दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे
किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे
तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे
तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला
तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे
कुणालाच नव्हती खबरबात काही, कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला
तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे, स्वत:ला विसरणे वगैरे वगैरे
अनासक्त मी! हे तिला मानवेना, कसे डाव लटकेच खेळायची ती
वृथा आळ घेणे, मनस्ताप देणे, रुजूवात करणे वगैरे वगैरे
कधी द्यायची ती दुटप्पी दुजोरा, मुळी थांग पत्ता मनाचा न येई
मला पेच हा की पुढे काय होणे! मनाशी कचरणे वगैरे वगैरे
मुसळधार होती तुझी प्रेमवर्षा, किती चिंबलो ते कळालेच नाही
जणू थेंब प्रत्येक मकरंद धारा, मधाचे पखरणें वगैरे वगैरे
तुझी ठेव अस्पर्श तू रक्षिलेली, मिळाली मला; ते ठसे आज ताजे
स्मरे त्या क्षणांचे मदोन्मत्त होणे, कराग्रे विहरणे वगैरे वगैरे
"अभय" एक युक्ती तुला सांगतो मी, करावे खरे प्रेम मातीवरी या
भुई संग जगणे, भुई संग मरणे, भुई संग झरणे वगैरे वगैरे
- गंगाधर मुटे "अभय"
--------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
25 Mar 2013 - 3:36 pm | नानबा
गझल मस्त... विशेषतः
प्रचंड आवडेश...
25 Mar 2013 - 3:42 pm | मनराव
छान
25 Mar 2013 - 3:43 pm | स्पंदना
मस्त ! मस्त!
25 Mar 2013 - 3:46 pm | बॅटमॅन
वाह!!!!!!
कितीदा असे काव्य हे वाचताना, मनाची अहा लागली पूर्ण तंद्री
कसे शब्द ते देखणे-आशयो ही, सवे वृत्त आहे वगैरे वगैरे!!! :)
25 Mar 2013 - 4:13 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्तच... भन्नाट!!
क्या बात!! व्वाह!!!
25 Mar 2013 - 4:20 pm | मदनबाण
मुसळधार होती तुझी प्रेमवर्षा, किती चिंबलो ते कळालेच नाही
जणू थेंब प्रत्येक मकरंद धारा, मधाचे पखरणें वगैरे वगैरे
खल्लास ! :)
25 Mar 2013 - 4:34 pm | शुचि
सुरेख!!
25 Mar 2013 - 5:32 pm | अक्षया
+ १
25 Mar 2013 - 5:38 pm | परिकथेतील राजकुमार
आज बर्याच दिवसांनी मिपावरती आलो आणि पहिला हाच धागा उघडला.
अप्रतिमच !
हे खासच !!
26 Mar 2013 - 7:20 pm | पिलीयन रायडर
फारच सुंदर...!!
25 Mar 2013 - 5:46 pm | श्री गावसेना प्रमुख
सगळी कडे कोरडी जमीन्,दुष्काळ दिसतोय,
अन इथे बघतोय तर मधच मध टपकतय
मुटे साहेब काय चाललय हे,
26 Mar 2013 - 6:51 pm | गंगाधर मुटे
अहो, दुष्काळाला काय प्रेमाचे वावडे असते?
लाखो शेतकर्यांनी आत्महत्त्या केल्यात; पण म्हणून काही प्रेमाची चंदेरी/रंगेली दुनिया थोडीफार तरी थबकली काय?
25 Mar 2013 - 6:12 pm | राही
कविता खूपच आवडली, पण..
भुईसंग जगणे असो ते खरेही,परी मृण्मयीची आस होती खरे ना?
मृदेचीच काया,मृदेचीच माया, कसा स्वप्नभंग? वगैरे वगैरे...
26 Mar 2013 - 6:56 pm | गंगाधर मुटे
भुईसंग जगणे असो ते खरेही,परी मृण्मयीची आस होती खरे ना?
मृदेचीच काया,मृदेचीच माया, कसा स्वप्नभंग? वगैरे वगैरे...
थोडयाशाने व्रूत्त गंडले ना!
आशय/प्रश्न चांगला आहे. :)
25 Mar 2013 - 7:19 pm | रेवती
वाह! फार सुरेख कविता.
25 Mar 2013 - 7:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा. लै भारी.
-दिलीप बिरुटे
25 Mar 2013 - 7:46 pm | प्रचेतस
वाह!!!
काय सुरेख ग़ज़ल लिहिलीय.
25 Mar 2013 - 7:48 pm | लॉरी टांगटूंगकर
शब्द नाहीत किती आवडली ते सांगायला..
25 Mar 2013 - 7:50 pm | पैसा
सुरेख कविता!
25 Mar 2013 - 7:51 pm | दादा कोंडके
खणखणीत गझल!
25 Mar 2013 - 8:01 pm | अत्रुप्त आत्मा
25 Mar 2013 - 8:37 pm | आदूबाळ
झकास!
25 Mar 2013 - 8:46 pm | अभ्या..
अभयराव. मस्तच हो एकदम.
अग्दी कौतुक, टाळ्या, स्टॅण्डींग ओव्हेशन वगैरे वगैरे.
25 Mar 2013 - 9:00 pm | जेनी...
मस्त मस्त मस्त !!!!!! :)
झक्कासच मुटे काका :)
25 Mar 2013 - 9:28 pm | प्यारे१
कातिल गजल!
26 Mar 2013 - 5:18 pm | गंगाधर मुटे
सर्व प्रतिसाद दात्यांना रामराम, नमस्कार, जयहिंद, जयभीम, सलाम वालेकूम, सुप्रभात/सुदुपार/शुभरात्री, मनपूर्वक आभार, धन्यवाद ..... वगैरे वगैरे! :)
26 Mar 2013 - 7:11 pm | अनुप कुलकर्णी
म हा न!
26 Mar 2013 - 7:17 pm | सुमीत भातखंडे
.
26 Mar 2013 - 7:42 pm | मालोजीराव
वाह वाह ! क्या बात
थोड्या सारख्या ओळी वाटल्या म्हणून टाकतोय…
27 Mar 2013 - 11:33 am | जयवी
एकदम रोमँटिक .........वगैरे वगैरे :)
27 Mar 2013 - 12:54 pm | गंगाधर मुटे
जयवीतै,
मी आजवर एकही प्रेम विषयाला अनुसरून एकही प्रेमकाव्य लिहिलेलं नव्हतं. कारण शृंगार हा माझ्या लेखनीचा ना तर विषय आहे नाही लेखणीचे उद्दीष्ट.
मात्र गझल लिहायची पण गझलेचा मुळ केंद्रबिंदू असलेला "प्रेम" हा विषय सोडूनच द्यायचा म्हटले तर माझ्यातल्या गझलकाराला ते पचणीही पडत नव्हतं. शृंगार हा विषय मला वर्ज्य असला तरी माझ्यातल्या गझलकारावर तसे बंधन लादणे, मला फारसे संयुक्तित वाटले नाही.
जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट मुडमध्ये जातो, तेव्हा आपल्याला नकोसं/नावडीचं असलं तरीही बरंच काही सुचत राहतं; एखादवेळ चक्क काही शब्द लयबद्ध होऊन ओठावर रेंगाळायला लागतात. माझा एक अनुभव असाही आहे की, एकदा दादा कोंडकेंनी स्वतः लिहिलेलं एक द्वीअर्थी फिल्मी गीत गुणगुणतांना त्यासोबतच त्यापुढे माझ्या तोंडातून काही ओळी उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्या होत्या. त्या ओळी माझ्यामते तरी दादा कोंडकेंच्या ओळीपेक्षा जास्त दर्जेदार, कसदार आणि श्रवणीय होत्या. मात्र त्या ओळी अर्थातच द्वीअर्थी व किंचितश्या अश्लिलतेकडे झुकणार्या होत्या... आणि मी.. स्वतःच स्वतःविषयी काही स्टेटस/मर्यादा/बंधने राखणारा असल्याने मला त्या माझ्याच ऑळी स्विकारता आल्या नाहीत. त्या ओळींच्या दफणविधीचा कार्यक्रम त्याच क्षणी तिथेच पार पडला. :(
मात्र मला त्याच क्षणी जाणीव झाली की आपण आपल्यातल्या कवीवर/गीतकारावर एक मोठा अत्याचार/अन्याय केलेला आहे. मी आणि माझ्यातल्या कवी या दोन वेगवेगळ्या आणि स्वतंत्र अभिव्यक्ती आहेत, याचीही जाणीव झाली. :)
त्या दिवशी अचानक त्या ओळी सुचत गेल्या आणि मतला बनत गेला. यावेळेस मी माझ्यातल्या गझलकाराला अजिबात अटकाव केला नाही. त्याला दिलोजानसे सहकार्य केले आणि त्यातूनच ही गझल साकारली.
ही गझल सफल झाली आहे. शृंगार हा विषय घेऊन चांगल्या रचना माझ्या हातून रचल्या जाऊ शकतील याचा अदमास आलेला आहे; मात्र तरीही यापुढे एकट-दुकट प्रसंग वगळता या विषयावर कौशल्य दाखविण्याची स्वैर अनुमती मी माझ्या लेखणीला देणार नाही. माझ्यासोबत जगायचे तर माझ्या लेखणीला माझ्या आवडीचेच विषय हाताळावे लागतील. एका ध्येयपूर्ण उद्देशासाठीच जगावे लागेल आणि त्यात शृंगाररसाला फारसे स्थान नाही. :)
तुम्हाला सुद्धा यानंतर एकदम रोमँटिक वगैरे वगैरे रचना माझ्याकडून वाचायला मिळण्याची शक्यता धूसर आहे कारण शृंगार हा माझा विषय नाही. :)
27 Mar 2013 - 5:52 pm | जयवी
गंगाधरजी.... तुम्ही म्हणताय ते पटतंय असं वाटतंय :)
पटलं असं न म्हणता पटतंय असं वाटतंय असं म्हणतेय कारण तुम्ही जसं म्हणताय की शृंगार तुमचा प्रांत नाही तसं मी म्हणेन की माझा प्रांत शृंगार रसच आहे ;) हल्ली हल्ली जरा वेगळं लिहायचा प्रयत्न सुरु केलाय. एकेकाचा पिंड असतो पण दुसर्या प्रांतात डोकवायचंच नाही असं नसतं ना.... म्हणून तुम्ही जशी तुमच्या लेखणीला सुट देताय तशीच थोडीफार मी पण त्या प्रयत्नात आहे :)
31 Mar 2013 - 8:28 am | यशोधरा
मुटेसाहेब, 'वगैरे वगैरे' हा वैभवचा गाजलेला रदीफ आहे. त्याला त्याचे योग्य क्रेडीट पोचवायला एखादी ओळ ह्या प्रतिसादात आली असती तर चालू शकलं असतं. :)
31 Mar 2013 - 2:47 pm | गंगाधर मुटे
यशोधराजी,
वैभव जोशींनी गझलेत वापरलेला रदीफ "वगैरे वगैरे" असा नसून "वगैरे" असा आहे. त्यांच्या त्या गझलेचा मक्ता पहा.
पुन्हा घेतली मी भरारी वगैरे
पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे
जिथपर्यंत गझल आणि गझलकारांचा प्रश्न आहे; रदीफ, काफिया किंवा गझलेतील कल्पना पुन्हा वापरल्या तरी कुणी कुणाला श्रेय देत नाहीत. "तरही गझलसाठी" तर जुन्या गझलेतील चक्क संपूर्ण ओळच वापरली जाते. तसे करण्यासाठी मुळ गझलकाराची अनुमती घेणे किंवा निदान त्याला तशी कल्पना देणेसुद्धा आवश्यक मानले जात नाही.
मी गझल लिहायला लागलो त्याला अजून तीन वर्ष व्हायची आहेत. सुरूवातीला हा प्रकार जेव्हा मला माहीत झाला तेव्हा मी गझलकारांना हे गैर आहे, असे म्हणालो तर उपस्थित सर्वच माझ्यावर तुटून पडलेत. आंतरजालावरील नावाजलेला एकही गझलकार माझ्या बाजूने उभा राहीला नाही. उलट असे करणे म्हणजे "आमचा अधीकार" अशाच अविर्भावात माझ्याशी वागलेत.
असो, मी व्यक्तिगत पातळीवर तुमच्याशी "ज्याचे त्याला योग्य क्रेडीट देणे" या मताशी सहमत आहे.
वैभव जोशींनी गझलेत वापरलेला रदीफ "वगैरे वगैरे" असा नाहीच. त्यामुळे या गझलेत तसा प्रश्न उद्भवतच नाही.
पण जेव्हा मी "वगैरे" हा रदीफ घेऊन गझल लिहिली तेव्हा प्रतिसादात नव्हे तर मुळ गझलेच्या खालीच तशी नोंद केली होती. :)
बघा.
http://www.misalpav.com/node/23921
http://www.baliraja.com/node/444
---------------------------------------------
31 Mar 2013 - 2:49 pm | यशोधरा
रदीफ, काफिया किंवा गझलेतील कल्पना पुन्हा वापरल्या तरी कुणी कुणाला श्रेय देत नाहीत. "तरही गझलसाठी" तर जुन्या गझलेतील चक्क संपूर्ण ओळच वापरली जाते. तसे करण्यासाठी मुळ गझलकाराची अनुमती घेणे किंवा निदान त्याला तशी कल्पना देणेसुद्धा आवश्यक मानले जात नाही.
हो? बरं :)
31 Mar 2013 - 3:00 pm | गंगाधर मुटे
कृपया मक्ता ऐवजी मतला असे वाचावे.
31 Mar 2013 - 8:31 am | यशोधरा
रदीफ नाही, काफिया. स्वसंपादन येत नाही आणि गझलीचे व्याकरण फारसे कळत नाही, पण मुद्दा हा की वैभवचे क्रेडीट त्याला जरुर मिळायला हवे. :)
31 Mar 2013 - 2:58 pm | गंगाधर मुटे
यशोधराजी,
तुम्ही सदर गझलेविषयी काहीच बोलल्या नाहीत.
लहानमुलांना उगीचच खोटीनाटी का होईना पण जराशी शाबासकी दिली, पाठीवर प्रेमाने कौतुकाची थाप दिली आणि मग हळूच कान उपटलेत की ते कान उपटने जास्त प्रभावी ठरत असते. :)
31 Mar 2013 - 3:08 pm | यशोधरा
मी खरं लिहिलं तर आपल्याला आवडणार नाही आणि खोटी वाह वाह मला जमणार नाही. राग नसावा. काही मनापासून आवडले तर लिहितेच त्या त्या वेळी तसे.
31 Mar 2013 - 3:37 pm | गंगाधर मुटे
नाही आवडले तर त्यात काय विशेष आहे? :)
उलट कुणी जर लेखनाची दुसरी बाजू दाखविली तर ते लेखन सुधारण्यासाठी फायद्याचेच असते.
मात्र कधीकधी त्यावर विनाकारण चर्चा वाढत जाते, हेही खरेच. त्यामुळे वादग्रस्त मुद्दे टाळणेही कधीकधी फायद्याचेच असते.
(मी सहज विनोद साधायचा प्रयत्न केला होता. बाकी काही नाही. :))
31 Mar 2013 - 3:41 pm | गंगाधर मुटे
मी :) स्मित करून नंतर ) कंस पूर्ण केला.
त्यामुळे ती स्मित वाली बाहूली गडबडा लोळतेय. भलताच विनोद झाला. :)
31 Mar 2013 - 3:44 pm | यशोधरा
काहीच विशेष नाही. :) हल्ली तसेही कोणत्याच गोष्टीत विशेष नसते, आणि मला गझलेमधले खूप काही समजतही नाही, तेह्वा मी काय सांगूही शकत नाही, पण वैभवसारख्या जाणकाराकडे खरच शिकायचे असेल तर जरुर गझल न्या. :)
>>वादग्रस्त मुद्दे टाळणेही >> म्हणजे योग्य क्रेडिट द्यावे वगैरे असले मुद्दे ना? खरे आहे, ते सोयीचे नसतातच कधीही.
सोडून द्या झाले. :)
27 Mar 2013 - 12:42 pm | तिमा
मराठीतली 'चुपके चुपके' च जणु.
29 Mar 2013 - 2:19 pm | श्रिया
अप्रतिम! खूप आवडली!
29 Mar 2013 - 2:49 pm | मूकवाचक
अप्रतिम कविता
31 Mar 2013 - 3:42 pm | एस
कसला दुपट्टा अन् कसलं ते प्रेम
सुखांच्या क्षणांची रोजचीच गेम
अन् म्हणे तुमचं अन् आमचं असतंय शेम
अवांतर - प्रेमबिम करायला बंदी घातली पाहिजे.
31 Mar 2013 - 3:49 pm | प्रीत-मोहर
मस्त!!!!
1 Apr 2013 - 8:43 am | इन्दुसुता
गझल अतिशय आवडली.
यशोधरा यांच्या मुद्द्याशी असहमत.
1 Apr 2013 - 12:32 pm | बॅटमॅन
इंदुसुता यांच्याशी सहमत. यशोधरा यांचा आग्रह अंमळ अस्थानी वाटला. आमच्या वाल्गुदभारतात पंडित कवींच्या श्लोकांची नक्कल आम्हीही केलीच होती, तेव्हा कुणीच काही बोलले नव्हते, मग गझलेने काय घोडं मारलंय?
1 Apr 2013 - 12:42 pm | यशोधरा
बॅटमनसाहेब, करा की नक्कल :) फक्त योग्य ते क्रेडिट द्या इतकेच माझे म्हणणे आहे. तेही चुकीचे आहे का?
तुम्ही म्हणताय ना की नक्कल केली से, की नाकारताय? :)
1 Apr 2013 - 12:46 pm | बॅटमॅन
पहिल्यांदाच मी म्हटले की नक्कल केली आहे, तर परत या प्रश्नाचे प्रयोजन काय?
बाकी क्रेडिट देणे ओके आहे, पण मी माझे काव्य सर्वथैव वरिजिनल, औट ऑफ द ब्ल्यू आहे असा क्लेम तरी कुठे करतोय? लोक ते काव्य वाचून म्हणाले की पंडित कवींची मशिनरी बरी वापरलीये, त्याला मी होच म्हटले आहे. नाकारण्याचा प्रश्न येतच नै. पण मजा अशी आहे, की क्रेडिट द्यायचे तरी कुणाकुणाला? कवी म्हटला की बर्याच गोष्टी इतरांकडून तो उसन्या घेतच असतो. उल्लेख करायचा तरी कुणाकुणाचा. असो.
1 Apr 2013 - 12:52 pm | यशोधरा
>परत या प्रश्नाचे प्रयोजन काय? >> माझा मुद्दा समजावण्यासाठी :)
>>पण मी माझे काव्य सर्वथैव वरिजिनल, औट ऑफ द ब्ल्यू आहे असा क्लेम तरी कुठे करतोय? >> मी असे कुठेच म्हटलेले नाही :) किंबहुना सुचवलेले नाही, रादर आत्तापरेंत असा विचारही केला नाही.
माझे तितकेच म्हणणे आहे की मग, की क्रेडिट द्या. :)
जर कोणाकडून मूळ कल्पना उसनी घेत असू, तर क्रेडिट देण्याने काही कमी तर होत नाही ना? तर जिथे उल्लेख आवश्यक आहे तिथे करावा असे मला वाटते. माझेही असो. :)
1 Apr 2013 - 9:27 am | गंगाधर मुटे
नमस्कार मित्रहो,
आपले सर्व प्रतिसाद मी येथे संकलीत केलेले आहेत. :)
-----------------------------------------------------------------------------------------
8 Apr 2013 - 7:31 pm | आगाऊ म्हादया......
जम्लिय!!! आवडलीय..