जेव्हा अदम्य ऐसी
जेव्हा अदम्य ऐसी
निद्रा कवेत घेते
आकाशभाषितांना
ध्वनिचित्ररूप येते
अंधार भिनत जाता
भवताल स्तब्ध होते
संवेदनांस अवघ्या
व्यापून साक्षी उरते
दिग्बंध सैल होती
तर्कास काम नुरते
कालौघ थांबतो अन्
आभास सत्य होते
अज्ञातशा स्वरांचा
अनुनाद ऐकू येतो
एकेक जाणिवेचा
अस्पष्ट बिंदू होतो
निद्रा अशी कृृृृपाळू
अंकी तिच्या मी क्लांत
मी शून्य एरवी, पण
निद्रेत मी अनंत