भाग १: स्वातंत्र्यदिनाची कल्पना
इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना
भाग २: स्वातंत्र्यदिनाची तयारी
स्वातंत्र्यदिन म्हणजे काय हे समजावण्यापासून जिथे तयारी आहे तिथे हे खायचं काम नव्हतं. पण यमदेवांना त्यावरही उपाय सुचला. त्यांनी गांधीजींवर ही जबाबदारी सोपवली. तेही लगेच तयार झाले आणि कामाला लागले.
जिचं मन वळवणं सर्वांत कठीण अशा व्यक्तीच्या गळी जर आपण ही गोष्ट आधी उतरवली तर आपलं काम फत्ते होईल असा अंदाज बांधून ते प्रथम औरंगजेबाकडे आले.
“प्रणाम.”
औरंगजेबाच्या चेहेऱ्यावरची सुरकुतीसुद्धा हलली नाही. त्यांनी पुन: प्रयत्न केला.
“सलाम. जरा स्वातंत्र्यदिनासंबंधी आपल्याशी चर्चा करायची होती.”
“ये स्वातंत्र्यदिन क्या होता है?”
“या दिवशी भारत देश स्वतंत्र झाला.”
“मतलब?”
“लोकांचं राज्य आलं.”
“मुसलमानांचं?”
“होय!”
औरंगजेबाचा चेहेरा जरा खुलला.
“हिंदू, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, सगळ्यांचंच राज्य आलं!” गांधीजी पुढे म्हणाले.
“ये नही हो सकता.” औरंगजेब पुन: स्थितप्रज्ञ.
“लोकशाहीत असंच असतं आता. प्रत्येकाला एक मत. ज्यांना सर्वांत जास्त मतं त्यांचा पंतप्रधान.”
“म्हणजे फक्त मुसलमान मतदान नाही करणार? काफीरसुद्धा मत देणार?”
“होय.”
“आणि हा दिवस तुम्ही सोहळा म्हणून साजरा करणार?”
“होय. तुम्ही भाषण करणार का? भारतातल्या सर्वांत बलशाली सम्राटांत तुमचं नाव येतं.”
“आणि तो शिवा असणार आहे का मंचावर? त्याला गौण स्थानी उभं केलं की तो फार कटकट करतो.”
तेवढ्यात ही चर्चा बघून जीना तिथे आले आणि औरंगजेबाला म्हणाले,
“आलमपनाह, आपण पाकिस्तानच्या स्वातंत्र्यावर भाषण करू शकता.”
“म्हणजे पाकिस्तान नावाचा वेगळा देश स्वतंत्र झाला? मुसलमानांचा?”
“हो!”
“म्हणजे तिथे फक्त मुसलमानच राहणार?”
“नाही, पण...”
“मतदान तरी फक्त मुसलमानच करणार?”
“नाही, पण...”
औरंगजेब तिथून निघून गेला!
गांधीजी मुघल साम्राज्याचा प्रतिनिधी म्हणून निदान शाहजहान तरी तयार होतोय का हे बघायला पुढे निघाले.
शाहजहान त्यांना म्हणाला,
“दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत.”
“म्हणजे?”
“मुमताज भेटली, पण ताजमहाल दिसत नाही ना आता इथून.”
या दोन गोष्टी सोडून त्याला कशातच रस नव्हता. त्याची तरी काय चूक त्यात? त्यानं गांधीजींना दारा शुकोहला विचारायला सांगितलं. आता दारा बादशाह होण्याआधीच त्याचा औरंगजेबानं काटा काढला होता त्यामुळे त्याला सम्राट कसं म्हणता येईल? असा विचार करून गांधीजी जहांगिराकडे गेले, तर तो पठ्ठयाही अनारकली भेटल्यामुळे आनंदात होता. अकबर आता त्यांना काही करू शकत नव्हता! त्यामुळे स्वातंत्र्य म्हणजे अजून काय निराळं हेच त्याला कळत नव्हतं. फक्त ‘माझ्या वडिलांना बोलावलंत तर आमच्या स्वातंत्र्यावर त्यांनी कसं बंधन घातलं होतं ते सगळ्यांना सांगेन’ असं म्हणून त्यानं अकबराचा पत्ता कट केला!
शेवटी एक-एक बादशाह बाद होत गेला आणि गर्दीतून वाट काढत गांधीजी शेवटच्या शहाकडे, म्हणजे बहादूरशहा जफरकडे, जाऊन पोहोचले. त्यानं त्यांचं प्रेमानं स्वागत केलं आणि म्हणाला,
“दो गज जगह यहां भी नहीं मिलती...”
“हेही दिवस जातील.” गांधीजी त्याला समजावू लागले, “हेही दिवस जातील. पण ते जाऊ द्या. तुम्ही फक्त एक भाषण करू शकाल का?”
“बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसी तो न थी...,” बहादूरशहा पुटपुटला.
“पण या मैफिलीसारखी दुसरी कुठे लाभणार आता?” गांधीजींनी हसून त्याला पुन: विनंती केली आणि तो पाघळला, तयार झाला!
गांधीजींना पहिलं यश मिळालं!....
यानंतर अठराव्या शतकाचा प्रतिनिधी म्हणून गांधीजींनी महादजी शिंदे यांना पाचारण केलं. पानिपतानंतर गतवैभव परत मिळवत दिल्लीच्या बादशहाला नाममात्र सत्तेवर ठेवून त्याची गादी चालवणाऱ्या महादजींनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचं एक अभूतपूर्व उदाहरण घालून दिलं आहे ही त्यांची त्यामागे भूमिका होती. पण मग काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार करणाऱ्या अहिल्याबाई होळकरांना का नाही निवडलं असा होळकर कंपूतून प्रश्न आला. शिवाय निबंध, वक्तृत्व आणि वेशभूषा स्पर्धांमुळे अहिल्याबाईच जास्त लोकांना माहिती असतात असंही इतरांचं मत पडलं. ‘शिंदे-होळकर तर पेशव्यांचे सरदार होते, त्यांना राजे म्हणायचंच कशाला?’ असा पेशवे गटाचा सूर होता. तर त्यावर ‘पेशवे म्हणजेही पंतप्रधान, राजे नाहीत काही!’ असं एक उत्तर मिळत होतं. अजूनही अनेक प्रश्न होतेच. पेशवाई वंशपरंपरागत करून आधुनिक राष्ट्रपतींसारखे ‘हेड ऑफ द नेशन’ होऊन बसलेले साताऱ्याचे छत्रपती या साम्राज्याचे अधिपती होते का? की दिल्लीच्या सत्तेला बुडवायचं नाही, फक्त भूभागांवर चौथाईचे आणि रक्षणाचे हक्क मिळवायचे असं धोरण अनुसरल्यामुळे [अ] खरे सर्वेसर्वा अजूनही दिल्लीचे बादशहाच ठरत होते? हे कमी म्हणून खरं राज्य शाहूमुळे साताऱ्याचं मानायचं की ताराबाईमुळे कोल्हापूरचं? बरं, राजारामानंतर कर्तबगारीनं लढलेल्या शूर ताराबाईचं खरं शिवराज्य म्हटलं तर तिला शह देऊन राजसबाईनं आपलंच अपत्य पुढे कोल्हापूरच्या सत्तेवर बसवलं होतं आणि ताराबाईला साताऱ्याला जाऊन ‘साताराबाई’ व्हायला लावलं होतं! मात्र शाहूनंतर साताऱ्याच्या सत्तेवर तिचा नातू म्हणून बसवलेला दुसरा राजाराम हा आपला वंशज नसल्याचं तिनंच कालांतरानं कबूल केलं होतं! असल्या बेबंदशाहीत अडकण्यापेक्षा कधीही पेशवे न झालेले सदाशिवराव भाऊ निवडायचे असं ठरवलं तर राघोबादादांचा त्यांच्या आणि माधवरावांच्याही नावाला विरोध. त्यांच्या मते त्यांच्यामुळे मराठे अटकेपार विजयी ठरले होते त्यामुळे तेच खरे मराठेशाहीचे सर्वोच्च प्रतिनिधी. बरं, या सगळ्यांना डावलून पहिल्या बाजीरावाला निवडावं तर त्याचं असं स्पष्ट म्हणणं होतं की ज्याला स्वत:च्या घरात आणि शहरात स्वातंत्र्य नव्हतं तो त्याच्याबद्दल इतरांना काय सांगणार? गांधीजींनी मग पानिपतावर कुर्बान झालेल्या बाजीरावपुत्र समशेरला विचारू का असा प्रश्न केला, तर नानासाहेब पेशवा रागावून बसला!
गांधीजींसमोर पेचही असा होता की इथे ते मौन पाळू शकत नव्हते की उपोषण करू शकत नव्हते! शेवटी गांधीजी लोकशाही पद्धतीनं या शतकाचा प्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणूक घेतील की काय असं वाटत असतानाच (नाना) फडणवीस यांनी फडणवीस-शिंदे युतीमध्ये आपलं स्थान दुय्यम असल्याचं मान्य करत शिंद्यांना पाठिंबा दिला आणि (महादजी) शिंदे निवडले गेले!
(क्रमश:)
- कुमार जावडेकर
संदर्भः
[अ] Advanced Study in the History of Modern India 1707-1813 - Jaswant Lal Mehta - Google Books (पृष्ठ क्रमांक २००)
प्रतिक्रिया
12 Aug 2025 - 12:21 am | कुमार जावडेकर
या काल्पनिक कथा आहेत, केवळ विनोदासाठी लिहिलेल्या. कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही. दीर्घ खुलासा पहिल्या भागाखाली लिहिला आहे (त्याचा दुवा खाली देत आहे). काही चूक आढळल्यास कृपया क्षमस्व.
- कुमार
विनंती / खुलासा
14 Aug 2025 - 12:44 pm | विजुभाऊ
पहिली गोष्ट मान्य आहे. पण दुसरी गोष्ट अमान्य. लिखाणात विनोद आढळला नाही.( सरकाष्टीक म्हणजे कुजकट पुणेरी की कसा म्हणतात तो देखील नाही)
ही चूक कशी दुरूस्त करणार ते सांगा.
16 Aug 2025 - 12:04 am | कुमार जावडेकर
आपला विनोद आवडला. :)
- कुमार
14 Aug 2025 - 3:04 pm | अमरेंद्र बाहुबली
छान लिहिलय. पहिल्या भागाप्रमाणे हाही भाग आवडला. पुलेशु.
16 Aug 2025 - 12:05 am | कुमार जावडेकर
धन्यवाद अमरेन्द्र!
16 Aug 2025 - 12:48 pm | माहितगार
उत्तम कथा कल्पना, वाचताना मजा आली, अगदी झकास, पुढील अनेक भागांच्या लेखनासाठी शुभेच्छा आणि प्रति़क्षा