आजीच्या घरातली गंमत
एक चिमणी, दोन चिमणी,
तीन चिमण्या आल्या दारी,
पटापटा चोचीमध्ये,
धान्य घेऊन गेल्या घरी ।।
आजी म्हणाली चिमणी बाई,
आज का ग तुझी घाई ?,
चिमणी म्हणाली टाकून दाणा,
आज जायचयं एका लग्नाला ।।
घरी जाते, नाश्ता करते,
घालते पोरांना ही जेवायला,
पोरांची नाटकं रोज नवी,
कशी पुरवावी सांगा मजला? ।।
आजी म्हणाली खरंए बाई,
खाण्याची नाटकं नवी नाही,
तुला उद्या देईन पोळी
पोरांना दे करून गोळी ।।
तिकडून आली आजीची नात,
रोजचं नवं गाणं गात,
आश्चर्याने आजीला म्हणते कशी,
चिमणीची भाषा कळते कशी? ।।