टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
नाट्य
मराठी नाटक बंगालीत ..
प्रेषक अभिरत भिरभि-या ( शुक्र, ०७/०४/२००८ - १९:४९) .मराठी नाटक देश पातळीवर पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. आपल्या मराठी नाटकांचे अनुवाद, पुनर्प्रयोग इतर भाषांमधे ही होताना दिसतात.शिरिष आठवल्यांचे एक नाटक नुकतेच बंगाली रंगमंचावर सादर झाले. देश नामक एका आघाडीच्या बंगाली मासिकाने यावर नुकताच परिक्षणात्मक लेखही छापला.मि.पा. च्या वाचकांसाठी त्याचा गोषवारा
मुळ लेखक: सुब्रतो घोष .
मानुषेर समान मानुष
बंगाली नाट्यविश्वात असे कित्येक 'दल' आहेत जे भलेही डामडौलात नसले तरी मोठ्या कष्टाने बंगाली नाटक जोपासताहेत. गांधार असेच एक दल.गेल्या शेहचाळिस वर्षात त्यंनी तेवीस एक नाटके मंचस्थ केलीत.अर्थात ते केवळ नाटकांच्या संख्येलाच नव्हे तर दर्जालाही महत्व देतात हे जाणवते.यंदाचे नाटक आहे शिरिष आठवल्यांच्ये मराठी नाटक 'मित्र'; ज्याचा विजयालक्ष्मी बर्मन यांच्या सहयोगाने काछेर मानुष' ( जवळचा माणूस) या नावाने बंगाली अनुवाद केलाय कमल सान्याल यांनी.
वर्ण वा जातीच्या आधारावरची विभागणी माणसाला माणसापासुन तोडू शकत नाही हि गोष्ट हे नाटक पुन्हा सांगु पाहते. ज्या बाबी समाजाला मागे रेटु बघतात त्यात मुख्य असते ही जातीपातीची मानसिकता.याचा उत्तर व पश्चिम भारतातला चेहरा इतका भेसुर की सहज ओळखला जावा. पण या तथाकथित पुरोगामी राज्यात - प. बंगाल मधे - हा चेहरा इतका भिन्न की ओळखु येण्यास उशिर व्हावा.नाटकात शिरिष आठवल्यांचे मराठी वातावरण जरी कायम असले तरी नाटकच्या शेवटी वाटते की नाटककाराला जे सांगायचेय ते ह्या राज्याच्या राजकीय/सामाजिक किंवा आर्थिक परिस्थितीसही पुरेपुर लागु आहे.
दादासाहेब पुरोहित संस्कारांमुळे कट्टर दलितविरोधी परंतु घटनाचक्रामुळे या विधुर गृहस्थाच्या
शारिरीक पंगु अवस्थेतून सोडवणुक करण्यासाठी येते सावित्रीबाई रुपवते नावाची दलित वर्गातील बाई.ददासाहेबांची मुलेबाळे आपापल्या नोकरीधंद्याच्या जागी असतात आणि तेथुनच पित्याची विचारपुस करत असतात. प्रारम्भी जात्याभिमानी दादासाहेब सावित्रीबाईंस काही एक दाद देत नाहीत. दुसरीकडे कामावर निष्ठा असलेली ही स्वाभिमानी बाई - जी स्वत:ला मिसेस रुपवते म्हणूनच ओळखु इच्छिते - कर्तव्यात काडीमात्र कसुर न करता रोग्यास बरे करण्याच्या मागे लागते. दादासाहेब जसजसे ठीक होऊ लागतात मि. रुपवतेंवरचे त्यांचे अवलम्बन वाढत जाते.मुलगी मैत्रेयी जेव्हा दादासाहेबांच्या इच्छेविरुद्ध स्वत:जवळ परदेशी नेऊ बघते तेव्हा दादासाहेब तिला स्वत:च्या इच्छाशक्तीच्या व मि. रुपवतेंच्या सुश्रुषेच्या बळावर खडखडीत बरे होऊन सिद्ध करतात की मुलीपाशी जायचे आता कोणतेही कारण नाही. दादासाहेबांना केवळ शारिरिक जोखडातुनच नव्हे तर जातीच्या खोट्या अभिमानातुनही मुक्ती मिळते
ही कहाणी सरळ सोप्या पद्धतीने सांगितली आहे. नाटककार कोणताही आडपडदा न ठेवता मुळ विषय प्रेक्षकांसमोर ठेवला आहे. सारे नाटक घडते ते दादासाहेबांच्या दिवाणखान्यात व स्वयंपाकघरात. दादासाहेबांचे एकाकीपण यामुळे प्रेक्षकांपर्यन्त पोहचते.
लेखाच्या उर्वरित भागात नेपथ्य / अभिनय वगैरे अंगांवर टीकाटिप्पणी आहे. भाषांतर करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. अनुवाद कृत्रिम वाटल्यास जरुर सांगावे.
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष
प्रेषक भडकमकर मास्तर ( मंगळ, ०७/०१/२००८ - १५:४६) .एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग दुसरा : प्रमुख व्यक्तिरेखा
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष
आता एक गोष्ट बघू...
एक मुलगा सकाळी उठून शाळेत जातो , त्याचा रिझल्ट कळतो, त्याला शाळेत पहिला आल्याबद्दल बक्षीस मिळतं आणि तो आनंदानं घरी येतो.
ओके..गोष्ट बरी आहे, पण मला त्यातून का मजा येत नाही?
त्यात अजिबात संघर्ष नाही...
शाळेत पहिला आला नाही तर काय होईल ते कळत नाही...
व्हॉट इज ऍट स्टेक? काय पणाला लागलंय?
एका दुसर्या मुलाने खूप स्पर्धा निर्माण केली आहे आणि पहिला नंबर येणार्या मुलाला दिल्लीला विज्ञान प्रदर्शनात थेट जायला मिळणार आहे...
किंवा त्याला वडिलांनी कबूल केलं आहे की पहिला आलास तर या वर्षी सगळे सिंगापूरला जाऊ.
किंवा तो नेहमी पहिला येतो पण या परीक्षेच्या वेळी त्याचे वडील खूप आजारी होते आणि त्याने पहिलं यावं अशी त्यांची शेवटची इच्छा होती...ते त्याला पूर्ण करायलाच हवी..
ही झाली प्रेरणा...ध्येय म्हणजे नातेसंबंध टिकवणे,स्वाभिमान जपणे ...अडचणी म्हणजे तीव्र स्पर्धा, वडील आजारी, पेपर अवघड निघणे वगैरे...पहिला नंबर आणणे ही झाली कृती...
______________________
कोणत्याही गोष्टीसाठी सर्वात महत्त्वाचा भाग... संघर्ष नसला तर कोणतीही गोष्ट रटाळ, कंटाळवाणी होणार..
उदा.
i] एखादं पात्र गरज नसताना, कोणीही विचारलं नसताना त्याच्या आयुष्याबद्दल माहिती देत राहतं..
ii]स्थलकाल, इतिहास, निसर्ग याबद्दल अति माहिती देणं.. लेखकाचं जास्त संशोधन झालं असलं की त्याला ते सारं गोष्टीत आणावंसं वाटतं.
iii]गरज नसताना नवनवीन पात्रं फ़क्त विनोदनिर्मितीसाठी आणली जातात, अशाचा जाम कंटाळा येतो.
या चुका कशा सुधाराव्यात?
i]पात्रांची माहितीसुद्धा संघर्षातूनच मिळावी. ( उदा.एखादं पात्र आरोप करतंय, प्रश्न विचारतंय आणि दुसरं पात्र काहीतरी लपवालपवी करतंय, त्यातून होणार्या संघर्षातून पात्रांची माहिती मिळावी)..
ii]वाचकाला किंवा प्रेक्षकाला समोर घडणार्या घटनांसंदर्भातच रिलेव्हंट माहिती अपेक्षित असते, उगाच ऐतिहासिक , नसर्गिक गोष्टींच्या खोलात शिरण्याची गरज नाही.
iii]पात्रांची संख्या मर्यादित असूद्या., एखाद्या प्रसंगामुळे / दृश्यामुळे / व्यक्तिरेखांमुळे मुख्य पात्रांच्या नातेसंबंधांमध्ये काहीही बदल होत नसेल, तर मुख्य थीमशी संबंधित नसलेले अनावश्यक प्रसंग सरळ निर्दयपणे कापून टाकलेले उत्तम.
संघर्षाचे काही प्रकार
आंतरिक संघर्ष : इच्छा, हक्क आणि कर्तव्य यासंदर्भात
मनातलाच बर्यावाईटाचा संघर्ष
बर्याचदा हा संस्कारासंदर्भात असतो.
बाह्य संघर्ष : व्यक्ती आणि नातेसंबंधातला संघर्ष
पठडीतला हीरो आणि व्हिलन यांच्यातला संघर्ष
समाजामधले इतर संघर्ष : व्यावसायिक / राजकीय / जातीय / धार्मिक
___________________________________________________
आणखी एक वेगळ्या प्रकारचे वर्गीकरण मी ऐकले ..त्यावरून माझ्या आवडत्या सिनेमामधली थेट उदाहरणेच देतो..
१. शक्ती... ..दिलिपकुमार आणि अमिताभ यांच्यात आंतरिक संघर्ष ...वडील आणि मुलगा दोघे प्रोटॆगनिस्टच पण त्यांच्यातला संघर्ष अधिक गडद. आणि बाह्य संघर्ष तो (अमिताभ + दिलिपकुमार) आणि अमरीश पुरी यांच्यात. इथे अमरीश ऎंटागनिस्ट...साधारणपणे ऎंटागनिस्ट बाह्य संघर्षाचे कारण असतो..आणि अमिताभच्या मनातले द्वंद्व म्हणजे अंतर्गत आंतरिक संघर्ष...!!?
२. सरफ़रोश : पोलीस ऒफ़िसर आणि आतिरेकी यांच्यातला बाह्य संघर्ष पण अजय राठोड आणि सलीम यांच्यातला आंतरिक संघर्ष
...आणि या आतिरेकी कटाचा सूत्रधार अजय राठोडच्या ओळखीचा पाकिस्तानी गायक असणं, ही वाढती गुंतागुंत आणि शेवटी याला मारू की नको असा अजय राठोडचा अंतर्गत आंतरिक संघर्ष !!!?
३. मला अजिबात न आवडलेला सिनेमा ... मैं प्रेम की दीवानी हूं... ( हाहाहाहाहा) .....
राजश्री फ़िल्म्स च्या साधारणपणे सगळ्याच फ़िल्म्समध्ये संघर्षच आधी खूप कमी... सगळं गोग्गोड... बरं असलाच तर कोणीतरी आजारी पडतं, अपघात होतो,पत्र उशीरा मिळतं आणि गैरसमज होतो असला नियतीवर आधारलेला योगायोगी बाह्य संघर्ष... त्यात अगदीच दम नसतो असं माझं वैयक्तिक मत.
४. काही आंतरधर्मीय विवाहाचे सिनेमे... यात पोरांचे आई-बाप अगदी ऎंटागनिस्ट दाखवले जातात बर्याचदा... मग त्यामुळे तेच बाह्य संघर्ष आहेत असे वाटायला लागते, मग शेवटी ते यांना माफ़ वगैरे करतात हे पचनी पडत नाही... त्यासाठी आधीच आईबापांचा विरोध हा आंतरिक संघर्ष मानला पाहिजे , आणि सामाजिक परिस्थितीचा त्यांच्यावरचा दबाव हा बाह्य संघर्ष..
संघर्ष कसा वाढवावा?
नुसतंच टोमणे मारणं, किरकिर करत भांडणं म्हणजे संघर्ष नव्हे..त्यातून काहीही बदल घडत नाही. प्रोटॆगोनिस्टच्या अडचणी व संकटं वाढवत नेणारा, त्याला अधिकाधिक संकटात पाडणारा संघर्ष हवा.त्यासाठी व्यक्तिरेखांवर दबाव वाढत जायला हवा..
काय पणाला लागलंय? ध्येय गाठलं नाही तर काय संकट येणार आहे हे ठरणं महत्त्वाचं..
आयुष्य, प्रेम, संपत्ती, आरोग्य, स्वाभिमान जेव्हा यावरच संकट कोसळतं तेव्हा मग मुख्य पात्र निकराने झगडतं... आपलं ( प्रेमाईसनं ठरवलेलं ) ध्येय गाठण्यासाठी अविश्रांत मेहनत करतं...
आणि या संघर्षातूनच त्याच्यात मोठा बदल घडतो आणि त्यातूनच ते पात्र धडा शिकतं... ( हेच ते तात्पर्य / कथाबीज)
हीरोला अधिकाधिक अडचणीत आणण्यासाठी मुख्य गोष्टीमध्ये काही उपकथानकं ( सबप्लॊट्स) तयार करता येतात.
परंतु ही उपकथानकं मुख्य गोष्टीला विरोध करणारी किंवा पाठिंबा देणारी किंवा त्यासाठी वाचकाला तयार करणारी म्हणजेच संबंधित हवीत.. उदा. खूनी शोधायच्या कथेत डिटेक्टिव्ह हीरो खुनी स्त्रीच्या प्रेमात पडला की गुंतागुंत झालीच.
संघर्ष वाढवण्यासाठी आवश्यक असलेले प्लॊट मोटिव्हेटर्स.
सूड, संकट,पाठलाग, द्वेष,प्रेम,दु:ख, वियोग, बंडखोरी, फ़सवणूक,स्वार्थत्याग, छळ, स्पर्धा, संशोधन,महत्त्वाकांक्षा, सर्व्हायव्हल.
प्रेरणा ध्येय अडचणी कृती
संघर्ष गडद करण्यासाठी प्रेरणा ध्येय अडचणी कृती या गोष्टी सतत चढत्या भाजणीने घडाव्या लागतात.
आता हे एक वाक्य बघू... (सुनील शेट्टी / सनी देओल यांच्या सिनेमात नेहमी असणारी परिस्थिती)
आपल्या वडिलांवरील चोरीचा आळ घालवण्यासाठी अर्जुनला एका साक्षीदाराला घेऊन न्यायालयात वेळेवर पोचणं आवश्यक आहे, हे माहित असल्याने राणाठाकूर आपल्या गुंडांना अर्जुनला अडवायला पाठवतो, अर्जुनला हे आधीच कळल्याने तो त्यातल्या काहींना गुंगारा देतो आणि न्यायालयाबाहेर उरलेल्यांशी तुफ़ान हाणामारी करून साक्षीदाराला न्यायालयात वेळेत पोचवतो आणि वडिलांना वाचवतो... .
आता या वाक्याचे तुकडे पाडू...
प्रेरणा : वडिलांवरील चोरीचा आळ घालवण्यासाठी
ध्येय : साक्षीदाराला घेऊन न्यायालयात वेळेवर पोचणं आवश्यक
अडचणी : गुंडांना अर्जुनला अडवायला पाठवतो
कृती : गुंगारा आणि हाणामारी
motivation goal obstacles action या गोष्टी योग्य क्रमाने घडत राहिल्या की व्यक्तिरेखासुद्धा फ़ुलतात, संघर्ष उत्कर्षबिंदूला पोचतो...
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग दुसरा : प्रमुख व्यक्तिरेखा
प्रेषक भडकमकर मास्तर ( मंगळ, ०७/०१/२००८ - ०९:४९) .एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग दुसरा : प्रमुख व्यक्तिरेखा
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष
व्यक्तिरेखन
कोणत्याही नाटकातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट.. नुसते संवाद उत्तम असून उपयोग नाही, ज्या माणसांची ही कथा आहे, ती माणसं खरी हवीत.
कमी पात्रांच्या चेकॊव्हच्या एकांकिका, दिवाकरांच्या नाट्यछटा यातून अत्यंत कमी वेळात व्यक्तिरेखा डोळ्यांपुढे उभ्या राहतात.
तेंडुलकरांनी खास दिलेली उदाहरणे...
१. क्रॅश सिनेमामध्ये ( आधीच्या दृश्यात वंशभेद करणारा ) गोरा इन्स्पेक्टर वडिलांच्या आजाराने गांजलेला आहे, तो अगतिकपणे वडिलांसाठी हॊस्पिटलमध्ये भांडतो आहे....माणूस प्रत्येक वेळी पूर्ण दुष्ट / सुष्ट नसतो, ते एक मिश्रण असते, याचे उत्तम उदाहरण.... त्यामुळे तो माणूस म्हणून जास्त खरा भासतो.
२.मिस्टर ऎंड मिसेस अय्यर या सिनेमातील बसमधील पात्रे..कमी वेळात व्यक्तिरेखा सुस्पष्ट....
भावना :
प्रत्येक माणसाला कशासाठीतरी असुरक्षित वाटत असतं आणि स्वत:चं महत्त्व वाढावं असं वाटत असतं..( कोणी बोलून दाखवतं, कोणी नाही).
म्हणून माणूस आपल्या चुकांसाठी कोणीतरी दुसर्याला जबाबदार धरतो, आरोप करतो.... असुरक्षितता ही सर्व मानवी भावनांमधली मूलभूत भावना आहे, इतर सर्व भावना यातूनच येतात.कोणीच स्वत:वर पूर्ण समाधानी नसतो.म्हणून प्रत्येकजण आपापल्या कमीपणावर मात करण्यासाठी इतर भावनांचा आधार घेतो.
( उदा. १ प्रतिकारास असमर्थ माणसं छोट्या टीकेबद्दलसुद्धा अतिसंवेदनशील असतात
२. मोठी महत्त्वाकांक्षा कोणत्यातरी कमीपणाच्या भावनेतून येते.).
व्यक्तिरेखेला आकार देणे..
आज आहे तशी ही व्यक्तिरेखा का घडली असेल? तिचा भूतकाळ आणि वर्तमान पडताळून पाहणे हा एक इन्ट्रेस्टिंग प्रकार असतो.
कोणत्याही व्यक्तिरेखेला तीन महत्त्वाची अंगे असतात... सम्पूर्ण त्रिमितीय व्यक्तिरेखा तयार करण्यासाठी त्यांचा अभ्यास फ़ार महत्त्वाचा आहे.
१. शारीरिक
दिसणं. आरोग्य...डोळे, कांती, केस, रंग, लठ्ठ / बारीक,सुंदर / कुरूप, अपंग , बहिरा, अंध, वगैरे..
...निरोगी माणूस आजारी माणसापेक्षा वेगळी प्रतिक्रिया देतो . दिसणं हे मानसिक जडणघडणीसाठी आणि आत्मविश्वासासाठी महत्त्वाचं असतं ज्यातून न्यूनगंड किंवा अहंगंड तयार होतात.
२. सामाजिक
वातावरण.... आजूबाजूची परिस्थिती. श्रीमंती/ गरीबी / पालकांची स्थिती/शांत सुखी स्थैर्य असलेलं आयुष्य...घटस्फ़ोटित पालक, एकपालकत्व,.... मित्रपरिवार, शाळा कॊलेज, शिक्षण, आवडते अभ्यासाचे विषय, सामाजिक जीवन.. वगैरे.
३.मानसिक
पहिल्या दोनातून ही मानसिक जडणघडण होते. व्यक्तिरेखांच्या महत्त्वाकांक्षा, वैफ़ल्य,चक्रमपणा,ऎटिट्यूड, गंड यात येतात..
व्यक्तिरेखांच्या कोणत्याही कृत्याची कारणमीमांसा करण्यासाठी , मोटिव्हेशन समजण्यासाठी हे आवश्यक.
protagonist : प्रोटॆगनिस्ट
ही गोष्ट कोणाची या प्रश्नाचे उत्तर काय??
कथेतलं मुख्य पात्र...कोणत्याही कथेतला संघर्ष सुरुवातीपासून शेवटापर्यंत जी व्यक्ती (किंवा सारख्या विचारसरणीचा समुदाय) पुढे नेते , ती व्यक्ती असते प्रोटॆगनिस्ट म्हणजे रूढार्थाने गोष्टीचा नायक किंवा नायिका....)
मुख्य व्यक्तिरेखेकडे असा एखादा गुण किंवा एखादा विशिष्ट स्वभावविशेष हवा... विशिष्ट बाबतीत थोडासा चक्रम वाटणारा,शंभर टक्के अतिरेकी टोकाचा विचार हवा..त्याचा जो स्वभाव असेल, कंपल्सिव्ह ट्रेट असेल तो अगदी भन्नाट असावा...
आणि त्याच्या त्या विशिष्ट चक्रमपणामुळंच तो काही प्रसंगात संकटात अडकलाय..इथे संघर्ष सुरू होतो...आणि संकटं वाढत वाढत जातात...त्यातून बाहेर पडतापडता धडपड करत करत तो आत आत रुतत जातो...
मुख्य पात्र कशासाठीतरी असमाधानी आहे, परिस्थिती बदलायची धडपड करत आहे... ध्येयासाठी वाट्टेल ते करणारा ,सार्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी झटणारा आहे, आणि कोणी बरोबर नाही आले तर एकटा लढणारा आहे....या ध्येयामध्ये जो तुल्यबळ परंतु सामान्यत: वाईट विचारांचा माणूस अडथळे आणतो, तो ऎंटागनिस्ट...( ही झाली प्रोटॆगनिस्ट प्लॆन डॊमिनेटेड थिअरी)
ऎंटागनिस्ट
अर्थात प्रोटॆगनिस्टच्या विचारांना विरोध करणारा , रूढार्थाने खलनायक....
( कधी कधी याच्या विचारांमधून गोष्ट सुरू होते.... ऎंटागनिस्ट प्लॆन डॊमिनेटेड थिअरी .....
उदा. जेम्स बॊंडचे बरेचसे सिनेमे... किंवा मिस्टर इंडियातला मोगॆम्बो वगैरे.... जगावर राज्य करण्यासाठी यांच्या कारवाया वगैरे चालू असताना त्यांच्या मनसुब्यामध्ये येणारा हीरो)
इतर पात्रे :
नाटकासाठी इतर पात्रांची गरज पडते, मनातले गुंतागुंतीचे विचार सांगायचेत तर पात्रांची कोणाशीतरी चर्चा होणे आवश्यक... मात्र ही पात्रे कथानकाशी आणि प्रेमाईसशी सुसंगत हवीत.उगीचच येणारी जाणारी अनावश्यक पात्रे कंटाळा आणतात....(ही लेखकाची सोय असली तरी प्रेक्षकाला आराखड्याच्या यंत्रांची खडखड जाणवू नये यात लेखकाचे कौशल्य)
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस
प्रेषक भडकमकर मास्तर ( मंगळ, ०७/०१/२००८ - ०२:४३) .एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग दुसरा : प्रमुख व्यक्तिरेखा
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष
" नाट्यलेखन काय क्लासमध्ये शिकवून येतं का रे? "
" काय एवढं शिकवतात रे लेखन कार्यशाळेत? "
अशा काही सीनियर नाटकवाल्याच्या प्रश्नांना तोंड देत देत आम्ही एक दोन लेखन कार्यशाळांमध्ये जाऊन शिकून वगैरे आलो... मग तिथून प्रेरणा घेत घेत आंतरजालावरती बरंच लेखनतंत्राविषयी वाचलं... पटकथा लेखन शिक्षण आणि नाट्यलेखन शिक्षण या विषयावर आंतरजालावरती प्रचंड साहित्य उपलब्ध आहे, त्यातलं काही वाचून समजून घेतलं, मजा आली...स्वत:च्या लेखनासाठी याचा उपयोग झालाच आणि समीक्षणात्मक लेखनासाठीही नेहमी उपयोग होतो. सरावासाठी घरचा अभ्यास दिलेला आहे काही संस्थळांवरती...तोही भलताच मजेदार आहे...हॊलीवूड मधल्या काही पटकथा,संवाद संस्थळावर उपलब्ध आहेत..त्यांचं या निमित्तानं वाचन झालं..
दरम्यान काही स्क्रीनरायटिंगचा कोर्स केलेली / करणारी काही मंडळी दोस्त झाली... यांनी लेखनतंत्रासाठी पाठ्यपुस्तक म्हणून वापरलेली काही पुस्तके सांगितली, त्यांचा अभ्यास झाला.या सार्या अभ्यासातलंच काही इथे थोडक्यात क्रमश: देण्याची इच्छा आहे....
इथे एक स्पष्टीकरण आवश्यक आहे की इथे दिलेले सगळे नियम किंवा ठोकताळे तारतम्याने घ्यायचे आहेत.... प्रत्येक ठिकाणी ते लागू पडणारच असा माझा कोणताही दावा नाही आणि कोणीही करू नये...कुठेकुठे कदाचित काही विसंगतीही सापडण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या आवडत्या कथा / नाटक / चित्रपट अशा कलाकृतींना यातले बरेचसे ठोकताळे फ़िट्ट बसतात असे समजत जाते तेव्हा झकास वाटते.
अजून एक म्हणजे प्रत्येक इंग्रजी शब्दाला मला प्रतिशब्द सापडला नाहीये, तिथेतिथे मी त्यासाठी थोडासा प्रयत्न केला पण त्यातच अडकलो नाही, पुढे लिहीत गेलो आहे.
terminology...यातल्या प्रत्येकावर पुढे काही भागांत लिहिणार आहे.
1.premise.
2.plot
3.dramatic structure
4.protagonist
5.conflict
6.rhythm
7.genre
8.dialogue
9.progression of play...
१. premise...प्रिमाइस याला चपखल मराठी शब्द मला सुचला नाही.. कथासार, कथाबीज, किंवा तात्पर्य वगैरे जवळ जाणारे शब्द आहेत पण प्रिमाईस ला ते अचूक वाटत नाहीत. असो..ते फ़ारसे महत्त्वाचे नाही.मी सध्या याला प्रिमाईसच म्हणेन. (काही लोक यालाच वन लाईन स्टोरी असे म्हणतानाही ऐकले आहे .ते असो.)
लिहायला सुरुवात करण्यापूर्वी आपला प्रिमाईस तयार असणे उत्तम.... आपल्याला नक्की काय सांगायचंय? तेच का सांगायचंय? आणि कुठवर कसं सांगायचंय? अशा प्रश्नांची उत्तरे माहित असायलाच हवीत... प्रत्येक दृश्य, प्रत्येक संवाद, प्रत्येक नवीन व्यक्तीरेखा तुमच्या मूळ प्रिमाईसशी सुसंगत आहे का हे पाहणे अत्यंत आवश्यक असते.प्रिमाईस साधारणपणे गोष्टीतल्या मूलभूत मानवी भावनेबद्दल सांगतो.
उदा. समजा आपली गोष्ट मत्सराबद्दलची आहे. मग मत्सराबद्दल आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे ते ठरलं पाहिजे.
म्हणजे मत्सरामुळे सर्वनाश होतो
मत्सरामुळे मानहानी होते.
मत्सर माणसाला एकटा पाडतो.
मत्सरामुळे माणूस प्रेमाला पारखा होतो.
आता यातलं काहीतरी एक नक्की केलं की आपलं कथासार तयार होणार.
प्रिमाईस मध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आल्या पाहिजेत.
१.भावना २.संघर्ष ३.निराकरण / गोष्टीचे ध्येय.
उदा. रोमिओ आणि जुलिएट चा प्रिमाईस असा होईल... सच्चं प्रेम मृत्यूवरही मात करतं.
कोणत्याही नाटकाला / गोष्टीला सुस्पष्ट प्रिमाईस नसला की बरेच गोंधळ निर्माण होतात.थातुरमातुर प्रसंग, नको त्या व्यक्तिरेखा वाढत जातात ...खुद्द लेखक गोष्ट पूर्ण होईपर्यंत गोंधळून जातो. लेखकाला नक्की काय सांगायचंय ते वाचकाला / प्रेक्षकाला कळेनासं होतं...
कधीकधी एखादा साधासा विचार, कल्पना किंवा प्रसंग यापासून गोष्ट सुरू होऊ शकते परंतु लिहिता लिहिता लवकरात लवकर प्रिमाईस तयार होणे आवश्यक असते.
प्रिमाईस जसाच्या तसा संवादात येऊ नये... प्रेक्षकांना तो गोष्ट संपताना आपोआप कळायला हवा... आणि प्रिमाईस काहीही असला तरी लेखकाला तो शेवटी सिद्ध करता यायला हवा.
आणखी एक सांगायचं म्हणजे आपल्या अत्यंत आवडत्या नाटकाचा / सिनेमाचा प्रिमाईस तयार करणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नसते पण तो एक मजेदार खेळ होऊ शकतो. ... या धाग्यात असा खेळ खेळून पाहूयात काय?
प्लॉट ( कथानक ?)
प्लॉट म्हणजे विशिष्ट प्रसंगांची, ठराविक क्रमाने केलेली, भावना उद्दिपीत करणारी अर्थपूर्ण मांडणी..
कथानकाशेवटी व्यक्तिरेखेच्या आयुष्यात अर्थपूर्ण बदल घडला पाहिजे.योगायोग नको.( उदा. गरीब कष्टाळू माणसाला शेवटी यश मिळते असा संदेश देताना हीरोला शेवटी लॊटरी लागते आणि तो श्रीमंत होतो , हे चूक...मान्य आहे,असं खरं घडू शकतं...लॊटरी काय कोणालाही लागू शकते पण या हीरोला लॊटरी लागली तर आपला प्रिमाईस खोटा पडला ना.... ).
नुसतंच खरं आयुष्य हे प्रत्येक वेळी परिणामकारक लेखन होऊ शकत नाही...अगदी रिअलिस्टिक नाटकातसुद्धा खर्या आयुष्याचा केवळ भास घडतो.पण तेच जसंच्या तसं खरं आयुष्य नव्हे.खर्या आयुष्यात बर्याचदा कार्यकारणभाव नसतो . पण प्रत्येकाला कार्यकारणभाव असलेल्या भासमान विश्वाची गरज असते आणि गोष्ट ती गरज पूर्ण करते.म्हणून नाटकाची गोष्ट संपूर्ण काल्पनिक किंवा संपूर्ण सत्य नसते तर ती या दोन्हींचे सुयोग्य मिश्रण असते.
ऍरिस्टॉटलचे ड्रामॆटिक स्ट्रक्चर

सुरुवात : यात पहिल्या १० % भागात स्थल,काल,व्यक्ती यांच्याबद्दल माहिती देणारे प्रसंग घडतात.
मध्य : पुढच्या ७५ % भागात नाट्यमय ताण वाढत जातो आणि आणीबाणीच्या परिस्थितीत अत्युच्च ताणापाशी क्लायमॆक्स, इथून माघार अशक्य.
शेवट : आणि मग उरलेल्या १५ % भागात ताणाचे निराकरण आणि तात्पर्य समजते.
(क्रमशः)
वळु
प्रेषक राजस ( शुक्र, ०६/२७/२००८ - २२:१५) .वळु
बर्याच दिवसांनी मराठी चित्रपट बघण्याचा योग आला. खरे तर मराठी चित्रपट बघायला मला आवडते. मध्यंतरीच्या काळात सचिन व महेश कोठारे चे चित्रपट छान असायचे. परंतु त्यानंतर मराठी चित्रपट एकाच साच्यात अडकला तेंव्हापासुन तो नकोसा व्हायला लागला होता. श्वास पासुन ही परिस्थीती बदलायला लागली आहे.
तर बरेच दिवसांनी चित्रपट बघितला, वळु. कथानक सर्वांना माहीत झालेच असेल. एका गावात वळुने उच्छाद मांडलेला असतो त्यामुळे फॉरेस्ट ऑफीसरला बोलावणे पाठवले जाते. त्याबरोबर त्याचा भाऊ डॉक्युमेंटरी करण्यासाठी येतो. गावकर्यांना एकत्र जमवुन डॉक्युमेंटरी करताना कथानक उलगडत जाते. त्यात संगीची प्रेमकथा असे उपकथानक सुद्धा आहे. डॉक्यमेंटरी करुन संपते आणि त्यानंतरच्या एक-दोन प्रयत्नांमधे वळु पकडला जातो, व चित्रपट संपतो.
मला चित्रपट आवडला नाही. कथानकात तस काही दम नाही. अगदीच साधे आहे. म्हणुन मग त्यात गावातल्या तरुण नेत्याची कुरघोडी करण्याची धडपड. भटजीबुवांचे (दिलीप प्रभावळकर) विनोद आणि संगीचे (अमृता सुभाष) प्रेमप्रकरण त्यात आले आहे. वळु बघितल्यानंतर त्याला पकडण्यासाठी फॉरेस्ट ऑफीसरची नेमणुक विचीत्र वाटते. वळु बिचारा एकदमच शांत आहे. चित्रपटात तो नुसताच इकडुन तिकडे जातो. तर त्याला लोक एवढे घाबरतात का हे काही समजत नाही. वळुचे पुर्ण दर्शन अगदी शेवटी घडते. तोपर्यंत त्याचा त्याला अर्धवट दाखवुन बॅकग्राउंडला त्याचा जोरात उच्छवास ऐकवण्यात आला आहे. त्यावरुन तो हिंसक झाला आहे असे आपण समजायचे. वळु पकडण्यासाठी गेलेला फॉरेस्ट ऑफीसर डॉक्युमेंटरी बनवण्यात मध्यांतरापर्यंत वेळ घालवतो. त्यानंतर त्याने केलेले प्रयत्न एका अननुभवी माणसाने केलेले प्रयत्न वाटत रहातात. शेवटी वळु पकडला जातो परंतु त्या प्रसंगात काही थ्रिल नाही.
अतुल कुलकर्णी हा एक चांगला अभिनेता आहे हे हा चित्रपट बघुन कोणीही म्हणणार नाही.काही मनाविरुद्ध घडले तर 'शिट शिट शिट' आणि मनासारखे घडले तर 'येस येस येस' असे संवाद त्याच्या तोंडी आहेत. वळु पकडण्यासाठी फॉरेस्ट ऑफिसरला आवश्यक असलेली लीडरशीप कुठेही जाणवत नाही. त्याच्यासारख्या अभिनेत्याला वाया घालवलेले आहे एवढेच म्हणता येइल.
दिलीप प्रभावळकरांनी ही भुमिका का स्वीकारली असावी असा प्रश्न पडतो. दिवस/रात्री कोणत्याही वेळेस परसाकडला जाणे य पलिकडे या भुमिकेत काहीच नाही. विनोद निर्मीती साठी हे पात्र असावे असे म्हटले तर सारखे 'लागली आहे' असा अभिनय करत इकडुन तिकडे जाणार््या पात्रात कसली आली आहे विनोदनिर्मीती. त्यात सरकार राज मधली दिलीप प्रभावळकरांची भुमिका बघितल्यानंतर त्यांना या भुमिकेत बघायचे म्हणजे एक शिक्षा आहे.
चित्रपटात काही प्रसंग उगाच घुसडल्यासारखे वाटतात. आता छोट्या मुलाला त्याची आई देवळाबाहेरच शु करायला लावते. यात दिग्दर्शकाला काय म्हणायचे आहे? विनोदनिर्मीतीसाठी असेल तर यात विनोद काय आहे. त्यात बाकी चित्रपट विनोदी अंगाने जात नाही. मला तर एकाही ठिकाणी खळखळुन हसु आले नाही.
चित्रपटात सगळेच काही निगेटिव्ह नाही. गावाची वातावरण निर्मिती उत्तम झाली आहे. जीवन्याची भुमिका करणार्या नटाने (गिरिश कुलकर्णी) उत्तम अभिनय केला आहे. फॉरेस्ट ऑफीसरला सगळी मदत केल्यानंतर ऑफीसर निघुन जाताना एकदम हळुवार होणे हे त्याने मस्त दाखवले आहे. चित्रपट तांत्रिक दृष्ट्या चांगला वाटतो.
हे चित्रपट परिक्षण नाही, तर नुसतेच माझे मत आहे. या वरुन चित्रपट पहायचे की नाही हे ठरवु नका. पण मराठी चित्रपटात सुधारणा व्हावी. किंबहुना मराठीत आंतरराष्टीय दर्जाचे चित्रपट निघावेत असे वाटते. त्यामुळे 'वळु' खरोखरच चांगला असता तर किती छान झाले असते असे चित्रपट बघितल्यानंतर वाटत राहीले म्हणुन चार ओळी खरडल्या एवढेच.
- - राजस
हैदराबाद येथे झालेले मराठी बालनाट्य : 'राजकन्येची बाहुली'
प्रेषक विसुनाना ( शुक्र, ०६/२७/२००८ - १४:०८) .हैदराबाद येथील रंगधारा नाट्यसंस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ पोट्टी श्रीरामलु तेलुगु युनिव्हर्सिटीच्या एन्.टी. रामाराव कलामंदिरात दि. २२ जून २००८ रोजी संपन्न झाला. यावेळी 'राजकन्येची बाहुली' हे बालनाट्य आणि 'ओले,ओले, टीव्ही बोले' हे लघुनाट्य सादर करण्यात आले. दोन्ही बालनाट्ये अत्यंत उत्कृष्टरित्या सादर झाली. वेळोवेळी हशा आणि टाळ्या यांच्या गजराने प्रेक्षकांनी त्यांची पसंती जाहीर केली.
'राजकन्येची बाहुली' : एक दृष्टीक्षेप
महाराजा श्रीवल्लभ एक शक्तीशाली सम्राट.
त्याची एकुलती एक मुलगी प्रभावती एक आईविना पोरकी राजकन्या आहे. तिचं सारं भावविश्व तिच्या लाडक्या बाहुलीभोवती गुंफलेले आहे.
राजा श्रीवल्लभाचा शत्रू राजा विक्रम! श्रीवल्लभाकडून वेळोवेळी युद्धात हरल्यामुळे विक्रम राजा राजकन्या प्रभावतीला पळवून ठार करण्याचा कट रचतो आणि त्याचे दोन मारेकरी प्रभावतीला पकडण्यासाठी सोडतो. ही बातमी ऐकून चिंताक्रांत झालेला श्रीवल्लभ आपल्या प्रधानाला आणि सेनापतीला राजकन्येला शूर आणि विद्वान बनवण्याचा हुकूम देतो.
परंतु आपल्या बाहुलीशी खेळण्यात रममाण झालेली राजकन्या काहीही शिकण्यास नकार देते.
ना राजकारण!
ना लढाई!
ना संगीत!
ना इतिहास!
त्यावर श्रीवल्लभ ती बाहुली घनदाट जंगलात फेकून देण्याचा हुकूम देतो. बाहुलीसाठी वेडी झालेली राजकन्या राजवाड्यातून पळून जाते आणि जंगलात जाऊन बाहुली शोधून काढते.
ही बातमी कळालेले विक्रम राजाचे मारेकरी तिचा माग काढत जंगलात पोहोचतात.
घाबरलेली राजकन्या जंगलात सैरावैरा पळत सुटते.
जंगलात धोंड्या, पांड्या आणि रुपा ही तीन निडर आदिवासी भावंडे राजकन्येला भेटतात आणि तिच्याशी मैत्री करतात.
त्यांच्यामुळे ती आपल्या कोषातून बाहेर पडते आणि तीही धीट बनते. राजकन्या रूपाला आपला मुकुट आणि दागदागिने भेट म्हणून देते. रूपा आता जणू राजकन्याच भासू लागते.
इतक्यात मारेकरी पोचतात आणि राजकन्या समजून रुपालाच पकडतात.
प्रत्यक्ष मारेकरी समोर आल्यावर ही सर्व मुले मिळून त्यांना तोंड देतात.
परंतु त्यांची मात्रा चालत नाही. मारेकरी आपला डाव साधणार इतक्यात राजा श्रीवल्लभ आपल्या सेनेसह तेथे पोहोचतो आणि मारेकर्यांना अटक करतो.
राजा श्रीवल्लभ धोंड्या, पांड्या आणि रुपाला दत्तक घेऊन धोंड्याला राजा बनवण्याचा मनसुबा जाहीर करतो. पण धोंड्या त्याला नकार देतो. राजकन्याही राजाला सांगते, "मी मुलगी असले तरी शूर आहे. ही फेकून दिली मी बाहुली. आता मी सर्वांना दाखवून देईन की मी तुमच्यापेक्षाही शूर आणि हुशार आहे."
या बालनाट्यात अगदी पाच वर्षे वयापासून १३ वर्षे वयापर्यंतच्या लहानग्यांनी भाग घेतला. मुळात मराठी अस्खलितपणे न बोलू शकणारी ही मुले जेंव्हा रंगमंचावर आपल्या भूमिका साकारत होती तेंव्हा अगदी कसलेल्या कलाकारांचा आभास होत होता. या बालनाट्यात कोठेही कुजबुज्या (प्रॉम्प्टर) ची गरज लागली नाही.
स्त्रीशिक्षणाच्या ढोबळ विषयाबरोबरच 'कर्तव्यासाठी आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करावा लागतो' हा सूक्ष्म संदेशही या बालनाट्याच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न झाला. लेखक श्री. विजय शिंदे यांचे कसब असे की निखळ विनोदी आणि करमणूकप्रधान अशा या बालनाट्यात लपलेला संदेश देण्यासाठी कोठेही त्यांनी बटबटीत, प्रचारकी थाटाचे, लहान मुलांच्या तोंडी न शोभणारे संवाद वापरले नाहीत.
या बालनाट्याचे दिग्दर्शन श्री. विजय नाईक यांनी केले. शिबिराचे संकल्पक श्री. प्रकाश फडणीस यांचेही या कामी मोलाचे सहकार्य लाभले. शिबिर समन्वयक सौ. अर्चना फडके यांनी सर्व कलाकारांची काळजी घेतली. नेपथ्य आणि कपडेपट सौ. सुवर्णा नाईक यांनी तर पार्श्वसंगीत श्री. माधव चौसाळकर यांनी सांभाळले. प्रकाश योजना प्रा.श्री. भास्कर शेवाळकर यांची होती. विशेष म्हणजे सर्व बालकलाकारांनी शिबिरात या सर्व तांत्रिक बाबी समजावून घेऊन त्यात सहभागही घेतला होता.
या कार्यक्रमात रंगधारेचे अध्यक्ष, हैदराबाद युनिव्हर्सिटीचे माजी नाट्यशास्त्र विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. भास्कर शेवाळकर यांच्या हस्ते बालनाट्य शिबिरात सहभागी झालेल्या बालकलाकारांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रंगधारेचे कार्यवाह श्री. अनंत कुलकर्णी यांनी केले.
या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. अंदाजे तीनशे बैठकक्षमतेचे हे छोटेखानी नाट्यगृह पूर्ण भरले होते.
कलाकार नेहमीच्या वेषात प्रेक्षकांना अभिवादन करताना -
लोकाग्रहास्तव याच बालनाट्यांचे प्रयोग लवकरच करण्याचे रंगधारेने ठरवले आहे.
रंगधारा , द थिएटर स्ट्रीम, हैदराबाद निर्मित
बालनाट्य
राजकन्येची बाहुली
लेखन : श्री. विजय शिंदे
दिग्दर्शन : श्री. विजय नाईक
समन्वय : सौ. अर्चना फडके
संकल्पना : श्री. प्रकाश फडणीस
नेपथ्य आणि वेशभूषा : सौ. सुवर्णा नाईक आणि सौ.अर्चना फडके
प्रकाशयोजना : श्री. भास्कर शेवाळकर
संगीत : श्री. माधव चौसाळकर
विशेष साहाय्य : श्री. अनंत कुलकर्णी
भूमिका आणि कलावंत
(प्रवेशानुसार)
राजा श्रीवल्लभ : चि. चैतन्य ठाकुर
राजकन्या प्रभावती : कु. ऐश्वर्या गोखले
गायन शिक्षिका : कु. अक्षदा अवधुत
इतिहास शिक्षिका : कु. संपदा जोशी
सदर बालनाट्याचे चलच्चित्रण लवकरच जालावर उपलब्ध होईल.
लूज कंट्रोल...दीर्घांक ... एक परीक्षण / अनुभव
प्रेषक भडकमकर मास्तर ( बुध, ०६/१८/२००८ - १७:२५) .लूज कंट्रोल...
२००५ च्या सुदर्शन रंगमंचावर महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित दीर्घांक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारं नाटक..
लेखक : हेमंत ढोमे
दिग्दर्शक : निपुण धर्माधिकारी
कलाकार : अमेय वाघ,हेमंत ढोमे,निपुण धर्माधिकारी, सुषमा देशपांडे
निर्मिती : समन्वय पुणे.
या नाटकाचा दीर्घांक मी जुलै २००६ मध्ये पाहिला. त्याचे नंतर दोन अंकी नाटक आले, पण ते जास्त काळ टिकले नाही. ते नाटक मी पाहिले नाही.मी आत्ता बोलणार आहे ते दीर्घांकाविषयी..
नाटकाचे कथासूत्र...
तीन कॉलेज मधले मित्र. वय वर्षे १९ - २०... त्यातल्या एकाचे आईवडील बाहेरगावी गेलेले असल्याने धिंगाणा करायला उरलेले दोघे मित्र त्याच्या घरी राहायला आले आहेत. नाटक सुरू होताना एक जण खिडकीतून समोरच्या बिल्डिंगमधलं तरूण जोडपं प्रेमचेष्टा करताना दिसतंय का ते पाहण्याच्या प्रयत्नात... पण ते जोडपं शॉपिंगला बाहेर गेलंय, परत आल्यावर लक्ष ठेवू, वगैरे संवाद होतो... नंतर संवादाची गाडी एकूणच आसपासची वाढती कामुक आव्हाने, सिनेमा नट्या, जगाच्या मानाने आपण किती मागे आहोत ( फ़िनलंडमधल्या तरूणांचे सेक्सच्या पहिल्या अनुभवाचे सरासरी वय आहे १९ बर्षे... आणि आपण तिच्यायला असे"!!!)..अजून लग्नाला इतका अवकाश अहे आणि आपण तोपर्यंत .... वगैरे वगैरे मार्गाने जात असताना तिघांचे एकमत होते की आपण हा अनुभव आता घेतलाच पाहिजे.
त्यातल्या एकाचा एक अनुभवी (!) मित्र एका "व्यावसायिक" PSW ला ओळखत असतो, त्याला फोन करून हे (हो नाही करत, स्वत:जवळ पुरेसे पैसे आहेत का बघत ) तिची अपोइंटमेंट घेऊनही टाकतात. ... मग असे करू, तसे करू वगैरे खूप अंदाज आणि ती येते...
( या सार्यांची अपेक्षा की एखादी कॉलेजकन्यका येईल... पण येते एक मध्यमवयीन स्त्री).. मग सगळे गांगरून जातात आणि काहीही न करता तिच्याबरोबर सीडीवर इक्बाल सिनेमा पाहतात, आणि तिला पैसे देऊन निरोप देतात.....
....
मग पुन्हा एकाला समोरच्या इमारतीत त्या फ़्लॆटमध्ये लाईट दिसतो .." ते जोडपं आलंय परत... " ... "बघावं काय?" असा विचार करत दोघे उठतात पण "नकोच ते" असं म्हणत परत झोपतात..
पडदा ...संपलं नाटक..
______________________________________
माझे मत : आपल्याला नाटक पाहताना आवडलं ...
औटस्टेंडिंग, विचारप्रवर्तक वगैरे नव्हते तरीसुद्धा त्यात गंमत होती.. कलाकारांनी छान कामे केली होती... सुरुवातीच्या सेक्सबद्दलच्या कुतुहलाचे संवाद छान लिहिले होते... काही क्षणी नाटक अगदीच चीप होतंय की काय अशी मला भीती निर्माण होता होता परत कंट्रोल व्हायचे. ... हे निपुणमधल्या दिग्दर्शकाचे कौशल्य ... ( हे असले संवाद मी लिहू शकलो नसतो , हे ही खरे) पण आता नाटकाचा विषयच हा आहे तर काय करणार ? (आता इतकी नैसर्गिक गोष्ट आहे ही, पण पूर्वी तर त्याबद्दल कुठेच बोलायचे नाही, चर्चा नाही,
अर्धवट माहिती इकडून तिकडून मिळवलेली .. आताच्या तरूण मंडळींकडे आंतरजालासारखा माहिती स्त्रोत आहे हे बरे....)
मला वाटतं मी हे नाटक सुमारे १२५ लोकांबरोबर पाहिलं... त्यात साधारणपणे ३ ग्रुप दिसले.
त्यात एक ग्रुप - पुढे बसून जोराजोरात खिदळणारे, प्रचंद दाद देणारे अगदी २० २२ वर्षांचे कॊलेजियन... कारण हे सारे अगदी त्यांच्या मनातले , त्यांच्याच वयाची पोरे सांगताना दिसताहेत.
दुसरा ग्रुप ... ( माझ्यासारखा ) तीस पस्तीसच्या आसपासचा , त्यातल्या एका मित्राशी बोललो , तो डोळे मिचकावत म्हणाला, " कुतुहल, अंदाज, आनंद वगैरे त्या त्या वयात ठीक आहे पण शेवटी यांनाही कळेलच की नंतर की ...म्हणजे ...वाटतं तेवढं ...हं... " आणि मान हलवत हसला.
तिसरा ग्रुप ... पन्नास- पंचावन्नचा ज्यांची मुले मुली वीशीत आहेत असे... यांचे चेहरे थोडे चिंताग्रस्त दिसले.... काही स्त्रिया तर वैतागलेल्या दिसल्या... ( हे काय घाणेरडं वगैरे? घरात वेश्या बोलावताय?")
मला तर पुण्यातल्या शनिवार पेठेत आपण हा प्रयोग पाहिला, यावर थोडा वेळ विश्वास बसेना....
प्रयोग नाटकाच्या विषयाशी प्रामाणिक होता? हो.
बहुसंख्य प्रेक्षकांनी एन्जॊय केला? हो.
कलाकारांची कामे मस्त.... आधी मारे वाघासारखी गप्पा मारणारी पोरं ती आल्यानंतर शेळी होतात ते बेष्ट...
________________________
( आता दुसर्या बाजूने विचार केल्यावर वाटतं , समजा तिथे खरंच कॊलेजची १८ वर्षांची PSW आली असती तर काय झाल असतं? मध्यमवयीन स्त्री येणं आणि यांनी काहीच न करणं , ही नाटककाराच्या दृष्टीनं एक पळवाट झाली की सांगायला, " बघा माझी पात्रे वाईट नाहीत हो, काहीही न करता त्यांनी फ़क्त सिनेमा पाहिला"... मग एवढंच करायचं होतं तर इतक्या धीट विषयाला हात घालून ऐन वेळी पळवाट कशाला काढली ? तिथे खरी मजा आली असती की आलेली १८ वर्षांची मुलगी यातल्या एकाची मानलेली गर्लफ़्रेंड आहे.... मग खरी मजा आली असती...मग यांची बोलती बंद झाली असती, "तुम्ही मुलं जर तिला बोलवू शकता तर त्याच न्यायाने मी ती असू का नये??"
असा एक संवाद लिहून पाहू म्हणतो, सराव म्हणून...कोणी लिहिणार का ?)
_____________________________
काह्ही केल्या आवडतच नाही! :)
प्रेषक विसोबा खेचर ( बुध, ०६/१८/२००८ - ११:२१) .राम राम मंडळी,
नाट्य व चित्रपट कलावंतांसंदर्भात हा काथ्याकूट आहे हे सर्वप्रथम नमूद करतो आणि या काथ्याकुटाचा प्रवास याच मंडळींसंदर्भात चालावा अशी विनंतीवजा अपेक्षा करतो!
तर मंडळी, काही काही नाट्य व चित्र कलावंत हे त्यांच्या त्यांच्या जागी गुणीच असतात. त्यांनी आपलं काहीच बिघडवलेलं नसतं. एक कलाकार म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल उचित आदरही असतो.
पण...
यापैकी काही कलावंत हे आपल्याला काह्ही म्हणजे काह्ही केल्या आवडतच नाहीत/नसतात. काय असेल ते असो पण त्यांना पडद्यावर पाहिलं की अगदी नक्को वाटतं!
हा कथ्याकूट हा याच मंडळींची नांवे लिहिण्याकरता मी सुरू करत आहे. आपण नेहमी आपल्या आवडीबद्दल/आवडणार्या कलावंतांबद्दल लिहीत असतो, या निमित्ताने एकदा आपल्या नावडीबद्दलही इथे लिहू या. बघुया तरी, कुणाला कोण आवडत नाही ते! 
चला, तर माझ्यापासूनच सुरवात करतो. तूर्तास जी नांवं चटकन आठवत आहेत ती इथे लिहीत आहे. आपणही भाग घेऊन आपापल्या नावडी कळवा!
खालील मंडळी मला कधीच सहन होत नाहीत -
अनिलकपूरचे दोन्ही भाऊ,
संध्या,
प्रदिपकुमार,
आशिकीफेम राहूल रॉय,
जॉय मुखर्जी,
सचिन(अपवाद 'हा माझा मार्ग एकला, पण त्यानंतर कधीही आणि केव्व्हाच आवडला नाही!),
चित्रपटात काम करणारी शांतारामबापूंची अजून एक बायको (तिचं नाव आता आठवत नाही!),
इत्यादी इत्यादी इत्यादी...
बराय तर मंडळी, आता आपला निरोप घेतो. बरीचशी मंडळी मिपाचा दिवाळी अंक काढा म्हणून मागे लागली आहेत. त्या संदर्भात नीलकांत, डॉ बिरुटे, चतुरंग, मुक्तराव, प्रियाली, प्राजू, नीलकांत इत्यादी माझ्या काही मित्रमैत्रिणींशी विचारविनिमय करायचा आहे! 
"वीस रुपये रोजी, रोजी दोन टाईम चाय अन् रोजी एक शिग्रेट" या बोलीवर काही संपादक मिळतात का तेही पाहिलं पाहिजे! 
आपला,
(नावडता) तात्या.
एक तितली मातकट तपकिरी
प्रेषक अरुण मनोहर ( मंगळ, ०६/१७/२००८ - ११:४०) .नजर पोहोचते तेथवर रखरखीत वाळवंटी टेकड्या.
संतप्त झळांनी आसमंत निर्दयपणे भाजून काढल्या जात आहे.
घळीतील अडचणीच्या जागेत असलेल्या भुयारी गुहेत,
बाहेरचे पेटलेले उन्ह भोकाभोकांनी आत ठिपकले आहे.
गुहेत येताच, अंगावरचे घामाने थबथबलेले राखाडी पिवळे रकटे
यासीम ओरबाडून फ़ेकून देतो.
त्या छोट्याशा जागेत आधीच,
त्याच्या सारखी वीस एक अर्धीउघडी शरीरे
जागा मिळेल तिथे पडली आहेत.
रोज दुपारचे सुखे मटन चावून झाल्यावर मिळणारी
अर्धा तासाची विश्रांती सगळ्यांना खूप मोलाची आहे.
उकाडा आणि तहानभूक ह्यांनी आलेली ग्लानी
यासीमच्या डोळ्यात उतरून त्याची द्रष्टी जडावली आहे.
तशातही, त्याचा उघडा बाहू कुरदणारी मक्खी त्याला दिसते.
भयंकर त्वेषाने तो पंज्याचा एक फ़टकारा मारून तिला चिरडतो.
खूप पुर्वी सरहदपार पाहिलेल्या शोले मधील गब्बरसिंगच्या त्वेषात!
कितीतरी साल लोटले फ़ील्लम पाहून.
****द अमेरिकनांनी दबाव वाढवल्यामुळे,
पर्बत सोडून जाणेही धोक्याचे झाले आहे.
केव्हा त्यांच्या मिसाईल्स सारे तहसनहस करतील, काही नेम नाही.
***द...... यासीम पुन्हा एक अर्वाच्च्य शिवी थुंकतो.
तो उकाडा, ती वाळू विखूरलेली गुहा, दाढ्या वाढलेले, घामात लोळणारे मुजाहिद,
यासीम सगळा उदासवाणा नजारा घृणाभरल्या नजरेने पहातो.
खिडकीच्या गजांवर त्याला एक क्षीणसा फ़डफ़डाट नजर येतो.
मातकट तपकिरी रंगावर मोठे काळे ठिपके असलेले पंख.
वाळवंटी फ़ुलपाखरू. साधारण मुठीयेवढे.
***द आमच्या नशीबात तितली सुद्धा रंगबिरंगी नाही.
कश्मीर घाटीत पाहिलेली रेशमी गर्द चमकत्या रंगांची मुस्कुराती फ़ुलपाखरे यसीमला अचानक वेडावून जातात.
खिडकीजवळ मंदशी हालचाल करणार्या तितलीचा
त्याला तीव्र द्वेष येतो.
तितली जर जवळपास असती, तर मघाच्या मक्खीसारखीच चिरडली असती.
यासीमला आता स्वत:चीच चीड येते.
लढून दुष्मनची कतल करण्याऐवजी आपण,
ह्या वाळवंटी भट्टीत छुपून, चिल्लर मक्खी आणि तितली चिरडीत बसलो आहोत!
थ्थू!
आता तो तितली कडे असुयेने पहात आहे.
निदान ह्या तितलीला तरी मिसाईलपासून बचण्यासाठी
छुपून रहावे लागत नाही.
जेव्हा वाटेल तेव्हा खुल्लेआम उडायला ती आज़ाद आहे.
यासीमला आता मातकट तपकिरी तितलीचा खूप प्यार येतो.
तिचे मऊमऊ पंख एकदा तरी छुवावे म्हणून उठून तो खिडकीजवळ येतो.
यासीम तिथे पोहोचण्या आधीच, तितली उडून बाहेरच्या दगडी पाळीवर बसली आहे.
खिडकीजवळ येऊन, यासीम तितलीच्या पंखावरील काळी रांगोळी बघतो.
उन्हात चमचमणारे पंख नायलॉनचे असावे असा भास होतो.
साली दलीद्दर काली तितलीभी आपल्याला जवळ करीत नाही....
पचकन थूंकून तो आत वळतो. त्याला खबरही नसते........
तितलीच्या नांग्यांमधून, ठीकाणाचा पत्ता दूरवर पोहोचला असतो.
आणि ह्या क्षणी भारी शक्तीचे एक मिसाईल
डोंगरात दडलेल्या मुजाहिदांना तहसनहस करायला
वेगाने झेपावत असते...........................
पुलंदर्शन!
प्रेषक प्रमोद देव ( गुरू, ०६/१२/२००८ - ०७:४८) .आज १२ जून. आज पुलंचा स्मृतीदिन. पुलंच्या काही भावमुद्रा इथे देण्याचा मोह होत आहे.

साहित्य साधनेत मग्न!

पहिल्या चित्रात पंडित भीमसेनांबरोबर आणि दुसर्या छायाचित्रात पंडितजींना पेटीवर साथ करताना.
पु.ल.देशपांडे! महाराष्ट्राला पडलेलं एक हसरं स्वप्न! ह्या माणसाने निर्विष विनोदाने कोट्यावधी मराठी लोकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवलेले आहे. पुलं ची रुपेही अनेक. साहित्यिक पुलं,संगीतकार-गायक पुलं,नाटककार,नट,पटकथाकार,दिग्दर्शक अशा कितीतरी वेगवेगळ्या भूमिका जगून ह्या माणसाने मराठी माणसाचे सांस्कृतिक आयुष्य समृद्ध करून टाकलंय.
पुलंचे लेखन इतके सर्वव्यापी आहे की व्यवहारात त्या त्या प्रसंगाला अनुरुप अशी त्यांच्या लेखनातील वाक्ये आपल्याला आठवत असतात आणि त्या प्रसंगातही आपण रमतो असा माझा अनुभव आहे.
पुलंच्या पुण्यस्मृतीला माझी विनम्र आदरांजली.
पुलंची सर्व छायाचित्रे पुलंदेशपांडे.नेट वरून साभार

