user

मदत

विदेशी दिनदर्शिकेसंबंधीत माहिती

आय टी उद्योगच नव्हे तर आजकाल सगळ्याच उद्योगांत काम करतांना बर्‍याचदा पाश्चात्य देशांशी संबंध येत असतो. त्या कारणाने तेथील वेळा, सण वार, सुट्या, राष्ट्रिय सण, समारंभ, स्थानिक सुट्या आदी असल्या तर त्या भारतात राहून समजत नाही. येथे अनेक सदस्य आयटी/ अन्य कारणाने भारताबाहेर वास्तव्यास आहेत. माझी एक विनंती आहे की त्यांनी त्या त्या देशातल्या वर उल्लेखिलेल्या सुट्यांचे वेळापत्रक सरकारतर्फे जाहिर झालेले वेळापत्रक म्हणा किंवा त्याशी संबंधीत संस्थळ किंवा दिनदर्शिका असेल तर ते येथे द्यावे जेणे करून येथील अनेक सदस्यांना त्याचा उपयोग होवू शकेल.
एक नेहमीचा उपयोग म्हणजे एखाद्या सदस्याला जर अमेरीकेचे संयुक्त संस्थानाशी कारभार करायचा असेल अन त्याला समजा त्या देशाचा राष्ट्रिय सण समजा परवा असेल तर तो येथे भारतात जोडून सुट्टी घेवू शकतो. त्याने त्याचे त्या दिवसाचे न केलेले कामाचा दिवस त्याच्या कार्यालयात सत्कारणी लागून कार्यालयाचे व त्याचेही वरखर्च वाचू शकतो.

अवलिया को गुस्सा क्यो आता है ?

काल संध्याकाळी दुकान बंद करायला घेतले आणि तेव्हड्यात फोन वाजला. बघतो तर चौपाटीवरच्या बारच्या म्यानेजरचा फोन.

"हॅलो परा साब जल्दी आओ यार, इधर तुम्हारा दोस्त नाना राडा कर रहा है, वेटर को गालीया दे रहा है "

मी डोक्याला हात लावला आणि चौपाटीकडे धावलो. साला चौपाटीचे रंग रुपच बदलून गेले आहे आजकाल हे जाणवुन गेले. चौपाटी अजुनच झगमगायला लागली होती. ह्यावेळी चौपाटीवर तरुणाईचा उत्साह जाणवण्यागत वाढला होता, एका कडेला मोठा स्क्रीन लावुन त्यावर फुटबॉलच्या मॅचेस दाखवल्या जात होत्या. साला क्राउड एकदम खेचला गेला होता तिकडे. काही जुने चेहरे गायब होते तर काही गायब झालेले जुने चेहरे पुन्हा दिसायला लागले होते. इकडे तिकडे बघता बघता एकदाचा बार मध्ये जाउन पोचलो.

अंधारात नजर सरावली आणि एका कोपर्‍यात विषण्णपणे बसलेला अवलिया दिसला, बाजुलाच आमचा बारचा म्यानेजर देखील बसला होता.

"आओ सेठ, देखो ये क्या लफडा किया. वेटरने सामनेका प्लेट उठाया तो वेटर को गालिया देना लगा. बोलता है "मेरा लेख कायको उडाया?" अब गलतीसे प्लेट उठा लिया वेटरने, इतना गुस्सा कायको करनेका ? सब राडा कर दिया.

"नान्या लेका किती पेग ढोसले ? काय झालय काय तुला?" मी नाना शेजारी बसत म्हणालो. नजर खिडकी बाहेरच्या चौपाटीकडे भिरभिरतच होती.

"आपण चौपाटी सोडुन चाललो आता. आता इकडे मन नाही लागत." नाना शून्यात नजर लावुन बोलला.

"काय नाटके करतो रे नान्या ? असे झाले काय तुला ? साला इतकी वर्षे ह्या चौपाटीवर एकत्र राहिलो, दंगा केला, मजा लुटली आणि तु असा एकदम सोडून जाणार ?"

"आपली गरज नाही राहिली आता चौपाटीला परा. जरा कुठे दुकान उघडले की अतिक्रमणवाले येतात आणि सगळा माल जप्त करुन नेतात. परत का जप्त केला ते पण सांगत नाहीत. दुकान उघडायचीच चोरे झालीये आता मला."

"काय बोलतो नाना ? अरे पण इन्स्पेक्टर पाध्येंशी सेटलमेंट झाली होती ना तुझी ?"

"सोड रे ! साप म्हणावा आपला पण 'अतिक्रमणवाला' म्हणू नये आपला" नाना एका दमात पेग संपवुन मोकळा झाला.

माझी नजर अध्ये मध्ये बाहेरच भिरभिरत होती.

"पर्‍या भाड्या, इकडे लक्ष दे तु ! बाहेर काय फुफाटा शोधतो का आता ?" नाना वैतागला.

"नान्या यार आपला चौपाटीवरचा फुगेवाला दिसत नाही रे आजकाल ? आणि तो धनुष्यबाण विकणारा कुठे गेला?"

"खी खी खी फुगेवाला आजकाल परिस्थीतीने नाडला गेलाय. आता तो गोग्गोड म्हातारीचा कापूस विकतो." नाना डोळे मिचकावत म्हणाला.

"नान्या लेका तुझे येवढे जुने दुकान असुन माल जप्त कसे काय करतात बॉ ? मानसीक रीत्या अल्पवयीन असणार्‍यांची दुकाने धो धो चालतात, मग तुझ्याशी काय प्रॉब्लेम आहे ?"

"काय कळत नाही रे परा. मला म्हणतात की नाना तु चौपाटीचे वातावरण गढुळ करतोस म्हणुन" नाना अंमळ हळवा झाला असावा.

"खी खी खी मग साल्या तु तुरटी का विकायला सुरुवात करत नाही ? ते जाउदे.. तु आता सरळ जप्त न होणारा माल विकायला सुरुवात कर बरं !"

"तो काय असतो ? डिटेलमध्ये बोल."

"चल नान्या तु भी क्या याद करेगा, कागद पेन घे तुला लिस्ट देतो बनवुन !" ह्या माझ्या उच्चाराबरोबर वातावरण निवळल्याचे ओळखुन बारचा म्यानेजर टेबलावरुन ऊठला. "अबे ए, परा साब को एक कागज देनेको बोल ना जल्दी.. और साथ मै पेनभी भेज फटाफट..!" जाता जाता त्याने हुकुम सोडला.

"हा नान्या घे लिहायला..."

मालाचे नाव - मालाचा प्रकार

१) मकर राशीत शिरलेल्या शनीचा आणि कर्केत आलेल्या बुधाचा इतर राशींवर होणारा परिणाम = माहितीपुर्ण लेख.

२) अंतर्वस्त्रांचे बाह्यसौंदर्य = महितीवजा अनुभवकथन.

३) सुई-दोर्‍याशीवाय शर्टाला बटने कशी लावावीत = अनुभव कथन + सल्ला.

४) लवकरच लग्न होणार आहे त्यामुळे काही काळातच बायको जेंव्हा गरोदर होईल तेंव्हा तिला सरकारी दवाखान्यात अ‍ॅडमीट करावे का खाजगी ? आजकाल घरी सुईणी वगैरे येतात का ? ते कितपत सुरक्षीत असते ? = काथ्याकूट + मदत हवी आहे.

५) माझा अमेरीकेतला मित्र आणि त्याच्या बायकोचे पगारावरुन होणारे वाद = अनुभव कथन

६) माझ्या भाच्याने मला मी त्याला एक कागदी नाव करुन दाखवल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ५० कागदी पक्षी, १०० नक्षीकामे कशी करुन दाखवली, आजकालची स्मार्ट पिढी इ. इ. - अनुभवकथन + आस्वाद

७) माझ्या खोलीच्या खिडकीतुन दिसणर्‍या भाजीच्या स्टॉलवरील विविध रंगी आकर्षक भाज्या = कलादालन.

८) माझ्या बाथरुम मध्ये पोपडे उडालेल्या भिंतीवर पाणी पडुन निर्माण झालेले विविध मनमोहक आकार = कलादालन.

९) 'आज सकाळ मध्ये आलेली फलाना-फलाना बातमी' हि कोणी वाचली का ? अजुन किती अधोगती होणार आहे भारताची ??? = काथ्याकूट.

१०) मी संगणकाचा माऊस साफ करायला कसा शिकलो = प्रकटन + अनुभवकथन.

११) "पिपात मेले ओल्या उंदिर " ह्या कडव्यात नक्की कोणते छंद आहेत ? हि गझल आहे का कविता ? = छंदशास्त्र + काथ्याकुट.

१२) शरिराला नक्की अपायकार काय असते ? आत्ममैथुन का हस्तमैथुन ? = मदत हवी आहे.

१३) कुठल्याही चित्रपटाबद्दल १५/२० वाक्ये आणि त्याच्या अध्ये मध्ये ५/१० फोटु = चित्रपट परिक्षण.

"म्हणजे तु करतो तसे ??" नान्याचा हलकटपणा जागृत झाला...

मी काहीएक सडेतोड उत्तर देणारा येवढ्यात माझा फोन वाजला. फोनवरील संभाषण संपताच मी ताडकन उभा राहिलो.

"नान्या चल मी पळतो रे आता.."

"अरे पर्‍या पण लिस्ट अर्धवट राहिली ना. कुठे चालला येवढ्या घाईत ? "

"डोन्रावांचा फोन होता.. दुकानच उडवले म्हणतायत माझे....."

पेट्रोलियम पदार्थांवरिल सरकारी नियंत्रण हटवणे योग्य?

मागच्या आठवड्यातच युपीए सरकारने इंधन दरवाढ केली हे एव्हाना सर्वांना माहिती आहेच.

मात्र याचबरोबर सरकारने एक आणखी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम पदार्थांवरिल सरकारी नियंत्रण हटवण्यात(Deregulation) आलेले आहे. म्हणजे आता आंतरराष्ट्रीय बाजारात ज्याप्रमाणे चढ उतार होतील त्याप्रमाणे पेट्रोलचे दर चढतील/उतरतील. फ्री मार्केट.

डिझेलच्या बाबतीत मात्र सरकारने partial deregulation केले आहे. डिझेलचे दर बाजारभावाच्या जवळपास निश्चित करण्याची मर्यादित स्वायत्तता केंद सरकारच्या मालकीच्या इंधन विक्री कंपन्यांना दिली आहे. पुढील काही महिन्यात डिझेलवरिल सरकारी नियंत्रण पुर्णपणे हटवण्यात येणार आहे.

डॉ. किरीट पारेख समितीच्या शिफारशींना अनुसरुनच हे पाऊल उचलत आहोत असे सरकारने म्हटले आहे. सब्सिडीसाठी सरकारला द्यावे लागणारे किमान २२ हजार कोटी रुपये यांमुळे वाचणार आहेत असे सरकार चे म्हणणे आहे.

नुकतंच सरकारला 3G स्पेक्ट्र्म च्या लिलावातुन जवळजवळ १ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. महागाईचा दर साधारण साडे सोळा टक्के झालाय. असे असताना .. ही दरवाढ करणे गरजेचे होते का ?

तसेच पेट्रोलियम पदार्थांवरिल सरकारी नियंत्रण उठवणे योग्य वाटते का? याचे परिणाम काय होतील ? आता मार्केट नुसार दर बदलणार म्हणजे काय ? ही प्रोसेस कशी आहे? दर दिवसाला दर बदलतील, दर आठवड्याला की आणखी काही? सर्व ऑईल कंपन्यांचे दर समान असतील की त्यातही फरक असेल ?

यापुर्वी कधी पेट्रोलियम पदार्थांवरिल सरकारी नियंत्रण उठवले गेले होते का ? एका मित्राने माहिती दिली की भाजप सरकारच्या काळात असे केले गेले होते. मला याबद्दल माहिती मिळु शकली नाही.

किरीट पारेख समितीच्या शिफारशी नक्की काय होत्या ? त्यांचा रिपोर्ट कुणी वाचलाय का ?

मिपावर प्रसिद्ध कसे व्हावे ?

डीसक्लेमर :-

खालील लेखन हे मौजमजा, विरंगुळा म्हणुन केले आहे. ह्या लेखात व सार्वजनीक जिवनात काही साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा. खालील युक्त्या ह्या गंमत म्हणुन दिल्या आहेत, त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करु नये, तोंडावर पडल्यास लेखक अथवा मिपा जबाबदार नाही.

"पर्‍या , यार मिपावर कोण विचारत नाही बे आपल्याला. इतके लेखन केले, प्रतिक्रीया दिल्या पण चार सदस्य पण धड ओळखत नाहीत." आमचे मित्रवर्य उद्वेगाने म्हणत होते.

"वेडाच आहेस, मिपावर प्रसिद्ध होण्यासाठी फार काही कष्ट लागत नाहीत लेका, चल मी समजावतो तुला." मी त्याला आश्वासन दिले.

मिपावर आजकाल दोन प्रकारचे सदस्य पटकन प्रसिद्ध होतात,

१) विचारजंत

२) टुकार

१) विचारजंत :-

ह्या लोकांना स्वत:विषयी फार म्हणजे फारच कौतुक असते. आपण जे काहि लिहितो ते अतिशय ज्ञानसंपन्न, लोकांना शहाणे करुन सोडणारे म्हणजेच 'लै भारी' असते असा ह्यांचा गोड गैरसमज असतो (माझ्यासारखा). आपले लेखन म्हणजे मिसळपाव इतिहासातील सोनेरी अक्षरे आहेत असेच हे लिहित असतात. खरे तर अक्कल असते शुन्य पण आपण फार मोठे ज्ञानी, सगळ्या विषयातली सगळी अक्कल असल्यासारखे वागणे हे ह्यांचे गुण. आपण फार मोठे विचारवंत आहोत असे ह्यांना वाटु लागते आणी मग जंत झालेल्या माणसला जसे सारखी साखर खावेसे वाटु लागते तसे ह्यांना विचार लिहावेसे वाटु लागते. मग एक दिवस ह्यांचे विचारजंतात रुपांतर होते.

विचारजंत होण्यासाठी करावयाचे उपाय :-

१) सहसा इतरांच्या धाग्यावर प्रतिसाद द्यायचा नाही, दिला तरी तो प्रतिसाद धाग्यापेक्षा मोठा असला पाहिजे ह्याची काळजी घ्या. धागा १० ओळींचा असेल तर तुमचा प्रतिसाद कमीत कमी २० ओळींचा असला पाहिजे.

२) २/३ दिवसातुन अतिशय रटाळ विषयावर धागे काढुन त्यावर त्याहुनही रटाळ चर्चा करीत रहा.

उदा :-

१) राजीव गांधीचा प्रेम विवाह.

२) समाजातील महिलेचे स्थान व अबलांच्या रक्षणासाठी सरकारी कायद्यातील तरतुदींचा अभाव.

३) सिमेंटच्या आधारभुत किंमतीचे फायदे.

४) भजनलाल ह्यांची पुढील कारकीर्द काय असावी ?

ह्या धाग्यात कोणीही प्रतिसाद दिला नाही तरीही आपण लिहितच रहावे, कुण्या नेत्यांची वाक्ये, पुस्तकातील संदर्भ गुगलुन गुगलुन लिहित रहावे. एखादे फेक प्रोफाईल असल्यास स्वत:च्याच धाग्यावर येउन "अतिशय अभ्यासु लेख." "नेहमीप्रमाणेच कसदार व सुंदर लेखन." अशा प्रतिक्रीया द्याव्यात.

३) एका वाक्याची चार वाक्ये बनवता आलीच पाहिजेत. दुसर्‍या सदस्यानी दिलेली माहिती आपण दिल्यासारखा आव आणता आला पाहिजे.

उदा :-

'क्ष' ने एखाद्या विषयावर " १९८७ साली पवारांनी हा नियम आंमलात आणला, त्याला महाजन ह्यांनी अनुमोदन दिले." अशी प्रतिक्रीया दिली असेल, तर आपण लगेच "खरे तर हि कल्पना महाजनांची पण 'वाईज थिंक्स अलाईक' असे काहिसे घडुन ती कल्पना आधी मांडण्याचा मान पवारांनी घेतला, १९८७ साल होते ते (मग त्या वर्षात घडलेल्या एखाद्या घटनेचा उल्लेख करावा. उदा :- १९८७ साल लक्षात रहायचे कारण म्हणजे ह्याच साली अमेरीकन मोटर्स कंपनी ख्राईसलर्स मध्ये विलीन झाली) असे ठोकुन द्यावे. म्हणजे विचार लोकाचे पण ते आपले म्हणुन मांडता आले पाहिजेत.

४) विशेषत: नविन आलेल्या सदस्यांना 'टार्गेट' करावे. ह्यांनी लिहिलेल्या लेखनावर हे लांबच्या लांब 'अभ्यासु प्रतिसाद' द्यावेत. हे लगेच तुमचे फॅन होउन जातात. संपुर्ण कम्युनिटी ज्या सदस्याच्या लेखनाला 'भिकार' म्हणत असेल त्या सदस्याच्या धाग्यावर जाउन हमखास "मस्त लिहिलय, असे वेगवेगळे विषय कसे काय सुचतात तुम्हाला?" अशी प्रतिक्रीया देउन यावी.

आता बघुयात 'टुकार' कसे बनावे. टुकार बनण्यासाठी धागे व तुमचे प्रतिसाद हे दोन्ही जमेल तेव्हडे टुकार असले पाहिजेत. तुमचे लेखन वाचुन लोकांनी डोकीच आपटुन घेतली पाहिजेत. सध्या अशा सदस्यांची फुल्ल चलती आहे .
टुकार होण्यासाठी काय करावे :-

१) प्रथमत: जमेल तेव्हड्या टुकार प्रतिक्रीया द्याव्यात.

उदा :-

१) 'हिटलर एक क्रुरकर्मा' अशा धाग्यावर जाउन "क्रुरकर्मा ? तुम्हाला काय त्रास दिला त्यानी??" अशी एक टुकार आणी हिणकस प्रतिक्रीया द्यावी.

२) कोणी 'शाळेतील गमती जमती' असा धाग काढला तर तिथे जाउन "तुम्ही मोठे कधी होणार?" किंवा "पाळण्यातल्या गंमती जंमतींचा धागा कधी?" अशी प्रतिक्रीया देउन यावी.
अशा प्रतिक्रीयांचे बरेच चाहते असल्याने, ते लगेच तुमची प्रतिक्रीया कॉपी पेस्ट करुन खाली दात दाखवणार्‍या स्मायली काढतात.

३) जमेल तेव्हडा धागा काढणार्‍याचा अथवा त्या धाग्यावर प्रतिक्रीया देणार्‍यांचा अपमान करावा.

उदा :-

'बालविवाह आणी कायदा' असा धागा कोणी काढला की लगेच तिथे जाऊन धागा काढणार्‍याला 'लग्न करा आता म्हणजे असे प्रश्न पडत नाहीत" अथवा " तुमचा बालविवाह मोडला होता का हो?" असे कुच्छीत प्रश्न विचारावेत. एखाद्या प्रतिसादकर्त्याला "काय हो तुम्हाला मुले किती?" असा हलकट प्रश्न विचारावा.

'मिपासाठी आपले योगदान' अशा प्रकारे कोणी धागा काढल्यास "तुमचे सदस्यत्व रद्द करुन घ्या, उपकार होतील' असा एक उगाच हिणकस टोमणा मारुन यावे.

एखाद्या सुंदर कथेवर "लाजवाब, अप्रतिम !" असे लिहुन एकदम खाली, "कुठुन ढापलीत?" असे विचारुन यावे. त्या धाग्यावर 'अगले जनम मोहे बिटिया हि कीजो" वगैरे मालीकांना शिव्या देउन याव्यात. उगाचच कुठल्याही धाग्यावर जाउन "रावण कोणी बघितला का?" अशा चर्चा करुन याव्यात.

एकुण काय तर जेव्हडे टुकार वागता येईल तेव्हडे वागावे. लवकरच आपली (अप)किर्ती मिपावर पसरुन आपण प्रसिद्धी पावाल.

"बदनाम हुए तो क्या ? नाम तो हुआ !!"

-----------------------------------------------------------------------

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

पूर्वपीठिका:

मी मुंबई विद्यापीठाशी संलग्न एका प्रथितयश महाविद्यालयातून बीएमएस (Bachelor of Management Studies) ही पदवी मिळवली आहे. त्यानंतर एका अन्य प्रथितयश महाविद्यालयातून एलएलबी चे पहिले वर्ष पूर्ण केल्यावर असे जाणवते, की आता मला माझे मुख्य ध्येय जे कंपनी सचिव (Company Secretary - Institute of Company Secretaries of India) होणे आहे, त्याला मी एलएलबी च्या अभ्यासा मुळे न्याय देऊ शकत नाहीये.

त्यामुळे मी असा विचार केला की एकाच वेळी एलएलबी आणि सीएस हे दोन आव्हानात्मक अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा आधी सीएस पूर्ण करू आणि त्या सोबत एमकॉम हा अभ्यास क्रम मुंबई विद्यापीठातून करू; मात्र आपल्या मुंबई विद्यापीठातून एमकॉम करता येण्यासाठी Business Management वा Accounts हे दोनच (बहुदा) पर्याय उपलब्ध आहेत, जे मला तितकेसे रोचक वाटत नाहीत. यावर विचार करत असताना अचानक पूर्वस्मृती [साठ्ये महाविद्यालयात एचएससी (कला) शिकत असतानाच्या] जाग्या झालाय आणि इथे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे केंद्र असल्याचे आठवले, इंटरनेट वर अधिक शोध घेतला असता या विद्यापीठाचा एम कॉम (International Business Management) हा अभ्यासक्रम मला निवडण्यास योग्य वाटला. ...

माननीय मिपाकरांना माझा प्रश्न आहे की इन्दिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा कोणी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे का? किंवा आपल्या कोणा महितीतल्या व्यक्तीने इथुन कोणता अभ्यासक्रम पुर्ण केला आहे का / करत आहे का? ह्या विद्यापीठाचा कारभार (परीक्षांची व निकालांची वेळ पाळणे इ.) कसा आहे? की मुंबई विद्यापीठच बरे? आणि एका विद्यापीठातून दुस-या विद्यापीठात प्रवेश घेताना काही विशेष कागदपत्रे जमा करावी लागतात का?

प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.
--
आपला नम्र,
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

फुल्ल सपोर्ट!

मंडळी मी विज्ञानवाद्यांना एक आक्रस्ताळे आव्हान दिले होते.
त्यातून चांगल्या गोष्टी उजेडात आल्या.

महत्त्वाचे म्हणजे शालेय मराठीसाठी खुप लोक काम करायला आनंदाने तयार आहेत.
अनेकांनी मला व्यनिद्वारे कळवले. काही जणांनी मदतीबद्दल तेथेच लिहिले आहे.

मुक्तसुनीत, ३_१४ विक्षिप्त अदिती ,पाषाणभेद, धनंजय, राजेश घासकडवी, भेन्डि बाजार, मन, शानबा५१२, जगताप, विनायक पाचलग, अक्षय पुर्णपात्रे, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

रामपुरी , llपुण्याचे पेशवेll यांनी आपला फुल्ल सपोर्ट असे सांगितले.
मी रुचा, अवलिया यांनी पाठींबा दिला आहे.
अरुंधती यांनी तत्सम काही मिळते आहे का याची चाचपणी केली.
प्रदीप साध्या सोप्या भाषेची आठवण करून दिली.
आप्पा यांनी तर आपली साईटच द्यायची तयारी दाखवली.

या सर्वांचे मनापासून आभार!
श्री. मिसळभोक्ता, टारझन यांनी धागा हलकाफुलका ठेवला त्याबद्दलही आभार!

मी आवाहन करतो की, 'ते आणि आपण' असा भेद बाजूला ठेउन
आपण सगळे मिळून शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेले हे स्थळ कसे असावे यावर चर्चा करू या!

तुमच्या कल्पना येथे मांडा.
मला काही अगदी प्राथमिक असे प्रश्न पडले आहेत, ते देतो. तुमचेही प्रश्न द्या

  • यासाठी प्रकल्प कसा आखावा
  • काल मर्यादा आणि काल निश्चिती कशी असावी
  • किती पैसे नक्की लागतील?
  • पैसे उभे करण्याच्या कल्पना
  • सॉफ्टवेयर कोणते वापरावे? मायक्रोसॉफ्टला गळ घातली तर फुकट देतील का? कशी घालावी?
  • इतर पर्याय?
  • रूप कसे असावे?
  • जोडण्या कश्या द्याव्यात? देता येतील?

तसेच

  • शिक्षकांना प्रशिक्षण हा कार्यक्रम कसा आखावा?
  • प्रशिक्षणात काय द्यावे?
  • संगणक अभ्यासक्रम कसा असला पाहिजे?
  • अनेक विद्यार्थी एकत्र गणित स्पर्धा खेळू शकतील अशी मल्टीयुझर ऍनिमेशन बनण्यासाठी काय केले पाहिजे?
  • की निव्वळ आकडेमोड वापरावी?
  • विज्ञानाच्या संकल्पना कशा मांडाव्यात?
  • की आपण डोके न चालवता, मुलांनाच सांगू द्यावे काय हवे ते?
  • कळफलक कोणता वापरावा? इन्स्क्रीप्ट की गमभन? का?
  • त्याचे प्रशिक्षण कसे आयोजित करावे?
  • मुख्य म्हणजे शाळा शाळांपर्यंत कसे पोहोचावे?
  • प्रकल्प कायम चालू राहण्यासाठी काय केले पाहिजे?
  • विद्यार्थ्यांची सुरक्षा?

यापेक्षाही अजून खोलात जाऊन विचार करण्याची गरज आहे.
तुमच्या सर्व कल्पनांचे स्वागत आहे!

मिसळपावचे विश्वस्त 'लोकविकास' या प्रकल्पासाठी आपली शक्ती पणाला लावतील,
असे मला आनंदयात्रींनी आत्ताच कळवले आहे.
माझ्या आकस्ताळेपणाने जर कुणी त्या धाग्यात सहभागी झाले नसेल, तर त्यांनाही मी येथे येण्याचे आवाहन करतो.

आपला
विधायक गुंडोपंत

वातानुकुलित आराम!

नमस्कार,

आज मितीला माझे वय सुमारे २१ वर्षे आणि ७ महिने आहे.

नुकतेच माझ्या अभ्यास व शयन कक्षा मधील वातावरण चांगले रहावे, मन प्रसन्न राहावे आणि पर्यायाने अभ्यास चांगला व्हावा म्हणून माझ्या कक्षामध्ये एक १.० टनाचे वातानुकूलन संयंत्र लावले. तर, सांगायचा मुद्दा असा की हे संयंत्र लावल्यापासून मला मोठ्या प्रमाणावर सर्दी आणि डोकेदुखी चा त्रास होऊ लागला आहे, ज्याचा थेट परिणाम माझ्या मनस्वास्थ्यावर आणि अभ्यासावर जाणवतो आहे.

या निमित्ताने आपल्या माननीय सभासदांनी आपाल्या स्वानुभवातून अथवा इंटरनेट वरील प्राप्त माहितीतून निम्नलिखित बाबींवर प्रकाश टाकल्यास ते मला व अन्य वाचनकर्त्यांना फार मोलाचे ठरेल:

१. वानाकुलीत कक्षा मध्ये थोडा वेळ अथवा जास्त वेळ वावरल्याने आरोग्यावर होणारे दीर्घ व लघु कालीन परिणाम,
२. वरील मुद्दा क्र १ मधील परिणाम टाळण्यासाठी करता येण्याजोग्या गोष्टी,
३. अन्य काही संबधित.

--
प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत,
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

महिला कारागृहात काही तास

आजची काही माझी तुरुंगातली पहिली वेळ नव्हती. ह्या आधीही दोनदा आले होते मी इथे. पण दोन्ही खेपेस जरा घाईगडबडीत होते. ह्या वेळेला मात्र ठरवले होते की निवांतपणे जायचे. गेल्या खेपांमध्ये फक्त स्त्री कैद्यांच्या बराकी, भटारखाना आणि रोजगार प्रशिक्षणाची पत्र्याची शेड एवढाच परिसर ओझरता पाहिलेला. त्या भेटीत पाहिलेल्या बराकींमध्ये भिंतीलगत गुंडाळून ठेवलेल्या वळकट्या व दोर्‍यांवर लटकणार्‍या कपड्यांखेरीज ओक्याबोक्या भिंती होत्या फक्त! आणि त्याच दिवशी एका कैदी स्त्रीने आवारातील दुरुस्ती-कामासाठी आणलेली बांबूची शिडी वापरून जेलच्या भिंतीवरून उडी टाकून पळून जायचा असफल प्रयत्न केला होता - त्यामुळे चालू असणारा गदारोळ होता तिथे! शिवाय त्या बाकी कैद्यांच्या निर्विकार नजरा.

स्थळ होते पुण्याच्या येरवड्याच्या महिला तुरुंगाचे. वेळोवेळी काही प्रसिद्ध तर काही कुख्यात व्यक्तींमुळे येरवडा तुरुंग कायमच चर्चेत राहिला. पुणे शहराकडून येरवड्याला जाताना रस्त्याच्या एका बाजूला दिसणारी त्याची काळीकभिन्न, छाती दडपविणारी उंच तट-भिंतच मी आतापर्यंत पाहत राहिले. पण कधी आतही डोकावेन असे स्वप्नात वाटले नव्हते.

एका आंतरराष्ट्रीय महिला क्लबच्या पुणे शाखेने मला एका समाजसेवी संस्थेमार्फ़त येरवड्याच्या महिला तुरुंगात तेथील कैद्यांसमवेत सत्संग करण्यासाठी खास आमंत्रित केले होते. जवळपास दोन-तीन वर्षांपूर्वीची, म्हणजे महिलांसाठी ''खुल्या कारागृहाची'' सुविधा उपलब्ध होण्याअगोदरची ही घटना. माझ्याबरोबर इतर गायक कलाकार, वाद्यवृंद व संस्थेचे दोन-तीन स्वयंसेवक होते.

त्या दिवशी भर दुपारी गाडीतून तुरुंगाच्या आवारात, रणरणत्या उन्हात पाऊल टाकल्यावर काही क्षण आम्ही अक्षरशः भाजून निघालो. हवेत विलक्षण उकाडा. पण तुरुंगाच्या प्रवेशद्वारापाशी लेडीज क्लबच्या हसऱ्या सदस्या आमच्या स्वागताला सज्ज असलेल्या पाहून छान वाटले. ह्या सदस्या गेले अनेक महिने महिला कैद्यांसाठी तुरुंगात उपक्रम राबवित असल्याने तेथील वातावरणाला सरावल्या होत्या. स्त्री कैद्यांसाठी सतत काही ना काही चांगले करण्याच्या त्यांच्या धडपडीचे खरेच कौतुक करावेसे वाटत होते. सुरुवातीची काही मिनिटे आम्ही तेथील सुरक्षा कर्मचारी, तुरुंगात अभ्यासक्रमाचा भाग म्हणून भेटीदाखल येणाऱ्या समाजसेवा अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी व सेवाकार्यासाठी नेहमी येणाऱ्या महिला क्लबच्या सदस्या यांच्याशी बोलून कैद्यांविषयी माहिती घेण्यात घालवला.

येथील बऱ्याचशा महिला ह्या 'अंडरट्रायल' आहेत हे समजले. म्हणजे त्यांच्यावरचे आरोप अजून सिद्ध झाले नाहीत व त्यांच्यावरचे दावे कोर्टात चालू आहेत. त्यामुळे त्या कैद्यांच्या संख्येत रोजच भर किंवा घट होत असते. काहीजणींना जामीन मिळतो, काहीजणींना जामीन मिळूनही त्याचे पैसे भरता न आल्याने पुन्हा तुरुंगातच राहावे लागते. बऱ्याचजणी विवाहितेचा छळ, मारामारी,चोऱ्या -दरोडे आणि अन्य किरकोळ गुन्ह्यांमध्ये अडकून तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. खुनाच्या किंवा गंभीर आरोपांखाली तुरुंगात असलेल्या महिला खूपच कमी आहेत. शिक्षा भोगून बाहेर पडणार्‍या महिलांचे पुनर्वसन हीदेखील मोठी समस्या असल्याचे कळले. घरचे, नातेवाईक, गावातले लोक त्यांना अनेकदा स्वीकारत नाहीत. मादक पदार्थ बाळगणे - सेवन करणे इ. इ. आरोपांवरून काही परदेशी महिलाही आत आहेत. अनेक गरीब, अनाथ महिला केवळ बाळंतपण सरकारी खर्चाने सुखरूप व्हावे व आपला व बाळाचा उदरनिर्वाह काही महिने तरी व्यवस्थित व्हावा ह्यापायी गर्भारपणाचे दिवस भरत आले की किरकोळ गुन्हे करून पकडल्या जातात व नंतर तुरुंगात सरकारी इतमामाने बाळंतपण करून घेतात हेही विदारक वास्तव समजले. तसेच दुसऱ्याच कोणी गुन्हा करून हकनाक गुन्ह्यात गोवलेल्या महिलाही येथे बऱ्याच आहेत. खूपशा महिला ग्रामीण भागातील असून त्यांचे फारसे शिक्षणही झालेले नाही. बाळंत झालेल्या किंवा ज्यांची मुले अगदी लहान आहेत त्या महिलांना येथे आपल्यासोबत आपली मुले ठेवण्याची मुभा असते. त्या मुलांच्या राहण्या-खाण्या-कपड्यालत्त्याचा, औषधाचा व शिक्षणाचा खर्च सरकार करते.

सुरक्षा तपासणी वगैरे उरकून, सोबतच्या चीजवस्तू पहाऱ्याकडे सोपवून, रजिस्टरवर सह्या ठोकून आम्ही त्या अरुंद (बरोबर! अगदी पिक्चरमध्ये दाखवतात तशा) छोट्या दरवाज्यातून आपापली डोकी सांभाळत आत शिरलो. सोबत महिला सुरक्षा कर्मचारी होत्याच, त्यांच्या हातात मस्त दंडुकेही होते. आवारात ह्या खेपेस कोणी महिला कैदी दिसत नव्हत्या. बहुतेक सगळ्याजणी सत्संगाच्या ठिकाणी जमल्या असाव्यात किंवा आपापल्या केसेससाठी कोर्टात गेल्या असाव्यात.

जाता जाता आम्हाला एकांत कोठड्यांचेही दर्शन झाले. तिन्ही बाजूंनी भिंती, कोणतीही प्रायव्हसी नसलेल्या, एक बाजू पूर्ण जाळी व गजांनी आच्छादित बंदिस्त अशा स्वरूपाच्या त्या अरुंद, चौकोनी, अंधाऱ्या खोल्या बघताना उगाचच अंगावर शहारा आला. आवारातल्या झाडाझुडुपांच्या मधून काढलेल्या पायवाटेने जात आम्ही सत्संगाच्या ठिकाणी पोचलो. पत्र्याचे छत असलेली ही एक लांबलचक खोली. खिडक्यांना भरभक्कम गज. आत शिरायला एकच दरवाजा आणि तोही छोटासा. गेल्या खेपेस आले होते तेव्हा ही फक्त पत्र्याची शेड होती. आता तिथे पक्के काम करून महिलांना रोजगार प्रशिक्षण देण्याची सोय केलेली दिसत होती. खोलीच्या एका कोपऱ्यात सरकावून ठेवलेली शिवण- विणकाम यंत्रे, कपडे वाळत घालण्याच्या दोऱ्यांवरचे दीनवाणे कपडे बरेच काही सांगून जात होते. समोर साधारण दीडशे-दोनशे महिला कैदी शिस्तीत सतरंज्यांवर आमची वाट बघत बसलेल्या. ''साऊंड''वाल्याची सर्व सेटिंग्ज पूर्ण होईपर्यंत तेथील स्टेजवर आम्ही वाद्यांची जुळवाजुळव केली. एका स्वयंसेवकाने लिलीच्या फुलांचा भरघोस, टवटवीत हार आणला होता. तो तेथील वेदीवरील सर्वधर्मीय ईश्वर प्रतिमांना एकत्रितपणे घातल्यावर त्या काहीशा कोंदट, घामेजल्या हवेत चैतन्याचा दरवळ पसरला.

ध्वनिक्षेपक सुरू होताच मी सर्वांना सत्संगात सामील होण्याचे आवाहन केले. समोरून ढिम्म प्रतिसाद. अर्थात ते अपेक्षित होतेच! सर्व बायका कोऱ्या, उखडलेल्या चेहऱ्यांनी बसलेल्या. एक डोळा सुरक्षा कर्मचाऱ्यांवर व एक आमच्यावर. साहजिकच होते म्हणा.... त्या सगळ्याजणी दाटीवाटीने भर उकाड्यात आमची वाट पाहत बसलेल्या. त्यातून वॉर्डनचा व सुरक्षा कर्मचाऱ्यांचा टरका डोळा आणि दुसरीकडे मनातली धुसफूस... त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करणेच चुकीचे होते.

मी काही क्षण डोळे मिटले, मनातले सर्व विचार समर्पित केले आणि शांत मनाने सत्संगाची सुरुवात नेहमीप्रमाणे अतिशय सोप्या गणेशवंदनेने केली. तबला, गिटार, सहगायकाचे व टाळाचे स्वर एकमेकांमध्ये मिसळून वातावरणात उत्साहाची पेरणी करत होते. पण अजून समोरून थंड प्रतिसाद होता. नाही म्हणायला बऱ्याच बायका हात जोडून बसल्या होत्या किंवा तालावर टाळ्या वाजवत होत्या. पण चेहरे व देहबोली अजून तशीच होती... आखडलेली, आक्रसलेली. त्या गणेश भजनाचा समारोप केल्यावर मी पुन्हा एकदा सर्व महिलांना माझ्या बरोबर, चुकत माकत का होईना, गाण्याचे आवाहन केले. संगीताच्या सुरांमधील मन हलके करण्याची जादू त्यांनी अनुभवावी, काही क्षण साऱ्या चिंता बाजूला ठेवून गाण्यात स्वतःला मुक्तपणे झोकून द्यावे असे मला प्रामाणिकपणे वाटत होते.

येथे सर्व धर्मांच्या स्त्रिया होत्या. म्हणूनच नंतरचे भजन सर्व-धर्म-समावेशक घेतले. अल्लाहचे नाव आल्यावर पुढे बसलेल्या तिघी-चौघींच्या कळ्या खुलल्या आणि त्या जरा मोकळेपणाने टाळ्या वाजवू लागल्या. बुद्धाचे नाव येताक्षणी अजून काही चेहरे उजळले. विठ्ठलाचे नाव आल्याबरोबर नऊवारी, पाचवारीतल्या, ग्रामीण भागातून आलेल्या अनेक महिला कैदी जोषाने टाळ्या वाजवू लागल्या. जीझसचा पुकारा करताक्षणी सहाव्या-सातव्या ओळीत बसलेल्या तीन-चार आंग्ल युवती डोलू लागल्या. थोडक्यात काय, समोरच्या श्रोत्यांमध्ये आता थोडा उत्साह दिसू लागला होता. काहीजणींच्या चर्येवर अस्फुटसे स्मितही उमटले होते. त्यांच्या त्या स्मितानेच मला अजून ऊर्जा मिळत होती.

मग पुढेही आम्ही म्हणायला सोपी, वेगवान, नादपूर्ण भजने गाऊ लागलो. सुरुवातीला गाताना संकोच करणाऱ्या बायका हळूहळू भीड चेपली जाऊन खुलेपणाने गाऊ लागल्या होत्या. मध्येच दोन-तीन बायका खोलीच्या मागच्या बाजूला उभ्या राहून भजनाच्या तालावर डोलू-नाचू लागल्या. विठ्ठलाचे भजन सुरू झाल्यावर तर चित्रच पालटले. डोळे मिटून, तालावर पावले टाकणाऱ्या महिलांना अजून काहीजणी सामील झाल्या. त्यांचा नाच फेर धरून जसजसा रंगात येऊ लागला तसतशा त्या आंग्ल युवतीही उठून त्यांच्या परीने ठेका धरत नाचू लागल्या. आता माझ्या समोर बसलेल्या बायकांनाही हुरूप आला. आपापल्या साड्या झटकत, पदर खोचून त्यातील काहीजणी फुगडी, काहीजणी झिम्मा खेळू लागल्या. एका वेळी दोन-दोन, तीन-तीन जोड्या फुगड्या खेळत होत्या. कोणाचा विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने वातावरण खेळकर बनले. झिम्मा खेळताना त्यांचे चेहरे फुलून आले होते. चुरशीच्या फुगडीत त्यांना शरीर झोकून मस्त रममाण होताना पाहून त्याच का त्या मगाच्या निर्विकार-कोऱ्या चेहऱ्यांच्या, सुन्न बसलेल्या किंवा खुन्नस देऊन पाहणाऱ्या बायका, असा प्रश्न कोणालाही पडला असता. बघता बघता काही तुरळक कैद्यांचा अपवाद सोडला तर बाकी सर्व बायका नाचू, गाऊ लागल्या होत्या. चेहर्‍यावरच्या रागाची, नैराश्याची, असमाधानाची जागा आता प्रफुल्लित खेळकरपणाने घेतली होती. काहीजणी डोळे मिटून तल्लीन होऊन एकट्याच नाचत होत्या. गतिमान गाण्यांसोबत त्यांची पावलेही थिरकत होती.

वेळ संपत आली तशी हळूहळू गाण्यांची गती मंदावत आम्ही भजने थांबविली. सर्वांना डोळे मिटून शांत बसायला सांगितले. धपापत्या उरांनी, घामाने डवरलेल्या चेहऱ्याने स्थानापन्न होत सर्व बायकांनी आज्ञाधारकपणे डोळे मिटले आणि आपला श्वास सावरायची वाट पाहू लागल्या. काही बायका अजूनही टक्क, साशंक डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत होत्या. डोळे बंद करायची त्यांची अजिबात तयारी नव्हती. मी सर्वांना आपल्या श्वासाकडे लक्ष घेऊन जायला सांगितले. शरीरात निर्माण झालेली ऊर्जा अनुभवायला सांगितली. त्यांचे एक छोटेसे, मन शांत करणारे ध्यान घेतल्यावर त्यांना जेव्हा डोळे उघडायला सांगितले तेव्हा कित्येकींच्या चेहऱ्यांवर हास्यरेषा उमटल्या होत्या. जणू त्या काही मिनिटांमध्ये निर्व्याज समाधानाचा सुगंधी दरवळ त्यांनी अनुभवला होता!

..... पण वास्तवही वेगळे असते! सत्संग संपल्याचे सूचित केल्यावर महिला क्लबच्या सदस्यांनी माईकचा ताबा घेतला. तेथील स्त्री कैद्यांच्या छोट्या मुलांसाठी त्यांनी नव्या कोऱ्या, फुगे - झिरमिळ्या लावलेल्या तीन-चाकी सायकली आणल्या होत्या. सायकली पाहिल्यावर एवढा वेळ बाहेर दंगा करणारी ती छोटुकली मुले हरखून गेली. कोण सायकलवर पुढे बसणार, कोण मागे ह्यावर त्यांच्यात चढाओढच सुरू झाली. एव्हाना सुरक्षा कर्मचारी पुढे सरसावल्या होत्याच... तरीही त्या कैद्यांपैकी आठ-दहाजणी लाजत, एकमेकींना ढकलत पुढे येऊन कार्यक्रम आवडल्याचे सांगून गेल्या. आंग्ल युवतींमधील एकजण धिटाईने पुढे आली आणि ती भायखळा तुरुंगात असताना, मनातली आशा पूर्ण तुटत चालली असताना तिथे झालेल्या अशाच सत्संगाने तिला कसा मानसिक आधार दिला होता ते व आजचा सत्संग आवडल्याचे सांगून गेली. आमच्याकडे येणाऱ्या महिलांची गर्दी वाढल्यावर सुरक्षा कर्मचारी दंडुके परजत पुढे आले. मग लगेच पांगापांग! आमच्यात व महिला कैद्यांमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांची एक फळीच उभी राहिली. आता कटायची वेळ आली होती. संयोजक व वॉर्डनसकट इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांचे अनौपचारिक आभार मानून आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. बाहेर मुलांचा नव्या सायकली पादडण्याचा व आनंदाने चित्कारण्याचा कार्यक्रम रंगात आला होता. त्यांना ह्या तुरुंगाबाहेरचे जग माहीत होते की नाही, कोणास ठाऊक!

तुरुंगाच्या बाहेर पडलो तसे एवढा वेळ संपर्क तुटलेले बाकीचे सामान्य जग पुन्हा पुकारू लागले. निघण्यासाठी गाडीत मी बसते न बसते तोच मोबाईल खणखणला. ''किती वेळा ट्राय केला तुझा मोबाईल, पण कॉल लागतच नव्हता! '' पलीकडून माझी मैत्रीण ठो ठो करत होती, ''कुठे आहेस? काय करत होतीस? '' गाडीतल्या माझ्या सहकारी मित्रांकडे एक मिष्किल कटाक्ष टाकून मी सहज उत्तरले, ''काही नाही गं, येरवडा जेलमध्ये होते जरा... पण पोचते आहे घरी अर्ध्या-पाऊण तासात, तेव्हा बोलू! '' तिला पुढे काही बोलू न देता मी फोन बंद केला आणि बाकीच्यांच्या हास्यात सामील झाले! मनात समाधानही होते आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्याचा आनंदही..... आज काही काळासाठी का होईना, त्या कैद भोगत असलेल्या स्त्रिया आपले सर्व राग, लोभ, मत्सर, चिंता, नैराश्य विसरून संगीत-नृत्यात आनंदाने तल्लीन झाल्या होत्या. त्यांना मोकळेपणाने हसताना, खेळताना आणि आपल्या मुलांच्या आनंदाने हरखून जाताना पाहूनच मन भरून आले होते. ईश्वराकडे त्यांना आयुष्यात योग्य मार्ग सापडून त्यांची घडी पुन्हा एकवार बसावी आणि गुन्हेगारीच्या वाट्याला जाण्याची वेळ त्यांच्यावर परत कधी येऊच नये अशी मनोमन प्रार्थना करत मी घराच्या वाटेला लागले.

-- अरुंधती कुलकर्णी

http://iravatik.blogspot.com/

आजचे बलुतेदार

तुमचा पेशा तुम्हाला आवडतो का? त्यात थोडंफार वेगळेपण आहे का? तुम्हाला त्याबद्दल लिहायला आवडेल का? मग माझ्या पुस्तक प्रकल्पात सहभागी होण्याचा विचार करा.

बाजारात उपलब्ध असलेली बहुतेक "करीअर गाइडस" ही व्यवसायाची निवड, कॉलेजांच्या याद्या, परीक्शांची वेळापत्रके, फी, आणि फॊर्म्स यात अडकलेली दिसतात. मुलाखत देण्यांबाबत सल्लेही असतात. मात्र एकदा एखादा व्यवसाय निवडल्यावर त्यातील आयुष्य कसं असतं याबद्दल माहिती अभावानेच आढळते.

या पुस्तकात वेगवेगळ्या ३०-३५ क्षेत्रांतील व्यावसायिक आपापले अनुभव सांगणार आहेत. त्यात त्यांच्या पेशांचं गुणगान नसलं तरच नवल, पण त्याबरोबरच त्यांची आव्हाने, त्यांना करायला लागणार्या तडजोडी, आणि कदाचित फ्र्स्ट्रेशन्सही असतील. "माझं करियर" पेक्शा "माझ्या दृष्टीकोनातून माझा पेशा" असं त्याचं स्वरूप असेल. वाचकवर्ग असेल दहावी-बारावी-कॉलेजच्या पुढची-मागची मुलं, त्यांचे पालक, आणि पेशांच्या/लेखांच्या वैविध्यामुळे सर्वसामान्य चोखंदळ वाचकही. मराठी आव्रुती पुण्यातील एक अग्रगण्य प्रकाशन संस्था करणार आहे, तर इंग्रजी आव्रुत्तीसाठीही प्रकाशक तयार आहे. आतापर्यंत खालील पेशांचा सहभाग नक्की झाला आहे, आणि त्यांची लिखाणंही पूर्ण होत आली आहेत:

रेडियो जॉकी, टेक्निकल रायटर, कंपनी सेक्रेटरी, जेमॉलॉजिस्ट, चाइल्ड सायकॉलॉजिस्ट, शेफ, भाषांतरकार/अनुवादक, एन्वायर्न्मेंटल प्लॅनर, पशुवैद्य, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉयर, साउंड रेकॉर्डिस्ट, सेल्स मॅनेजर, अ‍ॅनिमेटर, टीवी कलाकार, एम पी एस सी ऑफिसर, एंटर्टेन्मेंट जर्नालिस्ट, स्पोर्ट्स ट्रेनर, "टीच फॉर इंडिया" फेलो, क्लिअरिंग आणि फोरवर्डिंग एजंट, टूर लीडर, मर्चंट नेवीमन

निवडीसाठी काही ढोबळ निकष लावले आहेतः
- साधासुधा डॉक्टर, इंजिनीयर, आयटीवाला नको (म्हणजे मी स्वतःही बाहेर)
- पेशा अगदीच "रेअर" नसावा, पण "हटके" असल्यास बरं
- त्या त्या क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी वगैरे केलेली असण्याची अट नाही
- शक्यतो भारतातच कारकीर्द हवी आहे
- पुस्तकाच्या रॉयल्टीची सर्व रक्कम एका संस्थेला अर्पण होणार असल्याने, कुठल्याही आर्थिक मोबदल्याच्या अपेक्षा नसावी

सविस्तर माहितीसाठी मला खालील ईपत्त्त्यावर थेट संपर्क करा: एम एम अंडरस्कोअर जोशी अ‍ॅट हॉटमेल डॉट कॉम

तुमच्या ओळखीतल्या एखाद्याची/एखादीचा आठवण झाली तरी त्या व्यक्तीशी माझ्याशी गाठ घालून द्या.

धन्यवाद!

- कोंबडी

कळकळीचे आवाहन - मदत

मित्र मैत्रिणिंनो,
तुम्ही सगळेच मोठ्या मनाचे आहात.
ह्या न त्या कारणाने तुम्ही मदत करता मग ती कुठलीही असो हे हल्लीच सिद्ध झाले आहे.
मला सुध्दा एक मदत अपेक्शित आहे.
क्रुपया chuchu.marathe10 ह्या माझ्या आय्डीला तुमची शेजारीण म्हणुन तुमच्या शेतात अ‍ॅड करुन घ्या.
मला माझे शेत अपग्रेड करायचे आहे.
तुम्हाला मी गिफ्ट म्हणुन ह्यान त्या हस्ते ३% आपलं हे न ते काहितरी गिफ्त पाठ्वत जाइन.
तुमची,
(कश्टकरी) चुचु

Syndicate content
Scroll to Top