आनंदवन
मी नाही जाणत उगम तुझ्या दु:खाचा
तू पापी अथवा क्षण जगसी शरमेचा
प्रारब्ध तुझे वा आणी येथे तुजला
करुणेचा पाझर नाही चौकस इथला
नि:शंक निकट ये, हाती दे तव हात
या दु:खार्ता॑च्या देशी हाच प्रघात
परवलिची इथली एकच अनवट खूण
जरि जखम तुला, तरी माझे हृदय विदीर्ण
जरि भग्न तुझे कर, घडवू शिल्प अभंग
जरि कभिन्न वास्तव, बदलू त्याचा रंग
या निबिड अरण्यी, चल रचण्यास तराणे
आनंदवनाचे हेच ब्रीद, अन गाणे
आनंदवनाचे हेच ब्रीद, अन गाणे