शशक- एका पायाचा कावळा
वडील गेल्याने अचानक सुट्टी घेउन त्याला भारतात यावे लागले. चुलत भावांनी सुरुवातीचे विधी केले होते, पण "निदान पिंडदानाला तरी ये" म्हणुन त्याला गळ घातली होती. गुरुजी आले. त्यानी सगळे विधी समजावुन सांगितले. त्यावर तो आढ्यतेने म्हणाला" माझा या सगळ्यावर अजिबात विश्वास नाही. केवळ थोडक्यासाठी वाद नकोत म्हणुन मी हे सर्व करायला तयार झालोय."
सगळे घाटावर पिंडदानाला जमले. बराच वेळाने एक कावळा पिंडावर उतरला आणि भाताची मूद चिवडु लागला. त्याला एकच पाय होता. याने काही वेळ पाहीले मात्र आणि धाय मोकलुन रडु लागला. गुरुजींना कळेना काय झाले? त्यानी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले.