चल, घरी चल .....
तू मरून, मोजून १३ वर्षे, ५ दिवस आणि काही तास झालेत. काय काय घडत नाही इतक्या काळात? म्हटलं तर फार काही. म्हटलं तर काहीच नाही. मरणाच्या क्षणापाशी काल गोठून जातो.
पण, तू निघून गेल्यापासून back up ठेवल्यासारखा भेटतोयस.
आधी फार जड गेलं. मी अनंत काळ अशीच रडत राहणार असं वाटलं. पण तसे नाही घडले. तू परत भेटलास! माझ्या घरासमोर मंदिरापाशी, रात्रभर पावसात वाट पहात उभारलेला. का तर, मी एकदा तरी खिडकी उघडेन, किती पाउस पडतोय असं म्हणत बाहेर बघेन, आणि तुला दिसेन. पहाटे पाऊस टीपटीप करीत थांबला. पुजारी आला. एवढ्या पावसात चहाचा रिकामा कप कोण ठेवून गेलं, म्हणून इकडे तिकडे विचारीत राहिला.