टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
प्रतिसाद
मायमराठी!
प्रेषक प्रमोद देव ( मंगळ, ०७/०१/२००८ - २३:१२) .मिसळपाव अथवा मराठी संकेतस्थळावर मराठीतून लेखन करताना तिथल्या अंगभूत सोयीमुळे कोणतीच अडचण येत नाही. मात्र ऑर्कुट अथवा कोणत्याही संवादकात(मेसेंजर) लिहिताना बहुसंख्य लोक रोमन लिपीचा वापर करून मराठी लिहितात;थोडक्यात मिंग्लीशमध्ये संभाषण होत असते.
माझी अशी धारणा आहे की निदान दोन मराठी भाषकांनी जिथे जिथे शक्य होईल तिथे मराठीत आणि लेखी संभाषणात देवनागरीतून संवाद साधावा. त्यासाठी मेतकूटवर आम्ही काही जणांनी मायमराठी हा समूह स्थापन केलेला आहे. आपण तिथे जरूर भेट द्या आणि मराठीचा प्रचार आणि प्रसार करा. आपल्या सूचना,शंका-कुशंका जर काही असतील तर जरूर विचारा. त्यावर विचार केला जाईल. शक्य त्या सर्व शंकांची उत्तरे दिली जातील .
या.मराठीचा झेंडा त्रिखंडात फडकवू या!
धमुचे केळवण (जेव्हा पुरी नि भाजी - )
प्रेषक अमोल केळकर ( गुरू, ०६/२६/२००८ - १३:२८) .
मनस्वी ताईंनी 'धमाल मुलासाठी 'केलेला केळवणाचा बेत पाहुन तोंडाला पाणी सुटले आणी हे काव्य ही स्फुरले
चालः जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली ,झाली फुले कळ्यांची, झाडे भरास आली !!
गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - यशवंत देव
स्वर - अरुण दाते
'
------------------------------------------------------------------------
जेव्हा पुरी नि भाजी ताटात ही पडाली !
जेवुनी हेच सारे ढेकर मस्त आली. !!
ताटातल्या अन्नांचे मणिहार मांडलेले !
भोवती काकडीचे सॅलेड सजलेले !
खुशीत पाहुण्यांची पंगतही बसली ! जेवुनी हेच सारे ढेकर मस्त आली. !!
आमटीतल्या शेंगाना कोवळा स्पर्श होता!
वाटीतल्या रसाला केसर रंग होता !
आ़जीच्या ताटातली बेसन वडी मिळाली ! जेवुनी हेच सारे ढेकर मस्त आली. !!
नसतेच भुक जेव्हा, असते शांत सारे
वासाचा गंध येता पोटात काव कावे
ओथंबला तुपानी मेतकुटभात भारी ! जेवुनी हेच सारे ढेकर मस्त आली. !!
अवांतर - कैवल्या माझ्यातर्फे हे कवितारुपी केळवण गोड मानुन घे
काबूल ब्युटी स्कूल... डेबोरा रॉड्रिग्ज.
प्रेषक प्राजु ( रवी, ०६/२२/२००८ - १९:२७) .काबूल ब्युटी स्कूल , एका अमेरिकन स्त्रीने बुरख्या आडून घेतलेला शोध.
लेखिका : डेबोरा रॉड्रिग्ज.
अनुवाद : उषा तांबे.
प्रकाशक : कॉनसेप्ट बुक्स, पुणे.
मूल्य : १९५ रू.
मंडळी, काबूल ब्यूटी स्कूल हे पुस्तक नुकतंच माझ्या वाचनात आलं. मला मिळालं, आणि सहज चाळता चाळता मी ते झपाटल्यासारखं ४-५ दिवसांत वाचून काढलं. अफगाणिस्तानातल्या स्त्रियांच्यावर बरंच वाचलं आणि ऐकलं होतं. एस्केप फ्रॉम तालिबान या आणि अशा पुस्तकातून अफगाणी स्त्रीचं आयुष्य किती खडतर आहे हे थोडं समजलं होतं. पण काबूल ब्यूटी... या पुस्तकातून ९/११ नंतर अमेरिकेने बॉम्ब हल्ले केल्यानंतर, तालिबानी राजवट उलथून टाकल्या नंतरही तिथे एक स्त्री होऊन जगणं म्हणजे शाप असण्यासारखं आहे हे पदोपदी जाणवतं. पुस्तकाचा काळ २००२ नंतरचा आहे. म्हणजे नुकत्यात घडलेल्या घटनांची लेखिका साक्षिदार आहे.
थोडंसं लेखिकेबद्दल .. डेबोरा उर्फ डेबी, अमेरिकेमध्ये मिशिगन या राज्यात राहणारी. आई ब्युटीशियन म्हणून घरच्याच पार्लरमध्ये आईला मदत्र करता करता स्वतः उत्तम हेअर ड्रेसर बनली. पहिल्या लग्नाच्या अपयशानंतर, दुसर्या पतीशी भांडत रखड्त चाललेला संसार करत पार्लर चालवणारी..९/११ च्या दुर्घटने पूर्वी 'केअर फॉर ऑल फाऊंडेशन' या संस्थेच्या वतीने आपत्कालीन आणि दुर्घटनाकालीन मदतीचं प्रशिक्षण घेतलेलं होतं. त्यामुळे ९/११ नंतर या संस्थेनं अफगाणिस्तानात मदत कार्यासाठी पाठवलेल्या पहिल्या टिममध्ये, दुसर्या पतीकडून सुटका करून घेण्याच्या उद्देशाने, लेखिकेने स्वतःची वर्णी लावून घेतली. ग्रुपलिडरने ओळख करून देताना हेअर ड्रेसर अशी ओळख करून देताना तिथल्या परदेशी लोकांच्या चेहर्यावर अतिशय आनंद पसरला असे लेखिका लिहिते. कारण तिथे मदत कार्यासाठी आल्यापासून त्यांना चांगले पार्लर मिळाले नव्हते. हळू हळू डेबी कडे भरपूर स्त्रीया येऊ लागल्या त्यात अफगाणी स्त्रियांची संख्याही खूप होती. तिथे येणार्या स्त्रियांकडून त्यांच्यावर होणार्या अत्याचाराबद्दल, त्यांच्या परावलंबनाबद्दल समजू लागले. आणि त्यातून 'आपण ब्युटीस्कूल चालू करून इथल्या स्त्रीयांना स्वावलंबी बनवायचे या उद्देशाने लेखिकेने स्कूल चालू केले. त्यासाठी अमेरिकेतल्या कोणकोणत्या कॉस्मेटीक्स कंपन्यांनी मदत केली ... त्यांनी पाठवलेले कॉस्मेटीक्स चे बॉक्सेस अफगाण पर्यंत नेण्यासाठी काय दिव्य करावी लागली, त्यातच दुसर्या नवर्याने दिलेला त्रास.. त्यानंतर झालेला घटस्फोट..ह्यासगळ्याबरोबरच मुलांना आपल्या आईकडे सोडून येताना काळजात झालेली कालवाकालव.. याचं वर्णन या पुस्तकांत पहायला मिळतं.
काबूल मध्ये डेबीला भेटलेली पहिली मैत्रीण म्हणजे रोशना.. १९-२० वर्षीय रोशना आपल्या आईच्या वयाच्या डेबीशी अतिशय मित्रत्वाने वागते. पुस्तकाची सुरूवातच रोशनाच्या लग्नाच्या प्रसंगाने होते. तिच्या लग्नातल्या नृत्याचं वर्णन करताना लेखिका म्हणते, "ज्या तर्हेचा नाच इथे चाललेला असतो त्याची मी स्वप्नात्सुद्धा कल्पना केली नसती. या बायका एरवी फारशा घराबाहेर पडत नाहीत. पडल्याच तर नखशिखांत झाकलेल्या असतात. इथं मात्र त्या जो नाच करताहेत त्याला केवळ अश्लिल असंच म्हणावं लागेल - काबुली पद्धतीचा अश्लिल नाच. त्या सगळ्या अंगाला झतके देतात, पाठ वाकवतात...पाठीमागे , बाजूला, डोक्यावर हात असे हलवतात की, जणू काही प्रियकराला कुरवाळत आहेत....पुरूषांच्या हॉलमध्येही अशाच प्रकारचा नाच चालू असतो... मी तो नाच बघू शकत नाही."
त्यानंतर ब्यूटीस्कूलच्या माध्यमातू डेबीशी संपर्कात आलेल्या, बहार, बसीरा , टोपेकाई, नाहीदा, शाझ.. अशा स्त्रीयांची कहाणी आपल्याला समजू लागते आणि त्यावर कळस होतो हमा या १४ वर्षीय मुलीचं डेबीच्या देखत एका वेश्येमध्ये झालेलं रूपांतर वाचताना. डेबीच्या अटोकाट प्रयत्नांना आलेलं अपयश वाचताना.. मन खिन्न होतं. डेबीच्या अफगाणी नवर्याची तिला या स्कूलच्या उभारणीमध्ये मिळणारी साथ सुखाऊन जाते. तो सौदीमध्ये राहिलेला बराच सुधारीत विचारांचा अफगाणी आहे. .. त्याच्या मदतीमुळेच ती स्कूलचे काम करू शकली असे डेबी नमूद करते. स्कूलच्या सत्रांसाठी पैसा उभा करताना कोणकोणती दिव्यं पार करावि लागली .. तिथल्या रस्त्यांवरून वावरताना लोकांचे आलेले अनुभव.. तिथले दुकानदार, तिथला नोकरवर्ग, सरकारी कामकाज, पोलिस या सगळ्यांचे अनुभव वाचायला मिळतात. सगळ्यात शेवटी तिचा अफगाणी सासरा सौदीहून् तिच्याकडे येतो आणि तिच्याही नकळत तिला आपलंस करतो .. डेबीने याचं वर्णन खूप छान केलं आहे. सध्या डेबी तिच्या या अफगाणी नवर्यासोबत काबूल मध्ये राहते आहे आणि काबूल ब्यूटीस्कूल, ओऍसिस सलून.. यांचे काम जोरात आणि झोक्कात करते आहे.
स्त्रीबद्दल आदर असलेल्या कोणालाही विचार करायला लावेल अशीच आहे ही कादंबरी/ पुस्तक.. .काबूल ब्यूटी स्कूल...
-प्राजु.
रात्री सवास - थायलंड सफर (अंतिम)
प्रेषक ॐकार ( शनी, ०६/२१/२००८ - १५:१४) .सायं सवास पासून पुढे...
थायलंडमध्ये खाओ याई नॅशनल पार्कला गेलो होतो. पावसाळ्यात खरं तर इथे भेट द्यायला हवी पण इतर वेळेसही भेट द्यायला हरकत नाही. इथे रहायचीही व्यवस्था आहे. तंबूंपासून अगदी हवेशीर बंगल्यांची सोय आहे, पण महिन-दोन महिने आधीच नोंदणी करावी लागते. बुकींग फुल्ल असल्याने माझा कार्यक्रम एका दिवसात आटोपता घ्यायला लागला. त्यामुळे नाईट सफारीचा आनंद घेता आला नाही. धबधबे, जंगलवाटा, अगदी रस्त्यांवर फिरणारी हरणंही हमखास भेटतात इथे.
काही चित्रे:
या राष्ट्रीय उद्यानानजीकच जमिनीखाली तयार झालेले एक निसर्गनिर्मित बुद्धाचे देऊळ आहे. चुनखडकावर काही प्रक्रिया होऊन निसर्गतःच तयार झालेली अमूर्त शिल्पकृती इथे पहायला मिळतात-
काहीठिकाणी तर ह्या भिंती अर्धपारदर्शी आहेतः
याचसोबत खरेदीसाठी जतुजा ( थाई उच्चार : जाः तुक् जा:) मार्केटला चक्कर टाकावी. बँकॉकमधला जणू आठवडाबाजार! तब्बल २० हजारच्या आसपास दुकाने असणार्या या बाजारात बर्याच गोष्टी मिळतात. भाव करायला तुम्हाला थाई अंक, संख्या यांची थोडीफार ओळख असायला हवी. किंवा मग एखादा थाई मित्र अथवा मैत्रिण सोबत असेल तर चांगले.
समिंदरावर जायचे असेल तर चा-आम, फुकेत ला जावे. सोबत नाईट लाईफ अनुभवायची असल्यास पट्टाया! पर्यटकांच्या रेट्यामुळे हल्ली पट्टाया गजबजलेले असते तरी त्याचे आकर्षण परदेशातील लोकांनाच, थाई लोक मात्र त्यापेक्षा निवांत आणि चांगल्या समुद्रकिनारी जाणं पसंत करतात.
थायलंडमधील आणखी काही प्रकाशचित्रे त्यात सहभागी असणार्या थाई व्यक्तींची अनुमती नसल्याने देऊ शकलो नसलो तरी या सुस्वभावी लोकांनी केलेलं आदरातिथ्य मात्र कायम लक्षात राहील. भारताबाहेर आपली जमीन, आपलं आकाश आणि आपली माणसं वाटावीत अस थायलंडचं आश्वासक चित्र मनात आहे. जमल्यास थायलंडची सफर नक्की करून या.
या लेखांचा शेवट काही चित्रफितींनी करतो.
रटरटते चिकनः
लोटी तयार करणार्या थाई महिलेची हातोटी:
फ्लोटिंग मार्केटमध्ये मिळणारा गोड पदार्थ नावेत बसून बनवताना:
बँकॉकच्या रस्त्यावर नाचणारी पोरं टोरं:
निद्रिस्थ बुद्धराजः
रात्री सवास !(good night!)
डोळे हे जुलमी गडे...
प्रेषक प्राजु ( शनी, ०६/२१/२००८ - १२:१४) .नमस्कार मंडळी,
शिर्षकावरून असं वाटेल की, मी डोळे या विषयावर काही लिहिणार आहे. तसं पाहिलं तर ते थोडं फार खरंही आहे. तिच्या / त्याच्या प्रेमळ डोळ्यांवर आजपर्यंत अनेक कवींनी कवनं रचली, गझला लिहिल्या, शेर लिहिले. निसर्गानं प्रत्येक माणसाला डोळे देताना रंगनिर्मिती कोठून केली असेल हा प्रश्न मला नेहमीच पडतो. काळे भोर डोळे, भुरे डोळे, पिंगट डोळे, निळसर डोळे, हिरवट डोळे, राखडी छटा असलेले डोळे.. असे कितीतरी प्रकारचे डोळे आपण पाहतो. डोळ्यावरून मनातील भावना लगेच कळतात असं म्हणतात. काही डोळे शांत वाटतात, काही पाणिदार, काही प्रेमळ , काही उथळ, काही खट्याळ, काही भोचक.. काही गंभिर.... तिरळे असतील डोळे तर त्यांना कर्जत कसारा, पन्हाळा-ज्योतीबा किंवा जम्मू-कन्याकुमारी.. अशा प्रकारची लेबल्स सुद्धा लावली गेली. पण हे नक्की की माणसाच्या व्यक्तिमत्वातला एक असामान्य आणि अविभाज्य घटक म्हणजे डोळे. हे झालं माणसांच्या डोळ्यांबद्दल.
प्राण्यांत म्हणजे जनावरांत, एका म्हशीचे डोळे घारे होते ... मला ती त्यांच्यातली ऐश्वर्या रायच वाटली. मनांत म्हंटले हिच्या मागे किती अभिषेक, सलमान आणि विवेक (ओबेरॉय) लागले असतील कोण जाणे?? पण म्हशी या जमाती बद्दल माझं एक सर्वसाधारण मत असं आहे की, डोळ्यांवरून त्या निर्बुद्ध दिसतात. म्हणजे असं की, कुत्रा त्याच्या डोळ्यांवरून चिडका आहे की, प्रेमळ आहे हे कळू शकते. त्यावरून आपण त्याच्या किती जवळ अथवा लांब जायचे हे ठरवू शकतो. बैलाचे डोळे जवळून बघण्याचा संबंध कधी नाही आला. गाय सुद्धा बर्याच वेळेला प्रेमळ भेटली. डुक्कर या प्राण्याला डोळे असतात यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. कारण ते डुक्कर कितीही मोठं असलं तरी ते घाणीत लोळत असताना त्याचे डोळे कधी दिसतच नाहीत आणि घाणीत न लोळणारं डुक्कर मी कधी पाहिलं नाही. बकरी, शेळ्या यांचे डोळे काळे, पिवळट असतात. त्यांच्या डोळ्यात विलक्षण कारूण्य दिसतं मला. शेळीचं पिल्लू असलं तर अत्यंत गोजिरवाण्या त्याच्या डोळ्यांत थोडि भिती थोडासा अवखळपणा दिसतो. ... पण म्हैस.. छे!! तिच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे म्हणजे नक्की गोत्यात(की गोठ्यात??)येणे. मी एकदा कॉलेजला स्कूटीवरून जात असताना, रस्त्याच्या उजव्या बाजूकडून ६-७ म्हशी येताना दिसल्या. मी जरा जपूनच चालवू लागले.. पण उजव्या बाजूने जात होत्या त्या म्हशी त्यामुळे भिती नव्हती. आणि अचानक त्यांच्यापैकी एकीच्या मनांत काय आलं कोण जाणे.. संपूर्ण रस्ता ओलांडून ती एका ट्रकला आडवी आली आणि माझ्या पुढच्या एका सायकलस्वाराला धडकली.. तो पडला.. तशीच सरळ मलाही येऊन धडकणार हे उमजून मी पटकन स्कूटीवरून उतरण्याच्या बेतात असतानाच तिने मलाही खाली पाडलं आणि तशीच ती पुढे जाऊन एका रिक्शाला धडकली. पाठीमागून तिचा मालक पळत आला आणि तिने बाकी कोणाला आडवं करायच्या आत त्याने तिला धरून नेलं. हे असं असतं.. म्हशीचा मूड काय आहे हे तिच्या डोळ्यांत अजिबात दिसत नाही. म्हणून म्हशी डोळ्यांवरून तरी निर्बुद्धच दिसतात.
गोंडस दिसणारा ससा, त्याचे लाल चुटुक डोळे.. त्याच्या डोळ्यांमध्ये भिती आणि कुतुहल दिसतं. आपल्या जवळ आलेली माणसं नक्की आपल्याला का हात लावताहेत याचं कुतुहल आणि आपल्याला मारणार तर नाहीत ना.. ही भिती. कुत्र्याच्या डोळ्यांमधे इतक्या प्रकारचे भाव उमटत असतात की मीही कधी कधी हवालदिल होते. आपलं आवडतं माणूस जवळ आलं की, अतिशय प्रेमळ भाव दिसतात त्याच्या डोळ्यांत. कोणी अनोळखी असेल तर राग असतो.. माझ्या कुत्र्याच्या डोळ्यांमध्ये मी राग पाहीला तो डॉक्टर लोकांसाठी. मग तो जनावरांचा डॉक्टर असो वा माणसांचा. घरातील कोणी आजारी असेल आणि डॉक्टर आले की, आमचं कुत्र ते डॉक्टर जाईपर्यंत त्यांच्या कडे रागाने बघत समोर बसून रहायचं. आणि इंजेक्शन देताना चुकुन "आईगं!!" किंवा तत्सम वेदनादायक आवाज झाला तर डॉक्टरचं काही खरं नाही मग. हरणाच्या डोळ्यांबद्दल काय बोलावं. अत्यंत रेखीव, निर्मळ, निरागस आणि नाजूक डोळे ते. एखाद्या सुंदर डोळ्यांच्या मुलीला मृगनयनी म्हणतात ते बहुतेक याच साठी.
आता हा लेख लिहिण्याचा खरा खटाटोप होता .... ते मांजर या प्राण्याच्या डोळ्यांबद्दल. मांजराचे डोळे. ....काय नसतं हो त्या डोळ्यांमध्ये??? सर्वात देखणेपणा लाभलेला प्राणी आहे हा. ३-४ दिवसांचं पिलू सुद्धा डोळे मोठे करून टुकुटुकु पहात असतं तेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये किती कुतुहल असतं! मांजर या प्राण्याचा लहानपणापासून खूप जास्ती संबंध आला त्यामुळे असेल कदाचित, पण मांजराच्या डोळ्यांतले भाव मी नीट ओळखू शकते. लडिकपणे कागदच्या बोळ्याशी, रिबिनशी, शू-लेसशी खेळणारं मांजर पाहिलं तर त्याचे डोळे नेहमीच अवखळ, अल्लड, खट्याळ वाटतात मला. चिडलेलं मांजर, त्याच्या डोळ्यांतली बाहुली एकदम बरिक होते आणि डोळे रागीट होतात.. . शांत बसलेलं मांजर डोळ्यांमध्ये गरीब भाव घेऊन बसतं.. .. बागमध्ये हिंडणारं मांजर, इकडे तिकडे वास घेत.. अलगद चालत असतं .. तेव्हाचे त्याचे डोळे म्हणजे सतत काहीतरी शोध घेणार्या शास्त्रज्ञासारखे वाटतात. मांजराच्या डोळ्यांचे रंग तरी किती... पिवळ्या रंगाचे .. हिरवट रंगाचे, निळे.. काळे, लाल... दगडी रंगाचे... कितीतरी रंगाच्या डोळ्यांची मांजरं मी आतापर्यंत पाहीली. पण त्या सगळ्या मांजरांमध्ये एक गोष्ट होती ती म्हणजे त्यांचे सगळ्यांचे दोन्ही डोळे.... एक सराखे होते... म्हणजे.. एक डोळा दुसर्या सारखा होता. पण नुकत्यात पाहिलेली मांजरी आणि तिचं पिलू दोघांचेही डोळे वेगवेगळे होते. म्हणजे आईचा एक डोळा निळा आणि एक डोळा हिरवा ... आणि पिलाचाही एक डोळा हिरवा आणि दुसरा निळा.... पण तरिही दोघं अतिशय देखणी आहेत... विश्वास नाही बसत.. हे फोटोच पहा त्या माय लेकरांचे... खूप खटाटोप करावा लागला त्या दोघांचे त्यांच्या त्या डोळ्यांसकट फोटो मिळवण्यासाठी. पहा.. आहे ना निसर्गाची किमया!!!!
- प्राजु.
माय्-लेकरं दोघं....

पिलू : काय नजर आहे.. !

शांत डोळ्यांची आई..

आईची एक मुद्रा

पिल्लाची भावमुद्रा

आईची नजर...रोखलेली..

पिल्लू..

लूज कंट्रोल...दीर्घांक ... एक परीक्षण / अनुभव
प्रेषक भडकमकर मास्तर ( बुध, ०६/१८/२००८ - १७:२५) .लूज कंट्रोल...
२००५ च्या सुदर्शन रंगमंचावर महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित दीर्घांक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारं नाटक..
लेखक : हेमंत ढोमे
दिग्दर्शक : निपुण धर्माधिकारी
कलाकार : अमेय वाघ,हेमंत ढोमे,निपुण धर्माधिकारी, सुषमा देशपांडे
निर्मिती : समन्वय पुणे.
या नाटकाचा दीर्घांक मी जुलै २००६ मध्ये पाहिला. त्याचे नंतर दोन अंकी नाटक आले, पण ते जास्त काळ टिकले नाही. ते नाटक मी पाहिले नाही.मी आत्ता बोलणार आहे ते दीर्घांकाविषयी..
नाटकाचे कथासूत्र...
तीन कॉलेज मधले मित्र. वय वर्षे १९ - २०... त्यातल्या एकाचे आईवडील बाहेरगावी गेलेले असल्याने धिंगाणा करायला उरलेले दोघे मित्र त्याच्या घरी राहायला आले आहेत. नाटक सुरू होताना एक जण खिडकीतून समोरच्या बिल्डिंगमधलं तरूण जोडपं प्रेमचेष्टा करताना दिसतंय का ते पाहण्याच्या प्रयत्नात... पण ते जोडपं शॉपिंगला बाहेर गेलंय, परत आल्यावर लक्ष ठेवू, वगैरे संवाद होतो... नंतर संवादाची गाडी एकूणच आसपासची वाढती कामुक आव्हाने, सिनेमा नट्या, जगाच्या मानाने आपण किती मागे आहोत ( फ़िनलंडमधल्या तरूणांचे सेक्सच्या पहिल्या अनुभवाचे सरासरी वय आहे १९ बर्षे... आणि आपण तिच्यायला असे"!!!)..अजून लग्नाला इतका अवकाश अहे आणि आपण तोपर्यंत .... वगैरे वगैरे मार्गाने जात असताना तिघांचे एकमत होते की आपण हा अनुभव आता घेतलाच पाहिजे.
त्यातल्या एकाचा एक अनुभवी (!) मित्र एका "व्यावसायिक" PSW ला ओळखत असतो, त्याला फोन करून हे (हो नाही करत, स्वत:जवळ पुरेसे पैसे आहेत का बघत ) तिची अपोइंटमेंट घेऊनही टाकतात. ... मग असे करू, तसे करू वगैरे खूप अंदाज आणि ती येते...
( या सार्यांची अपेक्षा की एखादी कॉलेजकन्यका येईल... पण येते एक मध्यमवयीन स्त्री).. मग सगळे गांगरून जातात आणि काहीही न करता तिच्याबरोबर सीडीवर इक्बाल सिनेमा पाहतात, आणि तिला पैसे देऊन निरोप देतात.....
....
मग पुन्हा एकाला समोरच्या इमारतीत त्या फ़्लॆटमध्ये लाईट दिसतो .." ते जोडपं आलंय परत... " ... "बघावं काय?" असा विचार करत दोघे उठतात पण "नकोच ते" असं म्हणत परत झोपतात..
पडदा ...संपलं नाटक..
______________________________________
माझे मत : आपल्याला नाटक पाहताना आवडलं ...
औटस्टेंडिंग, विचारप्रवर्तक वगैरे नव्हते तरीसुद्धा त्यात गंमत होती.. कलाकारांनी छान कामे केली होती... सुरुवातीच्या सेक्सबद्दलच्या कुतुहलाचे संवाद छान लिहिले होते... काही क्षणी नाटक अगदीच चीप होतंय की काय अशी मला भीती निर्माण होता होता परत कंट्रोल व्हायचे. ... हे निपुणमधल्या दिग्दर्शकाचे कौशल्य ... ( हे असले संवाद मी लिहू शकलो नसतो , हे ही खरे) पण आता नाटकाचा विषयच हा आहे तर काय करणार ? (आता इतकी नैसर्गिक गोष्ट आहे ही, पण पूर्वी तर त्याबद्दल कुठेच बोलायचे नाही, चर्चा नाही,
अर्धवट माहिती इकडून तिकडून मिळवलेली .. आताच्या तरूण मंडळींकडे आंतरजालासारखा माहिती स्त्रोत आहे हे बरे....)
मला वाटतं मी हे नाटक सुमारे १२५ लोकांबरोबर पाहिलं... त्यात साधारणपणे ३ ग्रुप दिसले.
त्यात एक ग्रुप - पुढे बसून जोराजोरात खिदळणारे, प्रचंद दाद देणारे अगदी २० २२ वर्षांचे कॊलेजियन... कारण हे सारे अगदी त्यांच्या मनातले , त्यांच्याच वयाची पोरे सांगताना दिसताहेत.
दुसरा ग्रुप ... ( माझ्यासारखा ) तीस पस्तीसच्या आसपासचा , त्यातल्या एका मित्राशी बोललो , तो डोळे मिचकावत म्हणाला, " कुतुहल, अंदाज, आनंद वगैरे त्या त्या वयात ठीक आहे पण शेवटी यांनाही कळेलच की नंतर की ...म्हणजे ...वाटतं तेवढं ...हं... " आणि मान हलवत हसला.
तिसरा ग्रुप ... पन्नास- पंचावन्नचा ज्यांची मुले मुली वीशीत आहेत असे... यांचे चेहरे थोडे चिंताग्रस्त दिसले.... काही स्त्रिया तर वैतागलेल्या दिसल्या... ( हे काय घाणेरडं वगैरे? घरात वेश्या बोलावताय?")
मला तर पुण्यातल्या शनिवार पेठेत आपण हा प्रयोग पाहिला, यावर थोडा वेळ विश्वास बसेना....
प्रयोग नाटकाच्या विषयाशी प्रामाणिक होता? हो.
बहुसंख्य प्रेक्षकांनी एन्जॊय केला? हो.
कलाकारांची कामे मस्त.... आधी मारे वाघासारखी गप्पा मारणारी पोरं ती आल्यानंतर शेळी होतात ते बेष्ट...
________________________
( आता दुसर्या बाजूने विचार केल्यावर वाटतं , समजा तिथे खरंच कॊलेजची १८ वर्षांची PSW आली असती तर काय झाल असतं? मध्यमवयीन स्त्री येणं आणि यांनी काहीच न करणं , ही नाटककाराच्या दृष्टीनं एक पळवाट झाली की सांगायला, " बघा माझी पात्रे वाईट नाहीत हो, काहीही न करता त्यांनी फ़क्त सिनेमा पाहिला"... मग एवढंच करायचं होतं तर इतक्या धीट विषयाला हात घालून ऐन वेळी पळवाट कशाला काढली ? तिथे खरी मजा आली असती की आलेली १८ वर्षांची मुलगी यातल्या एकाची मानलेली गर्लफ़्रेंड आहे.... मग खरी मजा आली असती...मग यांची बोलती बंद झाली असती, "तुम्ही मुलं जर तिला बोलवू शकता तर त्याच न्यायाने मी ती असू का नये??"
असा एक संवाद लिहून पाहू म्हणतो, सराव म्हणून...कोणी लिहिणार का ?)
_____________________________
अमेरिकेच्या स्वप्नांवर पाणी?????
प्रेषक नाना चेंगट ( गुरू, ०६/१२/२००८ - १७:१८) .Has the American Dream Become a Fairy Tale? हा लेख Laura Rowley यांनी लिहीला आहे
वाचुन प्रतिक्रिया द्याव्यात ही विनंती
मराठी कलाकारांनी दिल्ली दणाणून सोडली!
प्रेषक चतुरंग ( बुध, ०६/११/२००८ - २०:३८) .५४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधे मराठी कलाकारांनी आपली ठसठशीत मोहोर उमटवली. वाचा सविस्तर बातमी इ-सकाळला.
मधुर भांडारकर, दिलिप प्रभावळकर, स्वानंद किरकिरे, अमोल पालेकर, नीना कुलकर्णी, आरती अंकलीकर, अशोक पत्की, अनिल पलांडे इ. प्रतिभाशाली मराठी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!!
चतुरंग
म. टा. मधे सुरु झालेले नवीन सदर , सेक्स न्यूज : नवं सेग्मेंट
प्रेषक शरुबाबा ( सोम, ०६/०९/२००८ - १५:०२) .म. टा. मधे सुरु झालेले नवीन सदर
सेक्स न्यूज : नवं सेग्मेंट
http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/3103033.cms
आपली प्रतीक्रीया ?
चाहूल.... नाटक...
प्रेषक भडकमकर मास्तर ( शुक्र, ०६/०६/२००८ - १८:३६) .चाहूल
चंद्रलेखा प्रकाशित
चिरंतन निर्मित
दोन अंकी नाटक... चाहूल..
लेखक : प्रशांत दळवी
दिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी
कलाकार : तुषार दळवी
सोनाली कुलकर्णी
कथासूत्र :
मकरंद आणि माधवी या तथाकथित आधुनिक, शहरी जोडप्याची एका रात्रीत घडणारी ही गोष्ट...मकरंद ऒफ़िसमधून घरी आलाय आणि चिडचिड करतोय , नंतर त्यामागचं कारण असं कळतं की त्याच्या बॊसनं माधवीला एक रात्र त्याच्याबरोबर लोणावळ्याला पाठवण्याची विनंती केलीय...
मग एकमेकांवर दोषारोप ( तूच जास्त नटतेस वगैरे आणि ती म्हणते तिथेच त्याला ठणकावून शिव्या देऊन नकार का नाही कळवलास वगैरे)... मग चर्चेलाच तोंड फ़ुटते.... पावित्र्य म्हणजे काय?(किराणा सामान आणलेलं आहे...) त्यातल्या प्रत्येक चैनीच्या गोष्टीची ( शांपू, पावडर, बॊडी लोशन , डिओ स्प्रे वगैरे ) आपल्याला खरंच गरज आहे काय?...( मग थोडं फ़ार समर्थन सुरू होतं ) कदाचित आपली लाचारी, वाढत्या गरजा, आणि स्वप्नं त्याला दिसली होती .....सर्वच गोष्टींचं बाजारीकरण... गरज आणि चैन यातला फ़रक काय , गरज कुठे संपते आणि चैन कुठे सुरू होते??...दोघे दारू पिऊन बोलत राहतात... मग पुढेपुढे सगळे नैतिक अध:पतनाचं भाबडे, खोटे समर्थन करत करत दोघे झोपतात...... सकाळ होते, घाईघाईने आवराआवर , तयारी करत माधवी बाहेर पडते, बाहेर जाताना एवढंच विचारते " पुरेसे भांडलो ना रे आपण ?" तोही मोजकंच बोलतो ," तू नि:शंक मनाने जा... प्रामाणिकपणाची चैन परवडणारी नाहीये आपल्याला..."
ती गेल्यावर मात्र मकरंद पलंगावर कोसळतो आणि डोक्यावरून पांढरी चादर ओढून घेतो,आणि मागे सारे आकाश चिरून टाकणारा हा आवाज कसला येतोय? तो आतला आवाज तर नक्कीच नाही..
____________________-
मी हे नाटक पाहिलं त्याला आता १० वर्षं झाली... अजून तो शेवटचा सीन आणि अनंत अमेंबल यांचं शेवटचं संगीत आठवतं..... इतका परिणामकारक शेवट असलेलं अस्वस्थ करणार नाटक मी अजून पाहिलेलं नाही... मी एकटाच पहायला गेलो होतो, बरोबर कोणीच नव्हतं... अत्यंत अस्वस्थ होऊन, आत्ममग्न अवस्थेत थरथरत राहिलो होतो काही काळ... अध:पतनाचं समर्थन आपल्याला पटतंय की काय, या विचाराने चिडचिडच व्हायला लागली..हे आपलं अध:पतन म्हणायचं का नाटककाराचं यश? बराच वेळ झोप आली नाही... दुसया दिवशी मित्राला पूर्ण स्टोरी सांगितली , सर्व ग्रुप घेऊन पुन्हा ते नाटक बघायला गेलो... असं कुठे असतं का? असं कोणी करतं का ?हे नाटक आवडणारा माणूस स्वत: तरी असं करेल का? वगैरे वगैरे पुष्कळ प्रश्न मित्रांच्या चर्चेत पुढे आले...सगळ्यांची उत्तरं द्यायला मी समर्थ नव्हतोच...मी गप्प बसलो... accepting indecent proposal या घटनेपलिकडे जाऊन त्यातली चर्चा मनाला लावून घ्यायला कोणी तयार नव्हतं..
________________________
मग २००० साली पॉप्युलर प्रकाशनाने काढलेले नाटकाचे पुस्तक सापडले... त्यात संवादांपेक्षाही प्रशांत दळवी यांनी लिहितानाचे आणि नाटक स्टेजवरती आल्यानंतरचे काही अनुभव लिहिले आहेत... खास त्यासाठी हे पुस्तक घ्यायलाच पाहिजे..
त्या प्रस्तावनेतील काही खास भावलेली वाक्यं द्यायचा मोह इथे आवरत नाहीये...
"...मकरंद आणि माधवी.....स्त्रीत्त्व किंवा पुरुषत्व हे त्यांचं समसमान भागभांडवल होतं, बाकी बुद्धिमत्ता आणि अधिकाराच्या बाबतीत तर समानताच होती,त्यामुळे इथे कोणीच कोणावर अन्याय करायचा प्रश्न नव्हता..मकरंदच्या आग्रहाला बळी पडण्याइतकी माधवी भाबडी राहिली नव्हती किंवा फ़क्त माधवीच्या चैनी वृत्तीमुळे मकरंद असहाय्य होण्याइतका बिचारा उरला नव्हता. आंतरजातीय विवाह केला असला तरी दोघांची गरजेची जात एकच होती......"
चाहूलला विचारले गेलेले प्रश्न ....
१. बॊस आला असता तर संघर्ष अधिक गडद झाला असता... बॊसनं प्रश्न विचारणं फ़क्त एक निमित्त आहे..असा एखादा नैतिक प्रश्न अंगावर कोसळल्यावर वैचारिक बैठक पक्की नसेल तर चांगले वाईट ठरवायला आपण कसे असमर्थ ठरतो, कोणती भावनिक , नैतिक आणि बौद्धिक उलथापालथ होते त्याचं हे नाटक आहे...त्यात बॊस येतोच कुठे? आणि बॊस आला असत तर सगळा दोष त्याच्यावर ढकलण्याचा धोका होताच...
२. त्यांच्याकडे एवढी सुबत्ता असताना ह्या तडजोडीची गरजच का वाटावी?
फ़ारच भाबडा प्रश्न झाला...फ़क्त गरीबच तडजोड करतात का? मग चंगळवादाचा जन्मच झाला नसता...
३.शेवट नकारात्मकच का?तिनं जायला नको होतं...
नाटकानं एकतर मनोरंजन करावं किंवा प्रबोधन ..ही एक परंपरागत अपेक्षा आहे त्यामुळे नाटकाचा शेवट हे लेखकाचं मत मानलं जातं, यातून माधवीच्या जाण्याचं आम्ही समर्थन करतोय अशी गल्लत काही जण करून बसतात..उलट तिचं जाणं आम्हाला जास्त क्लेशदायक होतं..
आणि समजा असा एंड दाखवणं टाळलं असतं तर " चला कितीही भांडले तरी शेवट गोड झाला " असं मानत परिस्थितीतल्या कडवटपणाकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष झाले असते...
४.एका रात्रीत, इतक्या कमी वेळात हा निर्णय कसा घेतला जाईल?
ढासळण्याची प्रक्रिया फ़ार आधीपासूनच सुरू आहे,नकाराची शक्ती शोषून घेणारं एक मिंधेपण कधीच घरात शिरलं आहे... त्यामुळं हासाचा कालखंड लक्षात घेतला पाहिजे..
५. समस्या मांडणं पुरे झालं ..त्यावरचे उपाय सांगा ना...
परिस्थितीचं निदान करणं त्यावर रोखठोक भाष्य करणं माझं कर्तव्य आहे... उपाय ज्यानं त्यानं आपापल्या ग्रहणशक्तीनुसार शोधायचा आहे..
चाहूल बघताना मकरंद माधवीच्या थरापर्यंत जाण्यापूर्वीच स्वत:ला थांबवावंसं वाटलं,आपल्या आयुष्यातल्या तडजोडी आठवून शरमल्यासारखं झालं, मनात काही खूणगाठ बांधावीशी वाटली, ऒफ़िसला एखादं खोटं बिल लावताना, एखादा काळा व्यवहार करताना मन थोडं जरी कचरलं तर त्याहून अधिक फ़लित चाहूलचं दुसरं काय असणार?कारण आज स्वत:ची स्वत:लाच लाज वाटणंयापेक्षा अधिक कोणती जागृती असू शकणार? नकारात्मक शेवट केल्याशिवाय ही सकारात्मक लाज येणार कुठून?
__________________________________________________________-
काही काळानंतर " कळा या लागल्या जीवा " नावाचे नाटक आले होते ... (प्रयोग छानच होता मी सुबोध भावे आणि शृजा प्रभुदेसाई यांनी केलेला प्रयोग पाहिला..... )
एका मित्राने सांगितले की त्याच्या लेखकाने चाहूलवर चिडून त्याला उत्तर देण्यासाठी हे नाटक लिहिले.... मी मोठ्या आशेने हे नाटक पहायला गेलो...( पण फरक इतकाच
१. चर्चेच्या वेळी दोघे दारू पीत नाहीत
२. ती त्याला सोडून जात नाही..शेवट गोड ...) बाकी सारे नाटक तेच्...मग एवढे मोठे नाटक परत लिहायचे कशाला?? असो.. तेही नाटक छान चालले , चालते आहे...

