Howdy मिपाकर्स
आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन?
येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून.
तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे.
आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया!
एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!
तर मंडळी, तुम्हाला माझ्या आधीच्या दोन गुरूंबद्दल संपुर्ण माहिती आहेच तरी इथे उपस्थित माझ्या नवीन शिष्यगणां साठी पुन्हा त्यांच्याबद्दल थोडी माहिती देतो.
माझे पहिले गुरुदेव वैकुंठवासी होऊन आता बराच काळ लोटला आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या "अक्यूमन"च्या दैवी देणगीमुळे माझे दिवसही तसे बरे चालले होते.
त्यांच्या निधनानंतर मला अल्पावधीतच दुसरे गुरुदेव भेटले ज्यांच्याकडून मी "निर्वीचारी विदेहत्व" प्राप्त करण्याची सिद्धी मिळवली.
त्यानंतर मला लाभलेली "अक्यूमन"ची दैवी देणगी आणि "निर्वीचारी विदेहत्व" प्राप्त करण्याची सिद्धी यांची सांगड घालून मी "निर्विचारातून विदेहत्वाकडे" नावाचा एक महान एकपानी ग्रंथ लिहिल्याचेही तुम्हाला आठवत असेल.
(* नवीन शिष्यगणांना त्या विषयीची माहीती इथे मिळेल.)
तर मंडळी याच मी लिहिलेल्या महान ग्रंथामुळे माझी आणि माझ्या दुसऱ्या गुरूंची ताटातूट झाली! आणि त्या दुर्दैवी घटनेमुळे झालेले दुःख मी आजही विसरू शकत नाही.
त्या महान ग्रंथात मी विदेहत्व प्राप्त करण्याच्या साधनेची स्टेप बाय स्टेप दिलेली कृती वाचुन अनेकांनी आपल्या जड, हाडामांसाच्या देहापासून मुक्ती मिळवून कायमस्वरूपी विदेहत्व प्राप्त केले. ईश्वर त्यांचे कल्याण करो!
अजुनही बऱ्याच साधकांना ती साधना करायची दुर्दम्य इच्छा आहे, परंतु पेट्रोलचे भाव काहीच्या काहीच वाढल्याने ते करू शकत नसल्याचे त्यांनी कळवले आहे. ही अमानुष पेट्रोल दरवाढ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने अनावश्यक आणि निरूपयोगी असे पेट्रोलियम मंत्रालय त्वरीत बंद करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
त्यांच्या मागणीचा सहानुभुतीपुर्वक विचार करून त्यांचा “विदेहत्व” प्राप्तीचा मार्ग सुकर करण्याची बुद्धी ईश्वर सरकारला देवो!
- - - - -
तर मंडळी, इतरांना एका क्षणात तात्पुरते निर्विचारी निर्देहत्व प्राप्त करण्याची कला शिकवणारे माझे गुरूदेवही कायमस्वरूपी विदेहत्व प्राप्त करण्याच्या मोहाला बळी पडतील असे मला स्वप्नातही कधी वाटले नव्हते.
माझ्या "निर्विचारातून विदेहत्वाकडे" या महान एकपानी ग्रंथात मी विदेहत्व प्राप्त करण्यासाठी सांगीतलेली काहीशी खर्चीक परंतु सहज कठीण सोपी अशी पेट्रोल पंचमीची साधना स्वत: करण्याचा अविचार माझ्या परमप्रिय दुसऱ्या गुरूदेवांनी केला.
असा अविचार हा महापुरूष करेल याची पुसटशी कल्पनाही मला आधी आली असती तर अवघ्या बिनडोक मानवजातीच्या कल्याणासाठी मी स्वत: लिहीलेला तो महान एकपानी ग्रंथ चंदनाच्या १८८ लाकडांची चिता रचून, त्यावर १८८ लिटर पेट्रोल ओतुन, स्वत:च्या हातांनी माचीसच्या १८८ काड्या एकाचवेळी पेटवुन एक क्षणही विचार न करता बेधडकपणे जाळुन भस्मसात करून टाकला असता!
अरे माझ्या प्राणप्रिय सर्वज्ञानी गुरूदेवांसाठी असला एकच काय १८८ कोटी ग्रंथांची होळी करायलाही मी कचरलो नसतो.
मला माहीत आहे आता तुमच्यापैकी अनेकांना चंदनाची १८८ लाकडे, १८८ लिटर पेट्रोल, माचीसच्या १८८ काड्या आणि १८८ कोटी ग्रंथच का ? हा प्रश्न सतावत असणार तर मग आधी त्याचेही उत्तर देउन टाकतो. नीट लक्ष देउन ऐका!
१८८ क्रमांकाला आमच्या अतिसुक्ष्म पंथीय अध्यात्मात अनन्यसाधारण महत्व आहे.
१८८ या जादुई क्रमांकाची महती आचार्य पापा रणजीत लिखीत “सुक्ष्मातुन अतिसुक्ष्माकडे” या १८८ खंडी सुरस महाग्रंथाच्या १८८ व्या अंतीम खंडांतील १८८ व्या “अतिसुक्ष्म अंकशास्त्र” या अध्यायात १८८ व्या ओवीत मोजून १८८ शब्दांत त्यांनी सांगितली आहे.
१) तेज:पुंज, महाज्ञानी, महापुरूषांच्या नावापुढे १८८ हा क्रमांक आवर्जुन लावावा. तसे केल्यास त्यांची विध्वत्ता चारचौघात विस्मयकारकरीत्या उठून दिसेल. कुठल्याही विद्येतील, शास्त्रातील, कलेतील आणि कुठल्याही विषयावरील वादचर्चेत हा आकडा नावापुढे अभिमानाने मिरवणाऱ्या तेज:पुंज, महाज्ञानी, महापुरूषाचा कुठल्याही विध्वानाकडुन, महापंडीताकडुन पराभव होणे केवळ अशक्य!
त्याचे आणखीही काही फायदे आचार्यांनी वर्णीलेत पण त्यासाठी तुम्ही आचार्य पापा रणजीत लिखीत “सुक्ष्मातुन अतिसुक्ष्माकडे” ग्रंथ वाचण्याचे कष्ट घ्या.
२) कुठल्याही वस्तुंची विल्हेवाट, विनाश, विध्वंस, सत्यानाश बिनबोभाट व उचीत पद्धतीने करावयाचा असल्यास त्या कार्यासाठी लागणारे साहित्य १८८ एककांत असावे त्याने नष्टकार्य सुफळ संपुर्ण होते.
वरील फक्त आणी फक्त दोनच कारणांसाठी १८८ या आकड्याचा वापर करण्याची अनुमती आचार्य पापा रणजीत देतात. त्याव्यतीरीक्त १८८ क्रमांकाचा वापर झाल्यास अनिष्ट परीणाम होउन गुरूकृपा पाठीशी नसेल तर सर्वनाश होतो असा गंभीर इशाराही आचार्यांनी त्यात दिला आहे.
ट्रस्ट मी, अन्य ठिकाणी १८८ क्रमांकाचा वापर झाल्यास त्याचे होणारे भीषण परीणाम मी स्वत: भोगले आहेत, केवळ गुरूकृपेमुळे बचावलो, अन्यथा सर्वनाश अटळ होता! ते अनुभवकथन पुढे येईलच!
तर काय सांगत होतो मी?
हां, माझ्या "निर्विचारातून विदेहत्वाकडे" या महान एकपानी ग्रंथात मी विदेहत्व प्राप्त करण्यासाठी सांगीतलेली काहीशी खर्चीक परंतु सहज कठीण सोपी अशी पेट्रोल पंचमीची साधना स्वत: करण्याचा अविचार माझ्या परमप्रिय दुसऱ्या गुरूदेवांनी मला, म्हणजे त्यांच्या पट्टशिष्याला देखील अंधारात ठेऊन केला.
नियतीने डाव साधला आणि जे घडायला नको होते तेच घडले! मंडळी, माझ्या, तुमच्या, आपल्या सर्वांच्या परमप्रिय सर्वज्ञानी गुरूदेवांना विदेहत्व प्राप्त होउन ते आकस्मिकपणे अंतर्धान पावले आहेत.
मला कल्पना आहे, कल्पनाच काय पक्की खात्रीच आहे की हे सर्व ऐकुन तुम्हाला तीव्र मानसीक धक्का बसला असणार! अतीव दु:खाने तुमचं मन कासावीस झाले असणार जसे माझे झाले होते!
पण थांबा. भावनेच्या भरात वहावत जाऊन “परत या…..परत या…. गुरूदेव तुम्ही परत या” असल्या निरर्थक घोषणा द्यायला सुरवात करू नका.
ट्रस्ट मी! माझ्यावर विश्वास ठेवा, परीस्थीती तेवढी निराशाजनक नाहीये. गुरूदेवांना विदेहत्व प्राप्त झाले असले तरी ते आपल्या सर्वांपासुन कींचीतही दुर गेले नाहीयेत.
अहो जन्मजात सिद्धपुरूष आहेत ते, असंख्य सिद्धी प्राप्त आहेत त्यांना! त्यातलीच परकाया प्रवेशाची सिद्धी वापरून नव्या रूपात, त्यांची ओळख बदलून गुप्तपणे ते आपल्या सर्वांच्यात आजही वावरत आहेत.
मी हे इतक्या ठामपणे कसे काय सांगु शकतो ते पुढे तुमच्या लक्षात येईलच! तोवर थोडी कळ काढा.
काय बरे सांगत होतो मी,
हां तर दुसरे गुरूदेव अचानक गायब झाल्याच्या दु:खातिरेकाने मी पार वेडापिसा झालो होतो. त्यावेळी आश्रमातल्या माझ्या खाजगी पर्णकुटीत माझी सेवा करण्यासाठी माझ्या जवळ असलेली बुसाबा ही माझी पट्टशिष्या तेवढी माझ्या त्या दु:खी कष्टी अवस्थेची एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे.
बुसाबा मोठी गोड छोकरी आहे.
आचार्य पापा रणजीत यांच्या कामाठीपुऱ्यातील आश्रमात उमेदवारी करतानाच्या काळात तिथल्या काही साधक सवंगड्यांबरोबर मी वरचेवर मसाज करवून घेण्यासाठी बॅंकॅाकला जात असे. तिथे मला ही बुसाबा भेटली. मला मसाज करता करता माझ्या दिव्य ज्ञानतेजाने प्रभावीत होउन ही थायलंडची वेडी पोर माझ्या प्रेमातच पडली!
त्यानंतर भारतात परतल्यावर काही नतद्रष्ट लोकांनी तक्रार करून मला आणि माझ्या सवंगड्यांना अंमली पदार्थांच्या सेवन प्रकरणात अडकवल्याने माझी रवानगी तुरूंगात झाली आणी माझा पासपोर्ट जप्त झाला.
मला सांगा समाधी अवस्था लवकर प्राप्त व्हावी यासाठी आम्ही होतकरू साधक चरस, गांजा, एल.एस.डी. एम. डी. ए. कोकेन सारख्या निरूपद्रवी पदार्थांचे सेवन करत होतो तर त्यावर सरकारला आक्षेप असण्याचे कारणच काय?
आम्ही सज्ञान आहोत, स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरीक आहोत मग आम्हाला आमच्या मनाप्रमाणे का वागु देत नाही सरकार?
अरे ही लोकशाही आहे की झोटींगशाही?
तुरूंगात असताना मन उद्धीग्न करणारे असे अनेक प्रश्न मला पडायचे पण त्यांची मला हवी तशी उत्तरे मिळत नव्हती.
काही आठवड्यांत मी जामीनावर सुटून पुन्हा माझ्या आश्रमात परत आलो. केसचा निकाल लागेपर्यंत माझा पासपोर्ट मला मिळणार नव्हता त्यामुळे मी बॅंकॅाकला बुसाबाकडे जाउ शकत नव्हतो. हे समजल्यावर ती वेडी पोर माझी सेवा करण्यासाठी कायमसाठी भारतात येउन माझ्या आश्रमात दाखल झाली.
तर सांगत काय होतो मी ?
हां, ही बुसाबा मोठी गोड छोकरी पण मनानी फारच हळवी आहे. एका रम्य सकाळी आश्रमातील माझ्या खाजगी पर्णकुटीत बुसाबा तिच्या नाजुक, कोमल हातांनी माझा मसाज करत असताना विकुशाने गुरूदेवांच्या गायब होण्याची सविस्तर बातमी मला फोनवर दिली आणि तुम्हाला सांगतो अशी घाणेरडी बातमी देणारा हातातला तो फोन मी जमीनीवर जोरात आपटून फोडून टाकला आणि काय केलंत हे गुरूदेवऽऽऽ असा आक्रोश करत बुसाबाच्या गळ्यात पडुन मी धाय मोकलुन रडु लागलो. माझा तो विलाप बघुन हळव्या स्वभावाची बुसाबाही ढसाढसा रडु लागली.
सतत तीन दिवस आणि तीन रात्री मी आणी बुसाबा एकमेकांच्या गळ्यात गळे घालुन रडत होतो.
- - - - -
सर्वज्ञानी गुरूदेव अचानक बेपत्ता झाल्याने बाहेर काय हाहाःकार माजलाय याची मला आणी बुसाबाला रूदन समाधीत रममाण असल्याने काहीच कल्पना नव्हती.
साक्षात सर्वज्ञानी गुरूदेव गायब होणे ही सामान्य बाब नव्हती. अवघ्या काही तासांत दिल्लीपर्यंत या घटनेचे पडसाद उमटले. केंद्राने विचारायच्या आधीच राज्य सरकारने आपला अहंकार गुंडाळून ठेवत ही हाय प्रोफाईल मिसींग केस सी.बी.आय. कडे वर्ग करण्याची तयारी दर्शवली आणि ती तशी केली सुद्धा!
तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. ज्या शेकडो लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते त्यांच्यातला एक होता ऋन्मेष शिक्षीत.
तसं बघीतलं तर माझं आणि या ऋन्मेष शिक्षीतचं काहीच वैर नव्हतं. पण स्वत:ला सर्वज्ञानी गुरूदेवांचा उजवा हात समजणाऱ्या या ऋन्म्याला गुरूदेवांचा उत्तराधिकारी बनण्याची प्रचंड महत्वाकांक्षा होती आणि मला तो त्याच्या वाटेतला काटा समजुन माझ्यावर उगाचच खार खाऊन असायचा.
सत्य काय आहे हे त्यालाही माहीत होते.
गुरूदेवांना पेट्रोल पंचमी खेळण्यासाठीची सगळी तयारी त्यानेच करून दिली होती. इतकेच नव्हे तर शेवटच्या क्षणी काडी पेटवताना गुरूदेवांचे हात थरथरायला लागले तेव्हा अचानक त्यांनी आसनावरून उठुन साधना अर्धवट सोडायला नको या भितीने त्यानेच चार काड्या पेटवुन आग लावली होती हे देखील मला विकुशाने नाव उघड न करण्याच्या अटीवर त्या दिवशी फोनवर सांगितले होते.
या प्रकरणातुन स्वत:ची मान वाचवण्यासाठी आणि मला यांत अडकवून गुरूदेवांच्या “श्वानाजीन” घातलेल्या मानाच्या गादीवर बसण्याचा त्याचा मार्ग निष्कंटक करण्याच्या उद्देशाने त्याने एक कुटील खेळी केली.
चौकशी दरम्यान सी.बी.आय. च्या तपास अधिकाऱ्यांना त्याने सर्वज्ञानी गुरूदेवांच्या बेपत्ता होण्यात माझा हात असल्याचे शपथपत्रावर लिहुन दिले. त्याने माझ्यावर केलेला आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावा म्हणून माझ्या "निर्विचारातून विदेहत्वाकडे" या महान एकपानी ग्रंथाची एक प्रत आणि सर्वज्ञानी गुरूदेवांनी ज्या ठिकाणी पेट्रोल पंचमीची साधना केली होती ती जागा, टायर्स आणि इतर साहित्याचा जळुन खाक झालेला ढिगाराही दाखवला.
झालं, संशयाची सुई माझ्या दिशेने वळली. वरवर पहाता परीस्थीतीजन्य पुरावे माझ्या विरोधात जात होते.
- - - - -
चौथ्या दिवशी सकाळी माझी प्राथमिक चौकशी करून माझ्यावरील आरोपांत काही तथ्य आढळल्यास मला अटक करण्याच्या हेतुने स्थानीक पोलीस आणि सी.बी.आय. च्या तपास अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक माझ्या आश्रमात पोचले.
आश्रमाच्या आवारात घोळक्यांनी माझे शिष्य आणी शिष्या निरूपद्रवी पदार्थांचे सेवन करून निरनीरळ्या लिला करण्यात दंग झालेले बघुन त्या पोलीस आणि सी.बी.आय. च्या तपास अधिकाऱ्यांचे पित्त खवळले आणि मंडळी त्या क्षणापासुन १८८ क्रमांकाची पिडा माझ्यामागे लागली.
भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!
पर्णकुटीतले आम्ही दोघं व बाहेरचे माझे १८६ शिष्यगण, सर्वमिळुन एकुणात १८८ नग त्यावेळी आश्रमात होतो.
करोना काळात एवढ्या मोठ्या संख्येने ते पण मास्क न लावता आश्रमात एकत्र जमल्याचा ठपका ठेउन त्यांनी साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार आम्हा १८८ निष्पाप मनुष्यप्राण्यांवर कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आणी मला गुरूदेवांच्या हत्येचा संशयीत म्हणून अटक करून पुढील चौकशीसाठी पोलीस चौकीत नेले.
क्रमश:
----------
विशेष सूचना (तीच आपली नेहमीची) -
सदर लेखन वाचून खरोखरीच कोणाच्या डोक्याला शॉट लागल्यास लेखकाचा उत्तरदायित्वास नकार लागू :P
अतिविशेष सूचना -
सर्व पात्रे आणि नावे काल्पनिक आहेत. त्यांचा कुठल्याही जिवंत अथवा मृत अथवा पुनर्जन्म झालेल्या व्यक्तींशी संबंध नाही. तरी संबंध अथवा साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
वरील लेखनाचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा उपमर्द करणे नसून निव्वळ मनोरंजनात्मक आहे.
प्रतिक्रिया
17 Jul 2021 - 12:08 pm | सामान्यनागरिक
(गुरु) देव तुमचे रक्षण करो !