेवर केली गेली. :-)
- (प्रहरी) सोकाजी
7 Oct 2025 - 3:42 pm | अमरेंद्र बाहुबली
रोटी-बेटी व्यवहार कसा होणार ह्या पुढच्या प्रश्नानंतर माझी रवानगी 'प्रहरी' म्हणून शिबिराच्या सीमेवर केली गेली.
खिक्क! :)7 Oct 2025 - 12:39 pm | युयुत्सु
२०१४ पर्यंतचा संघ सुसह्य होता आता तो असह्य झाला आहे. संभ्रम निर्माण करणार्या कल्पनांचा आधार घेऊन लोकांवर नियंत्रण निर्माण करायचे. मूळ प्रश्न न सोडवता जुनाट टाकाऊ संकल्पना परत रूजवायच्या इतकाच सध्या त्यांचा कार्यक्रम आहे.
7 Oct 2025 - 4:20 pm | नावातकायआहे
दुर्दैवानी (का सुदैवानी?) संघ कुणाच्याही टिकेमुळे थांबला नाही, थांबणार नाही.
कुठलाही राजकीय पक्ष किंवा संघटना १००% "सर्व समाविष्ट" नाही हे वास्तव आहे.
पूर्वाश्रमीच्या हिंदूना कोणत्या "जातीत" जाणार, "रोटी-बेटी" व्यवहार कसा होणार हा प्रश्न वाचून गंमत वाटली.
हिंदू किंवा इतर धर्मातून "शांती प्रिय" धर्मात जाणार्यांना/ ओढल्या गेलेल्यांना हा पर्याय असेल का किंवा विचारायची परवानगी आणि "धमक" असेल काय असा विचार मनात डोकावून गेला!
ह्या धाग्यावर संघाविषयी मत मतांतरे वाचून अंमळ करमणूक झाली हे नक्की !
असो! एवढे टंकून थांबतो!