निघताना....
मी हळूहळू पण निश्चितपणे
पार दिसेनाशी होईन
तेव्हा तू चौकट ओलांड,
आणि निघताना.....
आपल्या हसल्याबोलल्या
आवाजांची फूले घेऊन ये
आपल्यातल्या गहिवरांचे
कढ, न हिंदकळता आण
मी न ओलांडलेली अंतरे
तू सहजच पार करुन ये
माझे न उच्चारलेले नाव
चारचौघांत सरळच घे
सगळे उठून जातील तेव्हा
आपल्यातल्या शब्दांची
आरास मांड
त्यानंतर आपोआप दिवा लागेल
तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल