user

शृंगार

कृष्णा तू आमच्या संगे खेळत का नाही?

अरे आमच्या कृष्णा तू आमच्या संगे खेळत का नाही?

आवडते म्हणूनी लोणी मागतो
माझ्यासंगे गोपाळ फिरवीतो
उगाच माझी खोडी काढूनी
तुम्ही लोणी मज देत नाही
कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई?

दही दुध शिंक्यात टांगले
हाती माझ्या न लागे असे ठेवले
संवंगड्यासवे काढाया जाता
म्हणता दही मी चोरून खाई
कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई?

पाणवठ्यावरी जाता स्नाना करीता
उगाचच तुमची वस्त्रे विसरता
न जाणोनी कोठे शोधीता
आळ मजवर मग का घेई?
कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई?

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०७/२०१०

माझी जन्माची शिदोरी

तुझ्या श्वासांचा विळखा
तुझ्या नजरेची मिठी
तुला पाहता लाजून
झुके पावलांशी दिठी

तुझे मौनही बोलके,
गूज डोळ्यांनी सांगते
भाव जाणून त्यातले
गीत मनात रंगते

दुराव्यात जवळीक
जपणारी तुझी प्रीत
तिचा अनाहत नाद,
तिचे स्वर्गीय संगीत

तिची अवीट माधुरी
स्वप्न जागवी बिलोरी
तुझी क्षणांची संगत
माझी जन्माची शिदोरी

मंद जाहल्या तारका.....

मंद जाहल्या तारका.......

मंतरलेले दिवस ते
चंद्र होता साक्षीला,
पुनवेच्या राती रुपेरी
प्रेमरंगी तुजसवे नाहल्या.

रात्र होती तरुण
अन यौवनी मी तुजसवे,
मोरपंखी मधुर स्वप्नात तू
गंध रातराणीचा दरवळे.

मदहोश मी, बेधुद तू
चंद्र मजकवे सामावला,
हलकेच डोकाउनी नभातून
तारकाहि गाली लाजल्या.

आजही रात्र तैसीच आहे
गंध तोच रातराणीचा दरवळे
? ? ? ? ? ? ?
चंद्र नाही आज मजकवे
तारकाहि मंदावल्या.नभीच्या

निरंजन वहाळेकर

माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा


माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा

माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा
पडती मनामधी तुफानी पाउस धारा ||धृ||

लाटांवर लाट येई उंच उसळून
तालात त्यांच्या घेई मला लपेटून
भरती आली माझ्या मनाच्या समिंदराला
माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा ||१||

भरल्या वादळी नाव वल्हवू मी कशी
माझ्या होडीची वल्ह दिली तुझ्या हाती
जोशात हाक नाव पोचव सागर तीराला
माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा ||२||

जाळं टाकलं पाण्यात गावंना मला मासोळी
आले तुझ्याच जाळ्यात मीच झाले मासोळी
घरला ने मला बरोबरीनं काढीन जलम सारा
माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा ||३||

-पाषाणभेद (दगडफोड्या)
२८/०७/२०१०

लावणी : आसं कसं वो तुमी मर्द गडी


आसं कसं वो तुमी मर्द गडी

{{{कानडाऊ योगेशु वदला तू
लावणी लिहायची फर्माईश केलीस तू

पाषाणाने लिहीली लावणी आनंदाने
वाचन करा आस्वाद घ्या तुम्ही सारे}}}


जमीन खोदताय निसती तुम्ही
जेसीबी यंत्र येईना धड कामी
खालचा वरचा गियर टाकीता
अ‍ॅक्शीलेटर दाबूनी बंद पाडता गाडी
पाव्हनं आसं कसं वो तुमी मर्द गडी ||धृ||

कोरस : डिझल भरलंय नव्ह टाकीत तुमी, हात लावून जरा हलवा
दाजी तुमी गाडी निट चालवा

दिवसाराती कामच काम, नाय दुसरं काही ठावं
जळ्ळं मेलं लक्षण तुमचं, धंदा करायचं नुसतं नावं
गाडी भाड्यानं कशाला लावता
धंद्याची गावंना तुम्हा नाडी
अहो आमदार, आसं कसं वो तुमी मर्द गडी ||१||

लई दिसांची मैतरी आपली, वाढू लागली प्रित
डोक्यामदी गजरा माळूनी, साजरी करूया रात
टॅक्टर दामटायचा सोडून देवून
उगा म्हनं चालवू का बैलगाडी
अहो मिशीवाले, आसं कसं वो तुमी मर्द गडी ||२||

गावरान आबं पिकल्याती, पेरू लागल्याती पाडाला
पाडायाची आठवन पडली, बहार जड झाला झाडाला
उगाच खुळ का काढीता
म्हनं तुझी माझी नाय जमायाची जोडी ||३||
टोपीवालं, आसं कसं वो तुमी मर्द गडी

येड्यावानी करताय सगळं, सरळ चालंना काही
सांगून सांगून थकले मी ग,काम्हून वाकड्यात शिरता बाई
पायात पाय आडकला तुमचा
कमरंचं धोतार रस्ता झाडी
अहो फ्येटेवालं, आसं कसं वो तुमी मर्द गडी ||४||

कोरस : डिझल भरलंय नव्ह टाकीत तुमी, हात लावून जरा हलवा
दाजी तुमी गाडी निट चालवा

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०७/२०१०

नका जावू अशा पावसात


नका जावू अशा पावसात

सिच्यूऐशन: रातीचा पाउस पडूं र्‍हायलाय आन हिरो पहारा करायच्या डुटीला जावूं र्‍हायलाय......

भर रातीचं आभाळ फाटलं
मनी काहूर काळजीचं दाटलं
येळीअवेळी बाहेर पडता
जीवा घोर लागं
कारभारी....नका जावू अशा पावसात ||धृ||
उगा काळजी लागं

दिसभर पडं संततधार
रातीलाही नाही उतार
घरातच र्‍हावा तुमी माझ्यासंगती
घ्यावं मला उबार्‍यात
कारभारी नका जावू पावसात ||१||

रातीला तुमी डुटीला* जाता
उलटी सारी कामं करता
एकलीचा माझा येळ जाईना
कशी काढू मी रात
कारभारी नका जावू पावसात ||२||

बाईलमानूस मी घरात बसते
तुमच्या प्रितीची आटवन येते
दोघं र्‍हावू सोबतीला
येवूद्या तिसरं कुनी पाळण्यात
कारभारी नका जावू पावसात ||३||

*डुटी च्या ऐवजी 'पहार्‍याला' असाही शब्द टाकता येतो जेणे करून हिरवीन चा नवरा 'सैन्यात पहारेकरी' आहे अशी सिच्यूयेशन करत येईल.

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/०७/२००८

आठवण आणि ……

आठवण आणि ……

वादळ, वारा, पावसातहि
भेटीस येणे अपूर्व होते,
प्रीतिचे ते क्षण उन्मादी
मनांत माझ्या ठसले होते

प्रेमकहाणी विफल आपुली
प्रारब्धाचे देणे होते,
विधिलिखित हे भालीचे
त्या समयी मज कळले नव्हते.

निशब्द अधिकार तुजवर
बिम्बवित मी गेलो नसतो,
स्वप्न मोगरा फुलवीत मनींचा
सुगंधित मी जाहलो नसतो.

जीर्ण घराच्या मज भिंतीवरची
तसविर तुझी चिरतरुण आहे,
गाली खळी अन ओठ गुलाबी
त्यांत आजहि तसेच आहे

निरंजन वहाळेकर

हा तोच किनारा फिरतो मी

उजव्या बाजुस गजबजणारी तीच गाज घुमते अरबी
हा तोच किनारा फिरतो मी ।।धृ।।

दगडावरती झोकुन सारे
वार्‍यामनिचे गुपित खारे
लेउन लाटा उधळण करती तीच तुषारांची धुंदी ।।१।।

तोच दिवस त्या महिन्याचाही
तोच कोन त्या किरणांचाही
परंतु पृथ्वी सूर्याभवती व्यर्थ फेर फिरली काही ।।२।।

धरून ऐना कुंद हवेला
तनामनाने हिरवुन गेला
तसा न सागर आज सांगतो जन्मजन्मीच्या गुजगोष्टी ।।३।।

केसांमधल्या लाटा सारत
शब्दहासरे तुषार बरसत
उजव्या बाजुस गाज रोखुनि चालत तू ना मजसाथी ।।४।।

काय बोललो तेव्हा आपण
कसे कुठे अन गेले ते क्षण
मनात ओल्या रेतीवरच्या त्याच खुणा धरल्या जपुनी ।।५।।

डाव्या बाजुस गाज अता ही
सूर्यास्ताची सरते तरिही
जादू उरली अजुनी अपुल्या स्पर्शधुंदीच्या लाटांची ।।६।।

कव्वाली : अशी ग कशी सोडूनी जाते तू मला

कव्वाली : अशी ग कशी सोडूनी जाते तू मला
अशी ग कशी सोडूनी जाते तू मला | करू मी काय विचारू कसे मी तूला ||धृ||

वाटे जीवन आता हे सारे आले संपुष्टात | नश्वर शरीर हे आत्मा कसा राहील त्यात
सांभाळू काय कसे मला न समजेना | शेवटचे भेट मला हे ही बोलवेना ||१||

कधी काळी आठवण जरी माझी आली | नकोस भेटू कसे म्हणू मी त्या वेळी
हुरहुर लागे नेहमी माझ्या जीवा | आठवणी जुन्या साधती कावा ||२||

पावसाचे थेंब जेव्हा सोडतात मेघांना | हुरहुर लागते तेव्हा त्यांना
तशीच हुरहुर लागली मला तेव्हा | सोडून गेलीस जेव्हा तू मला ||३||

जरी थेंब साथ ढगांची सोडती | ढगांचे सुख एकच की थेंब पिकवतील शेती
तसाच मी ही आहे ढगांसारखा | सुखी होशील तू फुलव संसार दुसर्‍याचा ||४||

तुझे ते हसणे अन लाघवी बोलणे | आठवते ते तुझे खिडकीतले उभे रहाणे
जेव्हा आता मी जातो घरावरून तुझ्या | खिंडार पडे काळजातल्या घरात माझ्या ||५||

का करित होती चाळे केसांच्या बटांशी | का कवटाळी दिलेला गुलाब उराशी
का केला होता तू खुणेचा इशारा | का केला होता माझ्या नावाचा पुकारा ||६||

असेल जेथे तू तेथे सुखी रहा | माझ्या मनाला समजावीतो पहा
म्हणून सांगतो मी तुम्हाला| प्रेम केले तर न्या ते शेवटाला ||६||

अशी ग कशी सोडूनी जाते तू मला | करू मी काय विचारू कसे मी तूला ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१५/०७/२०१०

गाणी

आज अचानक जागी झाली
कधीतरी निजलेली गाणी
सांजवात होऊन तेवली
मनातली विझलेली गाणी ||
दबले, बुजले, घुसमटलेले
सूर विजेसम लख्ख चमकले,
घन बरसावे तशी बरसली
कंठातच थिजलेली गाणी ||
भुरभुरता पाऊस कोवळा
संध्यारंगातून झिरपला,
किरणांच्या छायेत उतरली
थेंबांवर सजलेली गाणी ||
नवथर मातीच्या ओलेत्या
देहाच्या परिमलात घुमली,
दरवळली अन तिच्या कुशीतुन
कोंबांसह रुजलेली गाणी ||
निळेसावळे ओले अंगण,
तुझ्या नि माझ्या मनात श्रावण,
रानोरानी, पानोपानी
भिरभिरती भिजलेली गाणी ||
असाच अवखळ पाउस होता,
अन उडणारी एकच छत्री,
आठवली का हळूच माझ्या
कानी कुजबुजलेली गाणी?

Syndicate content
Scroll to Top