सल्ला

मिसळ

ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो.
misal

पावसाची परी

काल मिपा वर पावसाची परी नावाने नवीन सदस्य आले. काही सदस्याना मीच पावसाची परी या नावाने लिहितो आहे असा संशय येउन
त्यानी परीला काही प्रश्न विचारले.
(सखाराम गटणे या सदस्याबद्दल देखील असाच समज होता.तो काल तात्याला डॉ दाढेला गटणे प्रत्यक्ष भेटल्यावर दूर झाला)
त्या परी साठी ही कविता

परीला एका छाळीत होते
दुष्ट राजा खवीस आणि खलनायक एक
परी बिचारी घाबरली पाहुन प्रत्येक
बावरली हिरमुसली ती..
उत्तरे देउन एकेक.
मग हांक मारली तीने देवांस.
देव ही नाही आला सोडवावयास
म्हणाला मंत्र जाण परीबाळा या कलियुगाचा
मैत्री जोडावी दुष्टांसमवे
देवोनिया मिसळपाव सुस्वभावे
तोची जाण मार्ग एक
भेटतां कोणी दुष्ट राजा खवीस आणि खलनायक एक


(अवांतरः प्रत्येक वेळीस माझाच संशय का यावा हा प्रश्न गहन आहे कोणीतरी पटापट उत्तर याचे सांगेल काय:)] )

स्वप्नविश्वाचा विरह...

कधी सकाळचा गजर वाजून सांगतो की, "उठा, आवरा, ऑफीसला जा... " आणि आपले मात्र ढिम्म हलायचे मन नसते. इत्तके मस्त स्वप्न पडत असते की ते सोडून ऑफीसला जायचे म्हणजे कैच्याकैच असे वाटावे. ऑफिसमध्ये फोन करून सुट्टी घ्यावी आणि असेच अनादीअनंत काळासाठी आपण आपल्या स्वप्नात रममाण व्हावे अशी अनावर इच्छा होते. फोन करायलाही स्वप्नातून बाहेर पडवत नाही. स्वप्नात मन रमवावे वाटत असतानाही का कोण जाणे मनाचे अर्धेअधिक लक्ष मात्र त्या मेल्या पुढेपुढे सरकणाऱ्या काट्यासोबत टिकटिक करत फिरत राहते. जी दोलायमानता शेवटी असह्य होऊन तिरीमिरीत उठून आवरून ऑफिसला जावेच लागते. अख्खा दिवस मग काही मनाजोगते म्हणून घडत नाही किंवा घडले तरी त्यात मजा अशी वाटत नाही.. ते स्वप्न.. ते स्वप्न पूर्ण पहायला मिळाले असते तर मस्त झाले असते असे वाटत राहते पण ते नक्की काय होते ते मात्र आठवत नाही त्यामुळे एक वेगळीच विरहभावना मनात उभी रहाते.

असे काही होते का तुम्हासोबतही? की मीच एकटी वेंधळी आहे असे चमत्कारीकसे काही आज अनुभवणारी? अशा परिस्थितीत नक्की काय केले तर ही विरहभावना टाळता येऊ शकते?

इथे कुणी सिंगापूरकर आहे का?

नमस्कार!
मिपा परिवारात कुणी सिंगापूरकर आहे का?

पुलं विशेष लेख

दुवा
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3121744.cms
मस्त मजा आहे.

भाषाशुद्धी, जडजंबाल लेखन, मराठी भाषेचे मूळ

भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे.

मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. काही काळ तिने आवाज केला. पुढे तो थंडावत गेला. दरम्यान या चळवळीला पुरस्कर्ते आणि अनुयायी लाभले ते संख्येने मर्यादितच होते. उच्च जात, आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादा. सर्वसाधारण लोकात तिचे हसे झाले. शुद्धीकृत भाषेची विडंबने झाली. तिला अनुयायांपेक्षा पुरस्कर्तेच अधिक लाभले Smile म्हणजे अशा शुद्धीकरणाचा तात्त्विक पुरस्कार करणारे. 'तशा' भाषेत आपले लेखन करणारे फार थोडे होते. शेवटी आपले लेखन ज्यांच्यासाठी त्या लोकांना ते कितपत समजेल ही शंका आड आली असणार. पण भाषाशुद्धीकरणाची चळवळ थंडावली, तिचे उघड उद्योग संपले, तरी आपल्या स्वातंत्र्यचळवळीच्या भाषेत ती 'भूमिगत' झाली. परिणामी ती कीड लागल्या प्रमाणे पसरली. बर्‍याच लेखनाच्या मुळांना ती कीड लागली. अनेकदा त्या लेखकांच्या नकळत! आणि 'शिष्ट' लेखकांमुळे ती लागण स्वत:ला लेखक न समझणार्‍या वाचकांपर्यंत पोचली. कृत्रिम, अर्थहीन आणि जडजंबाल लेखन त्यांना तसे वाटेनासे झाले. आपल्या भाषेबाबतची संवेदनाच क्षीण झाली आणि ती पुढे नष्ट झाली.

या भाषाशुद्धीचळवळीचे प्रणेते त्या काळी नावामागे बॅ. हा बॅरिस्टर या इंग्रजी पदवीचा संक्षेप लावणारे आणि आता 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी लावले जाणारे वि. दा. सावरकर. या भाषाहोमात भस्म करायचा संकल्प होता तो मराठीत आलेल्या फारसी व इंग्रजी शब्दांचा. या संकल्पामागची चेतना राजकीय होती, तशीच ती धार्मिकही. पण राजकीयपेक्षा मुख्यत्वे धार्मिक. एक तर इंग्रजी शब्द लेखनात येत ते तुलनेने फारच थोडे. फारसी कुळीतलेच फार. आणि इंग्रजी शब्द जेमतेम शतकभरात आलेले तेवढेच. मात्र फारसी शब्द कित्येक शतके ठाण मांडून बसलेले. अगदी शिवशाहीपूर्वीपासून. आणि एवढे एकजीव झालेले की तीक्ष्ण नाकाचे व्युत्पत्तिशोधक सोडल्यास ते शब्द परके आहेत याचा वाचणार्‍यांना, लिहिणार्‍यांना, वापरणार्‍यांना संशयदेखील येऊ नये.

पण ही शुद्धीकरणाची चळवळ जोरात आल्यावर काही घ्राणेंद्रिये (म्हणजे देशी भाषेत नाके) अधिकच तिखट झाली. आणि हाय खाल्लेल्या म्लेंच्छ सैनिकांना जळीस्थळी संताजी व धनाजी दिसू लागले तशी या शुद्धीसैनिकांना म्लेंच्छ व यवनी शब्द दिसू लागले. या सर्वच सैनिकांना भाषाशास्त्राची तालीम (हा देखील एक म्लेंच्छ शब्दच) मिळालेली होती असे नाही. तिची भरपाई करायला भाषाभिमान समर्थ होता!

पुढे आपले एक मोठे कवी माधव जूलियन यामध्ये उतरले. फारसीचा
विटाळ झालेल्या अनेक कविता त्यांनी संस्कृतच्या फवार्‍यांनी सोवळ्या करून घेतल्या. याशिवाय भाषाशुद्धीकरणाचा प्रचारही केला. मात्र पुढे १९१७ मध्ये त्यांनी आपल्या एका पत्रात लिहिले "संस्कृत शब्दांची निष्कारण गर्दी निषेधार्ह आहे. या लोकांना संस्कृत भाषा अवगत असावी. पण स्वत:च्या मराठी भाषेशी नीट परिचय नसावा याची कीव येते! बोलीतील सुलभ शब्दांकडे आपले दुर्लक्ष होते." १९२१ साली त्यांनी "प्रत्येक मराठी शब्दाचे संस्कृतशी नाते जोडण्याचा मूर्खपणाचा प्रयत्न धिक्कारला."

अर्थात हे शुद्धीकरणाचे खूळही संपूर्णत: देशी नाही! साहेबाला त्याने आधी पछाडले होते. पहिल्या महायुद्धानंतर, इंग्रजीतील 'नेटिव' (ऍंग्लो सॅक्सन कुळातले) शब्द कटाक्षाने वापरून फ्रेंचद्वारा आलेल्या लॅटिन कुळीतल्या व तशा शब्दांना नाकारायचे अशी टूम निघाली होती.
भाषा साधी सोपी करावी हा त्यामागचा हेतू. आपले शुद्धीकरण मात्र त्याच्या अगदी उलट जाणारे.

भाषाशुद्धीचा हा आग्रह प्रामुख्याने हिंदीच्या प्रगतीलाही भोवला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय व्यवहाराला सोयीची
म्हणून वापरल्या जाणार्‍या इंग्रजीचा वरचष्मा उतरवण्यासाठी तिच्याजागी कोणती भाषा आणायची असा प्रश्न पडल्यावर संख्याबळाच्या आधारावर हिंदीची वर्णी लागली. पण कोणती हिंदी? गांधीजींचा कौल पडला साध्या सोप्या 'खडीबोली'च्या बाजूने
. मात्र पंडित मालवीयांसारख्या काही पुढार्‍यांच्या हिंदीच्या पुनरुज्जीवनवादी संस्कृतीकरणामुळे, तापलेल्या धर्मनिष्ठेमुळे. भावी सत्तेच्या गाजरामुळे, संस्कृतचे रंगरोगण केलेल्या हिंदीची घोडदौड सुरू झाली. सत्ता आल्यावर हिंदीच्या उद्धारासाठी पैशांची लयलूट झाली. इतर भाषांच्या वाट्याला कंजूष भिक्षा आली.

डॉ. कालेलकर यांच्या 'भाषा आणि संस्कृती' या विद्वत्ता, स्पष्टवक्तेपणा आणि विषयोचित विनोद यांच्या मेळाने फार वाचनीय झालेल्या पुस्तकातील काही वाक्ये इथे देतो. "इंग्रजीपेक्षाही कठीण अशी ही शुद्ध नवमराठी कित्येकदा इतकी दुर्बोध आहे की ती कळण्यासाठी ती ज्या मूळ इंग्रजीचे भाषांतर आहे तिकडे वळल्यावाचून गत्यंतर नसते... लोकांच्या माथी एक अगदी नवी, बोजड भाषा मारण्याचा जो प्रयत्न झाला तो फसला... 'सरकार' हा शब्दच पाहा. कोट्यवधी लोक अगदी सहजपणे हा शब्द वापरतात. मात्र त्याच्या जागी संस्कृतातून आलेला 'शासन' हा शब्द! मग त्याला साथीदार म्हणून 'शासकीय' 'प्रशासनिक' हे शब्द... 'सरकारी छापखाना' असे म्हणताच अंगावर सांडपाणी पडले असे वाटणार्‍या लोकांनी 'शासकीय मुद्रणालय' हा शूचिर्भूत पवित्र प्रयोग चालू केला आणि मराठीपासून सामान्य जनता कशी दुरावेल याची काळजी घेतली.

भाषेच्या बाबतीत शुद्धीकरण ही शास्त्रबाह्य कल्पना आहे. धर्माभिमान, खोटा स्वाभिमान, उच्चनीचतेच्या कल्पना... स्वत:ला श्रेष्ट न समजणार्‍या वर्गाची भावना अशा कारणांमुळे लोक शुद्धीकरणाकडे वळतात. "

याउलट गुजरातेतील बडोदे संस्थानात एके काळी मराठी व इंग्रजी या कारभाराच्या भाषा होत्या. त्याऐवजी लोकांची भाषा गुजराती ही कारभारासाठी वापरण्याचा गायकवाडांनी निर्णय घेतला. आणि त्यातील परभाषिक फारसीसारखे शब्द काढण्याचा अडाणी खटाटोप न करता कारभार व्यवस्थितपणे चालला.

पण सयाजीरावांच्या या विचारावर एका शुद्धीकारक मराठी पंडिताने आक्षेप घेतला म्हणे: "गुजराती ही क्षुद्र भाषा! मराठीत मुखकमल, चरणकमल असे म्हणतात. पण गुजरातीत तसे काही नाही!"

मराठी भाषा 'उच्च' करण्याची केविलवाणी धडपड ज्यांनी आरंभली त्यांनी तिला घसरणीला लावले. उदा हे काही शब्द पहा: रेडिओला सांवहिक. वनस्पतिशास्त्राला: औद्भिदशास्त्र. लंबगोलाला: विवृत्ताकृति. 'अवलंबनपर्णोद्गमसूत्र हा जबडातोड शब्द कशासाठी वापरला आहे कोण जाणे! एका विदुषीने Honeysuckle या शब्दाला मधुचोष्यक हा शब्द सुचवला Big Grin

मराठी भाषेचे मूळः

राजाध्यक्षांच्या मतांनंतर 'मराठी भाषेचे मूळ' आणि 'अडगुलं मडगुलं' या थोर पुस्तकांचे लेखक, ज्येष्ठ भाषातज्ज्ञ विश्वनाथ खैरे यांचा मनोगतावर वाचलेला एक प्रतिसाद येथे देतो.

... मराठी व तमिळ या भाषांचा आणि संस्कृतींचा गाढ, प्राचीन संबंध दाखवणं हे या सर्व
लेखनाचं उद्दिष्ट आहे.प्रतीकार्थानं हा संबंध मराठीच्या बाळपणापासून सुरू होतो असं दाखवणारं गाणं म्हणजे बाळाला तीट लावण्याच्या वेळी मराठी आया शतकानुशतके म्हणत
आल्या आहेत ते:
अडगुलं मडगुलं/ सोन्याचं कडगुलं/रुप्याचा वाळा/ तान्ह्या बाळा/
तीट लावू//
तमिळमध्ये अटकु (अडगु) म्हणजे ठेवीची, विनिमयाची किंवा गहाणाची वस्तू. मडक्कू म्हणजे मातीची मोठी थाळी. मट्कलम् म्हणजे मडकं. मण् म्हणजे माती आणि कलम म्हणजे भांडं यावरून तो शब्द आला आहे. 'मडकं मोल म्हणून दिलं किंवा गहाण ठेवलं' असा पहिल्या ओळीचा अर्थ आहे. सोन्नम् म्हणजे सोनं आणि कडगम् म्हणजे कडं. ' मडकं देऊन सोन्याचं कडं घेतलं.' वाळम् म्हणजे गोल किंवा वर्तुळ. इरिप्पु म्हणजे रुपं, 'रुप्याचा वाळा घेतला.' हे दागिने तान्ह्या बाळाला घातले. 'ती' म्हणजे आग, जाळ. तीत्तल म्हणजे करपवणं, काजळणं. तीट्टुतल् म्हणजे अंगाला लावणं. तीत्तु म्हणजे दुष्टावा. 'दृष्ट' लागू नये म्हणून काजळीची तीट लावताना हे सगळे अर्थ एकत्र आले आहेत. तमिळ आणि मराठी समानार्थी शब्द किती सारखे आहेत पाहा.
खैरे विचारतात, "नवतरण्या महाराष्ट्री माउलीने तान्ह्या मराठी बाळाला जी शब्दाभूषणे घातली ती तमिळाईकडून तर घेतली नव्हती?" "होय" असं आत्मविश्वासपूर्ण उत्तर देण्यापर्यंत खैर्‍यांचा प्रवास नजीकच्या काळातच झाला. आणि केवळ शब्दभूषणं नव्हे तर सांकृतिक आभरणंही तामिळाईकडून मिळाली असे पुरावे ते सादर करीत राहिले.ओवी, अंगाई, पोवाडा हे सर्व तमिळमधून आले. ओवीचा चौथा चरण तुटका असतो एवढ्यावरून त्या अर्थाचे संस्कृत शब्द बनवायचे आणि त्याचा अपभ्रंश म्हणून ओवी शब्द सिद्ध झाला हे दाखवायचं असा
खटाटोप प्रस्थापित भाषाशास्त्राला धरून पूर्वीच करण्यात आला होता. प्रा. वेलणकरांनी ती संज्ञा अशी व्युत्पादिली आहे:
'अर्धचतुष्पदी-अठ्ठोठवइ-अड्ढुड्ढवयी-अड्ढूहवई-ढूहवई-हूहवई-होवई-ओवाई-ओवी. डॉ. कत्रे यांनी अपपादिका-अववाइआ-ओवैया-ओवी अशी परंपरा सांगितली."संस्कृतवरून व्युत्पत्ती काढायची म्हटल्यावर असा द्राविडी प्राणायाम करावाच लागतो" अशी यावर खैरे यांची टिप्पणी आहे. सरळ द्रविड भाषेकडे गेलं तर काय दिसतं? ओवीचा चौथा चरण तुटका ना? तमिळ ओऽवाय म्हणजे दात नसलेलं तोंड, तुटक्या काठाचं भांड. शिवाय 'ओवि' म्हणजे ध्वनी, आवाज. बाळ झोपताना ओऽ ओऽ करतं. त्याच तालावर आई त्याला ओऽ ओऽ करीत पटते. आवाहन करणारा हा आईचा मराठी ओऽ आहे. आजही मराठी गुराखी ओढाळ गुरू लांब गेलं तर ओऽ ओऽ करून त्याला ओवई किंवा ववई घालतो. (हे ग्रामीण बोलीचे महत्व. अशी अनेक उदाहरणे पुढे येतात.)छे, इश्श, अय्या हे उद्गार तमिळ.खंडोबा, त्याचा येळकोट, विठ्ठल, गोंधळ, तुळजाई, बोल्हाई, काळूबाई, फिरंगाई हे सर्व तमिळ.शेंडी पासून क्रमाने डोई, डोळा, पापणी, मिशी, ओठ, मोहरा, हात, पोट, स्त्रीयोनीचा मराठी शब्द, गुडघा, नडघी, घोटा, बोट हे सर्व तमिळ. 'तात्पर्य, शरीरवर्णनात आपण मराठी भाषिक नखशिखांत तमिळ आहोत.' शरीरवर्णनाचे शब्द हे भाषेतील प्राथमिक शब्द असतात हे या संदर्भात लक्षात ठेवणं योग्य होईल.चूलमूल, नातीगोती, भाजीपाला, स्वैपाकाचे पदार्थ, शेतीची अवजारे यांच्याशी संबंधित असलेले मराठीतील शब्दही तमिळ.
महाराष्ट्रातील स्थळनामांच्या अर्थाचा उलगडा तमिळवरून होतो हे द्रविड महाराष्ट्र या पुस्तकात दाखवले आहे. मुंबई, परळ, चेंबूर, वसई, वाशी, पुणे, वानवडी, येरवडा, थेऊर, जेजुरी, खंडाळा, जुन्नर, इत्यादी. मुठा, मुळा, उल्हास या नद्याही. उल्हास नदीच्या नावात उल्ह म्हणजे 'पल्ला मासा', जो केवळ याच नदीत सापडायचा. (आता प्रदूषणमुळं सापडत नाही.)मराठी वाचकांसमोर हे पुरावे मांडत असताना, दक्षिणी भाषाभ्यसकांपुढेही त्यांना भावतील असे तमिळ-मराठी संबंधांचे पुरावे इंग्रजी निबंधांतून खैरे सादर करीत आले आहेत. निर्णायक वाटावा असा पुरावा 'टोवर्डस इंडियन फोनॉलजी अँड लिंग्विस्टिक्स' या त्यांच्या निबंधात पहायला मिळतो. दक्षिणी भाषांच्या व्युत्पत्तिकोशाच्या दोघांपैकी एक संपादक एमेनो यांनी १९७० साली द्रविडियन कंपॅरेटिव्ह फोनॉलजी-ए स्केच या नावाच्या प्रबंधात सुमारे २७५ दक्षिणी शब्दावलीच्या वर्णांची तुलना केली आहे. त्यातल्या जवळ जवळ २६० गटांमधे मराठीतल्या एक ना एक शब्दाची ओळख पटते. त्यातल्या अनेकांच्या ज्या संस्कृत व्युत्पत्ती दिलेल्या आहेत त्या नमूद करून त्यांची कृत्रिमताही उघड केली आहे. अस्सल दक्षिणी म्हणवतात त्यांचे समशब्द मराठमोळे म्हणून वावरताहेत हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही.पण अगदी बिनतोड पुरावा हवा असेल तर तो पुढचा आहे. जे आपल्याला 'अस्सल मराठी' वाटतं त्याला आपण 'मराठमोळं' म्हणतो. अस्सल मराठी भाषेला आपण 'मराठमोळी' म्हणतो. तमिळ मर्रा (जो मराठीत मर्‍हा होतो) म्हणजे न झाकलेलं, उघडं किंवा स्पष्ट. 'मर्‍हाटाचि बोलु'! ज्ञानेश्वरीमधे बावीस वेळा हा शब्द आला आहे. आणि त्याचा हाच अर्थ असल्याचे खैर्‍यानी एका निबंधात दाखवून दिलं आहे. मोळि म्हणजे बोली, भाषा...

मयत (२) --- करीअर गायडंस वर्ग

हल्ली एखादा प्रकार हीट झाला की लगेच त्याच्या आवृत्त्या काढायची फ्याशन येते. एखादा पिक्चर हीट झाला की लगेच त्या थीमच्या 3-4 आवृत्या निघतात. हा प्रकार इथे मिसळपाववर नवीन नाही. एक खायाली पुलाव फेमस झाल्यावर लगेच तो प्रकार 5-6 जणानी वापरला. एक रेखाटन प्रसिध्ध झाल्याझाल्या लोकानी लगीच आपापली बरीच वर्ष कपाटात असलेली, घड्या, डाग पडलेली रेखाटने काढून मिपावर डकवली. सांगायचा उद्देश एवढाच की एखाद्या प्रकाराला प्रसिध्धी मिळती आहे म्हणल्यावर वाहत्या गंगेत बरेच जण हात धुवून घेताना दिसतात. भडकमकरांचे गायडंस वर्ग तुफान चालतायत बघून आम्हीही या गंगेत हात धुवायचे ठरवले.

तर मित्रानो आम्ही मयत इव्हेंट म्यानेज करून आपली प्रसिध्धी कशी वाढवायची हे शिकवणारे गायडंस वर्ग काढले आहेत.

पण आमच्या व भडकमकरांच्या वर्गामधे मूलभूत फरक आहे.त्यांचे वर्ग हे प्रसिध्ध होउन पैसे कसे मिळवायचे या बद्दल आहेत तर आमचे फक्त प्रसिध्धीमुळे येणारे आत्मिक सुख व समाधान देणारे आहेत. त्यांचे वर्ग हे पदवी किंवा पदव्योत्तर वर्गाचे आहेत. आमचे वर्ग हे शाळा लेव्हलचे फार तर पदविका लेव्हलचे म्हणता येतील. किंवा भडकमकरांच्या इव्हेंट म्यानेजमेंट्च्या मुलाना पैसे खर्च न करता प्रात्यक्षिके करण्याचे वर्ग आहेत असे म्हणले तरी चालण्यासारखे आहे.
हा वर्ग भडकमकरांच्या विद्यार्थ्यानी पहिली पायरी म्हणून करायला हरकत नाही. तसेच ज्यांची पैसे खर्च करायची इच्छा नाही पण एखादा इव्हेंट म्यानेज केल्याचे समाधान हवे असेल आणि फुकटात प्रसिध्धी हवी असेल त्यानी आमच्या ह्या वर्गात अवश्य प्रवेश घ्यावा.
काळजी नसावी. शेवटी “येन केन प्रकारेण प्रसिध्धी पुरुषो भवेत” हे आमच्या वर्गाचे ब्रीद वाक्य आहे. आपण फक्त आम्ही सांगितलेल्या खालील सूचना पाळाव्यात . आपणास प्रसिध्ध होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

१)सर्वात प्रथम ही गोष्ट ध्यानात ठेवा की मयत हा शाश्वत, चिरंतन , अधून मधून सतत , पण अकस्मात होणारा असा एक अनम्यानेज्ड इव्हेंट आहे. येथे टायमिंगला अतिशय महत्व आहे. दुसर्‍याकोणी याची सूत्रे हाती घायच्या आधी आपण ती हातात घेणे अत्यंत महत्वाचे असते. सुत्रे हाती कशी घ्यायची त्याच्या सुचना खाली दिल्या आहेतच.

२)नात्यातल्या, ओळखीच्या, आसपासच्या घरात कोणी मयत झाले असे कळाले की त्वरीत तेथे पोहोचावे. थोडाजरी उशीर केलात तर आमच्या वर्गातला दुसरा कोणी विद्यार्थी तेथे पोहोचण्याची व सुत्रे हाती घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ अजिबात वाया घालवू नका.

३) तेथे त्या घरातला क्रमांक 2 चा माणुस गाठावा.

आता हा क्रमांक 2 चा माणुस कोण? तर मयताच्या मुलाबाळानंतर ज्याचा वट त्या घरात आहे असा पुरुष. क्रमांक 2 चा माणुस शोधणे सोपे असते. मयताच्या घरचा सेट-अप साधारण असा आसतो : बाहेरच्या हॉल मधे प्रेत ठेवलेले असते. त्याच्या भोवती अर्ध वर्तुळाकारात लोक बसलेले असतात. पहिले वर्तुळ हे अत्यंत जवळचे लोक (क्रमांक १ चे लोक). म्हंजे मुल, मुली , सुना नातवंडे वगैरे. त्यानंतरच्या वर्तुळात भाऊ, बहीणी, भावाजया हे नातेवाईक. त्यानंतरच्या वर्तुळात ओळखीच्या वा आसपासच्या घरातील बायका बसलेल्या असतात. ही सर्व मंडळी आपल्या दृष्टीने बीनकामाची आहेत हे पक्के लक्षात ठेवा. आपल टार्गेट आहे जे लोक बाजूला किंवा बाहेर अंगणात दबक्या आवाजात चर्चा करत उभे असतात ते लोक. या मधे जावई, म्हेवणे , ओळखीचे वा आसपासचे लोक जास्त करून असतात असा आमचा अनुभव आहे. विशेषत: म्हेवणे किंवा जावई. सर्व लोक दबक्या आवाजात बोलत असताना जो मोठ्या आवाजात आपल्या बायकोला सूचना देतो किंवा रडणार्‍या मुलाचे सांत्वन करतो तो क्रमांक 2 चा माणुस ओळखावा. हा साधारण मयताचा म्हेवणा किंवा जावई असतो . क्रमांक 2 चा माणुस जर त्याच गावातला नसेल तर आपले काम खूपच सोपे होते. म्हणजे आमच्या गावात शनिवारी/गुरवारी मर्तिक नेत नाहीत. भटजी मिळत नाहीत वगैरे वाक्ये टाकून त्याच्या समोर आपले वजन वाढवता येते.

४)या क्रमांक 2 च्या माणसाला गाठुन थोडेसे बाजूला घ्यावे वा सरळ “ सगळे आले का? आजुन कोण यायच राहिलय?” हे विचारून घ्यावे. कोणी येणार असेल तर कुठून येतायत कधी पर्यंत पोहोचतील हा तपशील विचारून घ्यावा."जास्त थांबता येणार नाही , परत अमावस्या/शनिवार सुरु होत आहे" वगैरे वाक्ये नीट तपशील माहित असेल तर टाकावीत. पुढच्या तयारीला कोणी लागले आहे काय हे ही चाचपडून पहावे. एक लक्षात ठेवा की इथे ओळखीचा प्रश्न येत नाही. ओळख नाही म्हणून तुम्ही बुजलात तर तुम्ही आयुष्यात कुठेच यशस्वी होऊ शकणार नाही.
ही मिळालेली माहिती बाहेरच्या कोंडाळ्यात घराचाच माणुस आसल्याच्या थाटात सांगावी. “विजु यायची आहे आजुन. पुण्यावरुन निघालीय… एक दोन तासात पोहोचेल. तिच्यासाठी थांबावेच लागेल. फार जीव होता हो तिच्यावर. नाहीतर नंतर कावळा शिवायला अडचण यायची.” यावरुन बाहेरच्याना तुम्ही घरातले वाटता. आणि घरच्याना तुम्हाला एकंदर फारच कळकळ आहे असे वाटते. दोघांचेही असे गैरसमज झाले की आपले पुढचे काम सोपे होउन जाते. या क्रमांक २ वर घरातील जबाबदारी सोपवावी. म्हंजे मृताची अंघोळ, तोंडात सोन्याचा तुकडा, रडणार्यांचे सांत्वन अशा जबाबदार्‍यात त्याला अडकवला की बाहेरचे रान आपल्यासाठी मोकळे रहाते. नाहीतर बाहेरची कामे हा हातात घेतो व तुमच्या प्रसिध्ध होण्याच्या मार्गातील धोंड बनुन जातो.

५)मयताच्या शेजारी राहाणारा आणि मयताच्या कुटुंबाशी चांगले संबन्ध असणारा माणुस शोधावा.
या सर्व प्रकारात एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे आपण स्वतः कुठलेही काम करायचे नसते. सगळी कामे नीट दुसर्‍याकडून करुन घ्यायची असतात. कामे करण्यासाठी असा शेजारी उत्तम.हा शेजारी शोधणे हे कामही फार सोपे असते. तिथे भेटायला आलेल्या प्रत्तेक नवीन माणसाला हा शेजारी ”अहो कालच संध्याकाळी भेटले होते. तब्बेत अगदी उत्तम होती. आमच्या मुलाला 10वीत चांगले मार्क पडले (हल्ली लोकाना आपल्या मुलांचे कुठे कौतुक करावे याचेही भान नसते) म्हणून कौतुक करत होते. आणि आज हे असे झाले.” किंवा “अहो सकाळीच भेटले होते. दुपारी असे काही होईल असे वाटले सुध्धा नाही” वगैरे तीच तीच माहिती न दमता सांगत असतो. या शेजार्‍याला पकडून त्याला लाकडे स्मशानात पोचवण्यासाठी व मडके , बांबू वगैरे सामान आणण्यास पिटाळावे. गाडी चालवू शकेल असे एखादे कॉलेजमधे जाणारे पोरगे त्याच्या गाडी सकट “यांच्या बरोबर जा … जरा बघ हे सामान कुठे मिळते … ह्या गोष्टी पण आल्या पाहिजेत” असे म्हणून त्या शेजार्‍याला जोडुन द्यावे. वर त्या शेजार्‍याला "तुम्ही तेवढ बघा हं हे. काय आहे... कुणी तरी जबाबदार व्यक्तीने केले की बरे आसते.... नही तर नंतर खोळंबा होउन फजिती व्हायची...." असे हरबर्‍याच्या झाडावर चढवावे. फुकटची गाडी व जबाबदारीचे काम मिळाल्याने तो शेजारीही खुश. शिवाय असल्या प्रकारात शक्यतो कुणाची नाही म्हणण्याची टाप नसते. त्यामुळे इथे फार स्कील वापरावे लागत नाही.
अशी सगळी कामे लोकाना वाटून देउन आपण उगचच अधुन मधून आतबाहेर करावे. मधेच रडणार्‍या मुलाच्या शेजारी बसुन त्याच्या खांद्यावर थापटून "अहो सदानंदराव देवाच्या इच्छे पुढे कुणाचे काय चालणार? शोक आवरा....अहो तुम्हीच अस केलत तर आम्ही कुणाकडे बघायचे" वगैरे वाक्ये टाकून आसपासच्या लोकांच्यावर छाप पाडावी.

६)तिरडी बांधताना त्यावर जातीने लक्ष देणे.
दोन मुख्य बांबूमधील अंतर, त्यावर आडव्या बांधल्याजाणार्‍या बांबुची लांबी, बांधताना दिला जाणारा काथ्याचा तिढा याविषयी सुचना या दिल्याच गेल्या पाहिजेत. त्या दिल्याशिवाय तुमची या विषयातील मास्टरी लोकाना कळत नाही. या सुचना देताना "याचे ही एक शास्त्र आहे" असे वाक्य टाकावे. जगात कुणालाही तिरडी बांधायच्या शास्त्राविषयी माहिती नसते. शिवाय कोणी असल्या प्रसंगात "सांगा बघू काय शास्त्र आहे ते?" किंवा "दाखवा बघु ,कुठे असे लिहिलय की तिरडी कशी बांधावी ते?" अशी आव्हाने देत नाही. त्यामुळे वरील वाक्य बिनदिक्कत टाकावे. ऊलट लोक आपणास यातला तज्ञ समजू लागतात. तिरडी कुठल्या दिशेला ठेवावी, प्रेताचे डोके कुठल्या दिशेला ठेवायचे या विषयी लोकांचा खूप गोंधळ असतो. लोक हमखास चुकतात. अश्या वेळी मात्र पटकन पुढे जाउन तिरडीची दक्षिणोत्तर पोझिशन ठिक करावी. शिवाय 'अजुन ५ मिनिट तिरडी अशीच ठेवली आसती तर तो मुडदा उठुन चालायला लागला असता.काय राव तुमची अक्कल...' असे भाव चेहर्‍यावर आणुन चुकीची तिरडी ठेवणार्‍याकडे पहावे. खल्लास. तुमच्याबद्दल तिथल्या लोकांच्या मनात अतीव आदराशिवाय काहीही नसेल.

हाच प्रकार अंत्ययात्रेच्या वेळी करावा. हल्ली जवळजवळ सगळीकडे रुग्णवाहीकेतूनच प्रेत स्मशानात नेतात. त्यामुळे विसावा, खांदेपालट या गोष्टी विसरल्या जातात. शिवाय स्मशानाच्या दारापासून चवथर्‍या पर्यंत ५-१० पावलेच अंत्ययात्रा निघते. त्यात कसले आलय विसावा आणि खांदे पालट? पण नाही. त्या १० पावलातसुध्धा पाचव्या पावलावर लवकुशाच्या अभिनिवेशात ती यात्रा अडवायची, आणि २ मिनिट विसावा घायला लावून खांदेपालट करायला लावायचा. वर "शास्त्र आहे" असे ठणकाऊन सांगायचे. कोणीही तुम्हाला विरोध करायच्या भानगडीत पडत नाही. उलट तुम्ही किती कळकळीने व शास्त्रशुध्धपध्धतीने हे सर्व करत आहात याबद्दल तुमचाबद्दलचा आदर द्विगुणितच होतो.

७)श्रध्धांजली
अत्यंत महत्वाची व प्रसिध्ध होण्यासाठी अत्तापर्यंत केलेल्या धड्पडीवर कळस चढवायची सुवर्ण संधी. प्रेताला अग्नी देणारा अग्नी देउन खाली येउन बसतो आणि चिता धडाडून पेटते तो क्षण टिपायचा. उठून उभे रहायचे आणि "जरा सगळे जण इकडे या" असे म्हणून स्मशानात विखुरलेल्या लोकाना एकत्र करुन अंत्ययात्रेचे छोट्याश्या सभेत आणि खांदेकर्‍यांचे श्रोत्यात रुपांतर करायचे. आणि मग एक १५-२० मिनिट श्रध्धांजलीच्या नावाखाली एक छानसे भाषण ठोकायचे.(येथे श्रोत्यामधुन "थांबा","बास करा" असे शेरे येत नाहीत. त्यामुळे तुमच्या भाषणाचा कंड हवा तितका वेळ जिरवू शकता. शिवाय कुठलाही श्रोता सभा सोडून जायचे धाडस करत नाही.) यात मयत व्यक्तीचा परिचय कधी झाला इथुन सुरवात करुन त्यांचे व माझे संबंध कसे जिव्हाळ्याचे होते, त्यांच्या मनात माझ्याबद्दल कशी आपुलकी, प्रेम, आदर होता हे सांगण्यासाठी फक्त दोघांमधील प्रसंग सांगावयाचे. ते प्रसंग खोटे आहेत म्हणायची उपस्थीतांना हिम्मत होत नाही, शिवाय तो वर गेलेला मनुष्यही खाली येणार नसतो. त्यामुळे असले प्रसंग बिनधास्त रचुन सांगावेत. फार तर आगोदरच मेलेली एखादी प्रतिष्ठीत व्यक्तीपण तेंव्हा उपस्थीत होती असे ठोकून द्यावे. फक्त स्थळ काळ वेळ सांगू नये. "मागे एकदा.." येवढाच मोघम उल्लेख करावा.या भाषणात टाळया, हश्या घेणारी वाक्ये घालायची नसतात.शिवाय चेहर्‍यावरचे भावही विशिष्ठ ठेवावे लागतात. पण ती तयारी आम्ही आमच्या वर्गा मधे करुन घेउच. म्हंजे सांगायचे प्रसंग,चेहर्‍यावरचे भाव घोकून आणि घोटून घेउ. नन्तर फक्त मेलेला माणुस बदलायचा प्रसंग साधारण तेच ठेवायचे.भाषणाची तयारी मात्र तुम्हाला आधी पासुनच करावी लागेल कारण प्रसंग सांगून येत नाही.

तर मित्रानो एकदा तुम्ही आमच्या टिप्स लक्षात ठेवून त्याप्रमाणे मार्गक्रमणा केलीत तर तुम्ही गावातील एक अत्यंत प्रतिष्ठीत व्यक्ती बनून जाल. तेही खिशातले ५ पैसे खर्च न करता. तेंव्हा ताबडतोब आम्हाला खरड टाकुन तुमचा प्रवेश या वर्गासाठी आरक्षीत करा.
प्रसिध्धी तुमचीच आहे.

आमार बांगला सोनार बांगला

मराठी अस्मितेबद्दल सध्या बरेच काही ऐकू येत आहे. राज ठाकरे यांनी तर तो आपला राजकीय अजेंडा ठरवला आहे. बाकीचे पक्षही यात (आपल्या परीने) उतरले आहेत. मराठी मन मात्र या विषयावर विभागले गेल्यासारखे दिसते. वर्तमानपत्रातील प्रतिक्रिया, ब्लॉग्ज यावरून ते दिसतेय. पण बंगाली लोकांचा भाषाभिमान याविषयी एक चांगला लेख येथे वाचला. मला तो आवडला आणि पटलाही.
http://marathi.webdunia.com/miscellaneous/special08/mumbai/0805/10/10805...

रंगीत मिरच्या - रेसिपी सुचवाल ?

परवाच एका परिचितांनी एक रन्गीत पाकीट दिले...भेट म्हणून. Mixed hot chilli peppers असे त्यावर लिहीले होते. ह्य पाकीटामधे रंगीबेरंगी , जरा जाडसर आणि लांबट आकाराच्या ३५-४० मिरच्या होत्या. लाल , केशरी, पिवळा, हिरवा, पोपटी असे विविध रंग बघून रंगवेड्या माझ्या छोटीला तर त्या लगेच खेळायला हव्या होत्या.

Hot peppers

खरच; ह्या मिरच्या चवीने hot असल्या तरी त्यांना cool मिरची म्हणावे असेच सही रंग होते त्यांचे.
काही खाद्य पदार्थ बनवण्यापेक्षा टेबल वर सजवून नुसतेच त्यान्चे रंग न्याहळ्त बसावे असे वाटत होते. पण काहीतरी करायलाच हवे होते. नाहीतर फ्रीज मधे ठेवूनही काही दिवसांनी खराब झाल्या असत्या. परिचितांनी सान्गितले की ते ह्यान्ची भजी करतात आणि ती फारच छान लागतात. मी ही तेच करयचे ठरवले.
आख्ख्या मिरच्या उभी चिर पाडून आत किंचितसे मीठ भरुन भिजवलेल्या डाळीच्या पीठात बुडवून भजी केली. भजी दिसत छान होती आणि चवीला तर अहाहा ! मस्त च लागत होती. (अर्थात मला भजी च्या प्रत्येक घासाबरोबर पाणी प्यावे लागत होते. पण तरीही भजी enjoy केली. ) मला लाल मिरची सर्वात जास्त तिखट वाटली.. हिरवी तळल्यावर बरीच mild वाटली.
mirchi pakoda

ज्याना तिखटजाळ पदार्थांन्ची आवड आहे त्यांना जरुर आवडतील ह्या मिरच्या.
अजून मिरच्या बर्याच शिल्लक आहेत. नवरॅने सुचवले की ग्रील वर भाजून मग लिंबू , मीठ घालून त्याची चटणी कर.

ईथल्या हौशी बल्ल्वाचार्यांना आणि पाककला निपूण सख्यांना अजून काही ह्या मिरच्यांचे पदार्थ सुचतायेत का? काही वेगळा चविष्ट पदार्थ बनवता येइल का?
-- ईश्वरी

hot peppers

ब्रिटन प्रवास... माहिती

मित्रहो,

जून महिन्यात कंपनी तर्फे ब्रिटन मधे प्रवासाचे घाटत आहे.
अनुभविं कडून मार्गदर्शनाच्या अपेक्षेने लिहित आहे.
कृपया पुढिल माहीती हवी आहे:

१) मुंबई - लंडन प्रवास..
BA, VA, AI किंवा Jet Airways?

कोणता प्रवास ज्यास्त सुखकर आहे?

२) लंडन (हीथ्रो) ते लिस्टरः

विमान कि ट्रेन?

कोणता प्रवास स्वस्त?

३) लिस्टर मध्ये हॉटेलांचे दर काय आहेत?
सर्वसाधारण परंतु स्वच्छ हॉटेल अपेक्षित आहे.