मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जागतिक महिला दिन विशेष कविता: 'अक्षरांचे पंख'

श्वेता२४ ·
लेखनविषय:
अक्षरांचे पंख होऊनी परकी मला मी प्रश्न आज विचारते बेहिशेबी जीवनाचा ताळमेळच मांडते का कला साहित्य सारे ठेविले वेशीवरी अन् कुणाची पत्नी होऊन माप हे ओलांडते त्या नळाचे गीत सोबत ताल साधे भाकरी तान्हुल्याचा गोड चेहरा चंद्र म्हणूनी पाहते चांदण्यांचे शब्दमोती विखुरले दारी सडा कल्पना सारूनीही घर लख्ख माझे झाडते सोडुनी मज अन्य सर्वांना इथे प्राधान्य पण मीच मजला उचलूनी मग अग्रस्थानी ठेवते! अक्षरांचे पंख मजला हार का मग मानू मी? घेउनी स्वप्ने आभाळी मुक्त मी झेपावते...!! — श्वेता माईणकर सूर्यवंशी © 2026

स्वप्नजा!

राघव ·
लेखनविषय:
काव्यरस
बऱ्याच दिवसांनी एक रोमँटिक कविता झाली!! :-) कोण तू, माझी कुणी आहेस का? स्वप्नजा.. जागेपणी आहेस का? त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी.. ब्रह्मकमळाची सखी आहेस का? चाल नुपुरांची किती अलवार.. नाजुक! चालुनी येते खरी आहेस का? राग छेडी तार हृदयाचीच माझ्या.. अजुनी तू "रागा"वली आहेस का? काल मज दिसलीस तू होती म्हणूनी.. आज वाटे, तू उद्या आहेस का? --- का तुझा मी शोध घेतो पण, निरंतर? सर्वस्व माझे व्यापुनी आहेस का? राघव [१९ जुलै २३]

उडून गंध चालल्या...

Deepak Pawar ·
लेखनविषय:
उडून गंध चालल्या फुलास वाटते तसे कसे सुने - सुने उदास वाटते. कधी वसंत येईल, बहरेन मी पुन्हा झडून पान चालल्या तरुस वाटते. पवन तुला करीत स्पर्श जातसे अता दरवळला चहूकडे सुवास वाटते. कशास जन्म हा जगून काढला इथे उगाच का असे - तसे मनास वाटते. निघून चाललीस तू इथून ज्या क्षणी तिथेच संपला असे प्रवास वाटते. दीपक पवार.

भरु आज पेला ( गटारी स्पेशल)

किरण कुमार ·
लेखनविषय:
काव्यरस
मला ते विचारी भरु आज पेला तसा मी म्हणालो कशाला कशाला विजय कासवाचा पुन्हा का असावा कशी झोप येते भिणा-या सशाला तिला बोलण्याचे खरे टाळले मी उगा दोष देतो रिकाम्या खिशाला जरा दोन घटका चला घोट घेवू किती चांदण्या या विचारु निशेला जरासे पिल्याने कुठे काय होते किती थंड वाटे बिचा-या घशाला - किरण कुमार

नको पुन्हा एकदा

सागरसाथी ·
लेखनविषय:
नको आता वेदनांचे प्रमाण पुन्हा एकदा नको आता आनंदाला उधाण पुन्हा एकदा नको ग्रीष्मात सोनेरी क्षणाची सावली नको आता सुखाचे विधान पुन्हा एकदा. हरवून गेले ओळखीचे रस्ते संभ्रमामध्ये नको आता ते आयुष्याचे भान पुन्हा एकदा. डंख होतो पुन्हा पुन्हा स्वप्नांच्या इंगळीचा नको आता निद्रेला अवताण पुन्हा एकदा. देवा तुच धर हात माझा या मावळतीला झालो आहे बालकासम अजाण पुन्हा एकदा.

वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली!

सत्यजित... ·
लेखनविषय:
पावसाची सर जशी बरसून गेली वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली! गुणगुणत होतीस का तू गझल माझी? एक कोकीळा इथे गावून गेली!

गाण्यास पावसाच्या...

सत्यजित... ·
गाण्यास पावसाच्या झोकात चाल दे थेंबास ओघळाया हलकेच गाल दे! नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे!

तू ठरव...

सत्यजित... ·
लेखनविषय:
तू ठरव,आहे कसा मी,मी कसा नाही हात घे हातात आधी,आरसा नाही! टाळता आलाच तर,टाळू जरा तोटा फायदा नात्यात आता फारसा नाही! एवढा केला खुबीने खूनही माझा वारही केला असा जो वारसा नाही! सांगतो आहे जगाला कोण हा वेडा! मी असा नाही असा नाही असा नाही! कैफियत माझी जरा ऐकून तर घे ना एवढीही या मनाला लालसा नाही! तू ठरव...आहे कसा मी,मी कसा नाही... —सत्यजित

हसण्या उसंत नाही

कौस्तुभ भोसले ·
लेखनविषय:
हसण्या उसंत नाही रडण्यास अंत नाही. निळे सावळे जगणे मजला पसंत नाही. बहरली जरी झाडे हा तो वसंत नाही. दिले टाकुन जरी तू मी नाशवंत नाही. सांगुन थकलो मी, पण दुनिया ज्वलंत नाही. -कौस्तुभ शुद्धसती मात्रावृत्त