शिफारस
बुलबुल तरंग - माहिती हवी आहे
सद्या मी बॅंजो किंवा बुलबुलतरंग नावाचे एक वाद्य शिकत आहे (फक्त सातशे रूपयात ब्रॅण्ड न्यू पीस मिळाला). आजकालच्या ढ्याण-ढ्याण संगीतात हे गोड, नाजूक आवाजाचे वाद्य अगदी तुरळक प्रमाणात दिसते - हे वाद्य मरत चालले आहे असे म्हटले तरी चालेल; पण शिकायला फार सोपे असते (सा रे ग म प ध नी काही तासांत शिकता येते) इंटरनेटवर शोधून पाहिले, पण एकच साईट सापडली - त्यावर बाळबोध धडे नाहीत.
मिसळपाववर हे वाद्य वाजवणारे, त्याबद्दल मार्गदर्शन करू शकणारे कुणी आहे का??
याबद्दल पुस्तके इ. उपलब्ध असल्याचे माहित असल्यास तेही कृपया सांगावे.
एका तेलियाने
आंतरराष्ट्रीय राजकारण हे जितकं रोचक तितकंच क्लिष्ट. तिथे एकाच वेळी प्रत्येक जण आपला पट मांडतो, आपली चाल खेळतो आणि त्याच वेळी प्रत्येक जण इतरांच्या पटावरचे प्यादे असतो. अश्या ह्या बहुआयामी राजकारणात जसजसं जग जवळ येऊ लागलं तसतशी अधिक क्लिष्टता व प्रसंगी अधिक रोचकता येऊ लागली. त्याच बरोबर हा पट शांत डोक्याने मांडून व इतरांच्या पटांवरील आपली परिस्थिती लक्षात घेऊन ज्यांनी हा खेळ खेळला ते त्या त्या मार्गाने पुढे गेले व इतर अनेक जण त्या खेळात वाईट प्रकारे भरडले गेले.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर कोणत्या एका गोष्टीभोवती आंतरराष्ट्रीय राजकारण फिरलं हा प्रश्न विचाराल तर "तेल" हे उत्तर कोणीही देईल. पण केवळ हे उत्तर माहित असण आणि तो खेळ समजून घेणं आणि दुसर्याला समजावणं हे अधिक कठीण. आणि ज्यांनी हा तेलाचा खेळ खेळला त्या "तेलियां" बद्दल काय बोलावे? अश्याच एका तेलियाबद्द्ल "शेख अहमद झाकी यामानी" यांच्याबद्दल श्री. गिरिष कुबेर यांनी लिहिलेले दमदार व रोचक पुस्तक म्हणज "एका तेलियाने". या पुस्तकात लेखक आपल्याला केवळ यामानी यांच्याबरोबरच इतर अनेक तेलियांची ओळख तर करून देतातच व त्याचबरोबर वाचक करतो ती आंतरराष्ट्रीय राजकारणाची एक अत्यंत रोचक, डोळे दिपवणारी आणि तरीही अस्वस्थ करणारी सफर!
यामानी हा सौदी अरेबियाचे माजी तेलमंत्री. आखातातील सौदी अरेबियासारख्या तेलावर तरंगणार्या देशाचे तेलमंत्री व तेही पुरी २५ वर्षे पदभार सांभाळणारा हा तेलिया वाचकाला गुंग करून ठेवतो. सौदी अरेबियाच्या जन्मापासून सूरू होणारी ही कथा अरबांच्या मागासलेपणापासूनही सुरू होते. वाळवंटातील टोळ्यांचे तेलामुळे अचानक होणार्या मिळकतीने दिवस बदलतात. अर्थातच पश्चिमी जग ही ताक्द ओळखून तिथे आपले बस्तान बसवते व अरबांच्या तोंडाला पाने पुसून केवळ काहि पैसे व सुंदर बायकांच्या बदल्यात खोर्याने तेल ओढत असते. अश्यावेळी यामानींच्या रुपाने सौदी अरेबियाला तेलमंत्री मिळतो व एकुणच अरबस्थानाच्या नशीबाने राजे फैजल त्यावेळी सत्तेवर असतात.
पुढे ओपेक, ओआपेकचे राजकारण. गडाफी, इराणी शहा वगैरे तेलिये, ओपेकच्या एकजुटीने पाश्चिमात्यांचे घटते वर्चस्व, त्याच दरम्यान उफाळु लागलेला इस्त्रायल वाद, इजिप्तच्या खेळ्या, अमेरिका, ब्रिटन च्या चाली, रशियाची प्रत्युत्तरे, फ्रेंच, जर्मन, नेदरलंड, अल्जेरिया, इराक, कुवेत, इराण, इस्त्रायल, येमेन, जॉर्डन, जपान अश्या बहुविध खेळाडुंनी व त्याच वेळी प्याद्यांनी, रचलेले व्युह व ते राजे फैजल यांच्या मदतीने भेदणारे यामानी वाचाकाला पुस्तक संपेपर्यंत खिळवून ठेवतात.
एकतर ह्या पुस्तकात उल्लेख असलेले बरेच जण नेहमीचे ऐकलेले-वाचलेले आहेत. तेलसंकट, इराण-इराक युद्धे, शीतयुद्धे, इस्त्रायल प्रश्न वगैरे तर अनेकांनी अनुभवलेली आहेत. त्यामुळे त्यातील संदर्भ, प्रसंग, व्यक्ती, शहरे यांचे उल्लेख वाचकाची त्या राजकारणाची सहज नाळ बांधतात. एक उदा. देतो. अमेरिका तेलबंदी आल्यावर ओपेकप्रमाणे तेल खरेदीदारांची संघटना बांधण्यासाठी परिषद घेणार होती. तसे काहि झाले असते तर तो तेल उत्पादक देशांना झटका असता. अश्यावेळी यामानी यांची मुत्सद्देगिरी सगळ्यांना आठवत असेलच. आता हा परिच्छेद बघा तो वाचून अनेकांनी ही बातमी वाचल्याचं आठवेल
" सा सार्या पार्श्वभूमीवर यामानी जेव्हा पॅरीसला उतरले तेव्हा फ्रान्सचे अध्यक्ष जॉर्जेस पापेंदू यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जातीने हजर होते. हा प्रकार आता वारंवार घडणार होता. ह्या दौर्यात एका साध्या मंत्र्याच्या स्वागताला राष्ट्रप्रमुखांनी जाणं साजेसं होणार होतं. सारी माध्यमं हे तेलमंत्री काय बोलतात त्याकडे डोळे लाऊन होती. फ्रान्सने आपली आधीचीच भुमिका मांडली. इस्त्रायलने १९६७च्या युद्धापासून व्यापलेला अरब देश व पॅलेस्टाईन भुभाग परत करावा अशी स्वच्छ भुमिका घेतली. याला प्रतिसाद म्हणून यामानींनी लगेच घोषणा केली फ्रान्सला तेलकपातीतून वगळायची. दुसर्या दिवशी फ्रान्सच काय जगातील सार्या वृत्तपत्रांनी यामानींची बातमी छायाचित्रासकट छापली"
"पुढच मुक्काम होता लंडन. या देशाची भुमिकाही स्वछ होती. कधी नव्हे ते अमेरिकाच्या कच्छपी असलेल्या इंग्लंडनं आता महासत्तेची कास सोडली व इस्त्रायलचा निषेध केला. त्यामुळे इंग्लंडचं काय करायचं ते यामानींना माहित होतं. ते लंडनला उतरले तेव्हा इंग्लंड मध्ययुगीन मागास भागासारखं वाटत होतं. वीज नाही , बँका कोलमडलेल्या, कोळसा संपामुळे रेल्वे बंद आणि नाताळचा सण. यामानींनी इंग्लंडला पूर्वी होता तितका तेल पुरवठा सूरू करण्याचं घोषित केलं व पुन्हा यालाही प्रसिद्धी मिळाली"
हे सारं वाचकाला लख्ख आठवतं, पुढे बेल्जियम, जर्मनी इतकंच काय राजनैतिक संकेत झुगारून तेलमंत्र्यांच्या भेटीला आलेले जपानचे सम्राट काय सगळं वाचक आठवतो आणि पुढे झालेल्या अमेरिकेच्या पचक्याची आठवण होऊन वाचक मनात हसतो आणि उत्कंठेने पुढचे पान उलटतो.
ज्या यामानींना नुसता ताप जरी आला तरी वॉल स्ट्रीट गडगडायचा त्यांची कार्यपद्धती, व्युहरचना आणि मुख्य मणजे देशाभिमान व देशप्रेम बघितलं की त्यांना सलाम ठोकावासा वाटतो. आणि ही राजकारणाची व्याप्ती व त्याचे गरीब देशांवरचे भयावह परिणाम बघितल्यावर त्याकाळी तुलनेने गरीब असलेल्या भारताने ना खेळिया होऊन ना प्यादे बनून म्हणजेच बरेचसे अलिप्त राहून किती बरं केलं असंही वाटून जातं.
थोडक्यात काय तर आंतरराष्ट्रीय राजकारणाची रंजक शैलीत मजा घ्यायची असेल तर हे पुस्तक वाचणे मस्ट आहे. अगदी मिळवून वाचावे असे!
पुस्तकः एका तेलियाने
लेखक: गिरीश कुबेर
प्रकाशकः राजहंस प्रकाशन
आवृत्ती: पहिली
पाने:२४७
किंमतः २०० रुपये
मैसूर
२ महिन्यापुर्वीच मैसूर - ऊटी ला जाउन आलो. तेव्हापसुन मनात होते की तिकडचे फोटु टाकावेत म्हणुन. पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही.
हा मैसूरचा प्रसिद्ध राजवाडा. ज्यानी राजस्थानमधले महाल पाहिले असतील त्यांना यात विशेष असे काही वाटणार नाही. पण राजवाडा छान जतन केलेला आहे. आणि इथली सर्वित्तम गोष्ट म्हणजे राजवाड्यातील तैलचित्रे. इतकी जिवंत तैलचित्रे मी आजवर इतर कोठेही पाहिलेली नाहीत. दुर्दैवाने आत कॅमेरा न्यायला बंदी आहे. त्यामुळे छायाचित्रण करता आले नाही. त्यामुळे राजवाड्याची फक्त बाहेरुनच छायाचित्रे काढुन समाधान मानावे लागले
वृंदावनचे पण फोटो टाकणार होतो पण का कोणास ठाऊक, २० वर्षांपुर्वी जे वृंदावन पाहिले होते ते हे नव्हेच असे वाटले. आता ती शान नाही उरली वृंदावनची. गणेशोत्सवात चिंचेच्या तालमीचे कारंजे पण त्याच तोडीचे असते. त्यामुळे असेल कदाचित पण काही विशेष नाही वाटले खरे.
वृंदावनने केलेली निराशा चक्क मैसूरचे प्राणिसंग्रहालय बघुन दुर झाली. आता झू बघुन खुष होण्याचे दिवस गेले खरे म्हणजे. माकड बघुन लहानपणी जे हसु यायचे ते पण येत नाही आता (मि पा ची कृपा. बरीच माकडे आहेत इथे. रोज आरसाही बघतो. त्याचाही परिणाम असेल कदाचित). पण मैसूर चा झू खरोखर अप्रतिम आहे. काही छायाचित्रे:
वरचा फोटो पुर्ण झूम लावुन काढलेला आहे. त्यामुळे क्लॅरिटी थोडी गंडली आहे.
वरच्या फोटोतला मिपाकर कोण हे ज्याचे त्याने ठरवावे 
लहानपणापसुन मैसूरचे सर्वात मोठे आकर्षण होते महिषासुराचा पुतळा. त्याचा हा पुतळा बघुन अंमळ थोडी निराशाच झाली. माझ्या कल्पनेतला हा पुतळा चांगला ५० -१०० फूट उंच आणि १०-१२ फूट रुंद होता. प्रत्यक्ष पुतळा बघुन पुतळ्याचा बोन्साय बघितल्यासारखा वाटला. माझ्या बरोबर असलेल्य मित्रांची पण थोड्याफार फरकाने अशीच निराशा झाली. तरी "तु अजुन थोडा जाड असला असतास तर असाच दिसला असतास" असे म्हणुन मित्राने त्यातल्या त्यात त्याचे मानसिक समाधान साधुन घेतलेच
हेच ते चामुंडा देवीचे सुप्रसिद्ध मंदीर
मैसूर मध्ये आमचे सर्वात जास्त निराशा केली मैसूर मसाला डोश्याने. मैसूर मसाला डोसा हवा असे म्हणालो की लोक आमच्याकडे फार विचित्र नजरेने पाहायचे. हा डोसा पुण्याच्या शेट्ट्यांनी चक्क मैसूरच्या नावावर खपवला आहे. शेवटी या डोश्यावर तडजोड केली. डोसा होता मात्र अप्रतिम
बाकी उटी भाग -२ मध्ये.
भाषाभान : पुस्तक परिचय
'भाषाभान' या डॉ. नीलिमा गुंडी यांच्या पुस्तकात भाषा आणि संस्कृती यांविषयीच्या मार्मीक निरीक्षणांवर आधारीत काही ललित लेख आहेत. 'भाषाभान' मध्ये ललित आणि वैचारिक स्वरूपाचे लेख समाविष्ट केले आहेत. भाषेविषयीचे भान धारदार करण्याचे काम या लेखांद्वारे होते. यातील डॉ. अशोक रा. केळकर आणि डॉ. नागनाथ कोतापल्ले या दोन जेष्ठ नामवंत अभ्यासकांच्या यातील मुलाखती विचारांना चालना देणार्या आहेत.
लेखीकेने प्रस्तावनेत जरी 'भाषाविषयक', 'भाषेचे' अशा अर्थाचे शब्द वापरले असतील तरी ते शब्द एका अर्थाने 'मराठी' या भाषेसंदर्भात आलेले आहे. संपुर्ण पुस्तकात मराठी भाषा वैयक्तिक कारणासाठी म्हणा की इतर कारणाराठी वापरतांना घ्यावयाची काळजी लेखीकेने अत्यंत मार्मिकतेने सांगीतलेली आहे.
डॉ. नीलिमा गुंडी यांचे बरेचसे साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्यात काव्यसंग्रह, बालकवितासंग्रह, कथासंग्रह, लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहे. त्यांनी विविध पुस्तकांचे संपादन सहाय्यही केलेले आहे. अशा अधिकारी व्यक्तीकडून भाषेविषयीचे भान होणे हे मराठी वाचकांना एक पर्वणी आहे.
या पुस्तकात मुलांची, माणसांची ठेवलेली नावे, लहान मुलांची शब्दसंपत्ती वाढवण्याची शक्ती, शुद्धलेखनात होणार्या चुका, नवतरूणांची भाषा आदी लेख विभाग १ मध्ये आलेले आहेत.
विभाग २ हा मराठी भाषेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. यात मराठी भाषेचे अभिसरण- एक आव्हान व मराठीची आजची स्थिती ह्या दोन लेखात मराठी भाषेला वैश्विक स्तरावर कसे मोठे करता येईल याचे विवेचन आहे. लेखीकेच्या मते भाषा प्रवाही असणे आवश्यक आहे. शालेय स्तरावर व व्यावहारीक स्तरावर साधे वाक् प्रचार कशा पद्धतीने शिकविले पाहिजे याचे विवेचन आहे. भाषा 'श्रवण करणे' अन त्याचा उपयोग लेखनात करणे याचे महत्व त्यांनी 'श्रॄतयोजन: भाषेचा वारसा' या लेखात सोदाहरण पटवून दिलेले आहे. 'वाचन: एक भाषिक कौशल्य' या लेखात वाचन करतांना काय काळजी घेतली पाहीजे हे सांगितले आहे. या लेखातील एक उदाहरण द्यावेसे वाटते: वाक् प्रचारात अर्थसौंदर्याचेही भान हवे. उदा. 'त्याची फे फे उडाली' हे वाक्य वाचतांना 'फे फे' चा 'नेने' सारखा आडनाव समजून उच्चार केला, तर वाचणार्याचीच फे फे उडत आहे, हे जाणवेल.
स्त्रियांची भाषा या विषयी दोन लेख आलेले आहेत. स्त्रियांच्या भाषेत युगजाणीव व्यक्त करण्याची, वास्तव बदलण्याची सुप्त क्षमता आहे असे लेखीका म्हणते. पु. ल. देशपांडे यांच्या 'व्यक्ति आणि वल्ली' व 'अपूर्वाई' या दोन पुस्तकांची रसग्रहणे भाषिक अंगाने आलेली आहेत. आपल्या बालसाहित्यात रुढ भाषेच्या अलिकडची पलिकडची भाषा समाविष्ट आहे का? असा प्रश्न त्या 'बालासाहित्य, बालशिक्षण आणि मुलांची भाषा' या लेखात विचारतात. खरोखर आपले बालसाहित्य या गुणांनी युक्त आहे का? यशवंतांच्या 'आई' कवितेचे परिष्करण' या लेखात कवि यशवंतांनी 'आई' या कवितेत कसे व का बदल केलेत ते स्पष्ट केले आहे.
'भाषा: व्यवस्थेशी निगडीत प्रतिमा' या लेखात भाषाव्यवस्थेशी निगडीत प्रतिमासॄष्टी मराठी कवितेत कसकशा स्वरूपात आढळते, यांचा सोदाहरण शोध घेण्याचा प्रयत्न आहे. विरामचिन्हे, पुर्णविराम, नाम, सर्वनाम आदी मराठी व्याकरणातील संकल्पना हाती धरून मराठी कवितेचा प्रांत मराठी कवींनी कसा समृद्ध केला आहे हे त्यातील उदाहरणांवरून दिसून येते. अनेक कवींनी मराठीत अशा कविता आधीच लिहीलेल्या आहेत. तरीही अशा कवींची संख्या तुलनेने कमी असल्याचे त्या मान्य करतात.
"'म' मराठीचा" या लेखात त्यांनी मराठीचा शिक्षणक्रमात अभ्यास कसा असावा याबाबत मते नोंदवलेली आहेत. आपल्या राजकारण्यांनी अस समाजकारण्यांनी त्या मताचा अभ्यास केल्यास मराठी भाषेसाठी कोणतीही चळवळ उभी करावी लागणार नाही, 'भाष्यलक्षी अभ्यासक्रम' महाविद्यालयांत सर्व शाखांसाठी सुरू करावेत. पहिलीपासूनच मराठी अनिवार्य हवी, आदी त्यांची मते आहेत. "एकंदरीत 'म' मराठीचा' असे बिंबवायला हवे!" हे त्यांचे वाक्य बरेच काही सांगून जाते.
लेखीकेने दोन भाषाधुरीणांच्या मुलाखती घेतल्या होत्या. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ञ डॉ, अशोक केळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या मुलाखती या पुस्तकात समाविष्ट आहेत.
भाषातज्ञ डॉ, अशोक केळकर यांची मुलाखत बर्याच अंगांनी त्यांच्या कार्याबद्दल झाली आहे.
कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची मुलाखत म्हणजे आजच्या मराठीची अवस्था, शिक्षणपद्धती, मराठीचे व्यावहारीक उपयोजन आदिंची सांप्रत अवस्थेवर ओढलेले आसूड आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.
या पुस्तकपरीचयात मी त्या मुलाखतीतील काही भाग विस्तृत प्रमाणात देत आहे, जेणे करून काही लोकांपर्यंत तरी त्याचे शाब्दीक निखारे पोहोचतील व त्यातून अंगार पेटेल.
"नृत्य, नाट्य, शिल्प आदिं कलेच्या विषयांत विद्यार्थ्याला काहीतरी कला सादर करावी लागते. मराठीचा अभ्यास करणार्याला काय साहित्यविषयक कला सादर करावी लागते? त्याचा अभ्यास केवळ वाड:मयाचा अभ्यास, समिक्षा, काव्यशास्त्र, भाषाविज्ञान आदींपुरताच मर्यादित असतो. किती विद्यार्थी केवळ लेखक व्ह्यायचे आहे म्हणून एम. ए. ला मराठी घेतात? काही महाविद्यालयांमध्ये मराठीची केवळ १५० पुस्तके असतांनादेखील तेथे एम. ए. मराठी करण्याची 'सोय' आहे. केवळ विद्यार्थीसंख्या वाढली आहे. गुणात्मक वाढ कमी झाली आहे.मराठी संस्थाच इंग्रजी शाळा सुरू करतात हि उद्विगनतेची बाब आहे. मराठी समाज इंग्रजीला घाबरून गेलेला आहे. महाराष्ट्र शासनाला कोठलेच शैक्षणीक धोरण नाही. पक्ष कोठलाही असो. वीसएक वर्षात कमालीची अनागोंदी शिक्षण खात्यात आहे. शाळा पाहिजे- घेवून जा. महाविद्यालय हवे- घेवून जा. व्यावसायीक शिक्षणसंस्था पाहिजे- उशीर कशाला करता असे महाराष्ट्रीय शासनाचे धोरण आहे. शासन या सर्वांतून पैसा कमावते आहे. मंत्रालयात लोकप्रतिनीधींपेक्षा कारकूनांचे अधीक महत्व आहे. शासनाकडे विचारशक्ती, कल्पनाशक्ती नाही. इतर प्रांतांमध्ये शिक्षणाचे माध्यम त्या त्या प्रादेशीक भाषा आहेत. आपल्याकडे इंग्रजी शाळांमधून लोअरलेव्हल चे मराठी शिकविले जाते. मराठीला प्राधान्य देण्याचे धोरण शासन जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत मराठी सर्वसामान्यांपर्यंत जाणार नाही.
बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील संबंध प्रेममय असले पाहिजे. कालपरवा पर्यंत खेड्यातील मराठी (आणि लोकही) हिणकस असतात असे प्रमाण मराठी वापरणार्यांना वाटत होते. आता ते प्रमाण कमी झालेले आहे. भाषेच्या विकासात सर्वात महत्वाची गोष्ट असते ताठ कण्याचे सरकार. महाराष्ट्र शासनाचा कणा किती ताठ आहे हे आपण पदोपदी अनुभवतोच आहोत.महाराष्ट्रातील वैचारीक घुसळण याघडीला थांबलेलीच आहे. आपण मराठी आहोत आणि सगळे व्यवहार मराठीतूनच करू असा आग्रह सोडू नका".
या प्रदिर्घ मुलाखतीतून बरेच काही शिकण्यासारखे आहे. आपल्यापैकी ज्याला ज्याला मराठीचा अभिमान आहे त्याने त्याने ही मुलाखत वाचलीच पाहीजे. या मुलाखतीचे जळजळीत अंजन प्रत्येकाने आपल्या डोळ्यातून घातले पाहीजे.
खरे पाहता 'भाषाभान' या पुस्तकाचे नाव 'मराठीचे भाषाभान' असे ठेवायला काहीच हरकत नाही.
वाच्यार्थ पोहोचवणारी 'अभिधा' शक्ती, लक्षार्थ देणारी 'लक्षणा' शक्ती आणि व्यंगार्थ (सुचवलेला अर्थ) प्रकट करणारी 'व्यंजना' शक्ती या भाषेच्या तीन शक्ती कार्यरत असतात. लेखीकेने 'भाषाभान' हे पुस्तक या तीन शक्तींना अर्पण केलेले आहे. वाचकांचे मराठी भाषाविषयक भान तल्लख होण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल असा लेखीकेला विश्वास वाटतो.
लेखिकेचे मराठी भाषाविषयीचे कुतूहल आणि सामाजिक भान यांना समतोल विचारांचीही यात जोड मिळाली आहे. यातील लेख लालित्यपुर्ण शैलीमुळे वाचकांना आपलेसे करतील आणि चिंतनशीलतेमुळे त्यांना अंतर्मुखही करतील.
भाषाभान
डॉ. नीलिमा गुंडी, पुणे
प्रकाशकः उन्मेश प्रकाशन, पुणे
प्रकाशनः २००८ किंमतः १५० रू. पाने: १७१
सैपाकाची पथ्ये
नुकत्याच झालेल्या चर्चांमध्ये आयटीमधल्या स्त्रियांना स्वयंपाक करता येत नाही, यावा का, यावाच का, वगैरेवर साधकबाधक आणि लंबीचवडी चर्चा झाली. पण मला या बाबतीत विषय थोडा व्यापक करायचा आहे. फक्त आयटी, किंवा फक्त स्त्रियाच का, स्वयंपाक सगळ्यांनाच करता आला पाहिजे.
मधुशाला यांनी खालील मत मांडलं आहे, ते पटतं...
"स्वयंपाक न येणं ही तुम्हाला एवढी साधी गोष्ट का वाटते? रोज आपण जे खातो ते बनवायला सुद्धा यावं असं का वाटू नये? कमीतकमी प्रयत्न तरी करता येईल की नाही???... आता जर असं असेल की एखादी अवघड गोष्ट येत नाही, उदा. पुरणपोळी, गुळपोळी तर समजू शकतो. पण कुकर सुद्धा लावता येत नाही आणि कधी लावणार सुद्धा नाही या मानसिकतेचं समर्थन कसं करणार???"
आता व्यापक अर्थाने बघता काही लोक म्हणतील की आमचं वय झालंय, भूक कमी झाली आहे, आम्ही रोज खातच नाही... पण त्याने प्रश्न बदलत नाही. स्वयंपाक आला पाहिजे हे खरंच. आपला स्वयंपाक रोजच दुसऱ्याने करून द्यायला काय आपण बिल क्लिंटन लागून गेलोय का? (क्लिंटनने तरीही वर एकदा 'मी जेवलोच नाही' हे 'मी धूर आत घेतलाच नाही' च्या थाटात सांगितलं होतंच - अरे पण धूर बाहेर सोडलासच ना गधड्या...)
मुळात व्यापकपणे चर्चा करायची झाली तर स्वयंपाक या शब्दालाच आक्षेप घेता येईल. या शब्दाची व्याख्या लोकशाहीच्या व्याख्येच्या अंगाने करता येते. स्वयं + पाक = स्वतः केलेला, स्वतःसाठीचा, फक्त स्वतःचा पाक. ही व्याख्या अर्थातच अत्यंत स्वार्थी आहे हे उघड आहे. स्वयं हा शब्दच सध्या थोडा डागाळलेला आहे - हा त्याच शब्दाचा स्वयंदोष असावा. आता स्वयंसंपादनच घ्याना... त्यातही या स्वार्थी छटा आहेत म्हणूनच संपादकांनी तो अधिकार काढून घेतला आहे. एखाद्या टीनेजरकडून स्वयंपाक करण्याचा हक्क कुणीही पालक काढून घेईलच ना, तसंच. त्यांनी उगाच खोडसाळपणे भलत्या ठिकाणी स्वयंपाक करून ठेवला तर? असो. थोडे भरकटलो. पण स्वयंपाकाऐवजी मी सैपाक हा जास्त घरगुती शब्द वापरणं पसंत करेन. त्याचा अर्थ व्यापक आहे - एकाने एकट्यासाठी, एकाने फक्त दुसऱ्यासाठी, किंवा दोघांनी मिळून एकमेकांसाठी, किंवा अनेकांनी एकत्र या सगळ्यांना तो शब्द सामावून घेतो.
चला. व्याख्या तर पुरेशी व्यापक झाली. आता आपण मूळ मुद्द्याकडे वळूया. सैपाकाविषयी काही गोष्टी मधुशाला यांच्या प्रतिसादातून स्पष्ट आहेत.
-सैपाक सगळ्यांनाच करता आला पाहिजे. येत नसेल तर तो सगळ्यांनी शिकून घेतला पाहिजे.
-शिक्षण लग्नाआधीच व्हावं. एकदम लग्न झाल्यावर आता खायचं काय असा प्रश्न पडू नये. चांगल्या शिक्षणासाठी सराव आवश्यक आहे.
-गुळपोळी, पुरणपोळी वगैरे जमलं नाही तरी हरकत नाही. किंवा काही व्हेजिटेरियनाना नळीफोड पाककृती जमत नाहीत, ते समजून घेता येतं.
-पण कुकर लावता येत नाही, साधी शिट्टी काढता येत नाही आणि मी शिकणारही नाही ही मानसिकता चांगली नाही.
यावरून मलाही काही मुद्दे सुचले
-सैपाक करताना एकमेकांच्या चवी लक्षात घेऊन त्यानुसार बेत करावेत. शेवटी व्हरायटी हाच मसाला आहे.
-सैपाक व जेवण करताना दोघांचंही पोट भरेल अशी सोय पहावी.
-सैपाक करणं पुरुषांना देखील व्यवस्थित आलं पाहिजे. किमान योग्य तिथे मदत करता आली पाहिजेत.
-आधुनिक उपकरणांनी काही काम सोपं होतं.
-पाककृतींची पुस्तकं, व व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. ती जरूर वापरावीत.
इतक्या व्यापक विषयाचे सगळेच पैलू छोट्याशा चर्चाप्रस्तावात मांडता येत नाहीत. हॉटेलमध्ये खाणे, सैपाकाला बाई ठेवणे, कायम बायकोनेच सैपाक करणे, निरनिराळ्या देशाच्या पाकपद्धती, सैपाक करताना कष्ट कमी व्हावेत म्हणून अर्गोनॉमिकल विचार... या सर्वांविषयी तुम्हाला काय वाटतं ते जरूर लिहा. सैपाकाच्या अधिक पाककृती मिपावर याव्यात का? सैपाकाची कुठची कामं पुरुषांना व कुठची स्त्रियांना आलीच पाहिजेत का? स्त्रीमुक्तीच्या दृष्टीकोनातून या प्रश्नावर काय विचार करता येईल? वगैरे वगैरे... आणि हो, आधीच्या चर्चांमधले काही निवडक प्रतिसाद नव्या दृष्टीकोनातून लोकांनी पहावे असं वाटलं तर तेही डकवा (दुवे नकोत). अशीच आधीची एक उद्बोधक चर्चा या दुव्यावर पहायला मिळेल.
मराठी अल्बम
माझा एक मित्र अतिशय सुंदर कविता करतो. स्वभाव बुजरा असल्याने ह्या कविता कुठेही प्रकाशित केलेल्या नाहीत. पण खरंच सुरेख कविता आहेत आणि मी शेवटी त्याला संगित देऊन त्याचा म्युजिक अल्बम बनवण्यासाठी प्रवृत्त केले आहे. आता पुढचा प्रश्न आहे हे कसे जमवायचे. मिपावर बर्यापैकी कलाकारांची उठबस असते, मिपाकर प्राजु ह्यांनी नुकताच अलबम प्रकाशित केला आहे, तेव्हा हा प्रश्न इथेच मांडायचा ठरवले.
कवितांना संगीत देऊन त्याचा बर्यापैकी निर्मिती मूल्ये असणारा अल्बम काढण्यास साधारण किती खर्च येतो.
फडकवा आपला लाडका तिरंगा....पण सुलटा!
फडकवा आपला लाडका तिरंगा....पण सुलटा!
आपण सगळेच आपल्या "तिरंगी" ध्वजाचे अभिमानी आहोत. जेंव्हां मी आपला ध्वज उलटा लावलेला पहातो तेंव्हां माझं तर रक्तच उसळतं!
एक अनुभव माझा स्वतःचा!
साधारणतः सर्व आंतरराष्ट्रीय परिषदांत परिषद संपल्यावर एक 'ओली' मेजवानी देण्यात येते व त्यात परिषदेत ज्या ज्या सभासदांनी भाग घेतलेला असतो त्या त्या देशांचे ध्वज एका विशाल फलकावर लावले जातात. एकदा जर्मनीतील अशाच एका परिषदेत माझ्यासारखे इतरही भारतीय प्रतिनिधी असल्याने आपला तिरंगी ध्वज लावला होता, पण (बहुदा) अज्ञानामुळे उलटा लावलेला होता (हिरवी पट्टी वर ठेऊन). माझ्या शेजारी एक ओळखीचा जर्मन प्रतिनिधी उभा होता. ही चूक मी त्याच्या निदर्शनास आणून दिली. त्याने ज्या चापल्याने तिथल्या स्टाफला बोलावून तो सरळ करवला त्यावरून तोही या घटनेला किती महत्व देत होता हे सहज लक्षात येत होते.
तो ठीक केल्यावर त्याने व नंतर त्या परिषदेच्या व्यवस्थापक वर्गातील एका वरिष्ठानेही येऊन माझ्याकडे चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करून माफीही मागितली!
ती चूक नक्कीच अनवधानाने झाली होती.
पण माझे परमप्रिय (!) पाकिस्तानी नेते मुशर्रफ आग्र्याच्या शिखर परिषदेला PIAच्या खास विमानाने आले त्यावेळीही आपला ध्वज उलटा लागलेला बर्याच जणांनी पाहिला असेल! ते विमान भारतीय भूमीवर उतरल्यावर (मला वाटते अमृतसर येथे) ती चूक लक्षात आली व ती त्यांच्या शिष्टमंडळाच्या लक्षात आणून दिल्यावर आपला तिरंगा सुलटा करण्यात आला, मगच ते विमान पुढे गेले.
ही चूक अनवधानाने झाली नसणार! सरकारी पातळीवर अशा चुका होत नाहींत. कारण 'प्रोटोकॉल' विभागाचे लोक असल्या गोष्टी दहा वेळा तपासतात. आपल्या सरकारबरोबर वाटाघाटी करण्यासाठी येणारा सरकारी पाहुणा अशी चूक करणे शक्य नाहीं. पण 'झाली असेल एक वेळ' असे जरी मानले तर आपले परराष्ट्रमंत्री नुकतेच इस्लामाबादला गेले असता त्यांच्या उपस्थितीतही हीच मग्रूरी पुन्हा दिसली. मला तर वाटते कीं ही मुजोरी पाकिस्तानी सरकार मुद्दाम करते.
हे दुवे पहा:
http://www.youtube.com/watch?v=MDn9KJP0fsI (यात ध्वजाची चूक चिदंबरमसाहेबांच्या लक्षात आलेली दिसत नाहीं!)
http://www.youtube.com/watch?v=BKwxX7dwO9Y&feature=related
http://www.youtube.com/watch?v=yCTMmhXLGe4&feature=related
मग माझ्या मनात आलं कीं आपण आपल्या तिरंगी ध्वजाला नवे रूप कां देऊ नये जेणेकरून आपला ध्वज आडव्या आसावरही सारखा (symmetrical) असेल! तसे केल्यास आपण पाकिस्तानला नाकावर अंगठा ठेवून "टुक टुक माकडा" (Thumb your nose) करू शकू! अशाने आपल्याला सहजासहजी त्रस्त करण्यातला एक भाग काढून टाकला जाईल!
म्हणून पायाभूत रंगसंगतीत कांहींही बदल न करता व अशोक चक्रासारखे चिन्हही मध्यावरच ठेऊन मी एक नव्या रूपात आपला तिरंगी ध्वज योजला.
यात सध्याच्या निरंगी ध्वजाचा अवमान करण्याचा अर्थातच हेतू नाहींय्. उलट त्याला एक नवे आणि सरस रूप द्यायचा प्रयत्न मी केला आहे.
खालचा दुवा उघडल्यास आपल्याला हे नवे रूप पहाता येईल. ते पाहून आपले मत मला कळवावे ही विनंती.
http://lh6.ggpht.com/_O27mefLixak/TE4-qkaVLMI/AAAAAAAACCA/mB5MNELOlqM/Mo...
धन्यवाद व प्रणाम.
सुधीर काळे
'मिश्किली' - ई-बुक प्रकाशित
प्रस्तावना...
भावनिक प्रस्ताव मांडला की तिची प्रस्तावना होत असते. शब्दांना छेडायचं, शब्दांनाच वेढायचं अन् निकालातही काढायचं एकंदर असाच काहिसा हा मामला. मामला रंगात आला की कामला होत असते. म्हणून काही श्यामलेचे महत्व कमी होत नाही. श्यामलतेतच श्याम व लता वेलीँचा संकर घडून येत असतो...
अशा प्रकारच्या शाब्दिक कोट्यांची कोट्यावधी उड्डाणे घेण्याचा मोह आंतरजालावर कळा दाबतांना होत आलाय. कळा दिल्या तरच पुढे कुणाला तरी लळा लावता येत असतो. म्हणून जास्त कुथत किँवा थुंकत न बसता मी मूळ मुद्द्यावरच येतो...
पडद्यावर लिहिणे ही एक कलाच. ते वाचून प्रतिसाद देणे ही तर महाकला. कलेकलेने घेत गेल्याने किलोकिलोचे माप पदरात पडते. अशाच काही मिश्किल विषयांना स्पर्श करीत गेलेली ही 'मिश्किली' आपणासारख्या पडदे(स्क्रिन) व तावदाने(विँडोज) वाचणाऱ्या/ लिहिणाऱ्यांना जरूर पसंत पडेल अशी आशा आहे...
तसं पाहिलं तर मुद्रित क्षेत्रात आम्ही उणीपुरी दहा वर्षे वेचली तरी म्हणावी तशी मुद्रा उठली नसतांना जालावरच्या शब्दकुसुमांना आपल्या हवाली करणं हे एक धाडसच. परंतु 'राजे' बोलले अन् दिल हालले. 'मीम'कारांनी मनावर घेतलं अन हे शब्दचित्र पानावर ओतलं. माझं पहिलं ई-पुस्तक सादर करण्याचा पहिला मान त्यांनाच आहे असे मी मानतो. मिश्किल लेखांच्या लिंका आपणापुढे प्रकाशित झाल्याचा डंका पिटावा तितका कमीच ठरेल. आता जे काही लिहायचे उरलेय ते वाचक-लेखकांच्या हाती सोपवितो...
- डॉ.श्रीराम दिवटे.
पुस्तक 'इथे' वाचा...
ई टिव्ही मराठी वरची मालिका: श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी
ई टीव्ही मराठी वर सोम- शुक रात्री ९:०० वाजता "श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी" ही मालिका सुरू झालेली आहे.
नितीन चंद्रकांत देसाईंनीच ही सुद्धा मालिका बनवली आहे. त्यांची यापूर्वीची मालिका "राजा शिवछत्रपती" ही स्टार प्रवाह वरून प्रसारित व्हायची आणि ती गाजली असून त्याच्या आता डी.व्ही.डी. सुद्धा निघाल्यात.
"श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी"ही मालीका सुद्धा नक्कीच छान जमून आली आहे असे माझे मत आहे.
मालिकेची मला जाणवलेली वैशिष्ट्ये-
- श्रीमंत निर्मिती मूल्ये
- चित्रपटाला लाजवेल असे भव्य सेट
- थरारक, जीवंत युद्धचित्रण
- सर्वच कलाकारांची उत्तम निवड
- बाजीरावाची संवाद्फेक उत्तम आणि लाजवाब
- कथेची उत्तम मांडणी
जे बघत नसतील त्यांनी ही मालीका बघावी असे सुचवावेसे वाटते.
मिसळपाव वरचे जे सदस्य ही मालीका बघत असतील तर येथे त्या मालिके विषयी, त्यातील पात्रां विषयी, इतर संबंधीत गोष्टी आणि त्या अनुषंगाने मूळ कथा या संदर्भात चर्चा करण्यासाठी हा प्रस्ताव.
पावनखिंडीतली लढाई - ३५०वा स्मृतीदिन - २७ जुलै २०१०
काही दिवसांपूर्वी ही माहिती कळली. ती इथे प्रसिद्ध करायची विनंती झाली म्हणून हे प्रकाशित करत आहे.
***
नमस्कार,
येत्या २७ जुलैला पावनखिंडीतील रणसंग्रामाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने मी पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड असे पालखी घेऊन पदभ्रमण करायचे ठरविले आहे. आपल्या सहकार्यानेच हा ३५० वर्षांपूर्वींचा इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे. ह्या मोहिमेत सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करूया. सानथोर सर्व शिवप्रेमी ह्या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. सर्वांनाच तो ऐतिहासिक प्रसंग अनुभवता यावा असेच मोहिमेचे नियोजन केलेले आहे. तसेच आपल्या मित्रमंडळींना सुद्धा ह्या कार्यक्रमाची माहिती द्यावी.
कळावें,
आपला नम्र,
अमित मेंगळे.
९८६९ १० ९९ ७०.

