प्रेम कविता

पुस्तक

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
16 Jul 2017 - 6:23 am

ते पुस्तकच आहे.
दूर तुझ्या घरात ठेवलेलं
काचेआड.

एकदा तू वाचलेलं.
तू तिथं नसताना
मी वाचलेलं.
तिसरं कुणीही ते वाचलेलं नाही.

एकदा तू, नंतर मी.
कथा तुझ्या डोळ्यांनी वाचली
मी तुझे डोळे वाचले.

ते पुस्तकच आहे? अजूनही?
दूर तुझ्या घरात ठेवलेलं
काचेआड...
-शिवकन्या

मांडणीवावरकवितासाहित्यिककविता माझीप्रेम कविता

धुंद पाऊस

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
9 May 2017 - 10:46 pm

अनोळखी भेटीत धुंद पाऊस बरसला
थेंबा थेंबात प्रीत नक्षी आकारून गेला

पाने हलता मोती ओघळे
तुझ्या चाहूलीने गंधाळती मळे
गंध तुझा सावळ्या रानी विसावला

पावसाळी सावल्यांत मेघांचा झुला झुले
हळूवार प्रीतीत सरींचा पिसारा उमले
कोवळ्या सूराने दवांत पंख पसरला

विहग जलधारांचे पालवींत लोपले
गूज फुलपाखरांचे मंजिरींत साठले
ओलेत्या नभाने बांधली इंद्रधनुची मेखला

कविताप्रेम कविता

काळाचे गीत

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
9 May 2017 - 10:45 am

तूहि नव्हतीस, मीही नव्हतो
बघ काळ कसा बदलतो
तारे ते जे सदाच असती
आपल्या जागी नभात वरती
आज मोजण्या जागे कोणी
मनात अन् मोगरे माळूनि
फेऱ्या आपुल्या पाणवठ्याच्या
चर्चा साऱ्या गावकुसाच्या
कशी न कळली तू गेलेली
नियती अशी उलटलेली
पुन्हा भेटलीस का वळणावर?
घेऊन कुंकू परके, भांगावर
उभय उरातहि ते काही
आधीसारखे हलले नाही
        तूहि नव्हतीस मीही नव्हतो
        पुरते आपण अनोळखी होतो
        तू आहेस अन आज मीही
        समोरासमोर अगदी, तरीही
        त्याच्या हाती सर्व आहे

कलाकविताप्रेमकाव्यसाहित्यिकप्रेम कवितामाझी कविताकरुण

दे बहाणे सोडुनी ...

फुत्कार's picture
फुत्कार in जे न देखे रवी...
4 May 2017 - 11:00 pm

खास काही आजच्या भेटीत झाले आखरी
कावरी झाली किती झाली किती ती बावरी

भासवे नाजूक काही भावना या ना मनी
सांगते सारे खळी जी लाजते गालावरी

मान वेळावून पाही तो बहाणा लाघवी
एकदा सारे अशी सारे तशी बट लाजरी

ऐकण्यासाठी अबोला कोकिळा झाली मुकी
बोलली नाही तरी पंचम तिच्या ओठावरी

साधली संधी कशी तो वर्षला ग्रीष्मातही
दे बहाणे सोडुनी ती लाज आता सावरी

... संदीप

कवितागझलप्रेम कविता

पाण्यात हसरी राधा रुक्मिणी सवे

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
17 Apr 2017 - 8:13 am

तरूस लगडली सुवासिक आम्रफळे
परी कोयी अन बीया मोजतो हा बळे

पाण्यात मासे उसळतात
रेतीच्या खोप्यास हसतात

तृष्णार्त कृष्णा टोचती का खडे
जळात उतरू कसा प्रश्न हा पडे

आर्जवी पाणिते अवीट
परी कृष्णास दिसे का मीठ

खेळती कधी लहर कधी लाट
प्रश्नांकीत किनारी मुरलींची पाठ

तुडूंब सरोवर नरतनी पक्ष्यांचे थवे
पाण्यात हसरी राधा रुक्मिणी सवे

मुक्तकआता मला वाटते भितीकालगंगाजिलबीप्रेम कविताभूछत्रीरोमांचकारी.करुण

कविता

फुत्कार's picture
फुत्कार in जे न देखे रवी...
7 Apr 2017 - 12:13 am

आज वाटते एक कविता अशी जन्मावी
हाताने तर नव्हेच आणि ती मी न लिहावी

तू नुकतीच नाहलेली अन ओलेती असावी
केस मोकळे, दवबिंदूंनी पापणी मिटावी
ऊन कोवळे लेऊन कांती तुझी चमकावी
आज वाटते ...

अशी पाहुनी तुला, मला अस्फूट स्फुरावी
जवळ येउनी तू माझ्या नयनी वाचावी
ह्या हृदयीची त्या हृदयी होऊन जावी
आज वाटते ...

मिठीत माझ्या दिठी तुझी ती अलगद यावी
गात्रांमधली थरथर होऊन तू प्रसवावी
ओठ टेकता तुझ्याच ओठांतून उमटावी

आज वाटते एक कविता अशी जन्मावी
हाताने तर नव्हेच आणि ती मी न लिहावी

कविताप्रेमकाव्यप्रेम कविताभावकवितारोमांचकारी.शृंगार

इंद्रजाल

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
24 Mar 2017 - 9:51 pm

वेड लागे या लाजऱ्या कळीला
ओघ प्रितीचा दिगंतर परिमळला

सख्या अनुरागाचे इंद्रजाल तुझ्या नयनी
निर्मल भाव फुलला उभ्या गगनी
ह्रदयाची उमलूनी पाकळी मोगरा दरवळला

आर्त गीतांचे झाले गोड सूर
चांदण्यांची पैंजणे घाली साद मधुर
मिठी घाली जीव सख्या तुझ्या काळजाला

गूढ अबोल सावली डोळ्यांत दाटली
वाट हसऱ्या फुलाची त्यांत दिसली
ओढ अनिवार छळे सख्या या घडीला

कविताप्रेम कविता

कदाचित (भयगुढ कविता)

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जे न देखे रवी...
22 Feb 2017 - 11:00 am

कदाचित ही फक्त हवा असेल
जी चाल करून येतीये
विव्हळणाऱ्या जीर्ण फांद्यांना
खिडक्यांवर फटकारतीये

कदाचित हा फक्त पाऊस असेल
जो ढगांना प्रसवतोय
दाराछतातून टपटपून
अंगावर बर्फशहारे आणतोय

कदाचित ह्या फक्त सावल्या असतील
ज्या श्वापदांसारख्या दिसताहेत
सराईत शिकाऱ्यासारख्या
मला चारीबाजूंनी घेरताहेत

कदाचित हा फक्त कावळा असेल
जो आत्ताच खिडकीवर धडकलाय
रक्ताळलेली चोच आदळून
काचांना तडे देत सुटलाय

कविताशब्दक्रीडाप्रेम कविताभयानक

१०० नंबरी प्रेम

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जे न देखे रवी...
14 Feb 2017 - 10:47 am

---------------------------------------------
बायकांच्या बडबडीने जेव्हा
इच अँड एव्हरीजण कंटाळला
'रोज शंभरच शब्द बोलायचे'
सरकारने नियम काढला

मला फारसा त्रास नव्हता
नेहमीच मी कमी बोलायचो
गप्पा,भांडण,उपदेश
मोजक्या शब्दांत मांडायचो

नियम लागू व्हायच्या थोडं आधी
मला भलताच नाद लागला
एका गोग्गोड बडबड्या पोरीवर
नकळंत जीव जडला

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तिला
प्रपोज करायचं ठरवलं
शंभर शब्द काय बोलायचे
गणित मांडायला घेतलं

कविताप्रेमकाव्यभाषाशब्दक्रीडाप्रेम कविताहास्य

तुझ्या अंतरीची (चारोळी)

पराग देशमुख's picture
पराग देशमुख in जे न देखे रवी...
6 Feb 2017 - 3:44 pm

तुझ्या अंतरीची, मला जाण आहे;
जरी गीत माझे, तुला ताण आहे.
जरी ना निथळली, कधी कांत माझी;
तुझे पावसाळे, मला रोष आहे.
..............................................मुकुंद

कविताचारोळ्याप्रेमकाव्यमुक्तकव्युत्पत्तीशब्दक्रीडाअभय-काव्यकविता माझीप्रेम कविताभावकवितामुक्त कविता