नमस्कार. भारतीय सेनेमध्ये महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल नावाजले गेलेले मूळचे परभणीचे असलेले कर्नल समीर गुजर हे माझे मित्र! हे सांगताना अतिशय अभिमान वाटतो! नुकताच त्यांच्या सहवासाचा योग आला. सेनेमध्ये इतक्या उच्च पदावर व दायित्वावर असूनही जनतेसोबतचं त्यांचं आत्मीयतेचं वागणं- बोलणं, गावच्या लोकांसोबत व समाजासोबत असलेली त्यांची बांधिलकी, इतक्या उंचीवर पोहचूनही त्यांचं डाउन टू अर्थ वागणं हे खूप जवळून बघता आलं. त्यांच्याकडून त्यांच्या वाटचालीतले काही किस्से ऐकायला मिळाले. माझे गावचे मित्र म्हणून हे लिहावसं वाटलं. आणि सेनानी घडतो कसा, हेही लोकांसोबत शेअर करावसं वाटलं.
निमित्त झालं बुलढाणा जिल्ह्यातल्या किनगांव राजाच्या व परभणीजवळच्या हट्टा इथल्या शाळेतल्या आकाश दर्शन सत्रांचं! त्यांच्या आप्तांच्या ह्या शाळा. तिथल्या विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शन कार्यक्रम घ्यावा ही समीरजींची इच्छा होती. त्या ठिकाणच्या शाळेतले कार्यक्रम, शिक्षक व पालकांचा उत्साह, तिथे समीरजींनी केलेला संवाद, मुलांसाठी काही सकारात्मक असं देण्याचं समाधान, आकाशातल्या गमती बघताना मुलांना होणारा आनंद असं बरच काही अनुभवायला मिळालं. आणि त्याशिवाय समीर हे आजचे खूप वेगळ्या ठिकाणी पोहचलेले सेनानी कसे झाले, हे त्यांच्याकडूनच ऐकता आलं.
समीरजींचा जन्म १९७८ चा. त्यांचं शिक्षण मुख्यत: परभणीला नवोदय विद्यालय व बाल मंदिर प्रशालेत झालं. माझ्यापेक्षा ते सहा वर्षं मोठे. खरं तर वीरश्री त्यांच्या रक्तातच आहे, असं म्हणावं लागेल. ते छत्रपतींचे सरसेनापती प्रतापराव गुजर ह्यांचे वंशज आहेत. समीरजी सांगतात, त्यांचं बालपण इतर मुलांसारखंच होतं. त्यांना खेळाची, अंगमेहनतीची आणि इतर मुलांना सोबत घेण्याची खूप आवड होती. सामान्यांपासून असमान्यत्वाकडचा त्यांचा प्रवास सुरू झाला तो १९९६ मध्ये!
एका शनिवारी त्यांना कोणीतरी सांगितलं की, एन.डी.ए म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेण्याचे अर्ज स्वीकारले जात आहेत. पण ते अर्ज सादर करण्याची मुदत दोनच दिवसांनी संपत आहे. दोन दिवसांमध्ये हा अर्ज दिल्लीमध्ये कसा पोहचणार? १९९६ चा तो काळ! संपर्काची साधनं नाहीत. मग त्यांना कळालं की, रेल्वेची आरएमएस सेवा जलदगतीने पत्र नेते. मग मित्रांसोबत अर्ज भरून समीरजी स्टेशनवर गेले. आरएमएसचं कार्यालय बंद. तेवढ्यात एक ट्रेन आली. एका लगेज डब्याच्या बाहेर आरएमएसचं काम करत असेल, असं वाटणारा एक माणूस दिसला. त्याला समीरजींनी सांगितलं की, असा अर्ज पाठवायचाय. फक्त दोनच दिवस आहेत. आरएमएस कार्यालय बंद आहे. त्या माणसाने सांगितलं की, ते अर्ज द्या इकडे. हाच डबा दिल्लीला जातो आहे. आणि त्याने सगळ्यांचे अर्ज तसेच घेऊन डब्यामध्ये भिरकावूनही दिले! त्यावर कार्यालयीन सही- शिक्के नसले तरी ते मनमाडला नीट पुढे पाठवले जातील ही खात्री दिली!
त्यांच्यासोबत तो अर्ज केलेल्या एका मित्राला दिल्लीवरून उत्तर आलं की, तुमचा अर्ज उशीरा आल्याने फेटाळला गेला आहे. आपलाही अर्ज फेटाळला गेला असणार, असं समीरजींना वाटलं. इकडे त्यांची बारावीची परीक्षा होऊन गेली. नंतर त्यांना एन.डी.ए.च्या लेखी परीक्षेला येण्याचं पत्र आलं! पण तेव्हाही समीरजींचं मन होत नव्हतं. कशाला ही कठीण परीक्षा द्या, असं वाटत होतं. पण दादांनी, त्यांच्या वडिलांनी आग्रह केल्यामुळे त्यांनी ती परीक्षा दिली. सुरूवातीला त्यांनी टाळाटाळ केली. पण परत वडिलांनी समज दिली की, नाही. शिक्षणात तुझं लक्ष नाही. हे तरी मन लावून कर. मग समीरजींनी ठरवलं! त्या काळात परभणीसारख्या ठिकाणी फार कमी साधनं होती. पण तरी मित्रांकडून ह्या परीक्षेबद्दलची पुस्तकं मिळवली व तयारी केली. ३ लाख जण ह्या परीक्षेला बसले होते व त्यापैकी फक्त १% म्हणजे ३ हजार जण पुढच्या फेरीमध्ये बोलावले जाणार होते! आपली तर काही निवड होणारच नाही, असंच समीरजींना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी रिझल्टही जाणून घेतला नाही!
बारावीनंतर त्यांना शेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजात प्रवेश मिळाला होता. चांगलं कॉलेज होतं ते. पण तिथे त्यांचं मन रमलं नाही. म्हणून तिथला प्रवेश रद्द करून त्यांनी परभणीच्याच कृषि महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे त्या काळात अनेक जण एमपीएससी परीक्षेची तयारी करायचे व काही जण तिथून एमपीएससीसाठी जातही होते. त्यांनी प्रवेश घेतल्यावर तिथे अनेकदा "कॉमन ऑफ" व्हायला लागले. कॉलेजमध्ये लेक्चर्सच नसायचे. एकदा ते लेक्चरला बसायला गेले तेव्हा कॉमन ऑफ मोडेल म्हणून त्यांना मारहाण होण्याची स्थिती ओढवली. पण काही जणांनी त्यांना सावध केलं व वाचवलं.
अशात एक दिवस समीरजींच्या आजोबांनी त्यांना सांगितलं की, तुला एसएसबी परीक्षेसाठी मैसूरला बोलावलं आहे! अगदी दोन दिवसांनीच ती परीक्षा होती! बाल विद्या मंदिरच्या राके सरांचं मार्गदर्शन घेतलं. त्यांच्या माहितीत संजय पवार ह्या विद्यार्थ्याने ही परीक्षा तीन वेळा दिली होती. तो राहतो ती कॉलनी सरांना माहिती होती. तिथे जाऊन संजय पवारचं घर शोधलं! शेवटी त्याला भेटण्याची जवाबदारी समीरजीचे बंधू प्रभंजनजींनी घेतली व समीरजी बॅग भरायला घरी गेले. नंतर तो संजय पवार त्याने अजून एक पुस्तक दिलं व महत्त्वाच्या टिप्स दिल्या. सेनेमध्ये अधिकारी कसे असावेत, ह्यासाठी १६ गुण ठरवलेले आहेत. परीक्षेमध्ये काय काय बघितलं जातं, काय त्यांना हवं असतं हे त्याने सांगितलं! (कालांतराने संजय पवार ह्यांनी सरकारी सेवेमध्ये कार्य केलं)
समीरजींना पुस्तक तर मिळालं, पण डोळे दुखत असल्यामुळे वाचता येत नव्हतं. तेव्हा मित्राने त्यांना फक्त प्रस्तावना वाचून त्यावर मनन करायला सांगितलं. कधीच महाराष्ट्राबाहेर प्रवास न केलेले समीरजी, तेव्हाचा १८ वर्षांचा कोवळा तरूण समीर! त्यात नेमकं त्यांच्या वडिलांना फ्रॅक्चर झालं. त्यामुळे हा प्रवास त्यांना एकट्यालाच करावा लागला. परभणीवरून ट्रेनने बंगळूर व तिथून मैसूर. तिथे चार दिवसांची एसएसबी परीक्षा! इथे मात्र स्टेशनवर आल्यावर परीक्षार्थींना सेनेचे लोक मदत करतात व मुक्कामाची सगळी सोय करतात. पण इथे सगळे इंग्लिश बोलणारे. समीरजींचं इंग्लिश ठीक होतं, पण स्पोकन इंग्लिश कच्च होतं. एका स्थानिक परीक्षार्थी मुलाशी त्यांची मैत्री झाली. त्याने त्यांना बर्याच गोष्टी सांगितल्या. टिप्स दिल्या. बाकीची मुलं "पंचवार्षिक योजना", "अण्वस्त्र धोरण" अशा गोष्टींबद्दल सफाईने बोलत होती! समीरजी थोडे काळजीत पडले.
पण मित्राने त्यांना समजावलं, "इन लोगों को सायंटिस्टस या अंग्रेजी के प्रोफेसर नही चाहिए! इन्हे तो ऐसे लोग चाहिए जो चालिस लोगों को युद्ध के मैदान में ले जा सकते हो! क्या तुम ये कर सकते हो?" समीरजींना एकदम हलकं वाटलं. चाळीस कशाला, मी तर शंभर लोकांना घेऊन जाईन! कारण शाखेमध्ये त्यांच्या गणामध्येच शंभर युवक असायचे! सहजगत्या समीरजी त्यांचं नेतृत्व करायचे. आणि देशभक्ती तर त्यांच्या स्वभावात मुरलेली होती. अशा आत्मविश्वासाने समीरजी त्या परीक्षेला सामोरे गेले.
ह्या प्रवेश परीक्षेमध्ये स्टेशनवर आल्यापासूनच मानसशास्त्रज्ञ परीक्षार्थींचं निरीक्षण करत असतात. लेखी परीक्षेची काळजी नव्हती, कारण इंग्लिश चांगलं लिहीता येत होतं. जे ऐकलेलं होतं- वाचलेलं होतं ते त्यांनी लिहीलं. खरा कस मुलाखतीमध्ये व ग्रूप टास्कमध्ये लागणार होता. त्यांच्या त्या मित्राने त्यांना इंग्लिशचं एक वाक्य गुरूकिल्लीसारखं सांगितलं होतं- I cannot proceed further in English! मुलाखतीत प्रश्न विचारणारे त्यांना परत परत तोच प्रश्न विचारत होते व म्हणत होते, "You have not understood my question." अखेर ते हिंदीत बोलायला तयार झाले. भारताच्या शेतीबद्दल प्रश्न होते तेव्हा समीरजी बोलू शकले. शिवाय आम्ही मुलं कसे मैदानी खेळ खेळतो, कसे एकत्र येतो ते त्यांनी सांगितलं. असा तो इंटरव्ह्यू झाला. पण तरीही त्यांना वाटत होतं की, आपण काही निवडले जात नाही.
ग्रूप टास्कच्या वेळी मात्र खूप मजा आली. नशीब कसं कधी कधी आपली मदत करतं, असं म्हणून समीरजी तो किस्सा सांगतात. सगळे इंग्लिश बोलणारे मुलं होते. पण विषय नेमका समीरजींच्या आवडीचा आला- Indian education system! त्यावर तर त्यांच्याकडे बोलण्यासारखं खूप काही होतं. त्यांनी आपली फैरी सुरू केली- Why we are sitting here? Why not our education system gives us a certificate of a good officer? मग त्यांनी मॅकॉले व ब्रिटीशांचा भारतीय शिक्षणावरचा प्रभाव ह्यावर आघात केला! We have taught only to become clerks! Even this we are discussing in English and not in any Indian language! आणि मग त्यांनी तो क्षण जिंकला! सोबतचे मुलं त्यांना म्हणाले, "तू तो छुपा रुस्तम निकला, तुम्हे तो सब आता था!" ही बाजी आपण जिंकली, त्यांनाही जाणवलं.
एन.डी.ए.च्या प्रवेश परीक्षेमध्ये मुख्यत: अर्जदारांची मानसिकता व मनाचा कल बघितला जातो. मनाची तयारी बघितली जाते. तिथे शारीरिक चाचणीपेक्षा हे पैलू जास्त बघितले जातात. आणि शरीर तसं निसर्गाच्या जवळ आहे. मन जास्त सूक्ष्म आहे व म्हणून जास्त महत्त्वाचं आहे. शरीराची तयारी व शरीराचे पैलू पाडणं ह्या गोष्टी तर चार वर्षांच्या खडतर नव्हे भयावह प्रशिक्षणातून ते करूनच घेतात. They very properly "take care of the body!" त्यामुळे प्रवेश परीक्षेच्या वेळी हे इतर पैलू जास्त बघितले जातात. शाखेतले संस्कार, तिथे केलेलं संघटन, मुलांचं नेतृत्व व देशभक्तीचं बाळकडू ह्यामुळे माझी ह्या प्रवेश परीक्षेची तयारी झाली होती, असं समीरजी सांगतात! आणि आज इतके मोठे होऊनही इतरांमध्ये ते इतक्या सहजतेने वावरतात, ह्याचंही कारण कदाचित बालपणीचे ते संस्कार हेच आहे.
एन.डी.ए.मध्ये प्रवेशापासून सुरू होतं त्यांच्या खडतर तपश्चर्येचं पर्व! चार वर्षांची अति भीषण तपश्चर्याच ही! त्या अनुभवांबद्दल त्यांच्याकडून ऐकताना अंगावर काटा येत होता! मिलिटरीचं प्रशिक्षण किती खडतर असतं, हे आपल्याला ऐकून माहिती आहे. शिस्त म्हणजे शिस्त! अगदी बुटाचा करकरीतपणा, बुटाची लेस, कपड्यांची कडक इस्त्री, कवायतींमधली अचुकता, वेळेची शर्यत, ठराविक चाकोरीतील हालचाली!! जणू इथे हिंदीमधली व मराठीमधली शिक्षा एकच होते! शिकवणं हीच शिक्षा होते! शिक्षाच शिकवते! समीरजी सांगतात, तिथलं ट्रेनिंग इतकं खडतर होतं की, ते चुकवण्यासाठी मुलं स्वत:च स्वत:ला फ्रॅक्चर करायला बघायचे. जोरात स्टिक मारायचे. स्वत:ची हिंमत झाली नाही तर मित्राला मारायला सांगायचे. म्हणजे काही दिवस तरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन हा संघर्ष चुकेल!
ही सगळी अग्नीपरीक्षा मुलांनी युद्धाला सज्ज होण्यासाठी असते. प्रत्येकाच्या आतमध्ये असलेली सुप्त क्षमता सक्रिय करण्यासाठी असते. त्याद्वारे शरीराचं व मनाचं कंडीशनिंग बदलून टाकलं जातं. तुमचं मन व शरीर हे एका शिस्तीत आणलं जातं, तुमच्या आज्ञेत आणलं जातं! तिथलं प्रशिक्षण किती कठिणतम असेल हे तिथल्या शिक्षांवरून कळतं. एका प्रशिक्षणात एक शिक्षा दिवसभर मलमूत्र असलेल्या मैलापाण्यामध्ये बसणं, अशी असायची. फक्त डोकं वर. बाकी शरीर मैलापाण्यात. पण ही अवस्थाही परवडली म्हणावं, असं ते प्रशिक्षण असायचं. आणि ज्या कॅडेटसना ही शिक्षा जमायची, त्यांच्यासाठी लगेच दुसरी शिक्षाही शोधली जायची! सैन्याच्या भाषेमध्ये असं रगडून घेतात. त्यामुळेच अशा शिक्षेला "रगडा" म्हणतात.
दुसर्या एका शिक्षेमध्ये रोल करायला लावायचे. म्हणजे ओणवं चालवायला लावायचे. तेही पायर्यांवर. असं पाठीवर रोलिंग (म्हणजे शरीराचा गोळा करून घसरत जाणे) करून कॅडेटसना फोड यायचे, ते फुटायचे आणि पाठ रक्तबंबाळ व्हायची. शरीर सुजायचं. कधी उन्हाळ्यामध्ये तापलेल्या शहाबादी फरशीवर लोळत लोळत पुढे जाण्याची शिक्षा असायची! कधी कधी अशा शिक्षेमुळे खुरडत- लंगडत कॅडेटसला रॉक क्लाइंबिंगसारखी हर्डल रेस पूर्ण करावी लागायची. तिथेही उलट तपासणी व्हायचीच- की कॅडेट असा का लंगडतो आहे? जर कॅडेटचा प्रयत्न प्रामाणिक आहे, तो खरंच हे मनापासून करतो आहे पण जखमेमुळे करू शकत नाही हे लक्षात आल्यावर कधी कधी ही शिक्षा माफसुद्धा व्हायची! "जा बेटा, जा, तू इसमें पास है," असं वरिष्ठ म्हणायचे! एन.डी.ए.च्या चार वर्षांमध्ये ह्या युद्ध सज्जतेबरोबर इतर विषयांच्या अभ्यासासह डीग्री दिली जाते. कॅडेटचा कणखर अधिकारी होतो!
समीरजी चार वर्षांच्या ह्या अग्नी तपश्चर्येनंतर १९९९ मध्ये पायदळात दाखल झाले. गेली २५ वर्षं त्यांनी अनेक ठिकाणी सेवा बजावली आहे. अगदी जम्मू कश्मीरमध्ये लाईन ऑफ कंट्रोलजवळ धुमश्चक्रीमध्ये शत्रूवर वार करण्यापासून पूर्वांचलातल्या अस्थिर ठिकाणची जवाबदारीही हाताळली आहे. त्यांचे एक एक अनुभव रोमहर्षक आणि विलक्षण आहेत. अनेक वर्षं कांगोमधल्या भारतीय शांती सेनेचा ते भाग राहिले आहेत. तिथली आव्हानंही वेगळी, तिथले शत्रूही वेगळे! उत्तराखंडमध्ये गढवाल रायफल्समध्येही त्यांनी कार्य केलं आहे. अशा अनेक जवाबदार्या पूर्ण करून त्यांनी आपल्या युनिटचं यशस्वी नेतृत्व केलं आहे. अलीकडेच जम्मू- कश्मीरमध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावल्याबद्दल त्यांचं खूप कौतुकही झालं आहे.
जेव्हा अशा कर्नल समीरजींनी त्यांच्या पुणे छावणीतल्या युनिटमध्ये- ऑफिसात भेटायला बोलावलं होतं, तेव्हा खरं तर धडकीच भरली होती! तिथे गेटमधून आत जातानाच प्रेमळ विचारपूस होते! कुठे जायचं, कसं जायचं, काय करायचं नाही हे सांगितलं जातं. आत जाताना एका सैनिकाचा एस्कॉर्ट दिला जातो. असं आतमध्ये जाऊन कर्नल समीरजींना भेटलो तेव्हा त्यांचा रूबाब बघण्यासारखा होता! आज कित्येक अधिकारी त्यांच्या हाताखाली काम करत आहेत! हा रूबाब जेवढा देखणा आहे, तितकाच देखणा त्या वर्दीच्या आतला सहृदय माणूसही आहे. आज ते इतके उच्च पदावर गेले असले, तरी मनाने ते सगळ्यांना सोबत घेऊन चालतात. कनिष्ठांसोबत आत्मीयतेने काम करणारा सहकारी त्यांच्यात दिसतो! वर्दीचा रूबाब वर्दीमध्ये नसताना अजिबात नसतो. उलट असतो तो मित्र- नातेवाईकांमध्ये रमणारा कुटुंबवत्सल माणूस आणि आपल्या गावासाठी व लोकांसाठी झटणारा एक सुपूत्र. भारतमातेच्या अशा सर्व सुपुत्रांना व सुपुत्रींना वंदन करून थांबतो. जय हिंद!
4 जानेवारी 2025
निरंजन वेलणकर 09422108376.
प्रतिक्रिया
4 Jan 2025 - 4:41 pm | कर्नलतपस्वी
परीक्षेमध्ये काय काय बघितलं जातं, काय त्यांना हवं असतं हे त्याने सांगितलं!
एस एस बी ही सर्व साधारण परिक्षां पेक्षा वेगळी परिक्षा असते. इथे सिलेक्ट किंवा रिजेक्ट का झालो हे कधीच सांगत नाही आणी कुणालाच कळत नाही.
सोळा गुण जरी पहात असले तरी परीक्षार्थीना ते दाखवायचे असतात. वरवर साध्या सोप्या दिसणाऱ्या परिक्षा अतिशय गहन आणी अवघड . कॅण्डिडेट आपली खरी पर्सनॅलिटी लपवू शकत नाही.
मला माझ्या परिक्षेची आठवण झाली.
As per my understanding examination is in three stages.
Identification of material, -is anyone suitable or otherwise.
Testing Quality of material
Confirmation- Yes he real material .
However, it is big subject and cannot be covered in few words.
What qualities are required for military leadership? Whether one do possess or otherwise.
How to exhibit qualities and tell examinar that ,I am suitable material.
4 Jan 2025 - 7:17 pm | मुक्त विहारि
NCC मध्ये असतांना, NDA ला अर्ध्या दिवसाची प्रत्यक्ष भेट द्यायला मिळाली होती.
NDA मध्ये प्रशिक्षण घ्यायचे स्वप्न, प्रत्यक्षात कधी उतरलेच नाही.
6 Jan 2025 - 10:46 am | अनामिक सदस्य
"खरं तर वीरश्री त्यांच्या रक्तातच आहे, असं म्हणावं लागेल. ते छत्रपतींचे सरसेनापती प्रतापराव गुजर ह्यांचे वंशज आहेत."
हे नेपोटिझम नव्हे काय? का नेपोटिझम फक्त सिने कलाकार आणि उद्योगपती घराण्यातच असते?
सरसेनापती ते कर्नल साहेब यान्च्या मधिल पिढ्यानमध्येही तेच रक्त होते ना?
6 Jan 2025 - 1:29 pm | कर्नलतपस्वी
नेपोटिझम -nepotism हा शब्द पुतण्या, nepote या इटालियन शब्दावरून आला आहे . वरवर पाहता 17 व्या शतकात बरेच लोक इतर उमेदवारांच्या खर्चावर त्यांच्या पुतण्यांना शक्तिशाली पदांवर बढती देण्याकडे झुकत होते.
आपल्या कुटुंबाला किंवा मित्रांना नोकऱ्या किंवा इतर फायदे मिळवून देण्यासाठी सत्तेचा अयोग्य वापर म्हणजे नेपोटिझम.
प्रतिसाद देताना आपण वापरलेला शब्द नेपोटिझम अनुचित आहे. कर्नल समीर गुजर जरी सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज आहेत पण त्यांची निवड एस एस बी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच झाली व सेवारत असताना योग्यतेनुसार पदोन्नती झाली आहे. इथे कुठेच भाई भतीजा वाद कामाला येत नाही.
सैन्यामधे पिढ्यानुपिढ्या भरती होणारे अनेक भारतीय आहेत. पंजाब,हरियाणात तर घरटी कमीत कमी एक तरी सैन्यात दाखल होण्याची परंपरा आहे. तशीच महाराष्ट्रात सुद्धा. साताऱ्यात अपशिंगे गाव हे या साठी प्रसिद्ध आहे.
वीरश्री, देशप्रेम हे अंगभूत गुण जे सैन्यात येण्यासाठी प्रेरित करतात. लेखकाने कर्नल गुजर सरांचा पूर्वेतिहास संदर्भ म्हणून दिला आहे.याचा अर्थ नेपोटिझम अशा संदर्भात लावणे सर्वथैव चुकीचे आहे.
सरदार अंताजी माणकेश्वर गंधे,मोहीते, सातपुते आणी अनेक सरदार घराण्यातील सदस्य आजही सैन्यात आहेत व आपल्या पुर्वजांचा अभिमान बाळगुन आहेत.असे जरी असले तरी प्रत्येकजण आपापल्या गुणवत्तेवर,य्योग्यतेवर सिलेक्ट झाले आहेत.
हे नेपोटिझम नव्हे काय? का नेपोटिझम फक्त सिने कलाकार आणि उद्योगपती घराण्यातच असते?
हे उदाहरण म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्या सारखेच म्हणावे लागेल.
सरसेनापती ते कर्नल साहेब यान्च्या मधिल पिढ्यानमध्येही तेच रक्त होते ना?
असे जरी असले तरी जरूरी नाही की प्रत्येकानेच सैन्यात दाखल व्हायलाच हवे.
6 Jan 2025 - 7:47 pm | मुक्त विहारि
रणजित चितळे, यांनी एक लेखमाला लिहिली होती.. राजाराम सीताराम, ह्या नावाची.
त्यात, वंश परंपरागत एखादी बटालियन निवडायचा अधिकार त्या त्या उमेदवाराला फायनल सीलेक्शन नंतर असतो. असा उल्लेख आहे.
बाकी,
वंश परंपरागत व्यवसाय, हे एकदा मान्य केले की इतर सगळेच सोपे होते.
नेतेगिरी ते संघटीत गुन्हेगारी, सगळीकडे हा फंडा उपयोगी पडतो.
6 Jan 2025 - 8:07 pm | कर्नलतपस्वी
होय. पॅरेंटल क्लेम म्हणतात. हा सर्वांनाच असतो. अधिकारी व सिपाही आपल्या वडिलांची रेजिमेंट निवडण्याचा अधिकार. अभिमानाने सांगतात आमची तिसरी पिढी वगैरे.
6 Jan 2025 - 9:19 pm | मुक्त विहारि
पण हा, पॅरेंटल क्लेम, प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतरच मिळत असेल.
आधी गूण सिद्ध करा आणि मग बक्षीस मिळवा..
10 Jan 2025 - 8:40 pm | अनामिक सदस्य
नेपोटिझम हा शब्द फक्त खालील वाक्यापुरता होता.
"खरं तर वीरश्री त्यांच्या रक्तातच आहे, असं म्हणावं लागेल. ते छत्रपतींचे सरसेनापती प्रतापराव गुजर ह्यांचे वंशज आहेत."
कर्नल साहेबान्ची योग्यता, भरती, किन्वा पदोन्नती याबद्दल कुठलाही अनादर किन्वा शन्का नाही.
तुम्ही म्हणालात तसे कदाचित तो शब्द अनुचित असेल, पण शतकान्पुर्वीच्या एका पूर्वजाच्या परक्रमावरून, एखाद्या व्यक्तीच्या रक्तातच वीरश्री आहे असे म्हणणे योग्य आहे का?
6 Jan 2025 - 12:26 pm | सौंदाळा
कर्नल समीर गुजर यांची ओळख आवडली.
गुजर सरांना प्रणाम
14 Jan 2025 - 3:10 pm | मार्गी
सर्वांना नमस्कार. वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
इथे लिहीणा-या सर्व सेनानींबद्दल खूप आदर आहे. अनेकदा त्यांचे लेख वाचलेले आहेत.
@ अनामिक सदस्य जी, तुमचासुद्धा मुद्दा बरोबर आहे. तसं वाटूच शकतं. मलाही लिहीताना क्षणभर तसं वाटलं होतं.
धन्यवाद.