भूगोल
फर्डिनांड मॅगेलान - जगाचा प्रवासी!
प्रथम पृथ्वीप्रदक्षिणा करणारा महावीर कोण? या प्रश्नाचा शोध 'फर्डिनांड मॅगेलान'पाशी येऊन संपतो. कारण हाच तो सुपरहिरो ज्याने पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा घातली. ती सुद्धा आपण शंकराला प्रदक्षिणा घालतो ना, तशी!
या मॅगेलानबद्दल मी पहिल्यांदा वाचलं जेव्हा मी हौशी खगोलनिरीक्षकाचं काम करायचो. दक्षिण गोलार्धातून दिसणारा एक खगोलीय अविष्कार म्हणजे मॅगेलानचे ढग. प्रत्यक्षात ह्या अवकाशातील छोट्या आकाराच्या आकाशगंगा (गॅलेक्सी) असून आपल्या आकाशगंगेच्या भोवती फिरणाऱ्या उप-आकाशगंगा (किंवा लघु-दीर्घिका) आहेत. ही आणि याबद्दलची माहिती गोळा करताना अजून थोडी शोधाशोध केली आणि कळलं की या आकाशगंगांचं नाव हे 'फर्डिनांड मॅगेलान' या जग-प्रसिद्ध नाविकाच्या नावावरून दिलंय, ज्याने यांचा शोध (डिस्कव्हरी) लावला. मॅगेलानचं नाव अजूनही अनेक जागांना, वस्तूंना, पदार्थांना, प्राण्यांना दिलं गेलंय कारण या गोष्टी त्यानंच पहिल्यांदा जगासमोर आणल्या. असा हा मॅगेलान आणि त्याची ही परिचयात्मक माहिती.त्याची अजून थोडी ओळख करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न!
मॅगेलानचा जन्म झाला १५व्या शतकाच्या उत्तरार्धात एका पोर्तुगीज कुटुंबात. लहान वयातच मॅगेलान पोर्तुगीज राजाच्या दरबारी हुजर्या म्हणून नोकरीस लागला, अर्थातच ही नोकरी म्हणजे त्याच्या कुटुंबाचा पिढीजात पेशा होता. पण बहुधा मॅगेलानचं मन यात रमलं नसावं. कारण काही वर्षातच एकदम शांत आणि सरळसोट नोकरी सोडून तो एका जहाजावर खलाशाची अतिशय सामान्य नोकरी करू लागला आणि तिथेच त्याची समुद्राशी ओळख झाली. दक्षिण-पूर्वेतील पोर्तुगीज वसाहतींवर काम करताना अक्कलहुशारी, मेहेनत आणि थोडंफार नशीब यांच्यामुळे मॅगेलान वरिष्ठांच्या जसा पटकन नजरेत भरला, तशीच थोड्याच वर्षांत त्याचावर खप्पामर्जीही झाली. त्यातच अवैध व्यापाराचा शिक्का माथ्यावर लागल्याने पोर्तुगाल आणि पोर्तुगीज वसाहतींमध्ये त्याला काम मिळेनासे झाले. पोर्तुगीज राजानेही त्याची पश्चिमेकडील मसाल्याच्या बेटांवर मोहीम आर्थिक कारणे पुढे करून आणि मॅगेलानच्या मागण्या नाकारून रद्द केली. पोर्तुगालमध्ये करण्यासारखे मॅगेलानकडे काहीच उरले नाही. निराश मॅगेलान पोर्तुगाल सोडून स्पेनमध्ये निघून गेला.
१५वं शतक संपत आलं होतं. जगाचे नकाशे बनवायचं काम नुकतंच सुरु झालं होतं त्या काळातली ही गोष्ट. संशोधक आणि धर्मसंस्था यात 'पृथ्वी गोल आहे की सपाट आहे ' या प्रश्नावरून वादंग माजला होता. पोर्तुगीजांतर्फे वास्को-द-गामा भारतात पोहोचला होता. पोर्तुगाल आणि स्पेन ही दोन्ही राष्ट्रं तेव्हा अनिर्बंध राज्यकर्ते आणि परस्परांचा द्वेष यात गुंतून पडली होती. त्यातून मान्य कराव्या लागलेल्या एका तहानुसार 'आफ्रिकेला वळसा घालून भारताकडे जाणारा मार्ग' पोर्तुगीजांच्या ताब्यात आला होता. पोर्तुगीज भारतात पोहोचले आणि भारत नावाचा खजिना त्यांच्या हाती लागला ही गोष्ट स्पेनच्या राजाला सहन होणारी नव्हती. खुष्कीचा (जमिनीवरील) मार्ग हा कठीण तर होताच, त्यातच तुर्क, मूर आणि अफगाण टोळ्यांमुळे धोक्याचा होता. समुद्री चाचेगिरी आणि होणारी लुटालूट लक्षात घेऊनही हा मार्ग सोयीचा असल्याने स्पेनचे राज्यकर्ते लवकरात लवकर भारतात पोहोचण्यास उत्सुक होते. स्पेनच्या राजाने 'कोलंबस'ला भारतात जायचा नवा समुद्रामार्ग शोधायला संपूर्ण अर्थसहाय्य केलं. पण हाय रे कर्मा! कोलंबसाने भारताऐवजी अमेरिकेचा शोध लावला. अमेरिका कसली, त्याने तर अमेरिकेच्या आधी लागणाऱ्या वेस्ट इंडीज बेटांचा शोध लावला होता. कोलंबसला किंवा इतर स्पेनला आपण कसला शोध लावलाय याची सुतराम कल्पना नव्हती, आणि ते भारताला पोहोचायच्या ऐवजी कुठेतरी भलतीकडेच पोहोचल्याबद्दल कोलंबसावर नाराज होते. बिचाऱ्याने भारतात पोहोचण्यासाठी खूप खटपट केली पण तो गेला भलत्याच दिशेला त्याला तो तरी काय करणार.
अतिपूर्वेकडील मसाल्याची बेटे शोधण्यासाठी मॅगेलानला आर्थिक पाठबळ हवं होतं, आणि स्पेनच्या राजाला एक जाणकार मनुष्य. दोघांची भट्टी जमली आणि मॅगेलान त्याच्या पूर्वेच्या बेटांच्या मोहिमेला निघाला. स्पेनच्या राजाने त्याला आर्थिक मदत तर केलीच, शिवाय ५ जहाजांचा ताफा, सुमारे २०० खलाशी आणि एका जहाजाच्या कप्तानाला कधीही मिळणार नाहीत इतके अधिकार देऊन त्याची रवानगी केली. वेस्ट इंडीज बेटांचा ताबा जरी स्पेनकडे असला तरी ब्राझीलच्या भूभागाचा आणि किनारपट्टीचा ताबा पोर्तुगीजांकडे होता. पोर्तुगीज जहाजे आणि गस्त चुकवीत मॅगेलान आर्जेन्टिनापर्यंत येऊन पोहोचला. अतिशय खवळलेला अटलांटिक समुद्र आणि बेक्कार हवामान यामुळे त्याला तिथे काही काळ थांबून राहावे लागले. त्यानंतर संपूर्ण दक्षिण अमेरिकेला वळसा घालून जायच्याऐवजी मॅगेलानने आपला मोर्चा एका अरुंद अशा सामुद्रधुनीकडे वळवला. (सामुद्रधुनी: दोन भूभागामधील चिंचोळा समुद्राचा पट्टा. उदाहरणार्थ, भारत आणि श्रीलंकेदरम्यान असलेली पाल्कची सामुद्रधुनी).
इथून जात असताना मॅगेलानच्या २ जहाजांवर बंडखोरी झाली आणि मॅगेलानवर विश्वास नसणारे त्याचे २ कप्तान आणि काही खलाशी ही जहाजे घेऊन गुपचूप स्पेनला परत गेले. थोड्या दिवसांनी जेव्हा मॅगेलान सामुद्रधुनीच्या दुसऱ्या टोकाला पोहोचला तेव्हा त्याला दिसला एक अतिविशाल महासागर. अटलांटिक महासागर आणि सामुद्रधुनीमधील वादळी वारे आणि खराब हवामान यांच्या मानाने हा सामुद्र अगदीच शांत होता. मॅगेलानने याला नाव दिलं 'शांत' समुद्र. हाच आजचा प्रशांत महासागर (pacific ocean)!
पडेल वारे, आणि समुद्राचा शांतपणा यामुळे मॅगेलानच्या खलाशांची प्रशांत महासागर पार करताना चांगलीच दमछाक झाली. ३-४ महिने महासागरात कसेबसे जिवंत राहून मॅगेलान अतिपूर्वेकडील देशात येऊन पोहोचला. मसाल्याच्या बेटांकडे यायचा एक संपूर्ण नवा मार्ग त्याने शोधून काढला होता. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही.
सध्याच्या फिलिपिन्समध्ये दोन स्थानिक शासन-कर्त्यांच्या भांडणात एकाला मदत (अर्थात राजकीय फायदा उठवण्यासाठीच) करताना झालेल्या हल्ल्यात मॅगेलान जबर जखमी झाला. स्थानिक आदिवासी त्याला घेऊन गेले. मॅगेलान त्यानंतर तो कधीही कुणालाही दिसला नाही. त्याला झालेल्या जखमांमुळे तो जागीच मरण पावला असावा असे प्रत्यक्षदर्शी लोकांनी लिहून ठेवलेले आढळते. मॅगेलानच्या पार्थिवासाठी अनेक वाटाघाटी (आणि सौदेबाजीसुद्धा) झाली, पण सर्व व्यर्थ. जगाच्या या संशोधकाची अशी अखेर झाली की त्याच्यावर अंत्यसंस्कारही झाले नाहीत. पण त्याचा हा प्रवास व्यर्थ गेला नाही. या सगळ्या दिव्यातून वाचलेले खलाशी (फक्त १८ जण) रडत-खडत स्पेनला पोहोचले.
आता प्रश्न असा आहे की मॅगेलान जर मध्येच मरण पावला, तर असं का म्हणतात की त्याने जग-प्रदक्षिणा पूर्ण केली?
कारण जेव्हा तो पोर्तुगीजांच्या नोकरीत होता, तेव्हा तो फिलिपिन्सला येऊन काही काळ राहून गेला होता. त्यामुळे त्याने पहिली जग-प्रदिक्षिणा केली असे मानले जाते. त्या काळी समुद्र-प्रवासात जिवंत राहून सहीसलामत प्रवास पूर्ण करणे हीच सर्वात मोठी गोष्ट होती तिथे मॅगेलान आणि त्याचे मुठभर सहकारी जगाची सफर करून आले.
मॅगेलानने या सफरीदरम्यान बनवलेले नकाशे त्याच्या मृत्युनंतरही सुमारे ३०० वर्ष वापरात राहिले. गरजेप्रमाणे त्यात सुधारणाही झाल्या, पण पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत मॅगेलानने सर्वप्रथम 'पुराव्यानिशी शाबित' करून दाखवला. पृथ्वीचे आणि समुद्रामार्गांचे नकाशे 'पृथ्वी गोल आहे' हे ध्यानात ठेवून बनवले महिजेत ही दूरदृष्टी सर्वप्रथम मॅगेलानने दाखवली. त्यासाठी काहीकाळ त्याला स्पेन मधील धर्मासंस्थांच्या रोषाला बळी पडावे लागले होतेच. पण त्याने त्याचा आग्रह सोडला नाही, आणि नंतर घडला तो सर्व इतिहास वर संक्षेपाने आला आहेच!
असा हा जगाचा संशोधक, मॅगेलान! स्वत:च्या कार्याने आणि चिकाटीने अजरामर होता येतं हे दाखवून देणारा एक असामान्य सुपरहिरो!
सीमालढागीतः भिऊ नको मराठी जना
राहीला सीमाभागी
वेळ काढ जराशी जरा, येशील महाराष्ट्री पुन्हा
चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||धृ||
दिलेत भरपूर लढे, रक्ताचे पडले सडे
विचार नको करू, नको मनामधे झुरू
समजू नको अभागी
चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||१||
आम्ही जोर जुलूम तोडू, कन्नडीगांची कंबर मोडू
अन्यायाला वाचा फोडू, सीमाभाग महाराष्ट्रा जोडू
जरी लाठ्या डोक्यास लागी
चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||२||
जय महाराष्ट्र बोलू बोल, मराठीचे उपकार अनमोल
झालो मोठे त्याच धरतीवर, पांग फेडू झेलू गोळ्या छातीवर
चाल पुढे मागे नको फिरू
पाऊल टाक वेगी
चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१३/०७/२०१०
बेळगावी मराठी बांधवांवर हल्ला: सीमावासीयांनो आमचा तुम्हाला पाठिंबा आहे
काल दि. १२ जुलै २०१० रोजी बेळगाव शहरात सीमावासीयांनी मराठीचा झेंडा फडकावत बेळगावात उत्स्फूर्तपणे काढलेल्या मोर्चावर कर्नाटक सरकारने अमानुष लाठीमार केला. शांततेने चालणार्या मोर्चावर अचानक लाठीमार करून सीमावासीयांच्या भावना कर्नाटकी सरकारने पायदळी तुडवल्या. म्हातार्या कोतार्या माणसांनाही पोलीसांनी सोडले नाही. केंद्रसरकारला अजून किती वेळा लाठीमार व सीमावासीयांचे बळी हवेत? न्याय्य मागण्यांना न्याय मिळेल की नाही? सीमाबांधवांनो, तुम्ही एकटे समजू नका. आमचा तुम्हाला पाठिंबा आहे.
http://www.saamana.com/2010/July/13/Link/Main1.htm
http://72.78.249.124/esakal/20100712/4667969515589123216.htm
http://epaper.pudhari.com/epapermain.aspx
http://epaper.prahaar.in/
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6161109.cms
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=853...
http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/MainEditio...
विदेशी दिनदर्शिकेसंबंधीत माहिती
आय टी उद्योगच नव्हे तर आजकाल सगळ्याच उद्योगांत काम करतांना बर्याचदा पाश्चात्य देशांशी संबंध येत असतो. त्या कारणाने तेथील वेळा, सण वार, सुट्या, राष्ट्रिय सण, समारंभ, स्थानिक सुट्या आदी असल्या तर त्या भारतात राहून समजत नाही. येथे अनेक सदस्य आयटी/ अन्य कारणाने भारताबाहेर वास्तव्यास आहेत. माझी एक विनंती आहे की त्यांनी त्या त्या देशातल्या वर उल्लेखिलेल्या सुट्यांचे वेळापत्रक सरकारतर्फे जाहिर झालेले वेळापत्रक म्हणा किंवा त्याशी संबंधीत संस्थळ किंवा दिनदर्शिका असेल तर ते येथे द्यावे जेणे करून येथील अनेक सदस्यांना त्याचा उपयोग होवू शकेल.
एक नेहमीचा उपयोग म्हणजे एखाद्या सदस्याला जर अमेरीकेचे संयुक्त संस्थानाशी कारभार करायचा असेल अन त्याला समजा त्या देशाचा राष्ट्रिय सण समजा परवा असेल तर तो येथे भारतात जोडून सुट्टी घेवू शकतो. त्याने त्याचे त्या दिवसाचे न केलेले कामाचा दिवस त्याच्या कार्यालयात सत्कारणी लागून कार्यालयाचे व त्याचेही वरखर्च वाचू शकतो.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरील गीत : उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर
उचल मराठी झेंडा जावूदे वर वर ||धृ||
उचल तुझे हात नको भिऊ आता
आपूलाच जय होईल सीमेत शिरता
झेंडा मराठीचा फडके बेळगाव मनपावर
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||१||
राज्य आपले एक व्हावे मराठी भाषकांचे
वेगळे न राहू आता एक घर करू बांधवांचे
सुपीक प्रदेश ताब्यात आणू निप्पाणी कारवार
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||२||
पुर्वज आपले खपले तेथे विसरतो कशाला
महाराष्ट्र एकीकरण समिती आहे तुझ्या पाठीला
सामिल करू हलियाल,भालकी, अरूड अन बिदर*
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||३||
* महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्तीय मराठी शहरे (BCC's 2005 resolution हा परिच्छेद पहा.) (कृपया शहरांच्या नावांचे उच्चार योग्य आहेत का ते सांगा जेणेकरून बदल करता येईल.)
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०७/२०१०
अवलिया को गुस्सा क्यो आता है ?
काल संध्याकाळी दुकान बंद करायला घेतले आणि तेव्हड्यात फोन वाजला. बघतो तर चौपाटीवरच्या बारच्या म्यानेजरचा फोन.
"हॅलो परा साब जल्दी आओ यार, इधर तुम्हारा दोस्त नाना राडा कर रहा है, वेटर को गालीया दे रहा है "
मी डोक्याला हात लावला आणि चौपाटीकडे धावलो. साला चौपाटीचे रंग रुपच बदलून गेले आहे आजकाल हे जाणवुन गेले. चौपाटी अजुनच झगमगायला लागली होती. ह्यावेळी चौपाटीवर तरुणाईचा उत्साह जाणवण्यागत वाढला होता, एका कडेला मोठा स्क्रीन लावुन त्यावर फुटबॉलच्या मॅचेस दाखवल्या जात होत्या. साला क्राउड एकदम खेचला गेला होता तिकडे. काही जुने चेहरे गायब होते तर काही गायब झालेले जुने चेहरे पुन्हा दिसायला लागले होते. इकडे तिकडे बघता बघता एकदाचा बार मध्ये जाउन पोचलो.
अंधारात नजर सरावली आणि एका कोपर्यात विषण्णपणे बसलेला अवलिया दिसला, बाजुलाच आमचा बारचा म्यानेजर देखील बसला होता.
"आओ सेठ, देखो ये क्या लफडा किया. वेटरने सामनेका प्लेट उठाया तो वेटर को गालिया देना लगा. बोलता है "मेरा लेख कायको उडाया?" अब गलतीसे प्लेट उठा लिया वेटरने, इतना गुस्सा कायको करनेका ? सब राडा कर दिया.
"नान्या लेका किती पेग ढोसले ? काय झालय काय तुला?" मी नाना शेजारी बसत म्हणालो. नजर खिडकी बाहेरच्या चौपाटीकडे भिरभिरतच होती.
"आपण चौपाटी सोडुन चाललो आता. आता इकडे मन नाही लागत." नाना शून्यात नजर लावुन बोलला.
"काय नाटके करतो रे नान्या ? असे झाले काय तुला ? साला इतकी वर्षे ह्या चौपाटीवर एकत्र राहिलो, दंगा केला, मजा लुटली आणि तु असा एकदम सोडून जाणार ?"
"आपली गरज नाही राहिली आता चौपाटीला परा. जरा कुठे दुकान उघडले की अतिक्रमणवाले येतात आणि सगळा माल जप्त करुन नेतात. परत का जप्त केला ते पण सांगत नाहीत. दुकान उघडायचीच चोरे झालीये आता मला."
"काय बोलतो नाना ? अरे पण इन्स्पेक्टर पाध्येंशी सेटलमेंट झाली होती ना तुझी ?"
"सोड रे ! साप म्हणावा आपला पण 'अतिक्रमणवाला' म्हणू नये आपला" नाना एका दमात पेग संपवुन मोकळा झाला.
माझी नजर अध्ये मध्ये बाहेरच भिरभिरत होती.
"पर्या भाड्या, इकडे लक्ष दे तु ! बाहेर काय फुफाटा शोधतो का आता ?" नाना वैतागला.
"नान्या यार आपला चौपाटीवरचा फुगेवाला दिसत नाही रे आजकाल ? आणि तो धनुष्यबाण विकणारा कुठे गेला?"
"खी खी खी फुगेवाला आजकाल परिस्थीतीने नाडला गेलाय. आता तो गोग्गोड म्हातारीचा कापूस विकतो." नाना डोळे मिचकावत म्हणाला.
"नान्या लेका तुझे येवढे जुने दुकान असुन माल जप्त कसे काय करतात बॉ ? मानसीक रीत्या अल्पवयीन असणार्यांची दुकाने धो धो चालतात, मग तुझ्याशी काय प्रॉब्लेम आहे ?"
"काय कळत नाही रे परा. मला म्हणतात की नाना तु चौपाटीचे वातावरण गढुळ करतोस म्हणुन" नाना अंमळ हळवा झाला असावा.
"खी खी खी मग साल्या तु तुरटी का विकायला सुरुवात करत नाही ? ते जाउदे.. तु आता सरळ जप्त न होणारा माल विकायला सुरुवात कर बरं !"
"तो काय असतो ? डिटेलमध्ये बोल."
"चल नान्या तु भी क्या याद करेगा, कागद पेन घे तुला लिस्ट देतो बनवुन !" ह्या माझ्या उच्चाराबरोबर वातावरण निवळल्याचे ओळखुन बारचा म्यानेजर टेबलावरुन ऊठला. "अबे ए, परा साब को एक कागज देनेको बोल ना जल्दी.. और साथ मै पेनभी भेज फटाफट..!" जाता जाता त्याने हुकुम सोडला.
"हा नान्या घे लिहायला..."
मालाचे नाव - मालाचा प्रकार
१) मकर राशीत शिरलेल्या शनीचा आणि कर्केत आलेल्या बुधाचा इतर राशींवर होणारा परिणाम = माहितीपुर्ण लेख.
२) अंतर्वस्त्रांचे बाह्यसौंदर्य = महितीवजा अनुभवकथन.
३) सुई-दोर्याशीवाय शर्टाला बटने कशी लावावीत = अनुभव कथन + सल्ला.
४) लवकरच लग्न होणार आहे त्यामुळे काही काळातच बायको जेंव्हा गरोदर होईल तेंव्हा तिला सरकारी दवाखान्यात अॅडमीट करावे का खाजगी ? आजकाल घरी सुईणी वगैरे येतात का ? ते कितपत सुरक्षीत असते ? = काथ्याकूट + मदत हवी आहे.
५) माझा अमेरीकेतला मित्र आणि त्याच्या बायकोचे पगारावरुन होणारे वाद = अनुभव कथन
६) माझ्या भाच्याने मला मी त्याला एक कागदी नाव करुन दाखवल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ५० कागदी पक्षी, १०० नक्षीकामे कशी करुन दाखवली, आजकालची स्मार्ट पिढी इ. इ. - अनुभवकथन + आस्वाद
७) माझ्या खोलीच्या खिडकीतुन दिसणर्या भाजीच्या स्टॉलवरील विविध रंगी आकर्षक भाज्या = कलादालन.
८) माझ्या बाथरुम मध्ये पोपडे उडालेल्या भिंतीवर पाणी पडुन निर्माण झालेले विविध मनमोहक आकार = कलादालन.
९) 'आज सकाळ मध्ये आलेली फलाना-फलाना बातमी' हि कोणी वाचली का ? अजुन किती अधोगती होणार आहे भारताची ??? = काथ्याकूट.
१०) मी संगणकाचा माऊस साफ करायला कसा शिकलो = प्रकटन + अनुभवकथन.
११) "पिपात मेले ओल्या उंदिर " ह्या कडव्यात नक्की कोणते छंद आहेत ? हि गझल आहे का कविता ? = छंदशास्त्र + काथ्याकुट.
१२) शरिराला नक्की अपायकार काय असते ? आत्ममैथुन का हस्तमैथुन ? = मदत हवी आहे.
१३) कुठल्याही चित्रपटाबद्दल १५/२० वाक्ये आणि त्याच्या अध्ये मध्ये ५/१० फोटु = चित्रपट परिक्षण.
"म्हणजे तु करतो तसे ??" नान्याचा हलकटपणा जागृत झाला...
मी काहीएक सडेतोड उत्तर देणारा येवढ्यात माझा फोन वाजला. फोनवरील संभाषण संपताच मी ताडकन उभा राहिलो.
"नान्या चल मी पळतो रे आता.."
"अरे पर्या पण लिस्ट अर्धवट राहिली ना. कुठे चालला येवढ्या घाईत ? "
"डोन्रावांचा फोन होता.. दुकानच उडवले म्हणतायत माझे....."
पदरगड ऊर्फ कलावंतीणीचा महाल
पदरगड उर्फ़ कलावंतीणीचा महाल
आतापर्यंत भिमाशंकरला १५-१६ वेळा गेलो असेन. एका वर्षीतर एकाच महिन्यात सलग ३ शनिवार-रविवार भिमाशंकरला गेलो होतो घरच्यांना शंका पण यायला लागली हा भिमाशंकरी मुलगी आणतो की काय घरात? असो. पण भिमाशंकरला चिकटुनच असलेल्या पदरगडावर जायचा योग काही आजवर आला नव्ह्ता. गेल्या रविवारीच मी आणि गिरीश साठे कुठे जायच कुठे जायचं असा विचार करत होतो आणि दोघेही एकदम बोललो पदरगड. ठरल तर मग पदरगड फ़ायनल, कोणीही नाही आलं तरी आपण दोघच जाऊ पण तेवढ्यात तात्या आणि पराग भावे सुध्दा येतो बोलले. शनिवारी संध्याकाळीच खाण्याचं सामान घेतलं. रविवारी पहाटे ५.०० ला मारुती ऒम्नीने निघालो. ठाणे - पनवेल - चौक - कर्जत - कशेळे - खांड्स असा साधारण ८० कि.मी.चा प्रवास करुन ७.३० ला खांड्स गावात पोहोचलो. कशेळे - खांड्स रस्ता मस्त हिरवा झाला होता. लगेच क्लिकुन टाकलं.
मुंबईचे काही ट्रेकर्स आलेले होते तर काही ट्मट्म्यातनं धडकत होते. खांड्स गावातल्या हॉटेलमध्ये पोहे आणि चहा घेतला आणि गाडी काढली ती थेट गणेशघाटात. तेवढच ३-४ कि.मी. अंतर वाचल हो चालायचं. चालायचंच. गाडी पार्क केली, कोरडे कपडे गाडीतच ठेवले आणि ८.१० ला निघालो. पावसाळ्यातला ट्रेक आणि आकाशात ढगांचा मागमुस नाही. गाडीच्या काचेत दिसणा-या निरभ्र आकाशावरुन कल्पना येईलच म्हणा.
जुन एन्ड म्हणजे काही भरपुर पाऊस झालेला न्हवता पण तरीही गणेशघाटाच्या बाजुचे डोंगर हिरवाईने नटायला लागले होते. ऐन श्रावणामध्ये ईथलं रान मस्त ओल गच्च असत.
रमत गमत चालायला सुरुवात केली, एका दगडावर एक मस्त रंगीबेरंगी किडा दिसला. क्लिक !!
बाजुच्या पाना-झुड्पांवरसुध्दा काही ठिकाणी पाणी जमा झालेले होतं. क्लिक !!
क्लिकत क्लिकत मजल दरमजल करत १५-२० मिनीटातच गणेशघाटातल्या गणपतीच्या देवळात पोहोचलो.
देवळात थोडीशी विश्रांती घेऊन ८.४५ ला निघालो वाटेत एके ठिकाणी एक वेगळ्याच प्रकारची अळंबी दिसली. झुम मोडमध्ये ती आईसक्रिम चोकोबार सारखी वाट्त होती (मश्रुमाईस्क्रीम).
१५-२० मिनीट चाललो असु आणि एकदम पदरगडाचं प्रथम दर्शन झाल पण काही सेकंदापुरतच कारण आता पदरगडाला ढग वेढा घालायला लागले होते. मध्येच ढग यायचे पदरगड दिसेनासा व्हायचा पुन्हा दोन मिनीटात ढग भिमाशंकरच्या दिशेने निघुन जायचे. आकाश निरभ्र. या ऊन सावलीच्या खेळात भिमाशंकर मात्र मस्त चमकत होता.
ऊन सावलीच्या खेळात चमकणारा भिमाशंकरच

साधारण ९.३० च्या सुमारास आम्ही एका खुणेच्या विहीरीपाशी आलो. या विहीरीच्या मागुनच पदरला वाट जाते अशी माहिती होती. आम्ही विहीरीला प्रदक्षीणा घालुन बघीतली वाट काही मिळेना. सगळीकडेच रान माजल्यासारखं झालेले. आता मात्र वाट लागली होती (आमची). तेवढ्यात पदरवाडीतुन काही गुर आली आणि त्यांच्या मागे एक गुराखीसुध्दा. मामाला हाक मारली, ऒ मामा पदरला जायची वाट कुटं हाय ? हिकडुनच हाय बोलला असावा कारण तो काय बोलतोय हे आमच्यातल्या एकाला सुध्दा समजत न्हवतं. पदरला घेऊन जाता का विचारल तर गुर न्यायची आहेत चरायला त्याचे काय करु बोलला. ओप हाय का विचारल ते थोढ्यावेळानं कळलं की तो रोप आहे का विचारत होता. म्हटल रोप आहे आमच्याकडे. पैसे किती घेणार तर ५०० म्हणाला हे मात्र आम्हाला लगेच कळलं. पैश्याची भाषा सगळीकडे सारखीच असते असं म्हणतात. आम्ही १०० पासुन सुरुवात केली आणि २५० ला डिल फ़िक्स.
१०.०० ला मामा बरोबर निघालो. दाट झाडीतुन जाणारी वाट, आधी कधीही या बाजुला आलो नसल्याने आम्हाला मिळणे म्हणजे अशक्यच होतं बर झालं मामाला घेतलं ते. वाटेत एके ठिकाणी वाघाचे ठसे दिसले. ते सुध्दा मामानेच दाखवले. ३ वर्षाच्या वाघाचे ठ्से आहेत ही माहिती देखील दिली मामाने.
वाघाचे ठसे (ठसे पुसट झाल्यासारखे वाटतात ना ? शिवसेनेचा वाघ असेल. असो.)

अर्धा पाऊण तास चढुन एका खिंडीपाशी आलो. लहान मोठ्या दगड धोंड्यांची खिंड होती ती.
या खिंडीच्या शेवटी चिमणी आहे तिथे रोप लावावा लागतो. खिंडीच्या टोकाला डोंगर अत्यंत निमुळता होत गेलेला आहे. त्या जागेतुन सरळ चालणे अशक्य. तिरके होऊनच जायचे आणि चिमणी मारायची, म्हणजे आपले पाय समोरच्या डोंगराला तर पाठ मागच्या डोंगराला चिकटवायची आणि पाय आणि पाठ यांचा आधार घेऊन शरीर वरती ढकलायचं म्हणजे चिमणी मारायची.
मामाने टपाटप चिमणी मारली आणि रोप फ़िक्स केला. नंतर थोड्या फ़ार प्रयत्नानंतर आम्हीसुद्धा चिमणी मारुन प्रसंगी रोपचा आधार घेऊन खिंड पार करुन वरती आलो.
खिंडीतुन दिसणारे द्रुश्य विहंगम होते, समोरच्या बाजुला शिडीघाटाची वाट आणि सिध्दगड पर्यंतचा प्रदेश दिसत होता तर मागच्या बाजुला पेठचा किला ऊर्फ़ कोथळीगड खुणावत होता.
शिडीघाटाची वाट आणि सिध्दगड पर्यंतचा प्रदेश

खिंडीत येऊन थोडावेळ विसावलो, आणि मागच्या बाजुला असलेल्या १०-१५ फ़ुटी रॉक पैच वर चढायला सुरुवात केली. रॉक पैच मारुन वरती आलो तर समोर एक छोटीशी गुहा होती

गुहेच्या बाजुने दगडात खोदलेल्या पाय-या आम्हाला पदरच्या टॉप वर घेऊन गेल्या.

पदरचा माथा विशेष मोठा न्हवता, सहावारीच असावा. पदरच्या माथ्यावरचे दोन सुळके मात्र लक्शवेधी होते. सुळके चढायचे म्हणजे पुर्णपणे टेक्नीकल क्लायंम्बीग होतं आणि आम्हाला अर्थातच तिथे जायचं ही न्हवतं.
पदरच्या ऊजव्या कड्यावरील टाके लांबुनही स्पष्ट दिसत होतं.
टाक्याच्या बाजुलाच काही देवाचे दगड होते ते भैरोबा आणि शनी देव आहेत असे मामाने सांगितले.

सुळक्याच्या ऊजव्या बाजुने तसेच पुढे गेलो की आपण पदरच्या मुख्य गुहेत पोहोचतो. गुहा ब-यापैकी मोठी आहे. (कलावंतीणीची असावी) २०-२५ माणसं आरामात राहु शकतील. गुहेत बसुन आराम केला थोड्सं खाऊन घेतलं, टाक्याचं पाणी प्यायलो आणि निघालो.
एव्हाना मी बामण आहे आणि गुरुजीगिरी करतो हे मामाला कळ्लं होतं, पुन्हा देवांपाशी येताच मामाने आमच्या देवाना अभिशेक करा म्हणुन आग्रह केला, त्याचा आग्रह मोडवेना, म्हणुन पुन्हा टाक्यातलं पाणी घेतलं आणि शनी महाराज आणि भैरोबा यांना महिम्नाचा अभिशेक करुन टाकला. मामादेखील खुश झाला. श्रध्दाळु असतात हो हे लोक. असो.
अर्ध्या तासात पुन्हा खिंडीत आलो तर तिथे खालुन काही लोकांचे (ट्रेकर्स) आवाज येत होते. ईथे तात्याची हालत पहाण्यासारखी झाली होती.
मला वाटलं होत आज पदराला हात लावणारे आपणच असु पण मुंबई-ठाण्याच्या अजुन एक ग्रुप पदराला (पदरगडाला) हात लावण्यासाठी सरसरत होता. आता ऎन चिमणीपाशी गर्दी झाली असती आणि वेळही मोड्ला असता त्यामुळे आलो त्या वाटेने न ऊतरता दुस-य़ा बाजुने ऊतरायचं ठरवलं. खिंडीतनच ऊजव्या बाजुने खाली जाणारी वाट पदरला मागच्या बाजुने वळसा घालुन पुन्हा गणपती घाटात येते. ही वाट भरपुर घसा-याची आहे पण पाऊस झाल्यामुळे माती बसली होती आणि घसारा विशेष वाटत न्हवता. ह्य़ा घसा-याच्या वाटेने साधारण अर्धा तास ऊतरल्यावर (घसरल्यावर) आम्ही पदरच्या विरुध्द बाजुला आलो तिथुन भिमाशंकरचा डोंगर दिसत न्हवता.
आता पुन्हा एकदा आभाळ भरुन आलं आणि आम्ही ज्याच्या प्रतिक्षेत होतो त्या पावसाला जोरदार सुरवात झाली. तिथुन पुन्हा १५-२० मिनीटं सपाटीवर चालुन, पावसाचा मार खात, पदरला वळ्सा घालुन येत होतो. वाटेत एके ठिकाणी चांगल बांधलेल पाण्याचं टाक दिसलं त्याच्या बाजुलाच एक कातळात कोरलेली शंकराची पिंडी होती.
पुन्हा गणपती घाटाच्या वाटेवर आलो. विशेष म्हणजे तुकाराम मामाची गुरं देखील त्याच परिसरात चरायला आली होती. तुकाराम मामाला आम्ही तिथेच निरोप दिला, मामाने देखील श्रावणात मुक्कामाला या आमच्याकडे पदरवाडीला असा आग्रह केला. १५-२० मिनीटात पुन्हा गणपतीच्या देवळात आलो. वाटेत भिमाशंकरी लोक्स भेटत होतेच. आता मात्र भुका लागल्या होत्या कारण दुपारचे तीन वाजत आले होते आणि सकाळ्पासुन विशेष काही खाणं देखील झालेलं न्हवतं. पाऊस जरा कमी झाला होता.
देवळात आल्यावर लगेच सँडवीचची तयारी केली, सँडवीचं हादड्ली आणि निघालो.


१० मिनीटात गाडीपाशी आलो. कोरड्या कपड्यांचा सेट गाडीतच ठेवला होता म्हणुन बरं. कपडे बदलले, खांडस गावातच चहा प्यायला आणि साधारण ४.१५ च्या सुमारास निघालो ते ६.४५ ला ठाण्याला परत आलो.
अशारितीने बरेच दिवसांपासुन मनात असलेल्या पदराला हात लावुन झाला, पण एखादी कलावंतीण दिसेल असे वाटलं होतं ती काही दिसली नाही. असो.
बज्जु
ईराण - पिस्ते, आमीताब बाछ्छान आणी मोहिनी - भाग १
पर्शिया ह्या शब्दाशी माझा संबंध याआधी फक्त दोन वेळा आला होता, पर्शियन मांजर आणि प्रिन्स ऑफ पर्शिया हा संगणक खेळ. त्यावेळी अजिबात वाटले नव्हते कि या नावाचा देश अस्तित्वात असू शकेल.
काही दिवसांपूर्वी ईराणला प्रवचन देण्याची सुपारी आल्यावर गडबडलो.. ईराण विशयी माझ्या ईष्ट (आणि अनिष्टही) मित्रांकडुन बरेच ऐकुन होतो, त्यावरून ह देश म्हणजे अगदिच हा.. आहे आसे वाटले होते.
आता हा देश जगाच्या पाठिवर कुठे आहे ते शोधण्यापासून सुरूवात, आता सुपारी घेतलिये म्हणल्यावर वि़ज़ा वगैरे लफडि आली,तो घेउन.(ईराणी वि :? ज़ा विषयी नंतर कधितरी सांगेन) राजधानी तेहरान मधे उतरलो (तिकिट मिळे पर्यन्त मी ईराणची राजधानी पर्शिया समजत होतो.) फक्त रात्री २ वाजता.(चाल - गावडेवाडीचा पत्ता, वार्यावरची वरात)
ईमाम खोमेनी (हा ईसम जिवन्त आहे का हो? ) विमानतळावर असंख्य प्रश्नांनी वेढलेल्या अवस्थेत उतरलो (त्यातील पोटापाण्याचा प्रश्न जास्त जहाल) आणि माझ्या स्वागतला येणार असलेल्या चालकाला शोधु लागलो (हा आणखी एक प्रश्न, कारण आमचे अॅडमिनमामा, प्रत्येक शहरात तुम्हाला अगदि वाजतगाजत न्यायचि सोय केली आहे असे तोंड भरुन आश्वासन देतात (त्याच्या बापाचे काय जातय,प्रत्यक्षात लीफ्ट मागुन हॉटेल शोधायला जावे लागते))
त्या बिचारया चालकाने हातात नामफलक धरलेला असुनही मी येडबंबुसारखा त्याच्याकडे न बघता सगळा एअरपोर्ट शोधुन काढला. शेवटी तोच कीव येउन सामोरा आला( जीव भांड्यात पडल्याचा आवाज येतो का हो. :? ) आणी त्यानंतर आमचा संवाद असा.. फक्त रात्री २ वाजता
मी: फ्रॉम अबकड कंपनि?
चालक: सालाम (सलाम चा ईतका गोड उच्चार नवीन होता)(च्यायची.. हा अवसर्ग कसा देतात.)
मी: आय अॅम फ्रॉम पफबभ कंपनी
चालक: सालाम
मी: बोंबला
चालक: हॉटेल?
मी: आर वी गोइन्ग स्ट्रैट टू द हॉटेल?
चालक:... क ख ग ची अगम्य भाषा (ऐकायला चांगल वाटत होते पण त्याने पोट भरत असते तर नोकरी कशाला केली असती)
मी: हॉटेल? हॉटेल? X(
चालक: हॉठेल
मी: विल आय बि एबल टू ऑर्डर माय डीनर अॅट धिस अवर?
चालक: क ख ग.. (स्वगत : आयला हे अवघडच होत चाल्लाय)
मी: फूड, डीनर, ईट.. (हातवारे पण करून सम्पले thinking )
चालक: क ख ग.. (आणी तो माझी बॅग उचलून चालायला लागला, मी संपलोच )
मी: ईग्लिश?
चालक: नो ईन्ग्लिश.. पर्शियन?
मी: झक मारली अन विचारले ह्याला. (पोटाचा प्रश्न बिकट होत चाल्लाय)
चालक: हॉटेल (गपगुमान गाडीत जाउन बसलो,आणी गार वारं अंगावर घेत, थंड डोक्याने जेवण मिळवण्याचा कट रचायला लागलो )
मी: यू? तेहेरान?
चालक:... ( होकारार्थी काहितरी अगम्य )
मी: आय अॅम फ्रॉम ईंडीया.. ईंडीया..
चालक: ईंडीया.. ईंडीया.. हीदुस्थान? हीदुस्थान? ( हे त्याच्याच शब्दात) (त्याला अत्यानंद, माझा गोंधळ)
मी: येस हीदुस्थान (हुश्श्श्श्श्श्श्श्श)
चालक: सेंटर ईंडीया डेल्लि न्यु..? (त्याने हे ३ वेळा विचारले, बहुतेक माझी परीक्षा घेत असावा. नन्तर उजेड पडला - भारताची राजधानी नवी दिल्ली )
मी: येस येस.. सेंटर ईंडीया डेल्लि न्युच (संवाद तर होतोय ना..)
चालक: हीदुस्थान.. मूव्हि.. आमीताब बाछ्छान.. (युरेका युरेका .. मी सिटवरून केवळ सिटबेल्टमुळे पडतापडता वाचलो)
मी: येस येस आमीताब बाछ्छान.. मुव्हिज..
आणी त्यानंतर त्या चालकाने माझे हॉटेल शोधून देउन, त्या हॉटेलच्या मॅनेजरला माझ्या जेवणाविषयी सांगुन, मला जेवताना आग्रह करुन, मला रूममधे सोडुन, सकाळी लवकर न्यायला येतो हे सांगून बिचारा रात्री ३:४५ ला मार्गाला लागला (मला सारखी शंका येत होती की हा मलाच अमिताभ समजला का काय?)
क्रमशः
उन्हेरे - गरम पाण्याचे झरे
उन्हेरे - गरम पाण्याचे झरे
सर्व ऋतुंमध्ये सर्वकाळ स्नानासाठी गरम पाण्याची योजना नियतीने उन्हेरे या गावी केली आहे. उन्हेरे हे गाव पाली (अष्टविनायक बल्लाळेश्वर- ता. सुघागड, जि. रायगड) येथून उत्तरेस २ किमी अंतरावर आहे.

छायाचित्र १: उन्हेरे येथे जाण्यासाठी मार्गदर्शन

छायाचित्र २: पाली येथील सरसगड
श्रीरामाने बाण मारून सितामाईस स्नानासाठी हे स्थान तयार केले अशी पुराणात अख्याईका आहे.
उन्हेरे या गावाजवळील या गंधकमिश्रीत कुंडात स्नान केल्यास त्वचेचे विकार व वाताचे विकार बरे होतात. येथे गरम पाण्याच्या झर्यांचे कुंड बांधण्यात आलेले आहेते.
एकुण तीन कुंडे आहेत. त्यापैकी एक स्रीयांसाठी, एक पुरूषांसाठी आहे.

छायाचित्र ३: उन्हेरे येथील गरम पाण्याची कुंडे
या दोन्ही कुंडातील पाण्याचे तापमान आपल्या त्वचेला सुसह्य इतके आहे. तिसर्या कुंडाचे तापमान मात्र जास्त आहे. कुंडाच्या तळाशी आशानी लाकडाच्या फळ्या टाकल्या आहेत. त्यावर उभे राहून स्नान करता येते.

छायाचित्र ४: उन्हेरे येथील गरम पाण्याची कुंडे

छायाचित्र ५: उन्हेरे येथील गरम पाण्याची कुंडे
स्नान करतांना साबण लावणे, चुळ भरणे, कपडे धुणे, पोहणे आदी प्रकार टाळावेत. हे पाणी पिऊ नये.

छायाचित्र ६:
या पाण्यात जास्त वेळ थांबल्यास चक्कर येवू शकते. भुगर्भातील लाव्हारसामुळे खडक तापतात. त्याच्या संपर्कामुळे पाणीही तापते. त्यात गंधक आदी क्षार मिसळतात व ते पाणी खडकांच्या फटीतून बाहेर पडते. हेच गरम पाण्याचे झरे असतात.
उन्हेरे कुंडाचा परीसर अनेक सामाजीक राजकिय चळवळींचा साक्षीदार आहे. स्वातंत्रपुर्व काळात मो. कृ. देवधर यांचे अध्यक्षतेखाली हरिजन परिषद झाली होती. अनेक परिषदा, सभा या स्थानी झाल्या होत्या. दुसर्या महायुद्धात ब्रिटीशांना मदत करू नये अशा अर्थाचे भाषण बापूसाहेब लिमये यांनी याठिकाणाहून केल्याने त्यांना शिक्षा झाली होती. ताकई येथील विठोबाची यात्रा संपली की येथे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला येथे यात्रा भरते. सुकी मासळी व घोंगड्या हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे.
सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने कुंडात आंघोळ करणार्यांना एक भावनिक आवाहन: -
ही धारोष्ण गंगा आहे!
साबण लावून, कपडे धुवून,
या गंगेला मलीन करू नका!!
(संदर्भ: पाली तालुक्याचा इतिहास : लेखक: सुरेश पोतदार)
बाकी आमची कलाकारी:

छायाचित्र ७

छायाचित्र ८

छायाचित्र ९

छायाचित्र १०

छायाचित्र ११:
वरील छायाचित्रे (क्र. ७ ते ११) कुंडातल्या पाण्यातून घेतलेली आहेत.
मांडवगण -जि. नगर, ता. श्रीगोन्दा. (फोटो लिन्क सहित)
माझं गाव मांडवगण...जिल्हा - नगर... नगरमधल गाव म्हंटल्यावर दुष्काळी हे विशेषण आलंच...मला माझ्या लहानपणचं गाव आठवतंय...बर्यापैकी पाऊस पडत असे पावसाळ्यात...छान वाटायचं...अगदी हिरवळ वगैरेसुद्धा तयार व्हायची...अटाक्षा कटाक्षाला चांगले कंबरभर पाणी असायचे...मी तर पूर आलेलासुद्धा पहिला आहे...तर गावाबाहेर या नद्या...नदीच्या पलीकडे आमची शाळा...जमिनीवर बसायचं...अगदीच टोचतंय असं वाटलं तर पोतं न्यायचं...पण हे फक्त ३रि - ४थि पर्यंतच...नंतर बसायला बाक वगैरे असायचे...पास नापास सुद्धा अंगणात सगळ्या वर्गाना बसवून मग एक एक करत निकाल ऐकवले जायचे...अगदीच धोंडा असेल तर नापास व्हायचा नाहीतर शक्यतो सगळे पासच असायचे...पहिला - दुसरा नंबरसुद्धा सांगायच्या बाई...
शाळेत जाताना डावीकडे गढीआईच मंदिर....हे एक प्राचीन मंदिर आहे...सगळं बांधकाम दगडी..मूर्तीसुद्धा प्राचीन...पण त्याची किंमत न समजल्यामुळे उपेक्षित...या गावाची आख्यायिका आहे...सांगते...प्राचीन काळी इथे मांडव ऋषी राहायचे...त्यांनी इथे बराच काळ घालवला...जेव्हा ते इथून पुढच्या जागी जायला निघाले तेव्हा कसलातरी आवाज आला म्हणून त्यांनी मागे वळून पहिले तर आजूबाजूच्या झाडांनी देखील मागे वळून पहिले आणि त्यांचे बुंधे तसेच राहिले...हि झाडे सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ बघायला मिळतात...तर या मांडव ऋषीच्या निवासाने पवित्र झालेला भाग म्हणजे मांडवगण...
सिद्धेश्वर मंदिर....हे सुद्धा एक प्राचीन मंदिर आहे...जुने बांधकाम....मंदिराचा परिसर प्रचंड मोठा आहे...एका मोठ्या कमानीपासून आत समोरच एका भल्यामोठ्या हनुमानाच्या मूर्तीचे मंदिर आहे...इथून खाली चालले कि एक पावसाळ्यात वाहणारी म्हणून नदी म्हणायचे असा ओढा आहे...तो ओलांडून पुढे गेले कि २-३ मिनिट चालल्यावर अगदी हत्ती जातील अशा प्रचंड मोठ्या आणि रुंद पायऱ्या आहेत...त्या चढून सिद्धेश्वरला जायचे....मधेच एका उजव्या बाजूला मोठ्या वडाखाली मुसलमानाचा दर्गा आहे...पुढे चालत राहायचे....दोन्ही बाजूला मोकळी जागा...भन्नाट वारा साथीला...मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या थोडेसे आधी उजव्या बाजूला एका छोट्या टेकडावर गंगेचे असे समजले जाणारे स्थान आहे....एका छोट्या दगडी खोलीत पायऱ्या उतरून गेले कि काळोखात खाली थोडेसे पाणी असते...वटवाघळे इथेच बघायला मिळतात...मंदिरात शिरताना एका मारुतीचे छोटेसे मंदिर आहे ....मारुतीला वंदन करून आत गेले कि .मोठीच्या मोठी दीपमाळ आपले स्वागत करते...आत जाताना आपल्याला एक बुटका आडवा दगडी खांब ओलांडून म्हणजे त्याखालून वाकून जावे लागते...देवासमोर नतमस्तक व्हायचे याची जाणीव करण्यासाठी असेल...सगळ्या भिंतीला लागून मोठेच्या मोठे उघड्यावरचे चौथरे आहेत....दीपमाळेच्या डाव्या बाजूने पायऱ्या उतरल्या कि मंदिराच्या मागच्या बाजूला जाता येते... सगळे बांधकाम दगडी आहे...खुद्द पिंडसुद्धा प्राचीन आहे...दीपमाळ ओलांडून गेले कि मोठा दरवाजा लागतो...जुना दरवाजा...त्यावर चौकोन चौकोन कोरून त्यामध्ये मोठमोठ्या कड्या लावलेल्या आहेत...तो ओलांडला कि लगेचच वरती मोठी घंटा आणि डाव्या आणि उजव्या बाजूला साधारण पाच साडेपाच फुट उंचीचे दगडी कट्टे...त्यावर नगारा ठेवलेला असे...आता बहुतेक नाही...रोज सकाळी हा नगारा वाजविण्यात यायचा...तसेच एका बाजूला एक मोठी तोफ आहे...कारण माहिती नाही...दारापासून ३-४ फुटांवर कासव...मग लगेच समोर एक छोटी दीपमाळ...नवीन बांधलेली असावी....त्याच्या उजवीकडे एक मोठी पण जुनी दीपमाळ...त्याभोवती कट्टा....त्यासमोरून वेगवेगळ्या छोट्या मंदिरांना सुरुवात होते...इथेही सगळे बांधकाम आणि मुर्त्या प्राचीन आहेत...मुख्य मंदिराच्या भोवती ५-७ वेगवेगळ्या देवी आणि देवतांची छोटी मंदिर आहेत....या दीपमाळेच्या समोरच्या मंदिरामागे एक यज्ञकुंड आहे...तिथे बरेचसे यज्ञ होतात...त्यापुढे थोडेसे गेले कि मोठ्ठा पिंपळ आहे आणि त्याखाली एक लहानसा नाला असा बांधलेला आहे....सिद्धेश्वरला आंघोळ घातली कि ते तीर्थ म्हणून येथे येते...थेंबभर तोंडात घ्यायचे....यज्ञवेदीच्या समोर १२ एक फुटांवर एक छानसे पांढऱ्या सुवासिक नरसाळ्याच्या आकाराच्या फुलांचे झाड आहे...त्याच्या फांद्या खूपच नाजूक असतात...झाडच नाव विसरले...
तर मुख्य मंदिरात आल्यानंतर जी छोटी दीपमाळ आहे तिच्यापासून लगेचच आतमध्ये मोठा थोरला नंदी पिंडीचे रक्षण करत बसलेला आहे....पोरांनी त्यावर सारखे चढू नये म्हणून बहुतेक त्याभोवती सळ्यांचा चौकोनी पिंजरा बांधलेला आहे....अर्थातच नंदी ४ एक फुट उंच चौथऱ्यावर आहे...या चौथऱ्यावर लोकांना ऐसपैस बसता येईल अशी भरपूर जागा आहे....इथून आत दोन्ही बाजूना लगेचच खांबांची रांग सुरु होते आणि प्रत्येक खांबावर एक मोठा आरसा आहे आणि वेगवेगळ्या देवांचे मोठे फोटो आहेत...गाभार्यात प्रवेश करण्याआधी परत एक दार ओलांडावे लागते...त्याच्या उजव्या बाजूला भिंतीत कोरलेला असा मारुती हातावर द्रोणागिरी घेऊन उडत आहे...गाभाऱ्यात जातानाचे दार ओलांडले कि आत अंधार असून दोन एक ठिकाणी समया आपला उजेड देत असतात...मध्यभागी एक मोठे काळया कुळकुळीत पाषाणाचे कासव आहे...हे सुद्धा प्राचीन काम....त्याला हळद कुंकू वाहून ७-८ फुट पुढे गेले कि गाभारा....एखादा दिवा तेवत असतो...पूर्ण शांतता...थंडगार वातावरण...फक्त पिंड आणि आपण...मनाला एकप्रकारची शांतता मिळते...म्हणजे मलातरी मिळते....या ठिकाणी आलं कि फक्त आहे तो क्षण याची आणि पिंडीची जाणीव असते...
तसेच उलट्या पावलांनी मागे यायचे कासवापर्यंत....आणि मग गाभार्यातून बाहेर...मन प्रसन्न होऊन जाते...
नंदीच्या डाव्या बाजूला मोठा १०-१२ फुट चौथरा बांधलेला आहे...कशासाठी काही माहिती नाही...त्यावर जायचे तर शिडी लावूनच जावे लागते....तर या मंदिराच्या चहुबाजूला एकसंध असे ४-५ फुट उंचीचे चौथरे आहेत जिथे निमित्ताने गाव जेवणे वगैरे कार्यक्रम होत असतात...किंवा असत म्हणावे लागेल...आताची परिस्थिती माहित नाही...यातील एका चौथार्यालाच भिंत वगैरे बांधून गुरवाची त्याच्या कुटुंबासहित राहायची सोय केलेली आहे....या मोठ्या चौथर्यापासून जरा उजवीकडे वळून थोडे पुढे गेले कि एक मोठे दार येते...या बाजूने बऱ्याच पायऱ्या खाली उतरल्यावर एक भले मोठे पाण्याचे कुंड लागते...ते बरेच खोल आहे आणि त्यातले पाणी कायम हिरवट असते...शेवाळ साचून साचून....याप्रकारच्या कुंडाला काहीतरी नाव आहे ते मी विसरले...बहुतेक बारव म्हणत असावेत...या कुणाच्या अलीकडेच एक गंगेची छोटी जागा आहे....असे म्हणतात कि तिथे गंगा येते...इथे जायला चिंचोळ्या पायऱ्या उतरून खाली जावे लागते...खाली एक छोटी खोली सारखे आहे तिथे कायम पाणी असते...पावसाळ्यात पाणी थोडे वर चढून पायरीपर्यंत येते....मला इथे जायला कायम भीती वाटते...तर या मागील भागात भरपूर चिंचेची झाडे आहेत...नेहमी इथे सावली असते...या मागच्या बाजूकडून गावाचा एक भाग ज्याला पेठ म्हणतात तिकडे जायचा रस्ता आहे....आजूबाजूला सगळे जंगल...वरती सांगितलेली मागे वळून पाहणारी झाडे देखील याच भागात आहेत....त्या झाडांजवळ अजून काही छोटी छोटी मंदिरे आहेत...इथेच हिंदू स्मशानभूमी आहे...कदाचित म्हणूनच अजून एक छोटेसे शिवाचे मंदिर आहे...
सिद्धेश्वर आणि हि झाडे आणि मंदिरे यामध्ये एक छोटी नदी वाहते...म्हणजे पावसाळ्यात तिथून पाणी वाहत असते...बाकी एरवी खडखडाट....गावच्या बायका इथे भांडी घासायला आणि धुणी धुवायला येतात...तर असे हे माझे प्राचीन स्थळे मिरवणारे गाव....मांडवगण...दुर्लक्ष आणि प्राचीन वस्तू आणि ठिकाणाबद्दलच्या अनास्थेमुळे कोणालाही दखल न घ्यावेसे वाटलेले गाव...पण आता असे ऐकून आहे कि एका मोठ्या बिल्डरने इथे बांधकाम सुरु केले आहे...कदाचित जग जवळ आल्यामुळे प्राचीन मंदिरे जतन करण्याची आणि त्यापेक्षाही कॅश करण्याची जागरूकता आली असेल....मध्ये ४-५ वर्षापूर्वी गावाच्या नव्या नेतृत्वाने म्हणे गाभार्याच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतून मंदिर विरूप केले....गावातील प्रतिष्ठित मंडळीनी आक्षेप घेऊन ते थांबविले....तर तुम्हाला जमेल तेव्हा इथे भेट जरूर द्या....खात्रीने सांगते कि तुम्हाला पश्चाताप होणार नाही...अहमदनगरपासून साधारण ४५मि. ते एक तासाच्या अंतरावर हे गाव आहे....नगरलाच रहा...इथे गैरसोय होईल.







































