चौकशी
शेर कुणाला माहीत आहे का?
प्रेषक शुचि ( बुध, 03/10/2010 - 00:37) .महाविद्यलयात असताना एक अतिशय सुरेख शेर ऐकला होता. तेव्हा प्रेमात पडले होते नंतर आता काही पावसाळे पाहील्यानंतर प्रेम द्विगुणीत झाले आहे. शेर मला गूगलून सापडत नाहीये. अर्थ असा आहे -
मी माझ्या इच्छा-आकांक्षांच्या कबरीवर तलवार घेऊन सजग पहारा करत बसलो आहे की कधी एखादी चुकार इच्छा डोकं वर काढते आणि मी तिचा शिरच्छेद करतो.
कुणाला मिळाल्यास कृपया येथे द्यावा.
शेषप्रश्न/सव्यसाची कुठे मिळेल ??
प्रेषक अर्धवटराव ( मंगळ, 03/09/2010 - 03:08) .राम राम मंडळी !!
आत्ताच "वल्लीं"चा उत्क्रुष्ट मराठी कादंबर्यांबद्दलचा काथ्याकुट वाचत होतो. अचानक 'श्रीमानयोगी'ला नरहर करुंदकनांनि दिलेल्या प्रस्तावनेची आठवण झाली. त्या प्रस्तावनेत करुंदकरांनी कुठल्या 'शेषप्रश्न' (आत्ता नेमकं नाव आठवत नाहि) या सव्यसाची वर अधारीत कादंबरीचा उल्लेख केला आहे. त्या कादंबरीचे नेमके नाव/प्रकाशक वगैरे माहिती कोणास असेल तर क्रुपा करुन सांगणे. या जुजबी माहितीवर मी ति कादंबरी पुण्यात अप्पा बळवंत चौकात बरीच शोधली... पण नाहि सापडली 
(शोधात असलेला) अर्धवटराव
-रेडि टु थिंक
सुरेश भट यांची अप्रतिम कविता 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी' : शब्द हवे आहेत
प्रेषक दिपोटी ( सोम, 03/08/2010 - 18:23) .मंडळी,
मला श्री सुरेश भट यांची 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी' ही अप्रतिम कविता पूर्ण व लिखित स्वरुपात हवी आहे. मला आवडलेल्या या कवितेच्या बर्याचशा ओळी मला माहित आहेत / पाठ आहेत पण तरीही पूर्ण कविता तिच्या मूळ स्वरुपात मला अद्याप तरी कोठेही मिळलेली नाही. तेव्हा या कवितेचे अचूक शब्द / ओळी कोणी देऊ शकेल काय किंवा निदान ही माहिती कोठे मिळेल हे सांगू शकेल काय ?
मिळणार्या माहितीसाठी आधीच धन्यवाद देतो.
- दिपोटी
असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग २
प्रेषक हैयो हैयैयो ( शनी, 03/06/2010 - 16:23) .असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग २
वाचकमित्रहो,
नमस्कार! वणक्कम! वन्दनम! "असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग १" ह्या स्फुटास मिळालेला भरघोस प्रतिसाद, आणि त्यासह वाचकांनी पाठविलेल्या खरडी, व्यनि, आणि जीमेलावरील प्रेमळ विनंतींस मान देवून मी त्याच मालिकेतले हे दुसरे स्फुट आपणांसमोर मांडण्याचे धार्ष्ट्य करित आहे. कृपया गोड मानून घेणे.
तमिळ - जागतिक पातळीवर ’अभिजातभाषा’ म्हणून गौरविली गेलेली ही भाषा. मराठीभाषिकांच्या दृष्टीतून पाहावयाचे झाल्यास; मराठीभाषकांच्या समोर तमिऴभाषा ही संपूर्णत: अनाकलनीय आणि काहीशी चमत्कारिक अशी अवतीर्ण होते. तौलनिक भाषाभ्यास हा दोन्हीही भाषकांसाठी साहित्याचा परमानंद लुटता येण्याचे एक साधन होय. मराठीभाषकास ह्या भाषेच्या व्याकरणनियमांची / काव्यशास्त्रीय नियमांची थोडी तोंडओळख करून दिल्यास, ह्यातील चमत्कृती संपुष्टात येवून ती शिकण्यात गोडी वाटू लागू शकेल असे वाटते.
---
’उपक्रम दिवाळी अंक २००९ मध्ये लेख लिहाल काय’ अशी विचारणा करणारा व्यनि जेंव्हा आला, साधारण त्याचवेळी येथे मिसळपावावर श्री. तात्यांनी मुखपृष्ठावर दिल हैं छोटासा ह्या गीताबद्दल लिहिले होते. ते असे -
अर्थपूर्ण आशय असलेलं एका वेगळ्याच परंतु तेवढ्याच फ्रेश ढंगातलं गाणं. एखाद्या फुलपाखरासारखं सुंदर आणि तेवढंच हलकंफुलकं! गाण्याचे शब्द, चाल आणि गायकी तर उत्तमच परंतु या गाण्याला १०० पैकी १०० मार्क जर कुठे द्यायचे झाले तर ते चित्रीकरणाला आणि वाद्यवृंद संयोजनाला. वाद्यवृंद संयोजन आणि त्यातले फिलर्स तर केवळ अफलातून! एरवी गाणं शुद्ध गंधाराधिष्ठित, कानांना शुद्ध गंधाराचं अगदी भरपूर सुख देणारं परंतु 'चांद-तारोको छुनेकी आशा' नंतरच्या 'आसमानोमे उडनेकी आशा..' या ओळीतला शुद्ध मध्यम केवळ आश्चर्यकारक, अद्भूत परंतु तेवढाच आनंददायी! गायलंयही अगदी अल्लडपणे. म्हटलं तर स्वच्छंदपणे स्वत:शीच संवाद साधणारं आणि म्हटलं तर एखाद्याला एखादी गोष्ट अगदी छान समजून सांगावी तसं!
बादलोकी मै ओढू चुनरिया, अपनी चोटी मे बांध लूं दुनीया!
क्या केहेने! सुंदरच लिहिलं आहे गाणं. आणि बांधलंयही तेवढंच छान. चांदतार्यांना छुणार्या आणि आसमानात स्वच्छंद उडणार्या या गाण्याबद्दल रेहमानला सलाम..!
कदाचित वाचकांस ही माहिती नसेल; की हे गीत हे मूळ काव्यरूपांत असून ते ७० च्या दशकात लिहिले गेले होते. श्री. एम एस विश्वनाथन ह्यांनी ते तमिळ दूरदर्शनसाठी संगीतबद्धही केले होते. श्री. मणिरत्नम ह्यांस त्यांच्या नायिकेच्या भावनांचे प्रकटीकरण करण्यास ही कविता उत्कृष्ट वाटली आणि ह्या कारणाने ह्या कवितेचे चित्रपटगीतांत रूपांतर झाले. असो! एका बाजूस ’उपक्रम दिवाळी अंक २००९ चा व्यनि वाचतांना दुसर्या बाजूस मिसळपावावर श्री. तात्यांनी मुखपृष्ठावर सुंदरच लिहिलं आहे गाणं असे लिहिल्याचे पाहिले, आणि हिंदीत डब्ब केलेल्या रोजा चित्रपटातील चिन्न चिन्न आसै ह्या तमिळ गीताचा मराठी अर्थ आणि त्याचे काव्यात्मक रसग्रहण ह्या सार्यासंबंधी एकत्रितरीत्या लिहावे असा काहीसा विचार करून ह्याविषयी आतां लिहितो आहे...!
---
| मूळ तमिऴ लिपीमध्ये | देवनागरीमध्ये लिप्यंतरीत | मराठीभाषेमध्ये भावार्थ |
|---|---|---|
| சின்ன சின்ன ஆசை | चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै | छोटी छोटी इच्छा |
| சிறகடிக்கும் ஆசை | सिऱगडिक्कुम् आसै | पंख फडफडविण्याची इच्छा |
| முத்து முத்து ஆசை | मुत्तु मुत्तु आसै | (मोत्यासारखी) छोटी छोटी इच्छा |
| முடிந்துவைத்த ஆசை | मुडिन्दुवैत्त आसै | (शिंपल्यात बंद मोत्यासारखी - आजवर) बंद करून ठेवलेली इच्छा |
| வெண்ணிலவு தொட்டு முத்தமிட ஆசை | वॆण्णिलवु तॊट्टु मुत्तमिड आसै | शुभ्र चंद्रम्यास स्पर्शून त्याचा मुका घेण्याची इच्छा |
| என்னையிந்த பூமி சுற்றிவர ஆசை | ऎऩ्ऩै इन्द बूमि चुऱ्ऱिवर आसै | सारे हे विश्व फिरून पाहाण्याची इच्छा |
| [[சின்ன சின்ன ஆசை]]... | [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]... | [[छोटी छोटी इच्छा]]... |
| மல்லிகைப்பூவாய் மாறிவிட ஆசை | मल्लिगैप्पूवाय् माऱिविड आसै | मोगर्याच्या फुलामध्ये परावर्तित होण्याची इच्छा |
| தென்றலைக் கண்டு மாலையிட ஆசை | तॆऩ्ऱलैक् कण्डु मालैयिड आसै | हवेच्या झुळुकीस पाहून, (तिच्या गळ्यात) माळा घालण्याची इच्छा |
| மேகங்களை எல்லாம் தொட்டு விட ஆசை | मेहङ्गळै ऎल्लाम् तॊट्टु विड आसै | सार्या ढगांना स्पर्शून सोडण्याची इच्छा |
| சோகங்களை எல்லாம் விட்டு விட ஆசை | सोहङ्गळै ऎल्लाम् विट्टु विड आसै | सार्या दु:खांना सोडून टाकण्याची इच्छा |
| கார்குழலில் உலகைக் கட்டி விட ஆசை | कार्गुऴलिल् उलहैक् कट्टि विड आसै | केशरचनेमध्ये सार्या जगतास बांधून घेण्याची इच्छा |
| [[சின்ன சின்ன ஆசை]] | [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]... | [[छोटी छोटी इच्छा]]... |
| சேற்று வயலாடி நாற்று நட ஆசை | सेऱ्ऱु वयलाडि नाऱ्ऱु नड आसै | चिखलामध्ये पायांचे ठसे उमटवित सोडत चालण्याची इच्छा |
| மீன் பிடித்து மீன்டும் ஆற்றில் விட ஆசை | मीऩ् पिडित्तु मीण्डुम् आऱ्ऱिल् विड आसै | मासोळीस पकडून पुन्हा पाण्यात सोडून देण्याची इच्छा |
| வானவில்லைக் கொஞ்சம் உடுத்திக்கொள்ள ஆசை | वाऩविल्लैक् कॊञ्चम् उडुत्तिक्कॊळ्ळ आसै | इंद्रधनु परिधान करण्याची इच्छा |
| பனித்துளிக்குள் நானும் படுத்துக்கொள்ள ஆசை | पनित्तुळिक्कुळ् नाऩुम् पडुत्तुक्कॊळ्ळ आसै | दवबिंदुंच्या आतमध्ये निजण्याची इच्छा |
| சித்திரத்தின் மேலே சேலை கட்ட ஆசை | सित्तिरत्तिऩ् मेले सेलै कट्ट आसै | भित्तिचित्रास साडी नेसविण्याची इच्छा |
| [[சின்ன சின்ன ஆசை]]... | [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]... | [[छोटी छोटी इच्छा]]... |
---
तमिळभाषेमध्ये एक नियम. जोपर्यंत एखाद्या वाक्यात ’नाही’ असे म्हटले जात नाही, तोपर्यंत तेथे ’आहे’ असे गृहित धरले जाते.
उदा.
१. एन पेयर हैयो. - माझे नांव हैयो.
२. इदु तमिळमोळियिन नियमम. - हा तमिळभाषेचा नियम.
३. चिन्न चिन्न आसै. - छोटी छोटी इच्छा.
वरिल नियमानुसार प्रथम उदाहरणांत, जोपर्यंत एन पेयर हैयो ’इल्लै’ असे म्हटले जाणार नाही तोपर्यंत माझे नांव हैयो ’आहे’ असेच समजले जाते. दुसया उदाहरणांत जोपर्यंत हा तमिळभाषेचा नियम ’नाही’ असे म्हटले जाणार नाही तोपर्यंत हा तमिळभाषेचा नियम ’आहे’ असेच समजले जाते.
थोडक्यात कसे, की ’आहे’ असे निराळे सांगण्याची आवश्यकता शिल्लक नाही. हे भाषेचे वैशिष्ट्य आहे. काही पाश्चिमात्य भाषाभ्यासकांनी ह्या वैशिष्ट्यास तमिळ समाजाच्या ’दुर्दम्य आशावादाचे मूळ’ असे म्हटले आहे. हे गीत चित्रपटाची नायिका रोजा हिच्या दुर्दम्य आशावादाचे एक काव्यात्मक चित्रण ह्या रूपांत येते. तिला हव्या असलेल्या जवळजवळ सार्याच गोष्टी तिला मिळणे केवळ अशक्यप्राय असूनही ती इच्छा करते. काहीशी स्वप्नाळू मागणी असली तरीही एका विलक्षण आत्मविश्वासाने ती त्या गोष्टी मागते. इच्छा म्हटले की मार्ग येणारच!
---
कुठल्याही काव्यांतील यमकपूर्ति ही एक आवर्तन पूर्ण होण्याचा आनंद देवून जाते. सहसा इतरभाषी काव्यांमध्ये यमकपूर्ति ही चरणपूर्ति म्हणून येते. तमिळभाषेतही यमकपूर्ति ही चरणपूर्ति म्हणून येतेच, परंतु त्याशिवाय तमिळभाषेत आणखीही एक वैशिष्ट्य आहे. वाचकांनी वरील कवितेचे निरिक्षण केल्यास असे लक्षात येईल, की प्रत्येक ओळीची दुसर्या ओळीशी यमकपूर्ति होते आहे. काव्यातील झाडून प्रत्येक ओळीचा शेवटचा शब्द तो एकच आहे, तो म्हणजे ’आसै’. ह्या शब्दयोजनेमागे एक मुद्दा असा, की वाक्याच्या शेवटल्या शब्दावर एक साहजिक जोर येवून त्याचे महत्त्व अधोरेखित करणे; त्यातील अर्थपूर्ण आशयाकडे लक्ष वेधणे. तमिळ ईळम ची अनेक वीररसपूर्ण काव्ये आहेत, ज्यामध्ये आपणांस ही शब्दयोजना आढळून येईल. खरे पाहता ही शब्दयोजना ही वीररसपूर्ण काव्यांत वापरावयाची, परंतु येथे ती भावनाप्रधान गीतामध्ये वापरली गेली आहे - म्हणूनही श्री. तात्या म्हणतांत तसा एक ’फ्रेश ढंग’ येथे अनुभवण्यास मिळतो. एका अर्थाने ही काव्ये प्रासादिक होवून जातात. चित्रपटांतील नायिकाही केवळ एका विलक्षण आत्मविश्वासाच्या आणि दुर्दम्य आशावादाच्या जोरावर शेवटी तिच्या नवर्यास परत मिळवितेच नां? असो.
---
तर प्रश्न असा, की; असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय?
---
भारतीय महिलांविषयीचे विनोद
प्रेषक चिंतातुरजंतू ( शनी, 03/06/2010 - 11:50) .आमच्या परिचयातील एक समाजशास्त्रज्ञ विदुषी भारतीय महिलांविषयीच्या विनोदांचे संकलन करीत आहेत. आपल्या ऐकिवात आलेल्या अथवा आपल्या प्रतिभेतून स्रवलेल्या अशा विनोदांस कॄपया या धाग्यावर प्रसिध्दी द्यावी. ते करताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.
- आपल्या मते विनोद चांगला असावा.
- विनोदातील विनोदनिर्मितीचे मूळ भारतीय महिलांचे 'भारतीय' असणे आणि 'महिला' असणे याच्याशी संबंधित असावे.
- विशुध्द ज्ञानार्जनात श्लील/अश्लील असे काही नसते. त्यामुळे उपरोल्लेखित विदुषी स्वतः एक स्त्री असूनही त्यांना कोणत्याही प्रकारच्या विनोदाचे वावडे नाही. त्यातील काही या संस्थळाच्या धोरणात न बसणारे असू शकतील. आपला विनोद तसा असू शकेल, असे वाटल्यास तो या धाग्यावर न देता आम्हांस व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवावा, ही विनंती.
- विशुध्द ज्ञानार्जनात भावना भडकणे अभिप्रेत नसते. त्यामुळे उपरोल्लेखित विदुषी स्वतः एक संवेदनशील व सुजाण स्त्री असूनही त्यांना सर्व प्रकारच्या जातीय, प्रांतिक, लैंगिक, धार्मिक आणि इतरही अस्मितांचे दर्शन घडवणार्या विनोदांचेही वावडे नाही. त्यातील काही या संस्थळाच्या धोरणात न बसणारे असू शकतील. आपला विनोद तसा असू शकेल, असे वाटल्यास तो या धाग्यावर न देता आम्हांस व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवावा, ही विनंती.
एखाद्या समाजात एखाद्या समाजघटकाविषयी उत्पन्न होणारे विनोद हा समाजशास्त्रीय संशोधनाचा एक भाग असतो, याविषयी काही शंका असल्यास विनोदांवरील हा निबंध वाचावा. त्याउप्पर काही शंका असल्यास त्या आम्हांस विचाराव्या.
धन्यवाद,
चिंतातुर जंतू
ज्या वेळी तुम्हि एकटे असता
प्रेषक अविनाशकुलकर्णी ( शनी, 03/06/2010 - 11:30) .ज्या वेळी तुम्हि एकटे असता.. त्या वेळी काय करता? फावला वेळ कसा घालवता?
मी पुस्तक वाचतो.. वा आवडति गाणी ऎकतो
जरा मदत करा हो.....
प्रेषक अनंत छंदी ( शनी, 02/27/2010 - 13:07) .मित्रहो...
गेले काही दिवस मी एका समस्येने त्रस्त झालो आहे. माझ्या संगणकात smitfraud-c.gp
हा विषाणू एसव्हीसीहोस्ट.एक्सई ह्या फाईलला चिकटला आहे, अनेक उपाय केले पण तो जात नाही. स्पायबॉटने काढून टाकला तरी पुन्हा येतो आणि इतर फाईल्सना चिकटायला सुरुवात करतो. काय करावे. जरा मदत करा! 
पूजेची पथ्ये
प्रेषक राजेश घासकडवी ( शनी, 02/27/2010 - 06:47) .नुकतेच नाडीपरीक्षेवरील एका अनमोल लेखात खालील चमत्काराविषयी वाचले. खालील विधानांकडे टारझन यांच्या एका टिप्पणीमुळे आम्हाला नवीन दृष्टीकोनातून बघता येऊन त्याचा गर्भित अर्थ जाणून घ्यायला मदत झाली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
एका जोडप्याला मुल नव्हते, तेंव्हा महर्षींनी सांगितलेले उपाय केले संतती झाली. पण त्याआधी दैवीउपाय करूनही संततीचा लाभ का झाला नाही याची काही कारणे सांगताना महर्षी म्हणाले, ‘१) पूर्वी केलेल्या पूजा विधीपुर्वक व त्याच क्रमाने केल्या गेल्या नव्हत्या. २) पुजाकरताना पैशाचे गणित मांडून फारच कोतेपणा केला तो नडला. ३) ज्या पुजाऱ्याने मंत्र म्हणून पूजा सांगितली त्याने गडबडगुंडा करून काम आटपले. ४) पुजा करते वेळी स्वच्छता व पावित्र्य पाळले गेले नाही. ’
त्यावरून पूजेची काही पथ्ये ध्यानात आली. ही पथ्ये पाळली नाहीतर अनेक पूजा करूनही संतती होत नाही. मग पुन्हा महर्षींकडे जावे लागते.
- पूजा विधीपूर्वक व योग्य क्रमाने कराव्यात
- पूजा ठरवताना पैशाच्या गणितात कोतेपणा असू नये
- पूजेत गडबडगुंडा करून काम आटपू नये
- पूजेत स्वच्छता पाळावी
त्यावरून साग्रसंगीत पूजेचे माहात्म्य पटले. एरवी आम्ही आम्हाला जमेल तशी, जमेल तेव्हा पूजा करत आलेलो आहोत पण आता आम्ही खबरदारी घेऊ. अधिक विचार करता मला काही इतर पथ्ये सुचली
- पत्नी नसताना एकट्यानेच पूजा करू नये.
- पूजा करताना एकमेकांचा विचार न करता आपल्या प्रिय देवदेवता डोळ्यासमोर आणाव्यात
- पवित्र आचमनांनी पूजाविधी सुकर होतो
- पूजा करताना योग्य आसन वापरणे अनिवार्य आहे. आपल्या पूर्वजांनी अशा आसनांचे वर्णन केलेले आहे.
पूजेत पाळायची अशीच आणखी काही पथ्ये कोणी सांगेल काय?
नव्वदोत्तरीतले संग्राह्य, वाचनीय साहित्य
प्रेषक राजेश घासकडवी ( गुरू, 02/25/2010 - 15:51) .भारतातून काही पुस्तकं घ्यायची आहेत. त्यासाठी संग्राह्य, वाचनीय पुस्तकांबाबत मिपाकरांकडून सूचना हव्या आहेत. विशेषत: नव्वद सालनंतरची, कारण तशी माझ्याकडे खूप थोडी आहेत. पण ती अगदी काटेकोर अट नाही. तेव्हा कृपया आपल्याला आवडलेल्या, गेल्या काही वर्षात वाचलेल्या कथा, कविता, कादंबरी, नाटक याविषयी कळवा.
जर अशी चर्चा आधीच झालेली असेल तर दुवा द्या.
श्री लिपीतील मजकूर कसा पाहावा?
प्रेषक चिंतातुरजंतू ( सोम, 02/08/2010 - 17:46) .श्री लिपी ही देवनागरी लिहिण्याची प्रणाली वापरून लिहिलेला काही मराठी मजकूर मजकडे आहे. परंतु मजपाशी श्री लिपीची प्रणाली नाही. एकही दमडी न खर्चता ही शिंची लिपी वाचण्यासाठी काही उपाय आहे का? अवश्य सांगावा. अग्रिम धन्यवाद.
- चिंतातुर जंतू 



