धनवर्षाव (शतशब्दकथा)
सर्वपित्रीची रात्र
गावकुसाबाहेर तीन पिंपळामधल्या जागेत माझ्या चर्मासनासमोरचं धगधगतं, वखवखलेलं आहुतीकुंड.
शेवटच्या आहुतीच्यावेळी मांत्रिकानं लालभडक पट्टीनं डोळे झाकलेयत माझे.
ही महाआहुती ..कारण ती अर्भकाची.
याचे आई बाप काय करतील बाळ बळी गेल्याचं कळल्यावर?
आता असल्या वांझोट्या विचारांना थारा नाही. अन्यथा गुप्तधनाची संधी कायमची जाईल.
मांत्रिकानं दिलेली पंचधातूची सुरी महाआहुतीत भोसकून तिचं ज्वालार्पण तर केलं एकदाचं..
आता फक्त एक महिना..पुढच्या अमावास्येला धनवर्षाव.....