डार्कलँड
तो ऑफिसात कामात गढून गेला होता. अशावेळी येऊन कुणी व्यत्यय आणला असता तर त्याला ते आवडण्यासारखे नव्हते. पण जग कुणाच्या आवडीनिवडीवर चालत नाही. आपण खूप मारे ठरवतो कि आज “हे” करायचं आणि नेमके त्यावेळी “ते” येऊन मध्ये तडमडते.
व्यत्ययची आठवण झाली आणि तो आलाच.
पांडू –म्हणजे- ऑफिसचा हरकाम्या प्यून. तो आला आणि त्याच्या टेबलासमोर उभा राहिला. पांडू काही बोलायच्या आधीच तो म्हणाला,
“मला भेटायला कोणीतरी आलं आहे ना. मला माहित आहे. त्यांना सांग थोडा वेळ थांबा म्हणून.”