बालकथा
डच बालकथा ४ - नीनाची सकाळ
डच बालकथा ३ - कोंबडी आणि पिल्लू
डच बालकथा - २ - एक होती अळी
डच बालकथा - हत्ती आणि मासोळी
एका शेतातल्या वाडीवर यान कुत्रा आणि त्याचे कुटुंब रहात असे. त्याची नि त्याच्या छोट्याशा पिलाची, नीनाची ही गोष्ट.
कुकूSSSSचकूSSS! कोंबड्याने बांग दिली. पा उठला. अगदी हळूच, पावलांचाही आवाज होणार नाही याची काळजी घेत तो दाराकडे जाऊ लागला. तरीपण त्याच्या चाहुलीने नीना जागी झालीच!
" कुठे जातोयस तू पा ? " नीनाने विचारले.
" श्श्श्श्श.. ! आता सगळ्यांना जागी करू नको हं नीना. अगं, मी वाडीवर एक फेरफटका मारायला जातोय सहजच. तुला यायचंय का माझ्यासोबत ? " पा ने विचारले.
नीना काय तयारच होती. टुणकन उडी मारून ती पा च्या मागे निघाली.
बाहेर शेतकरीणबाईच्या कामाला सुरुवात झालेली होती. हातात एक चरवी घेऊन ती गोठ्याकडे निघाली होती.
" आता काय करणार ती ? " नीनाने पा ला विचारले.
" चल माझ्यासोबत. मग तुला ती काय करते ते पहाता येईल. " पा उत्साहात म्हणाला.
ते शेतकरीणबाईच्या मागे मागे गोठ्यात गेले. तिथे शेतकरीण गायीजवळ बसलेली दिसली.
" ती तिथे का बसली आहे ? " नीना म्हणाली.
" थांब थोडा वेळ. मग कळेल. " पा म्हणाला.
अचानक चरवीत काहीतरी पडत असल्याचा आवाज आला. कुतुहलाने नीना थोडी पुढे सरकली. शेतकरीण दूध काढत होती. त्यातले काही थेंब नीनाच्या तोंडावरच उडाले. नीनाने ते चाटून बघितले. " म्म्म... काय चविष्ट आहे हे ! "
एवढ्यात बाहेर कसलीशी घरघर मोठ्ठ्या आवाजात ऐकू आली. नीना आणि पा दचकलेच ! नीना तर घाबरून पा च्या कुशीत शिरली.
" ते काय आहे ? " तिने विचारले. " या खिडकीखालच्या कोळशाच्या ढिगावर चढ म्हणजे तुला खिडकीतून ते काय आहे हे बघता येईल. " पा म्हणाला.
एक प्रचंड मोठ्ठा कीटक वाडीवर घिरट्या घालत होता. नीनाला खूप भीती वाटली. ती एवढी घाबरली की त्या ढिगावरून घसरून खालीच पडली. धप्पाक् ! थेट दुधाच्या चरवीवर !!! तिच्या सगळ्या अंगावर दूध सांडलं.
"हा हा हा ! तू अगदी डालमेटीर कुत्र्यासारखी दिसतेय नीना ! " पा हसत म्हणाला. " म्हणजे रे कशी ? " नीनाने विचारले. " म्हणजे तो एक काळे ठिपके असलेला पांढराशुभ्र कुत्रा असतो. तू फक्त पांढरे ठिपके असणारी काळी कुत्री दिसतेयस ! "
बाहेर आल्यावर पा ने सांगितलं की तो घिरघिरणारा किडा नसून ते एक हेलिकॉप्टर आहे. तेवढ्यात त्यांना शेतकरीण हातात एक टोपली घेऊन येताना दिसली.
" आता कुठे जातेय ती पा ? " नीना
" मला माहीत नाही गं. चल आपणही जाऊया तिच्यामागे... " पा म्हणाला.
मग ते कोंबड्यांच्या खुराड्याजवळ आले. तिथे शेतकरीण अंडी गोळा करत होती. ती अंडी घेऊन बाहेर गेल्यावर नीनाने बघितलं, एक अंडं शिल्लक राहिलं होतं.
"पा, ती एक अंडं विसरली. हे बघ.. " असे म्हणून ती थोडी पुढे गेली. च्चप्पक ! अंड्यावर पाय पडून अंडे फुटलेसुद्धा !! ते पण नीनाने चाटले. "म्म्म्म्म.. हे पण मस्त लागतंय रे पा ! " नीना मिटक्या मारत म्हणाली.
आता शेतकरीण पुन्हा बाहेर दिसली. पार कुंपणाच्या पलिकडे चालली होती ती.
" पा, आपण जायचं का तिच्या मागे ? मग आपल्याला ती कुठे जातेय ते कळेल. " नीना एकदम पा सारखं म्हणाली. " गुड आयडिया ! " पा मिश्किलपणे म्हणाला.
शेतकरीण बाहेर असणार्या छोट्या छोट्या लाकडी कपाटांजवळ हळूच काम करत होती. तिने हातात मोजे चढवले होते आणि चेहर्यावर पण जाळीचा रुमाल लपेटला होता.
" वाSSS ! कित्ती सुंदर घरं आहेत ही ! " नीना आनंदाने ओरडली.
" ती मधमाशांची घरं आहेत. फार जवळ जाऊ नको हं त्यांच्या... " पा ने सांगितले.
" का नको जाऊ ? " नीना म्हणाली.
" कारण कोणी आपल्या कामात अडथळा आणलेलं मधमाशांना मुळीच आवडत नाही. " पा ने समजावले.
पण नीना ते ऐकण्यासाठी तिथे थांबलीच नव्हती. शेतकरीण तिथून निघून गेल्याबरोबर नीना त्या घरांजवळ पोहोचली होती.
" मी त्यांना त्रास नाही देत. फक्त गुड डे म्हणून येते " , नीनाने हे ओरडून पा ला सांगितले. ती एका घराजवळ गेली आणि जाळीत नाक खुपसून तिने वास घेतला. " म्म्म.. किती छान वास आहे हा ! किती चान चव असेल याची ! " नीना पा ला सांगण्यासाठी मोठ्याने म्हणाली.
पण त्याच आवाजाने मधमाशांना नीनाचा एवढा राग आला ! सगळ्याजणी नीनाकडे रागाने पाहू लागल्या. आणि अचानक त्यांनी नीनावर हल्लाच केला!
" वाचवा..... !!! " असे म्हणत नीना धुम पळत सुटली. पा पण तिच्या मागे पळाला. दोघांना पण धावल्यामुळे खूप तहान लागली होती. ते नदीजवळ आले. पाणी पिण्यासाठी म्हणून नीना खाली वाकली. पण ते काय आहे ?
" पा, पा, इथे एक कुत्रा आहे पाण्यात." नीना म्हणाली.
" वेडाबाई, तू ओळखत नाहीस का त्या कुत्र्याला ? " पा ने हसत विचारले.
" तपकिरी, पांढरा आणि पिवळा, आणि डोक्यावर काहीतरी विचित्र असलेला हा कुत्रा माझ्या ओळखीचा नाही " नीना
" अगं पुन्हा एकदा नीट बघ पाहू " पा ने सांगितल्याने नीना ने पुन्हा एकदा पाण्यात वाकून पाहिले. आणि धबाक्कन ती पाण्यातच पडली !
" खोडकर मुली, समजलं का आता ? आता मस्तपैकी आंघोळ कर बरं. " पा काठावरून म्हणाला. नीना पण मोठमोठ्याने हसू लागली.
" पण पा, बघ मला पोहोता पण येतय... मस्त नं ? " " तुला पोहोता येतं पा ? " असे नीनाने म्हणताच पा ने पण पाण्यात उडी मारली. मग बराच वेळ ते कमळाच्या वेलींभोवती लपंडाव खेळले.
थोड्या वेळाने ते वाडीवर चालत चालत आले. दोघांना पण खेळल्यामुळे खूप छान वाटत होतं. पण वाडीवर मात्र अजून सगळे झोपलेलेच होते. नीना दमली होती. तिच्या डोळ्यात झोप मावत नव्हती. ती हळूच आईच्या कुशीत शिरली. त्या हालचालीने आई जागी झाली. तिने एक डोळा उघडून नीनाकडे बघितले.
" मी आज शोधलं की दूध आणि अंडी खूप चवदार असतात. आणि हो, मधसुद्धा खूप छान असतो. " नीना झोपाळू आवाजात आईला म्हणाली.
" नीना, तुला नक्कीच एखादं छान स्वप्न पडलेलं दिसतंय ! " आई म्हणाली. " पण पा च्या डोक्याला काय झालंय हे ? " आईने विचारले.
'म्म्म्म .. ते आमचं गुपित आहे. तुला नंतर सांगेन मी !!" असे म्हणत म्हणत नीना झोपलीसुद्धा.
आई मात्र पा च्या डोक्यावर चिकटलेल्या कमळाच्या पानाकडे बघत ते गुपित काय असावं याचा विचार करत होती.
डच बालकथा ३ - कोंबडी आणि पिल्लू
एका शेतावर एक कोंबडी रहायची. छोटंसंच पण एकदम शानदार घर होतं हं तिचं. दिवसभर शेतात किडे मुंग्या शोधायची. इकडेतिकडे सापडलेले दाणे मस्त चवीचवीनं खायची. आणि रात्री आपल्या घरात येऊन आवडीचं काहीतरी करत बसायची. खूप छंद होते कोंबडीला. तिला गायला आवडायचं, तिला विणायला आवडायचं, नवे नवे पदार्थ बनवायला आवडायचं आणि बागकामही आवडायचं. आपल्या घरासमोरच्या अंगणात तिने छान बाग फुलवली होती.
हे एवढे उद्योग असतानाही तिला कधीतरी खूप कंटाळा यायचा. कोणाशी तरी खेळावं, गप्पा माराव्या असं वाटायचं. पण आजूबाजूला कोणी नसायचं. अशा वेळी मग ती आपल्या छोट्याशा गाडीतून फिरायला जायची. लांबच्या दुसर्या शेतात असणार्या मित्रमैत्रिणींना भेटायची आणि परत यायची.
एकदा ती अशीच सर्वांना भेटून परत येत असताना तिला एक छोटीशी भेट मिळाली. एका सुंदर पिशवीत काहीतरी गोल वस्तू होती. कोंबडीला वाटलं की लग्गेच ती पिशवी उघडून बघावी. पण आईने शिकवलेलं आठवलं. सगळ्यांसमोर भेटवस्तू लगेच नाही उघडायची. कधी एकदा घरी जाते आणि ती वस्तू बघते असं झालं तिला. भराभरा ती घरी आली. दार उघडून घरात आली. दाराजवळच्या टेबलावर तिने ती पिशवी अलगद ठेवली नि हळूच उघडली. बघते तर काय... एक पांढरेशुभ्र अंडे होते त्यात !!! " कित्ती मज्जा ! म्हणजे आता या अंड्यातून पिल्लू बाहेर येणार ! आणि आपल्यासोबत राहाणार "!! कोंबडीला खूप खूप आनंद झाला. घरभर नाचली ती अंडे हातात घेऊन !
पण अंड्यातून पिल्लू कसे बाहेर येते, कधी येते हे तिला काही माहीत नव्हतं. विचारणार तरी कोणाला ? सोबत कोणीच नव्हतं. कोंबडीने एक दिवस वाट बघायची ठरवली. सोफ्याजवळच्या एका छोट्याशा खुर्चीत तिने एक मऊ मऊ बिछाना तयार केला. आणि त्यावर ते अंडे ठेवले. दिवसभर ती त्या अंड्याकडे बघत राहिली. पिल्लू काही बाहेर येईना ! मग तिने रात्रभर वाट बघितली. अंड्याजवळच्या सोफ्यावरच येऊन झोपली. सकाळी उठून बघते तर काय अंडे तसेच. मग तिने अजून दोन दिवस वाट बघितली. अंहं... ! पिल्लू बाहेर येईना.
मग कोंबडीने विचार केला आपण पिल्लुला बोलले पाहिजे. ती अंड्याकडे तोंड करून म्हणाली, " पिल्ला, पिल्ला, बाहेर ये. मी तुला छान छान गोष्ट सांगेन. " तिने एक सुंदर गोष्ट सांगितली. पण पिल्लू बाहेर येईना !
आता काय करावं बरं? ह्म्म.. पिल्लाला खाऊ देऊया. असे म्हणत कोंबडी स्वयंपाकघरात गेली. तिने पिल्लूसाठी मस्त नूडल्स बनविल्या. आणि केक सुद्धा बनवला. ते घेऊन ती बाहेर आली. अंड्याकडे बघून म्हणाली, " पिल्ला पिल्ला, बघ मी तुझ्यासाठी काय काय खाऊ आणलाय.. बघ तरी बाहेर येऊन ! " अंहं ! पिल्लू बाहेर येईना ! कोंबडी बिचारी हिरमुसून गेली. " खूपच हट्टी दिसतंय पिल्लू " असं म्हणून बसून राहिली.
थोड्या वेळाने तिला वाटले," किती बाई ही थंडी ! पिल्लूसाठी स्वेटर विणले पाहिजे. " मग काय, चपला घालून गेली बाहेर. मेंढीकडून लोकर घेऊन आली. आणि कपाटातल्या विणकामाच्या सुया घेऊन लागली कामाला. मस्त स्वेटर तयार झाले ! ते घेऊन अंड्याजवळ जाऊन म्हणाली, ' पिल्लू..बघ किति छान स्वेटर आहे हे. चल ये आता बाहेर, घालून बघ पाहू.. " पण अंडे थोडेसुद्धा हलले नाही.
अचानक कोंबडीला वाटले, अरेच्चा, आपल्या लक्षातच आली नाही एक गोष्ट. पाणी कुठं घातलंय आपण अंड्याला ??? लगोलग ती घरातून एक कुदळ फावडे घेऊन आली. बागेत एक छोटासा खड्डा खणला. त्यात अंडे ठेवले नि वरून झारीने पाणी घातले. एक दिवस गेला, दोन गेले, तिसर्या दिवशी पण अंडे तस्सेच !
कोंबडीला त्या अंड्याचा खूप राग आला. आणि पिल्लू बाहेर येत नाही म्हणून खूप वाईटही वाटले. तिला खूप रडू येत होते. अंड्याच्या समोर बसून ती खूप खूप रडली. इतकी रडली की आता तिचे डोके दुखू लागले. तिने अंडे उचलले. आणि आपल्या बिछान्यावर ठेवले. जेवली नाही, कपडे बदलले नाहीत. तशीच पांघरूण घेऊन झोपून गेली. खूप खूप थकली होती ती. अंडे पण तिच्या पांघरुणातच होते.
सकाळी कोणाच्या तरी गोड आवाजाने तिला जाग आली. कोंबडीने डोक्यावरचे पांघरूण काढून पाहिले. समोर चक्क अंड्यातून नुकतेच बाहेर आलेले पिल्लू तिला हाका मारत होते. " सुप्रभात आई, तू कशी आहेस ? मला भूक लागली गं. कधी उठणार तू ? " कोंबडीला आभाळाएवढा आनंद झाला. अखेर तिला पिल्लू भेटले होते. 
डच बालकथा - २ - एक होती अळी
एक अळी होती. कुरूप, बुटकी नि लठ्ठ. तिला ना हात होते ना पाय. टिंबाएवढे मिचमिचे डोळे होते फक्त. दिवसभर इकडे तिकडे आपले अंग ओढत कशीबशी सरपटत रहायची. झाडाची पाने कुरतडून कुरतडून खात रहायची. ही अळी खूप भित्री होती. कोणाची चाहूल जरी लागली तरी अंग चोरून घेत एखादया पानामागे लपून बसायची. तिला वेगात पळता सुद्धा येत नसे. पण या अळीच्या डोळ्यात कुतूहल मात्र अपार होते. समोर येणारी प्रत्येक गोष्ट ती निरखून बघायची. जगात किती वेगवेगळ्या, सुंदर सुंदर गोष्टी आहेत असे तिला सारखे वाटायचे. आणि मग स्वतःची कुरूपता बघून तिला अजूनच वाईट वाटायचे.
एकदा अळीला एक गोगलगाय दिसली. तिच्यासारखीच हळुहळू चालली होती. अळीला वाटले, अरे! ही पण माझ्यासारखीच की! पण जेव्हा गोगलगाय जवळ आली तेव्हा तिला दिसले. गोगलगायीच्या पाठीवर तिचे सुंदर घर होते! आणि तिला दोन सुंदर शिंगंसुद्धा होती. वार्याची एक मोठी झुळूक आली नि गोगलगाय अलगद पाठीवरच्या घरात गुडुप झाली!! अळी आश्चर्याने बघतच बसली. या थंडगार वार्याने तिलाही थंडी वाजत होती पण तिला नव्हते असे सुंदर घर...
रात्री देवबाप्पाशी बोलताना ती म्हणाली, "मला कधी मिळणार असे सुंदर घर??" "बाळा, थोडी वाट बघावी..." देवबाप्पा म्हणाला. अळी तशीच थंडीत कुडकुडत झोपून गेली.
सकाळ झाली. मस्त सोनेरी उन्हे पसरली होती. अळी खूष होती. नवा दिवस दिसला की ती अशीच आनंदी असायची. अचानक तिच्या टिंबुल्या डोळ्यांपुढे काहीतरी सुंदर चमकले. बघते तर काय? एक कोळी किडा भराभर जाळे विणत होता. त्या जाळ्याचे चमचमणारे धागे दवबिंदू अडकून अजूनच सुंदर दिसत होते. अळी कुतुहलाने पुढे गेली. एवढयात तो कोळी तिच्यावर वस्सकन ओरडला, "ए सुरवंटा, दूर हो, दूर हो.. दिसत नाही मी इथे जाळे विणतोय ते....!!!" बिचारी अळी! हिरमुसून मागे सरकली. पण तिला थोडा आनंदही झाला. तिला तिचे नाव कळाले होते. "सुरवंट".
सुरवंट रात्री बाप्पाला म्हणाला, "मला निदान जाळे विणायला तरी शिकव की..." "अरे बाळा, थोडा धीर धर रे. योग्य वेळ आली की सगळे काही मिळेल." बाप्पा म्हणाला. सुरवंटाने विचारले, "पण म्हणजे कधी ???" बाप्पाने काहीच उत्तर दिले नाही. सुरवंट हिरमुसून झोपी गेला.
सकाळी कसलीशी लगबग ऐकू आली म्हणून सुरवंटाने मान वर करून बघितले. समोर मुंग्यांची भलीमोठी रांग गाणी गात चालली होती. प्रत्येक मुंगीच्या हातात मोठ्ठा साखरेचा दाणा होता. सगळ्या मुंग्या पावसाळ्यात खाण्यासाठी म्हणून आपापल्या घरात अन्नाचा साठा करून ठेवण्यात मग्न होत्या. सुरवंटाला परत एकदा वाईट वाटले. त्याला फक्त झाडाची पानेच कुरतडून खाता येत असत. आणि मुंग्यांसारखे मोठ्ठा किल्ला असलेले घरही नव्हते त्याला.
आपल्याला असं काहीच का मिळत नाही याचे सुरवंटाला खूप दु:ख झाले. जयबाप्पाचा रागही आला. त्याने ठरवले. जयबाप्पाशी कट्टी करायची! खूप रडू यायला लागले. रडत रडत तो झोपून गेला.
केव्हातरी मधेच जाग आली. त्याला जाणवले की कुणीतरी आपल्या अंगावर मस्त मऊमऊ पांघरूण घातले आहे. त्या रेशमी पांघरूणात झोपायला त्याला एवढे छान वाटले! वाटले की कधी उठूच नये... निघूच नये या पांघरुणाच्या बाहेर. अजून झोपही येत होती. आता अजून गाढ झोप लागली. किती वेळ झोपला तो ते बाप्पालाच माहीत! सूर्य आला नि गेला सुद्धा... चांदोबा आला नि झोपलेल्या सुरवंटाला हळूच हाक मारून गेला.
सुरवंटाने डोळे उघडले. खूप वेळ झोपल्यामुळी अंग अगदी आंबून गेले होते. त्याला खूप आळोखेपिळोखे द्यावे वाटत होते... आणि हात-पाय उगवल्याने देताही येत होते!! यिप्पी... आनंदाने त्याने आपले नवे हातपाय ताणून दिले. तर काय?? अंगाभोवतालचे पांघरूण गळून पडले. सकाळच्या लख्ख उन्हात त्याला पहिल्यांदाच आपले सुंदर पंख दिसले. निळे निळे पंख नि त्यावर पांढरी पिवळी नक्षी ! कोळीकिड्याच्या जाळ्यापेक्षाही मऊमऊ... मस्त टोकदार मिशापण आल्या होत्या की! गोगलगायीपेक्षा ऐटबाज! त्याने अलगद पंख हलवले. आता तर हवेत उडता येत होते त्याला!! किती भिरभिर उडता येते पंखांमुळे! सगळ्या मुंग्या खालून त्याच्याकडे बघत ओरडू लागल्या, "ते बघा... बघा... किती सुंदर फुलपाखरू!!!"
फुलपाखराला खूप खूप आनंद झाला. सगळी फुले, किडे, मुंग्या, गोगलगाय त्याच्याकडे कौतुकाने बघत होते. त्याच्या आनंदात सामील झाले होते.
माझे पोहणे
आता यात काय लिहायचे असे वाटेल तुम्हाला...पोहता येत नसेल तर क्लास लावायचा आणि हात पाय मारताना थोडेफार नाका-तोंडात पाणी जाऊन काही काळाने पोहायला जमते..
खरं तर हीच प्रक्रिया आहे...पण...
मला आत्तापर्यंत पोहता येत नव्हते...म्हणजे आता येते अशातला भाग नाही पण आताशा मी पाण्याला घाबरून काठावर उभी राहत नाही एवढंच..मला पाण्याची फार्फारच भीती वाटत आलीये...अजूनही वाटते...अंघोळ करताना डोक्यावरून जास्त पाणी घेतलं तरी एकदम धबधब्याखाली आले असं वाटून डोळे उघडून कितीतरी वेळा साबण डोळ्यात गेला असेल... पाण्यात कायम मगर, सुसर आणि शार्क असतातच असं मला आपलं वाटायचं, आणि डोळे बंद करून पोहायचं म्हणजे संकटच....आला समजा शार्क नाहीतर मगर तर डोळे बंद केल्यावर कसं कळणार? आणि डोळे उघडे ठेवले तर डोळ्यात पाणी जाऊन डोळे चुरचुरतात त्यामुळे उगाच पोहायच्या भानगडीत पडले नाही कधी...माझ्या पोहायच्या विरुद्ध असायला जन्मदात्रीचे वेगळेच कारण होते...पुलात पोहून पोहून मी काळी पडले तर माझ्याशी लग्न कोण करणार?
खूप लहान असताना मांडवगणच्या गीतेच्या क्लासच्या सहलीला पंढरपूरला गेले होते तेव्हा चंद्रभागेत बरेच लोक उतरले, ते उतरले म्हणून मी पण...आणि ५ एक वर्षाची असतानाच विठ्ठलाला भेटायला जायची वेळ आली होती...तेव्हापासून मी देवापासून दोन हात लांबच राहते.
लग्न झाल्यावर नवऱ्याला एकदा हौसेने म्हंटल मला पोहायला शिकव तर याने मला पुलात नेलं आणि माझं डोकं पाण्यात दाबून धरलं...काय तर म्हणे अशाने भीती जाते...जीव गेल्यावर भीती कशाची?
तर कालेजात पोहण्याचा क्लास होता तो करू का नको करत घेतला...नाव नोंदवायच्या आधी कोचला सांगितलं कि मी आत्तापर्यंत मुद्दामहून कधीही पाण्यात गेलेले नाही..
आता मुंबईत पावसाळ्यात आमच्या गल्लीत ५-५ फुट पाणी जमायचे आणि त्यातून मी अनेकदा गेले आहे हे तिला सांगायची गरज नव्हती म्हणून नाही सांगितलं ...आणि त्या
पाण्यात इतके लोक ये-जा करीत असतात कि बुडू म्हंटल तरी बुडायचे नाही...असो,
तर ब्याक टु माझं पोहणं...तर मी कोचला सांगितल्यावर ती म्हणाली हा क्लास बिगीनरसाठीच आहे...म्हंटल चांगलं आहे ...सगळे आपल्याचसारखे असतील त्यामुळे फजितीचा प्रश्न
फारसा नाही...पहिल्या दिवशी पहिले तर मी आणि अजून एक दोन मुलं सोडली तर बाकीचे लोक छान पोहत होते...मी पायरीजवळच्या पाण्यात उभी कारण त्यापुढे जायची हिम्मत होत नव्हती...पूल प्रचंड मोठा आहे...३ १/२ फुटापासून ८ फुटापर्यंत खोल आणि साधारण २५-३० फुट लांब एवढा मोठा आहे.. ४.५ फुटावर एक मोठा दोर मध्यावर बांधला
कोच आल्यावर आधी वॉर्मअप म्हणून पाण्यात धावायला लावले...त्याने अंगात उष्णता निर्माण होऊन पाणी तेवढे गार वाटत नाही...
मी कधीच २ फुटाच्या वर गेले नसल्याने आजूबाजूला लोक आहेत आणि कालेजवाले आपल्याला मरू देणार नाहीत हे जाणवल्याने मीसुद्धा पाण्यात धावायचा प्रयत्न केला....आणि साधारण ४.५ ते ५ फुटापर्यंत गेल्यावर प्रचंड भीती वाटली आणि तोल जायला लागला...म्हंटल आता मी बुडणार...लगेच जवळच असणाऱ्याचा भसकन हात धरला आणि पाणी कमरेखाली आल्यावर गुपचूप कडेला जाऊन उभी राहिले....
माझी हि अवस्था पाहून थोडेसे बेसिक शिकवल्यावर बेल्ट लावायला दिला...मी बुडू नये म्हणून ...तर त्या बेल्टने मला काही पाय खाली ठेवता येईना आणि धड पोहताही येईना...एकदम त्रिशंकू होऊन गेले...दोनतीन वेळा तर ३.५ फुट खोल पाण्यातच गटांगळ्या खाल्ल्या...क्लास संपल्यावर दुसरा एक कोच जो थोड्या वरच्या लेवलला शिकवायचा त्याने काही टिप्स द्यायचा प्रयत्न केला...
" असं श्वास घेऊन खाली जायचं आणि हळूहळू श्वास सोडायचा "
मी श्वास घेऊन खाली गेले आणि फुस्कन सगळा श्वास सोडला आणि भसकन पाणी नाका तोंडात...
"घरी बादलीत पाणी घेऊन त्यात सराव कर"
"बरं" असं सांगून केला नाही तो नाहीच... शेवटी विद्यार्थी असण्याचा पुरावा नको का?
आणि काय यड्यासारख बादलीत तोंड घालून बसायचं ...त्यापेक्षा पुलात बुडलेल परवडेल हासुद्धा एक विचार होताच...
सारखंसारखं बुडून वैताग आला शेवटी मी म्हंटल आता या बाईचं ऐकलं पाहिजे...म्हणतीये अंग सैल सोडून श्वास धरून डोक घाल पाण्याखाली तर घालावं....काही मरेपर्यंत बुडू द्यायची नाही...शेवटी तिचेही रेप्युटेशन आहेच नाही का? थोडा श्वास धरून डोक घातलं पाण्याखाली आणि कसलासा फोमचा बोर्ड धरून पाय मारायला लागले ....काय आश्चर्य २ एक फुट तरी पोहता आले असेल...मग काय महाराजा !!!...भीती झाली ना कमी...मग एकदम जन्मजात कोळीण असल्यासारखं पोहायचा प्रयत्न करायला लागले...डोकं फार काळ पाण्याखाली ठेवायची हिम्मत अजूनही होत नव्हती पण बर्यापैकी बेल्ट न लावता जमायला लागलं...बऱ्याच जणांनी मी इतका मनापासून प्रयत्न करताना पाहून मदत केली, कौतुक केलं...आमच्या पोहायच्या बाईंनी तर दुसरा वर्ग चालू होईपर्यंत सराव करण्याची मुभा दिली...हळू हळू जमायला लागले आणि दोनचार स्ट्रोक सुद्धा जमायला लागले...
आता तर पाण्याची भीती बऱ्यापैकी कमी होऊन थोडफार पोहता येतं...काहीही झाले तरी पाय जमिनीवरच ठेवायचे हे मी लहानपणापासूनच ठरवले असल्याने इथेही उगाच फार खोल मी शिरत नाही आणि पाय जमिनीवर टेकतील इतपर्यंतच जाते...तरी हेही नसे थोडके.
डच बालकथा - हत्ती आणि मासोळी
एक होतं जंगल. त्या जंगलात एक हत्ती रहायचा. दिवसभर त्या जंगलात खेळत रहायचा. भूक लागली की झाडावरची फळं खायचा आणि तळं, तलाव, झरा असे जिथे सापडेल तिथले पाणी प्यायचा. हत्तीची जंगलात सगळ्यांशी मैत्री होती. तो सर्वाना मदत करायचा. त्यामुळे सर्वांचा आवडता होता.
एके दिवशी तो असाच जंगलात फिरत होता. फिरता फिरता तो जंगलाच्या दुसर्या टोकाला गेला. त्याला खूप खूप तहान लागली होती. म्हणून तो पाणी शोधू लागला. उन्हाळ्यामुळे बहुतेक सर्व ठिकाणचे पाणी आटले होते. काही ठिकाणी नुसताच चिखल राहिला होता तर काही तळ्यांचे डबक्यात रुपांतर झाले होते. खूप शोधल्यानंतर हत्तीला अखेर एक जागा सापडली. तिथे खड्ड्यात पाणी दिसले. हत्तीने त्यात आपली सोंड बुडविली. आणि फुर्रर्रर्र करून पाणी पिऊ लागला. एक मिनिटात सगळे पाणीच संपले ! सगळे पाणी हत्तीने पिऊन टाकले होते ! " अरेच्चा ! पाणी संपले सुद्धा ! " हत्ती मनात म्हणाला. तेवढयात त्याला सोंडेच्या टोकावर काहीतरी वळवळ जाणवली....बघतो तर काय....एक छोटीशी मासोळी पाण्यातून बाहेर पडल्यामुळे तडफडत होती. अगदी सोंडेच्या टोकावर ! हत्तीने पाहिले. मासोळीला म्हणाला " हाय, कशी आहेस ? " मासोळीला हत्तीचा खूप राग आला होता. तिचे सगळे पाणी त्याने संपवले होते नं.. " काय रे हत्तीदादा, एवढा मोठा झालास तू तरी तुला काही कळत नाही ! माझे पाणी संपवलेस. आता मी कुठे राहू ? पाण्याबाहेर तर मी जगूच शकत नाही. तुझ्यामुळे मी आता मरून जाणार ! दुष्ट आहेस तू ! " असे मासोळी खूप रागारागाने बोलली. हत्तीला खूप वाईट वाटले.आपली चूक त्याला समजली. पण त्याने मुद्दाम पाणी संपवले नव्हते. तो म्हणाला," अगं मासोळी, चुकून संपलं गं पाणी! मी तुला दुसरे पाणी शोधून देतो. चल आपण शोधूया.. "
मासोळी म्हणाली," तू खरंच मला मदत करशील ? " " हो गं हो. नक्की करेन" हत्ती म्हणाला. मग ते दोघे पाणी शोधत शोधत फिरू लागले. पाणी काही सापडेना. मासोळीची तडफड खूपच वाढू लागली. हत्तीला खूप वाईट वाटले. आपल्यामुळे मासोळीला त्रास होतो आहे हे बघून त्याला रडू आले. दोन्ही डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. टप टप पाणी जमिनीवर पडले. तो म्हणाला, " आता काय करायचं? " पाणी बघून मासोळीने टुण्णकन त्यात उडी मारली. आणि ती म्हणाली, "हत्तीदादा, हे पाणी मला थोडावेळ पुरेल. तू दुसरे पाणी शोधून ये तोवर मी इथेच थांबते. " हत्तीला गंमतच वाटली. तो पाणी शोधायला एकटाच निघून गेला.
तिथेच जवळ एका चिखलाच्या डबक्यात एक मगर होती. ती हे सगळे दुरून बघत होती. मासोळीला एकटी सोडून हत्ती निघून गेल्याचे तिने पाहिले. मासोळी बघून तिच्या तोंडाला पाणी सुटले. आज आयतीच मेजवानी मिळणार म्हणून ती खूष झाली. दबक्या पावलांनी मासोळीच्या मागे गेली नि एका घासात तिने मासोळीला गट्टम् केले ! हत्ती परत आला तर तिथे मासोळीच नाही. "आता काय करायचं?" पण तिथल्या झाडावरच्या एका धीवर पक्षाने हत्तीच्या कानात सगळे सांगितले. हत्तीला मगरीचा एवढा राग आला.. त्याने तिला उचलले नि झाडावर उलटे टांगले ! मगरीला खूप भीती वाटली. ती हत्तीला तिला झाडावरून खाली उतरवण्यासाठी विनवू लागली. हत्ती म्हणाला, " आधी ती गिळून टाकलेली मासोळी बाहेर टाक मग मी तुला खाली उतरवतो." मगरीपुढे काही पर्यायच नव्हता. तिने मासोळी खाली टाकली.
मासोळी हत्तीला म्हणाली, " तुला बघून आत्ता कुठं माझ्या जिवात जीव आला ! आता सोड बरं मला पाण्यात ! " हत्तीचे तोंड एवढुसे झाले. त्याला अजून पाणी कुठे सापडले होते ! तो म्हणाला" मी पटकन येतो. तू इथेच माझी वाट बघ." आणि तो पाणी शोधायला निघाला. इकडे झाडावरच्या धीवर पक्षाने एक झडप मारली नि मासोळीला चोचीत उचलले. पिल्लांना खाऊ मिळाला या आनंदात तो घरट्याकडे निघाला. समोर हत्ती उभा ! त्याने आपल्या सोंडेत धीवराचे घरटेच पकडले होते. त्यात धीवराची पिल्लं घाबरून ओरडत होती. धीवराला आपली चूक समजली. त्याने मासोळीला अलगद खाली ठेवले. हत्तीनेही मग घरटे जागेवर ठेवले.
त्याने मासोळीला उचलले आणि सापडलेल्या छोट्याश्या तळ्याकडे निघाला. मासोळीला ते तळे पाहून खूप आनंद झाला. तिच्या आधीच्या घरापेक्षा इथे थोडे जास्त पाणी होते. हत्तीने तिला पाण्यात सोडताच सुळसुळ पोहत ती आनंदात गिरक्या घेऊ लागली. ते बघून हत्तीला खूप खूप आनंद झाला. अखेर त्याने मासोळीला वाचवले होते !
उन्हात फिरून फिरून हत्ती खूप थकला होता. आणि त्याला खूप तहान लागली होती. त्याने समोरच्याच पाण्यात आपली सोंड बुडविली. आणि तो ढसाढसा पाणी पिऊ लागला. दोन मिनिटात तळयातले पाणीच संपले !!!! त्या तळ्यात तर खूप खूप मासोळ्या राहात होत्या. सगळ्याच्या सगळ्या हत्तीकडे रागारागाने पाहू लागल्या. हत्तीने मात्र डोक्याला हात लावला ! आता काय करायचं???
( विरंगुळा म्हणून या डच बालकथेचा अनुवाद केला आहे. बघा तुम्हालाही आवडते का कथा... ! )
कापुसकोंड्याची गोष्ट....... म्हणजे नक्की कोणती गोष्ट
.... लहानपणी आपल्यातल्या बहुतेक सगळ्यांनीच हि गोष्ट ऐकली असेल....
... जेंव्हा गोष्ट ऐकायची इच्छा व्हायची आणि घरातल्या कोणत्या तरी मामा कडे (कारण असल्या गोष्टी सांगण्यात मामा लोकांचाच उत्साह जास्त असतो) गोष्टीची फर्माईश व्हायची...तेंव्हा मामा सुरू व्हायचा...
....कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का?.....मग ते पुढलं कधिही न संपणारं गुर्हाळ चालु व्हायचं...
मामा : कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का?....
मी : सांग...
मामा : सांग काय म्हणतीस्....कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का?
मी : सांग ना रे मामा...
मामा : मी : सांग ना रे मामा...काय म्हणतीस? .कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का?
...........
.........
......
.. हे संपायचच नाही....
.....मला खरच जाणुन घ्यायची इच्छा आहे...कि कोण आहे हा कापुसकोंड्या...आणि...काय आहे त्याची ती गोष्ट?
......मि.पा.वर कोणाला माहिती असेल तर क्रुपा (हे कसं नीट लिहायचं ते ही सांगा) करा माझ्यावर..
.....नाहीतर पिंडाला कावळा शिवणार नाही हो माझ्या.....!
ससा, सुसर आणि ससाणा
आणखी एक मिपाप निती कथा.
पुर्वी इसापाने जंगलमधले प्राणी पाहून इसाप निती कथा लिहील्या. मिपा नावाच्या ह्या तळ्यात किंवा मळ्यात (काय म्हणायच ते म्हणा) अनेक चित्रविचित्र प्राणी आहेत. स्वभावाप्रमाणे नावे वापरून जरी ते वावरायचा आव आणीत असले, तरी पुष्कळदा निळा रंग धूवून निघाल्यानंतर खरा कोल्हा उघडा पडला, तसेही होत असते.
हे प्राणी अवलोकन करीत अनेक साधु-महात्मे, नाना अवलिया ह्या जंगलात स्वैर फिरत असतात.
जंगलातील एका तळ्यात बुडी मारली तेव्हा, अशाच एका महान पुरुषा (ओह. सॉरी. सत् लावायला विसरलो) बरोबर खालील संवाद होण्याचे भाग्य प्रप्त झाले.
>>>>>>सुसर- काही माशांना मारता यावे म्हणुन सुसरी सशांशी दोस्ती करतात.<<<
>>>ससा- क्या बात है नाना! ससा आणि सुसर एक नवीन मिपाप निती कथा बनवू चला. कथाके लिये साला कुछभी करेंगा. ससुरा ससा सुसरसेभी सांस लेना सिखेंगा!<<<
इसापाने एकट्यानेच सगळ्या कथा लिहील्या होत्या. आपण मिपा तळ्या भोवती बसून सुसरीची सुरस कथा बनवू या कां?
तर जंगल् वासी, जलचर, निशाचरांनो (निशाचर- अमेरिकेत रहाणारे) प्रतिसादांमधून ही मिपाप निती कथा पुढे न्या. प्रत्येक प्राणी फक्त मागच्या प्रतिसादामधून कथा पुढे नेईल. खून खराबा, दंगा-मस्ती, छुरीयां चलाना सब चलेगा. पण कृपया कथे पुरतेच ठेवा. वैयक्तिक आवडनिवड, गुण-दोष ह्यांची चर्चा नको. म्हणजेच, दुसर् या शब्दात, कोल्ह्याचा निळा रंग धुवू नका.
बाकी संपादकांची फलटण समर्थ आहेच म्हणा. (अवांतर- नाहीतरी इतक्या प्रचंड संख्येत असलेल्या संपादकांना काही काम नको का?
)
चलो ह्हो ज्जाये!
मिपाप निती कथा- २
ससा सुसर आणि ससाणा-
एका निबीड अरण्यात एक विशाल तळे होते. तळे इतके खोल होते, की मी मी म्हणणार् यांना तळाचा थांगपता लागत नसे. एक विनयशील, हळूवार वगैरे असणारा ससा तळ्याच्या काठावर बसून खूप असुयेने आत खोलवर पोहणार् या जलचरांकडे बघत बसायचा. पण आत उडी घ्यायची त्याला फार भिती वाटायची. कारण बरेचदा, पाण्यावर खळबळ माजलेली त्याने पाहिली होती. त्यावेळेस पाणी शांत व्हायचे तेव्हा रक्ताळलेले मासांचे तुकडे आणि त्यावर तुटून पडलेले छोटे मोठे मासे त्याने पाहिले होते.
असाच एकदा तो बसला असतांना एक सुसर तेथे आली.......
बालकविता - मोठ्यांचे ऐका
एक होती मासोळी, सुळसुळ पोहतसे जळी
चमचम मऊ पोट करी,वर्ख मिरवे सोनेरी ||१||
आई तिची सांगे तिला,जपून नेहमी रहायाला
जळात असे गळ टाकूनी,दुष्ट माणूस किनार्यावरी ||२||
मासोळी होती उचापती,भारी होती करामती
तमा आईच्या बोलांची,नसे करीतसे कधीच ती ||३||
शिंपल्यातल्या मोत्यांशी, इतर सुंदर माशांशी
लव्हाळांशी बेडकांशी, मस्ती करावी मनमुरादशी ||४||
सुळसुळत पळत सुटावे,आईचे कोणी ऐकावे
आईने धपाटले तर्,मुळ्ळी फुगा करुन बसावे ||५||
मग एका काळ्या दिवशी, जाळ्यात सापडे मासोळी
कोळी तिला पकडून न्याहाळी, त्यालाही मग दया येई ||६||
इतकी सुंदर जलराणीसम, मासोळी ही सोनेरी जर
दिला नजराणा मी राजाला,मिळेल भरपूर द्रव्य मजला ||७||
राजा ठेवतसे संग्रही, चमचमणारी बाळ मासोळी
मासोळी मात्र लागे झुरणी,आईबाबा मित्र आठवुनी ||८||
मासोळी बाळास उशीराने गोष्ट कळे, आईचे नेहेमी ऐकावे
आई सांगे कळकळीने, बाळासाठी तिचे हृदय तळमळे ||९||
मोठे सांगती गोष्ट हीताची, ऐकावे त्यांचे ही रीत जगाची
म्हणून मुलांनो आईबाबांचे ऐका,धोक्यापासून लांब रहा ||१०||
महिन्याचे वाढदिवस
आपल्याकडे लहान बाळाचे - दर महिन्याला (एक वर्षापर्यंत) वाढदिवस साजरे करण्याची प्रथा आहे.
दर महिन्याला वेगवेगळे पदार्थ करुन हे साजरे केले जातात, हे पदार्थ बाळाची वाढ-दर्शवणारे असतात.
उदा: १ महिना -घावन / धिरडे, महिना २ - जिलेबी / कडबोळी - रिंगण घातल्यावर / गोल फिरल्यावर
महिना ३ - करंजी (कुशीवर झाल्यावर)
असे आणि या पुढील वाढदिवस कसे साजरे केले जातात याविषयी माहिती हवी आहे !
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
महाराष्ट्र राज्य स्थापनेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या पूर्वसंध्येस महाराष्ट्र स्थापनेच्या मुहुर्तापासून आज हयात असलेल्या/नसलेल्या कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन स्फुर्तिदायी मराठी व्यक्तींची नावे येथे प्रतिसादांमधे लिहीत हा धागा मोठा करूया.
त्या व्यक्ती महाराष्ट्रस्थापनेच्या आधी जन्माला आल्या असल्या तरी हरकत नाही. फक्त त्यांचा ठसा मराठी मनावर राहीलेला असला पाहीजे.
शक्यतो या कुठल्याच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक वेळेस (प्रतिसादात) नको.
व्यक्ती स्फुर्तिदायी असणे महत्वाचे, ती खूपच प्रसिद्ध नसली पण काम स्थानिक पातळीपासून अगदी आंतर्राष्ट्रीय पातळीवर कुठेही असले ज्याने समाजात फरक पडला असेल तर हवी.
सगळ्या क्षेत्रातील व्यक्ती याव्यात अशी इच्छा.
त्या मधे कुठेही क्रमांक लावायचा नाही, तर जे मनापासून स्फुर्तीदायी वाटले त्यांची यादी करायची इतकाच उद्देश.
धन्यवाद

