वाढदिवस

निओ's picture
निओ in जनातलं, मनातलं
4 Dec 2018 - 11:17 pm

त्याचा आज वाढदिवस. सकाळी अंथरुणात उठून बसला. काल रात्री बारा पर्यंत जागाच होता. पण शुभेच्छा द्यायला तो सोडून कोणीच जागे नव्हते. whats app वरचे काही फुटकळ मेसेज तपासून हा पण शहाण्या सारखा गपचूप झोपी गेला. तर सकाळी उठून बसला. कोणाची काही चर्चा नाही, भेटवस्तू काय हवी विचारणा नाही, बाहेर कोठे जायचे काही तयारी नाही. आपला वाढदिवस विसरले कि काय हे लोक, असंच त्याला वाटून गेलं.
इतक्यात आलीच ...लगबगीने हसत हसतच बायको आली. येऊन सरळ मांडीवरच बसली.
आयला हे काय... ! म्हणजे एकीकडे बरे वाटले. पण अजून झोपेतून पूर्ण शुद्धीवर येतोय तेवढ्यातच मांडीवर ..हा ..हा ..
गालाला गाल घासून 'हैप्पी ब'डे' झालं.चार दिवसांच्या धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर हा सुखद बदल होता. माझ्यासाठी तुम्ही महत्वाचे आहात वगैरे प्रचंड कौतुकास्पद डायलॉग पण ऐकायला मिळाले. हा सुखावला. पुढे बायकोनं लाडात येऊन आज लवकर उठलात वगैरे वगैरे आणि आज तुमच्यासाठी पालक पनीर आणि शेवयाची खीर करते असं ऐकवलं. हा दचकलाच, एवढ्या ढीग साऱ्या आवडत्या गोष्टींमधून हिला पालक पनीर आणि शेवयाची खीर असले कामचलाऊ पदार्थ सापडले. त्याने मग उगाच काहीतरी कुरकुर केली. मग बायकोनं मेनू बदलला. अंघोळीच्या आधी बायकोनं तेल वगैरे लावून अंगाची मस्त मालिश करून दिली. गरम पाण्याने अंघोळ घातली. नवऱ्याला असल्या गोष्टी आवडतात हे तिला माहित होतं.

याचा ऑफिस मध्ये एक interview होता. त्याच्या डोक्यात कालपासून तेच विचार. बायकोला हो हो म्हणत आवराआवर केली. याचा छोकरा फुगून बसलेला. याने शाळेच्या छोट्या सहलीला परवानगी दिली नव्हती.
" मी तुम्हाला wish पण करणार नाही", पांघरूणातूनच छोटी स्वारी कुरकुरली.
छोकरीनं समजुतीनं घेतलेले. "अरे, पप्पा आपल्याला घेऊन जातो म्हणालेत ना!"
खरं तर याने तिच्याही सहलीला परवानगी दिली नव्हती पण स्वतः घेऊन जायचे कबूल केले होते म्हणून तिची काही हरकत नव्हती.
"पप्पा मी तुमच्यासाठी gift बनविते", छोकरीने अगदी हसत हसत उत्साहाने सांगितले. याला आणखी काय हवे?
छोकरा तोपर्यंत सामान्य झालेला. त्यानं तर चार gift बनविण्याची घोषणा केली. त्याची पोरं खरं तर लय गुणी. मागच्या वाढदिवसाला पण त्यांनी स्वतः च्या हातानी भेटकार्ड बनविले होते.छोकऱ्यान Thor चा हातोडा रेखाटून भेट दिला होता. छोकरीनं सजवलेलं भेटकार्ड आणि my Pappa is best in the world वगैरे वगैरे छानशा ओळी लिहिलेल्या.

यानं आवरलं. बायको पाठ धरूनच होती. ठरलेला मेनू बनवायला सकाळपासूनच बिचारी धावपळ करत होती. टिफिन बनवून द्यायचा होता. याने कपडे केले. बायको समोरच उभी. तुमच्यासाठी काय करू. बायकोचा लडिवाळ प्रश्न. यानं पण काहीतरी तसंच गोड बोलावं ना. पण नाही. हा तिच्या लेखी कुचका...तस्साच बोलला.
"आठवडा झाला, कॉटनच्या अंडरपँटी उसविल्यात तेवढ्या शिवून दिल्यात तरी पुरे"
तिच्या म्हणण्यानुसार, हा फुगलेल्या फुग्याला कायम टाचणी लावणार.

पोरांना कसली तरी सुट्टी होती. कन्येनं मैत्रिणींना बोलावलं होतं. छोटीशी घरगुती पार्टी करायला. छोकऱ्याला पण राहवलं नाही त्याने पण त्याच्या मित्राला बोलावलं. हा ऑफिसला गेला. दुचाकी चालविताना पण Interview चा विचार. पण फारसं काही न होता Interview चांगला झाला. याला स्वतः च कौतुक वाटलं नि हा मोकळा झाला. संध्याकाळी लवकर घरी आला. बायकोच फोन येऊन गेलाच होता. पोरांची पार्टी संपली होती. बायकोला काय विश्रांती मिळाली नव्हती, खरं तर तिलाही सुट्टी होती.

घरी येऊन बघतो तर बायकोने गाडीतले फूट मॅट धुवून वाळत टाकले होते. काम चांगलं होतं पण वाळत घालायची जागा चुकली होती. गेट च्या टोकदार बाणांनी खालचे आवरण फाटायची जास्त शक्यता होती. फुकटचे नुकसान. याची सटकली होती पण आज वाढदिवस जास्त बडबड करून चालायचं नाही, उगा रंगाचा बेरंग व्हायचा. तरीही चार दोन वाक्ये सुनावलीच. बायकोनं अगदी हलकेपणाने घेतले आणि पुढे बोलू नये म्हणून अक्षरशः तोंडच बंद केले. मग थोडावेळ आराम केला. बायको नि पोरं, तिघ त्याला तीन बाजूंनी चिकटले. कुटुंबातले सुख म्हणजे काय ते हेच त्याला जाणवले. त्या सुखाची ऊब पुरेपूर जाणवली.

रात्री जेवायला जायचं हॉटेल त्यानं सांगितले. नवीन हॉटेल म्हणून सर्वांना उत्सुकता. कसं आहे? कुठे आहे? वगैरे त्याच त्या प्रश्नांची उत्तरे देत राहिला. छोकरीनं भेट कार्ड बनवायला घेतलेलं तर छोकऱ्याला कंदील?? बनवायचा होता. पण त्याला मम्मीकडून जास्त प्रोत्साहन मिळाल्यामुळे तो तसाच टाईमपास करत बसला. चार gift देण्याची घोषणा केवळ घोषणाच राहिली, मित्रांच्या नादात छोकऱ्याला वेळच मिळाला नाही. बाकी वाढदिवसाला कंदील भेट देणे अशी अभिनव कल्पना आपल्या दुसरीतल्या छोकऱ्याच्या डोक्यात येतेच कशी याचे त्याला कौतुक वाटत राहिले. छोकरीनं gift कडे फिरकू दिले नाही. तुम्हाला नंतर देणार असा सांगून कटवलं.
बायकोला विचारलं तू काय gift देणार? तिची काहीच हालचाल नाही, नुसतंच लाडे लाडे म्हणते काय, " मी काही दिलेलं तुम्हाला कुठे पसंत पडतं" झालं आता यावर काय बोलणार.

आवरून बायकोनं आरशासमोर मिरवून घेतलं. बारीक दिसत असल्याचं पण सांगून टाकलं. एकदाचे आवराआवर करून सर्वजण जेवणासाठी बाहेर पडले. छोकऱ्यानं हॉटेलच्या निवडीवर समाधान व्यक्त केले. पप्पा हेच पाहिजे असं काही नाही दुसऱ्या साध्या ठिकाणी गेलो असतो तरी चाललं असतं असं सांगून समजूतदारपणा दाखवला.

सगळे हॉटेलात पोचले. ठीकठाक वातावरण होते. मग पुढच्या घटना नेहमीप्रमाणे घडल्या. हे टेबल कि ते टेबल, इथे कि तिथे करत एका ठिकाणी स्थानापन्न झाले. पण बसल्यानंतरही बायकोने नाराजी व्यक्त केली. इकडे नको तिकडे जाऊ. त्यानं आर्जवं करत सांभाळून घ्यायला सांगितले आणि मग थोड्या वेळात सगळे सेट झाले. आता ऑर्डर काय द्यायची, quantity किती सांगायची यावर चर्चा, मग मुलांसाठी हे सांगू पण त्यांनी हे खाल्ले कि ते खाणार नाहीत याचीही चर्चा. आत्ता ऑर्डर काय द्यायची ते राहिलं सगळ्या पुढच्याच गप्पा. हा आपला उगाच बुचकळ्यात पडल्या सारखा बायको शेवटचे काय सांगते याची वाट बघत नुसताच बसून राहिला. हे हि त्याला सवयीचे झालेले. शेवटी एकदाची स्टार्टरची ऑर्डर गेली एकदाची नी जरा मोकळे झाले. खूप आनंदानं छोकरीनं भेट कार्ड दिलं. छान सजवलं होतं. पप्पांचा फोटो पण होता त्यात. बायकोनं हळूच याच्या पाकिटातून लंपास केला होता. छान छान फोटो काढले गेले, selfi झाल्या. फोटो काढताना यानं उगाच वेडे वाकडे तोंड करत, काणे डोळे करत बच्चे कंपनीला हसवलं. छोकऱ्याची दिवसभरातली बडबड चालू होती, मी असे केले, मित्राची बहीण मला चूप बस म्हणाली, मी तिला पुढच्या वेळेस बोलवणार नाही वगैरे वगैरे.

आता पुढचा कार्यक्रम म्हणजे मेन कोर्सची ऑर्डर देणे. ते हॉटेल निघालं Multi cuisine. त्याचे मेनू नीट समजेना. पदार्थांची अगम्य नावं आणि त्यात नेमकं काय असावं याचा अंदाज त्यालाही येईना. शेवटी समजलेल्या यादीमधून त्यातल्या त्यात नवीन पदार्थाची ऑर्डर दिली आणि परत कधी असल्या multi cuisine वगैरे हॉटेलात जायचे नाही हे हि ठरवून टाकले. स्टार्टर येईपर्यंत पोरांनी कधी येणार, कधी येणार करत पकवून टाकलं. छोकरा तर सारखा मागे वळून वळून वेटर काय आणतो ते पाहत होता.
छोकऱ्याला तो म्हणाला,"तू जर असं सारखा वळून वळून पाहशील, तर तो आणलेली डिश पण परत घेऊन जाईल"
यावर छोकऱ्याने तुम्ही काहीही सांगता असे भाव दाखविले.
शेवटी स्टार्टर्स आले नी छोकरा मोठमोठ्याने अरे व्वा ! काय छान आहे करत गुणगान करत खाऊ लागला. छोकरीचं निवांत चाललेलं. जेवण आटोपून मंडळी बाहेर पडली. घर येईपर्यंत पोरांना गाडीतच झोप लागली. दिवस संपला होता.

पडल्या पडल्या नवरा बायकोच्या गप्पा चाललेल्या. बायको म्हणे तुमच्यामुळे माझ्यात खूप बदल झाला. आपल्या हट्टी बायकोकडून असं ऐकल्यावर त्याला थट्टा करायची लहर आली. तो म्हणे " बाई गं, इतक्या अपरात्री तू हि राज कि बात सांगितलीस. आता काय माझ्या डोळ्याला डोळा लागणार नाही. तळमळतच रात्र जाणार माझी."
बायकोने छातीवर एक गुद्दा मारला ....तर असा त्याचा साधारणपणे पोळा साजरा झाला.

कथामुक्तकविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानkathaaमौजमजाप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनआस्वादलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

5 Dec 2018 - 1:43 pm | श्वेता२४

हलकं फुलक आणि वास्तवदर्शी. खूप आवडलं

निओ's picture

5 Dec 2018 - 6:19 pm | निओ

धन्यवाद श्वेता२४. प्रतिसादाबद्दल आभार :)

कुमार१'s picture

5 Dec 2018 - 2:07 pm | कुमार१

छान लिखाण !

निओ's picture

5 Dec 2018 - 6:20 pm | निओ

कुमार१ सर तुमच्या प्रतिसादाबद्दल आभार .

ज्योति अळवणी's picture

5 Dec 2018 - 3:10 pm | ज्योति अळवणी

लग्नानंतर 10-12 वर्षानंतरचा वाढदिवस असाच असतो सर्वांचा!

आपलाच आरसा बघून गम्मत वाटली. मस्त

निओ's picture

5 Dec 2018 - 6:23 pm | निओ

धन्यवाद ज्योति ताई. होय, तुम्ही बरोबर ताडलंत.

वास्तवदर्शी सुरेख चित्रण.

निओ's picture

5 Dec 2018 - 6:25 pm | निओ

धन्यवाद जागु, प्रतिसादाबद्दल आभार :)

दुर्गविहारी's picture

5 Dec 2018 - 7:44 pm | दुर्गविहारी

छान लिहिले आहे. :-)

निओ's picture

9 Dec 2018 - 11:11 am | निओ

धन्यवाद ! दु. वि. :)

सविता००१'s picture

5 Dec 2018 - 9:31 pm | सविता००१

मस्त लिहिलय

निओ's picture

9 Dec 2018 - 11:48 am | निओ

धन्यवाद सविता००१.

मंजूताई's picture

6 Dec 2018 - 3:07 am | मंजूताई

मस्त लिहीलंय!

निओ's picture

9 Dec 2018 - 11:55 am | निओ

धन्यवाद मंजूताई.

विजुभाऊ's picture

6 Dec 2018 - 7:03 am | विजुभाऊ

झक्कास लिहिलाय हो

तर असा त्याचा साधारणपणे पोळा साजरा झाला.

हे वाक्य खूप प्टले.
" शिंगे रंगविली........... बाशिंगे बांधली " कविता आठवली

निओ's picture

9 Dec 2018 - 11:56 am | निओ

धन्यवाद विजुभाऊ

चौथा कोनाडा's picture

7 Dec 2018 - 9:50 am | चौथा कोनाडा

फर्मास लिहीलंय !
मस्त. आवडलं खूप !
आमच्या एका लग्नाच्या वाढदिवसाला मल्टी काझीन मध्ये गेलो होतो, तेंव्हा फ्या फ्या झाली होती ते आठवलं !

निओ's picture

9 Dec 2018 - 11:12 am | निओ

:) :)

पद्मावति's picture

7 Dec 2018 - 3:24 pm | पद्मावति

मस्तच :)

निओ's picture

9 Dec 2018 - 11:16 am | निओ

धन्यवाद पद्मावतिजी

मराठी कथालेखक's picture

7 Dec 2018 - 6:53 pm | मराठी कथालेखक

आयुष्यातील खास क्षणांचीही हळूहळू चौकट बनू लागते.

निओ's picture

9 Dec 2018 - 11:15 am | निओ

+1
हो...खरंच .. कुटुंबासोबतचे असे हलके फुलके क्षण टिपून घ्यावेत.