प्रकटन
ई-पत्र किंवा ई-गप्पा मधल्या गमती जमती
नमस्कार मंडळी,
गणपा शेट बरोबर ग-बोल वर गप्पा करताना टंकन-गल्लती मुळे एक विनोद झाला. त्यावरुन आधीच्या काळचे काही झालेले ग-बोल वरचे गैरसमज आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
कधी कंप्युटर च्या प्रॉब्लेम्स मुळे, कधी घाईगडबडीत टंकण्यामुळे आपण कै च्या कैच बोलुन्/टंकुन जातो, पण परिणाम नेहमीच विनोदी असतील असे नाही ना, 
*************************************************************
एकदा मला माझी जुनी मैत्रीण फब वर भेटली. तिच्याशी १-२ वेळा फॉर्मल बोलणं झालं. मग असंच एका दिवशी..
मी: Hi. How r u?
ती: I am fine..
आता मला लिहायचं होतं की "Hows your Daughtar""
पण माझा कीबोर्ड गंड्ला आणि
मी: Hows our Daughtar?
झालं का? तिचं उत्तर नाही.. बराच वेळं.. मग मला कळालं की मी "Y" टाईपच केला नाहिये..
----------------------------------------------------------------------------------
माझी मैत्रीणः pls cum here.
मी: ( आता हापिसात कुठे *** करु?)
----------------------------------------------------------------------------------
असंच एक...
---मी: Dont worry about it.. take it easy (असं लिहायचं होतं.. पण उंदीर खुपच सेंसीटीव अस्ल्याने)
मी: Dont take it easy worry about it.. असं झालं.. मग झालच ना.. आमचे ३ तास टेलीकॉम च्या कर्मचार्यांचे पगार वाढवत होते.. 

हिंदुत्व आणि भारतीयत्व
समरमध्ये इथे, म्हणजे अमेरिकेत, फार्मर्स मार्केट नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे जागोजागी आठवड्याचा बाजार भरतो. आम्ही सबर्बमध्ये राहतो, खरेदी सुपरमार्केटमध्ये करतो. त्याऐवजी एखाद्या शनिवारी किंवा रविवारी सकाळी शहरांमध्ये जागोजागी आसपासच्या शेतांतून येणारा ताजा भाजीपाला व फळं विकण्यासाठी शेतकरी व मळेवाले येतात. खरेदीसाठी भारतीय व चिनी लोक तसेच ऑर्गॅनिक व फ्रेश खाण्याची हौस असलेले अनेक अमेरिकन तिथे येतात. या बाजारातून नुसता फेरफटका मारणे हादेखील अतिशय उल्हसित करणारा अनुभव असतो.
परवाच आमच्या इथल्या भाजीबाजारात एका अनोळखी अमेरिकन बाईशी माझे बोलणे झाले. भाजी निवडताना "तो पलिकडचा भोपळा इथे देता का?" "घेवडा फार छान आहे नाही?" "तुमच्याकडे कसा करतात" इत्यादी झाल्यावर तिने मला विचारले,
"तुम्ही हिंदू आहात, हो ना?" आता तसं म्हटलं तर मी कुठलाच धर्म रूढार्थाने पाळत नाही. म्हणून मी म्हटले,
"नाही, मी भारतीय आहे"
"पण भारतीय म्हणजेच हिंदू ना?" तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसले.
"हिंदू हा धर्म आहे. जसे ख्रिश्चन, मुस्लीम तसेच हिंदू. खूपसे भारतीय हिंदू असतात. पण इतर धर्माचेही अनेक लोक भारतात राहतात." मी म्हटले
नवीन मिळालेल्या ज्ञानाने तिचा गोंधळ उडालेला दिसत होता. खरे तर भारतीय या विषयावर एखादे लघु व्याख्यानही झोडायला मला आवडले असते. पण स्थळ काळ अनुकूल नव्हते.
आणखीन असाच एक दुसरा अनुभव.
इथल्या एका लायब्ररीत मला काही हिंदी पुस्तकं बघायची होती. लायब्ररीयनने सांगितलं की "या इथून पलिकडे परदेशी भाषांचा विभाग आहे. तिथे तुम्हाला "हिंडू" भाषेतली पुस्तकं मिळतील." तिथेही मला तिचं हिंदी भाषा व हिंदू धर्म या बाबतीत थोडंसं प्रबोधन करावं लागलं. सगळे हिंदी भाषिक हिंदू नसतात, सगळे हिंदू हिंदी बोलत नाहीत, आणि सगळे भारतीय हिंदू किंवा हिंदीभाषिक नसतात हे समजावून सांगायला थोडे कष्ट घ्यावे लागले.
तसे बघितले तर इंडियन शब्दाचे मूळ हिंदू शब्दाच्या जवळच जाते. सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे ते हिंदू आणि त्या प्रदेशाचे नाव हिंद किंवा हिंदुस्तान. सिंधूचं इंडस रिव्हर झालं तसं हिंदचं इंडिया झालं. त्यात हिंदी हे भाषेचं नाव त्याच मुळांमधून आलेलं. मात्र आजच्या काळात हिंदू शब्दाने धर्म सूचित होतो, तर भारतीय शब्दाने भारतावर निष्ठा असणारे सर्वधर्मी नागरिक सूचित होतात.
भारतीय समाजाशी इतका संपर्क येऊनही परदेशातल्या लोकांमध्ये इतक्या मूलभूत बाबतींमध्ये गोंधळ असू शकतो, याचं आश्चर्य वाटलं. वरील प्रसंगांमध्ये शब्दांमधल्या साम्यामुळे व अज्ञानामुळे हे झाले असावे, त्यामुळे मला त्यांचा राग आला नाही. मात्र आपला समाज, आपली संस्कृती, आपला देश, आपली ओळख (आयडेंटीटी) याबद्दल आपण जिथे राहतो त्या परदेशी समाजात जास्त अवेअरनेस असावा असे मनापासून वाटते. तुम्हाला असे काही अनुभव आले आहेत का?
'असल उत्तर'! भाग-१
वि. सू. : मी युद्धशास्त्रातला जाणकार नाही. पण भारतीय सैन्याने प्रतिकूल परिस्थीतीत मिळवलेल्या एका महत्वाच्या विजयाची आपल्या सगळ्याना आठवण असावी एव्हढाच ह्या लेखाचा उद्देश आहे.
आज ८ सप्टेंबर! स्वतंत्र भारताच्या लष्करी इतिहासातील एका फार महत्वाच्या लढाईची सुरूवात आजच्याच दिवशी झाली होती. ही लढाई १९६५ च्या युद्धाला कलाटणी देणार्या महत्वाच्या लढायांपैकी सर्वात महत्वाची मानावी लागेल. पण त्याआधी १९६५ च्या युद्धाची थोडीशी पार्श्वभूमी समजावून घ्यावी लागेल.
१९६२ च्या चीनकडून झालेल्या पराभवातून भारतीय सैन्यदलं अजून पूरती सावरली नव्हती. नेहरूंच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री नुकतेच पंतप्रधान म्हणून निवडून आले होते. पाकिस्तानी लष्कर अमेरिकेच्या मदतीने चिलखती दल आणि रणगाडा दलांच नुतनीकरण करत होतं आणि भारतीय लष्कराकडे मात्र अजूनही दुसर्या महायुद्धात वापरलेले रणगाडे आणि युद्धसामग्रीच होती. राजकिय आणि सामरिकदृष्टया भारताची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. पाकिस्तानात तेव्हा ज. अयुब खान सत्तेवर होते आणि उघडपणे भारताला आव्हान देउन "धोतीवाले क्या लडेंगे?" असे उपहासत्मक उद्गार काढण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती.
ऑगस्ट १९६५ च्या सुमारास झुल्फीकार अली भुत्तोंच्या (तेव्हाचे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री) पाठिंब्याने पाकिस्तानी सैन्याने काश्मिर सीमेवर आगळिक करायला सुरुवात केली. 'ऑपरेशन जिब्राल्टर' ह्या नावाने हे प्रकरण (कु)प्रसिद्ध आहे. पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षित केलेले 'मुजाहिदीन' काश्मिरमध्ये घुसखोरी करून घातपात करू लागले की ज्यामुळे भारतीय सैन्याला हालचाल करणं फार कठिण होउन बसल असतं. परंतु, स्थानिक जनतेचा अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने, तर काही ठिकाणी चक्क विरोध झाल्याने पाकिस्तानी सैन्याची चांगलीच अडचण झाली. त्यातच भारतीय सैन्याने चोख प्रत्युतर द्यायला सुरुवात केल्यामुळे पाकव्याप्त काश्मिरचा काही भागही भारताच्या ताब्यात आला. तरीही, काश्मिर आघाडी भारताला जड जात होती.
अशा परिस्थितीत पंजाबमधून नवीन आघाडी उघडून पाकिस्तानवर दबाव आणावा, ह्या लष्कराच्या प्रस्तावाला शास्त्रीजींनी तत्काळ मान्यता दिली. ह्यामुळेच पुढे भारतीय सैन्याला काश्मिर आघाडीवर थोडी उसंत मिळू शकली. पण भारतीय सैन्य लाहोरच्या 'कंटॉंमेंन्ट' पर्यंत जाउन जरी धडकलं असलं, तरी पाकिस्तानी सैन्याकडे आधुनिक शस्त्रास्त्र होती आणि तीही भारताकडे असलेल्या शस्त्रास्त्रांच्या प्रमाणात कितीतरी अधिक! त्यामुळे पंजाब आघाडी लढवणं हीसुद्धा फार सोपी गोष्ट नव्हती. त्यातच पाकिस्ताननेही आक्रमक धोरणं अवलंबलं आणि खेमकरण ताब्यात घेउन भारताच्या भूभागात प्रवेश केला.
इथून पुढे सुरूवात झाली दुसर्या महायुध्दानंतरच्या (आणि १९६६ च्या अरब-ईस्त्रायल संघर्षाच्या आधीच्या) सगळ्यात मोठ्या रणगाड्यांच्या लढाईला! ती लढाई म्हणजेच भारताचं पाकिस्तानला दिलेलं 'असल उत्तर'!
(क्रमशः)
काळ नावाचं औषध......
लेख पुर्वी अन्यत्र प्रकाशित
-----------------------
लोक म्हणतात काळ हे सगळ्यात प्रभावी औषध आहे. जात्या काळाबरोबर सगळ्याच जखमा हळूहळू भरून येतात म्हणे. होतं का बुवा खरंच असं?
११-१२ वर्षापुर्वीची गोष्ट, माझी एक मैत्रिण होती आणि ते म्हणतात ना कोणाच्या तरी प्रभावाखाली येणं तसं माझं झालं होतं. I was much too impressed with her!...तशा बाकीच्या पण मैत्रिणी झाल्या होत्या पण ही माझी खूपच आवडती मैत्रिण होती. आणि ती माझ्या बाकीच्या कुठल्याच मैत्रिणींना आवडायची नाही. शिष्ट आहे, स्वत:ला खूप ग्रेट समजते...वगैरे वगैरे.....आणि बाकीच्या मैत्रिणींशी माझं तिच्यावरून खूप वाजायचं, पण मी काही माझी मतं बदलत नव्हते. पुढच्या शिक्षणात तिच्या आणि माझ्या वाटा वेगळ्या होणार, मग आत्तासारखा contact राहणार नाही या गोष्टीचं मला फार वाईट वाटत असे.
बरं, बाकीच्या मैत्रिणीशी हिच्यासाठी भांडण करूनसुद्धा तिचं आणि माझं फार काही छान होतं अशातला भाग नव्हता. आम्ही दोन-अडीच वर्षे एकत्र असू त्या पैकी निदान दिड वर्ष तरी आम्ही भांडणं, अबोला यात घालवला. सर्वात शेवटचं भांडण मला खूप अनपेक्षित होतं जेव्हा काहीच कारण न सांगता तिने माझ्याशी बोलणं बंद केलं. ते ज्युनिअर कॉलेजचं वर्ष संपलं, पुढच्या वर्षी दोघी वेगवेगळ्या कॉलेजला गेलो. जवळजवळ दिड वर्ष झालं होतं भांडणाला! मग अचानक एकदा परत भेट झाली. कदाचित अशा प्रकारे भांडणं हे बालिशपणा या सदरात मोडतं असं वाटून किंवा जिला कधीतरी सर्वात जवळची मैत्रिण म्हटलं तिच्याशी निगडीत शेवट शेवट च्या आठवणी कडवट असू नयेत असं वाटून का होईना पण अबोला सुटला. तरीपण माझ्या आणि कदाचित तिच्यापण मनातली अढी पूर्णपणे गेली नाही. काही वेळेला भेटलो आणि मग contact कमी होत गेला.....संपला.
७-८ वर्षांपुर्वी कधीतरी आम्ही शेवटचे भेटलो होतो. तेव्हा email, मोबाइल हे प्रकार इतके कॉमन नव्हते. सो घरचा पत्ता आणि नंबर सोडला तर माझ्याकडे तिचे काहीच contact details नव्हते. १०-१२ वर्षांपुर्वी सहा आकडी असलेले पुण्याचे फोन नंबर गेल्या काही वर्षात पहिल्यांदा सात आणि नंतर आठ आकडी झाले, त्यामुळे आजही माझ्या लक्षात असलेला सहा आकडी नंबर काहीच कामाचा नाही. दोन- अडीच वर्षांपुर्वी तिच्या घराजवळ असलेल्या एका फर्निचरच्या दुकानात आम्ही सहज काहीतरी चौकशी करायला गेलो होतो. नंतर मी तिच्या बिल्डींगच्या पार्किंग मध्ये चक्कर मारून आले. मला माहीत असलेली तिची, तिच्या वडीलांची..कुठल्याच गाडीचा तिथे पत्ता नव्हता. अर्थात १०-१२ वर्षात तिने घर, गाडी बदललेलं असेल आणि मला तसंही की ही तशी लवकरच लग्न करेल हे मनात कुठेतरी माहीत होतं so तिचे आईवडील तिथे राहत असले तरी ती आता तिथे नसणारच हा माझा कयास होता. शिवाय आमचं शेवटचं भांडण तिच्या घरात तिच्या आई- वडीलांसमोर झालं होतं. त्यानंतर मी कधीच तिच्या घरी गेले नव्हते मग आता वरती जाऊन ती सध्या कुठे असते हे विचारणे मला प्रशस्त वाटलं नाही.
इंटरनेट हा प्रकार हाताला लागल्यापासून गेल्या ४-५ वर्षात, मला जेव्हा रिकामा वेळ मिळाला मी तिच्याबद्दल माहिती काढायचा प्रयत्न केला. नेट वरती एखाद्या माणसाला शोधण्याचे जे सगळे प्रकार उपलब्ध आहेत, मी सगळीकडे तिला शोधलं. याहू people search आणि अशा कित्येक ठिकाणी मी तिचे नाव शोधले. yahoo.com, hotmail.com, usa.net .... मला जे कुठले लोकप्रिय मेल सर्व्हर माहित होते त्यावर तिच्या नावाची सगळी combinations असलेल्या email addresses वर मी मेल टाकले. ऑर्कूट म्हणू नका.....अजून तसल्या साईट्स..अगदी गूगलवर सुद्धा तिच्या नावाचा मी सर्च केला. जेव्हा यातलं काहीच यशस्वी झालं नाही तेव्हा लग्न होऊन तिचं नाव बदललं असेल असं वाटून मी तिचा भाऊ, आमच्या त्या वेळेसच्या कॉमन मैत्रिणी शोधल्या. कशातूनच काही रीझल्टस आले नाहीत, आता अजून काय करावे असं वाटत असताना अचानक पणे मला तिच्या त्यावेळेसच्या एक जवळच्या मैत्रिणीचे प्रोफाइल ऑर्कुटवर अनपेक्षितपणे थोड्याच दिवसांपुर्वी सापडले.
तिला बाकीच्या सगळ्या चौकश्याबरोबर ही सध्या काय करते हे पण विचारलं, मला अपेक्षित होतं त्याप्रमाणे त्यांचा अजूनही contact आहे. तिचं लग्नं झालं काही वर्षापुर्वीच....तिला एक मुलगा झालाय हे कळलं. ती पुण्यातच असते, सॉफ्टवेअर मध्येच आहे, T Systems मध्ये काम करते हे सांगितलं, तिचं लग्नानंतरचं नाव आणि तिचा ई मेल address पण दिला...योगायोग बघा....इथं ऑफिसपाशी रस्ता ओलांडल्यावर T systems चे ऑफ़िस आहे! अक्षरश: "जिसको ढूंढा गली गली..वो घर के पिछवाडे मिली" असं माझं झालं. मला "युरेका युरेका.." झालं....अगदी उत्साहात मी तिला लगेच "काय कशी आहेस..ओळखलंस का हे मी विचारत नाही..कारण तू ओळखशीलच याची मला खात्री आहे..तुझ्या उत्तराची वाट बघतेय" असा एक मेल टाकला...............................
दोन महिने होऊन गेला..अजून एका शब्दाने उत्तर नाही आलं....जो अबोला सुटला असं वाटलं होतं तो आहे तसाच आहे....हे कुठेतरी जाणवलं..आणि कुठून दुर्बुद्धी झाली आणि आपण या व्यक्तीचा इतका शोध घेतला असं झालं. अबोला सुटलाय फक्त संपर्क कसा करायचा हे माहीत नसल्यामुळे नातं पुढे राहिलं नाही या गैरसमजात कायम राहिले असते तर किती बरं झालं असतं!!!!
आणि तिने तरी असं काय करावं, दोन ओळीचं उत्तर दिलं असतं तर काय बिघडलं असतं.. एकेकाळच्या सर्वात जवळच्या मैत्रिणीला? काय मी तिच्या घरी लगेच जेवायला जाणार होते की तिने तेव्हा केलेल्या सगळ्या उचापती तिच्या नव-याला जाऊन सांगणार होते?
आजही माझे ई-मेल आणि कितीतरी ठिकाणचे पासवर्डस मध्ये तिचं नाव, तिचा वाढदिवस, तिचा फोन नंबर, तिच्या पहिल्या गाडीचा नंबर यापैकी काही ना काहीतरी गुंफलेलं आहे, म्हणजे तसं एका प्रकारे पाहिलं तर आज १२-१३ वर्षानंतरसुद्धा माझा एक दिवस पण असा जात नाही की दोन क्षण तरी पासवर्ड टाइप करता करता मी तिचा विचार केला नाही.
वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या आवडीनिवडी, आदर्श बदलत राहतात. मग त्यामध्ये बसणारी लोकं आपल्यासाठी स्टार असतात. सहसा हे दूरचे चमकणारे तारे असतात पण कधीतरी त्या लोकांशी नातं पण जोडलं जातं. मग काही वर्षांनी तुमच्या आवडीनिवडी, आदर्श बदलले, ती लोकं तेवढी ग्रेट वाटेनाशी झाली तरी वाटणारा जिव्हाळा तुटत नाही. तसंच हिच्या बाबतीत होतं. मी कशी असायला हवे, दिसायला हवे वगैरे वगैरे.. असं मला जे वाटायचं त्याचं प्रतिबिंब मला तेव्हा तिच्यात दिसायचं. नंतर माझ्या कल्पना बदलल्या, पण आज जर तिची आणि माझी मैत्री तशीच राहिली असती तर...जग इकडचं तिकडे झालं, प्रसंगी मला त्रास झाला तरी मला शक्य असलेल्या सर्व प्रकारानी मी तिला emotional backing किंवा इतर कुठलीही मदत केली असती याची मला खात्री आहे.
अशीच ह्याच सुमारास झालेली माझी दुसरी एक मैत्रिण.....त्याच सुमारास कसली...तिघी एकाच ज्युनिअर कॉलेजला एका वर्गात होतो ना! वरती जिच्या बद्दल सांगितलंय ती जिला अजिबात आवडायची नाही त्यातली एक जण! पण आमचे या वरून कधी वाद झाले नाहीत..खरं तर आमच्यात भांडण असं एकदाही झालंच नाही. एखादा माणूस आवडणे...आणि एखाद्या माणसाच्या सहवासात मन:शांती मिळणे ह्या तशा खूप वेगळ्या गोष्टी आहेत पण दोन्ही प्रकारची माणसं तुमच्या आयुष्यात तितकीच महत्वाची असतात. ती दुसरी मैत्रिण खूप आवडायची आणि हिच्या बरोबर असलं, हिच्याशी बोललं की माझं frustration कमी होत असे. वयाने आपल्या एवढीच असून ही इतकी समंजस, शांत कशी...असा मला प्रश्न पडत असे. शिवाय अभ्यासात पण खूप हुषार..छान गाणं म्हणायची. तिच्यामध्ये असं काहीतरी होतं की तिच्याशी बोललं की बरं वाटायचं त्यामुळे मी तिला माझी प्रत्येक गोष्ट सांगायचे. अगदी माझ्या latest crush पासून ते मला वाटणा-या inferiority complex पर्यंत आणि घरी झालेल्या भांडणांपासून (त्या वेळी माझं घरी मुळीच पटायचं नाही..आठवड्यातून एकदातरी वादावादी हमखास!!) ते माझ्या भविष्याबद्दलच्या स्वप्नांबद्दल!!
१२ वीत माझे १२ वाजले, पण ही मात्र छान मार्क मिळवून पास झाली, फ़्री सीट मिळवून मुंबईला engineering साठी गेली. ती मुंबईला गेली तरी आमचा संपर्क मुळीच कमी झाला नाही. कॉलेजला येता जाता मी कायम तिच्या घरी थांबायचे, ती असली किंवा नसली तरी काका-काकू, तिचा भाऊ यांच्याशी गप्पा मारायचे. पत्रे किंवा फोन जरी केला नाही तरी २-३ आठवड्यातून ती जेव्हा एकदा पुण्याला यायची तेव्हा माझी संध्याकाळची चक्कर ठरलेली असायची. शनिवार किंवा रविवार संध्याकाळी तिच्या कडे जायचं, तिच्या घरून बोलत बोलत कधी S.N.D.T. कॉलेजचा कॅम्पस, कधी नळ स्टॉप जवळचा बंगल्यांचा परीसर तर कधी सेनापती बापट रोड अशी दोन-तीन तासांची फ़ेरी पक्की असायची. मग तेव्हा मी तिला आमच्या त्याआधीच्या भेटीनंतर माझ्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या महत्वाच्या, बिनमहत्वाच्या गोष्टींचे update देत असे. तेव्हा मला कधी ही गोष्ट फारशी जरी जाणवली नाही तरी आता विचार केल्यावर वाटते की ती स्वत:बद्दल फार कमी बोलायची, मी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांशिवाय क्वचितच तिने मला ती काय विचार करते, तिचे भविष्याबद्दलचे विचार अशा गोष्टी सांगितल्या. माझ्यासारख्या लोकांना आयुष्यातली आणि मनातली प्रत्येक गोष्ट सांगायची गरज पडते. पण तशी प्रत्येकालाच असतेच असे नाही हे जरी खरे असले तरी आपल्याला inside out ओळखणा-या माणसाबद्दल आपल्याला फारसं काही माहीतच नाही ही काही सुखावह कल्पना नाही.
तिची engineering ची ४ वर्षे संपली आणि ती पुण्यात परत आली ती सत्यम कॉम्प्युटर्स साठी कॅम्पस मधून select होऊनच! आम्ही त्याबद्दल अगदी पार्टी वगैरे पण करून झाली, पण तो सुमार होता २००१ चा...IT कंपन्या recession मुळे अडचणीत यायला सुरवात झाली होती. lay off, नवीन recruitments रद्द करणे हे प्रकार फार किती तरी ठिकाणी सुरू झाले होते. आता हिचे काय काय होणार असं म्हणत शेवटी सत्यम चे पत्र आले. कॅम्पस मधल्या लोकांना त्यांनी निवड रद्द झाली असे सांगितले नसले तरी joining date अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती. मला वाटलं होतं किंबहुना मला खात्री होती की हिने थोडी फार खटपट केली की हिचे सत्यम नसले तरी दुस-या कुठल्या तरी चांगल्या कंपनीत नक्की काहीतरी होईल. पण ही तर खूपच निवांत होती. सत्यम कडून joining चे पत्र येईल अशी आशेने ती बाहेर कुठे फारसं try च करत नाहीये असं निदान मला वाटायला लागलं. त्यातच तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी लग्नासाठी स्थळे बघायला सुरूवात केली, ती त्या बाबतीतही मला okay वाटली . माझ्यासाठी हा पण धक्का होता. come on!!!.....just 21-22....मुलगा असो वा मुलगी...माणसाने आधी स्वत:ची काहीतरी ओळख निर्माण करावी मग दुस-या कोणाशी स्वत:चे आयुष्य जोडावे..असं माझं मत आहे. B.E. ची डिग्री असलेलली माझी एकमेव मैत्रिण....जिला छान करीअर करण्याचे चान्सेस माझ्यापेक्षा खूप जास्त होते ती मात्र या मताची नाही हे मला माहीतच नव्हतं. इतकी वर्षे एकत्र असून मला हे कधीच का जाणवलं नाही? पण म्हटलं ठीक आहे लग्नासाठी स्थळे शोधायला सुरूवात केली की काय लगेच ठरतंच असं नाही आणि ती सुद्धा मी नोकरी शोधतेय, सत्यम वर फक्त अवलंबून नाही असं म्हटली. त्या वेळी माझं NIIT संपून मी पण नोकरी शोधायला लागले होते. भेटींमधलं अंतर थोडं वाढलं होतं.
मला आठवतंय २४ मे २००२, Sinewave मध्ये मी select झाले आणि हे तिला सांगायला मी फोन केला, तेव्हा ती "मला पण तुला काहीतरी सांगायचं आहे, भेटल्यावर बोलू" असं म्हटली. पण त्यानंतर लगेच तिच्याकडे जायला मला काही जमलं नाही आणि कामाचा पहिला आठवडा घाईत गेला. २ जून तिचा वाढदिवस म्हणून मी खास तिला भेटायला weekend ला गेले. तिथे तिने मला अजून एक धक्का दिला, "माझं लग्न ठरलंय आणि final बैठकीसाठी आम्ही आज त्यांच्याकडे जातो आहोत" वगैरे वगैरे...... I was not prepared for this!!!!!........माझा job मिळाल्याचा , तिथं कामाचा पहिला आठवडा कसा गेला वगैरे वगैरे किती बोलायचं होतं मला...सगळा उत्साह गेला. घरी गेले आणि बराच विचार केला, मग वाटलं वाईट वाटण्यात काय अर्थ आहे? हे कधीतरी होणारच होतं. इतकी वर्षे आपण बोलत राहीलो आता तिच्याकडे बोलायला असेल and its my turn now to play good listener!!!! मी माझ्याबद्दल ची बडबड बंद नाही पण बरीच कमी केली त्यापुढच्या भेटींमध्ये..पण खरं सांगायचं तर भेटी अशा फारशा झाल्याच नाहीत तिच्या आणि माझ्या, तिचं लग्न ठरल्यापासून होईपर्यन्त! एक दोन प्रसंग सोडले तर तिला बोलण्यासाठी कधी माझी गरजच पडली नाही, लग्नाच्या आधी नाही आणि लग्ना नंतर गेल्या सहा वर्षात पण नाही. लग्नाच्या आधी तिने मला सांगितलं, खास त्याच्या जवळच्या मित्रांशी ओळख करून देण्यासाठी त्याने तिला एकदा नेले होते, तसेच काहीतरी, कधीतरी ती पण त्याच्याशी "ही माझी Best Friend" अशी ओळख करून देईल अशी माझी अपेक्षा होती. पण तसे काही झाले नाही. साखरपुड्याच्या वेळी तिच्या बाकी ब-याच मैत्रिणींबरोबर एकदा नाममात्र ओळख करून दिली. मला पुर्वी वाटायचं ती स्वत:बद्दल बोलत नाही कारण तिला माझं बोलणं ऐकण्यात जास्ती रस आहे, पण आता वाटतं तसं नसावं बहुतेक....माझ्या सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकणारे, "good listener" वाटणारे लोक माझं तेव्हाच आणि तितकंच ऐकतात जेव्हा त्यांच्याकडे वेळ असतो आणि समोरच्याला बोलू द्यायला त्यांची ना नसते. प्रत्यक्षात माझं बोलणं एका कानाने ऐकून दुस-या कानाने सोडून दिलेलं असतं. ती पण तशीच असावी बहुतेक!
सहा वर्षे.....सहा..........लग्नानंतर पुण्यात असून तिने एकदाही अजूनपर्यंत मला घरी बोलावलेलं नाही. तिच्या मुलीचे बारसे झाले, तिच्या दादाचे लग्न ठरले अशा गोष्टी तिच्या आईकडे मी येता जाता एखादी चक्कर टाकल्यावर कळल्या आहेत.
लग्न झालेय...पूर्ण जग बदलले आहे..adjust करायला लागत असेल ब-याच नवीन गोष्टींशी.....याचा "benifit of doubt" देऊन मी तरीही बराच contact ठेवला. तिचा मोबाइल नंबर घेतला, एक दोनदा तिच्या वाढदिवसाला, तिच्या मुलीच्या वाढदिवसाला, लग्नाच्या वाढदिवसाला फोन केला. मी फोन केला तर अगदी पुर्वीसारखी बोलणार..पण स्वत:हून सहा वर्षात एकदा ही फोन करायला जमू नये? इतका बिझी होऊ शकतो माणूस? मी अगदी शेवटचा प्रयत्न म्हणून तिचा email address घेतला फोन करून, तिला म्हटलं "बाई, तुला फोन करायला पण वेळ होत नाही, पण दिवसभर कॉम्प्युटर समोर असतेस....कधीतरी एखादी मेल कर"......मी तिला बरेच मेल पाठवले...माझे ब्लॉग्ज..माझे ट्रिप चे फोटो..काही "लिहीलेल्या" मेल्स......पण पहिल्या "hi" च्या मेल ला आलेला दोन ओळीचा रिप्लाय आणि त्यानंतर आलेला एक "forward"...मग परत सगळं बंद............ अजून किती आणि काय करायचं? लग्नानंतर आयुष्य बदलतं, वेळ मिळत नाही.....माझा या असल्या कारणांवर विश्वास नाही....ज्याला नातं टिकवायचंय....तो काहीही करून टिकवतो...ज्याला वेळ काढायचाय...तो कसाही काढतो...ज्याची मुळात इच्छाच नाही त्याच्याकडे पोतडी भरून कारणे असतात.
त्रास होतो...जेव्हा लोक काही नीट कारण न देता असं अनाकलनीय वागतात. गेली तोन वर्षे झाले, दररोज घरी जाताना लॉ कॉलेज रोड ने जाते. दररोज नळ स्टॉप च्या सिग्नल ला थांबते, बाजूला बघितलं की तिच्या आईचं घर दिसतं, कधी तरी काकू - काका, तिचा दादा...तिची वहिनी दिसते.....जखमेवर परत एक नवीन ओरखडा उठतो. आणि गोष्टी अशा का बदलल्या असा हताश पणे विचार करत मी गाडीचा वेग वाढवते.
असो....तसे तर मी पण हल्ली ठरवलंय आणि तसंच वागतेय ...जेव्हा तुमच्या एखादा भाग (शरीराचा असो वा मनाचा!) त्याचे काम करण्याच्या ऐवजी सदैव ठणकतच राहतो, कुठलंच औषध परीणाम करत नाही...तेव्हा ऑपरेशन करून तो भाग काढून टाकलेलाच बरा असतो. फक्त जखमा ब-या न होणे हा माझा (अव) गुण मला स्वत:ला माहीत आहे त्यामुळे ठणका बरा होता की भरून न येणारी जखम.... हे येणारा काळच सांगेल..... फ़क्त ठणका बरा होता हा निष्कर्ष कदाचित निघाला तरी....तोडून टाकलेला भाग परत जोडता येत नाही!
बहुदा माझ्या मनाला हिमोफेमिया झालाय........ शी शी शी....काय पण उपमा....... सायन्स ची असले म्हणून काय झालं.... "मनाचा होमोफेलिया"???? छे छे...कुठल्या तरी साहित्यिक उपमेचा विचार करायला पाहिजे.....हं......ही कशी वाटतेय....आम्ही अश्वत्थाम्याच्या वंशाचे.... अमरत्वाचे वरदानपण ज्यामुळे शाप वाटेल अशी चिरंतन जखम कपाळावर घेऊन फिरणारे!!!!.......
खीर
तिचे हात एक एक टाका सफाईदारपणे घालत होते. झरझर. एकसारखा. टपोरा. लवकरात लवकर तिला ही दुलई पुरी करून द्यायची होती. शक्य झाले तर आजच. त्या बदल्यात मिळणार्या शंभर रुपयात तिच्या जागोजागी फाटलेल्या संसारात निदान मीठ-मिरची-तेलाचे ठिगळ लागले असते. दोन्ही पोरींच्या तोंडात चार दिवस दोन घास पडले असते.
दिवसभर मान मोडून पाठीचा काटा पुरा ढिल्ला करून एकदाची दुलई पुरी झाली. जोरदार झटकून तिवर अजूनही लोचटासारखे चिकटलेले धागेदोरे तिने काढले. वरच्या तारेवर दुलई टाकून निरखून पाहू लागली. दुलई सुंदरच झालेली. मऊमऊ. निगुतीने टाचलेली. एकही ओळ वाकडी नाही का एकाही तुकड्याचा तोल ढळलेला. यावेळी रंगीबेरंगी तुकड्यातुकड्यातून तिने फुले-पाने, पक्षी, सूर्य, गुंफलेले. दुकानदार म्हणाला होता, थोडी कल्पकता दाखवा. खरंय रे बाबा तुझं, माल खपायला रोज नवीन काहीतरी हवेच. पण, उपाशीपोटी कल्पकता कशी सुचावी? डोळ्यापुढे फक्त डाळभात दिसत राहतो, त्याचं काय करावं..... पाणी पिऊन पिऊन पोट फुगतंय निसतं. अन्नाशिवाय काय बी सुचना झालंय. तरी कल्पकता दाखवायलाच हवी. नाहीतर हे कामही हातातून जाईल.
तिने मान झटकली, चटदिशी दुलईची घडी घालून पिशवीत अलगद ठेवली. पदर सावरला अन पायात टाचेपाशी झिजलेली चप्पल अडकवली. " शरे, येते गं मी लगेच माघारी. तोवर अभ्यास करा बरका. उगाच रिकाम्या पोटी एकमेकींशी झोंबू नका. पोटात आग फारच भडकली तर मोठा पेला भरून पाणी प्या गं." शरीचे, हो नाही उत्तर ऐकायच्या आतच ती वाटेलाही लागली. दुकान बंद व्हायची वेळ झालेली. आज पैसे मिळाले नाहीत तर उपाशीच झोपवावे लागेल लेकरांना.
धापा टाकत दुकानात शिरली. " किती उशीर केलास? आता मी बंदच करणार होतो. पाहू दे. हां.... बढिया! ती मेहता, दोन वेळा विचारून गेली आज. आता घरी जाता जाता देतो पोचवून. तिची लेक खूश होईल. हे घे शंभर रुपये. काय झाले? बरं, हे अजून दहा घे वरती. आणि जातांना दोन दुलयांचे कापड, दोरे, लागतील ते तुकडे घेऊन जा. चटचट हात चालव जरा. पोरींना घे की मदतीला. नीघ आता. " असे म्हणून दुकानदाराने नोटा अंगावर फेकल्या आणि दिलीपला दुलयांची कापडे काढायला सांगत तो गायबही झाला.
शंभरावर दहाची अजून एक नोट. तिला खरेच वाटेना. चार दिवसांची सोय तर झाली. लेकी भुकेल्या आहेत. बाजार उठायची वेळ झालीच आहे. संपता संपता गेलं की जरा भाव पाडून मिळतोय. बरेचदा रस्त्याच्या कडेला गिऱ्हाईकांच्या हातून पडलेले चांगले कांदे-बटाटे, वांगी अन थोडेसे दबलेले-मार लागलेले तमाटेही मिळून जातात. पण उशीर झाला पोचायला तर तिच्यासारखे कोणीतरी हात मारते. आज तसे होऊन चालणार नाही, मिळायला हवेच म्हणत तिने दिलिपकडून न बघता माल उचलला. बाकीचे उद्या येऊन पाहीन रे असे म्हणत ती रस्त्यालाही लागली. जड पिशवी काखोटीला मारून ती झरझर पाय उचलत होती. आज थोडा रवा, साखर आणि अर्धा लीटर दूध घेईन. शरीला, रव्याची खीर खूप आवडते. पोरीचे डोळे लकाकतात नुसते खिरीचे नाव काढले तरी. दहा रुपये जादा मिळालेत नं. आज खीर करायचीच. इतकुश्या माझ्या पोरी पण किती समज आहे त्यांना. कधी हट्ट करत नाहीत. जितकी जमेल तितकी मदत करतात बिचाऱ्या.
देवळाला वळसा घालून जाता जाता शंकराकडे न पाहताच तिने हात जोडले. प्रदक्षिणा घातली. एक क्षण टेकावे म्हणून खांबापाशी पाठीचा कणा खेटला. डोळे मिटले. " देवा, माझं मेलीचं राहू दे रे पण पोरींवर तरी दया कर. जास्त काही नाही निदान दिसाच दोन घास तरी पानात पडू देत म्हणजे भरून पावलं. कष्टाला मी डरत नाही रे. कामं मिळू देत म्हणजे रात्रीचा दीस करून निभावीन बघ. इतक्या मोठ्या जगाच्या खटल्यात आमच्यावर लक्ष ठेव रे बाबा." असे म्हणत पुन्हा पुन्हा नमस्कार करून ती बाजाराकडे निघाली.
बाजार जवळपास गुंडाळलाच होता. सराइतासारखी तिची नजर खाली पडलेल्या कांद्या-बटाट्यावर पडत होती. पिशवी फुगत होती. लसणाचे थोडेसे कुजलेले दोन गड्डे व लिंबेही मिळून गेली. आलं- मिरच्या, तमाटेही मिळाले. ती खूश झाली. बाजारातल्या देवीपाशी प्रसादाची नारळाची कवड होती. इकडे तिकडे पाहत देवीला नमस्कार करून अंगारा लावायचे निमित्त करून तिने ती कवड पटदिशी पिशवीत सारली. वाट्यावर लावलेली वांगी व तोंडली घासाघीस करून दोनाच्या भावात तीन वाटे तिने मिळवले.
मनोमन ती आनंदली. आज सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघितल्यालं..... अजून जवळपास सगळे पैसे जशेच्या तशे कनवटीला होते आणि तरीही पिशवी भरलेली. देवा, लय उपकार झाले बघ तुझे. असे म्हणत वाण्याकडे जाऊन तिने रवा, साखर घेतले. डेअरीतून अर्धा लीटर दूध घेऊन ती घराकडे निघाली. डोळ्यासमोर स्टोवर मोठ्या पातेल्यात शिजत असलेली खीर व पातेल्याकडे आशाळभूतासारखे डोळे लावून बसलेली शरी अन भुकेने कळवळलेली कुसुम दिसत होती. झोपडी दिसायला लागली तशी चालण्याचा वेग अजूनच वाढला. तोच, हाकारा ऐकू आला.
" पोरी, वाईच जरा थांब गं. दोन थेंब पाणी तरी घाल तोंडात." कण्हत कण्हत कोणी बोलत होते. तिने निरखून पाहिले तर कचऱ्याच्या कुंडीपाशी एक मुटकुळं पडलेलं. त्यातूनच कण्हण्याचा आवाज येत होता. ती जवळ गेली. म्हातारी पाय पोटाशी घेऊन कलंडली होती. गेल्या आठवड्यातच हिला कुठेतरी पाहिल्याचे तिला स्मरत होते. कुठे बरं? हां, त्या मोर का कायसे नाव असलेल्या मोठ्याश्या दुकानापाशी ही भीक मागत होती.
" म्हातारे, अशी इथे का गं लवंडलीस? असे म्हणत तिने म्हातारीला हालवले. अगागा, किती तापली आहेस गं. मरशील नव्ह का अशी तू. माझ्याशिवाय कोणी तुला दिसलं न्हाई व्हय हाकारायला. आधीच चुलीत खडखडाट तशात तुझी भर. काय करावं आता? तुला हितच टाकून गेले तर उद्या सरकारी गाडीतूनच जाशील हे नक्की. शिवाय ते पाप माझ्यामाथीच पडायचं. देवा, तुझ्या मनात तरी काय हाय बाबा? चल म्हातारे, ऊठ बरं. माझ्या आधाराने हळूहळू उभी राहा म्हणजे तुला माझ्या घरला घेऊन जाते. " म्हातारी हो नको म्हणण्याच्या पलीकडे गेलेली. तिला आधार देत, लळतलोंबत कशीबशी घरी आणली.
" शरे, अगं कांबंळ हंतर बिगीबिगी. आज्जी लय तापलीये. कुसे, ग्लासात पाणी भर आणि आज्जेला पाज. तोवर मी स्टोला काकडा लावते. पयला ’ चा ’ करते. लयी दिसांनी साखर आणि दूध घालून केलेला ’ चा ’ पिऊ सगळे. " असे म्हणत ती कामाला लागली. थोड्याच वेळात ’ चा ’ झाला. एकीकडे डाळतांदूळाची खिचडी व दुसरीकडे खिरीचे पातेले स्टोवर रटरटू लागले. झोपडीभर अन्नाचा दरवळ पसरला. शरी, कुसुम आणि आजीचे प्राण कंठाशी आलेले. आता लवकरच तोंडात घास पडणार हे सत्य अजूनही त्यांच्या गळी उतरत नव्हते. तोच, जरासा गोडमिट्ट दुधाळ गरम चा चार पेल्यांमध्ये तिने भरला अन लेकींच्या पुढे ठेवत आजीला बसते करून ती पाजू लागली. फुर्रर्रर्र..... फुर्रर्रर्र.... आवाज करत चौघीही मन लावून चा फुरकू लागल्या. पेले रिकामे झाले तशी खंगलेले चेहरे जरासे उजळले. आजीशी दोघी लेकी बडबडू लागल्या.
पेले धुऊन तिने पानं घेतली. पानात खिचडी, तिवर थोडासा खोबऱ्याचा चव आन वाडग्यात खीर वाढताना नवीन दुलईचे डिझाइन डोक्यात घुमू लागले. आज चौथा कोना भरला व्हता. हे ठिगळ वाईच भारी व्हतं खरं. खाणारं एक तोंड वाढवणारं. पण, जीवात अजून धुगधुगी आहे म्हटल्यावर कचऱ्यात कसं मरू द्यावं म्हातारीला. तिच्या लेकरांनी टाकली तिला म्हणून मीबी डोळे झाकायचे? नाय नाय. माझी माय असती तर राहिलीच असती नं माझ्यापाशी. पोरींनाही माया मिळल. व्हईल काहीतरी सोय. त्यो देव बसलाय नग का वरती, त्यानेच तर आज्जेला माझ्याकडे पाठवलीय. आता तोंड वाढवलंय तर जिम्मेवारी त्याचीच नव्हं का. उद्याचं उद्याला पाहू.
"चला गं पोरींनो, हे ताट आजीला द्या आधी आणि बसा आपापल्या ताटावर. " तिघींचे पटापट घास घेत चवीचवीने मिटक्या मारत हालणारे तोंड, आनंदाने लकाकणारे डोळे पाहून रिकाम्या पोटीच ती भरून पावली. जगातलं सारं सुख या दोन घासातच सामावलेलं. काही करून यांच्या तोंडात हे दोन घास मी घालेनच. असा स्वत:शीच करार करत डोळ्यात आलेले पाणी निपटून काढत ती म्हणू लागली, " शरे, अगं खीर घे की अजून..... उद्याला नग ठेवायला. आजची येळ प्वाट भरून जेवा गं सगळी. कायमच अर्धपोटी राहायच नसतं. कधीतरी तडस लागू दे की. मन आणि प्वाट तुडुंब भरू द्या. " असे म्हणत पोरी व आजीकडे पाहत आनंदाने तिने खिरीचा भुरका मारला.
द्यायचाच आहे तर असा एखादा वर दे माऊली..
"श्रीपाद.." आवाज ओळखीचा नव्हता. श्रीपादपंत डोळे चोळत उठून बसले. काळामिच्च अंधार. त्या अंधारात त्यांच्या समोर एक तेजस्वी आकृती उभी होती! ते काही बोलणार इतक्यात ती आकृतीच पुढे बोलू लागली,
"श्रीपाद, तू आयुष्यभर माझी नि:स्वार्थ सेवा करीत आला आहेस. तुझ्या या परार्थसिद्ध सेवेने मी प्रसन्न झाले आहे. माग, आज तुला हवा तो वर माग वत्सा!"
"माऊली! साक्षात श्री देवी माऊली! खरंच विश्वास बसत नाही!" म्हणत श्रीपादपंतांनी साष्टांग नमस्कार घातला. कृतकृत्य भाव त्यांच्या चेहर्यावर उमटले.
"आज तुझ्या दर्शनाने जन्माचे सार्थक झाले आहे माते. आता मला आणखी काही नको."
"आयुष्यभर स्वतःसाठी काही मागितलं नाहीस. सतत परोपकारासाठी झटत राहिलास. असा कसा रे तू निर्लोभी? सांग, तुझी एखादी इच्छा सांग पुत्रा."
"जीवनातलं सारं सुख तुझ्या कृपेने मला लाभलंय माऊली. मला आणखी काही नको. पण आज वर मागतोच. आज माझी माऊली माझ्यावर प्रसन्न झालीच आहे तर आज मागूनच घेतो! माते, प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही तुझी जात्रा भरते आहे. होतील पाचपन्नास डोकी गोळा. दोन तीन दिवस येतील एकत्र आणि जातील पुन्हा आपापल्या मार्गी परत! पोटापाण्यासाठी दूरदेशी गेलेली तुझीलेकरं अजूनही तुला विसरलेली नाहीत आणि मनोभावे एकत्र येऊन तुझी सेवा करीत आहेत हे पाहून ऊर दाटून येतो. पण पूर्वीसारखी जात्रा रंगत मात्र नाही. कुठेतरी काहीतरी उरतंय खरं. आजही पटांगणात माटव उभा राहतो पण तो उभारायला तिसरेच कामगार असतात. एखादा बाबलो गावकार वगैरे तंबाकू मळत लक्ष ठेवून असतो त्यांच्यावर. पण या माझ्या गावची पोरं पुन्हा एकदा या समोरच्या पटांगणात साफसफाई करत अंग धुळीने माखून घेताना पाह्यचं आहे गं मला. माझी ही लाल माती त्यांना बिलगू पाहतेय! तिला आहे अगं ओढ माणसांची. पण मोजक्याच काही पायांचा स्पर्श होतो हल्ली तिला. माझ्या पोरांनीच, सर्व गावकर्यांनीच एकत्र येऊन तुझ्या पटांगणात माटव उभारलेला पाह्यचाय मला आणि त्या माटवाला श्रीफळ बांधून सर्वांसाठी गार्हाणं करून आशीर्वाद मागताना, सर्वांच्या "व्हय म्हाराजा"च्या गजरात मलाही हळूच माझा आवाज मिसळायचाय. द्यायचाच आहे तर असा एखादा वर दे गं आई..
माऊली, आज तू या महागड्या साड्यांनी दागिन्यांनी नटतेस, बघून फार बरं वाटतं मनाला. पण या चार महागड्या साड्या नि दागिन्यांपेक्षा, प्रत्येकाने आपापल्या ऐपतीनुसार दिलेल्या साडीखणांनी तुला नटवायचा आनंद कैकपटीने श्रेष्ठ होता. देवळातली ही दानपेटी आज व्यवस्थित भरते खरी पण या पैशाच्या राशीपेक्षा तुझ्यासमोर पडणार्या त्या खणानारळातांदळाची रासच अधिक जवळची वाटायची. गावातल्या प्रत्येक घरातल्या लेकीसुना येऊन तुझी ओटी भरताना पाहून तुला 'माऊली' का म्हटलं जातं याचा प्रत्यय येत असे. गजरे, फळे, उदबत्त्या यांचा तर खच पडलेला असे पण हल्ली का कोण जाणे निस्तेच त्या पेटीत पैसे टाकून जातात गं लोक आणि पदरी दानाचं पुण्य पाडून घेतल्याचं मनाचं समाधान करून घेतात. पूर्वी दिवसभर लोक येत नि तुझं दर्शन घेऊन जात. तेही कसं सहकुटुंब सहपरिवार. त्या सगळ्या लोकांचे नवस सांगता सांगता मानकरी थकून जात असत दिवसभर. पण दिवसभराचा तो थकवा त्यांचा उत्साह तसूभरदेखील कमी करत नसे! सगळे रात्री दशावताराची वेळ झाली परत त्याच उत्साहाने गोळा होत अंगणात! या उत्साहाला सांप्रत ओहोटी लागली आहे गं. आधीसारखे जात्रा म्हणजे घरातलंच एखादं कार्य असल्यासारखे हल्ली लोक गोळा होत नाहीत. पाचपन्नास डोकी येतात, रीतीप्रमाणे तुझी पूजा करतात आणि प्रसाद घेऊन निघून जातात. त्या पूजेला आता केवळ रिवाजाचा चेहरा उरलाय असं सारखं वाटत राहतं. पण या गावातल्या प्रत्येकाने स्वतःच्या घरचं कार्य असल्यासारखं येऊन उत्साहाने जात्रेत सामील झालेलं पाहायचंय. गावातल्या प्रत्येक सौभाग्यवतीने आपणहून येऊन तुझी खणानारळाने ओटी भरलेली पाहायचीय गं! असा एखादा वर देशील का गं माते?
अजूनही प्रथेप्रमाणे पालखी निघते पण चार गल्ल्यांतून फिरून सावकाश, शांतपणे परत येते. न्हावण घेऊन सगळे आपापल्या कामी जायला होतात रवाना पण त्या ताम्हनातला तो शाळिग्रामसुद्धा निरुत्साही भासतो अगं हल्ली. पुन्हा पूर्वीसारखाच गाजावाजा करत, आरोळ्या ठोकत तुझी पालखी तासनतास गावात मिरवायचीय आणि न्हावणासाठी पुढे पुढे करणार्या पोराटोरांना दामटवायचंय! भजनीमेळेसुद्धा हल्ली असेच अधूनमधून दिसतात कधीतरी. बाजापेटी आणि टाळमृदुंगाच्या तालावर आमचे कदमबुवा नि मिराशीबुवा रंगवायचे तशा भजनांच्या डब्बलबारी रंगत नाहीत हल्ली! रात्ररात्र भजनांत न्हाऊन निघायची. हल्ली लोक ऐकतात भजनं पण ते घरात शीडी नि क्यासेटी लावून. अन देवळाकडेही माटवात ते 'पीकर' मात्र हमखास लागतात. ते लागले जाल्या कळतं गावात जात्रा भरली आहे म्हणून. देवळाकडून थेट खालच्या आळीतल्या घरांकडे ऐकू येणारे भजनांचे स्वर पुन्हा एकदा कानांत भरून घ्यायचे आहेत माते. आमच्या कदम, मिराशी, जोशीबुवांच्या बाजापेटीतलं अन् त्यांच्या त्या टाळमृदुंगाच्या गजरातलं माधुर्य या 'पीकरा'वर वाजणार्या क्यासेटीतल्या न शीडीतल्या गाण्यांत शोधून सापडत नाही अगं. पुन्हा त्या मधुर भजनांच्या माध्यमातून तुझी स्तवनं गायची आहेत, पुन्हा रात्रभर भजनं गात या सभामंडपात सार्या गावकर्यांसोबत जागरणं करायची आहेत. असा एखादा वर देशील का गं माऊली?
नाही म्हणायला दशावतार तेवढे होतात अजूनही जोमाने! पण जमलेली डोकी खेळ संपल्यावर मुकाटपणे निघून जातात. खेळाला मनमुराद दाद देतात, टाळ्या पिटतात, मनसोक्त हसतातही पण पूर्वीसारखा गोंधळ मात्र होत नाही. खरंच तो गोंधळच जास्त प्रिय होता. संकासुराला टाळ्या शिट्ट्यांनी डोक्यावर घेणार्या त्या जनसागरात, राजा यायचा झाला की सुन्न शांतता पसरत असे! तिकडे नाटकात देवांचं नि राक्षसांचं युद्ध झालं की इकडे प्रेक्षकांतही पोरंटोरं आपल्या खेळण्यातल्या तलवारी घेऊन युद्ध सुरू करीत! मग त्यांच्या आईबापाची त्यांना आवरताना होणारी धांदल, त्यांची ती कसरत पाहून आणखी टाळ्या, आणखी हशा! या सगळ्याने दशावताराची रंगत आणखी वाढायची! या दशावतारांतल्या हनुमानास पाहूनसुद्धा आदराने वंदन करणारा आणि पार्वतीला मंचाच्या मागं विडी ओढताना पाहून अचंबित होऊन आरडाओरडा करणारा तो लहानगा श्रीपाद आता तुझ्याकडे त्या दिवसांतली तीच जात्रा मागतोय गं माऊली. हे सगळं हल्ली कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय! जात्रा भरते, पण एखाद्या न रंगवलेल्या चित्राप्रमाणे अपुरी भासते! तीत तेच पूर्वीचे जुने हसरे, उत्साहाचे, मौजमजेचे रंग भरून देशील का गं? द्यायचाच असला तर असा एखादा वर दे माऊली!
पूर्वीच्या जात्रेला केवळ आनंदाचा उत्सव इतकंच स्वरूप होतं. आज या जात्रेचा बाजार केलाय गं. कुणीतरी सरपंच किंवा इतर कुणी राजकारणी वगैरे येतो. तुझ्यासमोर उभा राहून पूजा करतो. नतमस्तक होऊन तुझ्याकडे काय मागतो ते तूच जाणसी. मग तो जमलेल्या गावकर्यांसमोर भाषणं करतो, त्यांना आपल्या मधाळ वाणीने, आश्वासनांनी भुलवतो. आपल्या वाटेला लागतो. निवडणुकांत भरभरून मतं घेतो! आणि गायब होतो. असे कित्येक सरपंच आले आणि गेले पण गावातला रस्ता दर पावसाळ्यात खचतोच. या माझ्या भाबड्या गावकर्यांची तुझ्याएवढीच त्या राजकारण्यांवरदेखील श्रद्धा आहे आणि अजूनही ती अढळ आहे. एकोप्याच्या या आनंदोत्सवाचं बाजारात कधी परिवर्तन झालं ते आठवत नाही. जात्रेला या विदुषकांनी असं बाजाराचं स्वरूप दिलेलं पाहवत नाही गं आई. यांच्या ढोल ताशांच्या कर्णकर्कश गदारोळापेक्षा आमच्या पिपाणीचे नि पळसाच्या शिट्ट्यांचे स्वर किती गोड होते! ते ऐकायला कान आतुर झालेत. द्यायचा तर असा एखादा वर दे गं माऊली! द्यायचा तर असा एखादा वर दे!"
श्रीपादपंतांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. सदर्याच्या बाहीने डोळे टिपून त्यांनी वर पाहिलं तो उजाडू लागलं होतं. सुभद्राकाकू, श्रीपादरावांच्या सौभाग्यवती, दाराकडे उभ्या होत्या नि कुणाला तरी निरोप देत होत्या. आत येऊन त्या म्हणाल्या,
"चला आता, आटपा भराभर. बाबी आला होता सरपंचांचा निरोप घेऊन. आज जात्रेचा माटव उभा करायचा मुहूर्त काढून हवाय त्यांना, कामगारांना काण्ट्रॅक द्यायचंय म्हणे नि देवळात आज सरपंचांची पूजाही आहे. आवरा बघू भराभर.."
"हो. आवरतो गं माऊली" म्हणत त्यांनी सुभद्राकाकूंनाच एक नमस्कार केला. आणि न्हाणीकडे निघाले. सुभद्राकाकू अचंबित होऊन स्वतःशीच पुटपुटल्या "काय हे सुचतंय यांना भल्या पहाटे? बायकोला नमस्कार करताहेत. लेकराला सांभाळून घे गं माऊली!" म्हणत त्यांनी श्री देवी माऊलीस नमस्कार केला!
***** हे लिखाण प्रातिनिधिक नसून संपूर्ण काल्पनिक लिखाण आहे. आजही कोकणातल्या बर्याच गावांतील जात्रांमध्ये पूर्वीसारखंच अखंड उत्साहाचं वातावरण असतं. मात्र काही ठिकाणी वर नमूद केल्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे. तेव्हा सगळ्याच गावच्या जात्रांचे आनंदोत्सवाचे स्वरूप टिकान उरो दे रे म्हाराजा! (म्हणा - व्हंय म्हाराजा!) *****
'लिहावे नेटके' - भाषा, संस्कृती, अनुभूती यांचा समृध्द ठेवा
भाषिक संस्कार/व्यवहार आणि त्यांचा एकंदर संस्कृती, अनुभूती वगैरेंवर होणारा दूरगामी परिणाम यांविषयीची ही चर्चा वाचून नुकत्याच हाती आलेल्या 'लिहावे नेटके' या पुस्तकसंचाची आठवण झाली. ज्याला एका भाषेमध्ये विविध प्रकारची अभिव्यक्ती समजते आणि करता येते त्याला या क्रिया इतर भाषांमध्येही करायला जमतात. शिवाय विविध ज्ञानशाखांमधली आपली जाण विस्तारायची असेल आणि त्या विषयांमध्ये नीट व्यक्त व्हायचं असेल, तर भाषा हेच प्रमुख साधन असतं. त्यामुळे भाषेवर किमान प्रभुत्व असणं आवश्यक असतं. पण आताच्या शिक्षणपध्दतीत हे पुरेसं होताना दिसत नाही. त्यामुळे कोणत्याच भाषेत लिहिताना नेमकेपणा, नेटकेपणा नसलेल्या पिढ्या आपल्यासमोर मोठ्या होत आहेत. यावर उपाय म्हणून माधुरी पुरंदरे यांनी मराठी शिकणार्या आणि शिकवणार्यांसाठी 'लिहावे नेटके' ही पुस्तकं निर्माण केलेली आहेत. पाचव्या-सहाव्या इयत्तेपासून वापरता येतील असे भाषेचे पाठ आणि स्वाध्याय असं या पुस्तकांचं स्वरूप थोडक्यात सांगता येईल. मराठी शिकणार्या परभाषिकांनाही ती मदत करतील. अगदी मराठी मातृभाषा असणार्या, पण चार वाक्यं लिहायला सायास पडणार्या कुणालाही ही पुस्तकं म्हणजे वरदानच वाटावीत.
मुलांसाठी स्वाध्याय-पाठ असं म्हटल्यावर जे नीरस, कंटाळवाणं चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं असेल, तशी मात्र ही पुस्तकं अजिबात नाहीत. पुस्तक वापरताना मुलांना मजा यावी म्हणून सर्वत्र दृश्यघटकांचा सढळ वापर केलेला आहे. सरावासाठी वापरलेल्या वेगवेगळ्या वाक्यांच्या आणि उतार्यांच्या अनुषंगानं चित्रं, छायाचित्रं यांची सर्वत्र रेलचेल आहे. उदा: लिहिताना होणार्या चुका दाखवताना 'मातृ-कृपा' शब्द चुकीच्या पध्दतीनं लिहिलेल्या खर्या पाटीचं छायाचित्र दिसतं. ज्यांनी यापूर्वी माधुरी पुरंदर्यांची 'वाचू आनंदे', 'आमची शाळा', 'राधाचं घर' वगैरे पुस्तकं पाहिली असतील त्यांना याचा अंदाज येऊ शकेल. संपूर्ण रंगीत असलेला 'लिहावे नेटके' हा पुस्तकसंच सुरेख चित्रं आणि सजावट यांनी पानोपानी भरलेला आहे. चित्रं स्वतः माधुरी पुरंदरे यांनीच काढलेली आहेत. बरीचशी छायाचित्रं संदेश भंडारे या ('तमाशा', 'वारी' अशा कामांसाठी गाजलेल्या) गुणी छायाचित्रकाराची आहेत. भाषेच्या स्वाध्यायपाठांमध्ये छायाचित्रं? आणि संपूर्ण रंगीत, देखणी वगैरे पुस्तकं? हे (नसते थेर) कशासाठी? असा (खास मराठी) प्रश्न पडला असेल तर तो या पुस्तकांच्या जवळजवळ क्रांतिकारक म्हणता येईल अशा स्वरुपाशी संबंधित आहे.
पुस्तकांच्या मुखपॄष्ठापासूनच त्यांचं वेगळेपण जाणवू लागतं. निरनिराळ्या पध्दतीचं लिखाण दाखवणारी छायाचित्रं त्यावर दिसतात. त्यात मातीत अक्षरं गिरवणारी लहान मुलं दिसतात, वस्तूंचे भाव लिहिलेला फलक दिसतो, संगणकावर टंकलेली अक्षरं दिसतात आणि ब्रेलमध्ये टोचलेला मजकूरही दिसतो. मोबाईलवरचा एस्.एम्.एस., भांड्यांवर नावं लिहिणं, हातांवर गोंदवून घेणं अशा लिखाणाच्या वेगवेगळ्या प्रकारांचं मुखपृष्ठावर दर्शन होतं. त्यावरून पुस्तकाच्या आवाक्याचा अंदाज येतो. पहिलं पान उलगडताच शब्दकोशातल्या 'भाषे'च्या व्याख्या दिसतात आणि विविध विशेषणं वापरून केलेलं भाषेचं (खरंतर भाषाविश्वाचंच) वर्णन दिसतं. मासल्यादाखल हे पाहा - लडिवाळ भाषा, चावट भाषा, क्लिष्ट भाषा, टपोरी भाषा, निर्वाणीची भाषा, गुद्द्यांची भाषा. भाषेच्या सर्वव्यापीपणाचं आणि विविधतेचं दर्शन यातून होतं.
भाषेच्या वेगवेगळ्या अंगांना अनुसरून पुस्तकातल्या धड्यांची रचना केलेली आहे. यामध्ये कालानुरुप भाषेच्या स्वरुपामध्ये झालेल्या बदलांची दखल घेतलेली दिसते. उदा: वर्णमालेच्या प्रकरणात जुन्या बाराखडीऐवजी 'अॅ', 'ऑ'सकटची 'चौदा'खडी वापरलेली आहे. निव्वळ घोकण्यापेक्षा समजून-उमजून शिकण्यावर सर्वत्र भर आहे. उदा: वर्णमाला लक्षात का ठेवायची? तर शब्दकोश, नावांची यादी, संदर्भसूची अशा अनेक ठिकाणी शब्द अकारविल्हे लावलेले असतात; वर्णमाला पाठ नसली तर त्यात हवी ती गोष्ट सापडणार नाही, हे इथं सांगितलं जातं.
मुलांच्या शब्दसंग्रहात आपोआप वाढ होईल अशीही योजना यात आहे. उदा. 'क्रियापदापासून बनलेली नामं' याविषयीच्या मजकुरात बोलणे, लिहिणे यांपासून बनलेल्या परिचित नामांशिवाय बोलवा, लिखाई, लिहिणावळ, लिखावट असे अनवट शब्दही आहेत. कांडप, गाळप, सांगावा अशा शब्दांचा इथे परिचय होतो आणि देयक, आवक-जावक अशा सरकारी शब्दांचाही परिचय होतो. मुलांच्या सहज आकलनासाठी कालानुरुप रुळलेले इंग्रजी शब्द स्वाध्यायांमध्ये वापरलेले आहेत. जसे - सॉस, मोबाईल, इंटरनेट. याबरोबरच नवीन घडलेल्या मराठी शब्दांची ओळख मुलांना होईल अशा पध्दतीनं तेही वापरलेले आहेत. उदा: ‘संकेतस्थळ’.
याशिवाय जाताजाता मुलांचा अनेक गोष्टींशी परिचय होईल अशी रीत पुस्तकाची व्याप्ती आणि उपयुक्तता अधिकच वाढवते. उदा: शब्द अकारविल्हे लावण्याच्या स्वाध्यायामध्ये पुस्तकं नेताना घसरून पडलेल्या मुलाचा प्रसंग आहे. घसरलेल्या मुलाच्या हातातली इतस्ततः विखुरलेली पुस्तकं एका चित्रात दाखवली आहेत. तर स्वाध्याय सोडवण्यासाठी उभी करून नीट ठेवलेल्या पुस्तकांचं चित्र आहे. त्यावरच दिलेल्या जागेत पुस्तकांची नावं लिहायची आहेत. विखुरलेल्या पुस्तकांत 'झेंडूची फुले', 'ऋतुचक्र', 'व्यक्ती आणि वल्ली', 'तराळ-अंतराळ' अशी सगळी खर्या पुस्तकांची नावं आहेत. स्वाध्याय सोडवताना या शब्दांशी आणि पुस्तकांशी मुलांची आपोआपच तोंडओळख होते.
‘वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र’ या संस्थेचा पुस्तकनिर्मितीत सहभाग आहे. पुस्तकांचा वापर ग्रामीण, शहरी आणि अगदी परदेशस्थ मराठी मंडळींनाही करता यावा याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. त्यात वाडा संस्कृती दिसते तसंच मॅक्डोनाल्ड, शॉपिंग मॉलही दिसतात. यात पैठणीचा पारंपरिक माग दिसतो तशा सरपण डोक्यावर वाहून नेणार्या कष्टकरी बायका, पाण्याचे हंडे डोक्यावर ठेवून पाणी भरायला चाललेल्या बायकाही भेटतात. आजच्या तरुणाईच्या सवयीचे 'सही', 'डेंजर' असे शब्द इथे येतात; तसेच चैत्रगौरीचं हळदीकुंकू, दिवेलागण, अंगण सारवणे, पु.लं., बिनाका गीतमाला अशा जुन्या गोष्टीही येतात. मुलं पुस्तकं वापरत असताना एक व्यापक मराठी संस्कृतीविश्व त्यांना त्यामुळे खुलं होईल. अपरिचित गोष्टींविषयी मुलांच्या शंकांना वाव देऊन आणि न्याय देऊन त्यांचं विश्व समृध्द करण्याची थोडी जबाबदारी मात्र शिक्षक-पालकांना त्यासाठी उचलावी लागेल.
पुस्तकांत निव्वळ व्याकरण नाही तर भाषेच्या स्वरुपांचं आणि वापरांचं वैविध्यही उलगडून दाखवलेलं आहे. उदाहरणार्थः वृत्तपत्रात मथळे लिहायची भाषा वेगळी असते आणि वृत्तांकनाचा मजकूर लिहायची भाषा वेगळी असते. गोष्टीतल्या वर्णनाची भाषा त्याहून वेगळी असते आणि दोन व्यक्तींमधला संवाद लिहिताना वेगळी भाषा वापरावी लागते. लेखी-बोली अशा अनेक प्रकारच्या भाषांमधला फरक मुलांना जाणवून देणारे पाठ आणि सरावासाठीचे स्वाध्याय पुस्तकात आहेत. इतकंच काय, पोलिसांच्या नोंदीची भाषा आणि तरुणाईची ‘व्रात्य’भाषा असे भाषेचे अनेक नमुने यात पाहायला मिळतात.
भाषेच्या वापरात आजकाल अतिशय विसविशीतपणा आलेला आहे. त्यामुळे होणार्या अनेक गफलती आता आपल्या इतक्या अंगवळणी पडलेल्या आहेत, की नक्की बरोबर काय आणि चूक काय हेच अनेकदा कळेनासं होतं. अशा गफलती आणि त्या होण्यामागची कारणं जाणून घेऊन त्या अनुषंगानंही पाठांची रचना केलेली आहे.
अशा सर्व मराठीविषयक मुद्द्यांच्या व्यतिरिक्त जाणवणारा पुस्तकांचा एक विशेष गुणधर्म म्हणजे त्यांतून मुलांना खुलं केलेलं मराठीपलीकडचं समृध्द अनुभवविश्व. अमिताभ बच्चन, राज कपूरपासून एम. एस. सुब्बलक्ष्मी, अकिरा कुरोसावा अशा अनेकांचा जाताजाता परिचय होईल अशी सरावपाठांची आणि स्वाध्यायांची मांडणी आहे. एस्किमोचं इग्लू, आफ्रिकन पोषाख, सरड्याप्रमाणे रंग बदलणारे मासे अशा जगभरातल्या अनेक गोष्टींचा खजिनाच इथे मांडलेला आहे. हे सर्व भाषेच्या अभ्यासात बेमालूम मिसळलेलं आहे. अपरिचित संस्कृती, निसर्गसृष्टी यांतलं वैविध्य हे अशा रीतीनं आपोआप मुलांच्या समोर येतं; त्यामुळे सरावपाठही सुरस आणि रोचक होतात.
भाषेच्या माध्यमातून नकळत संस्कारही होतील याची काळजी घेतलेली दिसते. उदा: भूकंपाबद्दलच्या उतार्यात बायकांची जिद्द दिसते आणि बरोबर कष्टकरी बायकांची छायाचित्रं दिसतात. भूतकाळाविषयी सांगताना ग्रीक ऑलिंपिक क्रीडास्पर्धांपासून कोट-टोपी-धोतरातल्या पुण्यातल्या क्रिकेट संघाच्या फोटोपर्यंत अनेक गोष्टी दाखवत, त्यांच्याविषयी सांगत, जाताजाता हेही सांगितलेलं आहे की आज आपण आणि आपलं जग कशामुळे असं आहे हे कळण्यासाठी भूतकाळाकडे जावं लागतं.
पुस्तकाची मांडणीही मुलांना आवडेल आणि पटकन समजेल अशी आहे. उदा: एखादा स्वाध्याय जर थोडा कठीण असेल तर तिथे एक चिमणी दाखवलेली आहे, तर त्याहून अधिक कठीण स्वाध्यायापाशी एक बेडूक उभा असतो. पुष्कळसे स्वाध्यायसुध्दा कोडी, खेळ अशा प्रकारचे आहेत. उदा. प्रश्न-उत्तरं बनवण्याचा स्वाध्याय म्हणजे भोंडल्याची खिरापत ओळखण्याचा खेळ आहे. यामुळे अभ्यास करायला लागत असूनही तो अजिबातच कंटाळवाणा होत नाही.
पुस्तक रंजक होण्याचं आणखी एक कारण म्हणजे अनेक ठिकाणी दिसणारा मिश्किलपणा. उदा. आज्ञार्थी रचना सांगताना ‘हमखास यशस्वी’ कवितेची पाककृती दिली आहे. तिची मजा कळायला ती मुळातूनच वाचायला हवी. विशेषणांच्या प्रकरणात 'असडीक' तांदूळ यांसारख्या अनवट विशेषणांची ओळख होतेच, पण त्यासाठी वापरलेल्या उतार्यातल्या व्यक्तीला हा शब्द माहीत नसल्यामुळे तिनं त्याऐवजी वापरलेली 'कव्हर न काढलेला' तांदूळ ही रचना वाचून गंमतही वाटते.
स्वाध्याय सोडवण्यासाठी, इतर टिपणं वगैरे नोंदवण्यासाठी भरपूर मोकळ्या जागा सोडलेल्या आहेत. ‘नोंदी शक्यतो पेन्सिलनंच कर; म्हणजे नंतर त्या खोडून टाकता येतील आणि मित्रमैत्रिणींना किंवा भावंडांना देखील तुझं पुस्तक वापरता येईल’, अशी प्रेमळ सूचनासुध्दा आहे.
लहान मुलांच्या देखण्या पुस्तकांसाठी प्रसिध्द असलेल्या 'ज्योत्स्ना प्रकाशन' या संस्थेनं ही पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. प्रत्यक्ष सरावपाठांचे दोन भाग आणि एक उत्तरपुस्तिका असा हा संच आहे. पानांवर पुरेशी मोकळी जागा सोडण्यासाठी आणि मोठ्या अक्षरांचा मजकूर मावण्यासाठी पुस्तकांचा आकार नेहमीपेक्षा किंचित मोठा आहे. तरीही पुस्तकसंचाची ४०० रुपये ही किंमत अगदीच वाजवी वाटते. त्यासाठी 'सर रतन टाटा ट्रस्ट'चं आर्थिक पाठबळ प्रकल्पाला लाभलेलं आहे.
एकंदरीत, मराठीविषयी अभिमान आणि आस्था असणार्या कुणीही संग्रही ठेवावीत अशीच ही पुस्तकं आहेत. मराठीच्या नावानं गळे काढणार्या किंवा आपल्या राजकारणासाठी तिला वापरणार्या कुणाहीपेक्षा या पुस्तकांमुळे मराठीचा अधिक लाभ झाला आहे आणि मराठीची मान अधिक उंचावली गेली आहे.
पुस्तकांविषयी लेखिकेचं मनोगत इथे वाचता येईल.
शुभदा चौकर यांनी 'लोकसत्ता'त लिहिलेला पुस्तक-परिचय इथे वाचता येईल.
फुलं(आणि)पाखरं
पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने (खुप दिवसांनंतर) माझा म्यान केलेला कॅमेरा बाहेर काढला आणि माझ्या मुलाला घेऊन शुटआउटसाठी बाहेर पडलो. त्याने पण काही फोटो काढलेले आहेत केके(कृष्णकांत) असे लिहीले आहे. आत्ता सातवित आहे पण माझ्या बरोबर राहुन अॅगल मारायचा/लावायचा सेन्स चांगलाच डेव्हलप होतोय
. साईट वर गेल्यावर शेकडो फुल पाखर पिंगा घालत होती.त्या पैकी काही निवडक फुल(आणि)पाखर आपल्या आस्वादा साठी सादर. 
फोटोंची मजा व्यवस्थीत लुअटण्यासाठी एफ११ दाबुन मग फोटो बघा
१

२

३

४

५

६

फुल (कॅमे-याने) टिपत-टिपत पुढे आल्यवर ही अशी झाडांना लगडलेली फुलपाखर दिसली आणि जिव सुखावला
७

८

९

१० बाय केके

११ बाय केके

१२

१३ बाय केके

१४

१५ बाय केके

१६

१७

१८ बाय केके

१९

२०

२१ बाय केके

२२

२३

२४

२५

२६

२७

घरी आल्यावर या सरड्याचे फोटो बघुन केके म्हणतो कसा " बाबा त्याने बघा मी.बिन सारखे आप्ले प्रायव्हेट पार्ट झाकुन ठेवलेत" 
२८

कॅमेरा = निकॉन डि ९०
लेन्स = निकॉन प्राईम लेन्स १०५
अपेक्षा!!!!, समज्-गैरसमज
काका(मनातल्या मनात): माझ्या ओळखीमुळे त्याला नोकरी मिळाली, मग मला दोन चार वेळा गिफ्ट घेऊन भेटायला नको यायला त्याने?
पुतण्या: किती वेळ/वर्ष उपकाराचे ओझे वाहु? आणि अपेक्षा तरी किती ठेवावी त्याने?
मित्र १: चायला, ह्याचं लोन पास होत नव्हतं, मी शब्द टाकला तेव्हा पास झालं. आधी चार वेळा यायचा, फोन करायचा आता नाव काढत नाही.... हरामखोर साला..........
मित्र २: आता माझं काय चाल्लय मलाच नाहित, उपकार म्हणुन आता काय पाय धुवुन तिर्थ घेऊ का? काय कळत नाही ब्वॉ..
मित्र१: "चॅट" वर हॅलो...
मित्र२: "ऑफलाईन"
मित्र१: माजला साला, चार पैसे मिळाले, नोकरी मिळाली तर लगेच ऑफलाईन, गरज पडु दे.. मग बघतो.
मित्र१: फोनवर - अरे कुठे आहेस लेका..
मित्र२: अरे मीटींग मधे आहे, नंतर फोन करतो... कॉल ड्रॉप... परत फोन येत नाही..
मित्र१: याचा फोन परत आला तरी उचलणार नाही.. अगदी पक्कं.. साला समजतो काय स्वतःला?
भाऊ१: अरे, बहिणिला घेऊन येशील का? मी जरा बिझी आहे.
भाऊ२: पैसे वाचवतोय, आता एवढा पण वेळ नाही का, आणि ही महामाया काय १ किमी चालत नाही येऊ शकत?
मॅनेजरः हा साला कधीच काम करत नाही, काय करावं ह्याचं?...
नोकरदारः मी राब राब राबतो, पण माझं काम कधीच ऊठुन दिसत नाही, हा मॅनजर बायसड् आहे पक्का..
प्रेषक१: माझ्या धाग्यावर ठराविक लोकं कधीच प्रतिसाद देत नाहीत. का?
प्रतिसादक: हा धागा जर माझ्या मित्राने टाकला असता तर कदाचित शंभरी नक्कीच गाठली असती, जाऊ देत. असे अनेक धागे निघतात, जातात, हा पण तोच एक.. 
=)) =)) =))
आपला,
(प्रामाणिक)मराठमोळा.
या रब्बा !! एक नवचित्रपटसंगीत अभ्यासिका
डिसक्लेमर : आमचा हा लेख वाचुन एखाद्याने कपाळावर हात मारुन 'या रब्बा' म्हणल्यास आम्ही जबाबदार नाही.
संगीताविषयी आम्हाला लहानपासुन प्रंचड प्रेम आणी आदर आहे, ते प्रेम भाषेच्या,प्रांताच्या,जातीच्या आधारवर विभागलेले नाही,मग ती संगीता जाधव असो वा जोशी,यच्च.संगीता असो वा कंदास्वामी नागार्जुना सिंथेल रेड्डी असो...अरे हे काय बोलतोय..सॉरी-सॉरी ..बाकी संगीता जाधव होती मात्र खंमग, म्हणजे कस सगळ जागच्या जागी,बांधा,नाक-डोळे,कांती,केशसंभार वगैरै कस एकदम बघत रहाव अस, एकदा तिला गाठुन (हो हो गाठुनच ,सध्या बया युरोपात 'जिलब्या' तळते असे एकुन आहे.) विचारायल हव की तुझ्या पत्रिकेत एकुण किती ग्रह आहेत ते ? म्हणजे बायकोला सांगुन त्या त्या ग्रहांची शांती करून घ्यायला,पण नको , स्साल ! ऊद्या टीव्हीवर 'मेरे काले घने लंबे बाल !! शनी ग्रह-शांती का कमाल !! किंवा 'कांती का निखार !! किसने लाई है ये बहार !! ये तो गुरु ग्रह-शांती की धार !! अश्या प्रकारच्या जाहिराती यायला सुरुवात व्हायची.
ईथे आधीच सध्याचे टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रम पाहुन ,ईकड,बँगलोरच्या रूम वर टीव्ही घ्यावा की नाही असा प्रश्न विचाराधीन आहे,पुण्यात आम्ही चांगला फ्लॅट-स्क्रीनचा टीव्ही घेऊन स्वताच्या व माझ्या घरातील समस्त पुरुषवर्गावर पायावर धोंडा (धोंडा कसला !! आख्खा 'गोवर्धन'च म्हणा ना !!) पाडुन घेतला आहे.आमच्या घरातील टीव्हीचा ऊपयोग केवळ आमचे खिसे रिकामे करण्यासाठी होतो,आमच्या घरातील समस्त स्त्री-वर्ग संध्यासमयी ७ ते ११ या' प्राईम टाईमच्या वेळात अतिशय व्यस्त असतात,(अश्या वेळेस 'कमर्शियल ब्रेक' नावाचा प्रकार किती बरा वाटतो नाही),साड्यांचे पॅटर्न,पडद्याचे रंग, ड्रेस मटेरियल्स,दागिन्यांचे पॅटर्न वगैरै-वगैरै ,मग काय ? गेला आमच्या गरीब पाकिटाचा बळी!!
असो...
तर काय सांगत होतो ? हां !! संगीताविषयीच आमच लहानपासुनच प्रेम !!
आमच्या प्रेमाची सुरवात होते, ती मी ,तिशली 'ढ' मध्ये असताना, 'अमिताब'च्या 'आखीरी रास्ता'तल्या एका गाण्यापासुन ,त्यातल एक गाण 'वो जा रही है मेरी हिरोईन' मधील एक कडवं होत ..'ती : याद करो तुम फिल्मोंमै क्या-क्या सीन दिखाते है , तो : लेटके बाते करते है ,दौडके गाना गाते है ' यातील 'दौडके गाना गाते है' ही ओळ आम्ही वर्गात ,शिरा ताणुन-ताणुन म्हणत असु कारण आमच्या वर्गात एक सुमित्रा दोडके नावाची 'वजनदार'मुलगी होती. तसेच 'सांवतसरांचा' हिन्दी'चा तास व्हायच्या आधी 'तुम्हे गींतोमें ढा दुंगा,सावन को आने दो ' ही ओळीच मोठमोठ्याने लांबलचक पारायण करायचो. असो ते आमच बालपण होतं बालपणात विरलं,पुढे निसर्ग-नियमाने अंगाने मोठा झाल्यावर(आम्ही फक्त अंगानेच मोठे झालो आहोत असे काही मिपाकरांचे मत आहे .)आम्ही संगीतावर नितांत प्रेम करायला लागलो..पण मुद्दा आहे आजकालच्या हिन्दी चित्रपट संगीताविषयी..
हल्लीच संगीत 'टेक्नो' असत म्हणतात.म्हणजे संगीत आणी टेक्नॉलॉजीचा संगम , हाच संगम कधी-कधी सुसह्य होतो तर कधी-कधी कर्ण-कर्कश्श !! टेक्नो संगीताचा जन्म नेमका कधी,कसे कुठे झाला ते नक्की सांगता येणार नाही पण त्याचा उपयोग होण्याआधी आम्हाला 'मोहम्मद अजीज'ने गाणे गाऊन कानठाळल्याचे आठवते,रफीच्या आवाजात कोमलता आणी पौरुष्याच कमालीच मिश्रण होतं म्हणतात, त्यापैंकी ह्या गायकाने फक्त 'पौरुष्य' ऊचलले असावे बहुतेक ,कारण मला तो रोमॅन्टिक गाणे गाताणा देखील हिरोईनची गंचाडी पकडुन ,तिला बाहु-बेडकुळ्या दाखवत किंवा कचा-कचा दातओठ खात गाणे गातोय की काय असे वाटायचे.तर,आता हेच पहा ना'कामरान अकमलने गायलेल्या,'जन्नत चित्रपटातील 'चार दिनों का प्यार' च रिमिक्स वर्जन,सुसह्य असलं तरी , सहाव्या वेळेस मी ते एकु शकत नाही, याऊलट वेक-अप सिड या चित्रपटातलं, कविता सेठ नी गायीलेल्या 'ओ रे मनवा तु तो बांवरा है' ह्या ओळी मला भावुन जातातच, शिवाय कधीही एकु शकतो.
पण टेक्नोचा खरा उपयोग सुरु झाला ते रिमीक्सच्या जमान्यात, गाण्याची शक्ल कशी का असेना , तरुण पिढीला तो प्रकारच एकुण भावला म्हणा.तस रिमिक्स,डिजे-गिरी ही अतिशय अवघड कला आहे(ईट जस्ट नॉट अ गेम,वॉर ऑफ द डिजे एकदा अटेन्ड केलय मी). असो त्यातली किशोरच्या गाण्याला ,'कह दु तुम्हे'ला, रिमीक्स मारताना, डिजे अकीलला भयानक त्रास झाला असणार, कारण एखाद मिडीयम स्लो रोमॅन्टिक गाणं,'डान्स नंबर मध्ये बदलायच म्हणजे कमालच आहे.त्याच सुमारास सरेल गाणे ही येत असत.ऊदाहरणार्थ ' हॅरीसन फोर्डच्या 'विटनेस' चित्रपटावरुन कॉपी केलेला " जॉन अब्राहम च्या ' एका फडतुस 'पाप' नावाच्या चित्रपटातील (ईथे मी चित्रपटाला फडतुस म्हणतोय बर का ! जॉन ला नाही ,लगेच नंग्या तलवारी ऊपसुन,आमच्या खव चा खफ बनवायच कारण नाही.) 'लागी तुमसे मनकी लगन'ला जो काही सुर दिलाय'राहत फतेह खाननी की, गाण टेक्नो असुन देखील 'रिफ्रेशिंग' वाटत.त्याच सुमारास आलेल्या 'तुम तो ठहरे परदेसी ' ह्या अल्ताफ राजाच्या गीत-संग्रहानी धुमाकुळ घातला होता,अर्थात त्यातल्या एका गाण्यामधली शेरो-बाजी मला आवडली होती ब्वा !!
'तुम्हारे घर को दरवाजा है'
'लेकीन तुम्हे खतरे का अंदाजा नहीं है'
"हमें खतरे का अंदाजा है लेकीन'
'हमारे घर को दरवाजा नहीं है '
आँ!! आयला काय शेर आहे का काय ? अश्लीलतेच्या मर्यादा चांगल्याच गुंडाळुन परिणाम साधला गेला होता.मला भावला ईतंराना भावेलच असे नाही..
पण मला आजकालच्या हिन्दी गाण्यातली एक गोष्ट भावत नाही ती म्हणजे हिन्दीत घुसविलेले पंजाबी शब्द (आधी शाळेत पाली-हिन्दी-मराठी-ईग्रंजी शिका,चेन्नईला गेलो की तमीळ शिका,जर्मनीत होतो तर जर्मन शिका,कर्नाटकात आहे तर कन्नडा शिका ,आणी आता पंजाबी शिका ,शिका शिका,डोक्याचा पार 'वागळे' झालाय.), आधीचे गीतकार 'रब्बा' हा शब्द वापरायचे,हा शब्द 'डब्बा' ह्या शब्दाशी किती जवळीक साधतो ना !!काही गीतकार 'वैरिंया वै " वापरायचे,या एका शब्दाचे विमान आजही माझ्या डोक्यावरून जातं.काय अर्थ घ्यायचा त्या शब्दाचा, तो जन्मोजन्मीचा वैरी झालाय का ? (मेनुं हा ही शब्द ध्यानात गेण्यासारखा आहे, मला एकदा हॉटेलात एका सरदारने'मेनुं देना' म्हटल्यावर मी त्याला 'क्या दुं' असे विचारले होते.तो स्वताच हसुन-हसुन पागल झाला.)पण पुर्णं गाण्यात पंजाबी वापरायला सुरुवात केली ते दलेर मेहंदी ह्या गायकाने , मला त्याच्या प्रकाशित झालेल्या एका गाण्यात'तुनक तुनक धुन,तुनक तुनक धुन, ता ता ता' ह्या तीन-चार शब्दापैंकी ईतर काही ही आजवर कधीच कळलेले नाही, पुढे ही कळणार नाही (त्यातला एक शब्द तुंबेवारी तार !!पण माझ्यासारखेच बरेच जण असतील)पण ह्याच गाण्यावर गणपतीत' बेधुंद' होऊन नाचलो आहे.
त्यानंतर तर मेल्या पंजाब्यांनी तर ऊत आणला.त्यातलेच एक नाव म्हणजे 'जाझी बी'.केशसंभार आणी दाढी ठेवण्याची स्टाईल करताना स्वताच्याच चेहर्यावर किती अत्याचार करावेत याच जाझी बी एक ऊत्तम ऊदाहरण आहे(त्यापेक्षा ते स्वताच्या चेहर्याचे बोकड करून घेणारे एमबीएचे स्टडस बरे !!) तर, हा बाबाजी एका गाण्यात सुरवात करताना म्हणतो, 'जिन्ने मेरा दिल लुटीया,जिन्ने मेनुं मार सुटीया' अरे बाबा, मार सुटीया म्हणजे काय ? ती तुला धरून मारत सुटली आहे काय ? आणी जर ती खरोखरच मारत सुटली असे तर तिने योग्य तेच केले असे मी म्हणेन , हा असा अवतार केल्यावर दुसरं काय करणार ?

आताच्या संगीतात तर गीतकार काय लिहीतो तेच कळत नाही. आता हेच बघा ना शाहीद कपुर ,भदाड्या करिना बरोबर नाचताना म्हणतो'जग सारा-जग सारा निखर गया, जब प्यार हवादिंविच बिखर गया' त्यापुढे मौजा ही मौजा पर्यंत गीतकार नेमकं काय म्हणतो ? तेच कळत नाही.असो..पण काल परवा एक गाणं एकल 'मेरे नाल-मेरे नाल चल सोणीये, मेनु सोहनीं लगती है तेरी 'गल' सोणीये'.. काय्य्य ? नेमक काय आवडत म्हणालास ? आणी नाल म्हणजे कुट रं बाबा, नाल्यात घेऊन चाललायस का ? काय प्रकार आहे हा . तिच गत 'लव्ह आजकल'च्या 'गड्डी ते हस बोल वे नी जिन्द सारी डोल वे !!' काय संक्रात आहे ? गड्डी ते हस ? नेमक कुठ हसायच ? ईथेच आमच गाडं अडल तर पुढील लिरिक्सची एकायची काय मजा ? खर तर गाण्यात घेतलला टेक्नोमुळे,गाण एक खतरनाक 'डान्स नंबर' बनु शकत होतं, अगदी'स्टेप-अप'या ईग्रंजी चित्रपटातल्या 'डान्स नंबर' सारख,पण ह्या गाण्यात सैफ-दिपीकाला बंद पडलेल्या स्कूटरला किका मारताना पाहुन भर थेटरात एकटाच हसत होतो.
ह्याच वाटचालीत शिरलेला एक प्राणी म्हणजे मिख्खा(दलेरच्या बापाच्या सप्तपुत्रांपैंकींच शेंडेफळ),एक तर करकटनी वर्तुळ काढल्या टाईपची चेहर्याची ठेवण,एखाद्या वारुळावरुन लाखो मुंगळे खाली येत असावेत असा केश-संभार,कट्ट्यावर, बिल टेबलावर आल्यावर,नेमक पाकिट विसरुन आल्यामुळे,एखाद्याच्या चेहर्यावर जसा भाव येतो तसा पडेल चेहरा,एखाद्यानी पार्श्वभागावर सुई टोचल्यावर आपल्या तोंडुन जसा आवाज निघेल तसा आवाज(राखीचा मुका घेतल्यापासुन तर अजुन अतुलनीय झालाय.) असलेल्या ह्या महाभागाला 'गायक' म्हणणं म्हणजे भारतीय अभिजात संगीताचा,रागदारीचा अपमान करणेच होईल. नुकतीच एका किशोरच्या गाण्याची, 'अपनी तो ऐसै-तैसै' ची ,मध्ये-मध्ये 'ओ धन्नो-ओ धन्नो' म्हणुन वाट लावली. धन्य ते संगीत आणी धन्य ते संगीतकार !!

जाता जाता : लेखात ऊल्लिखलेल्या लिंका गुगलवर स्वताच शोधायच्या आहेत, उगा नंदनोबा वा सहजोबांना त्रास द्यायचा नाही, लेख थोडीसी गम्मत जम्मत म्हणुन लिहीलेला आहे,भाषेचा अपमान करण्याचा हेतु नाही.
आजकालच्या मिपाच्या पध्दतीनुसार,
सुहास
vedevaakadelikhaana@gamil.com
सध्या मुक्काम कर्नाटक,बंगळुर येथे (चांगल जेवण बनवतो म्हणुन घरी यायच काही कारण नाही,गॅसची एकुलती एक शेगडी आमच्यापुरतीच मर्यादित आहे.)

