प्रेम कविता

नजरेतच सारे..

समयांत's picture
समयांत in जे न देखे रवी...
1 Dec 2017 - 2:34 pm

तुझ्या डोळ्यांत पाहिले असता कसले नाते समोर कधीच आले नाही.
तुझी पापणी, आणि त्यावरचे रूंद लव झोक देऊन उघडझाप करतात, तेव्हा माझाही श्वास त्याच लयीत धपापायला लागतो.
तुझे तुझ्या भावनांचे डोळ्यांतून व्यक्त होतांनाचे प्रमाण केव्हाच कमी होत नाही.
कितीतरी क्षणांना काबीज करणारे, कितीतरी क्षणांमध्ये ओघळून जात असलेले तुझे डोळे मला हलकेच जपून ठेवायचे आहेत.
तुझी डोळ्यांतली न हरवणारी चमक मला कुठेतरी नक्कीच हरवून जाते.
माझ्याच नजरेत तुझी नजर एकत्र मिळते तेव्हाच का हे सारे घडत असते खास..

प्रेम कविताफ्री स्टाइलमुक्त कवितामुक्तक

तू माझा?

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
17 Oct 2017 - 9:05 pm

हे तुझं असं अवेळी येणं
आणि मोकळं मोकळं होणं...
कसं बरं झेलू मी?
माझं मन आणि ओंजळ;
अपुरी आहे तुझ्या प्रपातासमोर!
आणि सगळं जाणूनही,
हे तुझं मला आपलंसं करणं....
आवडत मला.
आणि मग...
तू मागे ठेऊन गेलेल्या आठवणी..
जपते मी मनात हळुवार.
तुझ्या आवेगला भितेही....
आणि तुझ्यात सामावून जायला
आतुर अशी तुझी विरहणी!!
अन्
तू माझा... माझा..?

प्रेम कविताकविता

पहिला पाऊस

तृप्ति २३'s picture
तृप्ति २३ in जे न देखे रवी...
15 Aug 2017 - 6:45 pm

ह्या कवितेत मी पावसाच्या थेंबांनी मन कसे बहरते ते सांगितलं आहे .

☔ पहिला पाऊस ☔

पहील्या पावसात भीजतांना
आठवण तुझी होते
पावसाच्या त्या सरीमधे
मन माझे उमलते
☔☔☔☔☔
हाती तुझा हात घेऊन
भीजावेसे वाटते
दाटलेल्या त्या धुक्यांमधे
रमावेसे वाटते
☔☔☔☔☔
पावसाच्या सरीने
दरवळतो सुगंध मातीचा
भीजतांना त्या सरीमधे
विसर पडतो स्वतःचा

कविता माझीप्रेम कविताकविताप्रेमकाव्य

ती मला आवडते

निओ's picture
निओ in जे न देखे रवी...
11 Aug 2017 - 2:56 pm

ती मला आवडते

जेव्हा लाडिकपणे
अंगाशी झोंबते
तेव्हा ती मला खूप आवडते

जेव्हा किरकोळ गोष्टीला
खट्याळपणे Oh My God म्हणते
तेव्हा ती मला खूप आवडते

माझ्या टोमण्यांवर
गुद्द्यांचा प्रसाद देते
तेव्हा ती मला खूप आवडते

मी टकाटक आवरून बाहेर जाताना
हूं... करून नाक मुरडते
तेव्हा ती मला खूप आवडते

जेव्हा माझा पचका होतो
तिला कशी जिरली एकाची
असा लहान मुलासारखा आनंद होतो
तेव्हा ती मला खूप आवडते

कधी कधी माझ्या रागवण्यावर
भोळा भाबडा चेहरा करते
तेव्हा ती मला खूप आवडते

कविता माझीप्रेम कवितामाझी कविताशृंगारहास्यकविताचारोळ्याप्रेमकाव्यविनोद

पुस्तक

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
16 Jul 2017 - 6:23 am

ते पुस्तकच आहे.
दूर तुझ्या घरात ठेवलेलं
काचेआड.

एकदा तू वाचलेलं.
तू तिथं नसताना
मी वाचलेलं.
तिसरं कुणीही ते वाचलेलं नाही.

एकदा तू, नंतर मी.
कथा तुझ्या डोळ्यांनी वाचली
मी तुझे डोळे वाचले.

ते पुस्तकच आहे? अजूनही?
दूर तुझ्या घरात ठेवलेलं
काचेआड...
-शिवकन्या

कविता माझीप्रेम कवितामांडणीवावरकवितासाहित्यिक

धुंद पाऊस

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
9 May 2017 - 10:46 pm

अनोळखी भेटीत धुंद पाऊस बरसला
थेंबा थेंबात प्रीत नक्षी आकारून गेला

पाने हलता मोती ओघळे
तुझ्या चाहूलीने गंधाळती मळे
गंध तुझा सावळ्या रानी विसावला

पावसाळी सावल्यांत मेघांचा झुला झुले
हळूवार प्रीतीत सरींचा पिसारा उमले
कोवळ्या सूराने दवांत पंख पसरला

विहग जलधारांचे पालवींत लोपले
गूज फुलपाखरांचे मंजिरींत साठले
ओलेत्या नभाने बांधली इंद्रधनुची मेखला

प्रेम कविताकविता

काळाचे गीत

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
9 May 2017 - 10:45 am

तूहि नव्हतीस, मीही नव्हतो
बघ काळ कसा बदलतो
तारे ते जे सदाच असती
आपल्या जागी नभात वरती
आज मोजण्या जागे कोणी
मनात अन् मोगरे माळूनि
फेऱ्या आपुल्या पाणवठ्याच्या
चर्चा साऱ्या गावकुसाच्या
कशी न कळली तू गेलेली
नियती अशी उलटलेली
पुन्हा भेटलीस का वळणावर?
घेऊन कुंकू परके, भांगावर
उभय उरातहि ते काही
आधीसारखे हलले नाही
        तूहि नव्हतीस मीही नव्हतो
        पुरते आपण अनोळखी होतो
        तू आहेस अन आज मीही
        समोरासमोर अगदी, तरीही
        त्याच्या हाती सर्व आहे

प्रेम कवितामाझी कविताकरुणकलाकविताप्रेमकाव्यसाहित्यिक

दे बहाणे सोडुनी ...

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
4 May 2017 - 11:00 pm

खास काही आजच्या भेटीत झाले आखरी
कावरी झाली किती झाली किती ती बावरी

भासवे नाजूक काही भावना या ना मनी
सांगते सारे खळी जी लाजते गालावरी

मान वेळावून पाही तो बहाणा लाघवी
एकदा सारे अशी सारे तशी बट लाजरी

ऐकण्यासाठी अबोला कोकिळा झाली मुकी
बोलली नाही तरी पंचम तिच्या ओठावरी

साधली संधी कशी तो वर्षला ग्रीष्मातही
दे बहाणे सोडुनी ती लाज आता सावरी

... संदीप

प्रेम कविताकवितागझल

पाण्यात हसरी राधा रुक्मिणी सवे

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
17 Apr 2017 - 8:13 am

तरूस लगडली सुवासिक आम्रफळे
परी कोयी अन बीया मोजतो हा बळे

पाण्यात मासे उसळतात
रेतीच्या खोप्यास हसतात

तृष्णार्त कृष्णा टोचती का खडे
जळात उतरू कसा प्रश्न हा पडे

आर्जवी पाणिते अवीट
परी कृष्णास दिसे का मीठ

खेळती कधी लहर कधी लाट
प्रश्नांकीत किनारी मुरलींची पाठ

तुडूंब सरोवर नरतनी पक्ष्यांचे थवे
पाण्यात हसरी राधा रुक्मिणी सवे

आता मला वाटते भितीकालगंगाजिलबीप्रेम कविताभूछत्रीरोमांचकारी.करुणमुक्तक

कविता

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
7 Apr 2017 - 12:13 am

आज वाटते एक कविता अशी जन्मावी
हाताने तर नव्हेच आणि ती मी न लिहावी

तू नुकतीच नाहलेली अन ओलेती असावी
केस मोकळे, दवबिंदूंनी पापणी मिटावी
ऊन कोवळे लेऊन कांती तुझी चमकावी
आज वाटते ...

अशी पाहुनी तुला, मला अस्फूट स्फुरावी
जवळ येउनी तू माझ्या नयनी वाचावी
ह्या हृदयीची त्या हृदयी होऊन जावी
आज वाटते ...

मिठीत माझ्या दिठी तुझी ती अलगद यावी
गात्रांमधली थरथर होऊन तू प्रसवावी
ओठ टेकता तुझ्याच ओठांतून उमटावी

आज वाटते एक कविता अशी जन्मावी
हाताने तर नव्हेच आणि ती मी न लिहावी

प्रेम कविताभावकवितारोमांचकारी.शृंगारकविताप्रेमकाव्य