कहीं दूर जब दिन ढल जाये
कॅन्सरशी झुंज देत ओंकारने इहयात्रा संपवली. ओंकार माझा शाळूसोबती. घट्ट गूळपीठ ज्या मोजक्या लोकांशी जमलं त्यांच्यापैकी एक.
आमची जोडी तशी गमतीदार होती. तो जगन्मित्र, मी घुम्या. तो तल्लख स्मरणशक्तीचा, मी संदर्भासाठी पुस्तक धुंडाळणारा. तो तापट आणि शीघ्रकोपी, तर आता रागवायचा हक्क मला आहे का? याच गोंधळात मी अडकलेला. पण आमच्या दोघांत एक समान दुवा म्हणजे पुस्तकप्रेम. त्याच्या घरी एन्सायक्लोपीडियाचे खंड होते. समग्र पुलं होते. दळवी होते. इतकंच काय तर गादीखाली लपवलेलं आनंदध्वजाच्या कथाही होतं. त्यामुळे किशोरावस्थेतून तारुण्यात आम्ही एकत्र प्रवेश केला.