अभय-लेखन

दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
25 Mar 2013 - 3:27 pm

                        दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे

तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला
तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे

कुणालाच नव्हती खबरबात काही, कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला
तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे, स्वत:ला विसरणे वगैरे वगैरे

अभय-गझलअभय-लेखनमराठी गझलकवितागझल

माय मराठीचे श्लोक...!! (ध्वनीफ़ित)

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
28 Feb 2013 - 10:30 am

माय मराठीचे श्लोक...!!

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष "हर हर महादेव" झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

अभय-लेखनमराठीचे श्लोककविताभाषामराठीचे श्लोक

पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
15 Feb 2013 - 10:08 am

पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

कोण जाणे कोणासंग टाका भिडून व्हता...।
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥

जवा पाय कसाबचे मुंबईमंधी पडले
“लालदिवा” वाले तमाम घरामंधी दडले
तवा म्हणान माहा पारा असा काही चढला
दोन ढूशे मारून त्याले तोंडबुचक्या पाडला
पायापोटी तवा कसाब माह्या पडत व्हता... ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥

अभय-लेखनहास्यकवितानागपुरी तडकाकविता

गहाणात ७/१२.....

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
13 Feb 2013 - 10:16 am

गहाणात ७/१२.....

गहाणात हा सातबारा वगैरे
तरी वाढतो शेतसारा वगैरे

कुठे राहिली आज ही गाय माझी?
घरी खात नाहीच चारा वगैरे

रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला
हवी काय खुर्ची, निवारा वगैरे?

मला अन्य काहीच पर्याय नाही
करावाच लागेल ’मारा’ वगैरे

बढाई असूदे तुझी तूजपाशी
कुणी ना इथे ऐकणारा वगैरे

कशाला अशी सांग दर्पोक्तवाणी?
तुला कोण येथे भिणारा वगैरे?

खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला
खरा तोच असतो पिणारा वगैरे

कधी झोप मोडेल सुस्तावल्यांची?
किती वाजवावा नगारा वगैरे

अभय-गझलअभय-लेखनमराठी गझलवाङ्मयकवितागझल