user

कला

माझे रिकामपणाचे उद्योग--पेपर क्विलिंग!!!!

आमचे आधीचे रिकामपणाचे उद्योगः
१. ग्लासपेंटिग
२. बुकमार्क्स

सुबक ठेंगणी जपानहून आली. यायच्या आधीच तिने माझ्यासाठी विणलेला एक छानसा रूमाल घेतलाय म्हणून सांगितले होते. पण भेटली, तेव्हा तिने नुसता एकच रूमाल न देता एक आख्खी पेपर बॅगच दिली. आणि मी आतल्या भेटवस्तू पाहायचं सोडून बॅगकडेच पाहात राहिले. कागदाच्या पातळ पट्ट्या नीट्सपणे कापलेल्या. आणि त्या पट्ट्यांची सुंदरशी पिवळी-तांबडी, पिवळी-निळसर फुले, हिरवीगार पाने अशी मस्त नक्षी. प्रत्येक फूल दिमाखात... आपलाच तोरा सांगणारं!!!

लगेच डोक्यात किडा वळवळला. पुढचे रिकामपणाचे उद्योग म्हणून जमण्यासारखे आहे. अगदीच किचकट नाहीए, पण पूर्वतयारीला वेळ चांगलाच लागेलसं काम दिसत होतं खरं. करायचे म्हटलं तरी त्याचा तेव्हा श्रीगणेशा झाला नाही तो नाहीच.

माझं घर तळमजल्यावरचं. खेळता खेळता तहान लागली म्हणून पाणी प्यायला येणार्‍या बाळगोपाळांचं हक्काचं. मग पाणी पिता पिता चॉकलेटस खायला, टॉम-ऍंड-जेरी पाहायलाही ही मंडळी रेंगाळू लागली. त्यातलीच एक आनंदिता. आहे आता पहिलीतच, पण जाम गोडुलं आणि पक्कं डॅंबीस ध्यान आहे. आली की हटूनच बसते. बिचारे आई-बाबा तिला विनवून थकतात, आणि ही त्या कारवारी कोंकणीत काय बोलते, त्यातले मला अर्धं कळतं, राहिलेलं डोक्यावरून जातं, पण हिला आणखी थोडावेळ सवलत मिळते. एकदा मी तिला आणि तिच्या आईला माझ्याकडचे बुकमार्क्स दिले. माझी परिक्षा जवळ आल्यावर मी तिला अभ्यास आहे असे सांगून घरी पिटाळले तर पठ्ठी परत आईला घेऊन हजर. दोघींनी मिळून माझ्यासाठी छानसे परीक्षेच्या शुभेच्छा देणारे ग्रीटिंग आणले होते. आत नांव आनंदिताचे असले तरी बनवलं आईनंच होतं.

एकदा मी कॉलेजमधून येतायेताच ती भेटली. सोबत येणार हे तसे ठरलेलंच. आल्या-आल्या तिची नजर पुस्तकाच्या कपाटावर भिरभिरली. “ये मेरी मम्मीको आता है.” हे तिचे वाक्य आणि पाठोपाठ “ताई आताच आलीय तिला त्रास देऊ नको” असे म्हणायला तिची आई. व्वा!!!! कावळा बसायला... आपलं बोलाफुलाला गाठ पडली. त्या म्हणाल्या,” अगं हे तर क्वीलिंग. गुगल कर ढीगभर नमुने सापडतील. क्वीलिंगचे किट मिळते. या पातळ पट्ट्या अशा कापाव्या लागत नाहीत, कापलेल्या आयत्या मिळतात”. म्हटलं ,चला, आळशी माणसाची सोय झाली”. लागलीच बाजारात जाऊन एकदम मोठाले हॅंडमेड कागद(माझीच पुस्तके बुकमार्क्सशिवाय तशीच पडलीयेत.. एखादा कुठेतरी सापडतोय आणि मग त्यालाच या पुस्तकातून त्या पुस्तकात नाचवतेय), रेशमी धागे, क्वीलिंग पेन, क्वीलिंगचे पॅड, दोन-तीन प्रकारच्या वेगवेगळ्या कापलेल्या पट्ट्या असे चांगले साताअठशे रूपये कागदावर उडवून आले. माझ्या त्या नेहमीच्या दुकानाचा मालक म्हणजे एक शितू सरमळकर आहे. येणारी निवडुंग-गुलाबे काही खरेदी न करता सगळं दुकान उचकटतात आणि हा त्याच तन्मयतेने सगळ्या आघाड्यांवर तोंड देत असतो. साहजिकच मला दहा रूपयांचे धागे घ्यायला कमीतकमी पंधरा मिनिटांचा वेळ द्यावा लागतो. म्हणून जे काही असेल ते एकाच वेळी घेतले की परत परत तिथे जायला नको. मग आल्यावर उत्साहात त्याच दिवशी दोनचार पट्ट्यांवर प्रयोग करूनही झाले. आधी त्या सुईला आरपार भेग आहे हेच नाही कळलं. त्या गुंडाळ्या जमेचनात. ते कधीतरी दुसर्‍या दिवशी लक्षात आले. पण कामाला मुहुर्त असा काही लागला नव्हता. काल मात्र झोपतानाच आज क्वीलिंगचा फडशा पाडायचा असे ठरवूनच झोपले.

हे असं असतं क्विलींगचे पेनः

त्यातल्या फटीत कागदाचे एक टोक अडकवायचे आणि मग हवे तसे हलके किंवा घट्ट हाताने गुंडाळ्या बनवायच्या. पट्ट्या या अशा मिळतातः

भल्या सकाळी(?) उठून मी सगळा पसारा पसरून त्या गराड्यात बसले. सुरूवात कुठून करावी हेच समजत नव्हते. कशावर करायचे, तेही नक्की होत नव्हते. बुकमार्क बनवू की ग्रीटिंग??? पुस्तकातली चित्रे बघून करू, की मी काही चित्रे डाऊनलोड केली आहेत ती बघू, की नव्याने चित्रे शोधू? त्यात त्या पट्ट्यांची जाडी, पोत, दर्जाही वेगवेगळा. त्यातल्या नक्की कोणत्या कोणत्या प्रकारच्या चित्रासाठी योग्य ठरतील? हे सगळं कमी की काय म्हणून मधून मधून मिपा, फोन, चॅटिंग चालूच होतं. मग शेवटी एक पांढरा हॅंडमेड कागद घेतला. त्याची दोन ग्रीटिंग्ज करायची ठरवली. हातात कात्री आली की आधी चालवायची आणि नंतर “आई गं, हे काय झालं?” हे नेहमीचंच. (नशीब संपादक नाहीए मी). एका कागदात दोन भेटकार्डे जरा जास्तच मोठी वाटली म्हणून मी त्याची तीन केली होती. आता ती रूंदीला जास्तच कमी वाटू लागली. आता जो घोळ घालायचा तो यावरच घालू असा विचार करून बरीच चित्रे शोधून शोधून त्यातही थोड्या सुधारणा करून सोप्यात सोप्या प्रकरणाच्या वाटेला जायचे ठरवलं. मग चित्राबरहुकूम आकार बनवायला घेतले. आधी सोपे आणि पटकन होईलसे वाटणारं काम आता रंग दाखवत होते चांगलंच.

मग जरा वॉर्म-अप. आधी साध्या गुंडाळ्या. मग पुस्तकातली चित्रे पाहून पाहून त्यांना आकार दिले. घट्ट गुंडाळी केली की फूल, पाकळी, कळी जे काही असेल ते छोटे होत होते. म्हणून मग कधी घट्ट तर कधी हलक्या हाताने गुंडाळ्या करून , टोकं चिकटवून करून पाहिल्या. ते क्वीलिंग पॅड काही आवडलं नाही.. मग दिलं ठेवून सरळ बाजूला. बरं, हे सगळं करण्यात नीट लक्ष असावं की नाही? कुठले काय, जोडीला मिपा-फोन-चॅटिंग चालूच. मग काही लाक्षणिक प्रगती दिसेना. नुसत्याच गुंडाळ्या, कागद, कपटे, कात्र्या, आणि मध्ये मी आणि लॅपटॉप!!!!


फोटो खूपच छोटा आहे. काही विशेष केलेले नाहीए त्यात. एक गुंडाळी बनवायची आणि काही ठिकाणी हवा तितका दाब देऊन पान, बाण, पाकळी, डोळा असे आकार बनवायचे.

मग परत कंटाळा आला नुसत्याच भेंडोळ्यांचा. मग म्हटलं वेगळा आकार करून नुसतीच गुलाबाची फुले करावीत. पण हाय रे दुर्दैवा.. त्यासाठी कागद गोल कापायला हवा. वर्तुळ काढायला तर काहीच नव्हते माझ्याकडे. चालायचंच. आपल्याला अक्कल पाजळायला संधीच लागते ना!! पट्टीने मापे घेऊन सहा खुणा केल्या आणि काढलं वर्तुळ. हैच काय त्यात. मग आधी साध्या कागदावर प्रयोग केला. सारखे सारखे शितू सरमळकडे उगीच जायला लागायला नको म्हणून. करायचे काय होतं, तर दिलेल्या प्रमाणानुसार एक सहा इंच व्यासाचं वर्तुळ आखायचं, त्यात टोकापासून अर्धा इंचाचं स्पायरल वर्तुळ मध्यापर्यंत जाईल असे काढायचे आणि त्या स्पायरल रेषेवर कापायचे. आणि टोकापासून आतपर्यंत उलट्या बाजूने गुंडाळत यायचे. मग ते एखादी डिश सजवायला करतात तसे टोमॅटोच्या फुलासारखे दिसते. हे असे:

सराव तर झाला.. पण ते सहा इंचाचे फूल मोठे वाटत होते, अर्ध्या इंचाच्या पाकळ्या पण.. म्हणून मग आणखी लहान मापे घेतली आणि यावेळी थेट रंगीत कागदावर आकार कापला. आता आला का घोळ?? सरावाचा कागद साधा होता. हा एका बाजूने रंगीत आणि दुसर्‍या बाजूने पांढरा. आकार कापला पांढर्‍या बाजूने. पण टोकाकडून फुलाचा रंग दिसण्यासाठी नक्की गुंडाळायचा कसा?? त्यात सगळं लक्ष अदितीसोबत फोनवर खिदळण्यात. एक फुल आधी या बाजूने गुंडाळले, मग त्या बाजूने.. तरी पुढच्या फुलाच्या वेळी घोळ आहेच. शेवटी अदितीलाच सांगितले, “पुढच्या वेळी मी विचारले की सांग, पांढर्‍या बाजूने गुंडाळायचे म्हणून” आणि मग फोनवर बोलता बोलताच माझ्याकडे दोन पेपर बॅग्ज आहेत, त्यातली एक तुझ्यासाठी आणि दुसरी माझ्यासाठी म्हणून ठरवूनही झाले.

हुश्श!!! आता मांडामांड ठरवू लागले.. मनाजोगती जमेना. मग पुन्हा एकदा ब्रेक घेतला. मिपा रिफ्रेश केलं.. दोन वाजून गेले होते. पटापट सॅंड्विचेस बनवून खाऊन घेतली. आणि पटकन जशी सुचेल तशी फुले ठेवून बॅग बनवली!


(अदिती, आणखी एक फूल वाढवलं गं)

मग काही ग्रीटिंग कार्डस. तीही अशी तशीच नेटावरचे फोटो तसेच्या तसे वापरले असते पण गुंडाळ्या बनवायचा आळस केला आणि मग तयार कच्च्या मालातूनच सगळं साकार(!) केलं!

हे केशरी फूल आनंदिताच्या आईने बनवलेल्या कार्डवरती होते अगदी तस्संच आहे.

मग नुसतीच काही फुलं शिल्लक होती म्हणून माझी छोटुशी बचतबँक पण सजवून टाकली.

ही तर नुसती सुरूवात आहे. पहिलाच प्रयत्न. अवघड असे काहीच नाही. क्वीलिंगसाठी तयार पट्ट्या मिळतायत. आता कुणी तयार गुंडाळ्या देतं आहे का हे शोधेन!!!

टीपः घरातल्या कॅमेर्‍याने नुकताच राम म्हटलाय आणि मोबाईलच्या कॅमेरा लेन्समध्ये खंडीभर धूळ गेलीय. त्यामुळे गरजेपुरते फोटोज जालावरून घेतलेले आहेत. मी काढलेले फोटोज तितकेसे चांगले आले नाही आहेत. त्याबद्दल आधीच क्षमस्व!!!

बुलबुल तरंग - माहिती हवी आहे

सद्या मी बॅंजो किंवा बुलबुलतरंग नावाचे एक वाद्य शिकत आहे (फक्त सातशे रूपयात ब्रॅण्ड न्यू पीस मिळाला). आजकालच्या ढ्याण-ढ्याण संगीतात हे गोड, नाजूक आवाजाचे वाद्य अगदी तुरळक प्रमाणात दिसते - हे वाद्य मरत चालले आहे असे म्हटले तरी चालेल; पण शिकायला फार सोपे असते (सा रे ग म प ध नी काही तासांत शिकता येते) इंटरनेटवर शोधून पाहिले, पण एकच साईट सापडली - त्यावर बाळबोध धडे नाहीत.
मिसळपाववर हे वाद्य वाजवणारे, त्याबद्दल मार्गदर्शन करू शकणारे कुणी आहे का??
याबद्दल पुस्तके इ. उपलब्ध असल्याचे माहित असल्यास तेही कृपया सांगावे.

केव्हा तरी पहाटे..

असंच एकदा मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारताना एका मैत्रिणीने केव्हा तरी पहाटे हे गाणं म्हटलं...तर त्यावरून एका मैत्रिणीला याच गाण्यासाठी काही ओळी सुचल्या. मग त्यानंतर सगळ्यांनाच हा फीवर चढला...हे माझेही काही प्रयत्न -

ही कडवी चालीत बसत नसली तरीही त्यातील भावार्थ गाण्याला अनुरूप असा आहे

या शांतशा क्षणांनी मागितली साथही कुणाची
ती साथ मागताना ही रात सरून गेली..

शब्द माझे भिजताना सजवून रात्र गेली
हे शब्द वेदनांचे सुचवून रात्र गेली..

बघा तुम्हालाही अजून काही सुचतंय का?

कलात्म :- गोष्ट नव्या विचारांची... !!!

मध्यंतरी कलात्म हा विशेषांक वाचल्यानंतर लिहिलेले काही ...

कला हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच, कलेच्या विविध अंगावर सातत्याने चर्चा होत आलेली आहे. त्याशिवाय, वेगवेगळया perspective ने त्याचा अभ्यासही झाला आहे, होत आहे. मात्र कलेचा सामाजिक अंगाने फारसा अभ्यास झालेला दिसत नाही, निदान मोठ्या प्रमाणात झालेला नाही असे मला वाटते . म्हणूनच या विषयाला वाहिलेला "कलात्म" विशेषांक हे एक युनिक प्रॉडक्ट आहे. तसे पहायला गेले तर कलेवर सामाजिक अंगाने १० वर्षापूर्वीच काही व्हायला हवे होते , नाही का? पण, ते आत्ता होतयं!! असो , देर हे लेकिन दुरूस्त है ! आणि, म्हणूनच या धाडसी पावलासाठी संजय आवटे आणि टिम कलात्म यांचे आधी अभिनंदन करायला हवे.

संजय आवटे ! त्यांच्याबद्द्ल आता एक अनामिक कुतुहल निर्माण झालेले आहे . तरूणाईला भावणारी पत्रकारिता, बराक ओबामा या पुस्तकाचे यश ही त्याची कारणे आहेतच, पण लोकांना समजून घ्यायचा सतत प्रयत्न करणारे, विविध माध्यमाद्वारे समाजाच्या विविध क्रॉस सेक्शनचे निरिक्षण करणारे जे फार कमी लेखक आहेत. त्यात त्यांचा समावेश होतो. साहजिकच, या सगळया जाणिवांचा इफेक्ट त्यांचा 'कला कल्पतरूंचे आरव' या कलात्म च्या प्रस्तावना पुस्तिके देखील पडतो. आपण किंवा आम्ही तरूण म्हणा हवं तर.. आज खर्‍या आनंदाला पारखे झालो आहोत, हे खरे आहे . याचे कारण म्हणजे, आमचे आयुष्याचे बेसिकच चुकत आहेत. आमच्यात Preferences चा घोळ आहे. आणि, आवटे त्यांच्या प्रस्तावनेतुन याच मुद्द्यावर बोट ठेवतात , आत्म परीक्षण करायला लावतात . सुखी माणसाचा सदरा प्रत्येकजण शोधत असतो आणि, कला ही तो सदरा सापडण्यासाठी वापरायचा मार्ग आहे , असे आवटेंना वाटते व असे का ? हे ते या प्रस्तावनेतुन एक्स्प्लेन करतात. त्याहून महत्वाची बाब म्हणजे त्यांना माहित असलेली तरूणाईची नस... त्यामुळे, आमची आजची सिच्युएशन व सुप्त ताकद ते जाणतात आणि त्याला योग्य डायरेक्शन द्यावे लागेल हे अधोरेखित करतात !! म्हणूनच तसे बघायला गेले तर यातले मुद्दे असे प्रचंड वेगळे नसुनही प्रस्तावना ,त्यासोबत जोडलेले लेख पुन: पुन्हा विचार करायला लावतात, हे नक्की !

आणि म्हणूनच मग, धारणा, धोरणे आणि धुरिणांचा विचार करणारे कलात्मचे दोन अंक आपल्या समोर येतात. अक्षांश, कक्षा, ऐलपैल अशा विविध भागात विभागलेलं हे अंक अवाढव्य आहेत. Literally अवाढव्य...! एवढया 80 जणांना लिहिते करणे काय सोपी गोष्ट आहे का?ब्राव्हो , ब्राव्हो ..

एक फेमस quote आहे, कुणाचा आहे ते आठवत नाही... पण त्याचा अर्थ असा आहे. ''इतिहासाचे ओझे होऊ देऊ नका, उज्वल भविष्यासाठी ती पायवाट बनु द्या.'' कदाचित याच quote ला अनुसरून विविध दिगज्जांनी अगदी पहिल्याच भागात कलेचा इतिहास सांगितलेला आहे. Frankly speking मला किंवा आमच्या पीढीला एवढा इतिहास माहितच नव्हता. म्हणुनच माझ्यासारख्यांसाठी हे अत्यंत उपयोगाचे आहे. चैतन्य कुंटे आणि इतरांचे लेख म्हणजे, उत्तमच ! ऐलपैल मधुन इतिहास आणि ''इटस अवर टाईम'' मधून कलेचा वर्तमान समजतो. थोडक्यात कलाविश्वाबाबत आपली जाण , माहिती वाढते .

राहून राहून एक गोष्ट मात्र बरी वाटते , कि साला या विषयावर पीएच.डी. चा एक प्रबंध झाला असता... ''मराठी कलेची स्थिती - एक अभ्यास'' असाच काही , रूक्ष आणि शब्दबंबाळ ...! पण, ''कलात्म'' मध्ये विविध कलाकारांनी आपले अनुभव आपल्याच भाषेत शेअर केल्याने सुदैवाने अशा बोजडपणाची पुटे कलात्मवर चढलेली नाहीत.

याहून महत्वाचा म्हणजे आपल्या कलेचा आवाका...! फार मोठा आहे हो तो .. मला असे वाटते की, तुम्ही, मी ,आपण एका कोषात असतो याबाबतीत . म्हणजे कोल्हापूरात राहणार्‍या माझ्यासारख्या मुलाला आदिवासींच्या कलेबद्दल फारशी माहिती नाही , नसणारच.... पण ती एक कला आहे, अशा अनेक कला महाराष्ट्रभर, भारतभर आहेत. आणि, प्रत्येकाला स्वत:ची अशी आयडेन्टीटी आहे. या सगळ्यांबद्दल सगळे जाणायला बर्‍याच मर्यादा आहेत . पण, आपल्या कोषातून बाहेर पडायला, या सगळया कलांची तोंडदेखली का होईना ओळख करुन घ्यायला ''कलात्म'' हा एक उत्तम सोर्स आहे.

जरा विचार केला ,की अरे मला स्वत:ला यातले किती लेखक माहित होते? 50 टक्के फक्त... थोडीफार अशीच प्रत्येकाची परिस्थिती असणार आहे. अंतरे, भौतिकता, कला सर्वदूर पोहोचविण्यासाठी येणारे अडथळे... यामुळे ही एवढी चांगली लोकच मला /आपल्याला माहित नसतात. मी वरती कोषाचा संदर्भ दिला तो त्या अंगाने ...! पण, कलात्म नवीन लोक, त्यांचे विचार सगळ्यांकडे पोहोचवत आहे . कमलेश देवरूखकरसारखा एक नवा मित्र, मला या ''कलात्म'' नेच दिला...! नीरजा पटवर्धन ज्या वेशसंकल्पक या एका वेगळया कलेशी संबंधीत आहे, त्या कितीजणांना माहित आहेत? सुदैवाने मला त्या माहित आहेत, पण या कलेबद्दल लोकांना कसे कळणार? या सांस्कृतिक मध्यस्थाची भूमिका कलात्म खुप छान बजावत आहे. थोडक्यात आत्ताच्या घडीला ''कलात्म'' हा कलेचा Enclyopedia झाला आहे. ज्यात, माहितीसोबत विचारांचा, भावनांचा बोनसदेखील आहे.

अर्थात, कला क्षेत्रातील एखाद्या दर्दी माणसाला किंवा खर्‍या रसिकाला हया सर्व गोष्टी माहित असणार आहेत. त्यामुळे त्यांना यात काही नवं सापडणार नाही , किंवा त्यात भविष्यासाठी फारसा ठोस आराखडाही मांडलेला नाही. पण, हा अंक आहे तो सामान्य कलासक्त माणसासाठी .... ज्याला हे सगळं समजून घ्यायचयं...हे सारं अशा लोकांसाठी आहे ज्यांना मळवाटेपेक्षा चाकोरीबाहेरची वाट जास्त रुचते ...आणि हे त्यांच्यासाठीच असले पाहिजे, कारण उद्याच्या जगाच्या चाव्या त्यांच्याकडेच आहेत. बरोबर ना ?

डॉ. श्रीराम लागूंचे विचार, आवटेंची उत्तम लेखक निवड, प्रत्येकाने आतुन लिहिलेले लेख आणि उत्तम निर्मितीमुल्य यामुळे अवघ्या ५० दिवसात तयार झालेला हा विशेषांक महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिम्मित हे विविध उपक्रम सुरु आहेत त्यातील एक महत्वाचा उपक्रम तर आहेच. पण, कलेचा आवाका समजून घेण्यासाठी, काही वेगळ वाचण्यासाठी, कलासक्त होण्यासाठी संग्राह्यदेखील आहे.

कलात्म
अतिथी संपादक - डॉ .श्रीराम लागु
संपादक - संजय आवटे
लेखक - विविध कलाक्षेत्रातील नामांकीत ७० एक व्यक्ती ....

पल पल दिल के पास...

हे लेखन माझा मित्र चंद्रशेखर महामुनीचे आहे. आधी इ-सकाळवर प्रकाशित झालंय पण त्याच्या परवानगीने इकडे प्रकाशित कर्तेय...

पल पल दिल के पास...

हर शाम आँखोपर तेरा आँचल लहेराये,
हर रात यादों की बारात ले आये
मै सॉंस लेता हूँ, तेरी खुशबू आती है
इक महका महका सा, पैगाम लाती है
मेरे दिलकी धडकन भी, तेरे गीत है
पल पल दिल के पास, तुम रहती हो
जीवन मिठी प्यास, ये कहती हो...

प्रियतमेच्या आठवणींचं, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र भासणाऱ्या तिच्या हव्याहव्याशा अस्तित्वाचं इतकं अप्रतिम वर्णन खूप कमी ठिकाणी वाचायला मिळतं. "मणिकांचन योग', "समसमा संयोग', "दुग्धशर्करा योग', असे जे काही शब्द आपण अशा वेळी वापरतो ते सारे शब्द, साऱ्या उपमा "ब्लॅकमेल' मधल्या या अनुपम गाण्यासाठी अगदी यथार्थ आहेत.

हिंदी चित्रपटातील काही गाणी अशी असतात, की एखादं गाणं आपण फक्त ऐकतो, तेव्हा त्याच्या चित्रीकरणाविषयी आपल्या मनामध्ये एक प्रतिमा तयार होते, पण जेव्हा ते गाणं आपण पडद्यावर पाहतो, तेव्हा मात्र भ्रमनिरास होतो. दिग्दर्शकानं आपल्या मनातल्या गाण्याची पार वाट लावलेली आपल्याला त्या वेळी दिसते. (रात का समॉं - लता - जिद्दी - या सुंदर गाण्याच्या बाबतीत मी स्वतः या अनुभवातून गेलोय.)

काही गाणी रुपेरी पडद्यावरच्या नितांत सुंदर चित्रीकरणामुळे मनात कायमची घर करून राहतात. (रमय्या वस्तावय्या - श्री 420, मेरे सपनों की रानी - आराधना) काही गाणी अशी असतात, त्यांची श्रवणीयता इतकी उच्च असते, की ती पडद्यावर न पाहताही आपल्या परिपूर्ण संगीताची अनुभूती देतात. "पल पल दिल के पास' मात्र या दोन्ही पातळ्यांवर आपल्याला आनंद देतं. तरल रोमॅंटिक गाण्यांमध्ये या गाण्याला खूप वरचं स्थान द्यावं लागेल; कारण ते "एव्हरग्रीन रोमॅंटिक' आहे.

सत्तरच्या दशकामध्ये इतिहास घडविलेल्या गुलशन रायच्या आणि देव-हेमामालिनीच्या "जॉनी मेरा नाम'च्या निमित्तानं गोल्डी (विजय आनंद) आणि संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांची गाठ पडली. बॉक्‍स ऑफिसवर कोणती चाल हीट होईल, याचे अचूक अंदाज असणाऱ्या आणि सदासर्वदा गप्पांची मैफल जमविणाऱ्या बडबड्या कल्याणजींपेक्षा हळूवार, मितभाषी अशा धाकट्या आनंदजींबरोबर गोल्डींचे सांगीतिक सूर जास्त जुळले. त्यामुळे जॉनी मेरा नाम, ब्लॅकमेल, कोरा कागज या सगळ्या चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र बसून जास्त काम केलं. "जॉनी'च्या बंपर यशानंतर राखी-धर्मेंद्रच्या "ब्लॅकमेल'साठी गाण्यांच्या सीटिंग्ज सुरू झाल्या.

राजेंद्रकृष्णसारखा पट्टीचा आणि अनुभवी लेखक-गीतकार या चित्रपटासाठी होता. गोल्डीला एक हळूवार प्रेमगीत हवं होतं. त्याचं शूटिंग कसं करायचं याचा विचार त्यानं आधीच पक्का केला होता.

त्यानं कल्याणजी-आनंदजींना गाण्याची सिच्युएशन सांगितली, "नायक एका मुलीवर प्रेम करतोय, पण ते तिला सांगायचं धाडस काही केल्या त्याच्यानं होत नाही एवढा तो लाजाळू आहे. आपल्या प्रेमभावना मग तो दररोज लिहायला सुरवात करतो, पण चिठ्ठी तिच्यापर्यंत पोचविण्याची हिंमत त्याच्यात नाही. अखेर एके दिवशी धाडस करून तो त्या सगळ्या चिठ्ठ्या, ती प्रेमपत्रं तिला देतो आणि नायिका वाचत असताना ती पत्रंच गायला लागतात. नायकाच्या भावना तिच्यापर्यंत पोचवितात.'

गोल्डीच्या डोक्‍यातली ही भन्नाट कल्पना ऐकून दोघंही चक्रावून गेले. याच्यावर गाणं कसं बनवायचं, हा प्रश्‍न उभा राहिला; कारण चिठ्ठ्या गाणार होत्या! कल्पनांची देवाण-घेवाण सुरू झाली. दिवस लोटले. गाण्याच्या शूटिंगचा दिवस येऊन ठेपला, पण चाल काही तयार होईना. आदल्या दिवशीच्या रात्री पुन्हा बैठक जमली आणि सर्जनशील गोल्डीच्या मनात एक ओळ उमटली, "पल पल दिल के पास, तुम रहती हो...' त्यानं ही ओळ सांगताच आनंदजींना लगेच त्याची चाल सुचली. "जीवन मिठी प्यास ये कहती हो...' गोल्डीला लगेचच पुढचे शब्द सुचले. लगेच त्यालाही चाल लागली आणि पाहता पाहता गाण्याचा मुखडा तयार झाला.

दुसऱ्या दिवशी राजेंद्रकृष्ण आल्यानंतर गोल्डीने त्यांना सगळा किस्सा सांगितला आणि क्षमा मागून मुखडा समोर ठेवला. राजेंद्रकृष्ण यावर काही बोलले नाहीत. त्यांनी बराच वेळ विचार केला, पण कदाचित त्यांनाही या मुखड्याला पर्यायी शब्द सुचले नसावेत. त्यांनी तेच शब्द कायम ठेवून अत्यंत अप्रतिम असे एकाहून एक सरस तीन अंतरे लिहून दिले आणि एका अवीट गाण्याचा जन्म झाला!
पण मंडळी खरा क्‍लायमॅक्‍स अजून पुढेच आहे. गाणं तयार झालं खरं, पण शूटिंग आधीच ठरलेलं असल्यानं रेकॉर्डेड गाणं हातात नसताना, गोल्डीनं गाण्याचं "मीटर' डोक्‍यात ठेवून, त्यानुसार धर्मेंद्रला गाणं गुणगुणायला लावून आपल्या अद्‌भुत कल्पनाशक्तीनं गाणं शूट केलं. त्यानंतर आपल्या "गोल्डन' आवाजात किशोरनं ते रेकॉर्ड केलं. आज हेच गाणं पाहात किंवा ऐकत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा पत्ता तरी लागतो का?

- चंद्रशेखर महामुनी
nishad.pune@gmail.com

मी लिहीलेले उखाणे- संग्रह

माझे नांव- सिंधू वडाळकर.
राहाणार- मालेगांव
वय-६६
संसाराचा गाडा चालवता चालवता लिहायला वेळ मिळालाच नाही.
आता मुलींची लग्ने झाली.
थोडा मोकळा वेळ मिळाला असे वाटते... तेव्हा मी काही उखाणे लिहिले आहेत, ते वाचून आपला अभिप्राय कळवा.
जुन्या काळातले काही अनुभव पण मी तुमच्या सोबत लवकरच शेअर करणार आहेच.
मनोगत वरचे हे माझे पहिलेच लिखाण.
१९७५ च्या आसपासचा काळ. पूर्वीच्या आठवणींना उजाळा देता देता आमच्या काळचे उखाणे ही आठवतात.
***
(१) सुदाम्याचे पोहे केले कृष्णाने भक्षण...

--- राव म्हणतात, संकटकाळी मी करीन देशाचे रक्षण.

(२) रामनामाने समुद्रावर दगड तरंगले...

--- रावांच्या चरणी मी जीवन पुष्प वाहिले.

(३) प्रभू रामचंद्राला बोरे अर्पून, शबरीने जीवन केले कृतार्थ...

--- राव म्हणतात, "श्रद्धेविना जीवनाला नाही उरत अर्थ"

(४) संस्कृत मध्ये पाण्याला म्हणतात उदक...

--- रावांना आवडतात खुप मोदक

(५) निसर्ग्सौंदर्याने बहरलेला खंडाळ्याचा घाट...

--- रावांनी धरली परमार्थाची वाट.

(६) कोकणात नारळाच्या झाडाला म्हणतात कल्पवृक्ष...

--- राव म्हणतात, "श्रद्धेविना जीवन रुक्ष"

(७) श्रावणात प्राजक्ताला येतो बहर...

--- राव म्हणतात, "महाराष्ट्रात पावसाने केला कहर"

(८) ढग भरून आले म्हणजे मोराला होतो आनंद...

--- रावांना आहे पुस्तके वाचनाचा छंद.

(९) महादेवाच्या गळ्यात नगाचा वेढा...

--- रावांना आवडतो केशरी पेढा.

(१०) वृंदावनात कृष्ण वाजवत होता बासरी

--- रावांनी आणली आणली मला ५ तोळ्याची सरी

(११) जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष

--- रावांचे नाव घेते, आहे कुलदेवतेची साक्ष

(१२) खुप प्रसिद्ध आहेत कबीराचे दोहे

--- रावांना आवडतात कांदे पोहे

(१३) अर्जुन व कृष्णाची प्रसिद्ध आहे जोडी...

--- रावांना आहे परमार्थाची गोडी.

(१४) महाभारतात एकलव्याची आहे गाथा...

--- राव म्हणतात कुलदेवतेच्या चरणी ठेवावा माथा.

(१५) कोल्हापूरची मिरची आहे झणझणीत...

--- रावांचा आवाज आहे खणखणीत

(१६) कमळाभोवती भ्रमराचे गुंजन...

--- राव करतात हरीचे भजन

(१७) आम्रतरूवर कोकिळेचे गुंजन...

--- राव करतात गणेशाचे पूजन.

(१८) राधा होती हरिभजनात तल्लीन...

--- राव म्हणतात आपण व्हावे ईश्वराशी लीन

(१९) कृष्णाने केले कालीयामर्दन...

--- राव धरतात रामाचे चरण

(२०) सर्व क्षेत्रात स्त्रीयांनी आप्ल्या करतुत्वाचा उमटवलाय ठसा

--- राव म्हणतात अविरत प्रयत्न करण्याचा तू घे वसा
(२१) गणेशाला प्रिय दूर्वांची जूडी...

--- रावांना आहे परमार्थाची गोडी

(२२) संत जनाबाईने दळीता कांडीता विठ्ठलाल आळविले...

--- रावांच्या चरणी मी जीवनपुष्प वाहिले

(२३) श्रावणात दिसतो आकाशात इंद्रधनुष्य...

--- राव म्हणतात, प्रभू राम विश्वामित्राचे शिष्य.

(२४) हिरडा, आवळा, बेहेडा याची असते आयुर्वेदात भरती

--- रावांची राहूदे निरंतर किर्ती

ढिसाळ, ढोबळ 'पीपली लाईव्ह'

'पीपली लाईव्ह'बद्दल सध्या बरीच चर्चा चालू आहे. चित्रपट खूप आवडल्याचं सांगणारे अनेक भेटले म्हणून अखेर तो पाहिला.

चित्रपटाचं थोडक्यात सूत्र असं सांगता येईलः शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा गंभीर आणि करुण प्रश्न आहे, पण आपली माध्यमं, राज्यकर्ते वगैरे तो प्रश्न अतिशय उथळपणे आणि क्रूरपणे हाताळतात; आपल्या स्वार्थापुरता त्याचा वापर करून घेतात. त्यामुळे प्रश्न अधिकच चिघळतो आणि अधिकच गंभीर आणि करुण बनतो. एक विचार म्हणून हा पटण्यासारखाच आहे. त्यामुळे चित्रपटाद्वारे मांडलेल्या विचारसरणीशी माझे मतभेद नाहीत.

चित्रपटाची मांडणी उपहासात्मक आहे. यातले शेतकरी-गावकरी सालस, निरागस वगैरे नाहीत. द.मा. मिरासदार किंवा शंकर पाटलांच्या कथांमधून दिसणार्‍या गावकर्‍यांसारखे इरसाल आहेत. ते खोटं बोलतात, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा, स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात, मर्त्य, स्खलनशील, विकारी अशा सर्वसामान्य माणसांची सर्व लक्षणं त्यांच्यात दिसतात. अशा माणसांचं चित्रणही त्यांच्याविषयी जिव्हाळा/कणव उत्पन्न होईल अशा प्रकारे करता येतं. त्यामुळे असं दाखवण्यात काही गैर आहे असं वाटत नाही.

चित्रपटात अनेक गुणी अभिनेते आहेत. रघुवीर यादवसारख्या ओळखीच्या चेहेर्‍यांपासून ते हबीब तन्वीर यांच्या 'नया थिएटर'मधे घडलेल्या पण आपल्याला परिचित नसलेल्या कलाकारांपर्यंत अनेक कसलेले नट, उत्तर भारतीय गावात शोभतील असे रोचक चेहेरे चित्रपटात दिसतात. ते आपापल्या जागी शोभतात आणि अभिनयही चित्रपटाच्या शैलीला अनुसरून करतात.

तरीही चित्रपट पाहून फारच अपेक्षाभंग झाला. त्यामागची कारणं अशी सांगता येतील:

तपशिलांमध्ये रंग भरण्यात चित्रपट कमी पडतो असं वाटतं. उदा: 'लगान'मध्ये ज्याप्रमाणे विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून गाव उभा राहतो, तसं इथे होत नाही. आत्महत्या करु इच्छिणारा नत्था, त्याचा भाऊ, पत्नी, आई यांच्या व्यक्तिरेखा सुरुवातीला थोड्या दिसू लागतात तोच माध्यमं, राजकारणी यांच्या गदारोळात पटकथेला त्यांचा विसर पडतो. या गदारोळात ही माणसं हरवून जातात किंवा त्यांचं माणूसपण बेदखल होतं असं खरं तर दाखवायचं आहे. पण ते प्रेक्षकाला जाणवण्यासाठी मुळात त्यांचा या गदारोळातला वावर हवा तेवढा ठळक, करुण होत नाही. हीच बाब पत्रकार, राजकारणी वगैरेंच्या बाबतीत घडते. या व्यक्तिरेखा केवळ एकरंगी, ढोबळ अशा उभ्या राहतात.

थोड्या काळात पुष्कळ गोष्टी दाखवण्याचा हव्यास चित्रपटाच्या आशयाला मारक ठरतो. प्रसंग रंगण्यासाठी जेवढा वेळ द्यावा लागतो, तेवढा दिलाच जात नाही. हे कसं करावं याचं अशाच उपहासात्मक शैलीतलं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर श्रीलाल शुक्ल यांच्या 'राग दरबारी' या कादंबरीकडे निर्देश करावासा वाटतो. विविध प्रसंगांद्वारे लेखकानं यातल्या व्यक्तिरेखांना विलक्षण परिणामकारक पध्दतीनं जिवंत केलेलं आहे. तसं 'पीपली'मध्ये होत नाही.

माध्यमं टी.आर.पी. साठी वाटेल त्या थराला जातात, राजकारणी स्वार्थापोटी सर्वसामान्यांना कस्पटाप्रमाणे वागवतात, या गोष्टी तर आता शेंबडं पोरही सांगू शकतं. त्याहून वेगळं किंवा जास्त गुंतागुंतीचं यात काहीही दाखवलं जात नाही. जे दिसतं तेही अगदीच वरवरचं आणि शाळकरी आहे. त्यासाठी वापरलेले विनोदी प्रसंगही पटापट उरकून घेतलेले आहेत.

'लालबहादूर', 'इंदिरा', नेहरू' वगैरे नावांचा वापर करून केलेले विनोद चांगले आहेत. त्यात राजकारण्यांचा बेगडीपणा आणि सरकारी योजनांचा फोलपणा दिसतो. हे चित्रपटाच्या आशयाला पूरक असलेले घटक आहेत म्हणून ते विनोद अस्थानी होत नाहीत, तर परिणामकारक होतात.

अशी कल्पकता इतरत्र मात्र फारशी दिसत नाही. नत्था गावच्या पुढार्‍याकडे मदत मागायला जातो या प्रसंगात पुढार्‍यांच्या समोर ठेवलेल्या अंड्यांवर कॅमेरा ज्या प्रकारे भिरभिरतो त्यावरून आता पुढच्या प्रसंगात नत्थाचा डांबिसपणा दाखवण्यासाठी अंड्यांचा वापर केला जाणार हे उघड होतं. नंतर पुन्हा त्याच प्रसंगाचा आधार घेऊन एक गावकरी आपली आणि नत्थाची कशी जवळीक होती ते सांगतो तेव्हा तर अगदी शिळ्या कढीला उत आणल्यासारखं वाटतं.

शिवाय, जर नत्था इतपत डांबिस असेल तर तो भावाच्या 'मी आत्महत्या करतो; नको? मग तू कर'च्या जाळ्यात सहजासहजी फसतो ते तेवढंसं पटत नाही. इतका गांजलेला असतानाही ज्याची जीवनेच्छा इतकी जिवंत असते तो आत्महत्येसारख्या गोष्टीला मूक संमती देईल असं वाटत नाही.

'गां* फ* रही है', 'मा****'' वगैरे शब्द/वाक्यं वापरली की प्रेक्षक हसणार म्हणून त्यांचा फैलाव आहे. मलमूत्रासारख्या क्रियांशी संबंधित प्रसंग दाखवले की त्याला प्रेक्षकांची प्रतिक्रिया येणार म्हणून तेही आहे. शौचाचा प्रसंग येतो तोवर माध्यमांच्या नावानं पुष्कळ टी.आर.पी. खेचून झालेला असतो. त्यामुळे त्या प्रसंगात चकटफू हशे कमावण्याची शाळकरी हौसच दिसते. चित्रपटाच्या गाभ्याशी असल्या विनोदांचा संबंध लागत नाही ('लालबहादूर'चा तसा लागतो). त्यातून परिणामकारक अर्कचित्र उभं राहात नाही.

अर्कचित्र परिणामकारक वठण्यासाठीही कष्ट घ्यावे लागतात. चॅप्लिन जेव्हा 'ग्रेट डिक्टेटर'मध्ये हिटलरचा बुटबैंगणपणा, वचावचा भाषण करण्याची त्याची शैली यांचा वापर करतो तेव्हा तो हिटलरचं अर्कचित्रच उभं करत असतो. पण त्यामागचे कष्ट (आणि बुध्दीही) जाणवतात. जर्मन भाषेतले ध्वनी, हिटलरची वक्तृत्वशैली यांचा अभ्यास करून त्यांतलं विनोदमूल्य चॅप्लिन हेरतो. पृथ्वीगोलाबरोबरच्या नृत्याच्या प्रसंगात हिटलरच्या आवडत्या वॅग्नरच्या संगीताचा चॅप्लिन वापर करतो. कलेविषयीच्या नाझींच्या मूर्खासारख्या मतांचा चॅप्लिन विनोदनिर्मितीसाठी वापर करतो. ज्याचं अर्कचित्र काढायचं त्याच्यातल्या 'अर्क' घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी बुध्दी लागते; त्यांचा वापर करून प्रसंग घडवण्यासाठी कल्पकता लागते. 'पीपली'मध्ये दोन्हींचा अभाव जाणवतो.

सर्व हास्यास्पद गोष्टी संपवून चित्रपट जेव्हा शेवटाकडे जातो तेव्हा फारच उरकून टाकल्यासारखा वाटतो. प्रेक्षक अंतर्मुख होण्यासाठी करुण प्रसंगांतलं कारुण्य अधिक उठावदार व्हायला हवं होतं. त्यासाठी करुण प्रसंगांची लय धीमी हवी होती. पण तसं होत नाही. दोन एस्.एम्.एस्.च्या दरम्यान जमलं तर चित्रपटाचा आस्वाद घेणार्‍या तरुण प्रेक्षकांना कंटाळा येईल अशी भीती त्यामागे असावी की काय अशी शंका मनाला चाटून जाते.

एकंदरीत, मूळ विचार पटण्याजोगा असूनही, शैली रोचक असूनही, दमदार अभिनय असूनही ढोबळ पटकथा आणि तिचं ढिसाळ चित्रण यांमुळे चित्रपट योग्य उंची गाठू शकत नाही. चांगल्या विषयाला हात घालण्याचा एक वाया गेलेला प्रयत्न एवढंच अखेर हाती उरतं.

साहित्य संमेलन अध्यक्ष आन वाद

साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणूका येऊन राह्यल्या. वाद-विवादाचा धुराळा उडाला लागलाय. साहित्यिक गिरिजा कीर आयबीएन लोकमतमधल्या एका चर्चेत म्हणल्या ''झोपडपट्टील लोकांकडे साहित्य प्रतिभा नसते'' आन काल स्टार माझाच्या चर्चेत त्या म्हणल्या ''माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला''कोण चूक बोल्लं कोण बराबर बोल्लं ह्याच्यावर काथ्याकूट नाय कराचा मला. कोटीच्या घरात मराठी बोलणारी मंडली हाय आन साडेसातशे लोक जे साहित्य परिषदांचे निवडलेले मोजकेच सदस्य हायेत ते साहित्य मंडलाचे अध्यक्ष ठरतो ही गोठ काय बरी वाटत नाय. ज्यायला ज्यायला मराठी लेखन कराची, वाचाची हौस हाये अशा लोकायला मद्दान करुन दिले पाहिजेन. तुम्हाला काय वाट्टे ?

केट कोलविट्झ - मनस्वी, प्रशांत चित्र-शिल्पकर्ती

कर्तबगार स्त्री कलाकारांची ओळख करून देण्याचा हा आणखी एक प्रयत्न. मागच्या लेखात लुईज़ बूर्ज्वा या खट्याळ, बंडखोर स्त्रीविषयी सांगितलं होतं. यावेळी लुईजच्या अगदी उलट स्वभावाच्या, पण तितक्याच मनस्वी, धाडसी अशा एका स्त्रीची ओळख करून देत आहे.

आत्मचित्र

पूर्व-पश्चिम जर्मनीच्या एकीकरणानंतर बर्लिनला कधी गेला असाल, आणि तिथल्या प्रेक्षणीय स्थळांचा फेरफटका केला असेल, तर कदाचित केट कोलविट्झशी आपली नकळत ओळख झालीही असेल. (Käthe Kollwitz - नीट जर्मन उच्चार माहीत नाही; चू.भू.द्या.घ्या.)

एकेकाळी पूर्व आणि पश्चिम बर्लिनला विभागणार्‍या ब्रँडेनबर्ग गेटकडे जाणार्‍या 'उंटर डेन लिंडेन' या हमरस्त्याच्या दोहो बाजूंना बर्लिनमधली अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. 'न्यू गार्ड हाऊस' हे त्यांपैकीच एक. एकेकाळी जगाला प्रचंड विध्वंसाला सामोरं जायला भाग पाडणार्‍या जर्मनीनं युध्द आणि जुलमी सत्तेला बळी पडलेल्यांसाठी एक राष्ट्रीय स्मारक आता तिथं उभारलेलं आहे. एका अजस्र, पण रित्या खोलीमध्ये छपराला पाडलेल्या भल्यामोठ्या छिद्राखाली एक शिल्प फक्त ठेवलेलं आहे. आपल्या मृत मुलाला घट्ट कवटाळून बसलेली एक अभागी आई असं ते शिल्प आहे. एका असाहाय्य आईच्या वेदनेतून युध्दाकडे पाहायला लावणारं हे शिल्प त्या भल्यामोठ्या, भकास खोलीत अधिकच करुण, एकाकी दिसतं. कोणत्याही युध्दाला किंवा जुलमी सत्तेला जबाबदार असणार्‍या पुरुषी वर्चस्वाच्या कर्त्यांना आपण त्या क्षणापुरते विसरून जातो. त्यांच्या रेट्याखाली पिचणार्‍या अगणित स्त्रियांचे आक्रोश त्या भकास खोलीत घुमताहेत असं वाटतं. अशा वेळेला कोणालाही हेलावायला होणं अगदी साहजिक वाटतं. केट कोलविट्झ या शिल्पकर्तीशी पुष्कळ जणांची ही बहुधा पहिली ओळख असावी.

Neue Wache - Berlin

ज्यांना केटची खरी ओळख आहे, त्यांच्यासाठी मात्र हे शिल्प म्हणजे हिमनगाचा निव्वळ पृष्ठभाग आहे. हिमनगाशी ओळख करून घ्यायची असेल, तर थोडी वाट वाकडी करून बर्लिनमधल्याच केट कोलविट्झ संग्रहालयाला भेट द्यावी लागेल.

विविध काळात विविध दु:खं आणि संकटं सोसणार्‍या सर्वांना, म्हणजे अखिल मानवजातीलाच जिनं आपल्या करुणार्द्र मातृत्वाच्या अखंड झर्‍यातून जिवंत केलं अशी केट तिथं भेटते. शिल्पांखेरीज ड्रॉईंग, एचिंग, लिथोग्राफी, वूडकट अशा अनेक दृश्यमाध्यमांवरची तिची पकडही अचंबित करणारी आहे.

१८६७ साली केटचा जन्म झाला. ज्या काळात ती वाढली, त्या काळात स्त्रीनं 'करिअर' करणं हे समाजाच्या फारसं अंगवळणी पडलेलं नव्हतं. पण उदारमतवादी विचारांचे वडील आणि पती केटला लाभले. लहानपणी वडिलांनी तिच्यातली कला हेरून तिला कलाशिक्षण आणि प्रोत्साहन दिलं. लग्न करून देताना मात्र वडील म्हणाले, 'आता करिअर वगैरे विसरून जा. बायको आणि आई हेच आता तुझं आयुष्य.' केटचा नवरा डॉक्टर होता. बर्लिनच्या अत्यंत गरीब वस्तीत त्याचा दवाखाना आणि घर होतं. तिथल्या रुग्णांवर कमी खर्चात किंवा फुकटात वैद्यकीय उपचार करणं यातच त्याचा दिवस जाई. केटनंही त्या कामात त्याला मदत केली. त्यामुळेच समाजातल्या 'नाही रे' वर्गातली माणसं तिच्या संपर्कात आली आणि तिच्या कलेतही दिसू लागली. सर्वसामान्यांच्या आयुष्याकडे ती तिच्या नकळत खेचली गेली आणि मग सामान्य माणूस तिच्या कलेच्या केंद्रस्थानी आला.

१८४२ मधल्या विणकरांच्या अयशस्वी बंडावर आधारित एक नाटक केटनं पाहिलं. एमिल झोलाच्या 'जर्मिनाल' या सुप्रसिध्द कादंबरीतले खाण कामगारही तिला आधीपासून खुणावत होते. यातून निर्माण झालेली 'विणकर' ही एचिंग्ज आणि लिथोग्राफ्सची चित्रमालिका रसिकांचं लक्ष वेधून घेणारी ठरली.

विणकरांचा मोर्चा:
विणकरांचा मोर्चा

बंड अयशस्वी झाल्यानंतर आपल्या मृत सहकार्‍यांना वाहून नेणारे हे हताश विणकरः

The End

ही मालिका नावाजली गेली. राष्ट्रीय कलाप्रदर्शनात सुवर्णपदकासाठी परीक्षकांनी तिची शिफारसही केली. पण कैसर विल्यमनं नापसंती दर्शवल्यानं केटला सुवर्णपदक मिळू शकलं नाही. एक स्त्री आणि त्यात पददलितांची तळी उचलणारी म्हणून नियतीनं तिच्या वाट्याला पुढे जे मांडून ठेवलं होतं त्याची ही चाहूल होती.

सोळाव्या शतकात घडलेल्या शेतकर्‍यांच्या बंडावरची तिची मालिकाही गाजली. नांगरणार्‍या शेतकर्‍याचं, त्याच्या कष्टांचं प्रभावी वर्णनः

याच मालिकेत 'बलात्कारिता' हे चित्र आहे:

बलात्कारितेचं शरीर धरतीमातेत मिसळून गेलेलं आहे. प्रत्यक्ष बलात्कारित स्त्रीचा दु:खी, पीडित चेहेरा दाखवण्याऐवजी माती, पालापाचोळा यांच्याशी एकजीव झालेल्या हताश शरीरातून केटनं बलात्काराच्या घणाघाताविषयी जे सूचित केलं आहे, ते विलक्षण ताकदीचं आहे.

आईच्या हृदयानं केटनं इतरांची हलाखी मांडली, पण तिचं आयुष्यही खडतरच जाणार होतं. तिचा मुलगा पहिल्या महायुध्दात मारला गेला. पुत्रवियोगातून केटचा पुढचा प्रवास युध्दविरोध आणि शांतताप्रेमी जगासाठी झटण्याकडे झाला. आपणच सुरू केलेल्या पहिल्या जागतिक महायुध्दात जर्मनी हरला होता. युध्दानंतर सर्वसामान्य जनतेची हलाखी आणखीच वाढली. तिचं प्रभावी चित्रण केटच्या पुढच्या कामात दिसलं. 'युध्द' आणि 'भूक' अशा तिच्या चित्रमालिका अतिशय गाजल्या. 'युध्द' मालिकेतलं हे एक चित्र - ‘युध्दाच्या विरोधात युध्द’:

War Against War

'भूक' मालिकेतलं हे एक चित्रः

Hunger

'अन्न!' (भित्तिचित्र):

Bread!

'जर्मन मुलं भुकेली आहेत!' (भित्तिचित्र):

German Kids are Hungry

'युध्द पुन्हा कधीही नको' (भित्तिचित्र):

War - Never Again

याच काळात युध्दाचं स्मारक म्हणून केटनं 'शोकमग्न पालक' ही शिल्पद्वयी साकारली:

Grieving Parents

हळूहळू केटला रसिकमान्यता मिळू लागली. १९१९ मध्ये प्रशिअन कला अकादमीची पहिली महिला सदस्य बनण्याचा बहुमान केटला मिळाला. प्रशिअन अकादमीच्या 'मास्टर स्टुडिओ'ची ती पुढे संचालक झाली.

हिटलर सत्तेवर आल्यावर मात्र हे सर्व संपलं. जर्मनांचा पाठिंबा मिळवण्यासाठी हिटलरनं त्याकाळच्या हलाखीच्या परिस्थितीचा फायदा घेतला; पण गरिबी, भूक यांचं चित्रण करणारी, युध्दाला विरोध करणारी केट हिटलरच्या पुढच्या आकांक्षांना सोयीची नव्हती. त्यानं अकादमीवरून तिची हकालपट्टी केली. त्यानंतर तिच्या कलाकृतींच्या जाहीर प्रदर्शनावर बंदी आली. हिटलरनं ज्यू, काळे, समलिंगी, अशा लोकांचा छळ केलाच, पण केटसारख्या जनतेच्या हितासाठी झटणार्‍या कलाकारांनाही छळलं. गोंडस, सोनेरी केसांची हसरी आर्यन मुलं, त्यांचे बलदंड बाप आणि कमनीय आया अशा 'शायनिंग जर्मनी'चं दर्शन घडवणारी कलाच फक्त हिटलरला मान्य होती.

उदाहरणादाखल 'युध्दावरून सुटीवर तात्पुरता घरी आलेला सैनिक' हे चित्र पाहा: जर्मन सैनिकांच्या वस्तुस्थितीची जाण असलेल्यांना हे पाहून मळमळायला होत असेल, असंच वाटतं!

त्याउलट सौम्य, शांतरसाचा वस्तुपाठ म्हणून दाखवता येईल असं केटनं साकारलेलं हे आई आणि मुलाचं चित्र पाहा:

Mother with Child

किंवा हाताची घडी घालून बसलेली केटची ही गरोदर स्त्री पाहा:

Pregnant Woman with Crossed Hands

साधेपणात जे सौंदर्य असतं त्याची केटच्या कलाकृतींत पदोपदी जाणीव होते.

एव्हाना केट ७० वर्षांची झाली होती. तिच्या सत्तरीच्या निमित्तानं तिच्या कलाकृतींचं प्रदर्शन घडवून आणण्याचे सर्व प्रयत्न नाझींनी अपयशी ठरवले. तरीही अखेरपर्यंत केट कार्यरत राहिली. नातू, नवरा, अनेक आप्तस्वकीय यांच्या मृत्यूचं दु:खही तिनं सोसलं. अखेर २२ एप्रिल १९४५ रोजी, म्हणजे दुसरं महायुध्द संपण्याच्या किंचित आधी केट मरण पावली.

अखिल मानवजातीविषयी वाटणारी कळकळ आणि व्यक्तिगत दु:खं सोसून आलेलं शहाणपण यांची सांगड घालून, उभा जन्म इतरांच्या हितासाठी लढण्यात खर्च केलेली ही स्त्री तिच्याच आत्मचित्रांतून इतकी साधी (आणि म्हणूनच) सुंदर दिसते की तिच्यापुढे कोणत्याही सुपरमॉडेलचा कचकड्याचा आव कोसळून पडेल!

Self-portrait 1

Self-portrait - 2

Self-portrait - 3

Self-portrait - 4

केटचं आणखी काही काम “The Art that Hitler Hated" इथे पाहता येईल.

कोणता मानू मी विठठल ?

महाराष्ट्राचं लोकदैवत पंढरपूरचा पांडुरंग अनेकांचा श्रद्धेचा विषय. पंढरपूरचा पांडूरंग सर्वसामान्यांचा देव. गरिबांना पावणारा. भक्ताच्या रक्षणासाठी धावत येणारा. असा महिमा महाराष्ट्रभर मराठी माणसाच्या मनात दडून बसलेला आहे. पंढरपूरचा हा विठोबा वारक-यांचा देव आणि वारकरी संप्रदाय हा बहुजनांचा पंथ. निमंत्रणाशिवाया लाखोंची 'पाऊले पंढरीची वाटं चालतात हे एक आश्चर्यच आहे. अशा या पांडुरंगाच्या भेटीचे योग जुळुन येणार होते. पंढरपूरला पूर्वी पंडरंगे, पांडरंगपल्ली,

30072010490
माढा येथील विठोबाचे मंदिर

पौंडरीकक्षेत्रे, पंडरीपूर, पांडुरंगपूर अशा नावाने ओळखल्या जात होते. विठोबाची मूर्ती पंढरपूरात केव्हापासून आहे हे नेमके सांगता येणार नाही.

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।

अशा लोकभावनेचा मी आदर करतो पण ते काही खरे वाटत नाही. संत ज्ञानदेव आणि नामदेव यांच्या भेटीनंतर पंढरपूर क्षेत्रातील पांडुरंग दर्शनाचे महत्त्व वाढले. जातीभेद कर्मकांडाच्या पुढे जाऊन सर्व वारकरी आणि भक्तमंडळींची अराध्य दैवताची पुजा आठशे नऊशे वर्षापासून चालूच आहे. असे असले तरी अनेक आवडत्या नावडत्या गोष्टी पंढरीत घडल्या आहेत. पांडुरंगाचे दर्शन सर्वसामान्यासाठी खुले झाले तेव्हा पांडुरंगाचा आत्मा एका माठात काढून ठेवल्याने आता मुर्तीत देवत्व राहिले नाही अशा घटनेने माझी असलेली श्रद्धा डळमळीत होते. असो, या सर्व गोष्टी सांगण्याचा उद्देश असा की या पंढरीरायाचे दर्शन व्हावे म्हणून मी पहिल्यांदाच जाण्याचे ठरविले. पण थेट प्रचलित पंढरपूरचे पांडुरंगाच्या दर्शनाऐवजी वाट जरा वाकडी केली आणि मागे एकदा एका उपक्रमावरील विठोबा कोणता खरा ? चर्चेवरुन

30072010079
माढ्याचा विठ्ठल

मूळ विठ्ठलाची मूर्ती कोणती त्याबद्दल मला ओढ होती. म्हणून मी पंढरपूरला न जाता थेट माढ्याला पोहचलो. मूळ मूर्तीची गोष्ट सांगण्यापूर्वी इतिहासातील मूर्तीसंबंधातील काही संदर्भांची तोंडओळख करुन देतो.

विठ्ठल मुर्तीचे अनेक वेळा अनेक कारणाने स्थलांतर झाल्याचे इतिहासात नमुद केलेले आहे. औरंगजेब जेव्हा

30072010494
माढ्याचा विठ्ठल...

ब्रह्मगिरीपर्यंत हिंदुची एकेक देवळे फोडत आला तेव्हा बडव्यांनी विठ्ठलमुर्तीला देगावला एका देशमुखाकडे हलविले त्याने ती मुर्ती विहिरीत लपविली होती. पुढे आक्रमण परतल्यावर ती मुर्ती पुन्हा पंढरपुरवासियांच्या विनंतीवरुन पंढरपूरला आणन्यात आली. चिंचोली, गुळसरे, अशा गावीही ती मूर्ती हलविल्या गेली आहे. '' एकदा तर एका बडव्यानेच मुद्दाम मूर्ती पळवून नेऊन आणि लपवून ठेवून स्वार्थसाधनासाठी दर्शनोत्सुक भक्तांची अडवणूक केली होती.'' सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठ्ठलमूर्ती आपल्या राज्यात नेली. भव्य मंदिर बांधून त्यात विठ्ठलमुर्तीची स्थापनाही केली. पुढे वारीला जेव्हा संतमंडळी आली तेव्हा त्यांना मुर्ती दिसली नाही त्यांच्याबरोबर भक्तमंडळीही व्याकूळ झाली आणि या भक्तजनांनी एकनाथमहाराजांचे आजोबा भानुदास महाराज यांना मूर्ती परत आनण्याची विनवणी केली. भानुदास महाराजांनी कृष्णदेवरायांचे मन पूरिवर्त्न करुन विठलमूर्ती परत आणली. पुढे ''अफजलखानाच्या हाती मुर्ती येणार होती त्यापूर्वीच बडव्यांनी पंढरपूरहून वीस मैल असलेल्या 'माढा' या गावी [जि.सोलापूर] येथे नेऊन ठेवली. वर ह्या गंडांतराच्या स्मरणार्थ माढ्यात विठोबाचे एक स्वतंत्र देऊळ व मूर्ती स्थापण्यात आली. पुढे ती मूर्ती पंढरपूरला आणल्या गेली का ? पंढरपूरातली पांडुरंगाची मूर्ती ती आद्य मूर्ती का ? या विषयावर श्री रा.चि.ढेरे यांनी श्री विठ्ठल एक महासमन्व्यक हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे त्यात ते अनेक संदर्भ ग्रंथावरुन त्यांनी माढ्याची विठ्ठलाची मूर्ती ही आद्य मूर्ती ठरवली आहे. त्यांचे केसरी मधील दोन लेखांनी [वर्ष १९८२] महाराष्ट्रभर वैचारिक धुमाकूळ घातला होता असे म्हणतात.

श्री रा. चि. ढेरे यांनी या विषयावर मोठे संशोधन केलेले आहे आणि ते मला पटणारे आहे. त्या विषयी इथे अधिक काही टंकत नाही. विठ्ठलतेच्या अचूक निरीक्षणावरुन मूळ मूर्ती माढ्यालाच आहे असे त्यांचे म्हणने आहे.

30072010496
पायातले तोडे

तर मूर्ती विठ्ठमूर्ती माढ्याला हलविली गेली. त्या विठ्ठलमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी मी माढ्याला पोहचलो. सावता माळ्याच्या अप्रकाशित अभंगातील दाखला त्या मूर्तीबाबत दिल्या जातो. तो अभंग असा-

विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ । -दयकमळ मंत्रसिद्ध ॥
दिगंबर मूर्ती गोजरी सांवळी । तोडे पायी वाळी मनगटी ॥
कटीवर हात, हाती पद्म शंख । पुष्पकळी मोख अंगुलीत ॥
सावता माळी म्हणे शब्दब्रह्म । नाम विठ्ठलाचे कलियुगीं ॥

सावता माळ्याला [महाराजांना ] जसे रुप दिसले तसे त्यांनी वर्णन केले आहे. विठ्ठल कसा आहे तर दिगंबर आहे. वर्ण सावळा आहे. त्याच्या पायात तोडे आहेत. दोन्ही हात कमरेवर आहेत. या सर्व

30072010495
मंत्राक्षर

वर्णनापेक्षा दिगंबरत्व ह्या मुद्याकडे श्री. रा.चि. ढेरे आपले लक्ष वेधतात. मस्तकावर गवळी टोपी. दोन्ही कानात शंखाकार कुंडले. गळ्यात कौस्तुभमणी, डाव्या हातात शंख. उजव्या हाताच्या तळवा काठीवर टेकवलेला. मनगटावर कडे. आणि विठ्ठलाच्या वक्ष:स्थळावर मंत्राक्षर आपल्याला दिसतात.
'' श्री स्पर्शाद्यं सत्यनामाद्यं
षणषटु सदीर्घकं || ष
टषटू दिनंत्यंतं स
सारं तं विदर्बु
धा:|| श्री
वत्स'' [पृ.क्र. १२९]

प्रचलित पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीत अशी कोणतीही ओळख दिसत नाही. माढे येथील मूर्ती खडबडीत नाही. सध्याची पंढरपूर येथील पांडुरंग मूर्ती खडबडीत वाटते. इतक्या वर्षापासून वेगवेगळ्या अभिषकामुळे त्याची झीज झाली असावी असाही मुद्दा रेटता येतो. पण ज्या शिळेपासून माढ्याचा विठ्ठल घडलेला दिसतो त्याच शिळेपासून रुक्मिणी घडलेली दिसते. आणि श्री. रा.चि. ढेरे ज्या ''पांडुरंगमाहात्म्य'' चा संदर्भ देतात आणि आद्य मूर्तीची जी लक्षणे सांगतात ती अशी

''१) मूर्तीच्या -हदयावर देवाचा नाममंत्र कूटश्लोकात कोरलेला आहे.
२) मूर्तीच्या भाळावर तृतीय नेत्र आहे. आणि-
३) मूर्ती दिगंबर बालगोपालाची आहे'' [पृ.क्र.१३९]

ही तिन्ही लक्षणे आजच्या पंढरपूर मूर्तीत नाही. ती सर्व लक्षणे माढ्याच्या मूर्तीत दिसतात. या सर्व लक्षणावरुन मलाही ती मूर्तीच मूळ वाट्ली. अर्थात, मंदिरातल्या देव वगैरे अशा गोष्टींवर माझा विश्वास नसला तरी क्षणाक्षणाला असंख्य अद्बुत चमत्कार घडणा-या या सृष्टीत एखादी शक्ती कार्यरत असावी यावर विश्वास आहे. असो, तो विषय वेगळा. श्री.रा.चि.ढेरे म्हणतात ''मूर्तीद्रव्य हे भंगुर आणि जंगम असल्यामुळे त्याच्या बदलामुळे देवत्वाची आणि देवत्त्वाशी संबंध झालेल्या क्षेत्राची प्रतिष्ठा कधीच उणावत नसते. केवळ मूर्तीच्या बदलामुळे किंवा मूर्त्तीवर संकट आल्यामुळे स्थानमहिमा उणावत नाही ”त्यामुळे कोणाची श्रद्धा दुखावण्याचे मलाही कारण नाही. फक्त आपण कधी माढ्याला गेलात तर याही विठ्ठल मूर्तीची आणि आपली भेट व्हावी त्यासाठी हा प्रपंच. असो, पुढे चंद्रभागेला नमस्कार करुन पंढरपूर येथील प्रचलित पांडुरंगाचेही दर्शन घेतले. पण कोणता मानू मी विठ्ठल; पंढरपूरचा की माढ्याचा ? हा प्रश्न मात्र मनात रेंगाळत राहिला.


अधिक संदर्भासाठी जिज्ञासूंनी ''श्रीविठ्ठल एक महासमन्व्यक. लेखक. श्री रामचंद्र चिंतामण ढेरे. श्री विद्या प्रकाशन, 250 शनिवार पेठ, पुणे ४११०३०” हे वाचावे. त्यातील ''आद्य मूर्तीचा शोध'' हे प्रकरण वरील विषयावर आहे.

Syndicate content
Scroll to Top