स्त्रीत्वाचे शीलहरण!
स्त्रीत्वाचे शीलहरण!
स्त्रियाच करिती परस्परांचे
शीलचारित्र्य हनन मस्त
मातृत्वाचे वस्त्र फाडणे
त्यांच्या लेखी दिसते स्वस्त
तारतम्य अन विवेकाचे
उरत नसते त्यांना भान
कुस्करती मग एकमेकींचा
स्त्रीयाच स्त्रीत्वाचा सन्मान
बघुनी नागड्या नालस्तीला
बीभत्सतेला येते ग्लानी
निती, सभ्यता, मानवताही
वितळून होती पाणी पाणी
कशी लिहावी पुढली कडवी
शब्दवीणा तर झाली विन्मुख
विन्मुखतेचे सांत्वन करण्या
अभय लेखणी यावी सन्मुख