सद्भावना

गायक-संगीतकार विठ्ठल शिंदे ह्यांना भावपूर्ण आदरांजली!

मित्रहो,माझे बालपण समृद्ध करणार्‍या अनेक कलाकारांपैकी एक म्हणजे विठ्ठल शिंदे. भाळी अर्धचंद्र,माथी शुभ्र गंगा,लिंपिले सर्वांगा चिता-भस्म हे त्यांचे मी ऐकलेले पहिले गाणे. काहीसा चोरटा तरीही गोड आणि तितकाच आर्त आवाज असणार्‍या विठ्ठलरावांनी त्या गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला वेडं केलं होतं. भल्या पहाटे आकाशवाणीवरून प्रसारित होणार्‍या मंगलप्रभात ह्या कार्यक्रमात दर सोमवारी हे गीत हमखास लागायचे. तसेच त्यांनी गायलेली अजून काही भक्तिगीतेही खूपच लोकप्रिय होती. १)देवा हो सख्या पांडुरंगा,दर्शन द्या मजला श्रीरंगा २) विठ्ठला, देवा आलासी माझ्या दारी,पण थांब जरासा विटेवरी ३)नित्य वाचे तुझे नाम गाऊ,पांडुरंगी सदा लीन राहू ही देखिल माझ्या आवडीची आहेत आणि आजही अधून मधून ती आकाशवाणीवरून लागत असतात.
इथेच आणि ह्या बांधावर अशीच शामल वेळ,सख्या रे किती रंगला खेळ हे माणिक वर्मांनी गायलेले सुमधुर गीत आणि मज भेटून जा हो दत्त सख्या अवधूता हे आर.एन.पराडकरांनी गायलेले दत्तगीत ; ह्या दोन्ही गाजलेल्या गीतांचे संगीत दिग्दर्शन विठ्ठलरावांचे आहे.

विठ्ठलरावांचे नाव त्रिखंडात गाजवले ते मात्र एका लावणीने. प्रतिलता रोशन सातारकरांनी गायलेली लावणी म्हणजे नेहमीच राया तुमची घाई,नका लावू गठूडं बांधायला,येऊ कशी मी नांदायला हो,येऊ कशी तशी मी नांदायला ही होय. ह्या लावणीचे संगीत आहे विठ्ठरावांचे .
विठ्ठलरावांचे संगीत आणि गायिका रोशन सातारकर ह्या जोडगोळीची ही अजून काही गाजलेली लोकगीतं!
१)माझ्या नवर्‍याने सोडलीया दारु

२)मला म्हन्त्यात पुन्याची मैना
३)डार्लिंग डार्लिंग काय म्हन्तोस
४)उद्या जाईन मी माझ्या गावा,माझ्या अंगाला हळद लावा
५)पैठणचा शालू आज मला आणा गडे पतिराज .
ही गाणी ऐकलेली नाहीत असा क्वचितच कुणी मराठी माणूस भेटेल.

विठ्ठलरावांनी बाबासाहेब आंबेडकरांवर गीत भीमायन हे महाकाव्य लिहिले आणि त्याचे हजारो कार्यक्रम त्यांनी अवघ्या महाराष्ट्रभर केलेत. अतिशय ऋजु वृत्तीच्या विठ्ठलरावांचे मराठी सुगम संगीत आणि लोकसंगीतातले कार्य अनमोल असेच आहे. महाराष्ट्रातल्या सर्व नामांकित गायक-गायिकांबरोबर काम करूनही हा लोकगायक शेवटपर्यंत तसा पडद्याआडच राहिला.

लोकगीतांमध्ये विठ्ठलरावांचे नाव धृवतार्‍याप्रमाणे अढळ आहे. काय विलक्षण योगायोग आहे पाहा. अशा ह्या लोकसंगीतातल्या महागुरुला काल दिनांक १८जुलै २००८ रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच देवाज्ञा झाली. मृत्युसमयी ते ७६ वर्षांचे होते. त्यांना माझी भावपूर्ण आदरांजली.

महासमर्थ : "नानासाहेब धर्मधिकारी."

"दासबोधाच्या" निरुपणाद्वारे समाजजागॄति करणार्‍या आणि तळागाळातील अशिक्षित लोकान्पर्यन्त सु-सन्स्कारान्चे बीज रोवणार्‍या , समर्थ व्यासपीठावरील महासमर्थ "नानासाहेब धर्माधिकारी" यान्ना आदरपूर्वक भावन्जली.....

जय जय रघुवीर समर्थ!!!

पांडेकर आजी..

लोकहो... खरंतर व्यक्तीचित्र लिहिणे हा माझा प्रांत नव्हे.. पण मिपाचे मालक आणि माझे चांगले मित्र असलेले श्रीयुत तात्या अभ्यंकर यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आणि श्रीकृष्ण सामंत सर यांनी लिहिलेली व्यक्तीचित्रं वाचून मलाही असं वाटलं की आपणही एखादं व्यक्तीचित्र लिहावं. तर हे माझं पहिलं वहिलं व्यक्तीचित्र भाईकाकांच्या चरणी अर्पण करून मी मिपाच्या वाचकांसमोर ठेवत आहे. गोड वाटेल अशी आशा आहे.. मीठाचा खडा लागल्यास सांभाळून घ्या.

"वयनी..... " अशी किनर्‍या आवाजात म्हणजे अगदि स्पष्ट सांगायचं तर जुन्या मराठी तमाशापटातून मावशीचं काम करणारे कै. गणपत पाटील यांच्यासारख्या आवाजात हाक ऐकू आली की आई म्हणते पांडेकर आजी आल्या. अशिक्षित, अडाणी बाई. अतिशय प्रेमळ. तिचं तिच्या बागेवर पोटच्या मुलासारखं प्रेम. नवरा म्हणजे मुलखाचा चिकट होता असं आजीच स्वतः सांगते. तिला मुलगाही होता.. बिचारा आजारी पडला पण त्या विक्षिप्त नवर्‍याने उपचारासाठी खर्च नाही केला म्हणून दगावला. तेव्हापासून नवर्‍याबद्दल मन कलूषित झालेलं , पण जुने संस्कार .. त्यामुळे नवर्‍यासोबतच उरलेलं आयुष्य घालवीत होती. नवरा पोलिस खात्यात जमादार होता. त्यामुळे कोल्हापूरतील राजारामपुरी पोलिस स्टेशन मध्ये ओळख आहे बाईची. काळा सावळा रंग , डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा तो ही मामांचा म्हणजे तिच्या नवर्‍याचा होता, ती तो आता वापरते., आणि डोक्याची चांदी झालेली. अशी ही आजी. त्या मामांनी संपूर्ण आयुष्यात एक चांगलं काम केलं ते म्हणजे ४ लहान लहान खोल्यांचं का होईना पण साधारण ३००० स्क्वे. फूटच्या प्लॉटवर स्वतःचं घर बांधलं. घराच्या आवारात आजीनी लावलेली झाडं म्हणजे पायरी आंबा, लिंबू, शेवगा, पेरू, चिकू, जाई, जुई, मोगरा, गुलाब, २ प्रकारच्या जास्वंदी. झाडांवर अतिशय माया. तिच्या सोबतीला म्हणजे ती बॉबी कुत्री आणि माय-लेकरं असलेली वेगवेगळ्या डोळ्यांची मांजरं..
हे प्राणीही जणू आजी एकटी आहे तिला आपल्याशिवाय कोणी नाही हे जाणूनच असल्यासारखे...
आंब्याच्या सिझन मध्ये मोठाले येणारे पायरी आंबे राखायला बाई, दिवसरात्र बागेत बसून असते. २ खोल्यांमध्ये बिर्‍हाड ठेवल्याने सोबतही होते आणि मामांच्या तुटपुंज्या पेन्शन शिवाय मिळकतही होते थोडिफार.
गॅस ला नंबर नोंदवायचा असेल किंवा काही बँकेची कागदपत्र समजावून घ्यायची असतील तर हळू हळू धिम्या गतीने चालत चालत आजी येते आणि आईकडून किंवा घरी जे कोणी असेल त्याच्याकडून वाचून किंवा फोन लावून घेते. एक मात्र, तिची ही जी काहि कामं आम्ही करतो त्याच्या बदल्यात ती झाडाचे आंबे, लिंबं, शेवग्याच्या शेंगा आणून देते. सगळ्या जगाला ती तिच्या बागेत येणारी फळ विकते पण आमच्याकडून एक पैसाही नाही घेत. मी कधी गेले कोल्हापूरला तर मला आवडते म्हणून शेवग्याच्या शेंगांची तिखट, खमंग भाजीही करून आणून देते. यामध्ये कोणताही दिखाऊपणा नाही . पण झाडांबद्दलचं प्रेम आणि अभिमान अपार.
"आजी, शेवग्याच्या शेंगाची भाजी मस्तच झाली आहे .."
" मग! हुनारचं की, माझ्या झाडाच्या शेंगा हैत.. लई दळदार.. त्या बाजारच्या नव्हत, चवळीवानी!!" असं चिरक्या आवाजत पण ठसक्यात उत्तर मिळेल .
या बाईचं उत्पन्नाचं साधन म्हणजे, मामांची पेन्शन, येणारं घरभाडं आणि आंबे, लिंबं, शेंगा, पेरू... श्रावणात जाई-जुई, मोगर्‍याची फुलं विकून मिळणारि रक्कम. कॉलनीतली लोकं सुद्धा त्या बाईला जपतात.. बाजरातून शेवगा, पेरू आणून खाण्यापेक्षा आजीकडूनच घेतात. भलेही स्वत:च्या बंगल्यातल्या बागेतून टोपलीभर फुले निघू देत पण सत्यनारायण, मंगळागौरी, आणि गणपतीच्या पूजेला घरोघरि फुलं येतात ती आजीच्या बागेतली. त्यामुळे तिचा तिच्या झाडांबद्दलचा अभिमानही द्विगुणीत होतो आणि मग म्हणते..
"माझ्या मोगर्‍या वानी मोगरा कुट्टं मिळायचा न्हाई. परवा, शेजारची सुजा आल्ती.. ५० रूप्पयची फुलं घ्यून गेली बगा.." त्यावेळी तिच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वहात असतो.
मध्येच एकदा आजी अशीच आली घरी.. " वयनी...... हैसा काय??"
"या आजी.. आई नाहिये.. या ना बसा जरा" .. मी
"ताई, कुटं गेली आई, येनार हायका लवकर??" .. आजी
"येईल १० मिनीटात. बसा तरी." .. मी
हा संवाद होईपर्यंत आजी जेमतेम बंगल्याचं गेट उघडून आत आलेलि असते. तिला चालायला खूप वेळ लागतो.. वयोमाना प्रमाणे येते तिच्या गतीने. मग ती आत येईपर्यंत मी स्वयंपाकघरातून पाणी पिऊन येते. आजी आत येते, नेहमीच्या ठरलेल्या दाराजवळच असणार्‍या खुर्चीजवळ बसते. याचं कारण, दाराजवळच्या खुर्चीतून तिला तिच्या घराकडे लक्ष ठेवता येतं खास करून आंब्याच्या किंवा पेरूच्या सिझनमध्ये. कारण घराच्या मागे असणार्‍या झोपडपट्टितली मुलं ताबडतोब येतात दगडं मारायला. आणि एखादा दिसलाच आंब्यावर किंव पेरूवर दगड मारणारा.. तर.. टिपेच्या चिरक्या स्वरातून ती त्याला शिवी हाणते.. बिचार्‍याला आजी कुठून ओरडते आहे ते दिसतही नाही, आवाज मात्र ऐकू येत असतो. बिचारा इकडं तिकडं बघत निघून जातो.
आजी बसते, काठी ठवते.. मग एकदम म्हणते.."इवडी इवडी झालित आता.. ३-४ दिवसांत पिकली की, आनून देतो हां"
"काय इवडी इवडी झालित आजी? काय आणून देताय??" मी.
"अगं बाई माजे, पिरू गं... इवडी झाल्येत.. आता पिकतील छान.. देतो आनून".. 'इवडी' असं अंगठा आणि इंडेक्स (मराठी??) बोट दाखवत आजी म्हणते.
"हो, पण आजी मी विकत घेणार पेरू.. असेच नकोत मला" मी..
" न्हाइ गं बाई.. माजी प्वोर हायस.. म्हायेरी आलियास.. विकत नक गं बाई.." आवाजात जास्तीत जास्त मार्दव आणून आणि व्याकुळ होत आजी म्हणते.
मला तिचं मन मोडवत नाही. मी 'बर' म्हणते.
तिला कधीतरी औषधं, बिस्किट आणून हवी असली तर येऊन सांगते "ताई, तू भाइर गेलिस तर माजी इवडी औषदं आनि ती मारिची मिळत्यात तसली बिस्किटं बी आनशील ??" पैसे पुढे करते. मी घेत नाही. "आजी, अहो आहेत पैसे.."
"नगं.. हे घ्यून जा. " हातात कोंबते पैसे. मिही फारशी खसखस न करता ते घेते कारण त्यातून तिचा मला स्वाभिमान दिसतो. माझ्या पैशानी औषधं आणायची.. बस्स! इतरांचं काही देणं नको.. हीच भावना.
या बाईचं मला आश्चर्य वाटतं.. काहीही होऊदे... पण तिचं कुत्र, तिची मांजरं.. आणि तिची बाग... या बद्दलचा तिचा अभिमान हा सतत असतो बोलण्यातून. दुसरा विषय म्हणून नाही.
या आजीची एक लकब आहे. ती खुर्चित बसली ना तरी डाविकडे उजवीकडे अशी डुलत असते. बहुदा तिच्या उतरत्या वयामुळे होत असावं.. जशी डॉ. श्रीराम लागूंची मान हलते तशी आजी खांद्याच्या रेषेत डुलत असते.
"बरं.. मी यू का आता?" आजी
" का हो बसा ना.." मी
" नगं.. राधा आणि सखी ( मांजरी आणि तिचं ते पिलू) येतील हितं हुडकत.. जातो आता" आजी. खरंच बरं का मंडळी, एकदा हि राधा आणि सखी आल्या होत्या आजीच्या मागोमग आणि आजी उठेपर्यंत कंपाऊंड वॉलवर बसून होत्या.
आजी उठते तिच्या त्या विटक्या, तळ झिजलेल्या स्लिपर्स चढवते, काठी घेते आणि निघते. मी उठून आत येते आणि जवळ जवळ १० मिनिटांनी फाटकाचा आवाज होतो.. आजी आता कुठे गेटच्या बाहेर पडलेली असते हळूहळू तिच्या चालीने..
दुसरे दिवशी पुन्हा चिरक्या आवाजात हाक ऐकू येते.. "वयनी.. हैसा काय??"

- प्राजु

श्रद्धा॑जली: स॑गीतकार मदन मोहन

आज १४ जुलै ! १९७५ साली याच दिवशी माझ्या अत्य॑त लाडक्या स॑गीतकाराने 'मदन मोहनने' शेवटचा श्वास घेतला. ह्या लेखाद्वारे मी त्या॑ना भावपूर्ण आदरा॑जली वाहतो आहे.
ब्रिटिश अ॑कित मेसापोटेमिया (आत्ताचा इराक) मधील बगदाद शहरात दि. २५ जून १९२४ रोजी एका धनिक कुटु॑बात मदनमोहनचा जन्म झाला. त्या॑चे वडिल रायबहाद्दूर चुनिलाल कोहली हे एक वजनदार असामी होते. बगदादमधून रावळपि॑डी- चकवाल येथे काही वर्षे वास्तव्य केल्यावर कोहली कुटु॑ब मु॑बईत स्थायिक झाले. (१९३५)
रायबहाद्दूर त्यावेळच्या 'बॉम्बे टॉकिज' ह्या नामव॑त फिल्म क॑पनीत भागिदार होते. त्या॑ना स॑गितात विशेष रस नव्हता पण मदनमोहनच्या आईला मात्र गोड गळ्याची देणगी लाभली होती. मदनमोहनचे देखणे रूप आणि स॑गिताची आवड ह्या दोन्ही गोष्टी आईकडूनच आल्या होत्या. लहानपणापासूनच त्याला स॑गिताची अतोनात आवड होती. अवघा चार वर्षा॑चा मदन ग्रामोफोन लावून गाणी ऐकत बसे!
मदनमोहनचे शालेय शिक्षण भायखळ्यातल्या 'कॉन्वे॑ट ऑफ जीझस ऍन्ड मेरीत झाले. वडिला॑च्या आग्रहाखातर दुसर्‍या महायुद्धात त्याने ब्रिटिश लष्करात नोकरीही केली. पण लष्करात त्याचे मन रमत नव्हते. १९४५ मध्ये राजीनामा देऊन त्याने लखनौ येथे रेडिओ स्टेशनवर सहाय्यक स॑गीत स॑योजकाची नोकरी मिळविली.
लखनौमध्ये मदन मोहनची खरी जडणघडण झाली. त्याकाळात लखनौमध्ये कोठ्या॑वरचे जलसे व मैफिली ऐन भरात होत्या. बेगम अख्तर, सिद्धेश्वरी देवी, बरकत अली खान व इतर अनेक दिग्गजा॑चे गाणे मदनमोहनने भरभरून ऐकले. खर॑ पाहता त्याने हि॑दूस्थानी शास्त्रीय स॑गीताचे शिक्षण असे घेतलेच नव्हते पण त्याने एकलव्यासारखे श्रवणभक्तीतून खूपच ज्ञान मिळविले होते. हिराबाई बडोदेकरा॑चा त्याच्यावर प्रभाव होता व पुण्याच्या सवाई ग॑धर्वची वारीही त्याने कधी चुकविली नाही.
पुढे मु॑बईत आल्यावर मदनमोहनने सिनेमात छोटी कामेही केली (उदा. मुनिमजीमध्ये नलिनी जयव॑तच्या भावाचे काम) पण एक श्रेष्ठ स॑गीतकार बनणेच त्याच्या (व रसिका॑च्या) भाग्यात होते. काही काळ सचिनदेव बर्मन व श्यामसु॑दरकडे उमेदवारी केल्यावर १९५० मध्ये त्याने पहिल्या॑दा 'आ॑खे' या चित्रपटास स्वत॑त्रपणे स॑गीत दिले. पण एक्कावन सालच्या 'मदहोश' चे स॑गीत खूप गाजले. 'मेरी याद मे॑ तुम ना' हे तलतने अतिमुलायम आवाजात गायलेल॑ गाण॑ आजही लोकप्रिय आहे.
मधुरता व भाव-भावना॑चा उत्कृष्ट परिपोष मदनमोहनच्या स॑गितात प्रकर्षाने जाणवतो. गझल, ठुमरी हे तर त्याचे हक्काचे किल्लेच होते. हि॑दी, उर्दूवर त्याचे उत्तम प्रभूत्व होते. त्याची चाल शब्दा॑ना विस॑गत वाटत नसे.
त्यावेळच्या सर्वच गायक-गायिका॑नी मदनची गाणी गायली असली तरी लता- मदनमोहन हे मिश्रण मात्र अव्वल!
हि॑दूस्थानी वाद्या॑चा सुयोग्य वापर हे त्याच॑ आणखी एक वैशिष्ठ्य. तो सतारीचा विशेष चाहता होता. रईस खानने वाजवलेली 'आज सोचा तो आ॑सू भर आये (हॅ॑सते जख्म) मधील सतार ऐकून लतादीदी रडल्या होत्या म्हणतात. 'रस्मे उल्फत' 'वो चूप रहे॑ तो ' ' नैनो मे॑ बदरा छाये॑' इ गाण्या॑मधील सतार अ॑गावर काटा उभा करते.
भाई भाई (१९५६) मधील 'कदर जानेना' गाण॑ ऐकल्यावर साक्षात बेगम अख्तरने लखनौहून लता म॑गेशकरा॑ना मु॑बईला ट्र॑क कॉल केला होता अन फोनवर ते गाण॑ म्हणायला लावल॑ होत॑! 'नौनिहाल' (१९६७) मधील प॑. नेहरू॑च्या अ॑त्ययात्रेवर चित्रित केलेले 'मेरी आवाज सुनो' हे गाणे ऐकून इ॑दिराजी॑चे डोळेही भरून आले होते.
मदनमोहन अतिशय शिस्तप्रिय स॑गीतकार होता. लष्करात काम केल्यामुळे असेल कदाचित पण स्वच्छता, टापटिप आणि वेळेवर हजर राहणे हे त्याचे गुण होते. खवैय्या तर होताच पण स्वतः उत्तम कुकही होता. तो भे॑डी मटण उत्कृष्ट बनवून दोस्ता॑ना खिलवित असे अशी मन्ना डे॑नी आठवण सा॑गितली होती.
पण फ्लॉप चित्रपटा॑चा हिट स॑गीतकार अशी त्याची प्रतिमा झाली होती. खूप मोठ्या बॅनरचे चित्रपट त्याला कमीच मिळाले. हळव्या स्वभावाच्या मदनने अपयश मनाला लावून घेतले आणि खचून जाऊन मद्याचा आसरा घेतला. प्रकृतीवर व्हायचा तो परिणाम होऊन अवघ्या बावन्नाव्या वर्षी हा अतिशय गुणी स॑गितकार निधन पावला. त्या दिवशी आभाळही एव्हढ॑ कोसळत होत॑ की जणू सगळा आसम॑तच धाय मोकलून रडत होता.
आज मात्र मदनमोहनचे चाहते दिवसे॑दिवस वाढतच आहेत. त्याच्या स॑गिताचा अभ्यास, चर्चा होत आहेत. पण तो होता ते॑व्हा मात्र त्याला अन्नुल्लेखानेच मारले जायचे. लता म॑गेशकरा॑नी ह्यावर अचूक टिप्पणी केली आहे.. 'काही लोका॑च्या कु॑डल्या त्या॑च्या मृत्यून॑तर सुरू होतात.. मदनभैय्या त्यातला आहे..
मदन मोहनची माझी आवडती गाणी
१) आज सोचा तो -हॅ॑सते जख्म
२) आप कि नझरो॑ ने - अनपढ
३) आप क्यो॑ रोये- वो कौन थी
४) अगर मुझसे मुहोब्बत है॑- आपकी परछाईया॑
५) ऐ दिल मुझे बता दे- भाई भाई
६) बदली से निकला है चा॑द- स॑जोग
७) बेताब दिल की तमन्ना- ह॑सते जख्म
८) चला है कहा॑- स॑जोग
९) चिराग दिल का जलाओ- चिराग
१०) दिल ढू॑ढता है फिर वही- मौसम
११) दो घडी वो जो पास- गेट वे ऑफ इ॑डिया
१२) है इसी मे॑ प्यार की आबरू- अनपढ
१३) हम है॑ मता-ए-कूचा- दस्तक
१४) हम प्यार मे॑ जलने वालो॑को- जेलर
१५) जाना था हमसे दूर- अदालत
१६) कदर जाने ना- भाई भाई
१७) लग जा गले- वो कौन थी
१८) माई री मै॑ कासे कहू॑- दस्तक
१९) मेरा साया साथ होगा- मेरा साया
२०) नगमा और शेर की बारात- गझल
२१) नैना बरसे रिमझिम- वो कौन थी
२२) नैनो मे॑ बदरा छाये- मेरा साया
२३) रस्मे उल्फत को निभाये॑- दिल की राहे॑
२४) रुके रुके से कदम- मौसम
२५) शोख नझर की बिजलिया॑- वो कौन थी
२६) फिर वोही शाम- जहा॑ आरा
२७) मोरे नैना बहाये॑ नीर- बावर्ची
२८) उनको ये शिकायत है॑- अदालत
२९) वो भूली दास्ता॑- स॑जोग
३०) वो चूप रहे॑ तो- जहा॑ आरा
३१) ये दुनिया ये महफिल- हीर रा॑झा
३२) यू॑ हसरतो के दाग- अदालत
३३) झमीन से हमे आसमा पर- अदालत
३४) जरा सी आहट होती है- हकिगत
३५) तुम जो मिल गये हो- ह॑सते जख्म
३६) मेरी बीना तुम बिन रोये- देख कबिरा रोया
३७) बै॑या ना धरो- दस्तक
३८) तेरी आखो॑ के सिवा- चिराग
३९) न तुम बेवफा- एक कली मुस्कराई
४०) एक हसी॑ शाम को- दुल्हन एक रात की
४१) झुमका गिरा रे- मेरा साया
४२) आपके पेहलू मे॑- मेरा साया
४३) भूली हुई यादो॑- स॑जोग

आधार- १) 'मदनमोहन ऍन अनफर्गेटेबल कम्पोजर- व्हि.एम्.जोशी
२) गाये चला जा- शिरिष कणेकर
३) विश्वास नेरूरकर
४) मृदुला दाढे- जोशी
५) इ॑टरनेट

होय म्हाराज्या!

कोकणात देवाला गार्‍हाणं घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठवण काढून बरेच वेळा देवळात जाऊन पुजार्‍याकडून (भटजीकडून) गार्‍हाणं
घालून देवाशी संपर्क ठेवण्याची प्रथा आहे.देवाच्या कानावर घालून झाल्यावर एक प्रकारचं मानसीक समाधान प्राप्त झाल्याची समाधानी अगदी विरळीच असते.पुजार्‍याच्या प्रत्येक भाष्या पुढे "होय म्हाराज्या" असं इतरानी म्हणून स्वतःची समत्ती असल्याची जाहिर कबूली दिल्या सारखी असते.

ह्या वर्षी आमच्या घरी गणपतिच्या दिवसात विसर्जनादिवशी बाप्पामोर्याला आम्ही खास गार्‍हाणं घातलं,आणि ते मालवणीतून.
आमची दोन नातवंडं या वर्षी कॉलेजात जाणार होती.त्यांना
यश,समाधान,आणि चांगली बुद्धि दे हि बाप्पामोर्याला विशेष विनंती होती.

बाप्पा मोर्याला गार्‍हाणं ......
हे श्रीगणेशा,हे गणराया,हे शंकर-पार्वती पुत्रा,हे कार्तीकाच्या भावा,हे वक्रतुंडा,हे बाप्पा मोर्या तुका, आम्ही, आज, तुझ्या जन्मदिवशी, गार्‍हाणा घालतो,तां एकून घे म्हाराज्या.

"होय म्हाराज्या"

हे देवा,तूं आमच्या ह्या, सगळ्या गोतावळ्याक, सुखी ठेव. तेंची, सर्वांची प्रकृती, चांगली ठेव.
तेंची सदैव, भरभराट होऊ दे, असा आमचा तुका, हात जोडून सांगणा.

"होय म्हाराज्या"

हे देवा,आज, आमच्या जांवंयबापूचो, जन्मदिवस आसां.तेंका उदंड आयुष्य दी.

"होय म्हाराज्या"

हे गणनायका,लवकरच, आमची दोन नातवंडा, आमका सोडून, बाहेर गावाक, पुढचां, शिकुक जातहत,तेंच्यावर, तुझी चांगली नजर, असूं दे, तेंचो, अभ्यासात, नीट लक्ष लागू दे,तेंची, दिवसे दिवस, प्रगती होवूं दे.

"होय म्हाराज्या"

हे गौरीपति, पुढची सगळी, चार वर्षां, त्या दोघांक, सुखाची जावूं दे,असा तुका आमचा सांगणा.

"होय म्हाराज्या"

शेवटी देवा,आमच्याकडून, काय चूक झाली असल्यास, किंवा, काय तुझो उपम्रर्द, झालो असल्यास , किंवा, तुझो आमकां, विसर पडलो असल्य़ास, किंवा, वाडवडीलांचो, पुर्वजांचो ,किंवा, लहान मोठ्यांचो, आमच्या कोणाकडून, अपमान झालो असल्यास, चूक झाली असल्यास, आमका सगळ्याक, क्षमा कर.

"होय म्हाराज्या"

पुढ्ल्या वर्षी सुद्धा, तुझ्या पायाकडे येंवक, अशीच ताकद, आणि बुद्धी दी,ह्या, पार्वतीपुत्रा तुका अखेरचा सांगणा.

"होय म्हाराज्या"

गणपती बाप्पा मोर्या.पुढ्च्या वर्षी लवकर या.

श्रीकृष्ण सामंत

"मिसळ"णारी कोण कोण??? - इस्ट कोस्ट मध्ये??

नमस्कार मंडळी,
आता जरा उन्हाळा मस्त चालू झाला आहेच इथे... तर आपणही जबरदस्त मिसळकट्टा भरवू. काय म्हणता?? इस्ट कोस्ट ला कोण कोण आहे?? छोट्या डॉनची बहीण शोभाव्या अशा वरदाबाई कट्टा भरवायचं पिल्लू सोडून आता स्वतःच 'जमणे अवघड आहे असे सांगताहेत." तेव्हा आता ही जबाबदारी आपण सगळे मिळून घेऊ.. कसं?? इस्ट कोस्ट ला मी, शितल, संदीप चित्रे, चतुरंग.. आणखी कोण कोण आहे?? केव्हा जमूया, कुठे जमूया?? कोणाच्या घरी की एखाद्या बीच वरच जमायचं?? इस्ट कोस्ट वाले तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांचं मत घेऊन निर्णय घेऊ? घरी जमायचं असेल तर सगळ्यांसाठी कोल्हापूरी मिसळ मी करण्याची जबाबदारी घेते?? काय गं शितल.. तू करशील ना मदत?

- प्राजु

लळा जिव्हाळा शब्दच मोठे

दहा वर्षाचा असताना त्याच्या बापाने आमच्या आई जवळ ह्याला आणून सोडले.
"मला एव्हड्या मुलांचा व्याप आता जमत नाही.ह्याला तू तुझ्याकडे ठेव तुझ्याकडे उरेल सुरेल ते ह्याला घालून तुझ्याकडे कामासाठी ठेव आणि मला ह्या काळजीतून सोडव"
असं सांगून गेल्यावर गेले सत्तर वर्ष रामा आमच्याकडे राहिला. ना नाते ना गोते पण अक्षरशः आमच्याकडे रामा राबला.आणि अलीकडेच तो त्याच्या ८० वर्षावर आम्हाला सोडून गेला.त्याला ही श्रद्धांजली.

(लळा जिव्हाळा शब्दच खोटे ह्या कवितेचे किंचीत विडंबन)

लळा जिव्हाळा शब्दच मोठे
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

पिसे,सनतडी.काड्या जमवी
चिमणी बांधी कोटे
दाणा,दाणा आणून जगवी
जीव कोवळे छोटे
चिमणा उचलूनी नेई बाळा
जगविण्या साठी त्याते
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

रक्तहि सगळे नसते
असू शकते माया
कोण कुणाचे नसून ही
अंतरी असते दया
सांगायाची नाती नसेतना
प्रेम कुठे जाते
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

माणुस सुद्धा प्रेम करतो
समजून दुसरा अपुला
दुसरा ओळखी उपकाराते
देई सर्वस्व त्याला
कोण कुणाचा जोडू
पाहतो या जगती नाते
लळा जिव्हाळा शब्दच मोठे
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

श्रीकृष्ण सामंत

संकेतस्थळांचे उपयोग - मिपा सदस्यांना विनंती

नमस्कार मंडळी,

सर्वप्रथमः "मिपाचे मालक/विश्वस्त तात्या यांच्याशी चर्चा करूनच मी हा प्रस्ताव मांडत आहे व सदर चर्चाप्रस्तावास मिसळपाव डॉट कॉम या संस्थळाचा पूर्ण पाठिंबा आहे. सबब, सदर प्रस्ताव ही मिपाचीच अधिकृत घोषणा आहे असे समजावे!"

आपण सर्वचजणं मिपावर येण्याचा आणि गप्पाटप्पा मारण्याचा आनंद मनापासून घेत आहोत. प्रत्येकाचे प्रत्येकाशी पटत नसेल, वादविवाद घडत असले अगदी तात्यांच्या हाताच्या टपल्यापण खाल्या तरी बहुतांशी सर्वजण पुन्हपुन्हा येत राहतात. मिपाचे हे यश वृद्धींगत होवोत ही मनःपूर्वक शुभेच्छा!

तर अशाच एका चर्चेत (छोटा डॉनने चालू केलेल्या चर्चेत) मी काही मुद्दे मांडले. विषय होता भारताबाबत आणि आपण एकत्र राहू का नाही, समाजाची अवस्था वगैरे आणि मूळ लेखाचा मथळा होता: इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता त्यावर मुक्तसुनीत यांनी मला काही खरडले... त्यांचा मूळ मुद्दा होता मिपासारखी संकेतस्थळे या संदर्भात काय करू शकतात? याला उत्तर देणे प्रतिसादा इतके सोपे नव्हते म्हणलं विचार करतो... तर नंतर परत गेल्या एका वादामधील माझ्या प्रतिसादावर त्यांनी मला आठवण करून दिली. मग काही गोष्टी खरडल्या, तात्यांना व्य.नि.ने विचारल्या आणि मुक्तसुनीत यांच्यापण त्यासंबंधात सुचना घेतल्या.

हे सर्व सांगायचे (नमनाला घडाभर तेलाचे) कारण काय? - तर संकेतस्थळातील देवाणघेवाणितून विरंगुळा जसा होवू शकतो तसाच काही भरीव गोष्टी करण्यासाठीपण एकमेकांना न बघता देखील उपयोग होऊ शकतो हे यातून दिसून येते. तर आता जे आमची निरोपानिरोपी झाली ती खाली मी देतो. मूळ कल्पना मुक्तसुनीत यांची, संकेतस्थळ तात्यांचे, मी फक्त निमित्त...

मिपाला गणेश चतुर्थीला वर्ष पूर्ण होईल. इथे इतकी माणसे येत असतात ते वास्तवात भेटून कट्टे करत असतात या कट्ट्यांचाच उपयोग त्या त्या कट्ट्यातील मेंबरांनी काहीतरी स्थानिक गरज असलेल्या गोष्टींना मदत करण्यासाठी केला तर एक चांगला पायंडा पडेल. याचा अर्थ त्यांनी टिपी करू नये असा अजिबात नाही. पण त्याचबरोबर काहीतरी सामाजीक जाण ठेवली गेली त्यातून काही उपक्रम (संकेतस्थळ नाही बरं का!) तयार झाला राबवला गेला तर बरेच काही साध्य होईल. कुणाचे काहीतरी चांगभले होईल तर कुणाला तसे करण्याची नकळत सवय लागेल. यात कोणी काय करावे, कुणाबरोबर करावे हा ज्याचा/जीचा/त्याचा/तिचा प्रश्न असेल आणि स्वभावाप्रमाणे त्यांनी काहीतरी करावे. कुठल्याही चांगल्या/प्रामाणिक संस्थेबरोबर काम करावे - पैसे देऊन अथवा बौद्धीक दान देऊन किंवा अजून कशातरी पद्धतीने. त्यात राजकारण नसावे -कुठल्याही विचारांच्या संस्थांना एखाद्या विशिष्ठ प्रोजेक्टसाठी मदत करता येईल, कधी कधी शाळांना अथवा गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांची अथवा अजून कसली मदत करता येईल. कुठल्या संस्थेकडून होते ह्याने काही फरक पडत नाही - सर्व लोकगंगेला मिळाल्याशी कारण... संस्था प्रामाणिक आणि ट्रॅकरेकॉर्ड असलेली असावी, त्यातून कुठलाही भेदभाव तयार होऊ नये इतकीच काय ती प्रामाणिक इच्छा/अट असावी...
किंवा
अजून एक शक्यता : ज्याला काही एक विशिष्ट सामाजिक कार्य/प्रोजेक्ट करायचा आहे त्याने/तिने मिपावर एक पोस्ट टाकावे. आपल्या प्रोजेक्टची माहिती सविस्तर कळवावी. शेवटी आपल्या कॉन्टॅक्ट पर्सनचे नाव-पत्ता-फोनसकट डीटेल्स कळवावेत. ज्या ज्या मिसळपावकराला काही मदत करायची असेल त्याने त्याने एका विशिष्ट मुदतीमधे ती करावी. योग्य तसा निधी जमा झाल्यावर त्या संस्थेला जाऊन ती मदत सुपूर्त करण्यात यावी. या सगळ्याचा छायाचित्रांसकट वृत्तांत त्या त्या माणसाने मिपावर छापावा....

आणि हो असा एखादा प्रकल्प केलाच तर तो होण्यासाठी मिपा हे संकेतस्थळ कारणीभूत ठरले (कारण येथे भेटलेल्या सदस्यांच्या कट्ट्यातून होत असल्याने) असे जाहीरपणे म्हणायला/सांगायला विसरू नये अशी प्रेमळ अट.

म्हणले तर यात तसे कमी लॉजिस्टीक्स असेल. कोणी येथे येऊन गैरफायदा घेणार नाही ना अशी काळजी वाटू शकेल आणि त्यात काही चूक नाही. म्हणून च ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या सेवाभावी संस्था आणि फोकस्ड प्रॉजेक्ट्सचा विचार व्हावा. नुसत्या हृदयाने नाही तर डोक्याने विचार करूनच ज्याला/जीला जो प्रकल्प आवडेल/मानवेल त्याला/तिने स्वेच्छेने मदत करावी. ती मदत काही ठिकाणि पैशाने असेल पण काही ठिकाणि व्हॉलेंटिअरींग/सेवा पद्धतीची पण असू शकते.

यात अमुकने केले म्हणजे मला पण तितकेच केले पाहीजे असे प्रेशर आणायचे नाही आणि घेयचे नाही. पण हा प्रकल्प संसर्गजन्य होण्यासाठी (म्हणजे एकमेकांकडून प्रेरणा घेऊन) ज्याने असे काही केले ते येथे जाहीरपणे सांगावे. यात पब्लिसिटी आहे, एका हाताने केलेले दान इतर हातांना कळून त्यांना पण तसे करावेसे वाटायला लावणे हा उद्देश राहूदेत...

११५ वर्षांपूर्वी लोकमान्यांनी त्याकाळाला साजेसा आणि गरजेप्रमाणे राजकीय कारणांसाठी सार्वजनीक गणेशोत्सवाचा प्रारंभ आणि उपयोग केला. आता राजकारण नाही पण समाजकारणासाठी करता आला, जिथे असेल तिथे, यथाशक्ती तर काही तरी चांगला पायंडा पडेल असे वाटते.

आपले विचार समजून घेयला आवडतील.

शालूची शालीनता

शालूला तीन बहिणी आणि दोन भाऊ. मला आठवतं गाडीअड्ड्याचे पलिकडे शालू राहायची.त्यांच्या घरी दोन गाई होत्या.त्यांचे दूध विकून शालूची आई आपल्या चिल्लापिल्लांचा संभाळ करायची.
शालूच्या वडीलांत काही अर्थच नव्हता.ह्या गृहस्थाने स्वतःच्या चंगळी शिवाय कांही केलंच नाही.सकाळी उठून घरा बाहेर पडल्यावर दुपारच्या पोटातल्या भूकाग्नीला शमवायला घरी यायचे."घडता घडता घडेल ते घडेल" अशा समजूतीत राहून दिवस काढायचे.शालूची आई तर त्यांना पुरी कंटाळून गेली होती.पण करणार काय? "रांदा,वाढा आणि उष्टी काढा"हा त्यावेळचा स्त्रीयांचा आयुष्यक्रम. परंतु,शालुचे आईकडचे आजोळ तसं श्रीमंत होतं म्हणून दोन गाई तिला देवून तिच्या उदरनिर्वाहाचा पश्न त्यांच्याकडून सोडवला होता.
लहानपणी आम्ही जास्त दुध लागलं तर शालूच्या घरी जावून आणायचो,हीच माझी शालूशी ओळख.त्यानंतर शालूला आजीआजोबांनी मुंबईला कॉलेजपर्यंतचं शिक्षण देवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता येवू दिली होती.
अलिकडे शालू मला एका कॉमन मित्राच्या लग्नात भेटली.ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी तिच्या वडीलांविषयी विचारलं.
मला म्हणाली
"मी लहान असतानाच आमचे वडिल आम्हाला सोडून घरातून निघून गेले.योगायोगाने अगदी अलिकडेच मला त्यांच एक पत्र आलं. माझा वाढदिवस ऑक्टोबरमधे झाला पण ह्या फेब्रुवारी मला त्यानी शुभेच्छाचं पत्र पाठवलं.
माझा जन्मदिवस त्यांच्या कधीच लक्षात नसायचा.
माझ्या आईशी त्यांच केव्हांच पटलं नाही.तिच्याशी शेवटचा झालेला एपीसोड हा खरा लकी ठरला.ती त्यांच्या पासून वेगळी झाली. तिच्याकडूनच मी दुसऱ्याला क्षमा करण्यात सुद्धा किती शक्ति असते हे तिच्याच वागण्याकडे पाहून त्या शक्तिवर विश्वास ठेवू लागले."
"तिने त्यांच्या विषयी कधीच तक्रार केली नाही.कधी काळी जर ते घरी आले तर त्यांच्याशी आदराने वागायला मला ती निक्षून सांगायची.
ती म्हणायची
"त्यांनी मला दुःख दिलंय,तुला नाही"
शालू म्हणाली
"नक्कीच मला सुद्धा त्यानी कधी कधी त्रास दिला आहे.माझ्या कॉलेजमधे येवून मझ्याजवळ पैसे मागायचे.
आईला दुषणे द्दयायचे,माझ्या डिग्री समारंभाला मी त्याना बोलावलं नाही म्हणून त्याना राग पण आला होता.असं असलं तरी ते माझे वडिलच होते.ते आजारी झाले की मी त्यांची चौकशी करायची."
मी म्हणालो
"असले विचार फक्त मुलीच करू शकतात.मला वाटतं परमेश्वरानें स्त्रीजातीला हा मोठा गुणच दिला आहे."
त्यावर शालू म्हणाली
"मी त्यांची कधीच अवहेलना केली नाही.कारण कदाचित मी त्यांच्यावर कधीच प्रेम कलं नसेल. बहूदा माझं ज्यावेळी प्रेम करायचं वंय होतं त्यावेळी ते कधीच माझ्या जवळ नव्ह्ते. परंतु,वडिलांची उपेक्षा मी कधीच केली नाही. कदाचित माझे आजीआजोबा माझ्याजवळ होते म्हणून असेल.त्यानी मला लहान मुलांचे खेळ शिकवले.
कुणी म्हणतं, हे सर्व वडलांकडून होणं चांगलं.पण मी म्हणते माझं आयुष्य आनंदात आणि आजीआजोबांच्या प्रेमात गेलं हे ही काही कमी नव्हतं."
मी म्हणालो
"पण तू जास्त करून तुझ्या वडिलांसारखीच दिसतेस."
शालूला हे ऐकून खूप बरं वाटलं.
ती म्हणाली
" हो! बऱ्याच दृष्टीने मी वडिलांचीच मुलगी आहे.माझी उंची,माझे डोळे, आणि माझे अकालनीय केस पिकणे.
तसंच त्यांचा अनाकारण हट्टीपणा,आणि क्वचित वेळां चिडखोरपणा. पण मला त्यांची महत्वाकांशा आणि व्यवहारीपणा पण आला आहे."
"मी वकिल असून सुद्धा त्यांना जरुरीच्यावेळी मदत करू शकले नाही म्हणून माझा त्यांनी थोडे दिवस संबंधपण सोडला होता. मी त्यांच्या भावना ओळखू शकते.पण मी त्यांना बळी गेले नाही.आता ते माझ्याशी पुन्हा संबंध जोडू मागतात.मी पण तयार आहे.
माझ्या सबंध आयुष्यात माझ्या वडिलानी माझ्या जवळ खूप गोष्टी मागितल्या पण क्षमा कधीही मागतली नाही.
मी ती त्यांना ती न मागताच दिली आहे, कारण मी तसं करण्यात विश्वास ठेवते,आणि माझ्या डोक्यावरचा भार पण हलका होतो."

शालूची ही सर्व हकिकत ऐकून माझा तिच्या बद्दल वाटणारा आदर द्विगुणीत झाला.

मी तिचा हात माझ्या हातात घेत तिला म्हटलं
"शालू,आपण कधी कधी म्हणतो ’नांवात काय आहे’ पण खरं सांगू,तुला जरी शालू म्हणतात तरी तुझ्या आईने तुझं मूळ नांव शालिनी ठवलेलं आहे.नांवाप्रमाणे खरंच तुझ्या अंगात शालिनता आहे."
शालू खूप जोराजोरात हंसली.

श्रीकृष्ण सामंत

ओळख

नमस्कार्,खादाड लोक हो
" मिपा " च्या सर्व सभासदांना माझा नमस्कार. आणि मालकांना सुद्धा . बरं का!
मी संतोष जोशी
श्री स्थानक येथे रहातो.लोकांना पोटभर जेऊ घालणे हा व्यवसाय.गेले तीन पिढ्या हा व्यवसाय अव्याहतपणे चालु आहे.(मी तिसरा)
मालक (तात्या) आमचे मित्र आहेत. तशी मैत्री कट्ट्यावरची म्हणजे विचारांची , पण खाणे आणि पिणे यातील आवडीही सारख्या आहेत
हे समजल्यावर जास्त घट्ट झाली.
व्यवसाय तर आहेच पण लोकांना रुचेल ते खाऊ घालणे हा छंद.
त्यामुळे सामिष की निरामिष हा तुच्छ प्रश्न कधीच आडवा येत नाही.
आपणा सर्वांशी मैत्री करायला आवडेल .
पाहूया !! कधी भेटीचा योग येतो ते...