अखेर जमलं !

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
26 Jul 2025 - 7:33 pm

नमस्कार मंडळी. शीर्षक वाचून तुम्हाला काय वाटतंय ते आलंय माझ्या लक्षात. पण तसं काही नाही बरं का! आज मी तुम्हाला माझ्या नादिष्टपणाची एक‌‌ गोष्ट सांगणार आहे.

तर झालं असं की, अलीकडेच‌ माझा‌ वाढदिवस झाला. आता या‌ वयात कसलं आलंय " सेलीब्रेशन" वगैरे! ना खाण्याचा पराक्रम ना पायात फिरण्याचा जोर. तेव्हा वाढदिवस आणि नित्यक्रम ‌यात फारसा काही फरक पडत नाही. नाही म्हणायला मित्रमंडळी,नातेवाईकांचे फोन येतात. झालंच तर व्हाटस् ॲप ग्रुपवर ,वाढदिवसाच्या ढीगभर हार्दिक शुभेच्छा, आज काय स्पेशल? आणि तत्सम संदेशांचा धबधबा वाहतो. अर्थात इतकी‌ "आपली माणसं " असणं आणि त्यांनी आपली आठवण ठेवणं हे बघता आपली याबाबतीतली श्रीमंती मनाला सुखावून जाते हे मात्र खरं! असो. "सेलीब्रेशन " नसलं तरी अहोंनी काही भेटवस्तू आणली नाही असं कधी झालं नाही. (या बाबतीत देखील मी नशीबवान आहे असं म्हणायला हरकत नाही! ) अलीकडे माझ्या चित्रकलेच्या छंदाने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय, हे ओळखूनच बहुदा ,अहोंनी वाढदिवसाची भेट म्हणून १२० रंगीत पेन्सिलींचा संच भेट दिला. बिरबलाने सांगितल्याप्रमाणे श्रेष्ठ शस्त्र कोणतं? तर प्रसंगी पटकन हाताशी असेल ते. तद्वत या क्षणी तरी माझ्या छंदाला साजेशी ती भेट बघून इतर कशाही पेक्षा हीच सर्वोत्तम भेट असं म्हणत मी हरखुन गेले.

bhet

दुसऱ्या दिवशी हौसेने मांडामांड करून मी चित्र काढायला बसले . रंगवायची घाई अधिक म्हणून पेन्सिलने चित्र रेखाटण्यात वेळ न दवडता काॅम्प्युटरवरुन छापून घेतलं. आता रंगवायचं!लहान मुलाप्रमाणे नवीन पेन्सिली वापरण्यासाठी हात शिवशिवत होते . पण हाय! एक गडबड होती. सगळ्या पेन्सिली दंडगोलाकार खोक्यात अगदी घट्ट बसवलेल्या होत्या. त्यामुळे त्या बाहेर काढणं जरी सोपं होतं तरी पुन्हा खोक्यात बसवणं म्हणजे आव्हानच होतं. मग काय? रंगवायला काढलेल्या पेन्सिलींनी चहाचे कप ठेवायच्या ट्रे मध्ये मुक्काम ठोकला. बरं ,चित्र पूर्ण होईपर्यंत पॅड, त्याच्या डोक्यावर वही, वहीवर पेन्सिल, पट्टी ,रबर‌, रंगीत पेन्सिलींचा ट्रे, असं सारं
"टीव्ही " च्या युनिट वर . आता आली का पंचाईत! कारण घरच्या मंडळींना जागा हवी असली की माझ्या साहित्याची उचलबांगडी! इकडे माझा जीव थोडा! कारण पेन्सिली गडगडून खाली पडताहेत , टोकं तुटताहेत. छे! छे! काहीतरी व्यवस्था करायलाच हवी. म्हणतात ना जन्माला घातलं की ‌पालनपोषणाचा भार सोसायलाच हवा!

कशा आणि कुठे ठेवाव्यात बरं पेन्सिली, म्हणजे नीट राहतील आणि हाताळायलाही सोप्या पडतील? रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे चालू होते.पण‌ दोन तीन दिवस डोक्यात हाच विषय घोळत होता. आंतरजालावरच्या युक्त्या, प्रयोगांचे व्हिडिओ धुंडाळून झाले. या ना त्या कारणाने व्यवहार्य ठरत नव्हते म्हणून बाद झाले. विविध उत्पादनांची छाननी करून झाली. एखादं उत्पादन योग्य वाटलं तरी कधी अव्वाच्या सव्वा किंमतीमुळे ती बाद झाली तर कधी विक्रेत्यांनी ती घरपोच देणं नाकारलं. विषय काही डोक्यातनं जात नव्हता. अचानक कागदपत्रं ठेवण्याचा एक चपटा प्लॅस्टिकचा डबा घरातच सापडला. चांगला मोठ्या आकाराचा होता. मी हुश्श केलं. कागदपत्रं काय, ठेऊ‌ एखाद्या‌ फाइलमधे घालून ! पण पेन्सिली नीट नकोत का रहायला? मी‌ पटकन तो डबा रिकामा केला . आता प्रश्न सुटला म्हणत पेन्सिली ठेऊ लागले , पण‌ हे काय! जेमतेम ४०एक पेन्सिली राहिल्या. म्हटलं ठीक आहे, आणखी दोन मागवून घेऊ . पण रोजच्या दुकानदाराने हा माल येत नसल्याचं सांगितलं. मग इतर ठिकाणी चौकशी सुरू झाली. अखेर एका ठिकाणी सापडले. किंमत जरा‌ चढी‌ होती. पण आता माझ्या पेन्सिलींचा प्रश्न होता आणि पेन्सिली माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला होता.

box

दोन तीन दिवसांनी,ठरल्याप्रमाणे हे प्लास्टिकचे डबे आले. जेवणं उरकली आणि मोठ्या उत्साहाने मी पेन्सिली डब्यात भरून ठेऊ लागले .अगदी काळजीपूर्वक रंगछटेप्रमाणे पेन्सिली मांडल्या. आता काय फक्त डबा उघडायचा, छटा निवडायची आणि रंगवायला सुरुवात! पेन्सिलींची मांडणी बघून उगाचच वाटलं आपणही कुणीतरी मोठे........ असो. मनातलं मनातच! लवकरच लक्षात आलं की हे प्रकरण एवढ्यावर संपणारं नव्हतं. आता काय हे डबे एखाद्या पिशवीत ठेवले तरी चालतील म्हणून ठेवले खरे पण डबा उभा करताच‌ छटेनुसार मांडणी ‌केलेल्या पेन्सिली " केशवं प्रतिगच्छति" प्रमाणे एका जागी गोळा‌ झाल्या. कारण साधं होतं. आडव्या स्थितीत प्रश्न नव्हता.पण मोकळी जागा जास्त होती. त्यामुळे पेन्सिलींनी आपली जागा सोडली. प्रश्न सुटला नाही.मग पुन्हा एकदा विचारमंथन सुरू झालं.

मग‌ पेन्सिलींच्या भोवती कागदाचं पॅकिंग करून झालं . मनास येईना. मग पुन्हा विचार मंथन. मग पॅकिंगच्या नमुन्यांचा अभ्यास सुरू ‌झाला. मापं घेणं, कागदावर विविध पद्धतीने आकडेमोड करून झाली. आकृत्या काढून झाल्या.

calculation
काही नमुने बनवले

prayog1

prayog 2
पण मनास काही येईना. रात्री झोप लागेना. पसाराही तसाच टाकलेला होता. " पुरे झाला हं तुझा हा नादिष्टपणा!", "आता या‌ पेन्सिलींपायी तब्येत बिघडून घ्यायची आहे का?" ही आणि आणखी अशीच‌ बोलणी‌ ऐकून घ्यावी लागली. माझी खुमखुमी पण कमी व्हायला लागली होती. " एक जरा आहे डोक्यात, तेवढं फक्त आज रात्री करून बघेन " म्हणत थोडी‌ मुदत घेतली.
पुन्हा एकदा नव्या दमाने आणि अधिक काळजीने मापं घेतली . नवीन आकडेमोड, नवीन आकृत्या काढून सुरवात केली. आणि अखेर जमलं!

final design

एखादा प्रकल्प आकाराला यावा इतका मला आनंद झाला. घ्या आता हवी ती ‌छटा! माझा हा उपक्रम म्हणायला अगदीच किरकोळ. पण मला बरंच काही शिकवून गेला.

एवढं करून चित्र रंगवण्याचं काही जमलं की नाही? मंडळी,तुमची शंका रास्त आहे. पण याचं उत्तर हे चित्र बघून तुम्हीच ठरवा.

kalakruti

कलाआस्वाद

प्रतिक्रिया

खेडूत's picture

26 Jul 2025 - 8:25 pm | खेडूत

मस्तच.. छान जमलं आहे!
मी काचेवर चित्र रंगवायला एक box मागवला आहे. बघू चित्राला कधी मुहूर्त मिळतो.

(अजून चित्र काढत रहा..)

नूतन's picture

26 Jul 2025 - 11:53 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तुमच्या उपक्रमालाही शुभेच्छा. चित्राची वाट पहाते.

अरे वाह! पेन्सिली देणाऱ्याने चांगलेच कामाला लावले.

नूतन's picture

26 Jul 2025 - 11:55 pm | नूतन

बाकी आवडीच्या गोष्टींचा त्रास होत नाही.
असो.प्रतिसादाबद्दल धन्यवाद .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jul 2025 - 8:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे वाह ! छान रंगकाम आणि आवड. वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आणि
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छाही देणार होतो. पुढे सर्व खुलासा वाचला आणि आवरलं. :)

-दिलीप बिरुटे

नूतन's picture

27 Jul 2025 - 8:11 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल मनापासून आभार

नूतन's picture

27 Jul 2025 - 8:15 pm | नूतन

शुभेच्छांबद्दल पण मनापासून धन्यवाद

कर्नलतपस्वी's picture

27 Jul 2025 - 9:37 am | कर्नलतपस्वी

नादिष्हेटपणा एक मेडिटेशन चा प्रकार आहे जो स्वता करता मेडिसीन आणी दुसर्‍यासाठीचे टेन्शन असते.

बाकी, लेख मस्त.

नूतन's picture

27 Jul 2025 - 8:12 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल मनापासून आभार

सौंदाळा's picture

28 Jul 2025 - 10:32 am | सौंदाळा

वाढ्दिवसाच्या (उशीराने) शुभेच्छा
लेख आवडला.
रंगवलेले चित्रही आवडले.

नूतन's picture

28 Jul 2025 - 3:10 pm | नूतन

शुभेच्छा आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Jul 2025 - 11:46 am | राजेंद्र मेहेंदळे

चित्र आणि पेन्सिली ठेवायची युक्ती--दोन्हीही.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

मी ही असाच एक तूनळी चॅनल बघुन प्रभावित झालो होतो आणि एक मोठी चित्रकला वही आणि बरेच अ‍ॅक्रिलिक रंग घेउन बसलो होतो. पण बरीच धडपड करुनही जमले नाही. हा तो चॅनल
https://www.youtube.com/channel/UCHm9SiOLG8UoBT8STWY5mVA

नूतन's picture

28 Jul 2025 - 3:12 pm | नूतन

शुभेच्छा आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पुन्हा एकदा धडपड करून बघायला काय हरकत आहे?
त्यासाठी शुभेच्छा.

श्वेता२४'s picture

28 Jul 2025 - 4:27 pm | श्वेता२४

वाढदिवसाच्या शुभेच्छा!! आणि चित्रे काढत राहा.

नूतन's picture

28 Jul 2025 - 11:29 pm | नूतन

शुभेच्छा आणि प्रोत्साहन आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद

गामा पैलवान's picture

28 Jul 2025 - 6:58 pm | गामा पैलवान

नूतन,

तुम्ही एकंदरीत नेटकेपणे कामं करणाऱ्या दिसताहात. सोबतच्या चित्रावरून तुमची कलाही तुमच्यासारखीच नेटकी आहे असं वाटतं.

आ.न.,
-गा.पै.

नूतन's picture

28 Jul 2025 - 11:30 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

वाढदिवसाच्या लेटलतीफ शुभेच्छा!!

चित्र सुंदर आणि पेन्सिली ठेवायची युक्ती व त्यासाठीचे प्रयत्न भन्नाट आणि प्रेरणादायी!!

- (जमवण्याचे प्रयत्न आवडलेला) सोकाजी

नूतन's picture

29 Jul 2025 - 11:58 am | नूतन

शुभेच्छा आणि प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद

सुधीर कांदळकर's picture

29 Jul 2025 - 9:31 am | सुधीर कांदळकर

ज्या इरेने पेटून तुम्ही हवी त्या रंगाची पेन्सिल हवी तेव्हा चटकन मिळेल अशा रीतीने पेन्सिली व्यवस्थित ठेवण्याचे साधन बनवले त्या ईर्षेला विनम्र अभिवादन. आपले छंद आपल्याला जीवन ऊर्जा देतात आणि चिरतरुण ठेवतात. आतां हवे तेव्हां हवा तितका वेळ बालवयात वा किशोरवयात शिरून चित्रकारी, रंगकाम करा आणि चित्रकारी/रंगकाम सत्र आटोपले की मगच या खर्‍या जगात परत या. अनेक अनेक शुभेच्छा.

नूतन's picture

29 Jul 2025 - 12:01 pm | नूतन

शुभेच्छा आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद

आपले छंद आपल्याला जीवन ऊर्जा देतात आणि चिरतरुण ठेवतात.
१००% खरं!

विवेकपटाईत's picture

29 Jul 2025 - 10:37 am | विवेकपटाईत

चित्र आवडले. बाकी बायकोचे तोंड गप्प ठेवण्याचा उत्तम उपाय.

नूतन's picture

29 Jul 2025 - 12:05 pm | नूतन
नूतन's picture

29 Jul 2025 - 12:06 pm | नूतन
नूतन's picture

29 Jul 2025 - 12:06 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल धन्यवाद
बायकोचं तोंड बंद करणं इतकं सोपं नाही हं!

असे नमूद करुन खाली बसतो.

श्वेता व्यास's picture

29 Jul 2025 - 6:34 pm | श्वेता व्यास

वाढदिवसाच्या शुभेच्छा, मस्तच जमलंय. चित्र खूप सुंदर!

नूतन's picture

29 Jul 2025 - 9:53 pm | नूतन

शुभेच्छा आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद