एक वाद्य, तीन पिढ्या आणि दोन संगीतसंस्कृतीचे सीमोल्लंघन
नोव्हेंबर आला कीं थंडीची चाहूल लागते आणि चित्तवृत्तीला बहर येतो. पर्यटन, परिषदा, प्रदर्शने, महोत्सव, संगीत समारोह वगैरेंच्या आठवणी मनांत रुंजी घालूं लागतात. वयानुसार फारसे कुठे जाणेयेणे होत नाहीं. आधुनिक तंत्रज्ञानाने संगणक, महाजाल, यू-ट्यूब वगैरे साधनांचा सुंदर नजराणा दिला आणि आकाश ठेंगणे झाले. जाणेयेणे नगण्य झाले तरी महाजालावरची मुशाफरी मात्र अगदी आरामखुर्चीत बसून पण करतां येते. लांबलचक घनघोर पावसाळ्यात चुकला फकीर मशिदीत तसा चुकला सुधीर यू-ट्यूबवर सापडायला लागला. वाट फुटेल तिथें फिरतांना अचानक एखादे अप्रतिम निसर्गदृश्य दिसावे तसे कधीकधी अनमोल रत्नें कानीं पडतात.