शिक्षण

बालपणीचा काळ सुखाचा! १४

माझ्या मोठ्या भावाला मी आणि माझा धाकटा भाऊ दादा म्हणायचो.त्यामुळे हळूहळू वाडीतले इतरही बरेचसे लोक त्याला दादा च म्हणायला लागले. ह्या दादा शब्दामुळे घडलेला हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. कारण आज भाई हा शब्द ज्या कारणाने प्रसिद्ध आहे(गुंड ह्या अर्थी) तसाच माझ्या लहानपणी दादा हा शब्द प्रचलीत होता. म्हणजे घरात दादाचा अर्थ मोठा भाऊ असा होता तरी सार्वजनिक जीवनात दादा म्हणजे नामचीन गुंड समजला जायचा.

हा प्रसंग घडला तेव्हा मी सहावीत होतो आणि दादा आठवीत होता. धाकटा भाऊ तिसरीत होता. गंमत म्हणजे मी आणि दादा जवळपास एकाच उंचीचे म्हणजे साधाराणत: साडेचार फूट उंच होतो. अंगापिंडानेही तसे अशक्तच होतो. मात्र दादा काटक होता आणि लहान चणीचा असूनही त्याच्यापेक्षा थोराड एकदोघांना सहजपणे भारी पडायचा.त्यामुळे वाडीत त्याच्या वाटेला क्वचितच कुणी जात असे. तरीही तो गुंड वगैरे प्रवृत्तीचा नव्हता आणि स्वतःहून कधीही कुणाची खोडी काढणार्‍यापैकी नव्हता. मी मात्र अगदीच लेचापेचा होतो आणि दुसर्‍याला मार देण्यापेक्षा मार खाण्यात जास्त पटाईत होतो. आम्ही तिघे भाऊ आणि आमच्या बरोबरीचे आणखी तीन सवंगडी असे सहाजण मिळून बागेत खेळायला गेलो. बागेत आम्ही सोनसाखळीचा खेळ खेळत होतो.खेळ मस्त रंगात आलेला आणि त्याच वेळी माझ्या वर्गातला पुराणिक नावाचा एक मुलगा त्याच्या दोन मित्रांबरोबर बागेत आला. त्याने आम्हाला खेळताना पाहिले आणि स्वत:ही खेळायची इच्छा व्यक्त केली पण आमचा डाव अर्ध्यावर असल्याने आम्ही त्याला दूसरा डाव सुरु झाल्यावर खेळवू असे सांगितले. थोडा वेळ तो गप्प बसला पण आमचा डाव काही संपेचना तेव्हा त्याचा धीर खचला आणि तो आमच्या मध्ये मध्ये तडमडायला लागला. असे करताना त्याने दोनवेळा मला तोंडघशी पाडले. हे पाहून मी त्याची तक्रार दादाकडे केली. दादा लांब उभा होता त्याला मी हाक मारून म्हटले, "दादा! इकडे ये. हा बघ मला त्रास देतोय."
दादा जवळ आला आणि त्याने पुराणिकला समजावून सांगितले की असे करू नकोस म्हणून तरी पुराणिक काही ऐकेना. तो दादाला उलटून बोलला. अरे-जारेची भाषा बोलायला लागला. पुराणिक माझ्या आणि दादापेक्षा अंगापिंडाने मजबूत होता त्यामुळे तो आम्हाला मुद्दाम त्रास देत होता हे दादाच्या लक्षात आलं. समजूत घालून देखिल पुराणिक ऐकत नाही म्हटल्यावर दादा त्याला म्हणाला,"हे बघ पुराणिक! तू बर्‍या बोलाने ऐकणार नसशील तर मग मला तुला वेगळ्या पद्धतीने समजवावे लागेल."
त्याबरोबर पुराणिक म्हणाला,"काय करणार आहेस तू? स्वत:ला दादा समजतोस काय?"
त्यावर दादा म्हणाला, "त्यात समजायचे काय आहे? आहेच मी ह्याचा दादा!"
त्यावर पुराणिकने त्याला आव्हान दिले आणि म्हटले, "हिंमत असेल तर मला हात लावून दाखव.उगीच टूरटूर नको करूस."
तरीही दादाने त्याला समजवायचा प्रयत्न केला पण त्याचा उलटा परिणाम झाला आणि पुराणिकनेच दादाला ढकलून दिले.
इतका वेळ शांत असलेला दादा भडकला आणि त्याने पुराणिकची कॉलर पकडली आणि एका झटक्यात त्याला खाली लोळवले.पुराणिकला हे नवीनच होते. आपल्यापेक्षा लुकड्या मुलाने आपल्याला इतक्या सहजपणे खाली लोळवलेले पाहून तो चटकन उठला आणि त्वेषाने दादावर चाल करून गेला. दादा सावध होताच. दादा त्याच्या पटात घुसला आणि पुराणिकला त्याने आपल्या डोक्यावर उचलून धरले आणि क्षणार्धात जमिनीवर आपटले. पुराणिकला जागोजागी खरचटले आणि तो अक्षरश: रडकुंडीला आला. त्याने कसेबसे आपल्याला सावरले आणि लांब पळून जाता जाता तो जोरात ओरडला," दादा! आता बघतोच तुला. थांब, मी आता माझ्या दादाला घेऊन येतो आणि तुझा समाचार घेतो." असे म्हणून बघता बघता तो दिसेनासा झाला.
आम्ही सगळ्यांनी जल्लोष केला आणि मग पुन्हा खेळायला सुरुवात केली.

एक दहापंधरा मिनिटांनी पाहतो तो सात-आठ जणांची टोळी घेऊन पुराणिक खरंच हजर झालेला होता. आता मार खावा लागणार हे लक्षात घेऊन आम्ही सगळे घाबरट लोक दादाच्या मागे लपायचा प्रयत्न करायला लागलो. तेव्हढ्यात त्यांच्यातल्या एक्या टग्याने मला धरले आणि खाली वाकवून माझ्या मानेवर एक जोरदार फटका(चॉप) मारला. (हा चॉप नावाचा फटका त्या वेळी दारासिंगबरोबर फ्रीस्टाईल खेळणार्‍या मायटी चॅंग नावाच्या एका चिनी मल्लाच्या नावाने प्रसिद्ध होता.) त्याबरोबर मी मान धरून खालीच बसलो. असेच एकेकाचे बकोट पकडून त्या लोकांनी आम्हाला मारायला सुरुवात केली. दादा मधे पडत होता आणि आम्हाला सोडवायचा प्रयत्न करत होता पण त्यात त्यालाही यश येत नव्हते. शेवटी दादा सोडला तर बाकी आम्ही सगळे धारातिर्थी पडलो हे पाहून त्यातल्या म्होरक्याने दादाला आव्हान दिले आणि म्हणाला ,"अच्छा! तूच काय तो दादा. इतका चिंट्या दिसतोस तरी ही हिंमत? माझ्या ह्या (पुराणिककडे बोट दाखवून)मित्राला तुच मारलेस ना? मग चल आता तुझी दादागिरी माझ्यासमोर दाखव."

हा जो पुराणिक टोळीचा दादा होता त्याचे नाव होते विनायक...पण सगळे त्याला विन्यादादा म्हणूनच ओळखत आणि तो खरोखरीचा दादा(गुंड) होता. मात्र माझा भाऊ ज्याचे नाव विनय...(ह्यालाही वाडीतली त्याच्यापेक्षा मोठी मुले विन्या च म्हणायची) तो केवळ मोठा भाऊ म्हणून दादा होता. तेव्हा आता सामना गुंडदादा विरुद्ध नुसताच दादा यांच्यात होता.विन्यादादा हा टक्कर मारण्यात पटाईत असा त्याचा सगळीकडे बोलबाला होता. खरं तर त्याचे नाव ऐकूनच भलेभले टरकायचे पण माझा दादा कुणाला घाबरणार्‍यातला नव्हता. रेडे कसे टकरा देत लढतात तशा पद्धतीच्या टकरा मारण्यात विन्या प्रसिद्ध होता. तो स्वतःच्या डोक्याने प्रतिस्पर्ध्याच्या नाकावर टक्कर मारून त्याला नामोहरम करायचा. अशा नामचीन गुंडाबरोबर दादाचा सामना होता म्हणजे खरे पाहता सामना एकतर्फी होता. पण माझा दादा अतिशय शांत होता आणि विन्याच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून होता. बघता बघता विन्या चार पावले मागे गेला आणि क्षणार्धात त्याने पुढे येऊन दादाला टक्कर मारली. दादा सावध होता आणि त्याने टक्कर चुकवली तरीही त्याच्या नाकाला विन्याच्या डोक्याचा निसटता स्पर्श झाला आणि नाकातून रक्त वाहायला लागले. पण त्याच वेळी विन्या समोर जाऊन जमिनीवर कोसळलेला पाहून दादाने त्याला उठायला फुरसत न देता त्याच्यावर तुफान हल्ला केला. त्याला अक्षरश: लाथाबुक्यांनी तुडवले. दादा विन्याला उठायची संधीच देत नव्हता आणि विन्याचे ते इतर साथीदार हतबुद्ध होऊन हा विपरीत प्रकार पाहात होते.आजपर्यंत त्यांच्या दादाने कधी असा मार खाल्लेला नसावा बहुतेक त्यामुळे कुणीच त्याच्या मदतीला येण्याची हिंमत करत नव्हते हे पाहून मलाही जोर आला. मान दुखत होती तरी मी उठून पाठमोर्‍या पुराणिकच्या पेकाटात जोरात लाथ हाणली. माझे बघून आता आमचे इतर सवंगडीही उठले आणि त्यांनी त्या इतर साथीदारांवर जोरदार हल्ला केला. आमच्या ह्या अनपेक्षित प्रतिकाराने ते साथीदार वाट मिळेल तिथे पळत सुटले आणि आता आम्ही सगळ्यांनी मोर्चा विन्याकडे वळवला. आम्ही सगळ्यांनी मिळून मग विन्याला अक्षरश: बुकल बुकल बुकलले. शेवटी विन्या निपचित पडला तेव्हा कुठे आम्ही भानावर आलो. मग विन्याला तिथेच सोडून आम्ही सगळे जखमी वीर आपापल्या दुखापती कुरवाळत,कधी कण्हत तर कधी आपल्याच पराक्रमावर खुश होऊन हसत वाडीत परतलो.

मार खाल्यामुळे,मारामारी केल्यामुळे एकेकाचे अवतार पाहण्यासारखे होते. अशा अवस्थेत घरी जाणे म्हणजे आईचा मार ओढवून घेणे हे आम्हाला पक्के माहीत होते म्हणून आधी आम्ही विहीरीवर गेलो. तिथे स्वच्छ हातपाय,तोंड धुतले, कपडे ठीकठाक केले आणि मगच घरी गेलो. माझी मान तर कमालीची दुखत होती पण सांगणार कुणाला आणि काय? मी आपला तसाच जेवलो आणि गुपचुप झोपलो पण झोप कसली येतेय. मग आपोआप कण्हणं सुरु झालं आणि आईच्या लक्षात आलंच. मग काय झालं म्हणून विचारलं तिने, त्यावर खेळताना पडलो मानेवर असे खोटेच सांगितले.आईने तिच्या हळुवार हाताने तेल लावून मालीश करायला सुरुवात केली आणि मी बघता बघता झोपी गेलो.

साधे सोपे गणित.....

खालील समीकरणांमध्ये योग्य ती गणिती चिन्हे घालुन उत्तर ६ आणा.
गणिती समीकरणांचे सर्व नियम लागू.
त्या त्या अंकांशिवाय इतर कोणताही अंक वापरु नये.
उदा. २ + २ + २ = ६
६ + ६ - ६ = ६
मी २ सोपी उदाहरणे सोडवुन दाखवली आहेत.आता उरलेली सोडवा.

१ १ १ = ६
२ २ २ = ६
३ ३ ३ = ६
४ ४ ४ = ६
५ ५ ५ = ६
६ ६ ६ = ६
७ ७ ७ = ६
८ ८ ८ = ६
९ ९ ९ = ६

"चला, गाणं शिकुया, समजून घेउया!" - भाग १

राम राम मंडळी,

शीर्षक वाचून दचकलात ना? Smile

पण घाबरू नका, मी काही इथे आपल्याला गाणं शिकवण्याकरता आलेलो नाहीये कारण मी स्वत:च अजून एक विद्यार्थी आहे. आणि म्हणूनच माझ्या लेखाचं शीर्षक मी, 'चला गाणं शिकवतो, समजावतो!' असं न देता 'चला, गाणं शिकुया, समजून घेऊया!' असं दिलं आहे! Smile

असो..!

एक गोष्ट नमूद करू इच्छितो ती अशी की इथे मी गाण्यातल्या काव्याविषयी, त्याच्या चाली/संगीताविषयी न बोलता ते गाणं कश्या रितीने गायलं गेलं आहे या विषयावर बहुत करून बोलणार आहे. प्रत्येक गाण्याला एक गायकी असते. मी त्या गायकीविषयी बोलणार आहे. मला ती गायकी कशी दिसली, कुठे आवडली याबाबत माझं म्हणणं मी आपल्याशी शेयर करणार आहे. त्यामुळे कदाचित येथील काही वाचक मंडळींचा एखाद्या गाण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलूही शकेल, ती मंडळी ते गाणं अधिक चांगल्या प्रकारे, डोळसपणे एन्जॉय करू शकतील असं मला वाटतं म्हणून हा लेखनप्रपंच! एखाद्या गाण्याच्या गायकीविषयी काही गोष्टी समजून घेतल्या तर आपल्यालाच ते गाणं अधिक चांगल्या रितीने गाता येईल, ते ऐकतांना अधिक चांगल्या रितीने ऐकल्याचा आनंद मिळेल. कारण प्रत्येक मनुष्य जेव्हा गाणं ऐकत असतो तेव्हा तोही ते गाणं मनातल्या मनात गातच असतो. त्याकरता कुठे जाहीर गायलं पाहिजे असं नाही, ष्टेजशो वगैरे केले पाहिजेत असंही नाही. गाण्यासारखा दुसरा सोबती नाही, त्यामुळे एखादं गाणं समजून घेऊन स्वत:पुरतं गातांनाही मजा येते. त्यातला स्वानंद सर्वात महत्वाचा! सबब, गाण्यातली काही सौंदर्यस्थळे समजून घेऊन, जाणीवपूर्वक ते गाणं मनातल्या मनात का होईना, परंतु अधिक चांगल्या रितीने गाता यावं, गुणगुणता यावं असं वाटणार्‍यांकरता हा लेखनप्रपंच! Smile

एखादं गाणं आपल्याला का आवडतं? याची ढोबळमानाने उत्तरं द्यायची झाली तर त्या गाण्याची चाल/संगीत खूप छान असतं, संबंधित गायक/गायिकेचा आवाज खूप छान असतो, त्या गायक/गयिकेने ते गाणं खूप चांगल्या रितीने गायलेलं असतं, इत्यादी काही उत्तरे मिळतील. यापैकी आपण 'गायक/गायिकेने ते गाणं खूप चांगल्या तर्‍हेने गायलेलं असतं' या मुद्द्यावर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत.

बाबूजी, दिदी, आशाताई इत्यादी मंडळी एखादं गाणं खूप छान गातात तसं मला गाता येत नाही. असं का बरं होतं? फक्त त्यांचा आवाज माझ्यापेक्षा कितीतरी अधिक छान असतो म्हणून? नाही, एवढं एकच कारण नक्कीच नाही. इतरही अनेक कारणं आहेत. ह्या मंडळींनी गायलेलं एखादं गाणं ऐकायला खूप छान वाटतं यामागे ह्या मंडळींचा आवाज, त्याचा पोत हे मुख्य क्वालिफिकेशन आहे/असतं हे मान्य! परंतु 'आवाज' हे एवढं एकच कारण नसतं! मुख्य मुद्दा असतो तो त्यांच्या गायकीचा. स्वर ठेवण्याच्या, स्वर लावण्याच्या पद्धतीचा. गाण्यातली अदृष्य लय अतिशय लीलया सांभाळण्याचा, संगीतकाराने त्या गाण्यात ठेवलेल्या खास खास जागांचा, शब्दांच्या उच्चारांचा!

आता पहिलं उदाहरण म्हणून आपण खूबसूरत सिनेमातलं पंचमदांनी संगीत दिलेलं आणि आशाताईंनी गायलेलं 'पिया बावरी' हे गाणं पाहू. हे माझ अतिशय आवडतं गाणं आहे. हे गाणं आपल्याला येथे ऐकता येईल व येथे पाहताही येईल. आज पहिलाच भाग आहे म्हणून आज आपण फक्त या गाण्याच्या अस्थाईबद्दल बोलू, त्यातली गायकी समजून घ्यायचा प्रयत्न करू. आज आपल्या सगळ्यांच्या गुरू आहेत या गाण्याच्या गायिका आशाताई! चला तर मंडळी. आशाताईंना मनोमन वंदन करून व्हा तैय्यार! गाणं समजून घेण्याचा हा पहिला धडा गिरवायचा आपण सगळेच प्रयत्न करू! आधी म्हटल्याप्रमाणे मीही एक विद्यार्थीच आहे तेव्हा माझंही काही चुकू शकतं. तसं काही चुकलं तर अवश्य सांगा, मला ती चूक कबूल करायला जराही संकोच वा कमीपणा वाटणार नाही! Smile

'निसागम निधप' या सरगमने या गाण्याची सुरवात होते. यात 'निसागम' हा आरोह आहे व 'निधप' हा अवरोह आहे. 'निसागम' या आरोहानंतर 'निधप' हा अवरोह आशाताईंनी किती सुरेख गायला आहे पाहा! 'नि' वरून किती सुरेख वळण घेऊन त्या 'धप' या अवरोहावर येतात ही माझ्या मते शिकण्यासारखी गोष्ट आहे!

हा सरगम पूर्ण करून लागलीच त्या 'पिया बावरी..' ही अध्ध्या त्रितालातली चीज गाऊ लागतात व अतिशय सुरेलतेने 'बावरी' शब्दातल्या 'री' वर सम घेतात. एका क्षणात त्यांची स्वर-ताल-लय यांच्यावरची हुकुमत दिसून येते व आशाताईंनी या गाण्याचा संपूर्ण ताबा घेतल्याचे आपल्या लक्षात येते!

पिया बावरी, पिया बावरी, पी कहा, पी कहा, पिया पिया बोले रे, पिया बावरी!

'पी कहा, पी कहा' हे शब्द कसे टाकले आहेत पाहा व त्यानंतर लगेच 'पिया पिया बोले रे' या शब्दांतलं लयीला धरून असलेलं चापल्य किती सुरेख आहे पाहा! चापल्य हा शब्द मी अश्याकरता वापरला की पुढे लगेच 'पिया बावरी' हे शब्द घेऊन सम गाठणं महत्वाचं आहे! 'पिया पिया बोले रे' या शब्दांनंतर 'पिया बावरी' हे शब्द घेऊन आशाताई इतक्या सुंदर रितीने समेवर येतात की अगदी ऐकत रहावसं वाटतं. तालास्वरालयीवर घट्ट पकड, कुठेही शब्दांची खेचाखेच नाही की मोडतोड नाही! इथे आपल्याला आशाताईंच्या गायकीचा आनंद मिळतो अन् मन प्रसन्न होतं! लगेच पुढच्या आवर्तनात त्यांनी 'बावरी' शब्दातल्या 'बा' वर इतकी जीवघेणी जागा घेतली आहे की की क्या केहेने! साला, दिल एकदम खुश होऊन जातो! Smile

असो,

तर मंडळी, आज प्रस्तावनेचा हा पहिलाच भाग आहे तेव्हा आपल्याला जास्त त्रास न देता इथेच थांबतो. पुढील प्रत्येक भागात आपण एखाद्या गाण्यातलं धृवपद व एखादा अंतरा यातलं सौंदर्य बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते मी माझ्या परिने शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीन. बसंतच लग्न या मालिकेत मी मला आवडणार्‍या काही रागांचं सौंदर्य उलगडून दाखवायचा प्रयत्न केला आहे. तशी मला आवडणार्‍या काही गाण्यांबद्दल लिहिण्यासाठी मी ही लेखमाला सुरू करत आहे. आपल्याला आवडली, त्यातून काही चांगले विचार मिळाले तर चांगलंच आहे, नाय आवडली तर द्या सोडून...! Smile

-- तात्या अभ्यंकर.

व्याकरण आणि वृत्त

मराठी व्याकरण -- विशेषतः वृत्ते (भुजंगप्रयात, मंदाक्रांता इ.) ह्यांची सोपी माहिती आंतरजालावर उपलब्ध आहे का?

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग दुसरा : प्रमुख व्यक्तिरेखा
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष

आता एक गोष्ट बघू...
एक मुलगा सकाळी उठून शाळेत जातो , त्याचा रिझल्ट कळतो, त्याला शाळेत पहिला आल्याबद्दल बक्षीस मिळतं आणि तो आनंदानं घरी येतो.

ओके..गोष्ट बरी आहे, पण मला त्यातून का मजा येत नाही?
त्यात अजिबात संघर्ष नाही...
शाळेत पहिला आला नाही तर काय होईल ते कळत नाही...
व्हॉट इज ऍट स्टेक? काय पणाला लागलंय?

एका दुसर्‍या मुलाने खूप स्पर्धा निर्माण केली आहे आणि पहिला नंबर येणार्‍या मुलाला दिल्लीला विज्ञान प्रदर्शनात थेट जायला मिळणार आहे...
किंवा त्याला वडिलांनी कबूल केलं आहे की पहिला आलास तर या वर्षी सगळे सिंगापूरला जाऊ.
किंवा तो नेहमी पहिला येतो पण या परीक्षेच्या वेळी त्याचे वडील खूप आजारी होते आणि त्याने पहिलं यावं अशी त्यांची शेवटची इच्छा होती...ते त्याला पूर्ण करायलाच हवी..
ही झाली प्रेरणा...ध्येय म्हणजे नातेसंबंध टिकवणे,स्वाभिमान जपणे ...अडचणी म्हणजे तीव्र स्पर्धा, वडील आजारी, पेपर अवघड निघणे वगैरे...पहिला नंबर आणणे ही झाली कृती...
______________________

कोणत्याही गोष्टीसाठी सर्वात महत्त्वाचा भाग... संघर्ष नसला तर कोणतीही गोष्ट रटाळ, कंटाळवाणी होणार..
उदा.
i] एखादं पात्र गरज नसताना, कोणीही विचारलं नसताना त्याच्या आयुष्याबद्दल माहिती देत राहतं..
ii]स्थलकाल, इतिहास, निसर्ग याबद्दल अति माहिती देणं.. लेखकाचं जास्त संशोधन झालं असलं की त्याला ते सारं गोष्टीत आणावंसं वाटतं.
iii]गरज नसताना नवनवीन पात्रं फ़क्त विनोदनिर्मितीसाठी आणली जातात, अशाचा जाम कंटाळा येतो.

या चुका कशा सुधाराव्यात?
i]पात्रांची माहितीसुद्धा संघर्षातूनच मिळावी. ( उदा.एखादं पात्र आरोप करतंय, प्रश्न विचारतंय आणि दुसरं पात्र काहीतरी लपवालपवी करतंय, त्यातून होणार्या संघर्षातून पात्रांची माहिती मिळावी)..
ii]वाचकाला किंवा प्रेक्षकाला समोर घडणार्या घटनांसंदर्भातच रिलेव्हंट माहिती अपेक्षित असते, उगाच ऐतिहासिक , नसर्गिक गोष्टींच्या खोलात शिरण्याची गरज नाही.
iii]पात्रांची संख्या मर्यादित असूद्या., एखाद्या प्रसंगामुळे / दृश्यामुळे / व्यक्तिरेखांमुळे मुख्य पात्रांच्या नातेसंबंधांमध्ये काहीही बदल होत नसेल, तर मुख्य थीमशी संबंधित नसलेले अनावश्यक प्रसंग सरळ निर्दयपणे कापून टाकलेले उत्तम.

संघर्षाचे काही प्रकार

आंतरिक संघर्ष : इच्छा, हक्क आणि कर्तव्य यासंदर्भात
मनातलाच बर्यावाईटाचा संघर्ष
बर्याचदा हा संस्कारासंदर्भात असतो.
बाह्य संघर्ष : व्यक्ती आणि नातेसंबंधातला संघर्ष
पठडीतला हीरो आणि व्हिलन यांच्यातला संघर्ष

समाजामधले इतर संघर्ष : व्यावसायिक / राजकीय / जातीय / धार्मिक
___________________________________________________
आणखी एक वेगळ्या प्रकारचे वर्गीकरण मी ऐकले ..त्यावरून माझ्या आवडत्या सिनेमामधली थेट उदाहरणेच देतो..

१. शक्ती... ..दिलिपकुमार आणि अमिताभ यांच्यात आंतरिक संघर्ष ...वडील आणि मुलगा दोघे प्रोटॆगनिस्टच पण त्यांच्यातला संघर्ष अधिक गडद. आणि बाह्य संघर्ष तो (अमिताभ + दिलिपकुमार) आणि अमरीश पुरी यांच्यात. इथे अमरीश ऎंटागनिस्ट...साधारणपणे ऎंटागनिस्ट बाह्य संघर्षाचे कारण असतो..आणि अमिताभच्या मनातले द्वंद्व म्हणजे अंतर्गत आंतरिक संघर्ष...!!?

. सरफ़रोश : पोलीस ऒफ़िसर आणि आतिरेकी यांच्यातला बाह्य संघर्ष पण अजय राठोड आणि सलीम यांच्यातला आंतरिक संघर्ष
...आणि या आतिरेकी कटाचा सूत्रधार अजय राठोडच्या ओळखीचा पाकिस्तानी गायक असणं, ही वाढती गुंतागुंत आणि शेवटी याला मारू की नको असा अजय राठोडचा अंतर्गत आंतरिक संघर्ष !!!?

३. मला अजिबात न आवडलेला सिनेमा ... मैं प्रेम की दीवानी हूं... ( हाहाहाहाहा) .....
राजश्री फ़िल्म्स च्या साधारणपणे सगळ्याच फ़िल्म्समध्ये संघर्षच आधी खूप कमी... सगळं गोग्गोड... बरं असलाच तर कोणीतरी आजारी पडतं, अपघात होतो,पत्र उशीरा मिळतं आणि गैरसमज होतो असला नियतीवर आधारलेला योगायोगी बाह्य संघर्ष... त्यात अगदीच दम नसतो असं माझं वैयक्तिक मत.

४. काही आंतरधर्मीय विवाहाचे सिनेमे... यात पोरांचे आई-बाप अगदी ऎंटागनिस्ट दाखवले जातात बर्‍याचदा... मग त्यामुळे तेच बाह्य संघर्ष आहेत असे वाटायला लागते, मग शेवटी ते यांना माफ़ वगैरे करतात हे पचनी पडत नाही... त्यासाठी आधीच आईबापांचा विरोध हा आंतरिक संघर्ष मानला पाहिजे , आणि सामाजिक परिस्थितीचा त्यांच्यावरचा दबाव हा बाह्य संघर्ष..

संघर्ष कसा वाढवावा?

नुसतंच टोमणे मारणं, किरकिर करत भांडणं म्हणजे संघर्ष नव्हे..त्यातून काहीही बदल घडत नाही. प्रोटॆगोनिस्टच्या अडचणी व संकटं वाढवत नेणारा, त्याला अधिकाधिक संकटात पाडणारा संघर्ष हवा.त्यासाठी व्यक्तिरेखांवर दबाव वाढत जायला हवा..

काय पणाला लागलंय? ध्येय गाठलं नाही तर काय संकट येणार आहे हे ठरणं महत्त्वाचं..

आयुष्य, प्रेम, संपत्ती, आरोग्य, स्वाभिमान जेव्हा यावरच संकट कोसळतं तेव्हा मग मुख्य पात्र निकराने झगडतं... आपलं ( प्रेमाईसनं ठरवलेलं ) ध्येय गाठण्यासाठी अविश्रांत मेहनत करतं...
आणि या संघर्षातूनच त्याच्यात मोठा बदल घडतो आणि त्यातूनच ते पात्र धडा शिकतं... ( हेच ते तात्पर्य / कथाबीज)

हीरोला अधिकाधिक अडचणीत आणण्यासाठी मुख्य गोष्टीमध्ये काही उपकथानकं ( सबप्लॊट्स) तयार करता येतात.
परंतु ही उपकथानकं मुख्य गोष्टीला विरोध करणारी किंवा पाठिंबा देणारी किंवा त्यासाठी वाचकाला तयार करणारी म्हणजेच संबंधित हवीत.. उदा. खूनी शोधायच्या कथेत डिटेक्टिव्ह हीरो खुनी स्त्रीच्या प्रेमात पडला की गुंतागुंत झालीच.

संघर्ष वाढवण्यासाठी आवश्यक असलेले प्लॊट मोटिव्हेटर्स.
सूड, संकट,पाठलाग, द्वेष,प्रेम,दु:ख, वियोग, बंडखोरी, फ़सवणूक,स्वार्थत्याग, छळ, स्पर्धा, संशोधन,महत्त्वाकांक्षा, सर्व्हायव्हल.

प्रेरणा ध्येय अडचणी कृती

संघर्ष गडद करण्यासाठी प्रेरणा ध्येय अडचणी कृती या गोष्टी सतत चढत्या भाजणीने घडाव्या लागतात.

आता हे एक वाक्य बघू... (सुनील शेट्टी / सनी देओल यांच्या सिनेमात नेहमी असणारी परिस्थिती)
आपल्या वडिलांवरील चोरीचा आळ घालवण्यासाठी अर्जुनला एका साक्षीदाराला घेऊन न्यायालयात वेळेवर पोचणं आवश्यक आहे, हे माहित असल्याने राणाठाकूर आपल्या गुंडांना अर्जुनला अडवायला पाठवतो, अर्जुनला हे आधीच कळल्याने तो त्यातल्या काहींना गुंगारा देतो आणि न्यायालयाबाहेर उरलेल्यांशी तुफ़ान हाणामारी करून साक्षीदाराला न्यायालयात वेळेत पोचवतो आणि वडिलांना वाचवतो... .

आता या वाक्याचे तुकडे पाडू...

प्रेरणा : वडिलांवरील चोरीचा आळ घालवण्यासाठी
ध्येय : साक्षीदाराला घेऊन न्यायालयात वेळेवर पोचणं आवश्यक
अडचणी : गुंडांना अर्जुनला अडवायला पाठवतो
कृती : गुंगारा आणि हाणामारी

motivation goal obstacles action या गोष्टी योग्य क्रमाने घडत राहिल्या की व्यक्तिरेखासुद्धा फ़ुलतात, संघर्ष उत्कर्षबिंदूला पोचतो...

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग दुसरा : प्रमुख व्यक्तिरेखा
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष

" नाट्यलेखन काय क्लासमध्ये शिकवून येतं का रे? "
" काय एवढं शिकवतात रे लेखन कार्यशाळेत? "
अशा काही सीनियर नाटकवाल्याच्या प्रश्नांना तोंड देत देत आम्ही एक दोन लेखन कार्यशाळांमध्ये जाऊन शिकून वगैरे आलो... मग तिथून प्रेरणा घेत घेत आंतरजालावरती बरंच लेखनतंत्राविषयी वाचलं... पटकथा लेखन शिक्षण आणि नाट्यलेखन शिक्षण या विषयावर आंतरजालावरती प्रचंड साहित्य उपलब्ध आहे, त्यातलं काही वाचून समजून घेतलं, मजा आली...स्वत:च्या लेखनासाठी याचा उपयोग झालाच आणि समीक्षणात्मक लेखनासाठीही नेहमी उपयोग होतो. सरावासाठी घरचा अभ्यास दिलेला आहे काही संस्थळांवरती...तोही भलताच मजेदार आहे...हॊलीवूड मधल्या काही पटकथा,संवाद संस्थळावर उपलब्ध आहेत..त्यांचं या निमित्तानं वाचन झालं..

दरम्यान काही स्क्रीनरायटिंगचा कोर्स केलेली / करणारी काही मंडळी दोस्त झाली... यांनी लेखनतंत्रासाठी पाठ्यपुस्तक म्हणून वापरलेली काही पुस्तके सांगितली, त्यांचा अभ्यास झाला.या सार्‍या अभ्यासातलंच काही इथे थोडक्यात क्रमश: देण्याची इच्छा आहे....

इथे एक स्पष्टीकरण आवश्यक आहे की इथे दिलेले सगळे नियम किंवा ठोकताळे तारतम्याने घ्यायचे आहेत.... प्रत्येक ठिकाणी ते लागू पडणारच असा माझा कोणताही दावा नाही आणि कोणीही करू नये...कुठेकुठे कदाचित काही विसंगतीही सापडण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या आवडत्या कथा / नाटक / चित्रपट अशा कलाकृतींना यातले बरेचसे ठोकताळे फ़िट्ट बसतात असे समजत जाते तेव्हा झकास वाटते.
अजून एक म्हणजे प्रत्येक इंग्रजी शब्दाला मला प्रतिशब्द सापडला नाहीये, तिथेतिथे मी त्यासाठी थोडासा प्रयत्न केला पण त्यातच अडकलो नाही, पुढे लिहीत गेलो आहे.

terminology...यातल्या प्रत्येकावर पुढे काही भागांत लिहिणार आहे.
1.premise.
2.plot
3.dramatic structure
4.protagonist
5.conflict
6.rhythm
7.genre
8.dialogue
9.progression of play...

१. premise...प्रिमाइस याला चपखल मराठी शब्द मला सुचला नाही.. कथासार, कथाबीज, किंवा तात्पर्य वगैरे जवळ जाणारे शब्द आहेत पण प्रिमाईस ला ते अचूक वाटत नाहीत. असो..ते फ़ारसे महत्त्वाचे नाही.मी सध्या याला प्रिमाईसच म्हणेन. (काही लोक यालाच वन लाईन स्टोरी असे म्हणतानाही ऐकले आहे .ते असो.)
लिहायला सुरुवात करण्यापूर्वी आपला प्रिमाईस तयार असणे उत्तम.... आपल्याला नक्की काय सांगायचंय? तेच का सांगायचंय? आणि कुठवर कसं सांगायचंय? अशा प्रश्नांची उत्तरे माहित असायलाच हवीत... प्रत्येक दृश्य, प्रत्येक संवाद, प्रत्येक नवीन व्यक्तीरेखा तुमच्या मूळ प्रिमाईसशी सुसंगत आहे का हे पाहणे अत्यंत आवश्यक असते.प्रिमाईस साधारणपणे गोष्टीतल्या मूलभूत मानवी भावनेबद्दल सांगतो.

उदा. समजा आपली गोष्ट मत्सराबद्दलची आहे. मग मत्सराबद्दल आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे ते ठरलं पाहिजे.
म्हणजे मत्सरामुळे सर्वनाश होतो
मत्सरामुळे मानहानी होते.
मत्सर माणसाला एकटा पाडतो.
मत्सरामुळे माणूस प्रेमाला पारखा होतो.
आता यातलं काहीतरी एक नक्की केलं की आपलं कथासार तयार होणार.

प्रिमाईस मध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आल्या पाहिजेत.
१.भावना २.संघर्ष ३.निराकरण / गोष्टीचे ध्येय.
उदा. रोमिओ आणि जुलिएट चा प्रिमाईस असा होईल... सच्चं प्रेम मृत्यूवरही मात करतं.

कोणत्याही नाटकाला / गोष्टीला सुस्पष्ट प्रिमाईस नसला की बरेच गोंधळ निर्माण होतात.थातुरमातुर प्रसंग, नको त्या व्यक्तिरेखा वाढत जातात ...खुद्द लेखक गोष्ट पूर्ण होईपर्यंत गोंधळून जातो. लेखकाला नक्की काय सांगायचंय ते वाचकाला / प्रेक्षकाला कळेनासं होतं...

कधीकधी एखादा साधासा विचार, कल्पना किंवा प्रसंग यापासून गोष्ट सुरू होऊ शकते परंतु लिहिता लिहिता लवकरात लवकर प्रिमाईस तयार होणे आवश्यक असते.

प्रिमाईस जसाच्या तसा संवादात येऊ नये... प्रेक्षकांना तो गोष्ट संपताना आपोआप कळायला हवा... आणि प्रिमाईस काहीही असला तरी लेखकाला तो शेवटी सिद्ध करता यायला हवा.

आणखी एक सांगायचं म्हणजे आपल्या अत्यंत आवडत्या नाटकाचा / सिनेमाचा प्रिमाईस तयार करणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नसते पण तो एक मजेदार खेळ होऊ शकतो. ... या धाग्यात असा खेळ खेळून पाहूयात काय?

प्लॉट ( कथानक ?)
प्लॉट म्हणजे विशिष्ट प्रसंगांची, ठराविक क्रमाने केलेली, भावना उद्दिपीत करणारी अर्थपूर्ण मांडणी..
कथानकाशेवटी व्यक्तिरेखेच्या आयुष्यात अर्थपूर्ण बदल घडला पाहिजे.योगायोग नको.( उदा. गरीब कष्टाळू माणसाला शेवटी यश मिळते असा संदेश देताना हीरोला शेवटी लॊटरी लागते आणि तो श्रीमंत होतो , हे चूक...मान्य आहे,असं खरं घडू शकतं...लॊटरी काय कोणालाही लागू शकते पण या हीरोला लॊटरी लागली तर आपला प्रिमाईस खोटा पडला ना.... ).

नुसतंच खरं आयुष्य हे प्रत्येक वेळी परिणामकारक लेखन होऊ शकत नाही...अगदी रिअलिस्टिक नाटकातसुद्धा खर्‍या आयुष्याचा केवळ भास घडतो.पण तेच जसंच्या तसं खरं आयुष्य नव्हे.खर्‍या आयुष्यात बर्‍याचदा कार्यकारणभाव नसतो . पण प्रत्येकाला कार्यकारणभाव असलेल्या भासमान विश्वाची गरज असते आणि गोष्ट ती गरज पूर्ण करते.म्हणून नाटकाची गोष्ट संपूर्ण काल्पनिक किंवा संपूर्ण सत्य नसते तर ती या दोन्हींचे सुयोग्य मिश्रण असते.

ऍरिस्टॉटलचे ड्रामॆटिक स्ट्रक्चर

सुरुवात : यात पहिल्या १० % भागात स्थल,काल,व्यक्ती यांच्याबद्दल माहिती देणारे प्रसंग घडतात.
मध्य : पुढच्या ७५ % भागात नाट्यमय ताण वाढत जातो आणि आणीबाणीच्या परिस्थितीत अत्युच्च ताणापाशी क्लायमॆक्स, इथून माघार अशक्य.
शेवट : आणि मग उरलेल्या १५ % भागात ताणाचे निराकरण आणि तात्पर्य समजते.

(क्रमशः)

बालपणीचा काळ सुखाचा! १३ बायमावशी!

आमच्या घरात तसे फारसे धार्मिक वातावरण नव्हते. थोडीफार पूजा-अर्चा रोज नित्यनेमाने चालत असे.पण सोवळे-ओवळे,अभिषेक किंवा जप-जाप्य असली कर्मकांडे नव्हती. एक छोटीशी फळी ठोकलेली भिंतीत(हाच देव्हारा),त्याच फळीवर एखादी तसबीर आणि समोर छोट्य़ा ताम्हणात तीन चार पितळी मूर्ती असत.त्यातील एक शंकर,दुसरा गणपती,एक कोणती तरी देवी(लक्ष्मी की पार्वती? आठवत नाही) आणि लंगडा बाळकृष्ण.पूजा आईच करायची पण कधी अडचण असली तर मग आम्हा मुलांपैकी कुणी तरी करत असू.अर्थात पूजा म्हणजे स्वच्छ फडक्याने तसबीर साफ करायची,सगळे पितळी देव पुसायचे(आठवड्या्तून एकदा त्यांना आंघोळही घातली जायची), हळद-कुंकू वाहायचे,थोडी फुले वाहायची... की झाली पूजा. हाय काय नी नाय काय.

शाळेत गीतापठण,श्लोकपठण वगैरे असल्यामुळे ते सगळे पाठ होते. संध्याकाळी इतर उजळणी बरोबर त्याचीही उजळणी व्हायची. आता माझाच विश्वास बसत नाहीये,तर तुमचा काय बसणार म्हणा,पण त्या काळात मला रामरक्षा,अथर्वशीर्ष,मनाचे श्लोक, गीतेतले २,१२ आणि १५ असे अध्याय,झालेच तर संस्कृत सुभाषिते,मोरोपंतांच्या आर्या आणि असेच काही मिळून कितीतरी गोष्टी पाठ होत्या. अगदी मधनंच कुठूनही सुरु करायला सांगितले तरी न अडता,अस्खलितपणे घडाघडा म्हणून दाखवू शकत असे, असा मी घनपाठी होतो. असो. गेले ते दिवस! आता थोड्या वेळापूर्वी काय केले हेही आठवत नाहीये. Smile

मुख्य दिवाळी संपली की देवदिवाळीच्या आधी येणारे तुळशीचे लग्न आमच्या वाडीत बर्‍याच जणांकडे साजरे व्हायचे. मात्र त्यात पहिला मान ह्या बायमावशींकडच्या तुळशीच्या लग्नाचा. वाडीतल्या जवळपास सगळ्या बायका अगदी नटून थटून त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांसह येत असत. एरवी दिवसातनं एखादेवेळ पाणी घालण्या व्यतिरिक्त ज्या तुळशीकडे फारसे लक्ष नसायचे तिला आज भलतेच महत्व यायचे. ज्या डब्यात ती तुळस लावलेली असायची(बहुदा डालडाचा डबाच असायचा)त्या डब्याला बाहेरून गेरू फासला जायचा. मग त्यावर खडूने स्वस्तिक आणि कसली कसली नक्षी काढली जायची. तुळशीला जरीच्या हिरवाकंच खणाने गुंडाळले जायचे. समोर सुगंधी उदबत्ती,धूप लावला जायचा. तुळशीचा नवरा म्हणजे लंगडा बाळकृष्ण एका ताम्हणात घालून आणलेला असायचा. मग दोघांच्या मध्ये आंतरपाट म्हणून वापरायला नवा कोरा पंचा आणलेला असायचा.हळद कुंकु,ओटीचे सामान वगैरे सगळी जय्यत तयारी झाली की मग खास मला बोलावणे पाठवले जायचे. मी म्हणजे ते लग्न लावणारा पुरोहित असायचो.

अहो आता लग्नात भटजी काय म्हणतात कुणाला कळतंय? मलाही त्यातलं काही येत नव्हतंच. तसं मी बायमावशीना सांगितलं की त्या लगेच म्हणायच्या, "मी म्हणते, लग्नात ते मेले भटजी काय म्हणतात ते त्यांचं त्यांना तरी समजतंय काऽऽऽऽय?तुला जे काय श्लोक-बिक येतात नाऽऽऽऽ ते तू म्हण. आमच्या तुळशीबायला आणि बाळक्रिष्णाला चालेऽऽल बरं का! तू काऽऽऽऽऽऽही काळजी करू नकोस. मग मी हात जोडून संध्येला म्हणतात ते (माझी नुकतीच मुंज झालेली होती) "केशवायनम:,माधवाय नम:,गोविंदायनम: इतके म्हणून सुरु करायचो. माझे बघून बायमावशी सगळ्या पोरांना हात जोडायला लावत.

रामरक्षा,मनाचे श्लोक,गीतेचे तीन अध्याय,अथर्वशीर्ष आणि अजून जे जे काही म्हणून माझे पाठ होते ते सगळे म्हणायला मला किमान एक-दीड तास लागत असे. मी जे काही म्हणत असे त्याचा अर्थ माझ्यासकट कुणालाच समजत नसे . पण मोठ्या बायकांना माझे कोण कौतुक. पोरगं काय धडाधड संस्कृत बोलतंय.त्यावेळचे त्यांच्या चेहर्‍यावरचे ते कौतुकाने ओसंडून जाणारे भाव पाहिले की मलाही मी फार मोठा पंडित असल्यासारखा वाटायचो.निदान त्या क्षणी तरी मला हवेत तरंगल्यासारखे वाटायचे.
हे सगळं झालं की अक्षता वाटल्या जायच्या. मग तुळस आणि बाळक्रिष्णाच्या मध्ये आंतरपाट धरून कुणा हौशी बाईने रचलेली मंगलाष्टकं म्हटली जायची आणि शेवटी "शुभ लग्न सावधान" च्या गजरात अक्षता टाकून हे लग्न लागायचे की तिकडे मुलांनी लक्ष्मीबारचा धुमधडाका सुरु केलेला असायचा. त्यानंतर मग आम्हा चिल्लर पिल्लर लोकांना आवडणारा खाऊ मिळायचा तो म्हणजे उसाचे कर्वे,चिंचा,बोरं,बत्तासा आणि पुन्हा नव्याने बनवलेले ताजे दिवाळीचे पदार्थ. भटजींची दक्षिणा म्हणून मला सव्वा रुपया आणि एखादे शर्टाचे कापड मिळायचे. झालंच तर काही फळंही त्या बरोबरीने असायची. हे सगळे घेऊन ऐटीत मी घरी जात असे.काही म्हणा ते क्षण अक्षरश: मंतरललेले(मंत्र म्हणायचो म्हणून असेल! Wink )होते.
बायमावशींचं माझ्या बालपणातले स्थान हे माझ्या सख्ख्या मावशांपेक्षाही जास्त जवळचे होते. ११वीत जाईपर्यंत दरवर्षी मी ह्या नाटकात सक्रीय भाग घेत होतो. त्यानंतर शिंग फुटली म्हणा किंवा मनात संकोच निर्माण व्हायला लागला....कोणतेही कारण असो. मी ह्यातनं माझं अंग काढून घेतले.
(इथे बायमावशी पुराण संपले.)

फुक्कटचे पाटील

रामराम मित्रांनो,
"पाटील" .... खेड्या-पाड्यातली एक मानापानाची पदवी. आपल्या महाराष्ट्रातील खेड्यांत 'पाटलां'ना फार आदराने
संबोधलं जातं. लग्न असो वा मयत, शालेय समारंभ किंवा गावची जत्रा..." पाटील" लोक नेहमी पूढाकार घेत अलेत आणि
जनताही हेच अपेक्षित करते. थोडक्यात काय तर "पाटलां"शिवाय पान हालत नाही.
पण हे झाले मानाचे 'पाटील' .....

पाटलांची अजुन एक जमात आहे . हे आपल्या कर्माने 'पाटील' होतात. त्यासाठी , खालिल अटी लागु होतात,
थोड्याश्या स्तुतीने हूरळून जाऊन टग्या लोकांना चहा मिसळपाव खाऊ घालणे, "ढूंगणा"ला ठिगळ लागलेले
असले तरी निवडनूकीला ऊभे राहुन स्वता:चा आण्णू गोगोट्या करुन घेणे, जमिनी विकून स्कोर्पियो घेणे
(या पाटलांना "गुंठामंत्री" असे स्पेशल नाव आहे )
आता त्या स्कोर्पियोचा एवढा पानऊतारा झालायं यांच्या मुळे की , तुम्ही जर स्कोर्पियो घेतली तर लोक आधी विचार करतात
याने जमिन काढली वाट्ट. यांना 'अ' म्हणता 'ढ' लिहिता येत नाही ... पण खिश्याला पार्करचं पेन असतं.
हे 'पाटील' आपल्या आजूबाजूला सहज सापडतील...
मला एक असाच 'पाटील' आठवतो.

इंजिनियरींग ला कॉलेजात असताना, असाच एक पाटील होता ( योगायोगानं 'अडं'नावाने आणि कर्मानं)
राजू पाटील , मू.पो. जळगाव. यांच्या घरची परिस्थिती बेताचिच... वडिलांनी पोटात पोट काढून चिरंजीवांना इंजिनियरींगला
टाकलं. पहिल्यांदाच पूण्यात आलेले. ऊन्हाळ्यात घामाच्या धारा वाहील्या तरी 'गरमागरम' चहा ढोसू शकणारे महा'भाग'.
यांना पोरी पटवायचा नाद.मध्यम उंची, रंग अतिकाळा (यांच्या मता प्रमाणे पोरी काळ्यांवरंच फिदा होतात,
"उगाचं नाय आपण आपल्याला आसा ठीवला" असा अभिमानाने सांगणारा , तरीही फेअर & हँड्सम फासणारा)...
वजन; कपडे,पायतान आणि तेरेनाम स्टाईल केस धरुन ३७ किलो ३४७ ग्राम.
आख्ख्या होस्टेल वर "दानपेटी" म्हणून प्रचलित /प्रसिद्ध काय ते. कारणे सांगून, भावनाविवश करुन पैसे काढून घेण्यात निपूण,
आणि बाता आसल्या मोठ्या हाणाव्यात की आपल्याला एवढ्या महान व्यक्तीचा सहवास लागल्याचा अत्यानंद होऊन ह्रुदयविकार
व्हावा. यांनी आक्ख्या इंजिनियरींग मधे कधी चारचौघात खिशात हात घातल्याचे स्मरणात नाही.
झालं. कॉलेजच्या एका पोरीशी चुकून जवळीक झाली... पाटलांचा खिसापैसा त्यांनाच पूरत नव्हता.. त्यात हे हायफाय
पोरीला फिरवायचे स्टंट करु लागले. नेहमी हक्काने अस्मादिकांची यामाहा घेऊन जात (अति घनिष्ट मैत्रि असल्याने विचारने म्हणजे
तो दोस्तीचा अपमान होतो अशी पाटलांची समजूत ) आता यामाहाच ती.. तीची तहान मोठीच... यावर पण पाटील एक बकरा
शोधून तिची तहान भागवत. मग पोरीला स्वखर्चाने (?) सिनेमे दाखवणे, आता पोरगी ऊच्चअपेक्षा आणि यांचा स्वभावच मोठा
असल्या कारणाने अलका, मंगला, लक्ष्मीनारायण असल्या लो लेव्हल च्या सिनेगग्रुहात न जाता , ई-वर्ग(e-square),
शहर-अभिमान(city pride) किंवा आयनॉक्स थेटरात सूवर्णवर्गाचंच टिकीट काढलं जाई. जोश्यांकडे न जाता , चकाचक
काचांच्या मॅकडोनाल्ड काकांच्या जोरात्-अन्न ग्रुहात 'पाटील' मोठ्या थाटानं जात. आठ्वड्याला उसणं-पासणं करून का होईना
एक गिफ्ट घेतलं जाई. आणि पोरीने मलप्रुष्टावर लाथ हाणली की पाटील वरच्या आवाजात "आमू लै पूरी फिरवल्या भो " अशी
सिंहगर्जना करणारे आमचे पाटील ,,,, आयुष्यभर लक्षात रहातील.....

अशी पाटीलकी करणारी माणसं आपणं रोज आजुबाजुला बघतो...
"खिशात नाही आना.. अन बाजिराव म्हणा" काय असले पाटील आपल्या परीचयात आहेत ?
असल्यास लिहायला लाजू नका !!

आपला
कुबड्या पाटील

मातृशक्ती विरुद्ध मातृभाषा.

मे च्या सुट्टीत बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग आला. या निमित्त्याने आमच्या पुतणीच्या गावी मागच्या आठवड्यात गेलो होतो. आमचा नातू २ -१/४ वर्षाचा झाल्याअसल्या मुळे त्याला बालवाडीत ( के जी त )टाकण्याचा उत्साह त्यांच्या घरात वाहत होता. मी ही त्या गडबडीत सहभागी झालो होतो. त्याचे नवीन जोडे, नवीन गणवेश, छोटीशी पिशवी, ओळखपत्र इत्यादीचा थाट काय वर्णावा? घरात त्याच्या जाण्याचे, आवरासावरीचे आणि रडण्याचेही कौतुक होते.

तो शाळेत गेल्यावर सहजच विचारले की येथे मराठी शाळा चांगली आहे ना? म्हणजे बालवाडी ते १० वी पर्यंत परत विचार करायला नको ना. माझा या प्रश्नावर माझ्या पुतणीने माझ्याकडे अगदी कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकला. "अहो, काका, त्याला इंग्रजी शाळेत टाकण्याचा विचार आहे. पुढे मागे आता इंग्रजी माध्यमच राहणार आहे ना"!

मी प्रचंड अस्वस्थ झालो. मग माझ्या परीने आणि माझ्या सर्वोच्च वादविवादाने तिला मराठी माध्यम कसे चांगले आहे हे सांगण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. कधी तिच्या चेहऱ्यावर गोंधळ कधी नेमके खरे काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न चालू आहे हे मला समजायला लागले.

पण मला वाटत होते की त्याला परकीयाच्या माध्यमात टाकण्याचा विचार आमच्या जावयाचा असावा. त्यामुळे मी ते बाहेरुन येताच माझ्या मराठी शाळेच्या विचाराचे सूतोवाच केले. इंग्रजी माध्यम कसे खर्चीक आहे आणि मराठीची मुले कसे पुढे जात आहे हे सांगण्याचा प्रयत्न सुरू केला.

माझ्या समजुतीच्या आणि अपेक्षाच्या पलीकडे त्यांनी माझ्या पुतणीवर अगदी उघड हल्ला सुरू केला. अहो, काकाजी, मी मागच्या सहा महिन्यापासून किती समजावीत आहे पण ही ऐकेल तर शपथ? आता मराठीच्या माध्यमात काय कमी आहे? आपल्या घराचे चांगले संस्कार मराठीत होतात ना? उद्या इंग्रजी माध्यमात याने एखाद्या मुलीशी सलगी केली तर? तेथे वातावरण कसे असते हे आपण ऐकत असतोच ना? ( इंग्रजी माध्यमात मुलीशी सलगी करता येते याचाही शोध मला प्रथमच लागला. ). मीही शाहजुक पणे त्यांना अनुमोदन देत म्हटले की अहो आपल्या घराला बट्टा लागेल ना? नको ती इंग्रजी शाळा. पुतणी माझी निरुपाय पणे ऐकत होती. आता एकदा दोनदा चक्कर मारून त्याची शाळा बदलण्याचे पुण्यकृत्य बाकी आहे. आई जगदंबा यश देवो.

पण सर्वसाधारणपणे समाजात बघितले तर असे जाणवते की इंग्रजी माध्यमाचा सोस आयांना जास्त दिसतो. आपला मुलगा फाडफाड इंग्रजी बोलतो आहे याचे स्वप्न त्यांना भुरळ पाडते आहे असा माझा अनुभव आहे. आपल्या आर्थिक, बौद्धिक आणि कौटुबिंक क्षमतेच्या पलिकडे त्या इंग्रजीचे मोहजालात पडलेल्या दिसत आहे.

एकदा माझ्या मित्राची बायको आमच्याकडे आली असता तिला माझा मुलगा मराठीत शिकतो याचे नवलच वाटले. ती परत परत विचारत होती की मराठी वि़ज्ञान आणि गणित कसे असू शकते? ( हॉउ वंडरफुल ना? ). मित्राला माझे मराठी प्रेम माहित असल्यामुळे त्याची फजिती स्पष्ट दिसत होती.

माझ्या एका मित्राने मला असे सांगितले की या आयाच आपल्या भाषेला बहिष्कृत करत आहे.

मातृभाषा आणि विकृत मातृशक्तिचा लढा कोण जिंकेल काही समजत नाही.

बऱ्याच दिवसापासून माझ्या डोळ्यासमोर शंकराला पायदळी तुडवणाऱ्या काली चे चित्र दिसत आहे. शंकराच्या शिवाच्या भूमिकेत मराठी भाषा आहे आणि कालीच्या भूमिकेत सगळ्या इंग्रजीचा आग्रह धरणाऱ्या आया दिसत आहे. कालाय तस्मे नम: म्हणावे नाही तर काय?

ऑनलाईन मराठी -> इंग्रजी डिक्शनरी

जालावर फिरत असताना हि डिक्शनरीची लिंक सापडली....


http://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/

http://dsal.uchicago.edu/dictionaries/vaze/

खालील दोन ग्रंथांचे इ-रुपांतरण केलेले दिसते ....

Molesworth, J. T. (James Thomas). A dictionary, Marathi and English. 2d ed., rev. and enl. Bombay: Printed for government at the Bombay Education Society's press, 1857.

Vaze, Shridhar Ganesh. The Aryabhusan school dictionary, Marathi-English. Poona: Arya-Bhushan Press, 1911.

गमतीचा भाग म्हणजे या प्रकल्पा साठी आर्थिक मदत अमेरिकेच्या शिक्षण खात्याने केली आहे ..
बघा ... अमेरिका मराठीसाठी आर्थिक मदत करते; संमेलने भरवु इछ्छिते आणि आपण नुसता विरोध करतो ( ह्.घ्या.)